Friday, August 19, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग १

लदाखची भ्रमणगाथा


प्रस्तावना:


लदाख.... भारताच्या उत्तर टोकाजवळचा आगळावेगळा आणि कमालीचा दुर्गम भाग. हिमालयाच्या प्रमुख भागांमधील एक भाग.... इथे जाण्याची इच्छा अनेक वर्षांपासून मनात होती. अनेक वेळेस तिला प्रेरणा मिळत गेली आणि त्यातून तिथे आता जाऊनच आलं पाहिजे, अशी भावना प्रबळ होत गेली आणि अखेर ती प्रत्यक्षातसुद्धा उतरली!!

ही एक अत्यंत रोमांचक पर्वणी होती. ह्या अनुभवाची मिती फोटो, प्रवासवर्णन इत्यादि माध्यमांच्या पलीकडील आहे. त्यामुळे फोटो, व्हिडिओज, प्रवासवर्णन इत्यादि प्रकारे हा अनुभव कसा होता व त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे लदाख कसं आहे, हे सांगता येणार नाही. तरीसुद्धा एक अत्यंत प्राथमिक ओळख किंवा मूळाक्षरे ह्या पातळीवर ह्या विश्वाचं अंशाने कथन करण्याचा प्रयत्न करता येईल. प्रवासवर्णनापेक्षा अधिक उंचीच्या मितीवरील अस्तित्वाचं- एका रमणीय विश्वाचं वर्णन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मुळातच तो अत्यंत अपर्याप्त आहे. परंतु फूल ना फुलाची पाकळी ह्या भावनेतून तो केला जात आहे.

काश्मीर.... भारताचा मुकुटमणी आणि धगधगता भाग. ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशा सर्वच दृष्टीने अत्यंत विशेष असा भाग. हिमालय, निसर्गसौंदर्य, ह्यासह दहशतवाद, फुटिरता, देश संरक्षण अशा सर्वच गोष्टी तिथे वेगळ्या असल्यामुळे विशेष आकर्षून घेणारा भाग. सतत चर्चेत येणारं आणि राष्ट्रीय हितासाठी विशेष महत्त्वाचं असलेलं हे काश्मीर आहे तरी काय, ते बघावं ही इच्छा अनेक वर्षांपासून होती. वेगवेगळ्या निमित्ताने तिला प्रोत्साहन मिळत गेलं. ह्यामध्ये मुख्य वाटा अलीकडच्या काही वर्षांमध्ये तिथे जाऊन आलेल्या पर्यटकांचा व देशभक्तांचा, ज्यांनी पुस्तक, ब्लॉग अशा अनेक प्रकारे त्याबद्दल माहिती दिली. त्यातूनच ही मोहिम उभी राहिली व त्यांच्या मदतीनेच प्रत्यक्षात आली. बरीच चर्चा- विचारमंथन होऊन अंतिम रूप घेताना मोहिमेमध्ये तीन जण उरले. जम्मु- श्रीनगर- द्रास- करगिल- लेह प्रवास व लेहमधून पेंगाँग सरोवर, नुब्रा खोरे व त्सो मोरिरी सरोवर इत्यादि भाग बघायचा, स्वातंत्र्यदिनी शक्य तितक्या सियाचेन बेस कँपच्या जवळ जायचं व येताना लेह- मनाली ह्या अतिदुर्गम हायवेने यायचं, असं ठरलं. बाईकच्या ऐवजी मिळेल त्या चारचाकीने फिरणार होतो. मोहिमेची पार्श्वभूमी अधिक खोलात इथे वाचता येईल. काश्मीर व लदाख बघण्याची ही मोहिम आधी बाईकद्वारे करण्याची इच्छा होती. परंतु हळुहळु तिच्यात बदल होत गेले. आता इतर अधिक न विचार करता मोहिमेच्या सुरुवातीकडे जाऊया. ह्या कथनाच्या निमित्ताने ही मोहिम पुन: एकदा (अल्पांशाने असली तरी) अनुभवता येणार आहे. (:oजम्मु!!

६ ऑगस्ट! हिरोशिमा दिनी संध्याकाळी पुण्याहून निघालो. पुणे- जम्मु- श्रीनगर- लेह- लदाख प्रदेश- मनाली- सिमला- दिल्ली- पुणे ह्या मोठ्या प्रवासातील पहिला टप्पा म्हणजे झेलम एक्स्प्रेसचा जवळजवळ ४२ तासांचा पुणे- जम्मु प्रवास सुरू झाला. मोठी मोहिम व तीसुद्धा “काश्मीर” आणि “थंड प्रदेशातील” असल्यामुळे तयारी बरीच होती. संध्याकाळी हा प्रवास सुरू झाला व हळुहळु डब्यातील सहप्रवाशांशी गप्पा सुरू झाल्या. डब्यामधील बहुतांश प्रवासी जम्मु किंवा पंजाबमध्ये जाणारे होते. जवळच्या ठिकाणी जाणारे फारसे कोणीच नव्हते. जेव्हा ओळख झाली व गप्पा सुरू झाल्या, तेव्हा समजलं की त्यातील बरेच जण सेना, संरक्षण दळातील आहेत. मग आम्ही तीन जण- निरंजन, गिरीश आणि परीक्षित ह्यांची ओळख, प्रवास, हेतू ह्याबद्दल चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण विचारपूस करत होता. बरेचसे लोक सैन्यदलातील असल्यामुळे त्यांच्यातही एकसमान गप्पा सुरू झाल्या. मग प्रत्येकाकडून त्यांचे अनुभव, सूचना आणि ज्ञान की बातें मिळणं सुरू झालं. अनेक वर्षं काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात घालवलेले ते सैनिक/ अधिकारी होते. लवकरच गप्पा खुलल्या. एक जण म्हणाले, “तिथे कशाला येऊन मरता? तिथे नर्क आहे.” मग त्यांनी तिथलं बर्फाळ हवामान, प्रतिकूल प्रदेश व फिरताना येऊ शकणा-या अडचणींची माहिती दिली. आमच्या प्रवासातील नियोजित टप्पा- खार्दुंगला इथे अत्यंत अधिक उंचीमुळे श्वास आत ओढून घ्यावा लागतो असं म्हणाले. ज्या सियाचेन ग्लेशियरच्या रोखाने, ज्याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न होता, त्याबद्दलही माहिती मिळाली. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खडतर प्रदेश. सियाचेन ग्लेशियरवरचे अनुभव त्यांनी सांगितले. बर्फाळ थंडीतलं जीवन बाहेरून शौर्याचं, आकर्षक वाटत असलं, तरी त्यामध्ये माणूस गुदमरतो, असं वाटलं. त्यामुळे जाणवलं की सैनिक असले तरीही शेवटी माणूस माणूस असतो, त्यामुळे तोही वैतागतो, खचतो किंवा निराश होतो.


एका सहप्रवाशाने मराठी जेवणाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “एकदा महाराष्ट्र सोडला की पुढचं जेवण तुम्हांला जाणारच नाही. चवच येत नाही. आम्ही तर थेट जम्मुपर्यंत दोन दिवस शिळंच अन्न खातो.”

काही सहप्रवाशी काळजी घ्या, असं सांगत होते. “काश्मीरमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका, अगदी कोणीही. तुमच्या ड्रायव्हरने काही खायला दिलं तरी खाऊ नका.”


आम्ही १५ ऑगस्टला परेड बघणार आहोत आणि सैनिकांना भेटून फराळ, राख्या देणार आहोत हे सांगितल्यावरही असेच काळजीचे शब्द ऐकायला मिळाले. “सैनिकांकडून तुम्हांला चांगली वागणूकच मिळेल, असं समजू नका. बी प्रीपेअर्ड फॉर वोर्स्ट. कटू अनुभव येतील, त्यासाठी तयार राहा. तुम्ही जर सैनिकांना भेटायला जाणार असाल, तर तसं तिथे कोणासोबतही बोलू नका, कोणाला कळू देऊ नका. अगदी तुमच्या टॅक्सी ड्रायव्हरलासुद्धा. कारण तिथे कोण कसं असेल, काही सांगू शकत नाही. चुकून कोणी तुमच्या गाडीत/ सामानात काही ठेवलं, तर तुमचं लाईफ खराब होईल. कारण एकदा असं झालं की ते मिलिटरीच्या लक्षात येईल आणि मग तुमचं लाईफ खराब होईल. एकदा टेररिस्ट असा शिक्का बसला, की काहीही करता येणार नाही, तिथे कोणी दादा- बाबा चालत नाही.”


अशा प्रकारे एक ना अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. त्यामुळे मनामध्ये शंकाकुशंका, अनिश्चितता वाढली. थोडसं नकारात्मक चित्र समोर उभं राहिलं. पण हळु हळु ते बाजूला झालं. सहप्रवासी त्यांचे इतर ठिकाणचेही अनुभव सांगत होते. अंदमान निकोबारमध्ये, पूर्वांचलमध्ये असतानाचे प्रसंग सांगत होते. सर्व व्यक्ती संरक्षण दळांमधील असल्यामुळे चर्चा व गप्पा दर्जेदार होत होत्या. तसेच, त्या अत्यंत अनौपचारिकही होत्या, त्यामुळे प्रवासाच्या आखणीसाठी बराच फायदा झाला. काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. कधी एकदा जम्मु येतं आणि आम्ही काश्मीरमध्ये पोचतो, असं झालं होतं.


प्रवासामध्ये अनेक गप्पा होत असल्यामुळे व बराचसा नवीन प्रदेश असल्यामुळे प्रवास कंटाळवाणा झाला नाही. वाटेतला परिसर बघण्यासारखा होता. पावसाळा व हिरवागार निसर्ग. मधून मधून नद्या व पहाड..... आहाहा. झेलम एक्स्प्रेसबद्दल ऐकून होतो, तरी विशेष संथ वाटली नाही. मध्यप्रदेश, नंतर झांसीला उत्तर प्रदेश, परत ग्वाल्हेर व बबिनाला मध्य प्रदेश असं करत गाडी फरिदाबादच्या जवळ तर वेळेत आली, परंतु त्यानंतर सिग्नल व ट्रेन ट्रॅफिकमुळे दिल्लीला एक तास उशीरा पोचली. संध्याकाळच्या वेळी राष्ट्रीय राजधानी प्रदेशात पोचलो.


दिल्लीमध्ये ट्रेनला बराच उशीर होत गेला. पहाट सुरू झाली तेव्हा पंजाब सुरू झाला होता. लुधियानाला एक सहप्रवासी उतरले. लेहजवळील श्री पत्थर साहिब हा गुरुद्वारा आवर्जून बघा, असं ते म्हणाले होते. त्यांनीच गुरू नानकांबद्दल माहिती दिली. पहाटे उठून दरवाजात बसून पंजाब बघण्याचा अनुभव सुंदर होता. सर्वत्र हिरवळ, भरघोस शेती व समृद्ध निसर्ग. रुक्ष, कोरडा प्रदेश जाऊन थंड हवामान सुरू झालं होतं. शेती विशेष होती. त्याशिवाय छोटीमोठी टुमदार शहरं, महामार्ग आणि सुंदर घरंसुद्धा होती. संपन्नता जाणवत होती.

जालंधर येऊन गेल्यावर पंजाबच्या टोकाकडे वाटचाल सुरू झाली व हळुहळु पंजाब- हिमाचल प्रदेश- काश्मीर आणि त्याला लागून पाकिस्तान अशा निमुळत्या भागामध्ये ट्रेन शिरली!! उजव्या हाताला हिमाचल प्रदेश, समोर काश्मीर व डाव्या बाजूला थोडा लांब पाकिस्तान!


चक्की बँक हे पंजाबचं शेवटचं स्टेशन गेल्यावर लवकरच काश्मीर सुरू झालं!! कथुआ- सांबा स्टेशन्स गेल्यावर विजयपूर व जम्मु आलं. ही रेल्वेलाईन व जम्मुला जाणारा मार्ग पाकिस्तान सीमेला लागूनच जातो. त्यामुळे रेल्वेच्या दोन्ही बाजूंना चेकपोस्टस व टेहळणीच्या जागा दिसत होत्या. इतर काही फरक जाणवला नाही. परिसरही तसाच होता. पुष्कळसा पंजाबसारखा. फक्त स्टेशन्स व आसमंतात सेनेची उपस्थिती जाणवत होती. सतलज नदी लागून गेली.


शेवटी अडीच तास उशीर होऊन साडेअकरा वाजता जम्मुला पोचलो. वाटेत सहप्रवाशांपैकी काही उतरले होते. अर्थात उतरताना त्यांनी गावाला येण्याचा आग्रह केला होता. रेल्वेची हीच गंमत असते. पल दो पल का साथ, परंतु चांगली सोबत जमते व चुकामुक होताना हुरहुर होते. जम्मु स्टेशनमध्ये येताना सर्वांचा निरोप घेतला. सैन्य दलातील मंडळींनी अनेक सूचना केल्या. “काही झालं आणि जर आर्मीच्या लोकांनी तुम्हांला अडवलं, तर मला फोन करा, मी त्यांना बोलीन,” असंही म्हणाले!


जम्मु स्टेशन तसं नेहमीसारखंच वाटत होतं. बरीच गर्दी होती, ट्रेन्सच्या घोषणा चालू होत्या. जम्मुहून भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख शहरांना थेट ट्रेन जाते. स्टेशनवर सैनिक/ आर्मीचे लोक दिसत होते, पण फारही जास्त नाही. थोडावेळ ट्रेनवर थांबून बाहेर टॅक्सीचा शोध घेतला. स्टेशनवरच आणखीही ‘म-हाटी मानसं’ भेटली. साताराहून आलेले ते जवान होते. फिरण्यासाठी ‘हा’ भाग निवडल्याचं आश्चर्य त्यांच्याही चेह-यावर दिसलं. “इथे का आलात? सरोवर, पर्वत तर आपल्याकडेही आहेत ना,’ असं म्हणाले.


टॅक्सी घेतानासुद्धा ट्रेनमध्ये भेटलेले काका मदतीला आले. त्यांनी बघून टॅक्सी करून दिली. लवकरच जम्मुला टाटा करून उधमपूर मार्गे श्रीनगरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रस्ता दुपदरी (२ बाय २) होता, पण जम्मुतून बाहेर पडताना लगेचच एकपदरी झाला. वाटेत अनेक सैनिकी जागा लागत होत्या. तिथेही टेहेळणीच्या जागा होत्या. सैनिक दिसत होते. बीआरओ म्हणजे सीमा सडक संगठनचे फलक दिसण्यास सुरुवात झाली. जम्मुमध्ये दिड तास घालवल्यावर दुपारी एकच्या सुमारास टॅक्सीमधून जम्मु सोडलं. सुरिंदरसिंग पाजी हे चालक. जम्मु तसं काश्मीरमधलं अत्यंत मोठं शहर. सपाटीवर बसलं असल्यामुळे मोठा विस्तार. पण बाहेर पडताना विशेष गर्दी नव्हती. लवकरच उधमपूरच्या वाटेला लागलो.


हळुहळु डोंगर दिसण्यास सुरुवात झाली. वैष्णोदेवीचा मार्ग- कटरा फाटा गेल्यानंतर मोठा घाट लागला. आणि त्यानंतर सतत चढ, उतार, वळणं आणि घाट सुरू झाले. घनदाट झाडी, हिरवा निसर्ग आणि हळु हळु वाढत जाणारी उंची. जम्मु जवळपास समुद्रसपाटीलाच आहे. पण श्रीनगरची उंची १३०० मीटर्स आहे.

जम्मु आणि पुढील प्रवासात काही अंतरापर्यंत ब-यापैकी ओळखीची नावं दिसत होती. घर, हॉटेल, दुकान ह्यांची नावं हिंदु होती. पुढे हे हळुहळु कमी होत गेलं. पाट्यांमध्ये जास्त संख्या उर्दुची सुरू झाली.
नवीन प्रदेश असल्यामुळे प्रवास छान सुरू होता. सुरिंदर पाजी पंजाबी शैलीत बोलत होते. पंजाबी पद्धतीने रेटून आणि अर्थातच विशेषण लावून ते बोलत होते. बोलण्याची पद्धतच अशी होती, की कोणतीही गोष्ट असेल, तरी तिच्यासाठी ते विशेषणाचा वापर करत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचंही आम्हांला हसू येत होतं. जम्मु सोडून १०० किमी झाले, श्रीनगर २०० किमीवर आलं. तेव्हा एका मोठ्या घाटानंतर सहज मागे बघितलं, तर दूरवर एक स्पष्ट रेषा दिसत होती. समुद्राच्या किना-यासारखी ती रेषा होती. ते म्हणजे जम्मुपर्यंतचं पठार, समतल भूप्रदेश होता! अगदी दूरवर खाली दिसत होता. रस्त्याने १०० किमी समोर येऊनही ते पठार स्पष्ट दिसत होतं. म्हणजेच रस्ता वळणावळणाचा असला तरी हवाई अंतर- सरळ अंतर कमी होतं. अगदी असाच नजारा सातपुडा चढताना व उतरताना दिसतो. ओळखीच्या जमिनीला मागे ठेवून आता प्रवास पहाडी भागात काश्मीरच्या दिशेने सुरू झाला......