✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत
✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये
✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!"
✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ
✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण
✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे
✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते!
✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई
✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल!
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन टाटांचा तरूण मित्र! पण हा शंतनू नायडू (त्याच्या उत्साहामुळे व ऊर्जेमुळे "ते" नाही तर "तो" म्हणावसं वाटलं) इतका भन्नाट असेल हे माहिती नव्हतं. पुण्यामध्ये तो शिकला. आईमुळे त्याच्यावर वाचनाचे संस्कार झाले. श्वान प्रेमाचेही संस्कार झाले. आणि कालांतराने श्वान प्रेमामुळेच तो रतन टाटांच्या संपर्कात आला.
लोकमत साहित्य पुरस्कार समारंभात त्याला वाचन चळवळ व "मुंबई बूकीज" उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आला. ह्या मुलाखतीमध्ये त्याने सुरूवातीलाच सांगितलं, की मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका! आणि वाचनासाठी पुरस्कार द्यावा लागतोय, ही खरं तर चांगली गोष्ट नाहीय! आणि त्या पूर्ण मुलाखतीमध्ये त्याने अस्खलित मराठीमध्ये सुंदर मनोगत व्यक्त केलं. खरी मोठी माणसं नेहमी विनम्र असतात आणि डाउन टू अर्थ असतात. हे त्याला ऐकताना सतत जाणवत होतं.
हा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.
शंतनूच्या सगळ्याच गोष्टी अशाच विलक्षण आहेत! त्याने व त्याच्या मित्र- मैत्रिणींनी काही काळापूर्वी एक अभिनव उपक्रम सुरू केला होता- Good fellows India. त्याचा उद्देश एकटे पडलेल्या आजी- आजोबांना भाड्याने नातवंडं देणं हा आहे! ज्यांचे मुलं त्यांच्यासोबत राहात नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांना सोबत देण्याची ही व्यवस्था आहे. आणि हीसुद्धा काळाची गरज आहे, असं शंतनू सांगतो. हे सगळं आईकडून शिकलो असं शंतनू सांगतो. माझी आई पुण्यात मनपा शाळेत शिकवते, पण ती घरी जास्त शिक्षिका असते व शाळेत आई, असंही तो सांगतो!
शंतनूकडे बघून व त्याची ऊर्जा बघून वाटत नाही की, त्याचं वय तब्बल ३३ असेल! त्याचं वय, चेहरा व त्याचं कार्य- हे काहीच जुळत नाही! त्याच्या आईचं म्हणणं आहे, त्याच्यासाठी मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! मराठी मुलींनी प्रयत्न करायला हरकत नाही! ह्या मुलाखतीत तो रतन टाटांबद्दल काही बोलला नाहीय. रतन टाटा एक "लाईटहाऊस" आहेत, असं त्याने त्याच्या पुस्तकात लिहीलंय. ते पुस्तकही वाचनीय असणार. रतन टाटांना तो "डंबलडोर" मानतो! त्याची मुलाखत आवर्जून ऐकण्यासारखी आहे. आणि तो जे सांगतोय, ते आपण ऐकलंसुद्धा पाहिजे!
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या वरच्या ब्लॉगवर सामाजिक उपक्रम, फिटनेस, ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन इ. बद्दलचे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक ८ एप्रिल २०२५.
No comments:
Post a Comment
आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!