Friday, February 17, 2012

विकासाच्या विविध वाटा व काही प्रश्न


आज विकासाचे विविध प्रवाह आपल्याला दिसतात. अनेक पातळीवर अनेक पद्धतीने विकासाची प्रक्रिया पुढे चाललेली दिसते. विकासामध्ये सरकार, स्वयंसेवी संस्था व अन्य सामाजिक- आर्थिक घटक कार्यरत असलेले दिसतात. ह्या परिस्थितीमधील काही बाबींना विचारात घेण्याचा एक छोटासा प्रयत्न ह्या लेखातून करतो.

पार्श्वभूमी

आज सामाजिक आणि राजकीय तसंच आंतरराष्ट्रीय परिस्थितीसुद्धा कमालीची गुंतागुंतीची झाली आहे. तुकड्या- तुकड्यामध्ये न बघता आपण घटना आणि घटकांची व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ जागतिक अर्थव्यवस्थेमधील बदल, गेल्या काही वर्षांतली तिची वाटचाल आणि त्या अनुषंगाने जागतिकीकरण- खाजगीकरण आणि उदारीकरणानंतर होणारी आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची ओढाताण ह्या गोष्टी व ह्यातून दिसणा-या पडद्यामागील गोष्टी (उदा., जागतिक बँकेचा देशामधील हस्तक्षेप, भारतीय अंदाजपत्रकामध्ये परकीय व्यक्तींचा प्रभाव नव्हे भारतीय अंदाजपत्रकावर परकीय लोकांचे नियंत्रण, विदेशी कंपन्यांमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला पोचलेला धोका इत्यादी इत्यादी..........) समजून घेतल्या पाहिजेत.सरकार अनेक प्रयत्न करत आहेच. पण खरोखर सरकार देशाच्या भल्याचा प्रयत्न करण्याच्या स्थितीमध्ये किती आहे, हेही बघितलं पाहिजे. आज १९९० नंतर बावीस वर्षांमध्ये भारताने विविध आंतरराष्ट्रीय कराराचे साखळदंड बांधून घेतले आहेत. त्याची मोठी किंमत शेतक-यांच्या आत्महत्या आणि कष्टकरी जनतेचे हाल ह्या प्रकारे आपण मोजत आहोत. त्यामुळे सरकारमधल्या काही लोकांनी जरी काही चांगलं काम करायचं म्हंटलं, काही चांगले निर्णय घेण्याचं ठरवलं, तरीही ते तसे लागू होण्यातही असंख्य अडथळे आहेत व जरी असे काही निर्णय लागू झाले तरीही नोकरशाही आहेच.

सरकारचे प्रयत्न बरेचसे एकसुरी असले तरी स्वयंसेवी संस्था व आंदोलनांचे प्रयत्न मात्र ब-याच प्रमाणात वेगळे आणि उल्लेखनीय आहेत. इथेही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भावनिक अतिरेक आणि अंधश्रद्धा ह्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीकडे न पाहता शक्यतो खुल्या व ब्लँक मनाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपल्याला दिसणारे बहुतांश लोक एखाद्या विचारांशी, एखाद्या प्रतिकाशी, विचारधारेशी स्वत:ला जोडून इतरांपासून स्वत:ला पूर्णपणे तोडताना दिसतात. म्हणजे अमुक अमुक एक गोष्ट असेल तर त्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट ग्रेट आणि त्याच्यापासून लांब असलेली प्रत्येक गोष्ट चुकीची असा कंफर्टेबल समज केला जातो. उदाहरणार्थ, बीएसपी खूपच चांगली आहे, असा समज आणि अंधश्रद्धा. किंवा नर्मदा बचाओ आंदोलन खूपच वाईट आहे किंवा खूपच महान आहे, अशी टोकाची भुमिका.

कोणताही निर्णय व निष्कर्ष न काढता गोष्टी जशा आहेत, तशा म्हणजेच अपूर्ण व ब-या वाईट स्वरूपात पाहणं अवघड आहे पण आवश्यकसुद्धा आहे. आज नेमकं हेच होत नाही. तेव्हा शक्यतो खुल्या नजरेने जमेच्या आणि कमकुवत बाजूंचा विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा. ब्लॅक किंवा व्हाईट नाही तर ग्रे छटा बघण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढील काही प्रसंगांद्वारे आपण विकासाच्या काही वाटा बघण्याचा प्रयत्न करू.

प्रसंग एक: गुजरात आणि देशाच्या अन्य भागातील फरक 

एकदा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका शेतकरी मंडळाची स्थापना केली गेली. असं मंडळ स्थापन करावं, ही प्रेरणा त्या शेतक-यांना गुजरातमधील एका शेतकरी समूहाच्या कामावरून मिळाली होती. स्थापना व उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी त्या गुजराती शेतकरी समूहाच्या एका शेतक-याला बोलावलं. उद्घाटनाचा कार्यक्रम अर्थातच एका गावात आयोजित केला गेला होता. खेडेगावच होतं. कार्यक्रम सुरू झाला. काही भाषणं झाली आणि वीज गेली. पण काही गडबड झाली नाही, संबंधितांनी तयारी करूनच ठेवली होती. लगेच मेणबत्त्या पेटवल्या आणि कार्यक्रम चालू राहिला. थोड्या वेळाने गुजराती शेतक-याला दोन शब्द बोलण्याचा आग्रह झाला. आधी तो नाही नाही म्हणाला व अधिक आग्रह केल्यावर बोलायला उभा राहिला.

“हे शेतकरी मंडळ बंद करून टाका!”

सर्व चकीत झाले. पुढे तो बोलला, “आज इथे शेतक-यांचा कार्यक्रम चालू आहे आणि वीज गेली. ही वीज जाण्याची ठरलेली वेळ नव्हती. तरीसुद्धा तुमच्यापैकी एकानेही वीज वितरण केंद्राला फोन केला नाही आणि तक्रार केली नाही. तुम्ही लगेच मेणबत्त्या लावून शांत बसला. जर चुकीच्या प्रकारे तुमच्या कार्यक्रमाच्या वेळी गेलेली वीजसुद्धा तुम्हांला सुरू करता येत नसेल, तर मग तुम्ही मंडळामधून काय काम करणार?” इतकं बोलून तो थांबला नाही.

“एक तर अशी गोष्ट गुजरातमध्ये कधीच होणार नाही. शेतक-यांचा कार्यक्रम असताना वीज बंद केलीच जाणार नाही. आणि जरी वीज बंद पडली, तरी आम्ही शेतक-यांनी लगेच तक्रार नोंदवली असती व सतत फोन करून लगेचच वीज चालू करून घेतली असती.”

किती बोलकं हा प्रसंग आहे! देशाचा अन्य भाग आणि गुजरात कसे आहेत, हेच ह्यात दिसतं! गुजरातमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत. तिथलं सरकार, प्रशासन कमालीच कल्याणकारी आणि लोक- केंद्रित आहे. स्वप्नवत वाटावं इतकं लोकाभिमुख आहे. सर्व अद्ययावत सोयी व व्यावसायिकता प्रशासनामध्ये दिसते. सर्व व्यवस्था चोख ठेवली जाते. ह्याबद्दल आणखी एक प्रसंग.


प्रसंग दोन: असं आपल्याकडे कधी होईल?

एकदा एका महिलेला सरकारी अधिका-याकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. सरकारी कामात अडचण आली तर लावण्यासाठी एक फोन नंबर दिला होता. तिने तो लावला आणि फोनवर सरळ मुख्यमंत्रीच आले! मोदी समोर आहेत, हे कळाल्यावर तिला धक्काच बसला आणि तिने फोन ठेवला. पण दहा मिनिटातच तिच्या फोनवर फोन आला आणि मोदीच बोलत होते. फोन का ठेवला, समस्या काय ह्याची त्यांनी चौकशी केली. त्यानंतर एका तासामध्येच संबंधित सरकारी अधिका-याचं माफीपत्र त्या महिलेला मिळालं!!

कदाचित हे उदाहरण अतिरंजित असेल. परंतु अशी कित्येक उदाहरणं गुजरातमध्ये दिसतात, अनुभवता येतात. विकास जर करायचाच ठरवला तर करता येतो, हे त्यातून दिसतं. प्रशासन, प्रशासनातील माणसं सक्षम आणि जबरदस्त हे तर जाणवतंच, पण गुजराती उद्योगी आणि सक्रिय मानसिकताही तिथे दिसते. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिथे उद्योगी वृत्ती आहे. क्रियाशीलता आहे. मुख्य म्हणजे निरर्थक गोष्टींवर अखंडपणे भांडण्याची व डबक्यात पडून राहण्याची वृत्ती फार नाही. अर्थात ह्याची कारणंसुद्धा आहेत. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने गुजरात मोठ्या प्रमाणात समृद्ध व संपन्न आहे. त्यामुळेच देण्याची वृत्ती व क्रियाशील मानसिकता अधिक दिसते. गुजराती लोक जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये क्षुद्र तंटे व संकुचित मानसिकता कमी दिसते.

त्यामुळे सरकारी यंत्रणा, प्रशासन, लोक, उद्योग जगत हे सर्व एका दिशेने प्रयत्न करताना दिसतात व त्यातून परिणामही मिळालेले दिसतात. गुजरात भारतातील महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. आज खंबायतच्या आखातावर अवाढव्य पंचवीस किलोमीटरचा पूल बांधण्याचं काम चालू आहे. त्यामुळे पश्चिम दक्षिण गुजरातचं मुंबई व महाराष्ट्रापासूनचं अंतर तब्बल साडेतीनशे किमी कमी होणार आहे आणि अर्थव्यवस्थेला मोठीच चालना मिळणार आहे ..... तसंच नंदुरबारमधल्या पवनचक्क्यांमध्ये निर्माण होणारी वीजसुद्धा गुजरातच खरेदी करतो. पण त्याबरोबरच नंदुरबारमधल्या लोकांनी मोबाईल व्हॅनला कॉल केल्यास तीही गुजरातची सीमा ओलांडून येते, कारण देण्याबाबत ते कंजुष नाहीत.

अर्थात गुजरात काही Land of Rajanikanth नाही! (खरं पाहता रजनीकांतचा लँड म्हणजे आपला महाराष्ट्र................ आणि तरीसुद्धा तो असा......) त्यामुळे तिथेही अनेक कमतरता आहेतच, त्रुटी आहेतच. गुजरातमध्ये मुख्य पश्चिम मध्य भाग सोडला तर मोठा भाग आदिवासी आणि एक तृतीयांश भाग वाळवंटी आहे. काही समूहांमध्ये गरिबीही मोठ्या प्रमाणात आहे. गुजरातमध्ये ज्या गोष्टी चालल्या, त्या देशाच्या इतर भागात चालतीलच, असं नाही. कदाचित मोठ्या प्रमाणातसुद्धा चालणार नाहीत. तरीही गुजरातमधल्या विकासाच्या प्रयत्नांचं महत्त्व कमी होत नाही. त्यामधून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे.


स्वयंसेवी आणि समाजसेवी संस्था!
 
गेल्या काही वर्षांमध्ये सर्वत्र संस्था मिथून चक्रवर्तीच्या चित्रपटाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने स्थापन झाल्या आहेत. एनजीओजसाठी स्वयंसेवी संस्था हा शब्द ज्याने वापरला, त्याच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्वयंसेवी म्हणजे स्वत:ची सेवा करणा-या संस्था, असाच अर्थ आज जास्त ‘अर्थपूर्ण’ आहे!! अशा स्वयंसेवी संस्थांची दुकानदारी आज कमालीची फोफावत आहे. मोठ्या मोठ्या संस्था फक्त स्वत:च्या फायद्यासाठी आणि कोणत्या तरी सामाजिक समस्येचं नाव घेऊन पैसे (किंवा एक प्रकारची सॉफिस्टिकेटेड भीक) मिळवताना दिसतात. ज्या क्षणी पैसा मिळणं थांबतं तेव्हा लगेच त्यांचं कामही थांबतं, कारण हे ‘प्रोफेशनल’ ना!

त्याउलट काही संस्था खरोखर समाजसेवी संस्था आहेत. समाजाकडून, सरकारकडून, देणगीदारांकडून व फंडिंग एजन्सीजकडून काहीही न घेता जास्त परिणामकारक आणि जास्त टिकाऊ काम करून दाखवतात. त्यांचं काम ब-याच प्रमाणात जास्त खोलवर असतं. निव्वळ टारगेट ओरिएंटेड कामापेक्षा त्याचा पाया जास्त मजबूत असतो. प्रसंगी हलाखीमध्येसुद्धा ह्या संस्था उभ्या राहतात. हळुहळु काम वाढवत नेतात. दुकानदार संस्थांसारखा त्यांचा भर प्रोजेक्टवर किंवा ठराविक ऍक्टिव्हिटीज ठराविक संख्येने पूर्ण होण्यावर नसून मानवी संबंध, खरेखुरे प्रश्न (फक्त कंडोम वाटप किंवा अमुक अमुक संख्येमधील लोकांना प्रशिक्षण देणं किंवा ठराविक संख्या गाठणं ह्याहून जास्त वास्तवातील प्रश्न) सोडवण्याच्या दिशेने असतो. वेगवेगळ्या विचारधारेमध्ये किंवा वैचारिक प्रवाहामध्ये अशा संस्था सापडतात. त्यांचं काम जास्त भक्कम असतं आणि ब-याच प्रमाणात स्वयंपूर्ण असतं. आज अशा स्वयंपूर्ण संस्थांचीच जास्त गरज आहे. कारण स्थानिक पातळीवर जास्त काम उभं राहात असल्यामुळे त्यातून लोक व समाजाची घडण जास्त होऊ शकते. अर्थात व्यावहारिक गरजांची कुचंबणा, कार्यकर्त्यांकडून अवाजवी अपेक्षा आणि कधी कधी कार्यकर्त्यांचं शोषण आणि प्रोफेशनल कौशल्यांमध्ये कमतरता ह्या कमकुवत बाजू त्यामध्ये दिसतातच.

विकासाचे आर्थिक आणि जीवनशैलीशी निगडीत पैलू

विकासाच्या आर्थिक आणि जीवनशैलीशी निगडीत पैलूंचीचाही विचार करावा लागेल. आज जगातील बहुतांश अर्थव्यवस्था कमी किंवा अधिक प्रमाणात संकटात आहेत. आर्थिक स्थिरतेची चर्चा सुरू आहे. ह्यावेळी आर्थिक बाबींचा विचार करणं महत्त्वाचं झालं आहे. अमेरिका किंवा विकसित अशा युरोपातले देश आज कर्जबाजारी होण्याच्या संकटात का आहेत? ह्याचं सरळठोक उत्तर ग्राहक केंद्रित जीवनशैली (Consumer central lifestyle) आहे. म्हणजेच वेगळ्या भाषेत चंगळवाद आणि त्याचे भाईबंद. थोडक्यात सतत कशाचा ना कशाचा उपभोग घेण्याची सवय लावायची, त्यासाठी सवलती द्यायच्या (आमदनी अठन्नी खर्चा रूपया असं करू द्यायचं!) आणि त्यांचं गुलाम करून झाल्यावर त्या सवलती व अनुकूलता रद्द करायच्या. ही प्रवृत्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की, अमेरिकेसारखं सर्वशक्तीमान राष्ट्र त्यामुळे संकटग्रस्त झालं. कार, बंगले, मौजमजा, सुट्ट्या ह्यासाठी लोकांना सवलती दिल्या, कर्ज दिली पण उपभोगाच्या अतिरेकामुळे परतफेडीची क्षमता कमी झाली. त्यामुळे मग अर्थव्यवस्था कर्जबाजारी झाली. अर्थात ही फक्त एक बाजू झाली. त्यात अनेक इतरही घटक आहेतच.

पण विकासाचा विचार करताना आर्थिक बाबीमध्ये शाश्वतता बघितली पाहिजे. तरच तो विकास शाश्वत होईल. बाहेरून मोठ्या प्रमाणात फंडस आणून छोटसं काम केल्यास तो विकास नाहीच, पण भ्रष्टाचारच होतो आणि त्यातून अर्थव्यवस्थाही डळमळीत होते. त्यापेक्षा शून्यातून किंवा कमीत कमी गुंतवणूकीतून उभं केलेलं छोटं कामही जास्त महत्त्वाचं आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं असेल. त्यातून नवीन भांडवल/ कार्य/ उद्यम उभा राहू शकेल. त्यातून कशावर तरी अवलंबून राहण्याच्या वृत्तीऐवजी उद्योगी आणि क्रियाशील वृत्ती वाढीस लागेल. आज नेमक्या अशाच गोष्टींची आवश्यकता आहे आणि तेच कमी प्रमाणात दिसतं.

आणि त्याला योग्य जीवनशैलीचीही जोड दिली पाहिजे. नाही तर उभं झालेलं काम टिकणार नाही, त्याला तडे जातील किंवा त्यातून अपेक्षित तो परिणाम न साधला जाता काम वाया जाईल. आर्थिक संदर्भात उभा राहिलेला पैसा खेळता राहावा आणि तो देशामध्येच राहावा. नॉन प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा उपयोगी नसलेल्या कामी तो जाऊ नये. फक्त खर्च करण्यासाठी पैसे कमावले जाऊ नयेत. परस्पर पूरक पर्यावरणाप्रमाणे एका गोष्टीतून दुस-या गोष्टीला चालना मिळावी. ही तत्त्वं खरं तर आपल्याला अजिबात नवीन नाहीत. प्रश्न त्यांचा विचार आजच्या जीवनशैलीमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये करण्याचा आहे.

ग्राहक केंद्रित जीवनशैलीचा प्रवाह अत्यंत तीव्र आहे. सर्व जगच त्या दिशेने चालत आहे. पण जर ती दिशा आपल्याला योग्य वाटत नसेल, तर त्यापेक्षा वेगळी आणि स्वत:ची दिशा निवडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यासाठी विकासाच्या बेटांवर म्हणजेच महानगरांमध्ये न पळता विकासाचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. हा प्रत्येकाने स्वत:च्या आणि आसपासच्या थोड्या तरी लोकांच्या पातळीवर सोडवण्याचा प्रश्न आहे. समाजावर, देशावर आणि जगावर ‘Liability’ होण्यामध्ये भर घालण्याऐवजी ‘Asset’ मध्ये भर घालण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलं आहे. त्यामुळे शक्यतो स्वदेशी, आर्थिकदृष्ट्या सक्षम (कर्जबाजारी नसलेल्या) आणि स्थानिक पातळीवर योगदान देणा-या लहान- सहान उद्योगांना सुरू करून अशा इतर गोष्टींना चालना देण्याची सर्वाधिक आवश्यकता आहे. ख-याखु-या विकसित देशांनी (उदा., जपान, जर्मनी, जे इतरांच्या लूटीवर विकसित झाले नव्हते) हेच केलं आहे आणि अजूनही ते हेच करत आहेत. हे कसं करायचं, कशा प्रकारे करायचं हे पुढचे प्रश्न आहेत. आणि म्हणून पर्यायाने गाड्या, बंगले (फ्लॅटस) आणि त्यासोबत येणा-या अधिकाधिक ग्राहक केंद्रिततेला चालना द्यायची का आपल्या पद्धतीने स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा, हे प्रत्येकाने विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. विकासाच्या बेटांपेक्षा विकासाचं लहान असलेलं स्वराज्यच चांगलं. कारण ही बेटं एखाद्या नाही तर दुस-या लाटेच्या तडाख्यामध्ये कोसळू शकतात; पण संतुलनावर आधारित स्वराज्य टिकण्याची जास्त शक्यता असते.

उपसंहार

आज संपूर्ण समाजसेवी असणं शक्यच नाही. तशी आवश्यकताही नाही, कारण त्यामुळे समाज परावलंबी बनेल. परंतु स्वयंसेवी आणि समाजसेवी (स्वत:चा विकास आणि समाजाचा विकास) ह्यामध्ये योग्य संतुलन निश्चितच असावं. विकासाच्या ह्या वाटा खडतर असल्या तरी त्या शाश्वत असण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून त्या वाटांवर असलेल्या अप्रिय आणि अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. हे  काम अवघड असलं तरी अशक्य नाही. कारण इतिहासामध्ये अगदी अलीकडचा काळ सोडला तर नेहमीच आपण स्वत:च्या तंत्रज्ञानावर आणि जीवनपद्धतीवर - स्वदेशीवर भर दिलेला आहे. गरज आहे ती त्यावर आधारित विकासाच्या परिभाषेची व प्रतिमानाची (Paradigm of development) जाणीव करून घेण्याची व त्या दिशेने जाण्याची.

अधिक संवाद आणि चर्चेमधील सहभागासाठी आपल्या विचारांचं प्रतिक्रियांच्या स्वरूपात किंवा व्यक्तीगत ईमेलच्या स्वरूपात स्वागत आहे.

Friday, February 3, 2012

जॉय बांग्ला!!!!


नुकताच गोरिला हा बांग्लादेशी चित्रपट पाहण्यात आला. बांग्लादेश मुक्तीसंग्राम आणि १९७१ चे सत्तांतर ह्या पार्श्वभूमीचा हा अप्रतिम चित्रपट!! सर्वच दृष्टीने थरारक....


चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा मार्च १९७१ मध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशाही टोकाला पोचलेली असते. तेव्हा पूर्व पाकिस्तान असलेल्या (आजच्या बांग्लादेशच्या) प्रदेशात पाकिस्तानी सेना सर्व विरोधी आवाज मोडून टाकत असतात. ह्या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भुमिका असलेली नायिका- क्रांतिकारिका बिल्किस बानो हीचं नवीन लग्न झालेलं असतं व तिचा पती वार्ताहर असतो. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तो बातमी देण्यासाठी बाहेर पडतो आणि बेपत्ता होतो......... इथून नव्या बिल्किसचा जन्म होतो. ती तिच्या पतीचा शोध घेण्यास बाहेर पडते. ओळखीचे लोक, नातेवाईक ह्यांच्या मदतीने शोध घेता घेता ती क्रांतिकारिका बनते. भुमिगत युद्धात व गनिमी काव्याच्या संघर्षात (गोरिला वॉरफेअर) मुक्तीवाहिनीमध्ये सहभागी होते.

चित्रपटात तत्कालीन बदलती परिस्थिती, विविध संघर्ष, जुलुमी राजटीमध्ये लोकांचं होणारं शोषण आणि पूर्वी पाकिस्तानची लोकसंस्कृती, तत्कालीन शहरं ह्याबद्दल छान वर्णन आहे. मुक्तीवाहिनीने स्वतंत्र बांग्लादेश घोषित केलेला असला, तरीही ढाक्यासह ब-याच भागांमध्ये पाकिस्तानी सेनेचंच नियंत्रण असतं. तिथेच मग भुमिगत संघर्ष सुरू होतो. ब-यापैकी प्रामाणिकतेने व कोणाच्या भावना दुखावल्या जातील, असा जास्त विचार न करता वस्तुनिष्ठ मांडणी केलेली आहे. मुक्तीवाहिनीतील कार्यकर्ते, क्रांतिकारक आणि हिंदुंचा झालेला छळ काही प्रसंगांमधून ठळक प्रकारे मांडला आहे.


बिल्किसचा संघर्ष चालूच असतो. त्याबरोबर शत्रूचा छळही वाढत जातो. बिल्किस हळुहळु भुमिगत कारवाया सफाईने करते. शस्त्रे पुरवणे, माहिती घेणे, एकमेकांना मदत करणे अशी भुमिगत कामं ती योग्य प्रकारे पार पाडते. पण शर्थ करूनही तिला तिच्या पतीचा तपास लागत नाही. 

पाकिस्तानी सेना व पूर्व पाकिस्तानी बंगाली जनता ह्यांच्यामधील संबंध चांगल्या प्रकारे दाखवले आहेत. त्या पार्श्वभूमीमधील बरेचसे तपशील व घटक समजून घेण्यासाठी ह्या चित्रपटाची चांगली मदत होते. तसंच एका भुमिगत संघर्षाचं व स्थित्यंतराचं चित्रण म्हणूनही चित्रपट विशेष वाटतो. शत्रूचा विरोध व दडपशाही टोकाला गेल्यामुळे सर्व विरोधकांचं दमन केलं जातं. बिल्किसचे साथीदार पकडले जातात किंवा मारले जातात. मुक्तीसेनेच्या बरोबरीनेच रजाकारही उभे राहिलेले असतात. रजाकार म्हणजे थोडक्यात पाकिस्तानी चमचे! रजाकार शब्दाचे दोन अर्थ आहेत: पहिला अर्थ म्हणजे एखादा उठाव करणारा समूह/ गट आणि दुसरा अर्थ म्हणजे १९४८ पूर्वी हैदराबादच्या निजाम राजवटीतील क्रूरकर्मा कासीम रजवीचे अनुयायी!! 

.......परिस्थिती चिघळल्यानंतर बिल्किस बुरखा घालून (सामान्य बंगाली महिला बुरखा घालताना दाखवल्या नाहीत) ढाक्याहून दक्षिण- पश्चिमेस जायला निघते. रेल्वेमधल्या प्रवासाचंही चित्रण दर्जेदार आहे. मुक्तीवाहीनेचे सदस्य व हिंदु असल्याच्या कारणावरून प्रवाशांचा छळ केला जातो. अराजकामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. रेल्वे जशी एकेक स्टेशन पुढे जाते, तशी बिल्किस आठवणींमध्ये शिरते. तिच्या लहानपणीचं जग तिला आठवतं. हेही चित्रण सुंदर घेतलं आहे. 

इकडे, बिल्किसच्या गावाकडेसुद्धा संघर्ष शिगेला पोचलेला असतो. मुक्तीवाले तीस्ता नदीवरील रेल्वेचा ब्रिज पाडून टाकतात. त्यामुळे बिल्किसची गाडी तीस्ता स्टेशनवर येऊन थांबते. पण ती एकटीच पुढे जायला निघते. ब्रिज छोटासाच असतो व जरी रुळ तुटले असतात, तरी ती तो ब्रिज ओलांडू शकते. तिला असं येताना पाहून मुक्तीवाल्यांपैकीच तिच्या गावचा एक जण तिच्या मागे गुप्तपणे येत राहतो. ती येत असतानाच तिला विरुद्ध बाजूने मोठ्या संख्येने विमानं ढाक्याच्या दिशेने जाताना दिसतात...........पाकिस्तानी सैनिकांना चुकवत चुकवत ती तिच्या गावाच्या परिसराजवळ पोचते. पण इथली परिस्थितीसुद्धा बिघडली असते. इथे तिचा सख्खा भाऊ खोकोन कमांडर होऊन शत्रूला नामोहरम करत असतो. त्याचे पराक्रम ऐकून तिला अत्यंत आनंद होतो. पण इतर सर्व लोक शत्रूला मिळत असल्याचे पाहून ती पुढे जाऊ शकत नाही. तिच्या परिचयातलं जग उध्वस्त झालेलं व तिथली हिंदु कुटुंबं देशोधडीला लागलेली ती बघते. तोपर्यंत तो मुक्तीवाला तिला येऊन भेटतो व सर्व परिस्थिती सांगतो. मग ते दोघं पुढे जात राहतात. 

लवकरच पाकिस्तानी सेना खोकोन कमांडरला पकडते व आसपासच्या सर्व गावांमध्ये जाहीर सूचना देऊन त्याला हाल हाल करून ठार मारते. ही बातमी बिल्किसपर्यंत पोचल्यावर ती सुन्न होते. तिला तिचा भाऊ आणि लहानपणीचं जग आठवतं........... 

शत्रूची ताकत वाढलेली असते व ते फार काळ लपून राहू शकत नाहीत. एक गर्विष्ठ आणि स्वत:च्या पराक्रमाची बढाई मारणारा पाकिस्तानी अधिकारी तिला पकडतो. महिला कैद्यांसोबत तिला स्टेशनवर घेऊन जातात. सर्वत्र जुलुमशाहीचा नंगानाच चालू असतो. बिल्किस खोकोन कमांडरची बहिण आहे, हे कळाल्यावर तो अधिकारी तिला व तिच्यासोबत असलेल्या शिराज नावाच्या मुक्तीवाल्याला बोलावतो व त्यांचा अपमान करतो. पाकिस्तानी सेना किती प्रबळ आहे आणि मुक्तीवाल्यांना कसं नामशेष करत आहे, ह्याबद्दल बढाई मारतो. तेवढ्यात शिराज हा हिंदु आहे, हे त्याच्या शिपायाला कळतं. हिंदु आधीच परांगदा झालेले असल्यामुळे त्याला हिंदुला मारायला व हिंदु स्त्री उपभोगायला मिळणार म्हणून आनंद होतो.

परंतु तोपर्यंत बिल्किसने त्याच्याच टेबलावरच्या ग्रेनेडची किल्ली काढून तो पेटवलेला असतो..... हसत हसत ती ते ग्रेनेड त्याच्या हातात देते आणि................. प्रचंड स्फोट आणि धक्का........ ह्या धक्क्यामधूनच जुलुमी राजवटीला अखेरची घरघर लागते.....  
चित्रपटाचा शेवट होताना मुक्तीयुद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. पूर्व पाकिस्तानी जनतेने कशा प्रकारे प्रचंड मोल देऊन स्वातंत्र्य प्राप्त केलं, त्यामध्ये असंख्य वीर क्रांतीकारकांनी कसं बलिदान केलं व योगदान दिलं ते सांगितलं आहे. जुलै १९७१ पर्यंत इंदिरा गांधींनी बांग्लादेशला मान्यता दिली होती व स्वतंत्र बांग्लादेश हा शब्द वापरला होता. तरीही पाकिस्तानी दडपशाही चालू राहिल्यामुळे व भारतामध्ये लाखो निर्वासित येत राहिल्यामुळे अखेरीस भारतीय सेना मुक्तीवाहिनीच्या मदतीला गेली आणि अवघ्या १३ दिवसांमध्येच पाकिस्तानी लष्करशहा झिया उल हक शरण आला, ही ह्या सर्व परिस्थितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी...... इतकंच नाही, तर अमेरिकन सातव्या आरमाराला हस्तक्षेप करण्याची संधीच न देता भारताने निर्विवाद विजय मिळवला आणि दुस-या महायुद्धानंतरची सर्वांत मोठी शरणागती पाकिस्तानला पत्करावी लागली..... (अर्थात, युद्धानंतर भारताने पाकिस्तानच्या संबंधांमध्ये राजकीय लाभ किती मिळवला, ही बाब विविदास्पद आहे)...  
लेफ्ट. जनरल नियाझी शरणागती पत्करत असताना 
  
जॉय बांग्ला!!! (बंगाली अस्मितेचा विजय असो) अशी घोषणा आणि एका युद्धगीतासह चित्रपटाचा शेवट होतो..... अनेक प्रकारे हा चित्रपट समाधान देऊन जातो. त्या स्थिती व काळातले संदर्भ, परिस्थिती, भिन्न भिन्न घटक समजून घेता येतात. तिथली जनता किंवा जुलुमी राजवटीमधील कोणतीही जनता कशा परिस्थितीतून गेली, हे समजतं. तसंच उठाव करणा-यांचं कामसुद्धा समजतं.

त्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारे हा चित्रपट सरस आहे. पाकिस्तानी सैनिकांचं उर्दु काय किंवा बंगाली भाषा काय, भारत देश अजूनही सांस्कृतिक दृष्टीने व प्रॅक्टिकली अखंडच आणि जोडलेला आहे, हे जाणवतं. बंगाली भाषा ऐकताना वेगळी भाषा वाटतच नाही, इतकं सहजपणे ते समजतं. बांग्लादेशी किंवा पूर्व बंगाली संस्कृतीचंही चित्रण छान आलं आहे. पूर्व बंगाली मुस्लीम स्त्रिया मुस्लीम वाटतच नाहीत, कारण त्या साडी आणि दागिनेसुद्धा वापरतात. पूर्व बंगाल बघताना आणि तिथले लोक बघताना कितीही तुकडे झाले असले, तरी देशाची संस्कृती एकच आहे, हे जाणवत राहतं. त्याशिवायसुद्धा, १९७१ साली जग कसं होतं, ह्या दृष्टीकोनातूनही चित्रपट बघण्यासारखा आहे. आज आपण त्या काळापासून कमालीच्या वेगाने आणि कमालीच्या फरकाने दूर जात आहोत. त्यामुळे जुनं जग कसं होतं ह्याचं ज्ञान असण्याची आवश्यकता वाढतच जात आहे. तीही बाजू ह्या चित्रपटातून मिळते.

मुक्तीयुद्धामध्ये काही प्रमाणात पूर्व बंगाली हिंदु- मुस्लीम एकत्र आले असले, तरी नंतरच्या काळातलं चित्र विदारकच आहे. बांग्लादेश स्थापन झाला तरी सत्ता बांग्लादेशी लष्करशहाकडे आणि कडव्या गटाकडेच गेली. आजही रजाकार गटच जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे ब-याच प्रमाणात त्यावेळेसारखे अत्याचार पुढेही झाले व अजूनही काही प्रमाणात चालू आहेत. तसंच पाकिस्तानप्रमाणे बांग्लादेशही ब-याच प्रमाणात शत्रू देशच आहे. परंतु हा सर्व घटनाक्रम समजून घेताना १९७१ चा मैलाचा दगड ठरलेला सत्तांतराचा प्रवास लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सर्वच प्रकारे उत्तम अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट इथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. बांग्लादेश मुक्तीयुद्धाला चाळीस वर्षं पूर्ण होऊन गेल्यानंतर आलेला हा अत्यंत वेगळा आणि दर्जेदार असा हा चित्रपट नक्की पाहावा आणि त्याची माहिती इतरांनाही द्यावी, ही विनंती. तसेच बांग्लादेश मुक्तीसंग्राम व अन्य संबंधित घटनांबद्दल माहिती इथे वाचता येईल:Thursday, February 2, 2012

दक्षिण दर्शन भाग २ (अंतिम): हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......!
हंपी........ मनामध्ये अनेक प्रश्न, उत्सुकता, उत्कंठा घेऊन हंपीला जात होतो. बंगळूरू आणि त्याच्या जवळपासची ठिकाणं पाहिल्यामुळे अपेक्षा वाढलेल्या होत्या. हंपी हे ठिकाण बेळ्ळारी जिल्ह्यात आहे. बेळ्ळारी जिल्ह्याबद्दल एक आठवण आपल्या मनात आहेच. सुषमा स्वराज विरुद्ध सोनिया गांधी असा सामना इथेच रंगला होता. हंपी हॉस्पेट ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून १३ किमीवर आहे. हॉस्पेट जंक्शन हे बरीच वाहतूक असलेल्या हुबळी- गुंटकल रेल्वेमार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन आहे. परंतु रेल्वेपेक्षा बसने कमी वेळ लागत असल्यामुळे बंगळूरूवरून बसनेच गेलो. बंगळूरूवरून ७ तासांवर असलेलं हॉस्पेट कोल्हापूरपासूनसुद्धा जवळजवळ इतकंच म्हणजे ८ तास आहे.

हॉस्पेटमध्ये ओळख काढून व थोडी सोय करून निघालो. सकाळच्या प्रसन्न हवेत हंपीच्या दिशेने प्रवास सुरू झाला...... सभोवती नारळाची झाडं व लाल माती! बरचसं कोंकणासारखं वाटत होतं. लवकरच हंपीच्या जवळ आलो. दूरवर भग्नावशेष दिसायला सुरुवात झाली.......
हंपीमध्ये आल्याआल्या सुरुवातीला गणपतीचं ही मूर्ती व आसपासचे भव्य अवशेष आपलं स्वागत करतात व आपल्याला निरखून ऐतिहासिक भव्य नगरीमध्ये आपल्याला जाऊ देतात.......

आणि इथून सुरू होते एक अविस्मरणीय तीर्थयात्रा..................

हंपी...... आज मंदीरांची व वास्तुंची महानगरी असली, तरी सुमारे १३४७ ते १५७८ इतकी वर्षं हे एका महान साम्राज्याच्या राजधानीचं नगर होतं......... इथे प्रचंड इतिहास आहे. कदाचित महानगरीच्या भव्यतेहून अधिक भव्य.......


विरूपाक्ष राजाने बांधलेलं विरूपाक्ष मंदीर. हंपीच्या मुख्य स्थानांपैकी एक. मंदीरासमोरचा रस्ता हा त्या काळचा बाजारातला रस्ता होता..... ह्या बाजारपेठेची लांबी कित्येक किमी होती व त्यामध्ये सोनं- चांदीची ठोक विक्री होत होती................ ह्यावरून अंदाज येतो, की तत्कालीन अर्थव्यवस्था किती मजबूत, प्रबळ आणि श्रेष्ठ होती...... आणि अर्थव्यवस्थेवरून तत्कालीन समाजव्यवस्था, तंत्रज्ञान व संस्कृती कशी असेल, ह्याचा एक अंदाज बांधता येतो.

मुख्य प्रवेशद्वाराच्या आत असलेले दोन मंदीर


विराट, सूक्ष्म आणि भव्य!!सम्राटांची वंशावळ. इथे मुख्य तीन राजघराणी होती.
विद्यारण्यस्वामी मठाचे स्थान. विजयनगरच्या साम्राज्याचे ते आद्य प्रणेते.......
तुंगभद्रेच्या काठावरती..................


इतक्या महान नगरीमधल्या वास्तुनिर्मितीचं एक कारण म्हणजे वास्तु करण्यास योग्य असे विशाल खडक इथे निसर्गत:च उपलब्ध होते.आज अशी वास्तु कोणाला उभी करता येईल का?

विरूपाक्ष मंदीर समूह, पलीकडचे मंदीर, नदी परिसर व बाजारपेठ ही फक्त सुरुवातच होती...... आनंद एका गोष्टीचा होता, की पर्यटकांची फार गर्दी नव्हती. पण ह्याचं कारण पुढे कळालं. हंपीच्या ह्या परिसरामध्ये आत्ता दिसत असलेली वस्ती व इमारतीही पर्यटनामुळे झालेल्या आहेत व हळुहळु त्यावर पूर्णत: बंदी येत आहे. लवकरच हा भाग पूर्ण शांत व मूळ अवस्थेनुसार ठेवण्यात येईल, असं समजलं.

इथून पुढची तीर्थयात्रा म्हणजे एकामागोमाग एक अचाट, विराट, भव्य, अद्भुत वास्तुंमध्ये केलेली विलक्षण सैर होती.....सर्व मुस्लीम सत्तांनी एकत्र येऊन तालिकोटला विजयनगर साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर हंपी राजधानी नष्ट करण्याचं काम सात वर्षं चालू होतं.............. आणि तरीही राजधानी नष्ट करता आली नाही........
अशा कितीतरी अद्भुत वास्तु तिथे आहेत......... ये तो झाँकी है........ अभी पूरी हंपी बाकी है!
ही नैसर्गिक कमान!!!! शेकडो वर्षांपासून हे खडक असेच आहेत......


हंपीच्या मुख्य मूर्तींपैकी/ वास्तुंपैकी एक- नरसिंह.पाताळ शिव मंदीर. मुख्य मूर्ती जमिनीखाली पाण्यात आहे....


तत्कालीन सुरक्षा चौकी (आउट पोस्ट)
ह्या वास्तुंचं पूर्ण आकलन अजूनही झालेलं नाही.


कित्येक किलोमीटर परिसरात पसरलेल्या महानगरीच्या अवशेषांमध्ये अद्यापही पुरातत्त्व विभागाचं संशोधन चालूच आहे. कित्येक गोष्टी नव्याने सापडत आहेत. इतक्या मोठ्या परिसरात ह्या भव्य वास्तु पसरल्या आहेत......


हंपीच्या मुख्य वास्तु दर्शवणारा नकाशा.
एका वस्तुसंग्रहालयातील ह्या काही मूर्त्या.


उजव्या सोंडेचा गणपती


अशा अक्षरश: अगणित मूर्त्या सर्वत्र आहेत.
जागतिक संकटग्रस्त वारसा (Threatened Heritage) म्हणून युनेस्कोने सहाय्य केल्यानंतर ही हिरवळ निर्माण झाली.


दूपारी कडक ऊन्हात फिरताना शहाळं मिळाल्याचा आनंद विशेष! ह्या शहाळ्यामध्ये पाणी तर भरपूर होतंच, शिवाय अत्यंत मुलायम खोबरंसुद्धा होतं. गंमत म्हणजे ते खोबरं काढण्यासाठी व खाण्यासाठी एक नारळी चमचासुद्धा होता!!! निसर्ग महान आहे...............हंपीमध्ये आधुनिक शहर असं नाहीच. काही छोटी दुकानं फक्त आहेत. त्यामुळे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था एक तर हंपीलगतच्या कमलापूरमध्ये होऊ शकते किंवा मग सरळ हॉस्पेटमध्ये. दुपारी जेवायला कमलापूरमधल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये गेलो, तर तिथे बरंच महाग होतं. म्हणून मग आणखी एका साध्या पण इफेक्टिव्ह हॉटेलात गेलो. अगदी स्वस्तात चित्रान्न (म्हणजे जवळजवळ फोडणीचा भात) मिळाला. जेवून परत निघालो.

हंपीचा मुख्य परिसर कमीत कमी ४० चौरस किमी इतका विस्तृत आहे आणि जवळजवळ सलगपणे सगळीकडे पाहण्यासारखं बरंच (अमर्याद असं) काही आहे. त्याशिवायसुद्धा बराच बघण्यासारखा परिसर आहे. त्यामुळे स्वत: गाडी करून फिरणं तर आवश्यक आहेच. त्याशिवाय पुरेसा वेळही हवा. कमीत कमी तीन दिवस. कारण नुसतं वरवर फिरून पोस्ट पोचवल्यासारखं जाणं बरोबर नाही.....

हंपीबद्दलच्या मर्यादित पूर्वज्ञानातून एक दिवस वेळ काढला होता. तो अपुरा पडणार हे कळालंच होतं..... पण ह्या सर्वांपेक्षा हंपीचं विराट विश्व मन व्यापून टाकत होतं. केवढी विलक्षण व भव्य नगरी!!! देशाच्या व जगाच्या इतिहासातलं एक अद्वितीय स्थान!!!!


त्या काळचं तंत्रज्ञान व दृष्टी!दगडामध्येसुद्धा परमेश्वर असतो.
आज एवढं अवाढव्य काम करणं कोणाला जमेल? जमेल का गूगलला, ओबामांना किंवा चीनला?

प्राचीन काळात ह्या वास्तु कशा निर्माण केल्या असतील, ह्याबरोबरच का निर्माण केल्या असतील, हा प्रश्नही निर्माण होतो. त्यातून नजरेपुढे येणारं चित्रही ह्या वास्तुंइतकंच भव्य दिव्य असतं. जे राजे पिढ्यानुपिढ्या नगरीचा विकास अशाप्रकारे करू शकत असतील, ते किती वैभवशाली, समृद्ध असतील? ह्यातील ब-याचशा वास्तुरचना पौराणिक प्रसंग, रामायण व महाभारतातील कथा, दशावतार आदिंवर आधारित आहेत. विजयनगर साम्राज्याचा मुख्य सव्वादोनशे वर्षांचा काळ ब-यापैकी संघर्षपूर्णच होता. कारण साम्राज्याची उत्तर सीमा तुंगभद्रा ओलांडल्यावर उत्तरेला फार लांब नव्हती व लगेचच मुस्लीम सत्ता शत्रू म्हणून होत्या. तरीसुद्धा विद्यारण्यास्वामींच्या दूरदृष्टीवर उभं असलेलं हे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारत व्यापून पूर्वेला ओरिसापर्यंतही पसरलं. आशियासह युरोपामध्येही ह्या साम्राज्याचा व्यापार चालू होता. सिंहलद्वीप (श्रीलंका) आणि पूर्व आशियायी देश- मलेशिया, इंडोनेशिया हेही ह्या साम्राज्याच्या प्रभावाखाली होते व काही तर मांडलिक असल्यासारखे होते. अब्दुल रज्जाकसारख्या मध्य आशियायी जगप्रवाशाने आणि आणखी एका इटालियन जगप्रवाशाने ह्या साम्राज्याची व महानगरीची मुक्त कंठाने स्तुती केली आहे; तिची तुलना प्राचीन रोमसोबत केली आहे.........

मुख्य परिसरात गेल्यावर विठ्ठल मंदीराकडे जायला निघालो. आता वाहनांना आतमध्ये सोडत नाहीत. पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून विठ्ठल मंदीर सुमारे एक किमी आत आहे. जायचा मार्ग म्हणजे चालत जाणे किंवा मग छोट्या सौर रिक्शा आहेत. त्या सतत वाहतूक करतात. त्या खूप हळु जातात व तिथे थोडा वेळ थांबावंसुद्धा लागतं. कारण इथे बरीच गर्दी होती. शाळेची मुलं अधिक प्रमाणात होती.


विठ्ठल मंदीराजवळचा रथह्या महालाच्या आतमध्ये मुख्य स्तंभांमध्ये असलेल्या पातळ स्तंभांना (गजांसारख्या पट्ट्यांना) आता हात लावू दिला जात नाही व तिथे आतमध्ये सोडत नाहीत. हे पातळ स्तंभ दाबले गेल्यासारखे दिसतात..... कारण त्यांना हाताने थोडंसं दाबल्यावर त्यातून निरनिराळे संगीत स्वर येत असत........
असे पुष्करणी तलाव पुष्कळ ठिकाणी होते.
राजाचा (की रजनीकांतचा??) तराजू!


ही गुहा ओळखली का? काही अंदाज?

ही गुहा सुग्रीव व हनुमानाची आहे!!! होय, हंपीतल्या ह्या परिसराला किष्किंधा म्हणतात......


गुहेतून बाहेर येणारी ही खुण ओळखू येते का?


ही विशेष खूण सीतामातेच्या पदराचं चिन्ह आहे, असं सांगतात!!!!!!!!!!

हंपीचं वैशिष्ट्य म्हणजे रामायणकालीन ब-याच घटनांची ठिकाणं इथेच आहेत. किष्किंधा आहे, जवळच पंपा सरोवर आहे, ऋष्यमूक पर्वत आहे. हनुमानाचा अंजनी पर्वतसुद्धा आहे.


गुहेजवळून “ती खूण” दूर लांब गेलेली दिसते...... दक्षिण दिशेला.....


असे खडक सर्वत्र आहेत... त्यात वास्तुही आहेतच....


खडकांपुढे तुंगभद्रा........ इथून पुढे गेलं की समोर विरूपाक्ष मंदीर दिसतं. पण जाण्याचा पक्का रस्ता इथून नाही. फिरून जावं लागतं.


निश्चितच इथे अजूनही खूप काही शोधण्यासारखं आहे... पण बांधताना जी नजर होती, ती आज आपल्याजवळ आहे का?

खडका- खडकांमध्ये पुढे चालत गेलो. पुढे तुंगभद्रा रोरावत होती. लांबवर विरूपाक्षाचं शिखर दिसत होतं. सर्वत्र ऐतिहासिक व पौराणिक शांतता होती.........................


पाणी बरंच वाहून गेलं असलं तरी नदी अजून तशीच आहे.


प्राचीन पूल मोडकळीस आला आहे...........

नदीकिनारी दक्षिण भारतीय कवी पुरंदरदास ह्यांचं समाधीस्थान व एक मंदीर आहे.... इथला नदीचा प्रवाह बराच स्वच्छ वाटत होता. समोरच्या दिशेला सरळ अंजनी पर्वत होता. नदीमध्ये पाय बुडवून काही क्षण परिस्थितीचा अनुभव घेतला.... विलक्षण............. अत्यंत विशेष......
सर्व माहिती सांगणारे व सगळीकडे फिरवणारे व्यंकटेशजी.....


किष्किंधा, तुंगभद्रा किनारा, विठ्ठल मंदीर पाहून जाताना सौर गाडीत बसण्याऐवजी चालत गेलो.... सर्वत्र विशेष अशा प्राचीन खुणा दिसतच होत्या........ शेवटी वेळेअभावी ही तीर्थयात्रा अर्ध्यातच सोडावी लागली.... कारण जितकी माहिती मिळाली होती, त्यानुसार फक्त एक दिवस ठेवला होता. तो संपला. जेमतेम एक झलक पाहता आली होती.............लदाख थोडसं बघून झाल्यावर मनात एक पूर्वग्रह निर्माण झाला होता, की लदाखइतकं भन्नाट काहीच नाही..... हा एक भ्रम होता.......... हंपी.................. एक अद्भुत विश्व......

परत हंपीला येताना एक तर ब-याच लोकांना घेऊन येणार. कारण गटाने फिरण्यात अनेक फायदे असतात. शिवाय कमीत कमी तीन दिवस काढून येणार......... तोपर्यंत शांतता नाही............ अधिक माहिती व झलक घ्यायची असेल, तर इथे फोटो बघता येतील:

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

हंपीला जायचं असेल, तर दोन- तीन दिवस हातात असले पाहिजेत. रेल्वेनी जायचं असेल, तर कोल्हापूरहून थोड्या रेल्वे आहेत व पुणे- चेन्नै मार्गावर सोलापूरपासून ६-७ तास अंतर असलेल्या गुंटकल जंक्शनहूनही जाता येईल. तिथून हॉस्पेट २ तासांवर आहे व रेल्वेही ब-याच आहेत. कोल्हापूरवरून बसही आहेत. थेट बस कमी असल्या तरी कोल्हापूर- बेळगाव/ हुबळी व हुबळी- धारवाड- हॉस्पेट बस ब-याच असतात.

उपसंहार:
दक्षिण दर्शन मालिकेचा समारोप होत आहे. दोनच भागांमध्ये सर्व लिहिण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक बंग़ळूर शहर, कोलार सुवर्ण खाण आणि नंतर हंपी........... दक्षिणेमध्ये बरंच काही बघण्यासारखं होतं आणि खूप काही राहून गेलं....... परंतु ह्या निमित्ताने गौरवशाली इतिहास व भव्य, महान, अभूतपूर्व वारसा काय होता, ह्याची एक चुणूक मात्र बघायला मिळाली. आपण आपल्याच इतिहासाबद्दल किती संभ्रमित आणि अज्ञानी आहोत, तुकड्या तुकड्यातून आणि अनेक गैरसमजातून आपण कसे मर्यादित बघतो, ही जाणीवसुद्धा झाली. त्याबरोबर आपला इतिहास किती मोठा, भव्य होता, ह्याचीही प्रत्यक्ष प्रचिती घेता आली.............. तूर्तास हेही काही कमी नाही............