लदाखची भ्रमणगाथा: भाग२
श्रीनगर............
असं हे काश्मीर. अत्यंत वेगळं आणि बिकट, सर्वांना अडचणीत आणणारं. काश्मीर इतकं गुंतागुंतीचं, वेगळं आणि अनेक घोडचुका घडलेलं आहे. त्यामुळे आजची परिस्थिती, आजचं विदारक वास्तव तुकड्या तुकड्यात पाहता येत नाही. १५ ऑगस्टसाठी जात होतो, पण मनात गेल्या २६ जानेवारीला असलेल्या तणावाच्या आठवणी होत्या. खरं तर काश्मीर म्हंटलं की डोळ्यांपुढे दहशतवादच येतो. परंतु जेव्हापासून ह्या लदाख भ्रमणाचा विचार केला होता, तेव्हापासून दहशतवादी, फुटिरता, वेगळी अस्मिता इत्यादि गोष्टी मनाबाहेर जाऊन फक्त तिथला निसर्गच लक्षात होता. तरीसुद्धा श्रीनगरच्या दिशेने जाताना परत त्या आठवणी आल्या.
...... जम्मुला जेमतेम दीड तास थांबून पुढे निघालो. उधमपूर, कटरा फाटा मार्गाने दूरवरून डोंगरातल्या मातेचे- वैष्णोदेवीचे दूरदर्शन घेऊन पुढे आलो. सुमारे १०० किमी आल्यावर पाठीमागे लांबवर जम्मुचं पठार दिसून गेलं. आता निसर्ग बदलला होता. उंच उंच सूचीपर्णी झाडं आणि मोठे पर्वत व घाट सुरू झाले.
पटनी टॉपच्या आधी एका ठिकाणी थांबून मस्त फोटो काढले. फोटोज ह्या ठिकाणी पाहता येतील. https://picasaweb.google.com/ 109956999535784028982/ JammuSrinagar आमच्या त्रिकुटातील परीक्षितने काढलेले आहेत.
पटनी टॉपमध्ये थोडे थांबलो. तिथून पुढचा प्रवास बदलला. रस्त्यावर ट्रॅफिक विशेष लागत नव्हती. ट्रॅफिक कमी का लागत होती, ह्याचं कारण पुढे गेल्यावर कळालं. पण जाताना एक गडबड होत होती. अत्यं वेगात घाटातून जाताना चक्कर व मळमळ येण्यास सुरुवात झाली. कारण आरामशीर गाडीतून वेगाने वळणे घेतल्यामुळे पोटात गोळा आला. काही अंतर तसच कंट्रोल करायचा प्रयत्न केला. वाटेत ट्रॅफिक जाम लागण्यास सुरूवात झाली. ट्रक्सच्या मोठ्या मोठ्या रांगा लागत होत्या. परंतु सुंदर दृश्य हे होतं, की लाईन लागूनही महाराष्ट्रातल्याप्रमाणे कोणाची गाडी उजव्या लाईनवर येऊन रस्ता जाम करत नव्हती. डाव्या लेनमध्येच मोकळ्या जागेत अंग चोरून बसत होती. अरुंद व पहाडी रस्त्यामुळे आलेली ही शिस्त होती..... नाही तर आपल्याकडे महाराष्ट्रात ................. (:0 नाकातोंडात शिरून मचमच करणारी वाहनं व वैताग...... तो इथे नव्हता. आणि लोक इतकी शिस्त दाखवत होते, की जे उत्साहात पुढे जात होते, ते समोरची परिस्थिती बघून मागेही येत होते...... आश्चर्यच ना!
निसर्गाचं रूप आणखी सुंदर झालं होतं. डोंगरांची उंची व बाजूच्या दरीची खोली वाढली होती. उंच सूचीपर्णी (चिनार) वृक्ष आणि डोंगरावर दुर्गम भागातले घरं... इतक्या दुर्गम भागात- पहाडातल्या खबदाडांमध्ये व खाचांमध्ये मोठ्या प्रमाणात घरं दिसत होती. आश्चर्यच. सपाटीवर, हमरस्त्यावर व मार्केटमध्ये जशी घरं असतील, तशीच ही घरं दिसत होती.
.............. ट्रॅफिक जाममधून सुरिंदरपाजींनी पुढे काढली व निघालो.... आणि परत मळमळ वाढली. कंट्रोल करायला जावं, तर होत नव्हती, कारण तीव्र चढ- उतार व वळणं.... आणि जास्त कंट्रोल तरी का करायची? शरीर हे सर्वांत मोठं औषध आहे आणि ते उपाय सांगत होतं. त्यामुळे शरीर संदेश मानून उलटीचा उपक्रम पार पडला. एकंदरीत दुपारचं जेवण पोटात जाऊनसुद्धा नशीबात नव्हतं. (;0 नंतर मात्र एकदम भन्नाट फ्रेश वाटलं व मग अजून जास्त एंजॉय करता आलं.
इथून पुढचा संपूर्ण प्रवास सतत “चक् चक् चक्” करण्याचा होता. एखादी सुंदर, विशेष भावणारी गोष्ट दिसली की आपण करतो ना, “चक् चक् ! काय सिक्स मारला!”; त्याप्रमाणे. निसर्गाचं सौंदर्य सतत वाढत होतं. संध्याकाळचे पाच वाजले होते व आता सतत वाटेत ट्रॅफिक होतं. रामबन आलं. रामबन जम्मु- श्रीनगर रस्त्याच्या मधोमध येतं. हा एक जिल्हा आहे. परंतु गाव अगदीच लहान व कसब्यासारखं होतं. महान चिनाब नदी गावामधूनच वाहते. काय नदी होती ती!!! भन्नाट रोरावणारा आवाज आणि खळाळता प्रवाह......
फार सुंदर दृश्य होतं ते....... अद्भुद निसर्ग... उंच डोंगर व खोल द-या. त्यामधून वाहणारी चिनाब.... चिनाब ही पंजाबच्या पंचनद्यांपैकी एक! ह्याआधी आम्हांला रावी व सतलज लागून गेली होती. काश्मीरमधून चिनाब पश्चिमेला म्हणजे पाकिस्तानात जाते. काश्मीरमधल्या आमच्या वाटेतील बहुसंख्य नद्या पश्चिमवाहिनी होत्या. पाकिस्तानला (पश्चिम पंजाबला) पाणीपुरवठा करणा-या.
चिनाब ओलांडून व रामबन पार करून पुढे आलो. येताना वाटेत सेनेच्या भक्कम ट्रक्सचा काफिला लागला. किती तरी ट्रक्स होत्या त्या. जातच होत्या, जातच होत्या..... आणि गावातला रस्ता फारच अरुंद होता. त्यामुळे जाम आणि वेळ लागत होता.... सेनेचे ट्रक्स व आसपासचे जवान...... काश्मीर........ शब्द संपले, फक्त अनुभुती उरली.
रामबनच्या बाहेर आल्यावर मात्र ट्रॅफिकमध्ये फार जास्त वेळ अडकावं लागलं. ट्रॅफिक अगदी संथ वेगाने व थांबत थांबत पुढे सरकत होती. आता डोंगरावर ब-यापैकी उंचीवर आलो होतो. चिनाब बरीच खाली राहिली होती, तरीसुद्धा तिची गर्जना पोचत होती व संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात तिचं पाणी चमकत व निनादत जात होतं..... जीवन प्रवाही असताना किती सुंदर असतं..... आणि आमचा प्रवास तिथे ट्रॅफिकमुळे तुंबला होता..... परंतु चिनाब प्रवाहीपणाचं प्रतिक म्हणून सोबत करत होती. इथून पुढे संपूर्ण प्रवासभर छोटी- मोठी नदी सतत रस्त्याला सोबत करत होती. ह्या नद्या म्हणजे पहाडातून खाली येणारे ओघळ आणि पहाडातल्या बर्फाचं वितळलेलं पाणीच.....
संध्याकाळची हळुहळु रात्र झाली. तरी आम्ही तिथेच होतो. रात्रीच्या अंधारात चिनाबचा निनाद ऐकत होतो.... आम्हांला खरं वाटत नव्हतं, “आपण इथे आहोत, चिनाबच्या जवळ, काश्मीरमध्ये!!” आणि अजूनही तो थरार जाणवतो, की आम्ही “तिथे” गेलो होतो..... जणू स्वप्न, अशक्य शक्य झालं होतं.
समोर अडकलेल्या एका गाडीतून “गणपती बाप्पा मोरया” ऐकू आलं... सबंध प्रवासभर आम्हांला मराठी पर्यटक सतत भेटत राहणार होते...
ट्रॅफिक जाममध्ये एकाच जागी बराच वेळ गेला. सुमारे ४ तास तिथेच थांबलो. तोपर्यंत सोबतच्या प्रवाशांसोबत गप्पा सुरू झाल्या. सुरिंदर पाजी इतर ड्रायव्हर्ससोबत गप्पा मारत होते. गप्पा मारताना त्यांना आवडणा-या शब्दांचा ते सारखा वापर करत होते..... पंजाबी पद्धतीचे बोलणं (आणि त्यासोबत खूप काही....) तीही वेगळीच मजा होती. आसपासच्या ड्रायव्हरशी बहुतेक डोग्रा किंवा काश्मिरी भाषेत बोलत असावेत. हिंदीची बोलीभाषा होती, पण वेगळी वाटत होती.
रात्र झाली तसे डोंगरातल्या खाचांमध्ये, कुठेही असलेल्या घरांमध्ये लाईटस लागले, घरं उजळली. चिनाबच्या आसपासच्या डोंगरात- पहाडात वाटेल तिथे बांधलेली घरं आश्चर्यचकीत करत होती. महाराष्ट्रातही द-या खो-यात व दुर्गम भागात राहणारे लोक आहेत. परंतु असे पाडे लहान असतात व अगदी झोपड्यांसारखे असतात. इथे खालच्या गावाच्या वस्तीपासून अगदी ३००- ४०० मीटर्स उंचीवरही घरं दिसत होती. आणि पाडे नाहीत, एक एक घर. म्हणजे एक घर इथे, २०० मीटर्सवर, तर दुसरं जवळचं घर वेगळ्याच बाजूला एकदम कोप-यात. रात्री डोंगरात असे अनेक दिवे दिसत होते. आश्चर्यच! इतक्या दुर्गम भागात घरं आणि चांगली मोठी!!!
अखेर रात्री ९.३०नंतर कधी तरी गाडी हलली व निघाली. रामबनच्या काही अंतरच पुढे गेल्यावर आम्हांला ट्रॅफिक जामचं मूळ कारण कळालं आणि जे जागे होते, त्यांना ते बघायलाही मिळालं. रामबनच्या पुढे रस्त्यावर एका ठिकाणी दरड कोसळली होती, त्यामुळे आधीच रुंद असलेला रस्ता फार रुंद झाला होता, त्यामुळे जेमतेम एकावेळी एक वाहन पुढे जात होतं. सेना व जे-के पोलिस त्याचं नियमन करत होती. त्यामुळे त्या पॉइंटच्या दोन्ही बाजूंना मोठ्या लाईन लागल्या होत्या. आणि हाही भाग काही तासांपूर्वीच खुला झाला होता. कारण त्याआधी एक दिवस अतिवृष्टीमुळे हा रस्ता बंदच झाला होता..... त्यामुळे ट्रक्सचा व इतर वाहनांचा खूप मोठा ताफा दोन्ही बाजूंना अडकून होता. आमची जीप छोटं व प्रवासी वाहन असल्यामुळे त्यातल्या त्यात लवकर पुढे जाऊ शकली.
शेवटी कसा तरी आम्ही तो मार्ग ओलांडला, जरा पुढे आलो व मग मोकळा रस्ता लागला. अर्थात ट्रक्सवाले अजून अडकलेलेच होते. रात्रीचे ११ वाजून गेल्यामुळे ब-याच चालकांनी थांबणंच पसंत केलं होतं. जेवणाचा ब्रेक घेतला... नंतर लगेच पुढे निघालो.
आता प्रतीक्षा होती बनिहाल व जवाहर टनेलची. ट्रॅफिक नसल्यामुळे फटाफट जात होतो. जवाहर टनेल आला. हा टनेल म्हणजे मोठा बोगदा आहे. बोगद्यातला रस्ता आणखी अरुंद आहे, त्यामुळे एकदा आत गेल्यावर एकच वाहन एका लेनने जाऊ शकतं, त्यामुळे ओव्हरटेक करता येत नाही. चेक पोस्टवर सैनिकांनी येऊन गाडीमध्ये कोण आहे ते पाहिलं, जुजबी तपासणी केली व पुढे निघा असा इशारा केला. त्यांच्या बोलण्यावरून वाटलं, की ते कोणाला तरी शोधत होते व आम्ही ‘ते’ नव्हतो. सुरिंदर पाजीही तसंच म्हणाले. टनेल जवळजवळ दोन किमी लांब होता.
जवाहर टनेलच्या पुढे “काश्मीर व्हॅली व्ह्यू पॉइंट” लागतो. पण अंधार असल्यामुळे आम्ही त्या नजा-याला मुकलो. सुरिंदरजींच्या बोलण्यातून जाणवत होतं की जागोजागी असलेल्या सेनेच्या पोस्टबद्दल त्यांना त्रागा वाटत होता. एकूणच अनेकदा सेनेचे लोक व सैनिक, पोलिस अडवायचे किंवा सूचना द्यायचे. त्याचा सामान्य माणसांना कदाचित थोडा त्रास होत असावा. पण असं करणं आवश्यकच आहे. कारण काश्मीर- श्रीनगर अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील क्षेत्र आहे.......
आधीच्या पोस्टच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर व नियंत्रण रेषा इथून फार लांब नाही आणि नियंत्रण रेषेपेक्षा आतमध्येही अराजकता आहेच. अगदी आज- कालच्या बातम्याही तेच दर्शवतात. त्यामुळे तिथे विशेष सुरक्षा, विशेष पाहणी असणं अपेक्षितच आहे.
तर अशा ह्या रस्त्याने अनंतनाग बायपास करून आम्ही मध्यरात्री श्रीनगरच्या दिशेने जात होतो. जवाहर टनेलनंतर ब-यापैकी समतल व मोठा रस्ता होता. त्यामुळे लवकर जात होतो. वाटेत सारख्या चेक पोस्टस दिसत होत्या. काही कोअर्स क्वार्टरच्या गेटपुढे लिहिलेलं असायचं, “स्विच ऑफ हेडलाईट अँड स्विच ऑन केबिन लाईट.” अनेक ठिकाणी एकावेळी एक वाहन जावं म्हणून बॅरिअर ठेवलेले होते. असा प्रवास करत मध्यरात्रीनंतर पहाटे २ वाजता श्रीनगरमध्ये पोचलो. खुद्द श्रीनगरमध्ये त्या मानाने काही चौकशी झाली नाही. निर्जन रस्त्यावर श्रीनगरमध्ये शिरलो. पूर्ण शहर ओलांडून सरळ गेलो व मग उजवीकडे वळालो. दल सरोवर लागलं. रात्रीचं शांत पाणी बघत “अझिझ” हॉटेल शोधत होतो. थोडी शोधाशोध घेतल्यावर हॉटेल सापडलं, हॉटेलवाला घ्यायला आला. सुरिंदरपाजींनी थोडी तक्रार करत गाडी हॉटेलमध्ये आणली व सामान उतरवून घेतलं. सुरिंद्ररपाजींचा निरोप घेऊन हॉटेलमध्ये गेलो.....
दल सरोवराच्या समोरच असलेलं हॉटेल अझिझ....... आम्ही चक्क श्रीनगरमध्ये आलो होतो. इथून आता प्रत्येक क्षणी “चक्क” हा शब्द गृहितच धरावा......... श्रीनगर, काश्मीरची राजधानी, हेडलाईन्समधील टॉपच्या श्रीनगरमध्ये आम्ही पोचलो होतो.............(चक्क!!) एके काळी कर्ण आला असताना जे सूर्यनगर होतं व नंतर शंकराचार्यांच्या काळात श्रीनगर झालेलं होतं, त्या काश्मीरच्या राजधानीत आम्ही आलो होतो..... मनात आश्चर्य वाटत होतं, जुन्या काळी हे लोक कसे आले असतील, किंवा अगदी ४०- ५० वर्षांपूर्वीपर्यंत लोक कसे येत असतील..... किंवा आजही कसे येतात आणि डोंगरामध्ये खबदाडात जाऊन कसे काय राहू शकतात......
क्रमश:
पुढील भाग: श्रीनगरदर्शन.
छान झालं प्रवास वर्णन अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते. चिनाब, रावी, सतलज या नद्यांबाबत माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे. त्या नद्यांचे दर्शन तुम्ही घेतले हे वाचून खूप आनंद झाला.
ReplyDelete