Friday, June 4, 2010

कर्वे: "वे" ऑफ लाईफ:

माझ्या आयुष्यात "कर्वे" (म्हणजे कर्वेनगर, कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, कर्वे समाजसेवा संस्था, कर्वे पुतळा आदि) संबंधित गोष्टींचं स्थान फार विशेष आहे. इतकं, की "कर्वे"मध्ये येण्याआधीचं जीवन आणि नंतरचं जीवन असे दोन भाग करावे लागतील! गेल्या सुमारे चार वर्षांपासून जीवनचा मार्ग ("वे" ऑफ लाईफ) कर्वे झाला आहे. अनेक प्रकारे.....

सर्वांत पहिला कर्वे फॅक्टर म्हणजे कर्वेनगर. इथे आगमन आणि इथल्या वास्तव्याला सुरुवात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून झाली. त्यानंतर समाज सेवेमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी महर्षी कर्वे समाज सेवा संस्था. हा सर्वांत मोठा कर्वे फॅक्टर; जणू अनेक कर्वे उपग्रह असलेला कर्वे गुरू ग्रह! शिक्षण, ज्ञान, मित्र, मैत्रिणी, नोकरी (आत्तापर्यंतच्या सर्व जॉब मिळण्यामध्ये कर्वे व्यक्तींचा वाटा होता), आत्मविश्वास, स्पष्टता, जीवनदिशा आणि जीवनसाथी ह्या काही जीवनावश्यक गोष्टी! ह्या सर्व गोष्टी कर्वे समाजसेवा संस्थेने नेहमीसाठी दिल्या! एका व्यक्तीसाठी म्हणून कर्वे संस्थेची ही केवढी महत्ता! इतकं भरभरून कोणाला कुठून मिळत असेल? जीवनाचा एक अत्यंत एंजॉयेबल भाग कर्वेमध्ये व्यतित झाला. अनेक आठवणी, प्रसंग, क्षण, "मंतरलेले दिवस" . . . . अनेक गोष्टी पहिल्यांदाच झाल्या आणि होतच राहिल्या....

आजही ही प्रक्रिया पुढे सुरू आहेच. कर्वे पुतळ्याजवळील वास्तव्य आणि तिथलाच ड्रायव्हिंग क्लास! आणि आता परत पी.एच.डी प्रवेशासाठीचे केंद्र म्हणून कर्वे समाजसेवा संस्थाच मिळाली! जणू जीवनाचा केंद्रबिंदू "कर्वे" आहे. सर्व जीवन त्याभोवती विणले जात आहे. ....

"कर्वे"आधीही जीवन होतंच आणि नंतरही आहेच. पण कधीकधी अशा गोष्टी घडतात की "आधी" आणि "नंतर" असा फरक करावा लागतो. उदा., दुसर्‍या महायुद्धाआधीचे जग आणि त्यानंतरचे जग. त्याप्रमाणे "कर्वे"चं स्थान अद्वितीय आहे. एकाकी किंवा दिशाहिन प्रवास करून आल्यानंतरचे जीवनामधील जणू एक जंक्शन; ज्यातून मिळालेल्या धारा जीवनधारा झाल्या; नेहमी सोबतीला आल्या. जीवनामध्ये जीवनधारा सोबत मिळण्याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असेल?  समस्त "कर्वे" जगताला मानाचा मूजरा आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!