Wednesday, December 9, 2009

विपश्यना

आपल्या समस्यांसाठी विपश्यना मार्ग:
विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे पाहणे. ही एक स्वत: ला समजून घेण्याची, स्वत:ला बदलण्याची प्रक्रिया आहे.

पूर्वपीठिका:

विपश्यना ही गौतम बुद्धांनी नव्याने शोधून काढलेली आणि प्रसारित केलेली पुरातन भारतीय विद्या जी गौतम बुद्धांनंतर 500 वर्षांनी भारतातून लुप्त झाली. ही विद्या भारतातून लुप्त झाली असली तरी ब्रह्मदेशात (आजचा म्यानमार) मध्ये सुरक्षित होती आणि सत्यनारायणजी गोयंका जी ह्यांच्या प्रयत्नामुळे भारतात आली आणि गेल्या 40 वर्षांपासून सर्व जगात जात आहे आणि लोकांना ज्ञान देते आहे. सत्यनारायणजी गोयंका जी ह्यांनी सुरू केलेल्या विपश्यना केंद्रांवरून हे ज्ञान सर्व लोकांना दिले जाते.
विपश्यना काय आहे ?

विपश्यना ही कोणतीही अमूर्त कल्पना नाही. ही अत्यंत प्रत्यक्ष प्रत्यय येणारी गोष्ट आहे, पूर्णत: बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ आहे. आपण तिचा वापर करू शकतो, तिला प्रत्यक्ष करून बघू शकतो.

विपश्यना पद्धत म्हणजे आपल्या शरिरातील आणि मनातील संवेदनांकडे आणि अनुभवांकडे अलिप्तपणे, साक्षीभावाने पाहण्याची कला. आपल्या मनात, शरिरात सतत अनेक संवेदना, वासना, इच्छा, आसक्ती आणि विरोध येत जात असतात. ही विद्या आपल्याला त्यांच्याकडे अलिप्तपणे, साक्षीभावाने पाहायला सांगते.

ह्या पद्धतीमागच्या विचारानुसार, आपल्या सर्व समस्या, अडचणी, त्रास आणि तणाव हे आपल्या जास्तीच्या म्हणजे निसर्गानुसार, स्वभावत: येणार्‍या पेक्षा जास्त असणार्‍या वासना, इच्छा, आसक्ती आणि विरोध यांमुळे निर्माण होतात. म्हणजे आपल्याला निसर्गत: होणार्‍या इच्छेपेक्षा जास्त इच्छा, म्हणजे हव्यास, आसक्ती होते आणि ही आसक्ती आपल्याला आणि आपल्या बरोबर अनेकांना त्रास देते. नैसर्गिक इच्छा, भावना यांना आपण नियंत्रणात ठेवलं नाही, तर त्या वाढतच जातात आणि आपल्या त्रासाचं कारण बनतात. म्हणजे पैसा मिळवण्याची इच्छा. जर ती स्वाभाविक, नैसर्गिक पातळी पर्यंत असेल तर ठीक आहे. पण जर तिचा अतिरेक झाला तर हानीकारक आहे. किंवा अधिक उपभोग घेण्याची इच्छा तणावास कारणीभूत होते; कारण अधिक उपभोग हा काही नेहमी मिळू शकत नाही. आणि जरी मिळाला, तरी त्याला अधिक मिळवण्याची लालसाही वाढेल.
विपश्यना सांगते की आपण अंतर्मुख होऊन आपल्या वासना, इच्छा, आसक्ती आणि विरोध ह्यांना पाहिलं, तर आपण त्यांपासून मोकळे होऊ शकतो, त्या आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. हा एक वेगळा दृष्टीकोन आहे. समस्या सोडवण्याच्या प्रचलित एप्रोच पेक्षा वेगळा.

मानवी समस्या सोडवण्याचे प्रचलित मार्ग गरजांची पूर्तता करण्यावर भर देतात. जोपर्यंत स्वाभाविक, नैसर्गिक मानवी गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ही गोष्ट आवश्यक आहे. पण आपल्या किती समस्या गरजांच्या अभावामुळे होतात आणि किती हव्यासमुळे होतात हे बघितले पाहिजे. आणि कोणाच्या गरजा ह्या कोणाच्या (सामाजिक आणि पर्यावरणीय घटक ह्यांच्या) गरजांच्या अभावाला कारणीभूत होत आहेत का, हेही पाहिले पाहिजे. गरजा जरी नैसर्गिक मर्यादेपर्यंत, स्वाभाविक पातळीपर्यंत पूर्ण झाल्या तरी कशावरून त्या हव्यास किंवा आसक्ती बनणार नाहीत ?

ह्यासाठी विपश्यना मार्ग महत्त्वाचा आहे. ह्या मार्गानुसार आपल्या वासना, आसक्ती, अन्य गोष्टींबद्दलचा अवाजवी विरोध आपण कमी करू शकतो. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रियेचा अभ्यास सांगितला जातो. आपण आपल्या श्वासावर मन केंद्रित करून मनात आणि शरिरात येणार्‍या संवेदनांकडे अलिप्तपणे बघायला शिकतो, त्यामुळे असा सराव केला तर आपल्याला मनाविरुद्ध होणार्‍या गोष्टी अस्वस्थ, अशांत करू शकत नाहीत. आपल्या मनावर आपले नियंत्रण येऊ शकते आणि त्यामुळे आपल्या समस्या कमी होऊ शकतात. विपश्यना पद्धती आपल्याला आपल्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते. आपण बुद्धीच्या म्हणजेच बाह्य मनाच्या पातळीवर अनेक गोष्टी समजत असतो; पण करताना अनेक वेळा कमी पडतो; याचे कारण आपल्या अंतर्मनाचा स्वभाव त्याविरुद्ध असतो. म्हणून केवळ जाणीव असूनही अनेक प्रकारचे त्रास, असमतोल होताना दिसतात. विपश्यनेच्या मदतीने आपण अंतर्मनाचा स्वभाव नियंत्रणात आणून आपल्या जीवनात येणारा ताण, असंतुलन कमी करू शकतो.
सामाजिक समस्यांसाठी सुद्धा हा मार्ग, एप्रोच महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारचे सामाजिक इंटरव्हेंशस हे गरजांच्या पूर्तिवर भर देताना दिसतात. उदाहरणार्थ, सेक्स वर्कर्सना आणि त्यांच्या ग्राहकांना कंडोम वाटणे, समुदायाच्या गरजांनुसार पैसा पुरवणे इत्यादि. पण ह्यातून हा धोका नाही का की, ह्या गरजा वाढतच जातील आणि मग आत्ता आहे ते असंतुलन वाढतच जाऊ शकेल. ह्या पार्श्वभूमीवर विपश्यनेचा मार्ग, जो आपल्याला ताण, तणाव, अशांतता देणार्‍या वासना, विकार, तीव्र इच्छा, काही गोष्टींबद्दल असणारा विरोध ह्यांपासून मोकळे करतो. जर वासना नियंत्रणात असतील, तर त्या कोणताच ताण निर्माण करू शकणार नाहीत.

अनेक परिस्थितींमध्ये समस्या सोडवण्याचे मार्ग हे केवळ बुद्धी पर्यंत म्हणजेच बाह्य मनापर्यंत पोचणारे असतात, उदाहरणार्थ – माहिती देणे, समुपदेशन करणे. पण सर्व विकारांचं मूळ अंतर्मनात आहे आणि तिथे बुद्धी पातळीवरील हस्तक्षेपाचा परिणाम अत्यंत थोडा होतो. म्हणूनच समस्या तशाच राहतात, किंवा थोड्या कमी होतात. पण जर विपश्यना अंतर्मनाला बदलवण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत असेल, तर ती मोठी गोष्ट असेल; कारण त्या द्वारे समस्यांचे मूळ कारण दूर होण्यास मदत होईल.

विपश्यना केंद्रे आणि 10 दिवसीय शिबिर:
विपश्यना शिकण्यास सुरूवात करण्यासाठीचा राजमार्ग म्हणजे 10 दिवसीय शिबिर जे अनेक विपश्यना केंद्रांवर भरते. इगतपूरी, धुळे, औरंगाबाद, पुणे, नागपूर, सांगली अशा अनेक ठिकाणी अशी शिबिरे होतात ज्यांची माहिती आपल्याला वेबसाईट वर मिळू शकते. हे निवासी शिबिर 10 दिवस चालते. ह्या शिबिराच्या अटी (उदा., पूर्ण मौन, सतत ध्यान, एक वेळ जेवण) काही जणांसाठी अडचणीच्या असू शकतील. तरीही ही अनमोल विद्या पाहता ह्या गोष्टी काहीच महत्त्वाच्या नाहीत.
विपश्यना ही विद्या सर्वांसाठी आहे, कोणता पंथ, संप्रदाय, उपासना मार्ग ह्यासाठी ती बंदिस्त नाही. आपल्या समस्या सोडवण्याचा एक नवीन मार्ग मिळवण्यासाठी एकदा तरी ह्या शिबिरा मध्ये जाणे उत्तम. हे शिबिर विनामूल्य आहे कारण त्याचा खर्च तिथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या देणगीतून होतो. आणि ही विद्या इतकी श्रेष्ठ असल्याने तिचा लाभ मिळालेले लोक स्वत:च तिचा खर्च करतात, तिचा लाभ अन्य लोकांना मिळावा म्हणून प्रयत्न करतात. ह्याच प्रकारे नि:शुल्क तत्त्वावर संपूर्ण जगभर विपश्यना केंद्रे कार्यरत आहेत. ही गोष्ट सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे. बहुतांश संस्था पैशांच्या आधारावर काम करत असताना स्वत: च्या विद्यार्थ्यांद्वारे स्वत:चा निर्वाह करणारी विपश्यना परंपरा अनेक बाबतींत नवीन आदर्श, नवा मार्ग आणि नवा दृष्टीकोन देते.

ह्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि 10 दिवसीय शिबिरात भाग घेण्यासाठी संपर्क सूत्र:
विपश्यना विशोधन विन्यास, धम्मगिरि, इगतपूरी, जिल्हा नाशिक. 422403 (02553) 244076, 244086 वेबसाईट – www.vridhamma.org, www.dhamma.org
ईमेल – info@giri.dhamma.org

1 comment:

  1. ब्लॉग विश्वात आपले स्वागत..विपश्यना बाबतची सखोल माहिती यामधून समजली. परंतु हा ब्लॉग म्हणजे माहितीपत्रक वाटलं..विपश्यनेचा आपला अनुभव..त्याचा आपल्याला झालेला वैयक्तिक फायदा ह्या गोष्टी ब्लॉगमध्ये आल्या असता तर ब्लॉग आणखी रंजक झाला असता. आणखी एक महत्वाची गोष्ट..ब्लॉगची भाषाशैली आणखी प्रवाही करावी..सामान्य वाचकापर्यंत पोहचण्यासाठी याचा उपयोग होईल.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!