Wednesday, December 9, 2009

ऊर्जा

ऊर्जा

ऊर्जा म्हणजे कोणतीही गोष्ट घडण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती. कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. विज्ञानाच्या दृष्टीने कार्य आणि ऊर्जा हे दोन वेगळे घटकच नाहीत; एकाच राशीची ती दोन रूपे किंवा अभिव्यक्ती आहेत. त्यांच्यातला फरक इतकाच की जर एखादे कार्य स्थितिक स्वरूपात म्हणजे Potential प्रकारे असेल; प्रत्यक्ष सक्रिय नसेल; तर त्यास ऊर्जा म्हणतात. उदाहरणार्थ रेडिओच्या बॅटरीची ऊर्जा. जर रेडिओ चालू नसेल; तर ती ऊर्जा अक्रिय स्वरूपात म्हणजे Potential प्रकारात आहे जी रेडिओ चालू केल्यानंतर कार्यामध्ये अभिव्यक्त होते. एका स्वरूपातून दुसर्‍या स्वरूपात ऊर्जेचे रूपांतर सतत सुरूच असते.
ऊर्जेशिवाय काहीही होऊ शकत नाही. नुसती ऊर्जा असून चालत नाही; तर त्या ऊर्जेला कार्यामध्ये रूपांतरित करता आले पाहिजे. एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता आले पाहिजे. आपण विद्युत ह्या ऊर्जेच्या सर्वाधिक प्रचलित रूपाचे उदाहरण घेऊ. वीज आपण असंख्य कामांसाठी वापरतो आणि ती नसेल तर आपले हाल होतात. वेगळ्या शब्दांत आपण विद्युत ह्या एकाच ऊर्जेच्या रूपावर जास्त अवलंबून आहोत; अन्य प्रकारांना आपण आवश्यक तितके महत्त्व दिलेले नाही. शुद्ध विज्ञानानुसार तर सर्व वस्तुमान आणि ऊर्जा परस्परांमध्ये पूर्णत: परिवर्तनीय आहेत. मग एकाच रूपावर किंवा प्रकारावर इतके अवलंबून का असावे ?
ह्यामुळे अनेक समस्या होताना आपण पाहतो. विद्युत ह्याच ऊर्जा प्रकाराचा अधिक विचार करू. भारतीय प्रजासत्ताकाच्या कल्याणकारी धोरणानुसार विद्युतपुरवठा हे सरकारचे दायित्व आहे. आजवर सरकार हे दायित्व पूर्ण करू शकले नाही. कागदावर सरकार सर्वांना वीज देण्याचे मान्य करत आहे; जसे २००५ च्या राष्ट्रीय विद्युत नितीमध्ये सांगितले आहे:
राष्ट्रीय विद्युत निती २००५ची उद्दिष्टे: १. त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये सर्व घरांना विद्युतपुरवठा देण्यात येईल. २. विद्युत गरजेची आवश्यकता २०१२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. (संदर्भ - www.mnes.nic/in )
प्रत्यक्षात आपण पाहतो; की सरकार हे दायित्व पूर्ण करण्यापासून कित्येक कोस दूर आहे. वास्तवातील परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आणि निराशाजनक आहे. ग्रामीण भागांमध्ये तर वीजेने बहिष्कार पुकारला असल्यासारखी स्थिती आहे. २४ तासांच्या दिवसापैकी केवळ ६ ते ८ तास वीज मिळते. शहरी भागांतही ६ ते ८ तास वीज बंद असते.

ह्यामुळे होणार्‍या परिणामांचा विचार करू. आधी बघितले त्याप्रमाणे वीज म्हणजेच ऊर्जा आहे. त्यामुळे वीज असेल तर सर्व काही असू शकते आणि वीज नसेल तर सर्व कारभार ठप्प. असेच दारूण चित्र सर्वत्र दिसत आहे.

आणि ह्या ऊर्जा दुष्काळाची सर्वाधिक झळ समाजातील सर्वांत दुर्बल घटकांना बसते. आणि ह्याचे सरळ कारण म्हणजे सरकारद्वारे सार्वजनिक सेवा ह्या स्वरूपात दिली जाणारी ऊर्जा म्हणजेच वीज आता विकत घ्यावी लागत आहे – इन्वर्टर, यूपीएस किंवा जनित्राद्वारे. आणि जी गोष्ट सरकारकडून सवलतीच्या दरात मिळत होती; ती विकत घेण्याची वेळ आल्यावर जे ती विकत घेऊ शकत नाहीत; त्यांचे हाल होत आहेत. अगदी त्याप्रमाणे जर लोकल ट्रेनची सेवा खंडित झाली; तर श्रीमंत माणूस टॅक्सी करून घरी जाऊ शकतो; पण गरिबाला; जो ती सेवा विकत घेऊ शकत नाही; त्या सर्वांना लोकल सुरू होईपर्यंत थांबावेच लागते किंवा अनेक हाल सोसत जावे लागते.

ऊर्जेसारख्या अत्यत जीवनावश्यक घटकाचे बाजारीकरण झाल्यामुळे समाजातील विषमताही वाढते आहे. वस्तुत: कल्याणकारी सरकारचे काम आहे; की समाजातील दुर्बल घटकांना विशेष सुरक्षा द्यावी आणि त्यांचे हित लक्षात घेऊनच ध्येयधोरण राबवावे. पण ह्या संदर्भात अत्यंत विरुद्ध आणि विपरित होताना दिसत आहे.

ह्यावर उपाय काय ? ह्यावर सर्वांत चांगला मार्ग हाच की, जर सरकारची सर्व जनतेस सेवा देण्याची क्षमता उरली नसेल; तर जनतेनी स्वत:च्या प्रयत्नाने आपली गरज भागवावी आणि सरकारवर अवलंबूनच राहू नये. म्हणजे सरकारने काहीही केले आणि नाही केले तरी जनतेचे नुकसान होणार नाही. वस्तुत: विद्युत उत्पादन आणि वितरण ह्या क्षेत्रात कित्येक खाजगी आणि बहुराष्ट्रीय घटकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे सरकार किंवा सरकारी कंपन्या फार काही करतील असे गृहित धरून चालणे फायद्याचे ठरणार नाही.

प्रश्न उरतो की, आपण स्वत:च आपली वीजेची गरज कशी पूरी करणार ? ह्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे काम करावे लागेल. चाकोरीबाहेर जाऊन बघावे लागेल, विचार करावा लागेल आणि प्रयोग करावे लागतील. त्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तर आपल्या गरजा किती आहेत; त्यातल्या किती योग्य आहेत आणि किती गरजा अनाठायी आहेत हे तपासावे लागेल. त्याचबरोबर छोट्या प्रमाणावर जैवइंधन – बायोगॅस, सौर ऊर्जा, कचर्‍यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजवर अशा अनेक पद्धती अस्तित्वात येऊन विकसित झाल्या आहेत; परंतू खाजगी विद्युत निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही. आरती (ऍप्रॉप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्युट), पुणे सारख्या संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान ह्या दिशेने पुढे जाण्याचा एक मार्ग नक्कीच आहे. कदाचित आपल्यासाठी हे मार्ग आयत्या मिळणार्‍या वीजेइतके सोयीचे असणार नाहीत; पण त्याद्वारे आपण हळू हळू स्वयंपूर्ण होऊ शकतो. जितके आपण करू शकतो; जितक्या प्रमाणात सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या ऊर्जेपासून मोकळे होऊ शकतो; तितक्या प्रमाणात आपण मुक्त होऊ शकतो. समाजातील दुर्बल घटकांचे सशक्तीकरण (Empowerment) करणारी शक्ती म्हणजे Power ह्याच प्रकारे प्राप्त होईल.

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!