Saturday, May 19, 2012

काळ्या मातीत मातीत....


रणरणता मे महिना. भाजून काढणारं ऊन. अस्मानी आणि सुलतानी दुष्काळ. मागास मराठवाड्यातील एक कोपरा. त्यामधील शेतीची एक झलक.



वखरणीनंतरची रखरखीत जमीन


जमिनीलाच गेला तडा आणि त्यात कापूस उघडा


इतका तरी हिरवा किती प्रदेश असेल?


पशुधन दिसत आहे, चक्क!!!

शेती करता करता आयुष्याची इथे झाली माती
सत्त्व गेले, कस गेला, पीक गेले, गाय बैल गेले, फक्त उरली भिती
पीक आले कर्जाचे, कृत्रिम खताचे आणि बियाणाचे जगण्याची संपली शाश्वती

जगाचा पोषणकर्ता आज रानोमाळ फिरतो
देणा-या हातांची झोळी करून दोन घास मिळवतो
शेत, संसार, जगण्याचा पसारा मोडूनही राब राब राबतो

उत्पन्न गेले, बियाणे संपले, जमीन गेली आणि पाणीही गेले.
परंतु नाही गेली हिंमत, नाही संपली जिद्द आणि नाही सोडला बाणा
सर्व खचले तरी अजून शेतात करतोय पेरणी

उगवेल तो दिवस आणि हवे ते पीक
जेव्हा हटेल दिव्यावरची काजळी
जेव्हा मानवाची जागा निसर्गाच्या मूळाशी असेल

सृजनशीलतीने आणि नावीन्याने देऊ शेतीला उद्योगाचा आधार
झटकू आळस आणि करू अस्सल आणि सकस शेतीचा स्वीकार
अंध:काराच्या ह्या काळरात्री मिळून सारे करू एकच निर्धार


दुधना नदी. लोअर दुधना धरणाचं पाणी असल्यामुळे हा भाग थोडा तरी हिरवा आणि पाणी नेण्यासाठी योग्य दिसतो.....

आजच्या शेतीबद्दल असं जाणवतं की शेती खूप बदललेली आहे. पारंपारिक शहाणपण आणि शाश्वत तंत्रज्ञानाची व कार्यपद्धतीची जागा आज उथळ कृत्रिम खतं, कंपन्यांचं बियाणं आणि सरकारी हस्तक्षेपाने घेतली आहे. सरकारी योजनांच्या आणि विविध माध्यमातून मिळणा-या कर्ज पुरवठ्यामुळे कदाचित शेतक-यांची देण्याची सवय जाऊन जास्त घेण्याची सवय लागली असावी. आज जुन्या अस्सल शेतीची, शुद्ध शेतीची जागा ब-याच प्रमाणात शाश्वत नसलेल्या घटकांनी घेतलेली आहे. त्यामुळे जुन्या शेतीत ज्या ब-याच गोष्टी निसर्गत: मिळायच्या (खत, बियाणं, नैसर्गिक किटकनाशकं जमिनीचा कस, काही प्रमाणात गोधन) त्या सर्व आता जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिमरित्या कराव्या लागतात व त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. जवळजवळ प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागत आहे. शिवाय अपर्याप्त शिक्षण, बाहेरच्या जगाचा प्रभाव ह्यामुळे शेतक-यांच्या नवीन पिढीत मेहनतीचं करण्याच्या ऐवजी सहजपणे मिळणारं घ्यायची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसते. त्यामुळे शेतीतील कस आणि जोम घसरला. बदलत्या काळात जुन्या पद्धतीतील चांगल्या घटकांना जोडधंद्याची व उद्योगाची जोडही देणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतीकडे आणि शेतक-यांकडे समस्यांचा डोंगर म्हणून न बघता सकारात्मक, स्वयंपूर्ण आणि क्रियाशील दृष्टीने बघितलं पाहिजे.

एका असाधारण जपानी शेतक-याचं ‘नैसर्गिक शेती’बद्दल पुस्तक वाचण्यात आलं. त्यातलं तत्त्व- निसर्गच सर्व काम करत असतो. आपलं काम त्याच्या प्रक्रियेत खारीचा वाटा उचलणं. योग्य वेळी बी टाकणं, त्याची काळजी घेणं इतकंच. ते फार शुद्ध प्रकारे शेती करतात. ‘अनावश्यक कष्ट न करता नैसर्गिक शेती’ असं त्यांचं तत्त्व आहे. अर्थात नैसर्गिक अस्सलपणा असलेल्या व प्रदूषण, कृत्रिम बियाणांचा खतांचा- किटकनाशकांचा वापर नसलेल्या ठिकाणी ते शक्य आहे. कमीत कमी साधनांसह आणि कृत्रिम पद्धतीचा अवलंब न करता तितकीच उत्पादक व शाश्वत शेती करण्याच्या पद्धतीची माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.


मूळ जपानी पुस्तकाचा 'द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन' ह्या इंग्लिश अनुवादाचा हा मराठी अनुवाद

थोडक्यात दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निव्वळ समस्या आहेत असं नाही. समस्या आहेतच, पण त्यातही अनेक छुप्या स्ट्रेंथस आहेत. त्यांचे उपायही आहेत आणि म्हणून आपण संतुलित दृष्टीकोन ठेवला पाहिजे. शेती म्हणजे समस्या आणि समस्याच असा विचार न करता त्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्यावर सर्वात चांगला डोळ्यांपुढे येणारा उपाय म्हणजे जिथे जिथे शक्य असेल, तिथे शक्य त्या प्रमाणात शून्यातून एककडे गेलं पाहिजे. नवीन काही निर्माण केलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण इथे बघता येईल.







ह्या काडातून का नाही क्रांती करता येणार?

1 comment:

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!