Friday, May 27, 2011

हिमालयाच्या दिशेने.......

ही एका मोहिमेची सुरुवात आहे. हा एक प्रवास आहे.

तसं पाहिलं तर जीवन हा अखंड प्रवासच आहे. फक्त टप्पे बदलतात. रेल्वेच्या रुळांप्रमाणेच सांधे आणि ट्रॅक बदलतात.

मनामध्ये फार पूर्वीपासून असलेली इच्छा आणि ओढ कुठे तरी साकार होते आहे, असं वाटत आहे. सह्याद्रीच्या दर्शनाच्या निमित्ताने किंवा हिमालयाच्या फोटोंच्या दर्शनाच्या निमित्ताने असेल, पण गेले काही दिवस हिमालयामध्ये लद्दाखपर्यंत तरी जाऊन यायची तीव्र इच्छा होते आहे. शक्य असेल तितकं सियाचेनच्या म्हणजेच भारताच्या ताब्यात असलेल्या सर्वोच्च भारतीय भूभागावर जाऊन यावं असं वाटत आहे. काश्मीर- भारताचा अत्यंत वेगळा भाग. नेहमी चर्चेत असलेला. सियाचेन त्यातला टोकाचा भाग. पाकव्याप्त काश्मीर व चीनव्याप्त काश्मीरच्या बेचक्यात असलेला. पुढील फोटोमध्ये सियाचेन व काश्मीरमधील गुंतागुंत दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय विकिपेडियाचा फोटो आहे, म्हणून आझाद काश्मीर व अक्साई चीन ह्या नावाने भारतीय भाग दाखवला आहे:
असा हा भाग सर्वच दृष्टीने असाधारण. सर्वच विपरित असलेला. तिथे जाऊन सैनिकांना, तिथल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना व लोकांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.

एकदा डोक्यात किडा वळवळू लागला तर सनकी माणसं शांत बसू शकत नाहीत. तेच झालं आणि एक एक विचार सुरू झाला. ट्युबा पेटू लागल्या. मनामध्ये लद्दाखला बाईकवरून जाण्याची विलक्षण कल्पना शिरली व तिने मन व्यापून टाकलं.

चर्चा, माहिती व विचारांचं आदानप्रदान सुरू झालं. माहिती मिळवणे, देणे, मेलवर संपर्क करणे इत्यादि इत्यादि सर्व सुरू झालं. ह्या सर्वच प्रक्रियेमध्ये आधीचे लद्दाखवीर व सह्याद्रीचे सरसेनापती म्हणून ब्लॉगर्समध्ये प्रसिद्ध असलेल्या रोहन चौधरी ह्यांनीही खतपाणी घातलं व अनुभवाचे बोल सांगितले. ही सर्व माहिती घेत असताना व कच्चा आराखडा बनवत असताना आम्ही- मी व गिरीश- माझा परममित्र ह्यांनी एक चाचणी मोहिम घ्यायची ठरवलं, ज्यामुळे बाईकवर मोठा प्रवास करण्याचा आम्हांला एक छोटासा अनुभव आला असता.

जवळचा, शक्य असलेला आणि विविध अनुभव मिळतील असा प्रवास म्हणून पुणे ते देवगड हा प्रवास ठरवला. ठरवलं, काही तयारी केली आणि निघालोही पहाटे 5 वाजता पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून. दोघंच जण. दोघं नाही, अजून एक जण आणि 'तीच' सर्वांत महत्त्वाची. ती म्हणजे गिरीशची स्प्लेंडर.

तिघं निघालो. पहाटेची वेळ म्हणजे ड्रायव्हिंग करायला सर्वांत सुखद आणि निवांत वेळ. अगदी बॅटिंग पिच आणि सकाळ होईपर्यंत पॉवर प्ले! पुणे जिल्हा ओलांडून खंबाटकी घाट- सातारा व कराड आलं. इथे पहिला टप्पा संपला व ड्रायव्हर बदलला. माझी आणि 'तिची' म्हणजे स्प्लेंडरची पहिल्यांदाच इतक्या जवळून ओळख होत होती. प्रत्येक गाडी प्रत्येक व्यक्तीप्रमाणे किंवा घोड्याप्रमाणे युनिक असावी. त्यामुळे थोडं जुळवून घ्यायला वेळ लागला.

जसा वेळ जात होता, तसा ताजेपणा कमी होत गेला. नंतर कोल्हापूरमध्ये गर्दी आणि रस्त्याची शोधाशोध ह्यात वेळ गेला.

अखेर बरीच विचारपूस करून राधानगरी रस्ता शोधला व रस्त्याच्या बांधकामामधून 'वाट' काढत तिथे पोचलो. जाताना राधानगरीमार्गे फोंडा घाट बघायचा होता, त्यावर गाडी चालवून बघायची होती आणि देवगडहून परत येताना गगनबावडा हा सरळ उभा घाट चढायचा होता. म्हणजे चांगली फेरी झाली असती.

कोल्हापूरमध्ये सगळीकडे रस्त्यांची (रखडलेली) कामं पाहून आलेला वैताग राधानगरी येईपर्यंत टिकला. कारण इथपर्यंत रस्ता 'अंडर कन्स्ट्रक्शन' आणि कच्चा असल्यासारखा आहे. जसा वेळ जात होता, तसं थकव्यामुळे, गुरुत्वाकर्षण सक्रीय झाल्यामुळे (बसून बसून शरीराचा काही भाग दुखत असल्यामुळे) वारंवार थांबावं लागत होतं. एक गोष्ट छान होती. की निसर्ग खूप आल्हाददायक होता. त्यामुळे ऊन्हाचा त्रास लागत नव्हता. परंतु पहाटे 5 ला निघून व 10 वाजता कोल्हापूर सोडून राधानगरीला पोचेपर्यंत दुपारचा 1 वाजल्यामुळे थांबत थांबत जावं लागत होतं. येणा-या प्रत्येक गावात चहा- सरबत असा ब्रेक घेत घेत जात होतो.

राधानगरीनंतर कुठेही घाटाचा फलक लागला नाही, परंतु रस्ता घाटासारखाच होता. तरीही खूप कमी वळणं आणि कमी तीव्र. मात्र जंगल, वनश्री व वातावरण छान होतं. सह्याद्रीच्या माथ्याकडे जात असल्याची जाणीव होत होती. सर्वत्र पूरेपूर हिरवं असलेलं कोल्हापूर दिसत होतं.

राधानगरीनंतर दाजीपूर येऊन गेल्यावर पुढे वळणं- वळणं संपून दूरवर सपाट जागा दिसायला लागली. हाच घाटाचा बिंदू... इथून पुढे उतार सुरू झाला. दूरवर किनारी मैदानी प्रदेश- सिंधुदुर्ग जिल्हा दिसत होता. कोल्हापूर जिल्हा संपून सिंधुदुर्ग जिल्हा सुरू झाला. प्रवासाच्या ह्या टप्प्यावरील दृश्ये इथे पाहता (येतील  फाईल फार मोठी नसल्यामुळे लगेच दिसेल).  निसर्गाला बघताना थकवा व गुरुत्वाकर्षणाचा ताण निघून जात होता.देवगड इथून साधारण 50 किमी होतं. रस्ता यक नंबर होता. राधानगरी- देवगड चांगला रस्ता मिळाला. आता सिंधुदुर्ग सुरू झाल्यावर लाल माती सुरू झाली. आठ वर्षांपूर्वी पाहिलेलं देवगड आठवत होतं.

थांबत थांबत जात असल्यामुळे आणि कोल्हापूरमध्ये रस्ता शोधताना व गर्दीत बराच वेळ गेल्यामुळे आमचं वेळेचं गणित चुकलं. जो प्रवास 7 तासांमध्ये होईल असं वाटलं होतं, त्यासाठी आम्हांला 9 तास लागले. शेवटी 2.15 ला देवगडजवळ आलो. पण आत्याच्या घरी जाण्याऐवजी सरळ समुद्राच्या दिशेने पुढे जामसंडेपर्यंत आलो. दूरवरूनच समुद्राचं- निळ्या अभेद्य भिंतीचं दर्शन घेतलं. नंतर मग परत मागे वळून देवगडपासून 9 किमी पूर्वेला असलेल्या माळरानातील घरी गेलो. सर्वत्र लाल माती, मोठे मोठे दगड आणि शां त ता.

जेवण-  आराम करून झाल्यावर पुढचं नियोजन सुरू झालं. आधी विचार होता, देवगड समुद्र पाहून (म्हणजे बीचवरून) लगेच परत निघावं. कारण लद्दाख मोहिमेच्या तयारीसाठी सतत ड्राईव्ह करण्याचा सराव करायचा होता. बरीच चर्चा व बौद्धिक अभ्यासानंतर तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या दिवसात विजयदुर्ग पाहून होण्यासारखा होता. लगेच विजयदुर्गच्या दिशेने निघालो.

सर्व परिसर रमणीय होता, शरिराच्या दुख-या भागालाही विश्रांती मिळाली होती. त्यामुळे मजेत निघालो. शहरापेक्षा अत्यंत वेगळ्या वातावरणात आल्यामुळे अत्यंत प्रसन्नता होती. नवीन परिसर असल्यामुळे अत्यंत विशेष वाटत होतं. परिसर मी कित्येक वर्षांपूर्वी पाहिला होता आणि गिरीश पहिल्यांदाच पाहत होता. जामसंडे सोडल्यानंतर थोड्याच वेळात देवगडच्या खाडीचं दर्शन झालं.
समुद्राला ओलांडलं. समुद्राचं दर्शन अत्यंत सुंदर होतं.  मन अत्यंत खोलवर प्रसन्न करणारं. छोटा ब्रेक- फोटो आणि व्हिडिओसेशन करून पुढे निघालो.

रस्ता छान होता आणि सर्व नवीन असल्यामुळे तिघंही मजेत होतो [स्प्लेंडर सर्व काळ मजेत होती, तिला गुरुत्वाकर्षणाचा काहीच त्रास नव्हता..... (;o ] अंतर फार जास्त नव्हतं, परंतु वळणं आणि नवीन भाग ह्यामुळे हळु चालवत होतो. त्यावेळी गिरीशने टिपलेले हे काही क्षण. ह्यामध्ये घरं, हिरवी झाडं, शांतता, समुद्राचं पाणी ह्या दुर्मिळ गोष्टींचं दर्शन होतं.

छोटी छोटी गावं मागे पडली. रत्नागिरीचा रस्ता पुढे निघून गेला व विजयदुर्गचा रस्ता डावीकडे वळाला. विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम टोकाला आहे. तीन बाजूंनी समुद्र व एका बाजूने जमीन. खाडीच्या पुढे रत्नागिरी जिल्हा- राजापूर तालुका दिसतो (इथेच जैतापूर आहे)...

विजयदुर्ग गाव ओलांडून किल्ला व किना-याजवळ आलो. समुद्राचा आवाज येत होता. पण तो समोरच्या समुद्राचा- खाडीच्या पाण्याचा नव्हता तर मागील बाजूच्या समुद्राचा होता. तिस-या प्रवाशाला विश्रांतीसाठी ठेवून किल्यात शिरलो. सर्वत्र इतिहास आणि समुद्र ह्यांचा प्रभाव. विजयदुर्ग अनेक दृष्टीने मराठा इतिहासातील एक विशेष किल्ला. शिवाजी महाराज आणि आरमार!!

विजयदुर्ग भव्य आहे. आणि खूप फिरण्यासारखा आहे. मुख्य म्हणजे खूप फिल करण्यासारखा आहे. तिथे जावं आणि समुद्राची हवा आणि इतिहासाच्या प्रेरणेला ग्रहण करावं. बस. इथे त्याचे काही बिंदु आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे काही व्हिडिओज आहेत.

विजयदुर्ग01
विजयदुर्ग 02
विजयदुर्ग 03
विजयदुर्ग 04 हे व्हिडिओ सविस्तर आहे.
विजयदुर्ग 05

विजयदुर्गाला एक प्रदक्षिणा घातली. बरीच पडझड झाला असला तरी किल्ला बराचसा टिकून आहे. गतवैभवाची चुणूक आणि नववैभवाची प्रेरणा देण्यास पुरेसा आहे. पण कोण ती घेणार???

विजयदुर्ग मनसोक्त बघून परत फिरलो. किल्ल्यामध्ये परत वळताना एका टप्प्यावर समुद्राच्या लाटांचा आवाज क्षणात बंद झाला. ही नक्कीच किल्ल्याच्या रचनेतील व्यवस्था असली पाहिजे. किल्ल्याच्या सुरक्षेचे पैलू- बुरूज- बंदुकीसाठीचे झरोखे व मजबूत भिंती अजूनही टिकून आहेत.

हा किल्ला, किंवा हा एकूण परिसरच काळ मंदावलेला- Timeless आहे, असं वाटून गेलं. समुद्राच्या उपस्थितीत पन्हपान करून विजयदुर्गाला निरोप घेतला. ड्रायव्हर बदलला. येताना सव्वा तास लागला होता, तर येताना गिरीशने फास्ट गाडी आणल्यामुळे पाऊण तासच लागला. देवगडमधून सूर्यास्त पाहता आला नाही. गाडीमध्ये पेट्रोल भरलं. कोल्हापूरइतकं नाही, तरी इथे पेट्रोल महाग मिळालं. प्रवासाच्या बजेटमध्ये ह्याही गोष्टीचा विचार करावा लागणार होता.

रात्र झाली तसं परत माळरानाच्या घरी आलो. हापूसची खरेदी केली आणि जेवून बाहेरच्या थरार अंधारात थोडा वेळ फिरलो. थरार फारच थरार होता. जवळपास कोणीच (माणूस/ मानवी घर) नाही, किर्र अंधार व समोरचं खोल दरी असलेलं माळरान. हा परिसर लहानपणापासून आकर्षणाचा विषय असल्याने आठवणींना भरती आली होती.

दुस-या दिवशी पहाटे उठून निघायचं होतं. झोप आली होती, तरी जागे असेपर्यंत मस्त गप्पा झाल्या व मग विश्रांती. तिसरी यात्रेकरू बाहेरच्या थंडीत व निरवतेत उभ्या उभ्याच आराम घेत होती.

देवगडपासून 9 किमीवर असलेल्या माळरानातील घरातून पहाटे 5 करता करता 5.40 ला निघालो. पहाटेचा प्रसन्न वारा, शांतता आणि हळुहळु जागा होणारा परिसर. प्रवासासाठी ह्याहून अधिक कोणती बॅटिंग पिच मिळणार? मस्त गाडी पळवत होतो. काल सूर्यास्त मिळाला नव्हता पण आज सूर्योदय मिळणार होता. चढ- उतार- डोंगर- झाडं (नदीया पहाड झील और झरने जंगल और वादी) ओलांडून नांदगावच्या दिशेने निघालो. मस्त रस्ता होता.

नांदगावला थोडं थांबून राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 वरून थोडं उत्तरेला निघालो. हा दिल चाहता है रस्ता (मुंबई- गोवा महामार्ग) !! त्या गाण्याच्या ओळी मनात आठवत निघालो.

नंतर गगनबावडाचा फाटा आला आणि उजवीकडे निघालो. गगनबावडा 35 किमी दूर होते. वाटेतला परिसर सुंदर होता. असणारच. रस्ताच्या दोन्ही बाजूंना झाडी आणि सकाळची शांतता. वैभववाडीच्या आधी कोंकण रेल्वे लागली. 

मग सुरू झाला गगनबावडाचा घाट. अत्यंत अप्रतिम होता. आणि अगदी घाटात येईपर्यंत घाट समोर दिसत नव्हता. हळु हळु एकामागोमाग एक उंच डोंगर दिसले. ढगातले डोंगर व रस्ता दिसला. हळुहळु धुकं सुरू झालं. अवघ्या 18 किमीमध्ये सह्याद्री चढून जाणारा हा घाट इथे पाहता येईल.

गगनबावडा मनात भरून घेतल्यानंतर परत कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू. रस्ता व परिसर अत्यंत रमणीय होता. कोल्हापूर जिल्हा कमालीचा सुंदर आहे व समृद्ध आहे. कोल्हापूरपर्यंत प्रवास छान झाला. ह्यावेळी कोल्हापूरमध्ये फार थांबावं लागलं नाही, रस्ता लगेच मिळाला व ट्रॅफिक व रस्त्याची बांधकामं पार करून भन्नाट अशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागलो. थांबत थांबत आलो, नाही तर तीन तासातच कोल्हापूरला पोचलो असतो, इतका रस्ता चांगला होता.

कोल्हापूर सोडल्यानंतर परत गुरुत्वाकर्षणाची जाणीव होण्यास सुरुवात झाली आणि ऊनही अस्तित्वाची जाणीव करून देत होतं. निसर्गाचं रूपही बदललं होतं. कोल्हापूरच्या पलीकडचा सर्व भाग पर्वणीसारखा होता व त्या तुलनेत कराड- सातारा इथला रस्त्यावरून दिसणारा भाग म्हणजे ओसाडच म्हणावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा थकवा वाढत चालला. वारणेच्या वाघाची जन्मभूमी ओलांडून आल्यानंतर कराडला परत ड्रायव्हर चेंज.

इथून पुढचा प्रवास बराचसा कंटाळवाणाच झाला. कारण एक तर शरिराचे काही भाग खिळखिळे वाटत होते. प्रवासाला सुरुवात करून 5-6 तास झाले होते आणि सतत थांबावं लागत असल्यामुळे गती कमी होती व त्यामुळे अजूनच कंटाळा येत होता.

कोणत्याही मोहिमेमध्ये हा वेळ म्हणजे कसोटीचा काळ. बॅटिंग पिच, पॉवर प्ले इत्यादि संपून कसोटीचा प्रसंग आला होता. नंतर नंतर तर इतकं खिळखिळं वाटत होतं, की इतर वेळी जो रस्ता बघता बघता पार केला असता, तो अवघड होऊन बसला. थांबत थांबत प्रवास करत करत सातारा- शिरवळ करत पुण्याच्या जवळ आलो. ट्रॅफिक लागली नाही, त्यामुळे पुढे लवकर येता आलं. शेवटी पहाटे 5.40 ला निघून दुपारी 2 ला पुण्यात पोचलो. जातानापेक्षा 1 तास कमी लागला. शेवटी थांबत थांबत यावं लागलं. अर्थात थांबूनसुद्धा गुरुत्वाकर्षणाचा त्रास जात नव्हताच, तरीपण क्षणभर विश्रांती..... असं करत करत प्रवास पार पडला.

प्रवा संपल्यावर प्रवासाकडे बघताना वाटतं, की एक चाचणी म्हणून ज्या उद्देशाने हा प्रवास केला, तो ब-याच प्रमाणात यशस्वी झाला. हजारो किमीचा प्रवास- तोही हिमालयात करताना कोणत्या अडचणी येतील, ह्याची  छोटीशी ओळख झाली. वेळेची गणितं चुकणे, शरिराचा काही भाग दुखणे आणि शरीर खिळखिळे होणे, अपरिचित प्रदेशातील गोंधळ, अडचणी इत्यादि इत्यादि. आता ह्या छोट्या धड्याचा उपयोग होणार आहे. मोठ्या मोहिमेची ही प्रीटेस्टिंग चांगली झाली.

एका व्यक्तीला धन्यवाद दिल्याशिवाय ह्या वर्णनाचा शेवट होऊच शकत नाही. ते म्हणजे गिरीशची स्प्लेंडर. राहुल द्रविड- द वॉल प्रमाणेच तिने एक बाजू भक्कम संभाळली व कोणताही व कसलाच त्रास दिला नाही. त्यामुळे आम्ही मनसोक्त भटकू शकलो.

इथून पुढे......

इथून पुढे हिमालयाच्या दिशेने जायचं आहे. त्या दृष्टीने सर्व माहिती घेणं, तयारी, अंदाज घेणं, चर्चासत्रं चालू आहे. मोहिम तर मोठीच आहे. साधी, सरळ नाही. त्या दिशेने प्रयत्न करायचा आहे. अजून पूर्वतयारीचा प्राथमिक टप्पाच चालू आहे. पण जायचं नक्की आहे. जम्मु- श्रीनगर- द्रास- कारगिल- लेह- खार्दुंगला- सियाचेन बेस कँप- खार्दुंगला- लेह- पेंगॉंग त्सो- लेह- पांग- रोहतांग- मनाली असा मुख्य प्रवास करायचा विचार आहे. जमेल तितक्या सियाचेन बेस कँपच्या जवळ जायचं आहे, जो भारताचा भारतीय नियंत्रणातील उत्तरेकडचा सर्वोच्च बिंदु आहे. जमल्यास 15 ऑगस्टला सियाचेनमध्ये अशा असाधारण ठिकाणी जायचं आहे (सियाचेनवरील जन गण मन- एक थरारक अनुभव व्हिडिओमधून)  व सैनिकांना भेटायचं आहे. देश, निसर्ग, लोक, सैनिक ह्यांना भेटणे व बोलणे हीच ह्या मोहिमेची उद्दिष्टं आहेत.  वरील व्हिडिओ बघितल्यानंतर काही बोलायची गरज उरतच नाही. देशाचा काश्मीर हा अतिसंवेदनशील आणि असाधारण भाग बघण्याची, जमलंच तर त्यासाठी काही करण्याची इच्छा आधीपासूनच होती. तिला इथे साकार रूप मिळेल, असं वाटतं आहे. बघूया.... अजून खूप मोठी तयारी व मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपणही काही आयडियाज सूचवू शकता....

Tuesday, May 17, 2011

दरीदरीतून नाद गुंजला...............

काही काही अनुभव असे असतात की जे फक्त फील करता येतात आणि त्याद्वारे आपण स्वत:ला चार्ज करू शकतो. असेच काही अनुभव म्हणजे दरी- खो-यांमधल्या महाराष्ट्रामधील भटकंती. नुकताच अशी भटकंती करण्याचा योग आला.

महाराष्ट्रातल्या समृद्धतेचा संपन्न वारसा लाभलेला एक प्रमुख जिल्हा म्हणजे कोल्हापूर..... इथे निसर्गाचे सर्व बाबतीतले ऐश्वर्य दिसते. सह्याद्रीचा घाट व पर्वतमय प्रदेश..... त्याला वर्णन करण्यास शब्द नाहीत. ह्या प्रकारे त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करणं म्हणजे इंद्रियातीत गोष्टीला इंद्रियांद्वारे समजून घेणं आहे.

विशाळगडाची पायवाट................... संपूर्ण घनदाट झाडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जणू जंगलच.............. आव्हान देणारा रस्ता आणि आकर्षक निसर्ग..... आणि त्यानंतर एका ठिकाणाहून होणारे चाळीस कोस तरी परिसरातील कोकणाचे (रत्नागिरी जिल्हा) दर्शन..... सर्वच अद्भूत.... निसर्गामुळे मानवी उंची वाढल्याचीही व सह्याद्रीप्रमाणे मनांचीही उंची वाढल्याची उदाहरणे दिसतात.

कोल्हापूरप्रमाणेच निसर्गाने समृद्ध असलेला पण काहीसा अँटी क्लायमॅक्स असलेला नंदुरबार जिल्हा..... सातपुडा...... उत्तर व दक्षिण ह्यामधील सीमारेषा म्हणजे सातपुडा आणि नर्मदा.... सातपुड्याच्या अजस्र रांगा.... अत्यंत आव्हानात्मक घाट आणि डोंगर.... इतका बिकट निसर्ग असूनही त्यामध्ये हस-या चेह-याने राहणारे आदिवासी....

हा परिसर, ही भ्रमंती म्हणजे शुद्ध प्राणवायूप्रमाणेच शुद्ध जगणं आणि शुद्ध सौंदर्य मिळवण्याची संधी. तो अनुभव शब्दामधून तर पकडता येत नाहीत. आणि तो अनुभव फोटोमध्येसुद्धा घेता येत नाही. कारण तो निसर्ग सर्व अनुभवत असताना, मनाने व मनामध्ये 'फील' करत असताना फोटो घेण्याची शुद्ध सर्वांनाच राहत नाही.

तरीसुद्धा फूल नाही, फुलाची पाकळी नाही, पण काही परागकण म्हणून हे काही फोटो. ते सर्व अनुभवणे, फील करणे ही एक मोठी गोष्ट आहे. त्यातून फोटो घेणे, ते उतरवून घेणे, ही वेगळी व पुढची गोष्ट आहे.

कोल्हापूर अजूनही हिरवागार आहे. परंतु सातपुडा- नंदुरबार मात्र पूर्णपणे ओरबाडला गेलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा निसर्ग आव्हान देतो आणि नंदुरबार- सातपुडा आव्हान देतो आणि आवाहनही करतो. 

अजून खूप फिरण्याची इच्छा आहे. काश्मीर हिमालयापासून संपूर्ण भारत. देखते है आगे आगे होता है क्या.