Wednesday, December 23, 2020

माझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव

सर्वांना नमस्कार!

नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं. काही जणांचं अनुमान होतं की, अतिशय कमी कोनीय अंतरामुळे ते दोन वेगळे दिसणार नाहीत व बघताना एकच डबल प्लॅनेट दिसेल. तसं काही झालं नाही. पण अगदी चिकटून असे छान दिसले! Two legands in the same frame असं ते दृश्य होतं! इतके महाकाय ग्रह असूनही ते आपल्या बघण्याच्या स्थानाच्या संदर्भात आकाशात असे जवळ येतात ही मोठी गोष्ट आहे! शक्यतो मोठ्यांचा अहंकारही मोठा असतो! पण हे दोघे महाकाय व हवेचे गोळे असलेले ग्रह अनेक दिवसांसाठी जवळ जवळ आलेले दिसत आहेत! आणि अजूनही किमान तीन- चार दिवस ते डोळ्यांनी खूपच जवळ दिसतील.