Thursday, October 10, 2024

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ!
✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!"
✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा!
✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट
✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक
✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड
✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन
✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता

सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती. पावसाळ्यात बराच काळ वरांधा घाट बंद असतो. शिवाय ह्या भागामध्ये पाऊसही फार असतो. त्यामुळे राहून जात होतं. पण मग ठरलं. तरी निघतानासुद्धा पावसाची शक्यता होती. पण आतल्या आवाजाचं ऐकून निघालो! आणि नंतर स्वत:च्या नशीबाला असंख्य धन्यवाद देत राहिलो! पुणे ते शिवथरघळ अंतर साधारण १२० किमी! भोरच्या पुढे घाटाचा रस्ता व त्यामुळे साधारण ७-८ तास लागतील. अगदी कसोटी क्रिकेटमधल्या बॅटिंगसारखी ही खेळी असेल! सकाळी पावसाचा अंदाज बघण्यात वेळ गेल्यामुळे निघायला पावणेसात वाजले!





काल- परवा मोठा पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर अजूनही चिखल आहे. शनिवारचा दिवस असल्यामुळे तितकी रहदारी नाहीय. वेगामध्ये औंधवरून हायवेमार्गे चांदणी चौकापर्यंत पोहचलो. पुण्याच्या दक्षिणेला बरचसं मोकळं आकाश दिसतंय! वा! सिंहगड रस्त्यावरच्या वडगांव ब्रिजवर अनेक भेगा आहेत! बारीक टायर असलेली सायकल ह्या भेगांमध्ये अडकून वाईट अपघात होऊ शकतो. काळजी घेत पुढे जात राहिलो. सिंहगडाला दुरून नमस्कार केला! कात्रजचा बोगदा! काही किलोमीटरच्या चढानंतर 
सायकलीवर ह्या बोगद्यातून जाणं हासुद्धा एक विलक्षण अनुभव! बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचलंय! त्यामुळे काळजी घेत पेडल चालवतोय. सायकलिंग करताना थोडीही नजर हटली तर दुर्घटना नक्की! आतमध्ये प्रचंड घुमणारा मोठ्या गाड्यांचा आवाज! मध्येच असलेला अंधार! साधारण दीड किलोमीटरचा हा बोगदा! हळु हळु येणारा प्रकाश! वा! इथून पुढे कापूरहोळपर्यंत सरळ उतारच लागेल. पावसाचं कोणतंच लक्षण नाहीय. टोल नाका ओलांडल्यानंतर रस्त्यावर डायवर्जन्स असल्यामुळे थोडा खोळंबा झाला.  


उजवीकडे दूरवर राजगडाची पर्वतरांग आणि डावीकडे पुरंदर किल्ल्याचा आसमंत! कापूरहोळवरून आधीही २०१७ मध्ये एकदा भोर- मांढरदेवीला गेलो होतो. संभाजी राजांच्या धाराऊचं कापूरहोळ! पण ह्यावेळी कापूरहोळ आल्याचंच कळालं नाही. २ किलोमीटर पुढे जाऊन परत मागे यावं लागलं. इथे पहिला ब्रेक घेतला. ५४ किलोमीटर झाले आहेत! इथून भोर १६ किलोमीटर. आता मस्त शांत सिंगल लेन रस्ता! नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरणाची भिंत! भोरमध्ये अनेक संस्थांसाठी सेवा वृत्तीने काम करणारे माझे मित्र- दत्ताभाऊ शिनगारेंची भेट घेतली आणि पुढे निघालो. भोरपासून आता भूप्रदेश पूर्ण बदलला! डोंगरांचं राज्य सुरू झालं! दूरवर रायरेश्वर दिसतोय! सगळीकडे हिरव्या रंगाचा बहर! अहा हा! एकामागोमाग एक रमणीय दृश्यांची मालिका सुरू!

भोरपासून थोडा चढ सुरू झाला आणि रस्ताही थोडा खडबडीत आहे. त्यामुळे वेग कमी होतोय. निगूडसरमध्ये दुसरा ब्रेक घेतला! हळु हळु परिसर दुर्गम होतोय! मोठी गावं मागे पडून वाड्या सुरू होत आहेत! काही चढानंतर देवघर गांव आलं! रस्त्याच्या बाजूला खोल दरीमध्ये निरा- देवघर धरणाचा अजस्र जलाशय! दूर पाऊस दिसतोय. पण किती विलक्षण परिसर आहे! सगळीकडे डोंगररांगा आणि हळु हळु धबधबेही सुरू झाले! रस्ताही खडतर होत जातोय. त्यामुळे अंदाजापेक्षा जास्त वेळ लागणार हे नक्की! मध्ये मध्ये छोट्या घाटासारखे चढणारे रस्तेही लागत आहेत! अहा हा! काही अंतर गेल्यावर चढ संपून रस्ता उतरायला लागला. आणि मग निरा- देवघर धरणाचा विलक्षण जलाशय समोर आला! एक से बढकर एक नजारे! पाऊस सुरू व्हायच्या आत फोटो काढून घेतले.

जसा घाट जवळ येत जातोय तसं ढगांचं व पावसाचं राज्य सुरू होतंय! आता छोटी छोटी गावं लागत आहेत. सर्वत्र हिरवा शालू! मध्ये मध्ये कापसासारखे ढग! वरांधा घाट तर तसा उतरायचाच आहे. पण त्या आधी छोटे चढ बरेच लागत आहेत. घाटाच्या अलीकडे पाऊस तुफान लागतोय. पण पावसासाठी तयारी असल्यामुळे काही अडचण नाहीय. हळु हळु जात राहिलो! निघताना अंदाज होता की, २- २.३० पर्यंत पोहचेन! पण आता कळतंय की ४ तर सहज वाजतील! पण काय अवर्णनीय परिसर! अहा हा! आता तर धबधब्यांचंच राज्य सुरू झालंय! बघावं तिकडे धबधबे! किती‌ तरी धबधबे तर रस्त्याच्या खालून जातात! अचानक आवाज येतो अन् कळतो की, धबधबा! आणि आकाशातूनही आता धबधबा कोसळतोय! कोंकण जवळ येतंय! पण किंचित थकल्यासारखं वाटतंय. एका टपरीच्या हॉटेलमध्ये ब्रेक घेतला. गरम चहा आणि गरम भजी! अजूनही शिवथरघळ १६ किलोमीटर आहे!

नदियाँ, पहाड़, झील और झरने, जंगल और वादी! मोहनगड किल्ल्याचा परिसर! एक किलोमीटर चढ लागला आणि मग वरांधा घाटमाथा आला! हिरव्या निसर्गाने घेतलेली ढगांची पांढरी चादर! विलक्षण आसमंत! ढगामध्ये हरवलेले पर्वत! खरंच मला सुबुद्धी झाली आणि इथे सायकलवर आलो! थोडं पुढे गेल्यावर ढगांमधून खाली दूरवर हिरवं कोंकण दिसतंय! तिकडे ऊन दिसतंय चक्क! पावसाने अनुमती दिली तेव्हा फोटो काढतोय. वरांधा घाट! भोर आणि महाडला जोडणारा! तितका तीव्र वाटत नाहीय. उताराची भिती वाटत नाहीय. पण रस्त्यावर अनेक ठिकाणी वाळू व बारीक दगड आहेत. त्यामुळे सायकल काळजीपूर्वक चालवत राहिलो. एक एक वळण येतंय तसं आणखी नजारे दृग्गोचर होत आहेत! हळु हळु पाऊस कमी होतोय. ढग मागे पडत आहेत! दरडप्रवण क्षेत्र सुरू झालंय! ठिकठिकाणी इशारे आहेत की थांबू नका. पण नजारेच इतके अफाट, की थांबण्याचा मोह होतोय! दोनच ठिकाणी तीव्र उतार वाटला.






घाट अजून बराच असेल असं वाटत असतानाच शिवथरघळीची कमान आली! घाटामधून फुटणारा हा सहा किलोमीटरचा छोटा रस्ता! त्या रस्त्यावरही उतार सुरू आहे. डोंगरामधून वळसा घेऊन आत जाणारा रस्ता! कुठे कुठे तर फार अरुंद! काही ठिकाणी तर अगदी खचलेला! कावळ्या किल्ल्याला वळसा घेऊन रस्ता खाली उतरतोय! आणखी विलक्षण दृश्य समोर येत आहेत! काय अद्भुत परिसर आहे हा! घाटमाथा ओलांडल्या ओलांडल्या दरी! अगदी निमुळता रस्ता! पेडल मारण्याची गरजच नाहीय! छोटी छोटी गावं! लोकांना वाट विचारत पुढे जातोय. अखेर कसबे शिवथर सुरू झालं! प्रत्यक्ष घळ अजून बरीच पुढे आहे. अडीच तास पावसात भिजल्यामुळे खूप थंडी वाजतेय. दरीमध्ये दिवेलागणीची वेळ जवळ येतेय! अखेर पाच वाजता शिवथरघळ सुंदर मठामध्ये पोहचलो! विलक्षण अशी राईड! १२५ किलोमीटर पूर्ण झाले! "केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे!" काय ती धबधब्याची भीमगर्जना! समर्थांची साधनाभूमी! खरोखर इथला विराट निसर्ग नतमस्तक करतोय! समर्थांनाही मनातून दाद द्यावीशी वाटतेय, काय जागा शोधली! इतका ऊर्जावान धबधबा! जणू जीवंत साधना पथाचं व प्रवाहाचं निनादणारं प्रतिक!

सुंदर मठ! 
"तेथे जावया पुण्य पाहिजे" असं समर्थांनीच सांगून ठेवलंय! विलक्षण अशा धबधब्याच्या अगदी जवळ! सुंदर मठाच्या भक्त निवासामध्ये राहण्यासाठी आधी अनुमती घ्यावी लागते. ही माहिती‌ नव्याने कळाली. सज्जनगडाप्रमाणे इथे थांबता येईल असं वाटलं होतं. पण त्यांनी नकार दिला. दिवसभराच्या राईडमुळे पावसासोबत घामानेही भिजलो आहे, त्यामुळे आधी मुक्कामाची जागा बघून आंघोळ करायची आहे. भक्त निवासात बोलून बघितलं, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे मग हॉटेल शोधलं. टिपिकल पर्यटन स्थळासारखा अनुभव आला. पण दुसरा पर्याय नाहीय व लवकरच अंधार पडतोय. त्यामुळे मिळेल ते हॉटेल घेतलं. हॉटेल घळीपासून व धबधब्यापासून थोडं दूर आहे! पण ती गर्जना इथेही ऐकू येतेच आहे! काय दिवस गेला! सकाळपर्यंत हो- नाही चाललं होतं! पण अखेर राईड करायची इच्छा झाली व सकाळी निघालो! स्वत:ची ह्या निर्णयाबद्दल पाठ थोपटावीशी वाटली! वरांधा घाट जरी उतरायचा होता, तरी सगळ्या रस्त्यावर चढ- उतार बरेच होते. त्यामुळे राईड म्हणून ही खडतरच झाली. सायकलीने काय कमालीची साथ दिली! पेडलिंगचे साडेसात तास व त्यासोबत अडीच तास भिजल्यामुळे होणारा जास्तीचा ताण. आता आरामाची गरज आहे.

लवकरच अंधार पडला! आणि परत एकदा प्रचंड पाऊस सुरू झाला! इतका मोठा आकाशी धबधबा की त्यामुळे घळीतल्या धबधब्याचा आवाजच ऐकू येईनासा झाला! केवढी दुर्गम ही जागा आहे, बाप रे! जिथे थांबलो तिथेच जेवलो, त्यामुळे परत भिजाव लागलं नाही! जेवल्यानंतर थोडा वेळ समोरच्या जागेमध्ये शतपावली केली! चक्क आकाशात तारेही दिसत आहेत! कोंकणातला हा पाऊस! प्रचंड वेगाने येतो, तीव्र कोसळतो पण निघूनही जातो! आणि परत थोड्या वेळाने येतो! थोडा वेळ चालल्यानंतर पाय थोडे मोकळे झाले. थकवा कमी वाटतोय. फक्त उद्याच्या परतीच्या राईडच्या आधी आराम चांगला व्हायला पाहिजे. उद्या पहिले १५ किलोमीटरपर्यंत घाट आहे! इतका तीव्र उतार तर वाटला नाही. त्यामुळे मी घाट तसा आरामातच चढू शकेन. फक्त पाऊस आला तर! उद्याच्या परतीच्या राईडची विलक्षण उत्सुकता वाटतेय! पण त्याबरोबर आजची राईड केल्याचा अजूनही विश्वास बसत नाहीय! आयुष्यभराचा अनुभव देणारी राईड! खरंच, माझं नशीब किती थोर! आकाशातल्या धबधब्याच्या निनादामध्ये निद्रादेवी प्रसन्न झाली!

पुढच्या लेखामध्ये परतीचा थरारक अनुभव सांगेन.
आयुष्यभराचा अनुभव देणारी राईड!धन्यवाद!    

- निरंजन वेलणकर दि. १० ऑक्टोबर २०२४.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! लेख जवळच्यांसोबत शेअर करू शकता. 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!