Thursday, March 22, 2012

वसईचा किल्ला

अर्नाळा किल्ला पाहून झाल्यानंतर अर्थातच नजरेपुढे येणारा किल्ला म्हणजे वसईचा किल्ला! हा एक भुईकोट व किना-यावरचा किल्ला आहे. किल्ल्याचा घेर अत्यंत विस्तृत असून मोठी वस्ती व परिसर किल्ल्याने व्यापलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी वसई स्टेशनपासून सतत बस चालू असतात.




इतिहासाचे मूक साक्षीदार......... आणि कर्तेसुद्धा......



वसई! वसईचा किल्ला! वसईचा किल्ला आठवला की चिमाजी अप्पा आठवतात आणि त्यांचे बोलही आठवतात- “किल्ला ताब्यात येत नसेल, तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा!” १७३९ मध्ये तीन वर्षं पोर्तुगीजांशी लढल्यानंतर मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला जिंकला... तत्कालीन मराठेशाहीतील ती एक मोठी मोहीम होती..... आज “त्या” दिवसांची साक्ष म्हणून आपल्यासाठी किल्ल्यावरील वास्तू व अवशेष आहेत.......

‘किल्ला बंदर’ बसचा शेवटचा स्टॉप किल्ल्याच्या अंतर्भागातच आहे. आपण किल्ल्यात आलो, हे नीट कळू नये, इतकी मोठी वस्ती किल्ल्यात आहे. बरीचशी वस्ती पारंपारिकच आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र असला, तरी इथून प्रत्यक्ष बीचवर जाता येत नाही. पण किल्ल्यामधून धक्क्यावर जाता येतं. पण तिथे बघण्यासारखं विशेष नाही.

स्टॉपवर उतरून दाटीवाटीच्या वस्तीतून विचारत विचारत धक्क्यावर पोचलो. वाटेतल्या लोकांच्या चेह-यावर “आमच्या विश्वात हा कोण आला?” असे विचित्र भाव जाणवत होते. धक्क्यावर फार काही नसल्यामुळे तिथून परत स्टॉपवर आलो आणि विरुद्ध दिशेने पुढे गेलो. तिथून मग किल्ल्याचं “किल्लेपण” जाणवायला सुरुवात झाली. भव्य, विशाल वास्तू अजूनही काही प्रमाणात प्रेक्षणीय आहेत. ढासळला असला तरीही भव्यता टिकून आहे.








रचनेचा रेखीवपणा जाणवतो.......

किल्ला फिरत फिरत पुढे जात होतो (म्हणजे स्टॉपपासून मागे). शांत आणि बराचसा निर्जन परिसर. आणि त्यामानाने वर्जित क्षेत्र असं घोषित केलेलं नसल्यामुळे मुक्त परिसर. एका एका वास्तूमध्ये फिरून पाहत होतो. किल्ल्याची भव्यता ह्या वास्तुंवरून येऊ शकते.


किल्ल्याची भव्यता...........


किल्ला व्यवस्थित जतन केल्यासारखा दिसतो.






ह्या मूर्त्या वेगळ्याच वाटतात ना?




पोर्तुगीज प्रभाव!!!

पक्क्या रस्त्यावरून काही संध्याकाळचे फिरायला आलेले लोक दिसत होते. परिसर शांत व प्रेक्षणीय आहे. किल्ल्याच्या आतमधील वास्तू, झाडी आणि दूरवर दिसणारा कोट.... हा रस्ता पुढे पुढे जात अजून एका धक्क्यापाशी पोचतो. एकदा एका संध्याकाळी ह्या धक्क्यावर आलो होतो; पण हा धक्का किल्ल्याच्या इतका आत (शेवटी) आहे, हे माहिती नव्हतं! धक्क्यामध्ये ब-यापैकी बोटी लावलेल्या होत्या. वीकेंड नसल्यामुळे त्या बोटी लोकांना घेऊन जात नव्हत्या. समोर वसईची खाडी दिसत होती व त्या पलीकडे भाईंदर आणि उत्तन दिसत होतं! तसंच डावीकडे दूरवर ट्रेनचा पांढरा ब्रिज आणि त्यावरून जाणा-या ट्रेन्स मुंग्यांसारख्या दिसत होत्या... तसंच त्याहून डावीकडे अंधुक असा कामणदुर्ग दिसत होता. कामणदुर्ग तुंगारेश्वर रांगेतला एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि वसईने लोकलने नायगावच्या दिशेने जाताना डाव्या हाताला सहजगत्या त्याचं दर्शन होतं.


खाडी, तर आणि पल्याड भाईंदर- उत्तन


पांढरा पट्टा ट्रेनचा ब्रिज आहे.





































बीच किल्ल्याला लागून नाही. त्यामुळे खुला समुद्र व खुल्या समुद्रात सूर्यास्त पाहता आला नाही. पण हा धक्का शांत व स्वच्छ होता, त्यामुळे तिथे थोडा वेळ थांबता आलं...... पाण्यात उभं राहिल्यावर खाली अगदी लहान मासे फिरताना दिसत होते.........

धक्क्यावर थांबून परत आलो. येताना एक वाट डावीकडे वळलेली दिसली. तिथे परत किल्ल्याच्या वास्तु दिसत होत्या. काही जुन्या तोफा आणि अन्य जुनी सामग्री दिसत होती......... इथे किल्ल्याचा एक दरवाजा (चोरदरवाजा असावा) आहे. त्याच्या द्वारावर वैशिष्ट्यपूर्ण रचना होती. अर्थातच तो दरवाजा भक्कम होता. इथून पुढे बरंच आत जाता येतं. किल्ल्यातील विविध वास्तु दिसतात. काही अजूनही प्रेक्षणीय आहेत.


किल्ल्यामधील एकूण बांधकाम अवाढव्य असावं............


इतका काळ उलटून गेला असला तरीही मूळ पाया टिकून आहे.........


खडा स्तंभ





आकर्षक प्रवेशद्वार व कमान


तोफा?


दुर्गदैवत


मजबूत दरवाजा........... सावधान...... आत याल तर.....


हा रस्ता पुढे सरळ जाऊन आधी फिरलो होतो त्या रस्त्याला मिळत होत्या. किल्ल्यात शांतता असली तरी मधून मधून काही लोक फिरत होते. काही मुलं किल्ल्यात क्रिकेट खेळत होती. त्या भागात थोडा वेळ फिरून व थोडा “त्या भागाचा अनुभव” घेण्याचा प्रयत्न करून परत धक्क्याजवळ आलो व तिथून मागे वळलो. हा परिसर प्रसन्न आहे. सकाळी फिरायला येण्यासाठी आदर्श आहे. किल्ल्याचा घेर कित्येक किलोमीटर मोठा आहे. दूरवर मोकळ्या भागात क्रिकेट चालू होतं.


भारत: गल्ली तिथे क्रिकेट







चिमाजी अप्पा.........................

परत आल्यावर स्टॉपकडे न वळता समोर चिमाजी अप्पा स्मारकापाशी गेलो. हे स्मारक योग्य स्थितीमध्ये ठेवलं आहे. बघण्यासारखं आहे. चिमाजी अप्पा! अपराजित बाजीराव पेशव्यांचे बंधू आणि मराठ्यांचे मोठे सेनापती! त्या काळामध्ये मराठ्यांनी किती पराक्रम केले होते, ह्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही.... आज वेगवेगळ्या विचारधारांच्या, प्रतिकांच्या, झेंड्यांच्या, नेत्यांच्या नावांखाली स्वराज्याचा व गौरवास्पद इतिहासाचा पूर्ण कडेलोट झाला आहे! इतका संकुचित आणि उथळ विचार!!! भयानक स्थिती आहे......

ह्या संदर्भात एक आठवण. नुकतेच वाचण्यात आले की काही मराठी लोक मध्य प्रदेशामध्ये रावेरखेड इथे प्रतापी बाजीराव पेशव्यांच्या नदीच्या बुडीत क्षेत्रात जाण्याचा धोका निर्माण झालेल्या समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. तिथे "पेशवा सरकार" ह्या शब्दांमधून स्थानिक लोकांचा बाजीराव पेशव्यांप्रती असलेला आदर त्यांना दिसला. महाराष्ट्रात आज बाजीराव पेशवा म्हंटलं तर लोक काय बोलतील.... पण मध्य प्रदेशाच्या आडवळणाच्या गावात हा आदर...... इतका वैभवशाली आणि कर्तृत्वसंपन्न मराठी इतिहास असूनही त्याला आज एक लेबल, एक चिन्ह, एक विचार, एक बाजू आणि एक जात ह्यांमध्ये मर्यादित करून बघण्याची डबक्याची मानसिकताच जास्त दिसते......... ह्या गदारोळात व अशांततेत “काही शाश्वत होतं आणि आजही ते आहे,” हा अनुभव आपल्याला अशा ऐतिहासिक ठिकाणीच येऊ शकतो....






चिमाजी अप्पा स्मारक बघून झाल्यानंतर सरळ पुढे फिरत जावंसं वाटलं. म्हणून त्या ऐतिहासिक घडामोडींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत चालत पुढे गेलो. हा सर्व परिसर शांत व प्रसन्न होता. रात्र झाली असली तरी वर्दळ होती. दोन किलोमीटर चालल्यावर मग वसई गावचा मुख्य बस स्टँड आला व तिथून परतीची वाट.........










आगामी आकर्षण: गोरखगड...........

1 comment:

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!