Tuesday, April 6, 2021

आकाशातील आश्चर्य: चंद्र मंगळाला झाकणार!

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. येत्या १७ एप्रिल २०२१ च्या शनिवारी संध्याकाळी आकाशामध्ये एक आश्चर्य बघायला मिळणार आहे. जेव्हा चंद्र एखाद्या ग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्याला पिधान असं म्हणतात. १७ एप्रिलच्या संध्याकाळी चंद्र मंगळाला झाकणार आहे आणि नंतर आपल्याला मंगळ चंद्राच्या मागून परत येताना दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला चंद्राच्या मागे जाताना मंगळ दिसणार नाही, पण सायंकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी चंद्राच्या मागून तो परत दृग्गोचर होताना दिसेल. पूर्व भारतामध्ये आगरताळासारख्या ठिकाणी मंगळ चंद्राच्या अप्रकाशित भागाच्या आड जातानाही‌ दिसू शकेल. पण महाराष्ट्रामध्ये अंधार पडला असेल तेव्हा मंगळ आधीच चंद्रामुळे झाकला गेलेला असेल.

नुसत्या डोळ्यांनी आणि अगदी सहजपणे ही घटना बघता येईल. आकाशामधील किती तरी गमती नुसत्या डोळ्यांनी बघता येतात. अतिशय दूरवरचे तारे, तारकागुच्छ, आकाशगंगा आणि ग्रहण, पिधान, युती, ता-यांच्या पार्श्वभूमीवर ग्रह व चंद्राची हालचाल अशा गोष्टी नुसत्या डोळ्यांनीही बघता येऊ शकतात.

हे बघण्यासाठी सूर्यास्ताच्या सुमारास पश्चिम आकाश व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी जाऊन थांबावं लागेल. त्या दिवशी सूर्यास्त ६.५३ ला होईल आणि त्यानंतर थोड्या वेळात ७.२१ ला मंगळ चंद्राच्या आडून बाहेर येताना दिसेल. तेव्हा पुरेसा अंधार असेल व त्यामुळे १.५ इतक्या प्रतीचा व मध्यम तेजस्वी असा मंगळ चंद्राच्या आडून आलेला दिसू शकेल. चंद्राची पंचमीची कोर असेल. चंद्र व मंगळ हे वृषभ राशीमध्ये व अग्नी ता-यापासून दक्षिणेला साधारण साडेपाच अंश म्हणजे आपण बघताना हात पूर्ण लांब केल्यास हाताची तीन बोटे मावतील इतक्या अंतरावर असतील. ह्यावेळी आपल्याला मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, सप्तर्षी आदि ठळक तारे व तारकासमूह सहजपणे बघता येतील. ह्या घटनेच्या तांत्रिक तपशीलांसाठी ही वेबसाईट बघता येईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चंद्राच्या पलीकडून बाहेर येणारा मंगळ


पोस्टचा लेखक: निरंजन वेलणकर (niranjanwelankar@gmail.com, ०९४२२१०८३७६). २१ डिसेंबर २०२० रोजीच्या गुरू- शनी युतीचे फोटोज, व्हिडिओ इथे बघता येतील व त्यासंदर्भातला अनुभव इथे वाचता येईल.


ह्यावेळी प्रत्यक्षात मंगळ व चंद्र अजिबात जवळ नसतील. कारण ते तसे येऊ शकत नाहीत. चंद्र पृथ्वीच्या भोवती त्याच्या कक्षेत साधारण ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर फिरतो तर ह्यावेळी मंगळ आपल्यापासून सुमारे २९ कोटी किलोमीटर अंतरावर असेल. पण पृथ्वीवरून आणि आपल्या ठिकाणावरून बघताना काही काळ हे एका रेषेमध्ये येतील व चंद्रामुळे मंगळ झाकला जाईल! असं आकाशातील नाट्य बघताना आपल्याला एक नवीन दृष्टी मिळते. आपण सतत आपल्या समस्या व आपल्या अहंकारामध्ये अडकलेलो असतो. परंतु जेव्हा आपण आकाशाच्या रंगमंचावरचं नाट्य, महाकाय अंतरं आणि आपल्यापेक्षा लाख- कोटी पट मोठे असलेले तारे किंवा आपल्या सूर्यापेक्षा हजारो प्रकाशवर्ष दूर असलेले तारे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की, हे भले मोठे तारे आणि हजारो प्रकाशवर्षाची अंतरं असलेल्या विश्वात आपली पृथ्वी तर अतिशय नगण्य आहे! आपल्याला आपण किती छोटे आहोत, आपला अहंकार किती किरकोळ व आपल्या समस्यासुद्धा किती छोट्या आहेत ही जाणीव होते. आणि आपल्या चिमुकल्या डोळ्यांनीही आपल्याला ह्या विराट रंगमंचावरचे अप्रतिम अविष्कार बघता येतात ही जाणीवही होते. इतके हजार प्रकाशवर्ष अंतरावरचे तारे किंवा आकाशगंगा आपल्या नुसत्या डोळ्यांनी बघता येणे किंवा त्या तारे व ग्रहांच्या क्रमद्धतेची गंमत आपल्या बुद्धीला समजू शकणे ह्याहून मोठा चमत्कार काय असू शकेल?
तेव्हा १७ एप्रिलच्या शनिवारी आपण आकाशातलं हे आश्चर्य बघूया आणि आपल्या छोट्यांनाही‌ दाखवूया.

1 comment:

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!