Thursday, January 16, 2025

शेकडो कार्यकर्त्यांचे "मितवा"- सुहास आजगांवकर


नमस्कार. मला जर कोणी विचारलं की तुझ्या पाहण्यामध्ये असा कोणी आहे का जो कधीच तणावात दिसत नाही, जो कधीच अति गंभीर असत नाही आणि जो कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीतही चेहर्‍यावरचं हसू गमावत नाही तर माझ्या डोळ्यापुढे एकच नाव येतं. आणि खात्रीने सांगू शकतो की हाच प्रश्न इतर अनेक लोकांना विचारला, तरी ते त्याच व्यक्तीचं नाव घेतील. हा प्रश्न व हे दुर्मिळ गुण असणं म्हणजे ध्यान जमणं आहे. कितीही आणीबाणी येऊ दे, कितीही खडतर परिस्थितीचं ओझं येऊ दे किंवा कितीही गंभीर स्थिती असू दे, जो माणूस प्रसन्नचित्त राहतो तो खूप वेगळा असतो. सुहासभाऊंचे मित्र, त्यांनी ज्या ज्या प्रकल्पांमध्ये काम केलंय तिथले ताई- दादा माझ्या वाक्याशी खात्रीने सहमत होतील. आणीबाणी- मग ती कोणतीही असेल- संस्थेमध्ये बाहेरून मंडळी भेटायला आली आहेत आणि त्यांना नेणार्‍या गाडीचा ड्रायव्हर फोनच उचलत नाहीय, किंवा प्रकल्पासाठी डॉक्युमेंटस सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि फिल्ड वर्कर्सकडून डेटाच आलेला नाहीय. तरीही ज्यांची शांती ढळत नाही, कितीही ताण होऊनही ज्यांचं एक खट्याळ असं हसू लोप पावत नाही ते सुहासभाऊ! हास्यवदनी सुहासभाऊ! आणि शेकडो जणांचे जिव्हाळ्याचे "मितवा" अर्थात् मित्र- तत्त्वचिंतक आणि वाटाडे!
 


 

आज सुहासभाऊ- डॉ. (सुहास) सखाराम सद्गुरू आजगांवकर संभाजीनगरमध्ये (पूर्वीचं औरंगाबाद) सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते मुळचे कोकणातले. आज ग्रामीण विकास, सेंद्रीय शेती, पीकशास्त्र, जल संवर्धन, पर्यावरण, नैसर्गिक स्रोतांचं व्यवस्थापन, उपजीविका अशा विविध विषयांमधले ते तज्ज्ञ आहेत. अगदी गावच नव्हे तर वाड्या- वस्त्यांवर काम केल्याचा १८ वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आज ते व्यवस्थापनाचं काम करत असले तरी त्यांचा मूळ पिंड कार्यकर्त्याचा आणि माणसांना जोडणार्‍या संघटकाचा आहे. आणि संघटक म्हणजे गंभीर चेहर्‍याचा व उपदेशांना वाहून घेतलेला अजिबात नाही! आनंदी व हसतमुख चेहरा आणि प्रसंगी तर अजिबातही गंभीर न होणारा स्वभाव! ह्याचं‌ एक उदाहरण म्हणजे सुहासभाऊंचा असा औपचारिक परिचय जेव्हा नवीन माणसाला करून दिला जातो, तेव्हा ते खूप हसतात आणि मग परिचय करून देणार्‍यालाच सांगतात, माझ्याबद्दल हे जे गैरसमज तुम्ही पसरवत आहात, ते कसे खोटे आहेत हेच मी आता सिद्ध करतो! स्वत:बद्दल काही बोलू न देणारे सुहासभाऊ जेव्हा दुसर्‍या माणसाची ओळख समोरच्याला करून देतात, तेव्हा मात्र त्यांची वाणी जणू पावसाळ्यातली संततधार होते!
 

सुहासभाऊ अनुभवावं लागणारं रसायन आहे. व्यावहारिक भाषेत सांगायचं तर त्यांची जडण घडण रत्नागिरीजवळच्या एका लहान गावात झाली. विद्यार्थी जीवनात ते विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. दापोलीमध्ये कृषि महाविद्यालयामध्ये बीएससी केल्यानंतर एमएससी करण्याच्या आधी तीन महिन्यांचा काळ असतो. त्यावेळी विद्यार्थी परिषदेने त्यांना वनवासी कल्याण आश्रमासाठी काम करा, असं सुचवलं. तेव्हा जनसेवा फाउंडेशनच्या डॉ. दफ्तरदार सरांच्या सांगण्यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये बारीपाडा- पिंपळनेर व नवापूर ह्या परिसरात त्यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी काम सुरू‌ केलं. ते वर्षं २००० होतं. तीन महिन्यांच्या खरीफ हंगामात काम करण्यासाठी शेतीचं पुस्तकी शिक्षण घेऊन आलेला तो तरूण. पुस्तकात शिकवलेलं शास्त्र व प्रत्यक्ष शेती आणि लोकांसोबत काम करण्याचा अनुभव. सुरूवातीला खूप धडपडले, चाचपडले. आदिवासी भाषाच शिकायला त्यांना एक वर्षं लागलं. एक एक गोष्टी कळायला वेळ लागला. पण तिथले स्थानिक व कार्यकर्ते- चैतराम पवार, भैया पवार, कल्पनाताई जाधव, डॉ. दफ्तरदार सर, रशीद गावीत, मौल्या गावीत आणि प्रयोगशील शेतकर्‍यांकडून शिकत गेले. इतकं शिकत गेले आणि कामाच्या प्रवाहाशी इतके समरस झाले की, सुट्टीचे तीन महिने कधी संपले कळालंच नाही. ह्यावर्षी काम करू, पुढच्या वर्षी एमएससी करू, असं करत करत एक एक वर्षं मागे पडत गेलं आणि तब्बल सात वर्षे सुहासभाऊंनी वनवासी कल्याण आश्रमासोबत आणि जनसेवा फाउंडेशनसोबत काम केलं. आजच्या काळात कोणी एक तास समाजासाठी दिला तर त्याचे ढोल एक महिना वाजवले जातात. आज आपल्याला जवळ जवळ कल्पना करणं कठीण आहे की, काही माणसं अशीही निस्वार्थी असतात आणि केवळ दुस-यांसाठी झटतात! केवळ तीन महिन्यांच्या सुट्टीतला उद्योग म्हणून आलेले सुहासभाऊ तब्बल सात वर्षं तिथेच राहिले! आज ह्याची कल्पनाच आपण करू शकत नाही.
 

वनवासी कल्याण आश्रमच नव्हे तर तिथे असलेले विविध गांव पातळीवरील शेतीतले प्रयोग, ग्रामीण विकासामध्ये काम करणारे शेतकरी, कृषि तंत्रज्ञानातले वैज्ञानिक व तज्ज्ञ ह्यांच्याकडून शिकत गेले. पुस्तकी ज्ञान शिकून आलेला एक तरूण वाड्या- पाड्यांच्या मातीशी एकरूप झाला आणि कुशल संघटक म्हणून तर घडलाच, पण त्याबरोबर अष्टपैलू आणि अष्टावधानी झाला. विद्यार्थी म्हणून सुधारित तंत्रज्ञानाची शेती व ग्राम विकासाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी झाला पण पुढे जाऊन त्यामधला एक महत्त्वाचा मार्गदर्शक बनला. धुळे- नंदुरबार आणि गुजरातमधला डांग जिल्हा ह्या सर्व परिसरात सुरू असलेल्या विविध ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी तर झालेच पण एक दीपस्तंभ बनले. पुढे जाऊन कार्यकर्त्यांना जोडणारे संघटक आणि अर्थातच शेकडोंचे मित्र- तत्त्वचिंतक आणि वाटाडेही बनले. महिने, वर्षं मागे पडत गेले आणि सुहासभाऊंचं एमएससी राहिलंच! नंतर तर त्यांच्या कामाच्या ओढीमुळे त्यांचं ते करता करता तेव्हा राहिलं. आणि पुढे खूप नंतर पर्यावरणामध्ये त्यांनी एमएससी केलं आणि त्याही पुढे जाऊन संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. विद्यार्थी ते कार्यकर्ता- संघटक ते परत विद्यार्थी व वैज्ञानिक अशी वेगळी परिक्रमा त्यांनी पूर्ण केली.
 

हे जाणून घेताना सुहासभाऊ आणि त्यांच्यासारखे इतरही अनेक कार्यकर्ते ज्या संरचनेमध्ये घडले, ती संरचना समजून घ्यावी‌ अशी आहे. अनेक कार्यकर्ते व गट- संस्था जेव्हा काम करतात, तेव्हा एक काम तर औपचारिक असतं. किंवा तांत्रिक असतं. पण त्याही पलीकडे एक काम अदृश्य असतं. ते म्हणजे मन जोडण्याचं आणि नवीन लोकांना सोबत आणण्याचं. तेही तितकंच महत्त्वाचं. जेव्हा असे अनेक लोक जोडले जातात, तेव्हा त्यात असे कार्यकर्ते सापडतात, असे मार्गदर्शक सापडतात किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर इनोव्हेटर्स समोर येतात. पण त्यासाठी आवश्यक असतो तो संपर्क आणि संवाद. बोलने से सब होता है! लोकांमध्ये जाणं, भेटणं, बोलणं, मिसळणं, ह्यामधून अशा गोष्टी आपोआप घडत जातात. एक घुसळण होते. समस्याही कळतात आणि उत्तरंही समोर येतात. सामाजिक प्रयोगही उभे राहतात आणि कार्यकर्तेही घडत जातात. आणि म्हणूनच असा संवाद व जिव्हाळा जिथे असतो तिथे प्रोजेक्ट संपला, योजना बंद पडली तरी काम सुरूच राहतं आणि मन जोडलेलं राहतं. पण थोडं मागे जाऊया.
 

सात वर्षं धुळे- नंदुरबार परिसरात काम केल्यानंतर २००७ नंतर कौटुंबिक जवाबदारीमुळे सुहासभाऊंनी तेव्हाच्या औरंगाबादमध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामध्ये काम सुरू‌ केलं. संस्थेचं‌ नावसुद्धा किती बोलकं आहे! सावित्रीबाई फुले! आणि महिलांसाठी काम करणारी संस्था, पण एकात्म समाज म्हणून काम करणारी! धुळे जिल्ह्यात वार्सा येथे वनवासी कल्याण आश्रमात एक दशकभर आरोग्य सेवेसाठी कार्यरत राहिलेल्या डॉ. आनंद फाटक आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा फाटक ह्यांच्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने संभाजीनगर शहर व ग्रामीण भागात विविध विषयांवर काम सुरू केलं होतं. तिथे सुहासभाऊ आपली तळमळ, लोकांबद्दल जिव्हाळा आणि अनुभवाची शिदोरी घेऊन रुजू झाले. परत एकदा सुहासभाऊंना नवीन विषय, नवीन क्षेत्र, नवीन संदर्भ व नवीन आव्हानं मिळाली. काळही बदलत होता.
 

जेव्हा जीवन एखाद्या व्यक्तीला इतके गुण देतं, तेव्हा त्या गुणांची पारख असलेले गुणी जनही देतं आणि त्या गुणांचा विनियोग होईल ह्याची संधीही देतं. अनेक विषयांमधले तज्ज्ञ, कार्यकर्ते, विविध संस्था ह्यांच्या संपर्कात सुहासभाऊंचं काम आणखी बहरत गेलं. प्रपंचाच्या आघाडीवर त्यांना साथ द्यायला सामाजिक क्षेत्रातच कार्यरत असलेल्या सहधर्मचारिणी अनिता ताई लाभल्या. जरी सुहासभाऊ एका संस्थेमध्ये रुजू झाले व त्यांनी नवीन इनिंग सुरू झाली असली तरी ते सदैव धुळे- नंदुरबार- डांग आणि इतरही ठिकाणच्या कामाच्या व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले. तिथे अधून मधून जात राहिले. रशीद गावीत ह्यांचा नवापूरमधला बळीराजा कृषक गट असेल किंवा नंतरच्या काळात बारीपाडासारख्या आदर्श गावाच्या ठिकाणी झालेले आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे प्रयोग असतील, तिथे सुहासभाऊ सक्रिय राहिले. असंख्य कार्यकर्त्यांशी जोडलेले राहिले. मदतीसाठी सदैव तयार राहिले. सावित्रीबाई फुले संस्थेने त्यांना संभाजीनगर व जालना जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र दिलं. पुढच्या टप्प्यावर सचिव म्हणून संस्थेच्या कार्याचं नेतृत्व त्यांनी केलं. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकर्‍यांचे व महिलांचे प्रश्न कसे सोडवता येतील ह्या दिशेने त्यांनी योगदान दिलं आणि आजही देत आहेत. एका विद्यार्थ्यापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात कार्यकर्ता, मार्गदर्शक, आधारस्तंभ, संशोधक आणि आता इतर प्रकल्पांसाठी व सरकारी संशोधन संस्थेसाठी सल्लागार अशी अनेक गावं लागत आहेत. शेतकरी उत्पादक संघांचं काम त्यांनी मोठं केलं आहे. त्या प्रकल्पात ३२ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून १२,००० शेतकरी संघटित झाले आहेत. हे काम १२ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यासह जलसंधारणाच्या कामातून १०१ गावं टँकरमुक्त झाली आहेत. आपल्या समाजात काम करणारे किती जण आहेत, किती वेगळं काम करत आहेत हे कळावं म्हणून हा उल्लेख!
 

सुहासभाऊंबद्दल आवर्जून सांगावी अशी अजून एक गोष्ट म्हणजे कधीच त्यांच्यासोबत बोलण्याचं कोणाला दडपण येत नाही. वस्तीमधली एखादी महिला असेल किंवा पाड्यावरच्या आजीबाई. सुहासभाऊ सगळ्यांशीच एकदम हृदयीचा संवाद साधतात. "आपण काही उदात्त, खडतर, अतिशय कठीण असं करतोय," असा भावच त्यांच्या मनात नसतो. म्हणतात ना, कुशल फलंदाज तो असतो ज्याची फलंदाजी बघताना वाटतं अहा हा, किती सुंदर! किती सहज! सुहासभाऊ तसे आहेत कारण त्यांच्यासाठी हे खरं तर काम नाहीच आहे. हे सगळं त्यांच्यासाठी आनंदमय जीवन आहे. एक सहज स्फुरणा आहे. त्यामुळे क्रियाशील किंवा कर्मठ लोकांकडे बघताना एक थकल्याचा किंवा दमल्याचा जो भाव जाणवतो, त्याचा मागमूसही त्यांच्यामध्ये कधीच दिसत नाही. दिसतो तो प्रसन्नचित्त खेळकरपणा. त्यांच्यासाठी हे सगळं खूप सहज आहे, असंच वाटतं. त्यांच्या सुहास्य वदनाद्वारे आणि हास्याद्वारे समोरच्याचाही ताण निघून जातो!
स्वत:बद्दल कोणतेच "गैरसमज" टिकू न देणार्‍या सुहासभाऊंबद्दल हे लिहावसं वाटलं ते त्यामुळेच. आणि सुहासभाऊंसारखे इतरही दीपस्तंभ समाजात आहेत, हेसुद्धा आज सांगण्याची गरज आहे. समाजामध्ये भीषण समस्या असतील, पण त्यांच्यामधून वाट काढणारे वाटाडेही आहेत, हे सांगण्याची आज गरज आहे. त्यासाठी हा लेखन प्रपंच. सुहासभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 

-निरंजन वेलणकर दि. १६ जानेवारी २०२५. वाचल्याबद्दल धन्यवाद! हा लेख जवळच्यांसोबत शेअर करू शकता. ०९४२२१०८३७६

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!