सह्याद्री व किल्ल्यांच्या प्रदेशात राहात असूनही किल्ले पाहणं होत नसल्याची लाज वाटून अर्नाळा व वसई हे किल्ले बघून झाले. नंतर अर्थातच एखाद्या गडावर जाऊन यावसं वाटत होतं. इंटरनेटवर गडावर जाणा-या अनेक ग्रूप्सची माहिती मिळते. त्यात थोडं शोधलं आणि माहिती घेतली. वेळ सोयीची होती. कार्यक्रम आकर्षक होता. त्यामुळे मित्रांपैकी कोणीही सोबत येऊ शकले नाहीत, तरी भ्रमंती ग्रूपसह गोरखगडावर जाण्याचा कार्यक्रम ठरवून टाकला.. ट्रेकच्या लीडरना काँटॅक्ट केला आणि सतरा मार्चच्या रात्री कल्याणहून निघण्याची तयारी केली.......
सह्याद्रीचा नजारा.......
गोरखगड आणि ट्रेक....... संपूर्ण नवीन परिस्थिती होती. भ्रमंती ग्रूपसुद्धा आधी अजिबात ओळखीचा नव्हता....... पण सणक आली आणि सर्व ठरवलं. इंटरनेटवरूनच थोडीफार माहिती करून घेतली. ट्रेकबद्दल माहिती ज्या साईटवरून मिळाली, तिथे ह्या ट्रेकची वर्गवारी ‘सोपा’ म्हणून केलेली असल्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. कल्याण स्टेशनवरच भेटीगाठी झाल्या, ओळख झाली आणि रात्री पावणे अकरा वाजता मूरबाडच्या गाडीत बसलो. ट्रेकचे लीडर मुकेश व रवी आणि नारायण चौधरी हे ज्येष्ठ पण तरुण काका सोबत होते. मुकेश व रवी ह्यांच्या बोलण्यात पेंगाँग त्सो, त्सोमोरिरी, लेह, स्पिती हे शब्द ऐकून अपरंपार आनंद होत होता.............. लदाखची आठवण येत होती....
मूरबाडमध्ये थोडा वेळ थांबून पहाटे साडेबाराच्या एसटीने निघालो आणि जवळजवळ दीड वाजता डेहरे ह्या गावात पोचलो... गोरखगडाच्या पायथ्याशी हे गाव वसलं आहे......... गावात रस्त्याला लागूनच एक घर व ओसरी होती. तिथेच सामान ठेवलं. सर्वत्र सामसूम व अंधार. पण अंधारातही नजर स्थिरावल्यावर समोरच्या बाजूला दोन डोंगर दिसत होते..... आणि आकाशातले तारे जणू त्या डोंगरामध्ये उतरले आहेत, असं वाटत होतं. डोंगरात मंद दिवे दिसत होते. आधी वाटलं की कोणीतरी नाईट ट्रेक करून जात आहेत. पण त्यांची जागा तशीच स्थिर होती.... मग लक्षात आलं की त्या वणव्यामुळे लागलेल्या आगी आहेत........
नारायणकाका गेल्यागेल्या आडवे झाले. अजून काही सोबती जीपने येणार असल्यामुळे रवी आणि मुकेश सर जागे होते. सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे झोपायची इच्छा होत नव्हती. तरी थोडा वेळ फिरून झाल्यावर त्या घराच्या ओसरीवरच पेपर्स पसरून पडलो. बराच वेळाने जीप आली व बराच वेळ लगबग चालली होती. मग आलेले लोक झोपले आणि शांतता झाली. झोप लागतच नव्हती. थंडीसुद्धा खूप जास्त होती...... त्यामुळे मग उठलो आणि मुकेश सरांसोबत गप्पा मारत बसलो..... वारा अजिबात नव्हता. पण अस्सल गावाकडची थंडी होती.........
शांत निर्जन रस्ता आणि गावातली शांतता..... डेहरे गाव! गावाच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती घेतली तर दिसतं की हे गाव इतिहासामध्ये सह्याद्री ओलांडून कोकणात जाण्याची एक वाट म्हणून प्रसिद्ध होतं. इतकंच काय, अजूनही महसूली नोंदीमध्ये गावाचं नाव उंबर (म्हणजे कोकणचा उंबरठा ह्या अर्थाने) आहे. आणि डेहरे हे नावसुद्धा उंबरठ्यासाठी असलेल्या दहलीज ह्या उर्दू शब्दाचा अपभ्रंश आहे, असं सांगितलं जातं!! विशेष म्हणजे गावची जुनी लोकसंख्या कित्येक लाख होती, असं लोक सांगतात. सह्याद्रीमध्ये कोकणाच्या उंबरठ्यावर असलेलं असं हे विशेष गाव!!
गप्पा मारता मारता आणि थोडं फिरता फिरता पहाट झाली. पहाटेचा वारा सुटला... आणि वा-याबरोबर थंडी जाऊन गरम हवा येण्यास सुरू झाली... किंचित जळल्याचा वासही येत होता.... मग लक्षात आलं की वणव्याची गरम हवा वा-यामुळे खाली गावाकडे येत आहे..... वणव्याच्या आगीही हललेल्या दिसत होत्या.... झुंजूमुंजू झालं तसे समोरचे दोन डोंगर स्पष्ट झाले. डावीकडचा मच्छिंद्रगड आणि उजवीकडचा गोरखगड होता...... मच्छिंद्रगडाच्या बाजूच्या डोंगरावर लागलेला वणवा दिसत होता...... सकाळी हळुहळु सगळे उठले आणि त्या घरातल्या लोकांना उठवून चहा- नाश्ता सांगितला. उपसरपंच हमीद पटेल ह्यांचं हे घर गोरखगडावर येणा-या सर्व ट्रेकर्सचं स्वागत करतं व त्यांची सोय करतं.
पहाटेच्या चंद्रप्रकाशात डावीकडे मच्छिंद्रगड आणि उजवीकडे गोरखगड.... मच्छिंद्रगडाच्या खाली डावीकडे एक ठिणगी दिसते; तो वणवा होता.
सकाळी निघण्याआधी ओळख परेड झाली. एक दोन जण सोडले तर जवळजवळ सर्वच लोक अनुभवी ट्रेकर होते. आमच्यासोबत कल्याणहून आलेल्या नारायणकाकांनी आदल्याच दिवशी मलंग गड काबीज केला होता...... एकंदरित फ्रेशर फक्त मी आणि अजून एक इतकेच होतो..... भ्रमंती ग्रूपचीही ओळख होत गेली. लीडर स्वत: प्रत्येक गोष्ट करत होते; प्रत्येकाची विचारपूस करत होते. भांड्यातून चहा- पोहे काढून प्रत्येकाची डिश बनवण्याचं कामही लीडर करत होते. तसंच ट्रेकिंग व प्रस्तरारोहणाची त्यांची तयारीही जोरदार दिसत होती. त्यांची बॅगच मुळात अवजड होती.
पहाटे कल्याणहून निघूनही काही जण येणार होते. तेही आले आणि मग सर्व निघाले. लीडर्सनी सर्व सामान बांधून आणि लावून घेतलं. रोप, अँकर, पाण्याच्या बाटल्या, खाद्य सामुग्री, ग्लुकॉन डी घेतलं. ट्रेक मोहिमेमध्ये नेहमी करतात त्याप्रमाणे एक लीडर- रवी समोर तर मुकेश हे लीडर मागे थांबणार होते. रवी आणि नारायणकाका ह्यांच्या सोबत निघालो....
रवी आणि नारायणकाका... रोप बांधण्याची व बॅग बांधण्याची पद्धत त्यांचा अनुभव व कौशल्य दर्शवत होती.
रस्त्याला लागूनच गोरक्षनाथांचं मंदीर आहे. त्याच्या मागून गडाच्या दिशेने पायवाट जाते. एक एक जण येईपर्यंत सुरुवातीला थोडे थांबत गेलो. ज्याप्रमाणे वाहन चालवताना (विशेषत: अवजड वाहन!) ते सुरुवातीला प्राथमिक गेअर्समध्ये चालवून थोडं गरम आणि सक्रिय करावं लागतं व त्यानंतरच वरच्या गेअर्समध्ये नेता येतं, त्याप्रमाणे ट्रेकिंगच्या गेअरमध्ये शरीराला आणण्यासाठी सुरुवातीला हळु जाणंच चांगलं होतं.
मंदीरापासून पुढे आल्यावर लवकरच दाट झाडी सुरू झाली. पायवाट मात्र स्पष्ट व मळलेली होती. पण बरीच अरुंद होती. काही अंतर पुढे गेल्यावर खडा चढ सुरू झाला. गाव आणि रस्ता मागे दूरवर दिसत होते आणि समोर नजारा साकार होत होता...... मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन पर्वत एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत होते. बाजूला भरपूर डोंगर आणि दरीसुद्धा.....
देखों जिधर भी इन राहों में रंग पीघलते है निगाहों में...........
सुरुवातीची शांतता..........
जमीन दूर राहिली.....
थोडं थांबत थांबत आणि फोटो घेत घेत समोर जात होतो. हळुहळु बराच तीव्र चढ सुरू झाला. सुमारे ७० अंशातला तरी चढ असावा. आणि सलग होता. त्यामुळे मध्ये थांबायला जागा नव्हती. एक मोठा चढ पार करून झाल्यावर मग दोन तीव्र उतारसुद्धा लागले. आत्तापर्यंत दाट झाडीने जंगलाचं स्वरूप घेतलं होतं. चढताना सुरुवातीलाच अभयारण्याबद्दल एक पाटी लावलेली होती......
मुकेश सर आणि त्यांच्यासोबतचे मागेच होते आणि इतर सर्व जण रवी सरांसोबत पुढे जात होतो. सोळा जणांच्या ग्रूपमधल्या जवळ प्रत्येकालाच ट्रेकिंगचा बराच अनुभव होता. माउंटेनिअरिंगवर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलेले आणि कित्येक शिखरे केलेलेही बरेच जण होते. त्यामुळे विशेष अडचण न येता व एक- दुस-याला सूचना देत सर्व जण चढत होतो. माझ्या बॅगमधलं काही सामान खाली गाडीतच ठेवलं असलं तरी पाण्याच्या दोन बाटल्या आणि खाद्य- पदार्थ पाठीवरच्या सॅकमध्ये होते आणि त्या सॅकचा एक बंद तुटल्यामुळे गाठ मारून ती वापरत होतो. काही जणांनी ह्यामुळे चढताना त्रास होईल, हे सांगितलं व सॅक नीट लावूनही दिली. तोपर्यंत विलक्षण नजारा सुरू झाला होता..... खाली दूरवर सपाट भाग आणि आसपास दरी आणि उंच डोंगर..... सह्याद्री!!!
सुरुवात केल्यापासून जवळ जवळ तासाभराने एक चढ बराच तीव्र लागला. मग मात्र काही वेळ बसून आराम केला. सगळेच लोक थोडा थोडा वेळ थांबत येत होते. मग परत चढायला सुरुवात केली. तीव्र चढ असल्यामुळे पायवाटेला लागून असलेल्या झाडा- झुडूपांना व झाडाच्या मुळांना हाताने धरून चढावं लागत होतं. धापा टाकत व दम घेत घेत एकदाचा एक मुख्य चढ पार केला व समोर थोडा सपाट भाग आणि लाल रंगाची एक छोटी मूर्ती दिसली. इथून पुढचा टप्पा सुरू होतो. इथे मग बरेच जण काही वेळ थांबले. तिथे ट्रेकर्ससाठी पुढची दिशा बाणाने दाखवली होती. नारायणकाकांसारखे काही मुरलेले ट्रेकर्स सरळ पुढे निघून गेले.....
ही चढण्याची वाट.....
कूल नारायणकाका
इथून पुढचा ट्रेक हा निव्वळ रॉक क्लाइंबिंग म्हणजेच प्रस्तरारोहण होता!! अर्थात पाय-यासुद्धा होत्या. पण पुढे पुढे त्या तुटक होत गेल्या व त्यामध्ये अंतरही खूप जास्त होतं..... अर्थातच मुरलेल्या ट्रेकर्स व प्रस्तरारोहकांसाठी तो एक सोपा रॉक पॅच होता (आणि खरं म्हणजे रॉक क्लाइंबिंगसुद्धा नाही; कारण पाय-या होत्या ना :) )...... पण फ्रेशर ट्रेकर्ससाठी मात्र तसा नव्हता.........
बराच वेळ मधल्या सपाट जागेत आराम केला. तोपर्यंत बाकीचेही आले आणि रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढे जाण्यास सुरुवात केली.... इथून पुढे सर्व रस्ता दगडांच्या स्वरूपातच आहे. मध्ये मध्ये पाय-या व जिन्यासारखी रचना आहे. पण ते तुटलेलेही आहेत. शिवाय मागे काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे (एक्स्पोजर, अँकर, होल्ड, पिनॅकल इत्यादी शब्द ऐकायला मिळत होते!)....... तरीही चढताना तितकी अडचण आली नाही (अर्थात उतरताना कसं होणार, ही भिती मनात होतीच)....... दगडी तुटक पाय-यांमधून चढून वर गेल्यावर किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं. एका मोठ्या खिडकीसारखं ते आहे. तिथून आत जाऊन परत वर जाण्यासाठी दगडी वाट मिळते. तिथेच ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहेत. पण फोटो घेण्यासाठी थांबावं इतकी जागा तिथे नव्हती (किंवा आहे ती जागा पुरेशी वाटत नव्हती!); त्यामुळे फोटो घेता आले नाहीत.
हिंमत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले.......
खाली लाल ठिपका दिसतो; तिथून मुख्य गुहेपर्यंत चढण्याचा दगडी रस्ता.....
दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे. समोर जवळच मच्छिंद्रगड दिसत होता..... आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी..... आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते......
इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे. रात्री इथे मुक्कामाला आलेले ट्रेकर्स दिसत होते. गूहेमध्ये रात्री मुक्कामसुद्धा करता येतो. गुंफा बरीच मोठी आहे. आतमध्ये नवनाथांचे फोटो व देवस्थान आहे. आणि इथे सर्वत्र मर्कटांचा वावर आहे. पण ते दात विचकण्यापलीकडे आणि मधून मधून खाद्य पदार्थ नेण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे काही उपद्रव देत नाहीत. गडावरच एका बाजूला गोड्या पाण्याचं टाकंसुद्धा आहे.
गुहेतून दिसणारी डोंगररांग
नवनाथ गूंफेतील फोटो
मच्छिंद्रगड सुळका!
गूहेमध्ये बसून थोडा वेळ आराम केला आणि नाश्ता केला. लगेच नारायणकाकांनी एक ऊर्जादायी शवासन करून घेतलं. सुमारे सव्वादोन तासांमध्ये गावातून बालेकिल्ल्यापर्यंत किंवा माथ्याच्या पायथ्यापर्यंत पोचलो होतो...... साडेआठ वर्षांपूर्वी सिंहगड पायवाटेने उभा चढून जाताना चाडेचार तासांमध्ये चढलो होतो, हा ‘विक्रम’ मोडला गेला!
नाश्ता करून आणि थोडा आराम करून पुढच्या टप्प्याला जायला निघालो. एक माहिती मिळाली आणि किंचितसं बरं वाटलं! मुकेश सरांच्या सोबत चढणारे सकाळी बाईकवरून येऊन गटात सामील झालेले दोन जण अर्ध्या वाटेतच थकून मागे उतरून गेले होते....... कमीत कमी काही लोकांसाठी तरी हा गड अवघड होता!! (:0 गूहेच्या आसपास सपाट भाग कमीच आहे. आणि जो थोडा भाग आहे; त्याला लागून लगेचच एक्स्पोजर (सरळ दरी) आहे! गुहेतून निघाल्यावर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. त्यातील पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं. पण अधिक महत्त्वाची गोष्ट ही होती, की त्याच्या उजव्या बाजूने पायवाट जात होती आणि त्या पायवाटेपासून दरी किंवा एक्स्पोजर जेमतेम दोन फूटभर अंतरावर होतं. काही जण बिनधास्त प्रकारे बघता बघता पुढे निघूनही गेले........ इथून पुढे नजारा व चित्र कसं असणार आहे, ह्याचा अंदाज त्या वाटेवरून येत होता...... गोरखगडाच्या आव्हानास सुरुवात झाली होती....
हाँ यही रस्ता है तेरा....................
हाच तो सुळका- गोरखगड पिनॅकल!!
मच्छिंद्रगडाच्या सुळक्याच्या पार्श्वाभूमीवर रवी सर.........
कातळ कडेपासून दरीचं एक्स्पोजर फार लांब नव्हतं...... किल्ल्यावरील बांधकाम दिसत आहे.
डाव्या बाजूवरील दगडांना हाताने धरत धरत (धरायला काहीच नव्हतं; पसरट कातळाला हाताने स्पर्श करून धरण्याचा प्रयत्न केला) व वजन शक्यतो डावीकडे ठेवत ठेवत तो भाग कसा तरी पार केला..... इथून पुढचा टॉपचा भाग - पिनॅकल - सुळका भाग अवघड आहे, हे माहिती होतं. तो चढताना कदाचित रोप लावावा लागेल, असंही लीडर बोलले होते. ते त्यानुसार पाहणी करत होते. अजून पुढे चाललो. सुळक्याची सुरुवात असल्यामुळे आणि पायवाट किंवा सपाट भाग अत्यंत अरुंद असल्याने फार पुढे जाण्याची शक्यता नव्हती... तिथेच शक्य तितक्या गडाच्या जवळ उभा राहण्याचा प्रयत्न करत थांबलो...... नजारा अत्यंत सुंदर होता..... दूरवर विस्तीर्ण पठारी भूप्रदेश दिसत होता...... लांब अंतरावर धरणाचं पाणी दिसत होतं..... सर्व नितांत सुंदर नजारा होता; पण ह्या सर्व दूरच्या गोष्टी होत्या. सर्वांत जवळची गोष्ट- एक्स्पोजर आणि दरी!!!
लीडर्सनी शोधाशोध केली आणि सुळक्यावर कुठून चढायचं ही जागा ठरवली. गोरखगडावर त्यांपैकी काही जणच काही वर्षांपूर्वी येऊन गेले होते. सर्वांना बाजूला घेऊन प्रस्तरारोहण कसं करायचं ह्याची माहिती कैवल्य सरांनी दिली. त्यांना रॉक क्लाइंबिंगचा वीस वर्षांचा तरी अनुभव आहे. त्यांनी काही सूचनाही केल्या.
• चढताना जास्तीत जास्त भार पायांवर आणि पायाच्या बोटांवर द्यायचा. हातांवर भार घ्यायचा नाही; हात फक्त दगडांना धरून आधार देण्यासाठी आहेत. आपल्या हातांना आपलं वजन फार वेळ घेता येत नाही. कारण आपल्या हाताच्या बोटांमध्ये तेवढी ताकत नसते. पण आपण आपल्या पायांवर जास्त वजन देऊ शकतो; कारण त्यामध्ये ती ताकत असते व आपण दिवसभरात दोन तास तरी आपल्या पायांवरच असतो.
• दगडामध्ये अनेक ठिकाणी खोबणी व खाचा आहेत. बाहेर आलेले काही दगड व दगडाचा भाग आहेत. त्यावर पाय आणि हात ह्यांना होल्ड करून वर चढायचं.
• चढताना दगडी वाट मध्ये मध्ये वळण घेते आणि दगडी वाटेची रुंदी अत्यंत कमी (कुठे कुठे तर जेमतेम एक फूट आणि कुठे कुठे तर त्याहून थोडी व मोठी गॅप असलेली) आहे; त्यामुळे पाठीवरची सॅक कातळाला घासेल व तुम्हांस खाली फेकू शकेल. तेव्हा तिथून जाताना तिरपं वळण घेऊन जा; म्हणजे सॅक कातळाला घासणार नाही.
• जर फ्री- क्लाइंबिंग (रोपचा वापर न करता) करताना बॅलन्स गेला व पडला, तर शरीर पसरवा. हात- पाय लांब करा. म्हणजे पडल्यावर तुम्ही थांबू शकाल आणि बाउंस होणार नाहीत. जर हात- पाय जवळ घेतले तर सरळ दरीत पडू शकाल (माकडांची भिती असल्यामुळे व पाण्याची गरज असल्यामुळे सॅक्स सोबत न्याव्या लागत होत्या).
• उतरताना ज्या पोजिशनमध्ये चढलो, तसंच म्हणजे दरीकडे पाठ करून उतरायचं आहे. सरळ उतरण्याचा प्रयत्न करू नका; हातांवर भार देऊ नका.
त्यांनी सोबत असलेल्या साधनांची माहिती दिली व भ्रमंती ग्रूपमध्ये नेहमी सुरक्षेला प्राधान्य दिलं जातं व म्हणून सर्व जण सुरक्षित प्रकारे चढणार आहोत, हे सांगितलं.....
मनामध्ये प्रचंड धाकधुक होती..... कारण कितीही काळजी घेतली तरीही एक्स्पोजर जरा जास्तच होतं!!! एका मागोमाग एक जण चढण्यास सुरुवात झाली. ब-याच महिला आणि मुलीसुद्धा सहजपणे चढत होत्या. ट्रेकमध्ये भावनाताई म्हणून एक होत्या; त्यांनी तर हिमालयातलं ७००० मीटर उंचीचं एक शिखरही सर केलं होतं!!
पण सर्वच जण असे सहजपणे चढू शकले नाहीत....... मला तर चढताच येत नव्हतं..... ): कारण कसं चढणार? उभा कातळ. पहिलं पाऊल चढून गेल्यावर पाय ठेवायला जागाच नाही. बरं वर कशाला हाताने धरून मग पाय वर घ्यावेत; तर तेही नाही. असाच थोडावेळ अडकलो. मग वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी हात व पाय कुठे ठेवायचे ते सांगितलं. कसं तरी ते करून बघितलं आणि कसं तरी अक्षरश; कसं तरी वरती चढलो. पण ही फक्त सुळक्याची सुरुवात होती...... सुळक्यावर पुढे अशाच दगडी वाटेचा सुळसुळाट होता!
काही पाय-या होत्या. पण त्याही अत्यंत अरुंद व मध्ये मध्ये मोठी म्हणजे चार- पाच फूट गॅप असलेल्या पाय-या होत्या. पण तिथे ब-याच ठिकाणी हाताने होल्ड करण्यासाठी खाचा व खोबणी केलेल्या आहेत. मध्ये मध्ये दगडी वाटेला लागून छोटी भिंतही आहे (एक्स्पोजर नसावं म्हणून)! परंतु तरीही अत्यंत अरुंद पाय-या आणि मागे सरळ दरी........... त्यातच ती वाट वळण घेणार.... आणि आपली सॅक कातळाला घासून आपला बॅलन्स अजून घालवणार...... बरं, पाय-याही सलग नाहीत. खोबणी/ खाचा/ होल्डही सलग नाही. त्यामुळे मध्ये असंच अडकून पडणार...... कसा तरी तिथला पॅच पूर्ण केला. वर अजून एक छोटी गुहा होती. तिथे बसलो आणि खालचं दृश्य पाहिलं. एक एक करून सर्व वर येत होते. काही उत्साही आणि गतिमान पुढेही गेले होते. त्या वेळेस मात्र तिथून एक पाऊल वर टाकावसं वाटत नव्हतं. का टाकायचं? का पेक्षा कसं टाकायचं हा प्रश्न होता. पुढची वाट अशीच बिकट असणार होती. अजूनच धोकादायक होती. त्यामुळे आधीच इतका धोका पत्करलेला असताना अजून का वर जायचं? असे प्रश्न पडले आणि तसाच बसून राहिलो. पण ग्रूपने ट्रेक करत असल्याचा फायदा झाला. पश्चिम रेल्वेत काम करणा-या एका ताईंनी बसू दिलं नाही. “थोडसंच अंतर आहे, पाय-याही आहेत,” म्हणून मोटिव्हेट केलं.
मनाशी विचार केला, आधीच इतकं वर आणि इतकं धोकादायक प्रकारे आलो आहोत. खाली जाताना फुल वाट लागणारच आहे. तिथे काही बदल होणार नाही. त्यामुळे आधीच इतकी जास्त रिस्क आहे, तर अजून थोडी रिस्क घेतली तर काय मोठं बिघडणार? जी वाट लागणार आहे, ती उतरताना तशीही लागणारच आहे.... मग कशाला थांबायचं? असा विचार करून निघालो!!!
एक दोन ठिकाणी अडकलो; पण पुढे जाऊ शकलो आणि आला....... गडाचा सुळका आला!!!!! इथे मात्र वर अजून कोणता भाग शिल्लक राहिला नव्हता. अगदी माथ्याच्या माथ्यावर पोचलो..... सर्वत्र नजारा होता.... सह्याद्रीच्या अनेक डोंगरांची रांग दिसत होती.... समोरच मच्छिंद्रगड दिसत होता; पण तो आता बुटका वाटत होता. दूरवर.... खाली कित्येक अंतर दूरवर सपाट जमीन आणि रस्ता दिसत होता........................................ तिथपर्यंत कधी पोचू शकू, असं खरोखर, अगदी खरोखर, वाटतच नव्हतं!
एका बाजूला सिद्धगड आणि आसपासची डोंगररांग दिसत होती. दुस-या बाजूला नाणेघाट, हरिश्चंद्र गड असे गड व पर्वत होते. तिथून आकाश स्वच्छ असेल तर कोकणकडा, कळसूबाई हेही दिसू शकतात, असं म्हणतात. पण हवा तितकीशी स्वच्छ नव्हती. त्यामुळे दूरचे डोंगर नीट दिसत नव्हते. पण त्यांची प्रसिद्ध रांग मात्र दिसली.
सुळक्याच्या माथ्यावरील मंदीर! आलो एकदाचे.......
सुळक्यावरून दिसणारा सिद्धगड आणि इतर डोंगर
शिखरावर जाणं इतकं अवघड आहे तर सचिन व द्रविड कसे राहात असतील?
सह्याद्री पर्वतमधील सपाट भाग दिसत आहे....
हरिश्चंद्रगड, नाणेघाट, दमदम्या, कळसूबाई इत्यादि ह्या बाजूला आहेत.
गडाच्या माथ्यावर चक्क एक छोटं मंदीर बांधलेलं होतं. काही झाडं लावलेली आहेत. भगवा ध्वज लावलेला होता. तिथे मात्र बसण्यासाठी (सुरक्षित) जागा होती...... तिथे थोडावेळ बसलो. सर्व सोबती आल्यावर फोटोसेशन सुरू झालं. काही लोक एकदमच दरीच्या तोंडाशी जाऊन बसत होते..... उगीचच भिती देत होते...... मग मस्तपैकी ग्रूप फोटो काढले. लीडर्सनी ग्लुकॉन डी दिलं (पण मला घ्यावंसं वाटलं नाही, जिथे जगण्याचीच शाश्वती नाही, तिथे इतर सर्व व्यर्थ!!); काही लोकांना जास्त काठावर जाऊ नका असं बजावलं! उतरताना कातळ तापेल आणि पकडताना अडचण होईल, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मग उतरून (शक्य असल्यास उतरून आणि शक्य असल्यास व जमल्यास दरीच्या काठा काठाने सुळक्याला वळसा घालून) मुख्य गुहेत जेवण करून निघायचं ठरलं. सुळक्यावर पोचल्या पोचल्या विचारलं की, उतरण्यासाठी दुसरी वाट आहे का, तर उत्तर नकारार्थी मिळालं होतं..............
(फोटो सौजन्य: भ्रमंती ग्रूप व सदस्य)
उतरताना मजाच मजा होती.............. भयानक......... अशक्य........... भयानक अवघड अनुभव ठरणार होता तो आणि ठरलासुद्धा! काही आघाडीचे लोक उतरले. हळु हळु वळून आणि दरीकडे पाठ करून उतरण्यास त्यांनी सुरुवात केली. मीही धीर करून उतरण्यास सुरुवात केली. (अन्य काहीच करता येऊ शकत नसल्यामुळे उतरण्याचा ‘धीर’ केला). काही पाय-या उतरून गेल्यावरच मी अडलो. तिथून पुढचे चाळीस मिनिट माझ्यासाठी जीवन- मरणाचे होते!! उतरता येऊच शकत नव्हतं. २ पाय आणि २ हात ठेवण्यासाठी १ जागाही मिळत नव्हती!! तेव्हा एकमेव शरीर कसं उतरवणार? पाय-या सलग असत्या आणि होल्डस मजबूत असते; तर उतरता आलं असतं. पण पाय-या आणि होल्डस- खाचा/ खोबण्या/ बाहेर आलेला कातळाचा भाग ह्यामध्ये मोठी गॅप होती आणि एक्स्पोजर! त्यामध्ये तर अजिबातच गॅप नव्हती!
शेवटी रवी सरांच्या मार्गदर्शनानुसार, सूचनांनुसार आणि नंतर त्यांच्या आदेशानुसार अक्षरश: एक एक पाऊल, एक एक हात ठेवत ठेवत कसं तरी खाली येण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना विचारावं लागत होतं. एक पाय खाली टाकताना खालची पायरी किंवा दगडाचा बाहेर आलेला भाग – पायाचा होल्ड इतका खाली व बाजूला असायचा की तिथे पाय ठेवला तर हमखास बॅलन्स जाणार आणि फक्त वरचा पाय आणि हात ह्यांवर बॅलन्स होणार नाही, हे अगदी कन्फर्मली दिसायचं. बरं, पाय तसेच ठेवून जरा वाकून हाताला होल्ड घ्यावा म्हंटलं, तर तोही नाही. आणि जास्त वाकलो तर बॅलन्स जायची खात्री! बराच वेळ अडकून अडकून खाली येत होतो. मग कैवल्य सर मदतीला आले. त्यांनीही प्रत्येक पाऊल व हात हलवताना सूचना केल्या. मला अगदीच जमत नाही, असं पाहून मग ते माझ्या खाली आले व त्यांनी त्यांचा हात व पाय मला होल्ड म्हणून वापरू दिला.... तेव्हा कुठे सर्वांत वरचा भाग उतरू शकलो.
येताना लागलेली वाट
(फोटो अभिषेकने घेतलेला आहे)
वाटेत थोड्या पाय-या होत्या आणि छोटी भिंतही होती. अक्षरश: कसं तरी आणि जीव होल्ड करून तो भाग ओलांडला. पण पुढे अडलो. रवी सर त्यांचा पूर्ण पेशन्स होल्ड करून मला सूचना देत होते. एक एक पाऊल/ हात कुठे ठेवायचा ते सांगत होते. उतरताना एका वेळी तर रवी सरांच्या हातांवरही पाय ठेवून होल्ड करावा लागला.... कसं तरी आणखी काही स्टेप्स उतरलो. परत थोड्या पाय-या मिळाल्या. आणि मग जिथून सुरुवात केली होती; त्या सपाट भागाच्या म्हणजे माथ्याच्या पायथ्याच्या वर आलो. इथूनच वर येताना काही वेळापूर्वी बरीच अडचण आली होती. इथे थोड्या स्टेप्स होत्या आणि तिथून उतरताना मात्र दहा- बारा फूटांमध्ये होल्ड जवळजवळ नव्हताच. मग सरांना विचारलं, सर तुम्ही सांगाल, तसं थोडं अंतर उतरतो; नंतर मग उडी मारू का? इथेही एक्स्पोजर होतंच; पण पाच- सहा फूट सपाट जमीन होती......... तर सरांनी त्याला नकार दिला. रॉक क्लाइंबिंगमध्ये अगदी दोन फूटांची उडीही मारायची नाही, असं बजावलं! (कारण उडी मारल्यामुळे दगड हलू शकतात) मग मी उतरणार कसा? तोपर्यंत त्यांना माझ्या परिस्थितीची कल्पना आली होती. मी उतरणं जवळजवळ अशक्य आहे, हे त्यांनाही पटलं होतं. त्यामुळे त्यांनी सरळ मला रोप लावला. पोटाभोवती रोप घट्ट बांधला. त्याचं वरचं टोक त्यांनी त्यांच्याजवळ फिक्स करून ठेवलं. आणि मग मला एक एक पाऊल ठेवण्यासाठी सूचना दिल्या.
खाली असलेले नारायणकाकाही मला सूचना देतच होते. रोप लावून उतरण्यास सुरुवात केली..... आयुष्य होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतो. अर्थातच हात- पाय ठेवायला आणि त्या स्थितीत बॅलन्स करायला जागा मिळत नव्हती. एक स्टेप घेऊन खाली आलो. इथून सपाटीचं अंतर जेमतेम सहा फूट होतं. पण सर उडी मारू देणार नव्हते. पुढे होल्डच मिळत नव्हता; म्हणून मग त्यांनीच हळुहळु रोप सोडला. रोपने मला होल्ड केलं शेवटी!! मग दगडाला हात लावून थोडं घसरत घसरत खाली येऊन सपाट कातळावर टेकलो. सरांनी अलगद रोप सोडून मला उतरवलं होतं!!! उतरताना नारायण काकांनीही मदत केली. त्यांनी मलाच नाही, तर येणा-या सर्वांना मदत केली आणि जिथे आवश्यक वाटलं तिथे आपल्या हाताचा होल्ड उतरणा-याच्या पायासाठी दिला!
एकदाचे पाय थोड्या सपाट भागावर टेकवले; रोप सोडवला आणि हुश्श केलं!!! धोक्याच्या सर्वाधिक पातळीचा पहिला टप्पा पार झाला होता....... पण अजूनही आयुष्य होल्डवर ठेवलं असल्यासारखं वाटत होतं!! जरावेळ बसावसं वाटलं; पण सावली दरीलगत होती... म्हणून कातळाजवळ उभा राहिलो.... (:
वर चढताना मला उत्तेजन देणा-या व माझ्यामागोमाग उतरणा-या ताईंनाही तीच अडचण झाली व त्यांनाही शेवटी रोप लावूनच उतरावं लागलं!! We two were the only dignitaries who were granted the rope- facility!! हळुहळु सर्व जण उतरले. पण आमच्या इतकं अवघड कोणालाच गेलं नाही. थांबत थांबतच येत होते; पण त्यांना होल्ड मिळत होते...... काही वेळ तिथे थांबलो.....
पण अजून धोका संपला नव्हता. पहिला धोका मुख्य गुहेच्या आधीच होता..... मुख्य गुहेच्या आधी पाण्याच्या टाक्याजवळून जावं लागणार होतं. आणि तिथे तर एक्स्पोजर सर्वांत जास्त होतं. होल्डही काही नव्हता. उजव्या बाजूला असलेल्या कातळाला हात लावून हातामुळे होणा-या घर्षणावर शरीर होल्ड करून जायचं होतं! त्या वेळी नारायण काकांची मदत घेतली. ते पुढे निघाले व त्यांनी मला रस्ता दाखवला. मुख्य म्हणजे मनाने सोबत दिली, होल्ड केलं! त्यामुळे कसं तरी तोही पट्टा ओलांडला..... दरीजवळून पुढे जाऊन मुख्य गुहेत पोचलो!!!! जय गोरक्षनाथ!!!! असं म्हणावसं वाटलं..... धोका संपला नव्हता, पण कमी झाला होता आणि थोडा वेळ सुरक्षित प्रकारे थांबता येणार होतं!!!!
जमीन व रस्ता दूरवर दिसत होते. जमीनीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला होता..... ह्या वेळेस लदाखची आठवण झाली. तिथल्या अतिउंचीवरच्या भागामध्ये फिरताना बर्फ व सर्व नजारा पाहून विलक्षण आनंद झाला होता. अप्रतिम निसर्ग होता.... पण... पण नंतर बर्फाने अशी थंडी अंगात भिनवली, की बस्स....... “हा बर्फ, हा नजारा सर्व खूप सुंदर आहे, ठीक आहे, पण आपल्याला आपली जमीनच बरी” असं वाटलं होतं!! इथेही तशीच परिस्थिती होती; किंबहुना जास्त बिकट परिस्थिती होती...... इथे खाली आपण कधी काळी उतरू शकू, ही खात्रीच वाटत नव्हती. गुहेपर्यंत येऊनसुद्धा!!
मच्छिंद्रगड सुळक्याच्या पार्श्वभूमीवर खालील पठार...... एका ठिकाणचा वणवा दिसतो.
गोरखगडावरची तीन माकडं!!!
गूंफेमधील भिंत
गोरक्षनाथ!! नवनाथ संप्रदायाच्या संस्थापकांपैकी एक. त्यांचं हे साधनास्थल! गोरक्षनाथांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळालं की ते १३ व्या शतकाच्या कालखंडातील महान शैव पंथी साधक होते आणि त्यांचे शिष्य तत्कालीन नेपाळ, उत्तर प्रदेशपासून अफगणिस्तानपर्यंत पसरलेले होते! आजही ह्या ठिकाणी त्यांच्या शिष्यांचे पुरावे सापडतात. नेपाळमधील गूरखा लोक किंवा दार्जिलिंगजवळचा गूरखालँड भाग मागणारे लोक त्यांचेच शिष्य असल्यासारखे आहेत आणि गोरखपूर हा जिल्हासुद्धा त्यांच्याच नावाने झालेला आहे, ही माहिती मिळाली!! असे हे गोरक्षनाथ इथे कित्येक शतकांपूर्वी राहिले होते! ह्या इथे!!! इतक्या अशक्य जागी!! थरारक! त्या काळी देशभर इतकं फिरणं, अशा दुर्गम जागी येऊन साधना करणं किती महान असेल!!! आणि कदाचित गुहा, दगडी पाय-या व ब्राह्मी लिपीतील शिल्पं! ह्या दगडी पाय-या किंवा खाचा बनवणा-यास कोणी होल्ड केलं असेल? किंवा सुळक्याच्या माथ्यावर मंदीर बांधताना सामान कसं नेलं असेल? अद्भुत... अचाट..... विराट........
गोरखगडाबद्दल फार माहिती मिळत नाही. शहाजी राजांच्या कारकिर्दीत ह्या गडाला विशेष महत्त्व होतं, असं म्हणतात. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे जर डेहरे खरोखर मोठं (त्या काळच्या मानाने कित्येक लाख लोकसंख्या म्हणजे फार मोठं असलं पाहिजे) गाव असेल व ते गाव कोकणात जाण्याचा उंबरठा असेल, तर निश्चितच हे स्थान व हा किल्ला धोरणात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. गोरखगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेलगत आहे व किंचित विलग आहे. त्यामुळे टेहळणीसाठीही त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. तसंच कल्याण- नगर महामार्ग (जो आम्ही मूरबाडच्या पुढे सोडून आत आलो) सुद्धा इथून तोफांच्या टप्प्यात असावा. आजचे महामार्ग हे ब-याच प्रमाणात प्राचीन मार्ग व वाटांवरूनच घडलेले असतात. हे लक्षात घेतलं आणि कल्याण बंदर होतं हे लक्षात घेतलं, तर ह्या गडाचं महत्त्व कळू शकतं....
...सर्व मंडळी सुळक्याच्या शिखरावरून गुहेत आल्यावर जेवणाचा कार्यक्रम झाला. मर्कटचेष्टा चालूच होत्या. पण ते त्रास देत नव्हते. जेवण झाल्यावर काही उत्साही ट्रेकर अगदी कड्यावर रेलून किंवा झोपून फोटो काढत होते!!! लीडर लोकांनी गुहेवर कातळात लावलेले काही अँकर दाखवले. इथून सरळ माथ्यावर पूर्वी रॉक क्लाइंबिंग करून जात असत. म्हणजे अँकरमध्ये रोप लावून रोपला लटकून वर चढायचं, असं. पण आता ते दगड नाजुक झाले आहेत आणि सडले आहेत; त्यामुळे तिथून कोणी चढत नाही, अशी माहिती मिळाली. रवी सरांनी रॉक क्लाइंबिंगबद्दलही माहिती दिली. आता दोराला धरून चढण्याऐवजी पोटाला दोर (रोप) बांधून चढतात. कारण जर दोराला धरून अनेक जण चढत असतील; तर त्यात धोका असतो. शिवाय दोर हातामधून सुटण्याची शक्यता असते. म्हणून पोटाला दोर बांधून मग हात आणि पाय वापरून चढण्याची जास्त सुरक्षित पद्धत वापरली जाते, असं ते म्हणाले.... गुहेसमोर परत एकदा ग्रूप फोटोसेशन झालं. गुहेच्या आसपास लोकांनी टाकून दिलेला कचरा सर्वांनी मिळून एका पोत्यात भरला. मोबाईल आणि मुक्त असलेल्या काही जणांनी गोड्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून आणलं.
मुख्य गुहेच्या वरून रॉक क्लाइंबिंगचा जुना पॅच. काही अँकर्स अडकवलेले दिसतात.
परतीच्या मार्गावर जाताना खूप हलकं वाटत होतं.... कारण पुढे धोका होता; पण तो वरच्या मानाने काहीच नव्हता. आणि प्राणांतिक नव्हता..... त्यामुळे आयुष्य होल्डवर ठेवण्याची गरज नव्हती...... परत एकदा रवी सरांच्या सोबतच उतरण्यास सुरुवात केली. आता त्यांनीही त्यांचा पेशन्स होल्डवर ठेवला नव्हता; त्यामुळे तेही मला कडक मास्तराप्रमाणे (इथे मी मदत करणार नाही, तूच बघ) सूचना देत होते..... पुढे उतरताना अडचण आली नाही. फक्त काही ठिकाणी हात- पाय कुठे ठेवायचे ते विचारावं लागलं. आणि कातळ भयानक तापला होता! हात होल्ड होतच नव्हता!!! वळताना थोडं अडकलो आणि मग उतरलो. नंतर पुढे पाय-याच होत्या.
सर्वांत आधी नारायणकाका पायवाट संपत होती, तिथे जाऊन पोचले होते. लवकरच तिथे जाऊन पोचलो आणि पायवाटेच्या स्वरूपात धरणी माय भेटल्याचा आनंद झाला!!! पुढे मग नारायणकाकांसोबत सरसर उतरण्यास सुरुवात केली. जमिनीची व सुरक्षिततेची ओढ लागली होती...... वाटेमध्ये अडचण फक्त तीव्र उताराची व थकून जाण्याची होती. पण त्या withhold करत जाऊ शकत होतो! शिवाय आता धरणी मायसुद्धा विरुद्ध नसून सोबत होती!
उतरतानाही तीव्र उतार होता, तिथे अडचण आलीच. कारण तिथेही होल्ड मिळत नव्हता. एकदम घसरायला होत होतं आणि सलग तीव्र उतार असल्यामुळे घसरून चालणार नव्हतं. इथेही लीडरनी सांगितलेली सूचना आठवली. पाय तिरपे करून टाचेवर वजन ठेवून चालायचं. पण त्यांच्या इतर सूचनांप्रमाणे ही सूचनाही पाळता येत नव्हती! (: त्यामुळे कसं तरी, जमेल तसं गती कमी ठेवण्याचा प्रयत्न करत उतरत होतो. वाटेतले झाडं- झुडुपं, झाडाचे खोड आणि मुळं ह्यांचा आधार घेतला. ग्रिप असलेले बूटसुद्धा घसरत होते. त्यामुळे अनेक वेळेस तर सरळ जाऊन झाडांना पकडावं लागलं; कुठे कुठे घसरून उतरावं लागलं.... गती कमी करण्यासाठी शरीराच्या घर्षणाचा वापर करण्याची ही पद्धत क्रिकेटपटू बॉल सीमारेषेच्या आत होल्ड करताना वापरतात!
उतरतानाही थकायला होत होतं. कारण आता दुपारचे साडेतीन वाजले होते! थोडा वेळाने थोडं थांबून व थोडं थोडं पाणी पिऊन पुढे उतरत होतो. नारायणकाकांनी सांगितलं की हृदयाचे ठोके सामान्य होईपर्यंत थांबावं ते सामान्य झाल्यावर थांबू नये; नाही तर परत हृदयावर ताण पडतो.
जमिनीची सुरक्षितता!
अजूनही जमीन व रस्ता दूर दिसत होता. सभोवती झाडी व नजारा. पण दुपारच्या उष्ण झळा होत्या.... मी आणि काका आम्ही दोघंच पुढे होतो. बाकी लोक बरेच मागे राहिले होते. जमीन कधी एकदा येते, असं झालं होतं. हळु हळु उतार कमी झाला; पायवाट सोपी होत गेली आणि एकदाचे गोरक्षनाथांच्या मंदीरात येऊन पोचलो!!!! समोरच रस्ता दिसत होता. त्यावरून काही वाहनं जाताना दिसत होती....................................................
मंदीरात थोडा वेळ टेकलो. तिथेच पाणी मिळालं. हळुहळु धापा टाकत इतरही जण आले. बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मग खाली गावात पोचलो. उपसरपंच हमीद पटेलांच्या उंबरठ्यावर थोडा वेळ आराम केला. तोपर्यंत इतर सदस्यांना उशीर होण्याचं कारण कळालं. एका मुलीला उन्हाचा त्रास झाला होता व ताप आला होता. त्यामुळे तिला थांबत थांबत यावं लागलं. नंतर ती मंदीरात आल्याचं कळाल्यावर मुकेश सर तिच्यासाठी गावातून सरबत घेऊन मंदीरात गेले...... गावातून गोरखगड आणि मच्छिंद्रगड किती सुंदर दिसत होते............. :)
अशी ही भ्रमंती ग्रूपसोबतची गोरखगडगाथा!!! भ्रमंती ग्रूपचं काम फारच सुंदर आणि नीटनेटकं वाटलं. भ्रमंती हा काही वर्षांपूर्वी नोंदणी झालेला न्यास (ट्रस्ट) आहे. आणि ही एक विना- नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्यांचा मुख्य भर रॉक क्लाइंबिंगवर आहे. ट्रेकिंग ते कमीच करतात. पण मुख्य म्हणजे त्यांनी त्यांचं धोरण ना- नफा ठेवलं आहे. ते ज्या मोहिमा, ट्रेक्स आयोजित करतात, त्याचा ते अगदी थोडा खर्च घेतात. म्हणजे संस्थेसाठी म्हणून नाममात्र पन्नास रूपये शुल्क; बाकी सर्व प्रवास, खाणं- फिरणं ह्याचा होईल तितका खर्च. जाणीवपूर्वक त्यांनी आर्थिक नफ्यापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. कारण एकदा आर्थिक गोष्ट सुरू झाली, की इतर प्राथमिकता बदलतात आणि फिरण्यातली, एडवेंचरमधली मजा जाते, असं त्यांना वाटतं. संस्थेची ही भुमिका संपूर्ण ट्रेकभर जाणवत होती. लीडर्स अनुभवी होते. त्यांनी सर्वांना खूप मदत केली आणि मी त्यांच्या मदतीचा सर्वाधिक लाभ घेतला..... एक स्टेक- होल्डर म्हणून! फक्त नम्रपणे त्यांना एक सूचना केली, की गोरखगड ट्रेक ‘सोप्या’ वर्गवारीत नसावा! तसंच कितीही म्हंटलं तरी ह्या ट्रेकमध्ये अनेक टेक्निकल गोष्टी होत्या. उदा., सॅक पाठीला चिकटून राहील अशी बांधणं (ज्यामुळे बॅलन्स करताना त्रास होणार नाही), जीन्सची पँट न वापरणं, एक दिवस आधीपासून जास्तीत जास्त पाणी पिणं इत्यादी. शिवाय असंही वाटलं की कुठे तरी सर्व येणारे सोबती ट्रेकिंगचा/ क्लाइंबिंगचा अनुभव असलेलेच असतील, असंही गृहित धरलं गेलं असावं. ते काहीही असलं तरी लीडर्स व भ्रमंती सदस्यांनी हा ट्रेक यशस्वीपणे संभाळला आणि सर्वांना होल्ड करून तो यशस्वीपणे पूर्ण केला!! त्यांचं मन:पूर्वक अभिवादन!!
ह्या अनुभवातून आणखी काही गोष्टी जाणवतात. ट्रेक करताना दमछाक होणे, मुद्दाम आराम करावा लागणे आणि आल्यावरही एक दिवस थोडं अस्वस्थ वाटणे व हातपाय दुखणे ह्या गोष्टी काय दर्शवतात? त्याच वेळेस नारायणकाका हे ज्येष्ठ तरुण संपूर्ण ट्रेक सहजगत्या पूर्ण करतात. ह्यातून काय धडा घ्यायचा? आरोग्य, फिटनेस आणि स्टॅमिनाबद्दल निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. चुकीच्या लावलेल्या सवयी मोडण्याची गरज आहे. चांगल्या सवयींना व पद्धतींना भरपूर एक्स्पोजर देण्याची गरज आहे!! हा ट्रेक जरी अवघड आणि ‘धोकादायक’ गेला असला, तरी आणखी काही सोप्या ट्रेक्सचं एक्स्पोजर मिळाल्यास असा ट्रेकसुद्धा होल्ड करता येऊ शकेल............

सुपर्ब झालाय ब्लॉग.सर्व प्रवास वर्णन ब्लॉगमधील मस्त. जे घडले जे अनुभवले ते अगदी सरळ आणि महत्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे लिहले आहे. चढताना आणि उतरताना काय वाट लागली असेल ते वाचताना जाणवत होते. तरी देखील हिंमत करुन 'लक्ष्य'पूर्ण केलेस ह्याबद्दल विशेष अभिनंदन( हे मला जमले असते असे वाटत नाही. मी सेफ गेम खेळला असता, ठराविक अंतरानंतर निवृत्ती घेतली असती )
ReplyDeleteरॉक क्लाईमिंगबाबत सांगितलेली माहितीही उपयोगी आहे.फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर आलेत. हिंमत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले....... हे आवडलेय आणि सचिन व द्रविडववरचे तर बेस्टच आहे.
'डर के आगे जीत है' हे शब्द जाहिरातीमध्ये बघायला छान वाटतात. पण ते तू प्रत्यक्ष अनुभवलेस... छान वाटले.
Broooooo superb!!!!!
ReplyDeleteRegards,
Neha. N. Phatak.
एकदम चाबुक लेख... मस्त...!!!
ReplyDeleteभारी झालाय सर हा भाग😀
ReplyDeleteधन्यवाद!! :)
Deleteअतिशय सुरेख वर्णन! वाचताना देखील अंगावर शहारे येतात.लेखन अतिशय आवडले हे वेगळे सांगायला नको.
ReplyDelete