Thursday, February 2, 2012

दक्षिण दर्शन भाग २ (अंतिम): हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......!








हंपी........ मनामध्ये अनेक प्रश्न, उत्सुकता, उत्कंठा घेऊन हंपीला जात होतो. बंगळूरू आणि त्याच्या जवळपासची ठिकाणं पाहिल्यामुळे अपेक्षा वाढलेल्या होत्या. हंपी हे ठिकाण बेळ्ळारी जिल्ह्यात आहे. बेळ्ळारी जिल्ह्याबद्दल एक आठवण आपल्या मनात आहेच. सुषमा स्वराज विरुद्ध सोनिया गांधी असा सामना इथेच रंगला होता. हंपी हॉस्पेट ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून १३ किमीवर आहे. हॉस्पेट जंक्शन हे बरीच वाहतूक असलेल्या हुबळी- गुंटकल रेल्वेमार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन आहे. परंतु रेल्वेपेक्षा बसने कमी वेळ लागत असल्यामुळे बंगळूरूवरून बसनेच गेलो. बंगळूरूवरून ७ तासांवर असलेलं हॉस्पेट कोल्हापूरपासूनसुद्धा जवळजवळ इतकंच म्हणजे ८ तास आहे.

हॉस्पेटमध्ये ओळख काढून व थोडी सोय करून निघालो. सकाळच्या प्रसन्न हवेत हंपीच्या दिशेने प्रवास सुरू झाला...... सभोवती नारळाची झाडं व लाल माती! बरचसं कोंकणासारखं वाटत होतं. लवकरच हंपीच्या जवळ आलो. दूरवर भग्नावशेष दिसायला सुरुवात झाली.......
हंपीमध्ये आल्याआल्या सुरुवातीला गणपतीचं ही मूर्ती व आसपासचे भव्य अवशेष आपलं स्वागत करतात व आपल्याला निरखून ऐतिहासिक भव्य नगरीमध्ये आपल्याला जाऊ देतात......



.





आणि इथून सुरू होते एक अविस्मरणीय तीर्थयात्रा..................





हंपी...... आज मंदीरांची व वास्तुंची महानगरी असली, तरी सुमारे १३४७ ते १५७८ इतकी वर्षं हे एका महान साम्राज्याच्या राजधानीचं नगर होतं......... इथे प्रचंड इतिहास आहे. कदाचित महानगरीच्या भव्यतेहून अधिक भव्य.......


विरूपाक्ष राजाने बांधलेलं विरूपाक्ष मंदीर. हंपीच्या मुख्य स्थानांपैकी एक. मंदीरासमोरचा रस्ता हा त्या काळचा बाजारातला रस्ता होता..... ह्या बाजारपेठेची लांबी कित्येक किमी होती व त्यामध्ये सोनं- चांदीची ठोक विक्री होत होती................ ह्यावरून अंदाज येतो, की तत्कालीन अर्थव्यवस्था किती मजबूत, प्रबळ आणि श्रेष्ठ होती...... आणि अर्थव्यवस्थेवरून तत्कालीन समाजव्यवस्था, तंत्रज्ञान व संस्कृती कशी असेल, ह्याचा एक अंदाज बांधता येतो.









मुख्य प्रवेशद्वाराच्या आत असलेले दोन मंदीर


विराट, सूक्ष्म आणि भव्य!!



सम्राटांची वंशावळ. इथे मुख्य तीन राजघराणी होती.




विद्यारण्यस्वामी मठाचे स्थान. विजयनगरच्या साम्राज्याचे ते आद्य प्रणेते.......




तुंगभद्रेच्या काठावरती..................


इतक्या महान नगरीमधल्या वास्तुनिर्मितीचं एक कारण म्हणजे वास्तु करण्यास योग्य असे विशाल खडक इथे निसर्गत:च उपलब्ध होते.







आज अशी वास्तु कोणाला उभी करता येईल का?

विरूपाक्ष मंदीर समूह, पलीकडचे मंदीर, नदी परिसर व बाजारपेठ ही फक्त सुरुवातच होती...... आनंद एका गोष्टीचा होता, की पर्यटकांची फार गर्दी नव्हती. पण ह्याचं कारण पुढे कळालं. हंपीच्या ह्या परिसरामध्ये आत्ता दिसत असलेली वस्ती व इमारतीही पर्यटनामुळे झालेल्या आहेत व हळुहळु त्यावर पूर्णत: बंदी येत आहे. लवकरच हा भाग पूर्ण शांत व मूळ अवस्थेनुसार ठेवण्यात येईल, असं समजलं.

इथून पुढची तीर्थयात्रा म्हणजे एकामागोमाग एक अचाट, विराट, भव्य, अद्भुत वास्तुंमध्ये केलेली विलक्षण सैर होती.....



सर्व मुस्लीम सत्तांनी एकत्र येऊन तालिकोटला विजयनगर साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर हंपी राजधानी नष्ट करण्याचं काम सात वर्षं चालू होतं.............. आणि तरीही राजधानी नष्ट करता आली नाही........




अशा कितीतरी अद्भुत वास्तु तिथे आहेत......... ये तो झाँकी है........ अभी पूरी हंपी बाकी है!




ही नैसर्गिक कमान!!!! शेकडो वर्षांपासून हे खडक असेच आहेत......


हंपीच्या मुख्य मूर्तींपैकी/ वास्तुंपैकी एक- नरसिंह.







पाताळ शिव मंदीर. मुख्य मूर्ती जमिनीखाली पाण्यात आहे....


तत्कालीन सुरक्षा चौकी (आउट पोस्ट)








ह्या वास्तुंचं पूर्ण आकलन अजूनही झालेलं नाही.


कित्येक किलोमीटर परिसरात पसरलेल्या महानगरीच्या अवशेषांमध्ये अद्यापही पुरातत्त्व विभागाचं संशोधन चालूच आहे. कित्येक गोष्टी नव्याने सापडत आहेत. इतक्या मोठ्या परिसरात ह्या भव्य वास्तु पसरल्या आहेत......


हंपीच्या मुख्य वास्तु दर्शवणारा नकाशा.




एका वस्तुसंग्रहालयातील ह्या काही मूर्त्या.


उजव्या सोंडेचा गणपती


अशा अक्षरश: अगणित मूर्त्या सर्वत्र आहेत.




जागतिक संकटग्रस्त वारसा (Threatened Heritage) म्हणून युनेस्कोने सहाय्य केल्यानंतर ही हिरवळ निर्माण झाली.










दूपारी कडक ऊन्हात फिरताना शहाळं मिळाल्याचा आनंद विशेष! ह्या शहाळ्यामध्ये पाणी तर भरपूर होतंच, शिवाय अत्यंत मुलायम खोबरंसुद्धा होतं. गंमत म्हणजे ते खोबरं काढण्यासाठी व खाण्यासाठी एक नारळी चमचासुद्धा होता!!! निसर्ग महान आहे...............



हंपीमध्ये आधुनिक शहर असं नाहीच. काही छोटी दुकानं फक्त आहेत. त्यामुळे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था एक तर हंपीलगतच्या कमलापूरमध्ये होऊ शकते किंवा मग सरळ हॉस्पेटमध्ये. दुपारी जेवायला कमलापूरमधल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये गेलो, तर तिथे बरंच महाग होतं. म्हणून मग आणखी एका साध्या पण इफेक्टिव्ह हॉटेलात गेलो. अगदी स्वस्तात चित्रान्न (म्हणजे जवळजवळ फोडणीचा भात) मिळाला. जेवून परत निघालो.

हंपीचा मुख्य परिसर कमीत कमी ४० चौरस किमी इतका विस्तृत आहे आणि जवळजवळ सलगपणे सगळीकडे पाहण्यासारखं बरंच (अमर्याद असं) काही आहे. त्याशिवायसुद्धा बराच बघण्यासारखा परिसर आहे. त्यामुळे स्वत: गाडी करून फिरणं तर आवश्यक आहेच. त्याशिवाय पुरेसा वेळही हवा. कमीत कमी तीन दिवस. कारण नुसतं वरवर फिरून पोस्ट पोचवल्यासारखं जाणं बरोबर नाही.....

हंपीबद्दलच्या मर्यादित पूर्वज्ञानातून एक दिवस वेळ काढला होता. तो अपुरा पडणार हे कळालंच होतं..... पण ह्या सर्वांपेक्षा हंपीचं विराट विश्व मन व्यापून टाकत होतं. केवढी विलक्षण व भव्य नगरी!!! देशाच्या व जगाच्या इतिहासातलं एक अद्वितीय स्थान!!!!










त्या काळचं तंत्रज्ञान व दृष्टी!



दगडामध्येसुद्धा परमेश्वर असतो.




आज एवढं अवाढव्य काम करणं कोणाला जमेल? जमेल का गूगलला, ओबामांना किंवा चीनला?

प्राचीन काळात ह्या वास्तु कशा निर्माण केल्या असतील, ह्याबरोबरच का निर्माण केल्या असतील, हा प्रश्नही निर्माण होतो. त्यातून नजरेपुढे येणारं चित्रही ह्या वास्तुंइतकंच भव्य दिव्य असतं. जे राजे पिढ्यानुपिढ्या नगरीचा विकास अशाप्रकारे करू शकत असतील, ते किती वैभवशाली, समृद्ध असतील? ह्यातील ब-याचशा वास्तुरचना पौराणिक प्रसंग, रामायण व महाभारतातील कथा, दशावतार आदिंवर आधारित आहेत. विजयनगर साम्राज्याचा मुख्य सव्वादोनशे वर्षांचा काळ ब-यापैकी संघर्षपूर्णच होता. कारण साम्राज्याची उत्तर सीमा तुंगभद्रा ओलांडल्यावर उत्तरेला फार लांब नव्हती व लगेचच मुस्लीम सत्ता शत्रू म्हणून होत्या. तरीसुद्धा विद्यारण्यास्वामींच्या दूरदृष्टीवर उभं असलेलं हे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारत व्यापून पूर्वेला ओरिसापर्यंतही पसरलं. आशियासह युरोपामध्येही ह्या साम्राज्याचा व्यापार चालू होता. सिंहलद्वीप (श्रीलंका) आणि पूर्व आशियायी देश- मलेशिया, इंडोनेशिया हेही ह्या साम्राज्याच्या प्रभावाखाली होते व काही तर मांडलिक असल्यासारखे होते. अब्दुल रज्जाकसारख्या मध्य आशियायी जगप्रवाशाने आणि आणखी एका इटालियन जगप्रवाशाने ह्या साम्राज्याची व महानगरीची मुक्त कंठाने स्तुती केली आहे; तिची तुलना प्राचीन रोमसोबत केली आहे.........

मुख्य परिसरात गेल्यावर विठ्ठल मंदीराकडे जायला निघालो. आता वाहनांना आतमध्ये सोडत नाहीत. पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून विठ्ठल मंदीर सुमारे एक किमी आत आहे. जायचा मार्ग म्हणजे चालत जाणे किंवा मग छोट्या सौर रिक्शा आहेत. त्या सतत वाहतूक करतात. त्या खूप हळु जातात व तिथे थोडा वेळ थांबावंसुद्धा लागतं. कारण इथे बरीच गर्दी होती. शाळेची मुलं अधिक प्रमाणात होती.


विठ्ठल मंदीराजवळचा रथ







ह्या महालाच्या आतमध्ये मुख्य स्तंभांमध्ये असलेल्या पातळ स्तंभांना (गजांसारख्या पट्ट्यांना) आता हात लावू दिला जात नाही व तिथे आतमध्ये सोडत नाहीत. हे पातळ स्तंभ दाबले गेल्यासारखे दिसतात..... कारण त्यांना हाताने थोडंसं दाबल्यावर त्यातून निरनिराळे संगीत स्वर येत असत........
















असे पुष्करणी तलाव पुष्कळ ठिकाणी होते.








राजाचा (की रजनीकांतचा??) तराजू!


ही गुहा ओळखली का? काही अंदाज?

ही गुहा सुग्रीव व हनुमानाची आहे!!! होय, हंपीतल्या ह्या परिसराला किष्किंधा म्हणतात......


गुहेतून बाहेर येणारी ही खुण ओळखू येते का?


ही विशेष खूण सीतामातेच्या पदराचं चिन्ह आहे, असं सांगतात!!!!!!!!!!

हंपीचं वैशिष्ट्य म्हणजे रामायणकालीन ब-याच घटनांची ठिकाणं इथेच आहेत. किष्किंधा आहे, जवळच पंपा सरोवर आहे, ऋष्यमूक पर्वत आहे. हनुमानाचा अंजनी पर्वतसुद्धा आहे.


गुहेजवळून “ती खूण” दूर लांब गेलेली दिसते...... दक्षिण दिशेला.....


असे खडक सर्वत्र आहेत... त्यात वास्तुही आहेतच....


खडकांपुढे तुंगभद्रा........ इथून पुढे गेलं की समोर विरूपाक्ष मंदीर दिसतं. पण जाण्याचा पक्का रस्ता इथून नाही. फिरून जावं लागतं.


निश्चितच इथे अजूनही खूप काही शोधण्यासारखं आहे... पण बांधताना जी नजर होती, ती आज आपल्याजवळ आहे का?

खडका- खडकांमध्ये पुढे चालत गेलो. पुढे तुंगभद्रा रोरावत होती. लांबवर विरूपाक्षाचं शिखर दिसत होतं. सर्वत्र ऐतिहासिक व पौराणिक शांतता होती.........................


पाणी बरंच वाहून गेलं असलं तरी नदी अजून तशीच आहे.


प्राचीन पूल मोडकळीस आला आहे...........

नदीकिनारी दक्षिण भारतीय कवी पुरंदरदास ह्यांचं समाधीस्थान व एक मंदीर आहे.... इथला नदीचा प्रवाह बराच स्वच्छ वाटत होता. समोरच्या दिशेला सरळ अंजनी पर्वत होता. नदीमध्ये पाय बुडवून काही क्षण परिस्थितीचा अनुभव घेतला.... विलक्षण............. अत्यंत विशेष......




सर्व माहिती सांगणारे व सगळीकडे फिरवणारे व्यंकटेशजी.....


किष्किंधा, तुंगभद्रा किनारा, विठ्ठल मंदीर पाहून जाताना सौर गाडीत बसण्याऐवजी चालत गेलो.... सर्वत्र विशेष अशा प्राचीन खुणा दिसतच होत्या........ शेवटी वेळेअभावी ही तीर्थयात्रा अर्ध्यातच सोडावी लागली.... कारण जितकी माहिती मिळाली होती, त्यानुसार फक्त एक दिवस ठेवला होता. तो संपला. जेमतेम एक झलक पाहता आली होती.............लदाख थोडसं बघून झाल्यावर मनात एक पूर्वग्रह निर्माण झाला होता, की लदाखइतकं भन्नाट काहीच नाही..... हा एक भ्रम होता.......... हंपी.................. एक अद्भुत विश्व......

परत हंपीला येताना एक तर ब-याच लोकांना घेऊन येणार. कारण गटाने फिरण्यात अनेक फायदे असतात. शिवाय कमीत कमी तीन दिवस काढून येणार......... तोपर्यंत शांतता नाही............ अधिक माहिती व झलक घ्यायची असेल, तर इथे फोटो बघता येतील:

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

हंपीला जायचं असेल, तर दोन- तीन दिवस हातात असले पाहिजेत. रेल्वेनी जायचं असेल, तर कोल्हापूरहून थोड्या रेल्वे आहेत व पुणे- चेन्नै मार्गावर सोलापूरपासून ६-७ तास अंतर असलेल्या गुंटकल जंक्शनहूनही जाता येईल. तिथून हॉस्पेट २ तासांवर आहे व रेल्वेही ब-याच आहेत. कोल्हापूरवरून बसही आहेत. थेट बस कमी असल्या तरी कोल्हापूर- बेळगाव/ हुबळी व हुबळी- धारवाड- हॉस्पेट बस ब-याच असतात.

उपसंहार:
दक्षिण दर्शन मालिकेचा समारोप होत आहे. दोनच भागांमध्ये सर्व लिहिण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक बंग़ळूर शहर, कोलार सुवर्ण खाण आणि नंतर हंपी........... दक्षिणेमध्ये बरंच काही बघण्यासारखं होतं आणि खूप काही राहून गेलं....... परंतु ह्या निमित्ताने गौरवशाली इतिहास व भव्य, महान, अभूतपूर्व वारसा काय होता, ह्याची एक चुणूक मात्र बघायला मिळाली. आपण आपल्याच इतिहासाबद्दल किती संभ्रमित आणि अज्ञानी आहोत, तुकड्या तुकड्यातून आणि अनेक गैरसमजातून आपण कसे मर्यादित बघतो, ही जाणीवसुद्धा झाली. त्याबरोबर आपला इतिहास किती मोठा, भव्य होता, ह्याचीही प्रत्यक्ष प्रचिती घेता आली.............. तूर्तास हेही काही कमी नाही............



1 comment:

  1. ashach sitechya padrachya khunesarkhi katha tadobajavlchya eka khedyat aikali. pan ti ramachya rathachya chakanchi hoti. donhikade dagad mala sarkhach distoy. hi khadkachi vaishishtya purn rachana asavi ase vatate.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!