Sunday, April 25, 2010

......... माणसाचे मोठेपण

पाऊलखुणा . . .


माणसाचे मोठेपण अनेकदा जवळ असण्यामुळे किंवा कुटुंबीय असण्यामुळे समजत नाही, हे किती खरे आहे. ह्याची प्रचिती आता येते आहे. तसेच माणूस समजून घेणे, हेही किती कठिण आहे, ते समजतं आहे. माझे आजोबा कै. नाना वेलणकरांबद्दल लोकांच्या आठवणी ऐकताना ही गोष्ट जाणवत राहते. त्यांच्या निर्वाणानंतर अनेकांकडून त्यांच्या आठवणी ऐकताना; त्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची उंची जाणून घेताना जाणवतो तो अज्ञभाव. जवळचा, रोजचा असलेला माणूस समजून घेण्यामध्ये आपण किती कमी पडतो; ते लक्षात येतं.



नातवांच्या डोळ्यांपुढील आजोबांची प्रतिमा फारशी आकर्षक नाही. १९९९ नंतर वाढत जाणारे विस्मरण आणि वृद्धापकाळामुळे आलेले परावलंबन आणि शैथिल्य, हेच नजरेसमोर येते. कारण त्यांच्या खर्‍या कर्तृत्वाच्या साक्षीदार ह्याआधीच्या तीन पिढ्या आहेत. आजोबांना क्रिकेट आवडत असल्यामुळे क्रिकेटच्या भाषेत बोलायला आक्षेप नसावा. आमच्या समोर असलेली आजोबांची प्रतिमा म्हणजे एखाद्या मॅरॅथॉन इनिंगच्या शेवटच्या टप्प्यावरील स्थिती. त्यामुळे साहजिक त्यावरून त्या इनिंगचे मोजमाप करता येत नाही. पण जे आम्ही बघू शकलो नाही; ते काय होते; ते आता समजतं आहे. 86 वर्षे आयुष्य हे ते ८६रन्सच्या आणि ८६च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या इनिंगप्रमाणे जगले. ह्या जीवनाची व्याप्ती आणि खोली किती प्रचंड आणि गहिरी होती, हे समजून घेण्याचा आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. अनेक प्रकारांमध्ये “the first of its kind” असे ते जगले. त्यांच्याकडून घेण्यासारखे प्रचंडच आहे. परंतु आमची जवाबदारी आता आहे, आता आमची वेळ आहे. जी ज्योत आमच्यापर्यंत येता येता मंदावली; किंवा अधिक योग्य शब्दांमध्ये आमची दृष्टी त्या ज्योतीची “प्रभा” समजण्याएवढी समर्थ नव्हती; त्या ज्योतीचा प्रकाश समजून घेऊन पुढे पुढे तेवत ठेवण्याचे कार्य आमच्यासमोर आहे. आणि म्हणून आता समोर येणारे आजोबांचे चरित्र हे पाऊलखुणांप्रमाणे आहे. पाऊलखुणा केवळ स्मृतीमय, रम्य आठवणी नसतात; त्यांमध्ये पुढील कार्याला दिशा देण्याची क्षमता असते. त्यांच्या आठवणी आम्हाला ती दिशा नक्कीच दाखवतील. ज्या गोष्टींसाठी, मूल्यांसाठी, लोकांसाठी आजोबा असे जगले; त्यांना अभिवादन!

 

त्यांच्या प्रेरक आठवणींमधील हा एक छोटासा भाग दै. लोकसत्ता आणि लेखक शेषराव मोहिते, ह्यांच्या सौजन्याने इथे सादर आहे -

नाना वेलणकर



शेषराव मोहिते


"प्रत्येक योगासनाचे फायदे काय, ते नाना एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत. त्यांचं घर आमचं हक्काचं झालं. कुठल्याही कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही..इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता."

... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, कृषी महाविद्यालयाच्या देखण्या इमारतीचा आराखडा बनविणारे नाना वेलणकर यांचे अलीकडेच निधन झाले. एका सुहृदाची त्यांना ही आदरांजली..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाना वेलणकर यांच्या निधनाची बातमी सोमवारी वाचली. मनातून चरकलो. परभणीला ज्या ज्या वेळी जाणे होई, त्या त्या वेळी ठरविलेले असे की, या वेळी नानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायची! पण प्रत्येक वेळी ते राहूनच गेले. ही बातमी वाचली आणि अपराधभाव मनात दाटून आला.

परभणीतील रामकृष्णनगरमधील नानांचं घर. शंकरनगर झोपडपट्टीला लागून. परभणीला शिकायला होतो तेव्हा माझं आणि माझ्यासोबतच्या आठ-दहा तरी मित्रांचं हक्काचं, कधीही मनाला वाटेल तेव्हा जाऊन नानांसोबत गप्पागोष्टी करीत बसण्याचं जिव्हाळ्याचं ठिकाण होतं. अनेक सैरभैर क्षणी आम्ही या घरात, घराच्या अंगणात एकत्र आलो होतो. संध्याकाळी गावातून फिरून येताना किंवा लंगडय़ा मावशीच्या मेसमधून जेवून येताना थोडी वाट वाकडी करून नानांच्या घरी जाऊन येणं हा आमचा परिपाठ होता.

नानांची आणि माझी ओळख कशी झाली? त्यांचे वय तर माझ्या वडिलांहून अधिक. संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक तरुण पिढीतील कार्यकर्त्यांशी संबंध असतातच म्हणावे, तर माझ्या बाबतीत तेही खरे नव्हते. मी नानांच्या घरी जाई. त्यांच्याशी खूप वेगवेगळ्या विषयावर बोलणे होई. पण नानांनी मला कधी शाखेवर येण्याचे सुचविले नाही की आग्रह केला नाही.

मी पहिल्यांदा परभणीला कृषी विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा दहावीच्या वर्गात असताना डास चावून झालेल्या हिवतापाने खूप अशक्त झालो होतो. विद्यापीठाच्या ‘हेल्थ सेंटर’मध्ये जाऊन सगळ्या तपासण्या केल्या. रक्त तपासलं, इंजेक्शनचा पंधरा दिवसांचा ‘कोर्स’ पूर्ण केला. तेव्हा थोडी तब्येत सुधारली. मग हळूहळू इतरांचं बघून जिम्नॅशियममध्ये जाऊन व्यायामास सुरुवात केली. माझ्या ‘धूळपेरणी’ या कादंबरीत या प्रसंगाचे चित्रण आले आहे. एके दिवशी पाहिलं तर जिम्नॅशियमच्या शेजारच्याच हॉलमध्ये कुणी तरी एक शिक्षक पांढरी हाफपँट आणि वरती पांढरा टी-शर्ट घातलेले. योगासनाचा वर्ग घेत होते. मी दारात उभा राहून आतलं ते दृश्य पाहत होतो. शिक्षकाच्या सूचनेनुसार आतील पन्नास-साठ मुलं एकाग्रतेनं आसनं करीत होती. आपणही आत जाऊन त्यांच्यात सामील व्हावं असं वाटायला लागलं. पण मन धजेना. मुलं तर आपल्याच हॉस्टेलची; पण हे योगासनं शिकविणारे ‘सर’ कोण आहेत माहीत नाही. वाटायलं, ‘जाऊ द्या, बळंनं कुठं घुसावं. आपण आपला रोजचा व्यायाम करून हॉस्टेलवर निघून जावं.’ पण त्या जागेवरून हलावसंही वाटेना.

दोन-तीन दिवस असेच गेले. एके दिवशी मी असाच त्या दारात उभा होतो आणि पाठीमागून येऊन कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी चमकून वळून पाहिले. प्रसन्न मुद्रेनं माझ्याकडं पाहत योगासनं शिकवायला येणारे ‘सर’ म्हणाले, ‘‘का रे! तू रोज दारात उभा राहून नुसता पाहातच असतोस. तुलाही यायचंय का योगासनं करायला?’’ मी थोडासा गोंधळून म्हणालो, ‘‘फी किती असते?’’ ते हसून म्हणाले ‘‘लेका, तुला मी फी घेतो म्हणून कुणी सांगितलं! चल, आजपासून तूही ये.’’

मला मनातून खूप आनंद झाला. तरी माझी भीड चेपायला खूप दिवस लागले आणि मग त्या योगासनाच्या वर्गाची आणि तो वर्ग घेणाऱ्या नाना वेलणकरांची कायमचीच साथसंगत जमली. नानांविषयी मी सगळ्या माझ्या बॅचमधल्या मुलांना सांगायला लागलो. तर किरण चालुक्य म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिताय का? नाना वेलणकर संघाचे आहेत आणि त्यांची दोन मुलं सध्या आणीबाणीत आर.एस.एस.वर बंदी असल्याने मिसाखाली जेलमध्ये आहेत.’’ मला तेव्हा संघाविषयी काही फारशी माहितीच नव्हती. तेव्हा मी म्हणालो, ‘‘म्हणजे ग्रेटच की राव!’’ तर किरण म्हणाला, ‘‘म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय अजून.’’ मी गप्प बसलेला बघून किरण आणखी म्हणाला, ‘‘तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तिकडं संघाच्या शाखा भरविण्यावर बंदी आहे म्हणून इकडं हे योगासनाचे वर्ग घे, शिबिर घे असे उद्योग करीत आहेत. उद्या आणीबाणी उठली की तुम्हालाही संघाच्या शाखेवर बोलावतील. मी अधिक काही बोलत नाही. पण त्यांच्या फार नादी लागू नका. शेवटी तुमची मर्जी!’’

किरण, प्रवीण माझे पाटर्नर. किरणचे वडील आधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार. जिल्हा बँकेचे अध्यक्ष. काँग्रेसमध्ये. प्रवीणचे वडील तर पंधरा वर्षांपासून काँग्रेसचे आमदार. इथं आल्यापासून मी किरणनं सांगितलेली कुठलीही गोष्ट ओलांडून मनानं काही करीत नव्हतो. पण योगासनाच्या वर्गाबाबत त्याचं मी काहीही ऐकायचं नाही असं ठरवलं. एक तर त्या संघाबिंघाचं आपल्याला काही फारसं देणं-घेणं नाही आणि नाना वेलणकर योगासनं शिकविताना प्रत्येक आसनाचे फायदे काय काय आहेत ते इतक्या लयदारपणे, एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत की ते नुसतं ऐकतच राहावं वाटे.

नंतर आणीबाणी उठली. आम्ही कृषी विद्यापीठात छात्र युवा संघर्ष वाहिनीची शाखा सुरू केली. त्यात नानांनी हिरीरीनं भाग घेतला. मग आम्ही हक्कानं नानांच्या घरी जायला लागलो. ते कधी हॉस्टेलवर यायला लागले. मग हे नेहमीचंच झालं. पुढे शेतकरी संघटनेची चळवळ झंझावातासारखी आली. आंदोलनं, लाठय़ा, काठय़ा, जेल, सभा, मेळावे, अधिवेशनं हे करून दमून भागून आलं की, नानांचं घर हे हक्काचं, विसाव्याचं, सुख-दु:खं बोलून हलकं करण्याचं ठिकाण झालं.

नानांची मुलगी वासंती. आमच्याबरोबर नेहमी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धाना शिवाजी महाविद्यालयाकडून असायची. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि तिने मध्य प्रदेशमधील आदिवासी विभागात दोन वर्षे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. नानांनी इतक्या सहजपणे संमती दिली की आम्ही आश्चर्यचकित झालो. आधीच एक मुलगा आसाममध्ये असाच पूर्ण वेळ काम करायला गेलेला. कृषी विद्यापीठात आम्ही वासंतीचा सत्कार करून निरोप दिला.

नानाजी देशमुखांच्या उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्य़ातील कामाविषयी आणि दीनदयाळ संस्थेविषयी नानांची आस्था अधिक. दोन-चार वेळा त्यांनी नानाजींशी माझी भेट घडवून आणली. कदाचित बीड जिल्ह्य़ात नानाजी देशमुख जे काम करू इच्छित होते, त्यात मी सहभागी व्हावं असं नाना वेलणकरांना मनातून कुठे तरी वाटत असावं. पण माझी विचार करण्याची पद्धत, शेतकरी संघटनेचं माझं काम, त्या संघटनेतील माझं स्थान याविषयी त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच वयाचं खूप मोठं अंतर बाजूला सारून ते माझ्याशी सदैव मित्रत्वाच्या नात्यानेच वागले. इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता.

संघाची सर्व मोठी माणसं तेव्हा परभणीत आली म्हणजे नानांकडेच थांबत. त्या काही जणांची बौद्धिकंही आम्ही ऐकली. पण जे मनाला पटले नाही ते स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात नानांना आम्ही सांगत असू. तेही तितक्याच खेळकरपणे प्रतिवाद करीत. पण शक्यतो मतभेदांच्या मुद्दय़ांपेक्षा सहमतीच्या मुद्दय़ावर काय करता येईल याचाच नेहमी विचार करीत असत.

नाना पेशाने इंजिनीअर. नागपूरच्या खरे आणि तारकुंडे या बांधकाम व्यावसायिकांनी १९६०मध्ये परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात केली, तेव्हा या बांधकामाचे स्थापत्य अभियंता म्हणून नारायण गोविंद वेलणकर परभणीत दाखल झाले आणि नंतर ते ‘नाना’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. कृषी महाविद्यालयाची एवढी देखणी इमारत आणि त्या इमारतीचा आराखडा नानांनी बनविला होता, हे त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही आणि त्यांचं निधन होईपर्यंत आम्हाला माहीतही नव्हतं. नानांनी आयुष्यभर केलेल्या अनेक कामांचेदेखील असंच असण्याची शक्यता आहे. कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही.

आता जेव्हा केव्हा परभणीला जाणे होईल तेव्हा नानांच्या घरी निश्चित जाईन. पण तिथे प्रसन्न चित्ताने हसून स्वागत करायला नाना असणार नाहीत. ही रुखरुख कायमची राहून गेली. दुसरी एक रुखरुख मनाला सतावते आहे. नाना तुम्ही संघाचे होता; आयुष्यभर संघाचेच राहिलात म्हणून तुमच्या कार्याचे नीट मोजमापच झाले नाही की काय? मनात येऊन जाते अशी एक शंका. त्याची खंत बाळगण्याचा तुमचा स्वभाव नव्हता हे मला माहीत आहे. पण तुम्ही गेल्यावर तरी तुमचे मोठेपण आम्हाला कळो! अपेक्षा एवढीच.

1 comment:

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!