सर्वांना नमस्कार!
नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं. काही जणांचं अनुमान होतं की, अतिशय कमी कोनीय अंतरामुळे ते दोन वेगळे दिसणार नाहीत व बघताना एकच डबल प्लॅनेट दिसेल. तसं काही झालं नाही. पण अगदी चिकटून असे छान दिसले! Two legands in the same frame असं ते दृश्य होतं! इतके महाकाय ग्रह असूनही ते आपल्या बघण्याच्या स्थानाच्या संदर्भात आकाशात असे जवळ येतात ही मोठी गोष्ट आहे! शक्यतो मोठ्यांचा अहंकारही मोठा असतो! पण हे दोघे महाकाय व हवेचे गोळे असलेले ग्रह अनेक दिवसांसाठी जवळ जवळ आलेले दिसत आहेत! आणि अजूनही किमान तीन- चार दिवस ते डोळ्यांनी खूपच जवळ दिसतील.
आता ह्या मागची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. लॉकडाउन आणि कोरोनामुळे सगळ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. जग इकडचं तिकडे किंवा "तिकडचं" इकडे झालं! पण माझ्या बाबतीत मात्र लॉकडाउनने काही गोष्टी मला दिल्या. त्यातली पहिली म्हणजे रनिंग. इन्डोअर रनिंगच्या माध्यमातून रनिंगमधली खूप वेगळी बाजू मला बघता आली, शिकता आली व एंजॉयही करता आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझा आकाश दर्शनाचा छंदही नव्याने सापडला. लॉकडाउनच्या काळात खूप गोष्टींची नव्याने उजळणी व आखणी करण्य़ाची संधी मिळाली. त्यामध्ये माझ्या मित्राने घेतलेल्या टेलिस्कोपच्या निमित्ताने माझा सगळा छंद रिबूट झाला. लहानपणी १० व्या वर्षापासून मला आकाशाची खूप आवड होती. तेव्हा खगोलावर एक पाक्षिकही एक वर्षं चालवलं होतं, ते आयुकाच्या लायब्ररीपर्यंत गेलं होतं व डॉ. नारळीकरांची पत्रही मला आली होती. माझ्या मामाने मला ही आवड लावली होती आणि त्याने एक छोटा टेलिस्कोपही घेऊन दिला होता. तो आज २५ वर्षांनंतरही तितकाच टिकून आहे व old is gold सिद्ध करतो आहे!
पण इतकं "एक्स्पोजर" मिळूनही नंतर शिक्षण, करीअर आणि नंतर संसाराच्या चक्रामध्ये हे मागे पडत गेलं. कधी ग्रहण असेल तर तेव्हा किंवा कधी मोठी आकाशीय घटना असेल तेव्हाच हा विषय समोर यायचा. पण जेव्हा मित्राने टेलिस्कोप घेतला व मग त्यातून काय काय बघता येईल असा विचार मनात आला तेव्हा उजळणी सुरू झाली. आणि आता एका अर्थाने सगळे सॉफ्टवेअर्स, अद्ययावत माहिती, आकाशातल्या स्थितींचे रोजचे अपडेटस हे ज्ञान खूप सहजपणे उपलब्ध आहे. माझ्या लहानपणी व गेली १० वर्षं सोडली तर आधी ते तसं उपलब्ध नव्हतं. मग त्यातून मित्रासोबत शेअरिंग करता करता कळालं की माझ्या टेलिस्कोपमधूनच माझं खूप आकाश बघायचं राहून गेलं आहे! अगदी "गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे!" मग झाली रिबूट व रिस्टार्ट प्रक्रिया सुरू. त्या जुन्या 8-24 X 40 मोनोक्युलरमधून पण आजचे साधनं व अद्ययावत apps वापरून एक एक गोष्टी बघायला सुरुवात केली. आणि काही महिन्यांमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षं मागे गेलो आणि तीच मजा, तोच आनंद आणि तीच रंगत परत मिळाली! त्या टेलिस्कोपच्या "कक्षेमध्ये" असलेले पण बघायचे राहूनच गेलेले अनेक ऑब्जेक्टस बघितले (युरेनस- नेपच्यून, काही लघुग्रह, काही तारकागुच्छ इ.)! त्यातही अनेकदा अपयश येत होतं. पण ती आवड होती, आजचं तंत्रज्ञान होतं. आज आकाशात कोणता ऑब्जेक्ट कुठे आहे ही माहिती अगदी मोबाईलच्या स्क्रीनवर उपलब्ध असते. ती वापरून ती राहून गेलेली कसर भरून काढली!
आणि हा आनंद व ही मजा परत अनुभवताना वाटत होतं की, इतका वेळ गेला ठीक आहे. पण आता इतरांसोबतही हे शेअर करायला पाहिजे. त्यातली मजा, त्यातून कळणा-या एक एक गोष्टी व त्यातून येणारी एक व्हिजन व वैज्ञानिक समज लोकांसोबत शेअर करायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यातून नवीन टेलिस्कोप घेण्याची इच्छा झाली. जुन्या छोट्या टेलिस्कोपच्या क्षमतेचा पूर्ण नाही तरी ब-यापैकी वापर झाला व आता इतरांना दाखवण्यासाठी म्हणून नवीन टेलिस्कोप घ्यावासा वाटला खूप "रि-व्ह्यू" करून ठरवला आणि तो गुरू- शनीच्या महायुतीच्या थोडेच दिवस आधी मिळाला! पण देर आए, दुरुस्त आए! त्यामुळे ह्या Startracker 114/500 reflector पोर्टेबल टेबलटॉप टेलिस्कोपमधून लोकांना गुरू शनी व इतरही अनेक ऑब्जेक्टस दाखवता आले! आणि इतरांनाही त्यातला थरार किती छान वाटतो ते बघता आलं! चंद्र बघतानाच्या लोकांच्या प्रतिक्रिया तर Oh My god, अरे बाप रे! अशा असायच्या!
परभणीमध्ये इथल्या खगोलप्रेमींसोबत दोन छोटी सेशन्स घेतली. आता इथून पुढे अशी सेशन्स इतरही घेण्याचा विचार आहे. आकाशामध्ये एक घटना होऊन गेली तरी दुसरी घटना सुरूच असते. किंबहुना आपल्या इतक्या चिमुकल्या डोळ्यांनी आपल्याला इतके कोट्यवधी- अब्जावधी किलोमीटर दूरचे तारे- आकाशगंगा दिसतात हाच मोठा चमत्कार आहे. आपण त्या ता-यांपेक्षा जवळ जवळ अनंत पट छोटे असूनही त्यांना बघू शकतो, त्यांचे आकृतीबंध व त्यांच्या गमती समजू शकतो, हा मोठा चमत्कार आहे! आणि टेलिस्कोपशिवाय नुसत्या डोळ्यांनीही आकाशातल्या किती तरी गमती दिसू शकतात; किती गोष्टी बघता येतात; हेही तितकंच खरं. तेव्हा माझ्या प्रोफेशनल कामाचं (online consultancy) मोबाईल स्वरूप लक्षात घेता जिथे आकाश बघण्यास उत्सुक लोक असतील तिथे जाऊनही असे सेशन घेऊ शकेन. त्यासाठी योग्य तो पोर्टेबल टेलिस्कोप आहेच, त्याबरोबर आकाशात काय व कुठे बघायचं ही समजही नव्याने मिळालेली आहे. आणि हे फक्त आकाश दर्शन नाही तर त्यामध्ये विज्ञान आहे, एकाग्रता आहे, निसर्गातल्या गमती जमती समजून घेणं आहे, शांतपणे परत परत प्रयत्न करण्याचं धैर्य आहे आणि खूप मनोरंजनही आहे, infotainment ही आहे!
आपल्या माहितीत कोणाला छोट्या ग्रूपने आकाश बघायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com
'गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्राचे देणे'....खूप छान...गुरू शनिच्या महायुतीचे चांगले दर्शन तूझ्या ब्लॉग मधून झाले... फोटोज् अप्रतिम आहेत.
ReplyDelete