Wednesday, March 21, 2012

जलदुर्ग अर्नाळा

किल्ले अर्नाळा! जलदुर्ग अर्नाळा! विरारजवळच्या समुद्रामध्ये बेटावर उभा असलेला अनोखा किल्ला! पश्चिम महाराष्ट्रात किल्ल्यांच्या व सह्याद्रीच्या परिसरात राहात असूनही किल्ले बघत नसल्याबद्दल लाज वाटून हा किल्ला बघायला गेलो. अर्नाळा हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्नाळा गाव हे एक बंदर आहे आणि त्या बंदरापासून समुद्रात दिड किमीवर अर्नाळा बेट आहे. तिथेसुद्धा दाट वस्तीचं एक छोटं गाव आहे आणि किल्ला आहे. किल्ला बराचसा भग्न असला तरी बघण्यासारखा आहे. अर्नाळ्याला जाणं अवघड नाही. वसई आणि विरारहून सारख्या बस आहेत. विरारहून वसईपेक्षा जास्त जवळ असल्यामुळे शेअर रिक्शासुद्धा आहेत.


भव्यता....... महत्ता......... खरी सत्ता.....हा सागरी किनारा.......

अर्नाळ्याला जाण्यासाठी सकाळी वसई स्टेशनवरून बसने निघालो. स्टेशन बसस्टँडवरून वसई गाव बसस्टँडवर आलो व तिथून अर्नाळा बस घेतली. बसचा मार्ग वसईच्या जुन्या वस्त्यांमधून जात होता. किना-यापासून फार लांब नसूनही समुद्र दर्शन देत नव्हता... वस्ती ब-यापैकी दाट होती. कोंकण जाणवत होतं!! फक्त शहरीकरणामुळे हिरवी दाट झाडी, थंड हवामान आणि प्रचंड शांतता नव्हती......... अगदी कोंकणातल्या चिपळूण, गुहागर ह्यांच्या आसपास असेल तसा परिसर.... भूगाव, गिरिज इत्यादि गावं ओलांडून आणि नालासोपारा बाजूला ठेवून सुमारे तासाभरात अर्नाळा गावात पोचलो. अंतर तसं १२ किमीच आहे; पण दाट वस्ती, स्टॉप्स आणि वळणावळणाचा प्रदेश ह्यामुळे वेळ लागला. गावातून बीचची चौकशी केली व जवळच आहे असं कळल्यामुळे चालत गेलो.

इतका वेळ समुद्राने दर्शन दिलंच नव्हतं.... पण मग बीचवर पोचल्यावर खूप मोठा खुला समुद्र दिसला. अर्नाळ्याला लागून असलेल्या किना-याची लांबी कित्येक किमी आहे. इतका मोठा किनारा इथे आहे. पण तो प्रेक्षणीय वाटत नव्हता. कारण मासेमारीची गर्दी आणि गावामध्ये आढळणा-या नैसर्गिक क्रिया तिथे चालू होत्या...... तिथून बोटी किंवा नावा निघत नव्हत्या; म्हणून बोटी निघण्याची जागा विचारून किना-यावरून चालत चालत तिकडे गेलो. वाटेत सर्वत्र अस्वच्छ किनारा होता. मच्छीमारांची लगबग चालली होती. काही मच्छीमार माशांना किना-यावर आणून निवडत होते, वाळवत होते.........


नावा आणि धारातिर्थी पडलेले मत्स्यावशेष!


किना-यावरून बराच वेळ चालत जावं लागलं. ओहोटी होती; त्यामुळे समुद्र थोडा दूर गेला होता व शांत होता.......... पण समुद्र तो समुद्रच............ एका ठिकाणी काही लोक थांबलेले दिसले. तेही बोटीवर म्हणजे फेरीवर जाण्यासाठी थांबले होते. थोड्या वेळातच एक मोटरबोट आली. पण ती किना-यावर येत नव्हती; काही अंतर समुद्रातच थांबली होती. काही लोक त्यावर उड्या मारून व तीन फूट पाण्यात चालून जाऊन चढले व ती निघालीसुद्धा! दुसरी बोट वाळूत आत येईल म्हणून थांबलो. थोड्याच वेळात दुसरी बोट आली. पण तीसुद्धा वाळूत पुढे येईना! दहा पावलं समुद्रातच थांबली होती. सगळे लोक तसेच जात होते. मग तसेच पुढे गेलो. चढताना अर्थातच खूप मजा आली........ तीन फूट तरी पाणी होतं. पँट खूप वर घेऊनही भिजलीच. समुद्र...................... आहा हा........

चालिकेने धक्का देऊन मोटरबोट चालू केली आणि ती धाड धाड करत निघाली! बोटीमध्ये त्या मानाने बरेच जास्त लोक होते. त्यामुळे काही काठावरच्या भिंतीवर व पाय-यांवर बसले होते. बहुतांश लोक स्थानिकच होते. पर्यटक जवळजवळ कोणीच नव्हते. किनारा सोडला आणि बोट पुढे आली तसं दृश्य बदलत गेलं. वैतरणा नदीचं मुख व भव्य किनारा दिसत होता......... अर्नाळा बंदर लांब जात गेलं व लवकरच अर्नाळा बेटावर पोचलो.... दूरवरून बेटावर काही घरं, एक मंदीर व टेलिफोन टॉवर दिसत होतं. इथे तरी नीट उतरता येईल, असं वाटत होतं, पण त्याच प्रकारे उडी मारून उतरावं लागलं! भाडं फक्त दहा रूपये होतं!!! भिजलेले पाय घेऊन वाळूत गेलो.. काही क्षणातच वाळूचे चटके बसायला लागले. ओले पाय असूनही पाय भाजून निघत होते..... मग लगेचच भिजलेली चप्पल तशीच घातली व पुढे गेलो........ पुढे अख्खं गाव होतं!!! गाव सुरू होत होतं तिथेच कोणता तरी समारंभ चालू होता. लोक उत्साहात दिसत होते. किल्ल्यावर कसं जायचं म्हणून चौकशी केली. हात दाखवून सरळ जा म्हणून सांगितलं.


बेट वेगळंच वाटत होतं. एक दाट वस्तीचं छोटं गाव दिसत होतं. मुख्य लोक अर्थातच कोळी व मच्छीमार वाटत होते. त्यांची भाषा, अगदी अर्नाळा बंदरावरच्या लोकांचीही भाषा वेगळी जाणवत होती. गावातून पुढे जाताना विचित्र वाटत होतं.... लहानपणी वाचलेल्या ज्यूल व्हर्नच्या “निर्जन बेटावर धाडसी वीर” कादंबरीची आठवण होत होती! समुद्र ओलांडून वसलेली ही एक वेगळी दुनियाच होती. गावातल्या अरुंद गल्ली- बोळातून वाट काढून विचारत विचारत पुढे गेलो. दहा एक मिनिटे चालल्यावर किल्ला दृष्टीक्षेपात आला. जवळच काही नावा बांधलेल्या होत्या. समोर समुद्रही दिसत होता........

किल्ल्याचा बुरूज


 
एका बाजूचे महाद्वार


मूळ पाया व बांधकाम शिल्लक आहे.....................................मुख्य कमानीतील भाग

किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीच राम नाईकांचं नाव असलेली पाटी आहे. त्यांनी किल्ल्याच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन केलं होतं. विद्युतीकरणासाठी ओएनजीसीने सहकार्य दिलं होतं. किल्ल्याचं महाद्वार ब-यापैकी शाबूत आहे. मोठी कमान आहे. तिथून आत गेलो. किल्ल्याचा विस्तार ब-यापैकी मोठा होता; पण पाहण्यासारखं फार नाही असं समजलं. आत एक मस्जिद व मंदीर दिसत होतं. मंदीराजवळ गेलो. तिथे एक जुनाट विहीर होती. एक झोपडीसारखं घर होतं व दोन मूर्त्या होत्या..... गंमत म्हणजे तिथे चक्क ऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेतल्या अंतिम सामन्याचं धावतं वर्णन रेडिओवर कोणीतरी ऐकत होतं!! ह्याला म्हणतात DIE HARD CRICKET FAN! भारताचा मानहानीकारकरित्या बाहेर पडावं लागून आणि अंतिम सामना खेळत नसूनही कॉमेंटरी ऐकली जात होती. नंतर जाताना किना-यावरही लोक ऐकतच होते............. पण हे क्रिकेटचं वेड नसून व्यसन असावं.


ह्या मूर्त्या किती प्राचीन असतील?


किल्ल्यात फिरण्यासारखं फार नव्हतं. बुरूजावर थोडं फिरलो. अतीत!!! गतकालीन इतिहासाच्या व वैभवाच्या शिल्लक खाणाखुणा पाहिल्या. मुख्य वास्तु भग्न झाली असली, तरी पाया अजून पक्का होता.................................................
ह्या प्रस्तरांनी किती मोठा इतिहास पाहिला असेल..............................

किल्ल्याच्या बुरूजावरून समुद्राचं दृश्य छान दिसत होतं. काही थोडे पर्यटकांसदृश लोक दिसत होते, पण ते फिरण्यासाठीच आले असावेत असं वाटत होतं. थोडावेळ तिथे थांबून निघालो. परत जाण्याची दुसरी वाट आहे का, अशी चौकशी केली. (समुद्रात चालून बोटीवर चढण्याऐवजी सोपी वाळूत/ धक्क्यावर बोट येणारी वाट हवी होती!) पण तशी वाट नसल्यामुळे परत निघालो. किल्ल्याचं महाद्वार आणि कमान.... तिथली शांतता......................
मुलांच्या फर्माईशीसाठी काढलेला फोटो.


प्रवेशद्वाराच्या कमानीची आतील उंची......... किल्ल्यावरून दिसणारा समुद्र..................

परत गाव पार करून किना-यावर आलो. दूरवर एक बोट निघताना दिसत होती. ती चुकली असंच वाटलं; पण आम्हांला पाहून ती थांबली. किना-यावरचे लोक सांगत होते, लवकर जा, तर थांबलयं!! “तर” म्हणत होते, तर ! आम्ही ज्या बोटीने आलो होतो, तीच बोट नव्हे तर (एक फेरी मारून आली असावी) होती. हेलकावे खाणा-या तरमध्ये उडी मारून चढलो. एकदम जोरदार अनुभव होता..... तरमध्ये बसायला जागा नव्हती. उभं राहतानाही हेलकावे बसत होते. सर्वत्र स्वदेस नजारा होता! स्वदेसमधल्या बोटीचं दृश्य आठवलं!चालिका आणि तरमधील इतर प्रवासी. मागे अर्नाळा बेट. ते मोठं मंदीर विरुद्ध बाजूला होतं, त्यामुळे बघता आलं नाही.

अर्नाळा किल्ला..... किल्ल्याची फार माहिती इतिहासात मिळत नाही. पंधराव्या शतकाच्या आसपास हा किल्ला पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. पुढे १७३९ मध्ये वसई मराठ्यांनी जिंकल्यानंतर हाही किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. पण नंतरच्या काळात इंग्रज- मराठा तहांमध्ये हा किल्ला दोन्ही पक्षांकडे जात- येत राहिला आणि सरतेशेवटी १८१८ मध्ये मराठी ध्वज किल्ल्यावरून उतरला. बेटावर असल्यामुळे आणि उत्तरेच्या किना-यापासून वसईच्या खाडीपर्यंतचा बराच मोठा टापू ह्याच्या टप्प्यात असल्यामुळे हा किल्ला निश्चितच महत्त्वाचा होता. किंबहुना आजही आहे. पण एक लाईट हाऊस वगळता फार काही हालचाल किल्ल्यावर असल्याचं समजलं नाही. ह्या भागात समुद्र खुला असल्यामुळे व नैसर्गिक बंदर नसल्यामुळे तराची वाहतूक समुद्रातूनच करावी लागते. धक्का व खाडी नसल्यामुळे तर जमिनीलगत येऊ शकत नाही. अर्थात नालासोपारा हे प्राचीन बंदर इथून जवळच आहे. नालासोपारा बंदर हा एक स्वतंत्र विषय व स्वतंत्र भेट होऊ शकते. शुर्पारक किंवा सुप्पारक (बौद्ध काळात) म्हणून ओळखलं जाणारं हे एक प्राचीन बंदर. प्राचीन व मध्ययुगीन व्यापाराचं एक प्रमुख केंद्र. कोंकणच्या निर्मितीच्या आख्यायिकेतील परशुरामांचं एक कार्यक्षेत्र (परशुरामांनी समुद्र मागे सरकवून कोंकण स्थापन केला, ही आख्यायिका आहे)!


वसईचा जुना नकाशा. साधारण नाळे गावाजवळ शुर्पारक बंदर होतं.


दैदिप्यमान........... अमोघ...... रौद्र...................  अजस्र........ अद्भुत.....  अथांग...............

उडी मारून किना-यावर उतरलो आणि मन हलकं झालं!! (:o गंमत म्हणजे उतरताना पैसे द्यायला गेलो, तर येतानाचे पैसे घेतले नाहीत! दोन्ही वेळचा प्रवास प्रत्येकी फक्त दहा रूपये!! मुंबईच्या इतक्या जवळ इतका साधेपणा! इथे अजूनही गतकालीन प्रभाव आहे, हे दिसत होतं! किना-यावर माशांचा खच पडला होता. वाळूमध्ये अक्षरश: शेकडो (बिनकामाचे) मासे फेकून दिलेले होते. लाकडाच्या वखारीमध्ये लाकडाचा भुसा जसा पसरलेला असतो, तसे हे मृत मासे पसरलेले होते. काही मोठे मासेही फेकलेले दिसत होते. इथल्या किना-यावर विपुल मासे असावेत. मच्छीमार एक पात्र घेऊन पाण्यात जात होते आणि पात्रभर मासे घेऊन परत येत होते. मग ते ते मासे शॉर्ट लिस्ट करत असावेत! आणि जे कामाचे मासे होते, ते लोकांनी किना-यावर व घरासमोर वाळत ठेवले होते. सर्वत्र एकच घमघमाट होता!!!


माशांचा खच

समुद्र किना-यावर डिहायड्रेशन जास्त होत असल्यामुळे व ऊन असल्यामुळे थकल्यासारखं वाटत होतं. समोरच रसवंती दिसली. ऊसाचा रस घेऊन आणि धारातिर्थी पडलेल्या माशांचं दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर निघालो............ भाईंदर आणि वसईच्या प्रवासामध्ये एकदा दिव्य दर्शन देऊन नंतर अस्तित्व जाणवतंय पण दिसत नाही ह्या मोडमध्ये दबा धरून बसलेला; अगदी अर्नाळा बीच येईपर्यंत वाटेतल्या चिपळुण- गुहागर मधून अजिबात न दिसणारा; मरिन लाईन्स स्टेशनवर "दोन सीट एडन, दोन सीट एडन" म्हणणारा दिव्य “तो” शेवटी एकदाचा सविस्तर आणि भरभरून भेटला.................


आगामी आकर्षण: वसईचा किल्ला

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!