Friday, February 3, 2012

जॉय बांग्ला!!!!


नुकताच गोरिला हा बांग्लादेशी चित्रपट पाहण्यात आला. बांग्लादेश मुक्तीसंग्राम आणि १९७१ चे सत्तांतर ह्या पार्श्वभूमीचा हा अप्रतिम चित्रपट!! सर्वच दृष्टीने थरारक....


चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा मार्च १९७१ मध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशाही टोकाला पोचलेली असते. तेव्हा पूर्व पाकिस्तान असलेल्या (आजच्या बांग्लादेशच्या) प्रदेशात पाकिस्तानी सेना सर्व विरोधी आवाज मोडून टाकत असतात. ह्या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भुमिका असलेली नायिका- क्रांतिकारिका बिल्किस बानो हीचं नवीन लग्न झालेलं असतं व तिचा पती वार्ताहर असतो. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तो बातमी देण्यासाठी बाहेर पडतो आणि बेपत्ता होतो......... इथून नव्या बिल्किसचा जन्म होतो. ती तिच्या पतीचा शोध घेण्यास बाहेर पडते. ओळखीचे लोक, नातेवाईक ह्यांच्या मदतीने शोध घेता घेता ती क्रांतिकारिका बनते. भुमिगत युद्धात व गनिमी काव्याच्या संघर्षात (गोरिला वॉरफेअर) मुक्तीवाहिनीमध्ये सहभागी होते.

चित्रपटात तत्कालीन बदलती परिस्थिती, विविध संघर्ष, जुलुमी राजटीमध्ये लोकांचं होणारं शोषण आणि पूर्वी पाकिस्तानची लोकसंस्कृती, तत्कालीन शहरं ह्याबद्दल छान वर्णन आहे. मुक्तीवाहिनीने स्वतंत्र बांग्लादेश घोषित केलेला असला, तरीही ढाक्यासह ब-याच भागांमध्ये पाकिस्तानी सेनेचंच नियंत्रण असतं. तिथेच मग भुमिगत संघर्ष सुरू होतो. ब-यापैकी प्रामाणिकतेने व कोणाच्या भावना दुखावल्या जातील, असा जास्त विचार न करता वस्तुनिष्ठ मांडणी केलेली आहे. मुक्तीवाहिनीतील कार्यकर्ते, क्रांतिकारक आणि हिंदुंचा झालेला छळ काही प्रसंगांमधून ठळक प्रकारे मांडला आहे.


बिल्किसचा संघर्ष चालूच असतो. त्याबरोबर शत्रूचा छळही वाढत जातो. बिल्किस हळुहळु भुमिगत कारवाया सफाईने करते. शस्त्रे पुरवणे, माहिती घेणे, एकमेकांना मदत करणे अशी भुमिगत कामं ती योग्य प्रकारे पार पाडते. पण शर्थ करूनही तिला तिच्या पतीचा तपास लागत नाही. 

पाकिस्तानी सेना व पूर्व पाकिस्तानी बंगाली जनता ह्यांच्यामधील संबंध चांगल्या प्रकारे दाखवले आहेत. त्या पार्श्वभूमीमधील बरेचसे तपशील व घटक समजून घेण्यासाठी ह्या चित्रपटाची चांगली मदत होते. तसंच एका भुमिगत संघर्षाचं व स्थित्यंतराचं चित्रण म्हणूनही चित्रपट विशेष वाटतो. शत्रूचा विरोध व दडपशाही टोकाला गेल्यामुळे सर्व विरोधकांचं दमन केलं जातं. बिल्किसचे साथीदार पकडले जातात किंवा मारले जातात. मुक्तीसेनेच्या बरोबरीनेच रजाकारही उभे राहिलेले असतात. रजाकार म्हणजे थोडक्यात पाकिस्तानी चमचे! रजाकार शब्दाचे दोन अर्थ आहेत: पहिला अर्थ म्हणजे एखादा उठाव करणारा समूह/ गट आणि दुसरा अर्थ म्हणजे १९४८ पूर्वी हैदराबादच्या निजाम राजवटीतील क्रूरकर्मा कासीम रजवीचे अनुयायी!! 

.......परिस्थिती चिघळल्यानंतर बिल्किस बुरखा घालून (सामान्य बंगाली महिला बुरखा घालताना दाखवल्या नाहीत) ढाक्याहून दक्षिण- पश्चिमेस जायला निघते. रेल्वेमधल्या प्रवासाचंही चित्रण दर्जेदार आहे. मुक्तीवाहीनेचे सदस्य व हिंदु असल्याच्या कारणावरून प्रवाशांचा छळ केला जातो. अराजकामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. रेल्वे जशी एकेक स्टेशन पुढे जाते, तशी बिल्किस आठवणींमध्ये शिरते. तिच्या लहानपणीचं जग तिला आठवतं. हेही चित्रण सुंदर घेतलं आहे. 

इकडे, बिल्किसच्या गावाकडेसुद्धा संघर्ष शिगेला पोचलेला असतो. मुक्तीवाले तीस्ता नदीवरील रेल्वेचा ब्रिज पाडून टाकतात. त्यामुळे बिल्किसची गाडी तीस्ता स्टेशनवर येऊन थांबते. पण ती एकटीच पुढे जायला निघते. ब्रिज छोटासाच असतो व जरी रुळ तुटले असतात, तरी ती तो ब्रिज ओलांडू शकते. तिला असं येताना पाहून मुक्तीवाल्यांपैकीच तिच्या गावचा एक जण तिच्या मागे गुप्तपणे येत राहतो. ती येत असतानाच तिला विरुद्ध बाजूने मोठ्या संख्येने विमानं ढाक्याच्या दिशेने जाताना दिसतात...........पाकिस्तानी सैनिकांना चुकवत चुकवत ती तिच्या गावाच्या परिसराजवळ पोचते. पण इथली परिस्थितीसुद्धा बिघडली असते. इथे तिचा सख्खा भाऊ खोकोन कमांडर होऊन शत्रूला नामोहरम करत असतो. त्याचे पराक्रम ऐकून तिला अत्यंत आनंद होतो. पण इतर सर्व लोक शत्रूला मिळत असल्याचे पाहून ती पुढे जाऊ शकत नाही. तिच्या परिचयातलं जग उध्वस्त झालेलं व तिथली हिंदु कुटुंबं देशोधडीला लागलेली ती बघते. तोपर्यंत तो मुक्तीवाला तिला येऊन भेटतो व सर्व परिस्थिती सांगतो. मग ते दोघं पुढे जात राहतात. 

लवकरच पाकिस्तानी सेना खोकोन कमांडरला पकडते व आसपासच्या सर्व गावांमध्ये जाहीर सूचना देऊन त्याला हाल हाल करून ठार मारते. ही बातमी बिल्किसपर्यंत पोचल्यावर ती सुन्न होते. तिला तिचा भाऊ आणि लहानपणीचं जग आठवतं........... 

शत्रूची ताकत वाढलेली असते व ते फार काळ लपून राहू शकत नाहीत. एक गर्विष्ठ आणि स्वत:च्या पराक्रमाची बढाई मारणारा पाकिस्तानी अधिकारी तिला पकडतो. महिला कैद्यांसोबत तिला स्टेशनवर घेऊन जातात. सर्वत्र जुलुमशाहीचा नंगानाच चालू असतो. बिल्किस खोकोन कमांडरची बहिण आहे, हे कळाल्यावर तो अधिकारी तिला व तिच्यासोबत असलेल्या शिराज नावाच्या मुक्तीवाल्याला बोलावतो व त्यांचा अपमान करतो. पाकिस्तानी सेना किती प्रबळ आहे आणि मुक्तीवाल्यांना कसं नामशेष करत आहे, ह्याबद्दल बढाई मारतो. तेवढ्यात शिराज हा हिंदु आहे, हे त्याच्या शिपायाला कळतं. हिंदु आधीच परांगदा झालेले असल्यामुळे त्याला हिंदुला मारायला व हिंदु स्त्री उपभोगायला मिळणार म्हणून आनंद होतो.

परंतु तोपर्यंत बिल्किसने त्याच्याच टेबलावरच्या ग्रेनेडची किल्ली काढून तो पेटवलेला असतो..... हसत हसत ती ते ग्रेनेड त्याच्या हातात देते आणि................. प्रचंड स्फोट आणि धक्का........ ह्या धक्क्यामधूनच जुलुमी राजवटीला अखेरची घरघर लागते.....  
चित्रपटाचा शेवट होताना मुक्तीयुद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. पूर्व पाकिस्तानी जनतेने कशा प्रकारे प्रचंड मोल देऊन स्वातंत्र्य प्राप्त केलं, त्यामध्ये असंख्य वीर क्रांतीकारकांनी कसं बलिदान केलं व योगदान दिलं ते सांगितलं आहे. जुलै १९७१ पर्यंत इंदिरा गांधींनी बांग्लादेशला मान्यता दिली होती व स्वतंत्र बांग्लादेश हा शब्द वापरला होता. तरीही पाकिस्तानी दडपशाही चालू राहिल्यामुळे व भारतामध्ये लाखो निर्वासित येत राहिल्यामुळे अखेरीस भारतीय सेना मुक्तीवाहिनीच्या मदतीला गेली आणि अवघ्या १३ दिवसांमध्येच पाकिस्तानी लष्करशहा झिया उल हक शरण आला, ही ह्या सर्व परिस्थितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी...... इतकंच नाही, तर अमेरिकन सातव्या आरमाराला हस्तक्षेप करण्याची संधीच न देता भारताने निर्विवाद विजय मिळवला आणि दुस-या महायुद्धानंतरची सर्वांत मोठी शरणागती पाकिस्तानला पत्करावी लागली..... (अर्थात, युद्धानंतर भारताने पाकिस्तानच्या संबंधांमध्ये राजकीय लाभ किती मिळवला, ही बाब विविदास्पद आहे)...  
लेफ्ट. जनरल नियाझी शरणागती पत्करत असताना 
  
जॉय बांग्ला!!! (बंगाली अस्मितेचा विजय असो) अशी घोषणा आणि एका युद्धगीतासह चित्रपटाचा शेवट होतो..... अनेक प्रकारे हा चित्रपट समाधान देऊन जातो. त्या स्थिती व काळातले संदर्भ, परिस्थिती, भिन्न भिन्न घटक समजून घेता येतात. तिथली जनता किंवा जुलुमी राजवटीमधील कोणतीही जनता कशा परिस्थितीतून गेली, हे समजतं. तसंच उठाव करणा-यांचं कामसुद्धा समजतं.

त्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारे हा चित्रपट सरस आहे. पाकिस्तानी सैनिकांचं उर्दु काय किंवा बंगाली भाषा काय, भारत देश अजूनही सांस्कृतिक दृष्टीने व प्रॅक्टिकली अखंडच आणि जोडलेला आहे, हे जाणवतं. बंगाली भाषा ऐकताना वेगळी भाषा वाटतच नाही, इतकं सहजपणे ते समजतं. बांग्लादेशी किंवा पूर्व बंगाली संस्कृतीचंही चित्रण छान आलं आहे. पूर्व बंगाली मुस्लीम स्त्रिया मुस्लीम वाटतच नाहीत, कारण त्या साडी आणि दागिनेसुद्धा वापरतात. पूर्व बंगाल बघताना आणि तिथले लोक बघताना कितीही तुकडे झाले असले, तरी देशाची संस्कृती एकच आहे, हे जाणवत राहतं. त्याशिवायसुद्धा, १९७१ साली जग कसं होतं, ह्या दृष्टीकोनातूनही चित्रपट बघण्यासारखा आहे. आज आपण त्या काळापासून कमालीच्या वेगाने आणि कमालीच्या फरकाने दूर जात आहोत. त्यामुळे जुनं जग कसं होतं ह्याचं ज्ञान असण्याची आवश्यकता वाढतच जात आहे. तीही बाजू ह्या चित्रपटातून मिळते.

मुक्तीयुद्धामध्ये काही प्रमाणात पूर्व बंगाली हिंदु- मुस्लीम एकत्र आले असले, तरी नंतरच्या काळातलं चित्र विदारकच आहे. बांग्लादेश स्थापन झाला तरी सत्ता बांग्लादेशी लष्करशहाकडे आणि कडव्या गटाकडेच गेली. आजही रजाकार गटच जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे ब-याच प्रमाणात त्यावेळेसारखे अत्याचार पुढेही झाले व अजूनही काही प्रमाणात चालू आहेत. तसंच पाकिस्तानप्रमाणे बांग्लादेशही ब-याच प्रमाणात शत्रू देशच आहे. परंतु हा सर्व घटनाक्रम समजून घेताना १९७१ चा मैलाचा दगड ठरलेला सत्तांतराचा प्रवास लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सर्वच प्रकारे उत्तम अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट इथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. बांग्लादेश मुक्तीयुद्धाला चाळीस वर्षं पूर्ण होऊन गेल्यानंतर आलेला हा अत्यंत वेगळा आणि दर्जेदार असा हा चित्रपट नक्की पाहावा आणि त्याची माहिती इतरांनाही द्यावी, ही विनंती. तसेच बांग्लादेश मुक्तीसंग्राम व अन्य संबंधित घटनांबद्दल माहिती इथे वाचता येईल:2 comments:

  1. चांगली माहिती दिली आहे, सुरवातीच्या कथेवरुन शेवट काय असेल याचा अंदाज आला होता, तरीही चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली.

    ReplyDelete
  2. ata lavkarach baghnar ha movie...mastaa lihile ahes :)

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!