Showing posts with label Tibet. Show all posts
Showing posts with label Tibet. Show all posts

Sunday, May 27, 2012

लोब्संग राम्पा: एक महागाथा.........

स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी स्वत:चं वर्णन “पाश्चात्य जगावर बाँबप्रमाणे कोसळलो,” असं केलं आहे. अगदी त्या धर्तीवर “पाश्चात्य आणि सर्व जगावर कोसळलेला एक महामानव,” असं लोब्संग राम्पा ह्यांचं वर्णन करता येईल. हा एक खराखुरा महापुरुष- श्रेष्ठ लामा आणि तिबेटी वीरपुरुष- गेल्या शतकात होऊन गेला. दुस-या महायुद्धाच्या काळखंडात त्याने असामान्य संघर्ष केला.... त्याचं एक पुस्तक हातात घेतलं. कधी पूर्ण झालं कळलंच नाही. मग दुसरं. मग तिसरं. त्या तीन पुस्तकांचं रसग्रहण आणि लोब्संग राम्पा कोण होता, ह्याचं आकलन करण्याचा हा एक प्रयत्न....



द थर्ड आय

द थर्ड आय म्हणजेच मराठीत भाषांतरित झालेलं ‘तृतीय नेत्र’ हे लोब्संग राम्पा (१९११- १९८१) ह्यांचं पहिलं पुस्तक. पुस्तकाची सुरुवात चार वर्षाच्या लोब्संगपासून होते. चार वर्षांचा लोब्संग घोड्यावर बसायला शिकत असतो आणि त्सूबाबा ह्या शिक्षकाकडून स्वसंरक्षण-कला शिकत असतो. तिबेटी प्रथेप्रमाणे सातव्या वाढदिवशी लोब्संगचं भविष्य वर्तवलं जातं. त्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तो महान पद प्राप्त करणार असतो; परंतु त्याचं आयुष्य संघर्षमय असतं आणि त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असतं. त्यानंतर लगेचच तो ल्हासा जवळच्या चाकपोरी आश्रमात दाखल होतो. तिबेटमधील उच्च दर्जाच्या निवडक आश्रमांपैकी हा एक आश्रम. आश्रमात प्रवेश घेण्यापासून त्याची खडतर परीक्षा सुरू होते. तीन दिवस त्याला आश्रमाच्या बाहेर एका स्थितीत अजिबात हालचाल न करता बसावं लागतं. ही आश्रमाची चाचणी असते! आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो. मग हळुहळु आश्रमाच्या पद्धती, गुरूजन, सहविद्यार्थी ह्यांची त्याला ओळख होते. त्याचे गुरू मिंग्यार डोंडूप लामाश्री त्याला घडवण्यास सुरुवात करतात. आधीपासून त्याची आध्यात्मिक उन्नती झालेली असल्यामुळे व ह्या जन्मात एका मोठ्या ध्येयाची पूर्तता हे त्याचं दायित्व असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा खडतर प्रशिक्षण मिळतं. आश्रमातल्या कठोर वातावरणामध्ये तो पारंपारिक विद्यार्जन करतो.

एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची योग्यता एका पातळीवर पोचते. भावी जीवनातील कार्य पूर्ण करण्यासाठी डोंडूप लामाश्री व अन्य गुरूजन मिळून त्याच्या कपाळावर विशेष अशी शस्त्रक्रिया करतात व त्याचा तृतीय नेत्र जागृत करतात. तिबेटी मान्यतेनुसार प्राचीन काळी मानवामध्ये आज असाधारण वाटणा-या अनेक शक्ती होत्या आणि प्रत्येकाजवळ तिसरा डोळाही होता; पण काळाच्या ओघात जसं मानवाचं स्खलन झालं, तशा ह्या शक्ती संपत गेल्या. फक्त काही पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच त्या शक्तींसह जन्म घेऊ शकतात. आश्रमात लोब्संगचे जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच त्याच्या आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करण्यात येतं आणि म्हणूनच त्याचा तिसरा डोळा सुरू केला जातो. कपाळावरचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस त्याला आराम करावा लागतो. शस्त्रक्रियेचं वर्णन, इतर संदर्भ आणि तपशील (उदा., डोळे बंद असल्यामुळे त्याला अंधा-या खोलीत ठेवलं, काही दिवसानंतर एक मंद पणती लावली, रोज तिची वात थोडी थोडी मोठी करत नेली व हळुहळु डोळ्यांना उजेडाची सवय केली) मूळातून वाचण्यासारखे आणि अत्यंत विस्मयजनक आहेत. तिस-या डोळ्यामुळे त्याला माणसांचे विचार व शारीरिक स्थिती उत्तम प्रकारे दिसते. तिबेटी आध्यात्मात सांगितलेला ऑरा- वलय त्याला दिसतात. प्रत्येक माणसाच्या वलयाच्या रंगावरून आणि स्थितीवरून त्याची मन:स्थिती, विचार, शारीरिक स्थिती ह्या गोष्टी त्याला समजू लागतात. ह्या सर्व वर्णात तिबेटी आध्यात्मिक प्रगती, तिबेटी संस्कृती ह्यावर प्रकाश टाकला गेला आहे. आणि अनेक गोष्टी चमत्कारिक व विस्मयजनक असल्या तरी त्या सुसंबद्ध आहेत.

चाकपोरी आश्रमात डोंडूप लामाश्रींच्या हातांखाली लोब्संगचं प्रशिक्षण पुढेही सुरू राहतं. त्याला लामापद प्राप्त होतं. तिबेटी वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया आदिमध्ये तो पारंगत होतो. आश्रमामध्ये दर वर्षी दुर्मिळ वनौषधींसाठीच्या सहलीचा एक कार्यक्रम असतो. त्यात तो भाग घेतो. दूरवरच्या आणि ल्हासापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात जाऊन तो वनौषधी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होतो. तिबेटमधील पतंग उडवण्याच्या पद्धतीचंही वर्णन छान आहे. हे पतंग म्हणजे ग्लायडरसारखे मोठे असतात. त्यातून उंच डोंगरावर काही लोक थोडा वेळ हवाई भ्रमण करू शकतात. तिबेटी गुरूकुल पद्धती, आध्यात्मिक परंपरा, जीवनपद्धती ह्यांचं वर्णन सुंदर आहे.

ल्हासामधील तेरावे दलाई लामा डोंडूप लामाश्रींचे मित्र असतात आणि लोब्संगवरही त्यांचा जीव असतो. लोब्संगच्या तिस-या नेत्राचं काम इथे सुरू होतं. दलाई लामांना भेटायला विविध लोक- राजकीय पाहुणे येत असतात. ह्या पाहुण्यांचे उद्देश नक्की कसे आहेत, त्यांचे अंत:स्थ विचार काय आहेत, हे त्यांना लोब्संगकडून काढून घ्यायचं असतं. दलाई लामा लोब्संगवर प्रसन्न होतात. ल्हासाच्या पोताला आश्रमाचं वर्णन दिलं आहे. एकदा डोंडूप लामाश्री व लोब्संग आश्रमाच्या सर्वसामान्यांना प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त उच्च लामांना खुल्या असलेल्या जमिनीखालच्या भागात जातात. तिबेटी परंपरेतील वैभवशाली वास्तु, पुरातन ग्रंथ, आध्यात्मिक साधनं इत्यादि तिथे असतात. आणखी गूढ अशाही ब-याच गोष्टी असतात.

त्यानंतर वनौषधी आणण्यासाठी तिबेटच्या एका अतिदुर्गम प्रदेशातील थरारक मोहिमेचं वर्णन दिलं आहे. तिबेटच्या उत्तर- पश्चिम भागामधील चांग- तांग ह्या पर्वतीय प्रदेशात डोंडूप लामाश्रींच्या नेतृत्वाखाली एक मोहिम जायला निघते. कित्येक महिने चालणा-या ह्या मोहिमेसाठी भरपूर सामग्री, घोडे, तट्टं इत्यादी तयारी केली जाते. तिबेटचा हा अतिदुर्गम भाग असतो. ल्हासा व आसपासच्या प्रदेशाची उंची ४००० ते ५००० मीटर आहे; पण चांग तांग ह्या उत्तर पश्चिम तिबेटमधील भागाची उंची ७००० ते ८००० मीटर असते आणि प्रवास पूर्णत: अशक्यप्राय असतो. बर्फाचे डोंगर, द-या, रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल वातावरण, संपूर्ण निर्मनुष्य अशा सर्व परिस्थितीत मोहीम सुरू राहते. कित्येक साथीदार व घोडे आजारी पडतात. त्यांना वाटेतल्या एका शेवटच्या मुक्काम करण्यायोग्य ठिकाणी ठेवून उरलेले लोक पुढे जातात. खडतर प्रवास सुरूच राहतो. सर्व जण गळून जातात. सर्वांचे हाल होतात. तेव्हा कुठे चांग- तांग पर्वतीय प्रदेशात ते पोचतात. तिथलं हवामान सुखद व आल्हाददायक असतं. वनौषधींचा शोध घेता घेता त्यांना एक अतिप्राचीन नगरी सापडते. परत असाच खडतर प्रवास करत करत कित्येक महिन्यांनी ते मानवी प्रदेशात येतात. प्रवासाचे तपशील वाचण्यासारखे आहेत. वर्णन असामान्य असलं तरी अतिरंजित आणि अतिरेकी नाही. आपण नकाशात पाहिलं तर चांग तांग हा भाग आपल्याला तिबेटच्या वायव्य सीमेजवळ अक्साई चीनच्या दक्षिणेला आणि लदाखच्या पूर्वेला दिसतो........ अद्भुत...... असंच हे वर्णन आहे.

दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर लोब्संगचं तिबेटमधलं शिक्षण पूर्ण होतं आणि वयाच्या अठराव्या वर्षी तो वरिष्ठ लामा होतो (सुमारे १९२९). जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक शिक्षणाची गरज असते; म्हणून तो तिबेट सोडतो. चीनच्या मध्यभागात असलेल्या चुंगकिंग (आजचे Chongqing) ह्या शहरात जाण्यासाठी तो निघतो. घर, आई- वडील ह्यांची त्याची आधीच ताटातूट झालेली असते. आणि तिबेटमध्ये आगामी येणा-या संकटांच्या संदर्भात भावी आयुष्यातल्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी चुंगकिंगला जायला निघताना लोब्संगची गुरूजी, आदरणीय दलाई लामा व मातृभूमी तिबेट ह्यांचीही ताटातूट होते आणि इथेच ‘द थर्ड आय’ हे पुस्तक समाप्त होतं.......................



डॉक्टर फ्रॉम ल्हासा

मराठीतलं तृतीय नेत्र वाचून झाल्यावर विलक्षण कुतूहल निर्माण झालं. इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि लगेच लोब्संग राम्पा ह्याच्या विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्याची पुस्तकंही डाऊनलोड करून वाचता आली! त्यामुळे लोब्संग राम्पाच्या जीवनयात्रेची महागाथा पुढे वाचता आली! डॉक्टर फ्रॉम ल्हासा हे त्यांचं दुसरं पुस्तक. ‘द थर्ड आय’ जिथे संपतं, तिथून हे पुस्तक सुरू होतं. निवडक साथीदार आणि तंदुरुस्त घोड्यांसोबत लोब्संगचा प्रवास चुंगकिंगच्या दिशेने सुरू होतो.... प्रवासवर्णन, जीवनशैली, तिबेटची माहिती ह्यांचं अत्यंत सुंदर मिश्रण ह्यात आहे. तिबेट हा अतिउंचीवरील प्रदेश. सरासरी उंची चार हजार मीटर आणि विलक्षण थंड हवामान. त्यामुळे जसे ते अतिउंचीवरून कमी उंचीच्या प्रदेशात येतात, तशा त्यांना अडचणी येतात. शरीराला कमी उंचीच्या वातावरणाची सवयच नसते. त्यामुळे उष्ण हवामान, जास्त घनतेची हवा ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. तोपर्यंत चिनी संस्कृतीही सुरू झालेली असते. सर्व बदलांचा त्रास होतो. तरीही त्यांचा प्रवास सुरू राहतो. रात्री वाटेत लागणा-या एखाद्या मठात मुक्काम करत प्रवास सुरू राहतो. आणि हे मठ दलाई लामांच्याच परंपरेतलेच असे नसतात. परंतु कोणत्याही विचारधारेचा मठ असला, तरी यात्रेकरूंची व्यवस्था केली जाते! उष्ण प्रदेश, दमट हवामान, वादळी वारे ह्यांचा सामना करत करत ते पुढे जातात. एका टप्प्यावर आल्यावर त्यांना पक्का रस्ता लागतो आणि तिथून चार चाकांच्या वाहनांची वाहतुक सुरू होते! नवीन जगच सुरू होतं.

यांगत्सेच्या किनारी असलेलं चुंगकिंग हे तत्कालीन चीनमधलं एक मुख्य ज्ञानकेंद्र व बाजारपेठ असते. लोब्संग शहरी जीवन, काही प्रमाणात पाश्चात्य प्रभाव पहिल्यांदाच बघतो. तिथल्या एका वैद्यकशास्त्र महाविद्यालयात तो प्रवेश घेतो. त्याचे गुरूजी व दलाई लामांच्या ओळखीमुळे त्याची व्यवस्था होते. वैद्यक शास्त्रातलं त्याचं ज्ञान तपासलं जातं. त्याचं कठोर प्रशिक्षण व ज्ञान ह्यामुळे त्याचं ज्ञान अर्थातच भरपूर असतं. फक्त मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन विषय त्याला पूर्णपणे नवीन असतात! आणि इथेच गमती- जमती होतात! इलेक्ट्रिक करंट शिकवतानाच्या प्रात्यक्षिकामध्ये ‘करंट’ काय असतो, ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांना छोटा शॉक देऊन करंट म्हणजे काय, हे शिकवलं जातं. परंतु आध्यात्मिक साधनेमुळे लोब्संगला करंटची जाणीवच होत नाही (फक्त किंचित उष्णता जाणवते). काही तरी गडबड झाली, असं बघून शिक्षक जेव्हा स्वत: हात लावतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्का बसतो!! असंच मॅग्नेटिझमच्या प्रात्यक्षिकामध्ये होतं. लोब्संगला तिस-या डोळ्यामुळे चुंबकीय क्षेत्र दिसत असतं आणि हेच त्याच्या शिक्षकांना कोड्यात टाकतं. ह्या चिनी महाविद्यालयात अमेरिकन पद्धतीने वैद्यकशास्त्र शिकवलं जात असतं. तिबेटी पद्धत व पारंपारिक ज्ञान व अमेरिकन ज्ञान ह्यांच्यासंदर्भात वर्णन छान आहे. पाश्चात्य उथळ ज्ञानापेक्षा पौर्वात्य ज्ञानात जास्त शहाणपणा व खोली आहे, असं लोब्संगचं मत असतं. अनेकदा त्रास देणा-या आडदांड लोकांना लोब्संग मानेतली एक नस दाबून एका क्षणात लोळवतो. त्याचं आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण सुरू राहतं.

योगायोगाने त्याची ओळख एका चिनी पायलटशी होते. हळुहळु उत्सुकतेपोटी तो त्यांच्याकडून विमान उडवण्याचं तंत्र शिकून घेतो आणि एकदा चक्क विमान उडवतो! त्याचं कौशल्य पाहून चैंग- कै- शेकचे लोक त्याला चिनी विमानदळात घेऊ इच्छितात. परंतु ह्यावेळीच अनेक दुर्घटनांना सुरुवात होते. चुंगकिंगमधले लोब्संगचे एक ओळखीचे लामा प्राणत्याग करतात. त्याचवेळी त्याला त्याचे गुरूजी- डोंडूप लामाश्री ह्यांनीही प्राणत्याग केल्याचं कळतं. तो न राहवून शोक करायला लागतो. त्याचा शोक पाहून डोंडूप लामाश्री सूक्ष्म देहाने येऊन त्याचं सांत्वन करतात आणि त्याला पुढच्या खडतर प्रसंगांना सामोरं जाण्यास सांगतात. त्यातून तो सावरला नसतानाच बातमी येते की आदरणीय दलाई लामा लवकरच शरीर सोडणार आहेत. त्याला आणि आणखी एका लामाला ल्हासाला येण्यासाठी मानसिक दूरसंवेदन- टेलिपॅथी पद्धतीने निरोप दिला जातो. एक वरिष्ठ लामा असूनही भावना आवरणं त्याला जड जातं. सत्वर तो ल्हासाला यायला निघतो. ह्यावेळी मात्र त्याच्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत (जिथे रस्ता जाऊ शकतो तिथपर्यंत!) एका मजबूत अमेरिकन गाडीची व्यवस्था केली जाते. ही गाडी दिवसरात्र प्रवास करून त्याला अर्ध्या वाटेवर रस्ता संपतो तिथे असलेल्या एका मठात आणून सोडते. ह्या मठातल्या मठाध्यक्षालासुद्धा टेलिपॅथी संदेश आलेला असल्यामुळे त्याने एक मजबूत घोडा लोब्संगसाठी तयार ठेवलेला असतो!

लोब्संग ल्हासामध्ये गुरूजी व आदरणीय दलाई लामांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून आणि सहाध्यायी, मित्र आदिंचा अखेरचा निरोप घेतो. तिबेटी पद्धतीप्रमाणे दलाई लामांचा मृतदेह विशेष प्रकारे जतन करून पवित्र वास्तूत ठेवला जातो. विशेष म्हणजे त्यांचं मस्तक वारंवार पूर्वेकडे वळतं!! ह्याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणा-या (चिनी आक्रमणाच्या) संकटाबद्दल ते अखंड सावधानतेचा इशारा देत असतात. लोब्संग ल्हासाला अखेरचा रामराम करून तो चुंगकिंगच्या दिशेने घोड्यावरून सुसाट निघतो. मुक्कामाच्या मठामध्ये नवीन घोडा घेऊन तो न थांबता प्रवास करतो. परत त्याला तीच मजबूत गाडी मिळते आणि अखेरिस तो चुंगकिंगला येऊन पोचतो.

त्या वेळी चुंगकिंगमध्ये हळुहळु जपानी आक्रमणाच्या बातम्या येत असतात. अनेक भागांमध्ये जपानी कारवाया सुरू झालेल्या असतात. त्याला चैंग-कै शेकच्या अधिका-यांचा निरोप मिळतो. तो चिनी विमानदलात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल होतो! आक्रमणाच्या तणावामुळे शांघायजवळ परिस्थिती बिघडत असते व तिथल्या वैद्यकीय सेवेसाठी तो शांघायला येतो. काही काळाने म्हणजे ७ जुलै १९३७ रोजी मार्को पोलो पूल ओलांडून जपानी सेना शांघायवर हल्ला करते. ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’मधला इथून पुढचा भाग म्हणजे खरीखुरी युद्धकथाच आहे. विपरित परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांशिवाय रुग्णसेवा करत असताना जपानी लोक लोब्संगला पकडतात. त्याचे असंख्य हाल करतात. त्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत म्हणून अत्यंत क्रूर हाल करतात. उलटे टांगून हात गळ्याशी बांधणे, नखं कापून त्यात मीठ चोळणे, उपाशी ठेवणे, आगीवर टांगून ठेवणे आणि असंख्य. कित्येक दिवस, आठवडे व महिने ते त्याचा छळ करतात, पण तो “मी चिनी सेनेत अधिकारी आहे व युद्धकैदी आहे,” ह्याव्यतिरिक्त काहीच सांगत नाही. प्रचंड अत्याचार सहन केल्यानंतर तो कसाबसा तुरुंगवासातून मृतदेहाचं सोंग घेऊन निसटतो आणि एका वृद्ध चिनी माणसाच्या मदतीने परत चैंग- कै- शेकच्या चिनी सैन्याला मिळतो. काही दिवस चुंगकिंगमध्ये राहतो. त्यावेळी चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चुंगकिंगचीही रया गेलेली असते. तिथेही हल्ले सुरू झालेले असतात. थोडा आराम करून व जुन्या लोकांना भेटून तो परत युद्धभूमीवर येतो. रुग्णसेवा करत असतानाच परत पकडला जातो. पुन: भयानक छळ आणि हाल. परत एकदा तो निसटतो आणि एका युरोपीयन व्यक्तीच्या घरी जातो. पण तो जपानी लोकांना सामील झालेला असल्यामुळे लोब्संग परत एकदा जपानी लोकांच्या तावडीत सापडतो. सर्वत्र जपानच्या विजयाच्या बातम्या येत असतात.

लोब्संग माहिती देत नसल्यामुळे ते त्याचा अविरत छळ करतात. पण कठोर परिश्रम आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बळावर लोब्संग टिकाव धरतो. छळामुळे होणा-या वेदनांचा सामना करण्यासाठी त्याला वेदनांवरून मनाचं ध्यान दूर न्यायचं असतं. त्यासाठी तो जुन्या आठवणी, गुरूंचे उपदेश व गतकालीन प्रसंग आठवतो. चांग- तांग पर्वतीय प्रदेशातील त्यांचा प्रवास, प्राचीन नगरी, तिथली उपकरणे, तिथे दिसलेले यती इत्यादी त्याला आठवतात. मधून मधून गुरू सूक्ष्म रूपाने येऊन त्याला प्रेरणा देतात. शेवटी त्याला एका महिला कैद्यांच्या कँपचा डॉक्टर म्हणून काम देतात. त्या भागात मिळणा-या वनस्पतींचा वापर कुशलतेने करून तो ट्रॉपिकल अल्सरसारख्या भितीदायक रोगावर औषधोपचार तयार करतो. कैद्यांना गोळा करून साधनं तयार करतो. श्वासाचा परिणामकारक वापर करून वेदना कशा कमी जाणवतील, ह्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देतो. परंतु काही दिवसांतच त्याला पुन: बंदी करून जपानमधल्या तुरुंगात आणलं जातं. शांघायहून जवळजवळ एक मृतदेह म्हणून जपानच्या मुख्यभूमीपर्यंतच्या प्रवासाचं केलेलं वर्णन थरारक आणि भीषण आहे. युद्ध आणि साम्राज्यवाद असेल, तर नाव कोणतंही असो, वास्तव सैतानाचा साक्षात्कार, हेच असतं हे दिसतं.....

जपानच्या मुख्यभुमीतील हिरोशिमाजवळच्या एका बंदिवासात लोब्संगला ठेवण्यात येतं. सततच्या छळामुळे व शरिरावर झालेल्या असंख्य आघातांमुळे तो अत्यंत अशक्त असतो आणि कित्येक दिवस पडून असतं. त्याचं स्थळ- काळाचं भान शिल्लक राहात नाही. फक्त ह्या तुरुंगात समुद्रातून कोणत्या मार्गाने आलो, तितकं त्याला लक्षात असतं. लोब्संग कमालीचा अशक्त असतो. अशक्त लोब्संगच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकामध्ये बोलावलं जातं. तिथे लोब्संगला त्याचे गुरुजी व अन्य लामा भेटतात. ते त्याला सांगतात, “तू अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून जात आहेस. तुझ्या कष्टांना व हाल- अपेष्टांना मर्यादा नाहीत. तुझं शरीर खिळखिळं झालं आहे. आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही असा एक ब्रिटिश नागरिक बघितला आहे, जो प्राणत्याग करू इच्छितो. त्याचं शरीर तुला मिळू शकतं. पण अजून त्यासाठी सात वर्षं बाकी आहेत. तुला हर हवं असेल, तर तू शरीर सोडून आमच्यात येऊ शकतो; तुला कोणीही नाव ठेवणार नाही.” त्यावर लोब्संग त्याच्या विशेष ध्येयासाठी झुंजत राहण्याची इच्छा व त्याचा निर्धार बोलून दाखवतो. सूक्ष्म देह परत त्याच्या शरिरात येतो आणि त्याचा तुरुंगवास सुरू राहतो.

एके दिवशी लोब्संगला विमानाची घरघर ऐकू येते. त्याला माहिती असलेल्या विमानांपेक्षा ती वेगळी असते. तेवढ्यात बाहेर सर्वत्र हल्लकल्लोळ उठतो आणि सैनिक आरडाओरड सुरू करतात. सर्वत्र एकच थैमान सुरू होतं. “सम्राट, आम्हांला ह्या प्रलयापासून वाचवा,” असं सैनिक म्हणत असतात. लोब्संगने लिहिलं आहे, की तो हिरोशिमावरचा ६ ऑगस्ट १९४५ चा अणुबाँब होता आणि अर्थातच हे त्याला त्या वेळी समजलं नाही.. लोब्संगला जाणवतं की सर्व सैनिक प्रचंड भितीने पळत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. तो इतका अशक्त असतो, की त्याच्या खोलीला कुलुपही नसतं. तो हळुच बाहेर पडतो. एका सैनिकाचे बूट व पोशाख घेऊन खुरडत खुरडत समुद्राच्या दिशेने पुढे जायला निघतो. कसा बसा तो किना-यावर पोचतो. सर्वत्र अराजकता असते, त्यामुळे त्याला कोणी अडवत नाही. वाळूत त्याला एक नाव दिसते. शक्ती एकवटून तो नावेपर्यंत जातो. त्यात त्याला काही मासे अन्न म्हणून ठेवलेले दिसतात. तो थोडेसे खातो आणि खूप जोर लावून नावेचा दोर तोडतो. नाव मोकळी होते आणि हळुहळु समुद्रात जाते......... असंख्य मरणयातना आणि अत्याचार सहन केल्यावर कित्येक वर्षांच्या तुरुंगवासातून तो मुक्त होतो........ आणि तिथेच ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’ भाग संपतो.



द राम्पा स्टोरी

आत्मचरित्राच्या ह्या तिस-या भागाच्या सुरुवातीला वर्तमानकाळातील काही संवाद आहेत. पण ते समोरासमोरचे किंवा दूरध्वनीवरचे नाहीत; तर सूक्ष्म रूपातील आहेत!! पहिले दोन भाग प्रकाशित झाल्यावर लोब्संगवर काही लोकांनी खूप टीका केलेली असते. खोटं आणि काल्पनिक लेखन असं त्याच्या लेखनाबद्दल बोललं जात असतं. त्याला त्याचे गुरूजी व अन्य लामा समजावून सांगतात, की त्याने लिहिणं खूप आवश्यक आहे. जे लोक आध्यात्मिक प्रवासात थोड्या तरी विकसित अवस्थेत आहेत, ते त्याचं सांगणं समजू शकतील. आणि इतरांनी जरी त्याच्या सांगण्याला खोटं म्हंटलं, तरी त्यांच्या अंतर्मनात त्याची नोंद होईल व योग्यवेळी त्यांनाही त्याची जाणीव होईल. म्हणून ते त्याला लिहिण्यास प्रेरित करतात. आधीच्या भागांकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आत्मचरित्र परत हिरोशिमामध्ये व तिथून बाहेर पडणा-या नावेच्या प्रवासाकडे येतं.....

कितीतरी दिवस, आठवडे, महिने लोब्संगची नाव समुद्रात जात राहते. त्याला स्थळ- काळाचं भान उरत नाही. नावेतले मासे आणि पावसाचं पाणी ह्यावर मधून मधून जागा होणारा लोब्संग पुढे पुढे जात राहतो....... कित्येक काळ उलटल्यावर त्याच्या कानावर काही शब्द ऐकू येतात. त्याची नाव किना-याला लागलेली असते आणि दोन तरुण किना-यावरून त्याच्याकडे येतात. ते त्याला ढकलून नाव स्वत:च्या ताब्यात घेतात. लोब्संग किना-यावर वाळूत बेशुद्ध पडलेला असतो.

शुद्धीवर आल्यावर लोब्संगला त्याला एका जागी आडवं केल्याचं दिसतं. त्याच्याजवळ पाणी व थोडं अन्न ठेवलेलं असतं. तो एका मठात असतो. त्याचे उघडलेले डोळे पाहून एक वृद्ध बौद्ध भिक्षु त्याच्याकडे येतात. दोघांची भाषा चिनी असली तरी त्यात बराच फरक असतो; पण हळुहळु संवाद सुरू होतो. ते भिक्षु त्याला सांगतात की ते वाळूत त्याला बघून शिष्यांना सांगून मठात आणतात. ते हेही सांगतात, की त्यांच्या मठात एक दिवस कोणी विशेष अतिथी येणार आहे, अशी त्यांना पूर्वीपासून सूचना देण्यात आली होती व केवळ त्या कारणासाठी ते वयोवृद्ध भिक्षु शेवटचा श्वास घेत जगत असतात. काही दिवस लोब्संग तिथे विश्रांती घेतो. परंतु नंतर ते भिक्षु त्याला समजावतात की त्याने फार काळ थांबून चालणार नाही, कारण धोका अजून संपलेला नाही आणि भिक्षुही राहणार नाहीत. तो मठ उत्तर कोरियामध्ये असतो (अर्थातच लोब्संगची नाव जपानच्या दक्षिण- पश्चिमेकडून समुद्र ओलांडून उत्तर कोरियाला लागलेली असते!!!). भिक्षुंचे शिष्य त्याला उनगीचा रस्ता सांगतात. उनगी उत्तर कोरियामध्ये रशियन सीमेपासून जवळ असतं (गावाचं आजचं नाव सोन्बोंग आहे आणि ते उत्तर कोरियामध्ये चीन व रशिया ह्यांच्या सीमेलगत आहे). मुख्य रस्त्यावरून न जाता बाजूने चालत चालत तो तिथपर्यंत जातो. चिनी आणि जपानी भाषेत लोकांना विचारत विचारत आणि थांबत थांबत जातो. उनगीमध्ये पोचल्यावर त्याला व्हॅलिडिओस्टॉककडे जायचं असतं. त्याला रशियन लाल फ्रंटियर पेट्रोलचे तीन सैनिक दिसतात. त्यांच्याजवळ पोलिसी कुत्रे असतात. त्याला बघून ते कुत्रे त्याच्यावर धावून येतात.... लोब्संग मनामध्ये त्या कुत्र्यांप्रति सद्भाव व्यक्त करून तो त्यांचा मित्र आहे, असा विचार व्यक्त करतो. कुत्रे त्याच्या अंगापर्यंत येऊन शांत होतात. सैनिकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. ज्या अर्थी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही, त्या अर्थी तो स्थानिक धर्मगुरू असावा, असं त्यांना वाटतं. ते प्रभावित होऊन त्याची मदत करतात. त्याला त्यांच्या गाडीतून व्हॅलिडिओस्टॉकलाही न्यायला तयार होतात.

व्हॅलिडिओस्टॉकमधल्या छावणीमध्ये पोलिसी कुत्र्यांनी वेगळीच समस्या निर्माण केलेली असते. कारण कम्युनिस्ट लाल सोव्हिएत राजवटीमध्ये सैनिक त्या कुत्र्यांना सतत बंडखोरांवर सोडत असतात व त्यामुळे मानवी रक्ताची चटक लागून ते कुत्रे नियंत्रणाबाहेर जात असतात. कुत्र्यांच्या एका दंगलीमध्ये 4 सैनिकसुद्धा ठार झालेले असतात. म्हणून हे सैनिक (त्यातला एक सार्जंट असतो) लोब्संगला कुत्र्यांना नियंत्रणात आणायला सांगतात. तो आणून दाखवतो. मग आणखी कुत्र्यांना नियंत्रणात आणण्याचा ‘पराक्रम’ लोब्संग करतो. त्याच्यामुळे तिथला वरिष्ठ अधिकारी इतका प्रभावित होतो, की त्याला लाल सोव्हिएत सेनेत तो त्याला मानाचं कॉर्पोरेल पद देतो! काही दिवस कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी ते लोब्संगला थांबवून घेतात, पैसे आणि इतर साधनं देतात. लोब्संग त्यांच्याकडून व्हॅलिडिओस्टॉकमधून मॉस्कोला जाणा-या ट्रान्स सैबेरियन रेल्वेच्या प्रवासाची माहिती काढून घेतो. सुरक्षा रक्षकांना चुकवत तो प्रवास कसा करता येईल, हे त्याच्या लक्षात येतं.......

तिथून पुढे त्याचा अखंड प्रवास सुरू होतो...... प्रवास, छळ आणि परत प्रवास. व्हॅलिडिओस्टॉकच्या पुढच्या एका गावात तो मॉस्कोला जाणा-या मालगाडीमध्ये बसतो. पुढे काही दिवसांनी बैकल सरोवराजवळ ती गाडी थांबते. तपासणीच्या वेळी तो ट्रेनमध्ये उतरून मग परत डब्यात चढतो. पण ह्यावेळी डब्यात अजून चार जण असतात. ते त्याच्यावर हल्ला करतात. पण तिबेटी युद्धकौशल्याने लोब्संग त्यांना लगेचच शांत करतो. मग ते त्याला सहकार्य करतात. मालगाडीमध्ये खायला धान्य व पदार्थ मिळतात. सैबेरियातल्या बर्फापासून पाणी मिळतं. निघाल्यापासून जवळजवळ चोवीस दिवसांनी लोब्संग मॉस्कोजवळ पोचतो. तिथून परत प्रवास, कैद, छळ, सुटका, प्रवास असं किती तरी महिने किंवा वर्षं सुरू राहतं. अखेरीस तो युक्रेन- पोलंडमार्गे चेकोस्लोव्हाकियामध्ये पोचतो (दुस-या महायुद्धातल्या जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण युद्धक्षेत्रातून जाऊन!). तिथून मग त्याचा छळ थोडा थोडा कमी होतो. परंतु पाश्चात्य जगातील पद्धती माहित नसल्यामुळे लोक त्याला फसवत राहतात. तरीही स्वत:च्या हुशारीवर असंख्य उद्योग करत तो चेकोस्लोव्हाकिया, इटली, जर्मनी, फ्रांसमार्गे अमेरिकेत पोचतो. ह्या सर्व प्रवासात ड्रायव्हर, इंजिनिअर, मर्चंट नेव्ही इंजिनिअर, रेडिओ निवेदक अशी कित्येक कामं तो करतो.

मधल्या कालावधीत तिबेटमध्ये चीनच्या लाल सेनेने आक्रमण करून तो देश गिळंकृत केलेला असतो (१९५०). सर्वत्र पारतंत्र्य आणि जुलुमशाही आलेली असते. ल्हासामधले मठ जाऊन तिथे नवीन कामगारगृहे येतात. सूक्ष्म रूपात लोब्संग हे पाहतो. सूक्ष्म रूपात त्याचं त्याच्या गुरुजींशी संभाषण होतं. ते त्याला सांगतात, की त्याच्या शरीराचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याने आता तिबेटमध्ये जाऊन आत्मार्पण करावं, म्हणजे त्याचं शरीर पारंपारिक पद्धतीने जतन करता येईल आणि एका ब्रिटिश नागरिकाच्या शरीरात जाऊन तो त्याचं जीवितकार्य करू शकेल. त्या लामांनी त्या ब्रिटिश नागरिकाशीही संभाषण केलेलं असतं. त्यानुसार तो भारतात मुंबईला येतो आणि तिबेटच्या सीमेवर पोचतो. ल्हासामध्ये शत्रूसैन्य असल्यामुळे तो तिथे जाऊ शकत नाही; परंतु एका दुर्गम पहाडावरच्या मठामध्ये शरीरत्याग करतो. सूक्ष्म रूपात अन्य लामा त्याला सहकार्य करतात व बराच प्रयत्न केल्यावर तो ब्रिटिश नागरिकाच्या शरीरामध्ये शिरतो. तिथून मग त्याचं सुरुवातीला इंग्लंड, नंतर आयर्लंड आणि शेवटी कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. अनेक छोटीमोठी कामं केल्यावर तो शेवटी लेखक बनतो. आणि ‘द थर्ड आय’ लिहून त्याची लेखन कारकीर्द सुरू होते!! परंतु त्याचं जीवितकार्य मानवतेच्या मुक्तीसाठी शरीराभोवतीच्या वलयांवर (ऑरा) संशोधन करून रोगनिदान करण्यामध्ये सहाय्य करेल, असे उपकरण विकसित करणे, हे असतं. त्याशिवाय पारंपारिक तिबेटी बौद्ध ज्ञानाची तो जगाला ओळख करून देतो. स्वत:च्या अनुभवाद्वारे आणि मिळालेल्या ज्ञानाद्वारे मानवजातीच्या इतिहासाची नव्याने ओळख करून देतो आणि एक प्रकारे पारंपारिक ज्ञानाला नष्ट होण्यापासून वाचवतो.........

समारोप

अशी ही तीन पुस्तकांची रोमहर्षक मालिका आणि असा हा दिव्य लोब्संग राम्पा! त्याने ह्या तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकांनंतर वैचारिक अशी बरीच पुस्तकं लिहिली. जागतिक तत्त्वज्ञानात त्याने उत्पन्न केलेली लाट अजूनही शांत झालेली नाही....

लोब्संग राम्पाच्या लेखनाला आणि विचारांना नेहमीच कठोर टीका सहन करावी लागली. फेक, खोटारडा म्हणून खूप लोकांनी त्याला बघितलं. पण त्याच्या सांगण्यात अर्थ आहे, असे मानणारेही कमी नाहीत. पाश्चात्य विज्ञान व मानसिकतेबद्दल त्याची मतं कठोर आणि रोखठोक आहेत. पाश्चात्य मानसिकता कमालीची स्वार्थी, स्व- केंद्रित आणि दुस-यांचे शोषण करणारी आहे, असं तो सांगतो. पाश्चात्य मानसिकतेला प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत आणून त्याचे तुकडे तुकडे करून सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करेपर्यंत काहीही पटणार नाही, हे तो सांगतो. निव्वळ आसुरी इच्छा करण्याऐवजी पाश्चात्य मानसिकतेने जर थोडा विनम्रभाव आणि खुली मानसिकता ठेवली, तर त्यांचं भलं होईल, असं सांगायला तो कमी करत नाही.

ह्या तीनही पुस्तकांमध्ये निव्वळ आत्मकथन नाही. त्यामध्ये भरपूर विचारमंथन आहे, सोप्या उदाहरणांसह अनेक आध्यात्मिक साधना आणि प्रक्रियांचं वर्णन आहे. स्वदेशप्रेम आहे, पण अहंकार नाही. अत्यंत खळबळजनक काळात त्याने केलेल्या जगप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य महत्त्वाचे अनुभव व प्रसंग आहेत. वेगवेगळे देश, संस्कृती, राजवटी, माणसं ह्यांचं भावपूर्ण वर्णन आहे. शिवाय पुस्तकांची शैली निव्वळ तात्त्विक किंवा गंभीर नसून हलकी फुलकीसुद्धा आहे (पासपोर्ट घेऊन देश ओलांडताना/ देशात प्रवेश करताना मला लाल फितीमुळे जितक्या अडचणी आल्या, तितक्या अवैध प्रकारे देशांतर करताना कधीच आल्या नाहीत). जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोब्संगने केलेला पराक्रम अविरत प्रकारे जाणवत राहतो. माणूस देवपदाला जरी पोचला असला, तरीही त्याला हाल अपेष्टांपासून मुक्ती नाही, जे सत्य जाणवतं आणि आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीतल्या छोट्याश्या समस्यांच्या विरोधात थकणारे आपण दिसतो.....

आणखी महत्त्वाचं म्हणजे ह्या तीन पुस्तकांतून दिसणा-या तिबेटी बौद्ध पद्धतीचं व भारतीय योगपद्धतीतील साम्य. गुरू, कुंडलिनी, प्राण, आकाश, कर्म असे शब्द सहजपणे येतात. एकंदर तिबेटी तत्त्वज्ञानाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात ओळखीचं बरंच काही दिसतं. पद्मासनाने व कायास्थैर्यमने सुरुवात होते. ॐ आहे. ध्यान व योग तर आहेच. शिवाय कर्मसिद्धांत, जीवनविषयक दृष्टीकोनसुद्धा तोच आहे. त्यामुळे भारत किंवा अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, सयाम, थायलंड, कोरिया, श्रीलंका ही बौद्ध संस्कृती असलेली राष्ट्रे ह्यात फरक दिसतच नाही. शेवटी व्यापक सहिष्णू संस्कृती एकच आहे, समानच आहे, हे जाणवतं. फक्त इतकेच देश नाही, तर मानवजात एकच आहे, हे दिसतं. ह्यातल्या ब-याच गोष्टी चमत्कारिक, असंभाव्य वाटतील. पण तरीही ह्या पुस्तकांमध्ये आपण प्रत्यक्ष करू शकतो, अशा गोष्टींही मोठ्या प्रमाणात आहे. उदा., श्वासाचा वापर, विचारांवर नियंत्रण, शरीर सामर्थ्य ह्या संदर्भातील. त्यामुळे जरी आपल्याला काही मतं मान्य नसतील, तरीही मन मोकळं ठेवून ह्या पुस्तकांचा आस्वाद नक्की घेतला, नव्हे अभ्यास केला, तरी त्यातून भलंच होणार आहे.

संदर्भ 

लोब्संग राम्पा ह्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांची पुस्तकं इथून डाऊनलोड करता येतील.

Friday, December 30, 2011

झेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन

झेपावे जरा उत्तरेकडे!
भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन


हिवाळा ऋतु सध्या शिखरावर आहे. डिसेंबरचा शेवट आणि जानेवारी म्हणजे संपूर्ण देशभर थंडीची लाट मध्य व दक्षिण भारतामध्ये जरी ही थंडी काहीशी सुसह्य असली, तरी उत्तर व उत्तरेकडच्या पहाडी भागांमध्ये बरीच जास्त असते. अशाच उत्तराखंडच्या काही भागात कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.





उत्तराखंड! पूर्वीच्या उत्तर प्रदेशातला उत्तरेचा भाग, नंतर उत्तरांचल म्हणून व आता उत्तराखंड म्हणून ओळखला जाणारा पहाडी भाग! देवभूमी किंवा योगी लोकांची भूमी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध. आणि अर्थातच धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र प्रदेश. इतका पवित्र की पूर्वीच्या काळी गावातून कोणी हृषिकेश, हरिद्वार किंवा गंगोत्री अशा ठिकाणी जाऊन आले तर त्यांचं दर्शन सर्व गाव घेत असे. पर्यटकांसाठी हा प्रदेश म्हणजे नंदनवनच. कारण जिकडे पहावे तिकडे हिमालयाचा रमणीय नजारा! त्यामुळेच कित्येक हिंदी चित्रपटांचं (विशेषत: जुन्या) चित्रीकरण इथेच झालं. असा हा प्रदेश भूराजकीय दृष्टीनेसुद्धा अत्यंत मोक्याचा प्रदेश, कमालीचा महत्त्वाचा प्रदेश. नेपाळ व चीनव्याप्त तिबेट लागूनच आहे. त्यामुळे सेनेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा. चीनच्या कारवाया पूर्वांचल व काश्मीरप्रमाणेच इथेही छुप्या पद्धतीने सुरू असतात. शिवाय मानससरोवराला जाणारा भारतीय यात्रेकरूंचा एक मार्ग इथूनच जातो. इथला निसर्ग, जैव विविधता तर अद्भुतच. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान काय किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स काय, सर्वच एकदम विशेष.... असा हा सर्वच दृष्टीने अत्यंत विशेष व अद्वितीय प्रदेश.




पिथोरागढमधला सूर्योदय

दिल्लीमार्गे तिथे जाताना ह्या सर्व गोष्टी आकर्षित करत होत्या. उत्तराखंड ब-याच प्रमाणात पहाडी असल्यामुळे रेल्वे पायथ्यापर्यंतच म्हणजे मर्यादित ठिकाणीच जाते. तिथून पुढे बस, टॅक्सी अशा साधनानेच जावे लागते. दिल्लीहून नैनितालजवळ काठगोदाम इथे रेल्वे जाते. तेच रेल्वेचं त्या भागातलं टोकाचं स्टेशन आहे. कुमाऊं प्रदेशाचं जणू प्रवेशद्वार. काठगोदामसुद्धा विशेष आहे. ब्रिटिश काळात जेव्हा ब्रिटिशांनी व्यापारासाठी उत्तराखंडमधल्या जंगलांना तोडण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची आवश्यकता होती. जंगलातलं लाकूड दूरवर न्यायचं होतं. ह्या उद्देशाने त्यांनी शक्य तितक्या पहाडाच्या जवळ स्टेशन उभं केलं. तेच काठगोदाम! ब्रिटिश गेल्यानंतरच्या वर्षांमध्ये ह्या भागात तरी रेल्वे अजून पहाड चढू शकली नाही. शक्यताही कमीच आहे. त्यामानाने काश्मीरमध्ये अगदी श्रीनगरपर्यंत रेल्वे पोचली आहे.

२६ नोव्हेंबरच्या रात्री जुन्या दिल्लीच्या स्टेशनवरून निघून पहाटे हल्द्वानी ह्या काठगोदामच्या आधीच्या स्टेशनला उतरलो. हे मोठं गाव आहे; त्यामुळे बरेच लोक इथून पुढे पहाडात जातात. पहाटे थंडी दिल्लीपेक्षा विशेष वाटत नव्हती. स्टेशनबाहेरूनच एक जीप करून पिथोरागढच्या दिशेने प्रवास सुरू झाला....... दक्षिण मध्य कुमाऊं प्रदेशातून हा प्रवास होणार होता. अंतर १६० किमी असलं तरी सर्व रस्ता पहाडी असल्यामुळे बराच वेळ लागणार होता...

हल्द्वानीहून निघाल्यावर थोड्याच वेळात काठगोदाम स्टेशन रस्त्यावर लागतं. पुढे पर्वतीय प्रदेश सुरू होतो. नैनिताललगत असलेलं भीमताल तळ्याजवळून हल्द्वानी- पद्मपुरीमार्गे शहर फाटक ह्या मार्गाने प्रवास चालू झाला. भीमताल! इथे प्रत्येक ठिकाणी पौराणिक संदर्भ मिळतात. भीमताल अर्थातच भीमामुळे तयार झालेला तलाव! तसंच रामायणात उल्लेख असलेला संजीवनी पर्वतही कुमाऊंमध्येच आहे. पुढे लवकरच घाट सुरू झाला. पर्वतीय असला तरी रस्ता सुस्थितीत होता. हळुहळु पर्वतीय प्रदेशाच्या खुणा दिसू लागल्या. स्थानिक प्राण्यांच्या कातडीवर सपाटीवर असतात त्यापेक्षा जास्त केस होते. थंडीसाठी निसर्गाची व्यवस्था! आज माणूस कितीही वल्गना करत असला, तरी निसर्गापुढे तो नगण्य आहे. निसर्गाच्या बरोबर येण्यासाठी माणसाला निसर्गाचीच मदत घ्यावी लागते. हिमालयामध्ये अधिक उंचीवर गिर्यारोहण करणा-या लोकांना स्थानिक शेर्पा, खेचर, घोडे ह्यांचीच मदत होते. आपण थंडीत वापरतो ते स्वेटर किंवा शाली अनेक वेळेस नेपाळी लोकांकडून घेतलेल्या असतात व त्यासुद्धा विशेष थंडीच्या पर्वतीय प्रदेशातील मेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात! पर्वतीय प्रदेशात तर निसर्ग विशेष आव्हान देतो आणि आवाहनसुद्धा करतो...........






साद देती हिमशिखरे

अलीकडच्या वर्षांमध्ये पहाडामध्ये वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु तरीसुद्धा निसर्गवैभव नजरेत मावत नव्हतं. सर्वत्र हिरवी झाडी आणि मोठे होत जाणारे डोंगर दिसत होते. उंचावर करतात ती पहाडी शेती सगळीकडे दिसत होती. डोंगराच्या अनेक लेव्हल करून त्यावर पिकं घेतली जातात. लांब अंतरावरून बघताना ते आपल्याकडे डोंगरात करतात त्या समतल चरांसारखं (Continuous Contour Trench) दिसत होतं. डोंगरावरच्या शेतांमध्ये मधून मधून घरंसुद्धा दिसत होती. सर्वच डोंगराळ भाग! गावंसुद्धा लहान होती. सूचीपर्णी वृक्षही सुरू झाले. पुढे एका ठिकाणी थोड्या उंचीवर आल्यावर दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागली. अत्यंत दूरवर असला तरी तो नजारा अद्भुतच होता. ओम पर्वत, त्रिशुल पर्वत व त्या मालिकेतील अन्य पर्वत शिखरे दिसत होती. त्यांचं अंतर शंभरहून अधिक किमी होतं, परंतु ते इतक्या दुरूनही स्पष्ट दिसत होते. ओम पर्वताचा फोटो आधी पाहिला असल्यामुळे तो लगेच ओळखू आला. पुढच्या सर्व प्रवासामध्ये हे पर्वत दिसतच होते. पाच हजार मीटर्सपेक्षा ह्या पर्वतशिखरांची उंची अधिक होती, त्यामुळे ते लांबूनसुद्धा दिसत होते.


डावीकडे दिसणारा पर्वत ओम पर्वत आहे.


हे ओम पर्वताचे छायाचित्र





देखो जिधर भे इन राहों में रंग पिघलते है निगाहों मे....ठंडी हवा है, ठंडी छाँव है...



वाटेमध्ये थांबत आणि नजारा बघत प्रवास सुरू होता. पुढे ड्रायव्हरने मुख्य रस्ता सोडून एक शॉर्ट कट असलेला रस्ता घेतला. त्या रस्त्याने काही किलोमीटर्स वाचतील म्हणाला. आधीच निर्जन असलेला परिसर आणखी निर्जन झाला. रस्त्याचं रूपही बदलत होतं. काही काही घाटामध्ये रस्ता पूर्ण कच्चा होता. काही ठिकाणी पायवाटेसारखा होता. बराच वेळ कच्च्या रस्त्याने प्रवास सुरू राहिला. त्यामुळे आणखी दुर्गम भाग बघता आला. वाटेत वाहन तर नव्हतंच, पण लोकसुद्धा तुरळकच भेटत होते. तेही गुरं किंवा मेंढ्या हाकणारे. एका ठिकाणी एक अवघड वळण आलं व तो घाट ओलांडला. तिथे त्या परिस्थितीची सवय नसताना वाहन चालवणं थोडं अवघडच आहे. रस्ताही सरळ नव्हताच.






ही पर्वतीय शेती. लांबून काहीशी समतल चरांप्रमाणे (Continuous Contour Trench) दिसते.




बराच वेळ कच्च्या रस्त्याने पुढे आल्यावर एका ठिकाणी मात्र दुसरा पक्का रस्ता येऊन मिळाला. तो अल्मोडा- पिथोरागढ मार्ग होता. अल्मोडा गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद इथे आले होते व इथे मायावती आश्रम आहे. अर्थात तसं पाहिलं तर सर्व उत्तराखंड किंवा हिमालयच योगी लोकांचं निवासस्थान आहे. इथे दन्या गावाजवळ चांगलं हॉटेल होतं. महामार्गावर असलं तरी साधं व चांगलं होतं. पर्यटनाच्या लाटेमध्येही असा साधेपणा ब-याच ठिकाणी टिकून आहे.

इथून पिथोरागढ जवळ म्हणजे सुमारे पन्नास किमी होतं. रस्ता पक्का असला तरी पहाड होता व उंची वाढली असल्यामुळे वेळ लागतच होता. उंचच उंच पहाड आणि लांबवर पसरलेला वळणे वळणे घेत जाणारा रस्ता...... राहून राहून काश्मीर व लदाखची आठवण येत होती. काहीसं तसंच वाटत होतं. फक्त इथे हिरवा निसर्ग अधिक प्रमाणात होता आणि पहाडामधून ओघळणा-या प्रवाहामुळे वाहणा-या नदीची कमतरता होती. पण तीसुद्धा दूर झाली! पुढे घाट ह्या ठिकाणी एक घाट होता. इथेच टणकपूर नेपाळ सीमेलगतच्या टणकपूरवरून येणारा रस्ता मिळतो. दोन्ही बाजूंना उंच पर्वत आणि मधोमध वाहणारी नदी.... आहा हा............ स्वर्गाचा उंबरठाच जणू. इथेच सीमा सडक संगठन आपलं स्वागत करतं. मानस सरोवर यात्रेचा मार्ग इथे येऊन मिळतो. पुढे रस्त्यावर पहाडातून येणारे पाण्याचे झ-यासारखे प्रवाह लागतात. इथे प्रवासी पाणी भरून घेत होते. अर्थातच पाणी थंड होतं....


रामगंगा नदी







लवकरच पिथोरागढला पोचलो. सकाळी ६ वाजता हल्द्वानीहून निघून पोचेपर्यंत दुपार उलटून गेली. पिथोरागढ जिल्ह्याचं ठिकाण आहे. ह्याची सरासरी उंची १५०० मीटर्स आहे. उंची कमी असली तरी सर्वत्र मोठे मोठे घाट आहेत. शहरसुद्धा डोंगरावरच वसलेलं आहे. दुर्गम जिल्हा असल्यामुळे फार जास्त सुविधा, वाहतूक, वस्ती नाही. हा सर्वच प्रदेश अत्यंत दुर्गम. त्यामुळे इथे राहणीमानही त्यानुसारच आहे. व्यवसायांमध्ये जास्त व्यवसाय शक्यतो मूलभूत स्वरूपाचेच आहेत. म्हणजे शेती, सरकारी सेवा, वाहतूक, सेना (मिलिटरी सेवा), पर्यटन आधारित असे. उत्तराखंड सरकारने उद्योगांना कर माफ केला असला तरी जास्त उद्योग तुलनेने सपाट भागांमध्येच उभे राहिले आहेत. त्या दिवशी पिथोरागढमध्येच थांबलो. गाठीभेटी झाल्या. संध्याकाळी जरा थंडी जाणवली.

दुस-या दिवशी २८ नोव्हेंबरला दोन गावांमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. थंडीमुळे सकाळी लवकर उठणं अवघड होतं. त्यामुळे थोडं उशीरा निघालो. इथे राज्य महामंडळाच्या बस आहेत. त्या अगदी दिल्लीपर्यंत जा- ये करतात. पण बरीच वाहतूक खाजगी पद्धतीने चालते. शेअर जीपच मुख्यत (कारण पहाडी रस्त्यांवर तीनचाकी चालू शकत नाहीत!) चालतात. त्यामुळे आणि एकूणच दुर्गम रस्त्यामुळेही प्रवास थोडा संथ गतीनेच होतो. प्रवासातला पहिला टप्पा मानस सरोवर यात्रेच्या मार्गावरीलच म्हणजे धारचुला रोडवर सत्गड इथे जाणे, हा होता. पिथोरागढच्या पुढे सुमारे तीस किमीवर असलेलं हे छोटसं गाव.





पिथोरागढमधून बाहेर पडतानाच इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) ह्या निमलष्करी विभागाचं मोठं केंद्र लागतं. ह्या भागामध्ये सीमा सडक संगठन (बीआरओ) आणि आयटीबीपी सक्रिय आहेत. दुर्गम व सीमा भागातले हे मुख्य मार्गदर्शक व रक्षक! थोडंसं पुढे जाऊन घाट चढल्यावर काल दिसलेले पहाड- ओम पर्वत, त्रिशुल पर्वत परत दिसण्यास सुरुवात झाली. पिथोरागढमधूनही काही ठिकाणाहून ते दिसतात. सगळीकडून दिसत नाहीत; कारण मध्ये मोठे पहाड आहेत. त्या नजा-याच्या दिशेनेच प्रवास सुरू झाला. सर्वत्र पहाड, हिरवागार निसर्ग, थोडी थोडी घरं व उंचावरची टप्या टप्याने केलेली शेती दिसत होती....... अद्भुत नजारा होता...... वळणं वळणं घेत जाणारे घाटरस्ते आणि त्याला लागून दरी. रस्त्यावरून अधून मधून जाणारी सेनेची वाहनं!






ये हसीं वादियाँ..... ये खुला आसमाँ....




तीस किमी अंतर असलं तरी सत्गडला पोचायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. अजून पुढे शुभ्र शिखरांच्या दिशेने जायची इच्छा होत होती.... सत्गड पहाडी पद्धतीप्रमाणे उंचावरील शेतांमध्ये असलेल्या काही घरांचा समूह मिळून बनलेलं गाव होतं. रस्त्याला लागूनच डोंगर आणि डोंगरामध्ये चढावावर घरं. खरं तर हा सर्व निसर्ग आणि नजारा फोटो, शब्द, वर्णन ह्याद्वारे सांगणं अशक्य आहे. अमिताभचा आवाज शब्दामधून सांगता येत नाही, तो ऐकावाच लागतो. तसं हेसुद्धा बघण्यातूनच कळू शकतं. परंतु एक पुसटसा अंदाज म्हणून हे काही फोटो...











सर्वच नजारा विशेष वाटत होता. उंचावरील शेतं. त्यामध्येच घरं. वर वर चढत जाणारा रस्ता. जुन्या पद्धतीची घरं, झाडी, शांतता आणि आपुलकीने स्वागत करणारी साधी माणसं!!!!! अद्भुत अनुभव होता. सत्गडचं म्हणजे सात गावं (वाड्या) असलेलं उंचावरचं गाव. घरं सगळीकडे विखुरलेली, एकमेकांपासून लांबसुद्धा आहेत. ह्या भागातली गावं विशिष्ट समाजावर आधारित होती. म्हणजे एका गावात एकच मुख्य समाज. इतर जवळजवळ नगण्यच. आपल्याकडे असते तशी मिश्र पद्धत नाही.



त्या शेतांमधून व घरांजवळूनच पाण्याचे काही प्रवाह वाहत होते. ते पाणी नैसर्गिक स्रोताचं होतं! म्हणजे आपोआप पहाडामधून वाहत येणारं! पहाडामध्ये असे स्रोत जवळजवळ सगळीकडेच आहेत. काळाच्या ओघात त्यांच्यावर नळ लावण्यात आले व हौद बांधण्यात आले. पाण्याचा मूळ उगम पहाडातच! पाणी अर्थातच थंड पण खूप ताजं होतं. घराजवळच्या पायवाटेवरून आणखी वर गेलो. रस्ता खाली लांब राहिला. थोड्या उंचीवरून निसर्ग वैभवाची नीट कल्पना येत होती. सर्वत्र घनदाट झाडी व डोंगर. तिथे ब-याच महिला डोक्यावरून गवताचे भारे घेऊन वरून खाली जाताना दिसत होत्या.  

हा दुर्गम भाग असल्यामुळे अर्थातच शिक्षण व इतर सुविधांसंदर्भात अडचणी आहेत. संपर्काची साधनं मर्यादित आहेत. तसंच आरोग्य व इतरही बाबतीत अडचणी आहेत. दिवसा तिथे फिरायला मजा वाटत होती..... पण रात्री? रात्री तिथे जंगली प्राणी फिरतात. कारण मुळात तो सर्व भाग जंगलच आहे. आणि विरळ जंगल नाही, तर घनदाट जंगल........





दुपारी परत त्याच मार्गाने परत येण्यासाठी निघालो. परत तोच वळणावळणाचा रस्ता. शेअर जीपमध्येही बरीच गर्दी. सतत वळणे असल्यामुळे व बराच रस्ता उताराचाही असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी थोडी चक्कर येण्याची भावना अनुभवास येतेच. पहाडी रस्त्यांवर त्याला पर्याय नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या निसर्गाचं अवलोकन करत प्रवास पार पडला. पिथोरागढहून परत लगेच बूंगाछीना ह्या गावाला जायचं होतं. त्या गावाकडे जाणारा रस्ता पिथोरागढ- धारचुला (ज्या रस्त्याने जाऊन आलो) ह्या रस्त्यावरूनच निघत होता. पण निघेपर्यंत संध्याकाळ झाली. इथली संध्याकाळ म्हणजे रात्र असते, ह्याचा अनुभव आला! संध्याकाळी साडेपाच वाजता स्पष्ट अंधार पडला होता! ह्याची दोन कारणं. एक म्हणजे हा भाग बराच उत्तरेला आहे. सुमारे ३० अंश उत्तरेला असेल. आणि त्यावेळी सूर्य दक्षिणायनात होता. म्हणजे सूर्याची आकाशातली उंची बरीच कमी होती. आणि सर्वत्र पहाड असल्यामुळे सूर्योदय उशीरा होणार; कारण जरी सूर्य क्षितिजावर उगवला असला, तरी पहाडाच्या वर यायला त्याला वेळ लागणार. त्यामुळेच सूर्यास्त लवकर होणार. ह्या कारणामुळे त्या परिसरात दिवस सकाळी 7 ला सुरू होऊन संध्याकाळी ५ ला संपायचा. ५.३० वाजता पूर्ण अंधार! थोडक्यात घड्याळ दोन तास पुढे होतं!

बूंगाछीनाला जाण्यासाठी जीपमध्ये जागाच मिळाली नाही. म्हणून मग जीपच्या टपावरून काही अंतर प्रवास केला..... बाहेर सर्व अद्भुत नजारा होता. पण... पण दुर्दैवाने रात्र झाली होती. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त गार गार वारा अंगाला सुखावून जात होता. असा अनुभव परत कधी मिळाला नसता. पहाडी वा-याचा टपावरून घेतलेला अनुभव! नंतर जीप थोडी रिकामी झाल्यावर खाली आलो. बूंगाछीना हे गावसुद्धा जवळजवळ ३० किमी अंतरावरच होतं. हा रस्ता पश्चिमेकडे जाणारा होता.

जीपमधून उतरून पुढे गावात खाली उतरून गेलो. रस्त्याच्या खाली असलेल्या दरीकडे जाणा-या रस्त्यावर हे गाव म्हणजे वाडी आहे. किर्र अंधार.... वळणावळणाची घसरणारी पायवाट. पंधरा मिनिटं चालल्यावर घरासमोर आलो........ प्रदूषण विरहित आकाशात तारे अधिक स्पष्ट दिसत होते...... भेटीगाठी, गप्पा टप्पा झाल्या.

सकाळी उठून थंड हवेत बाहेर फिरलो. घरालगतच शेती होती. दरीकडे जाणा-या पायवाटा दिसत होत्या. इथेही एका ठिकाणी भुमिगत जलस्रोत होता! वाडा पद्धतीची घरं होती. लोकसंख्येची दाटी नसल्यामुळे घरालगतचं अंगण मोठं होतं. दूरवर डोंगरात मंदीरं दिसत होते. डोंगरातच दूरवर एक रस्ता दिसत होता. सहज फिरायला म्हणून दरीच्या दिशेने निघालो. पायवाट स्पष्ट दिसत होती. पण पुढे अवघड झाली. तीव्र उतार होता. थोडा वेळ जात राहिलो. खाली लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. एक झरासुद्धा वाहत होता. सगळीकडे झाडी होती. ते वातावरण, तो निसर्ग मनात साठवून परत आलो. इथे खालपर्यंत लोक राहतात. गाव लांबपर्यंत विखुरलेलं आहे.







दुपारी पिथोरागढला परत आलो. रात्री येताना दिसला नव्हता तो अद्भुत निसर्ग दिसला. सर्वत्र उंचच उंच घाट व लांब रस्ते होते. प्रदेशाची बरीचशी रूपरेषा लदाखशी जुळत होती............. इथली बोलीभाषा कुमाऊनी आहे. पण हिंदी सगळीकडे चालते. हिंदीच प्रमाण भाषा आहे. बाहेरच्या जगापासून जवळजवळ तुटलेल्या भागात फिरण्याचा अनुभव घेतला...........

पुढच्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरला बस्तडी ह्या गावाला जायचं होतं. आधी गेलो होतो त्या सत्गडच्या रस्त्यावरूनच हे आणखी पुढे होतं. आणखी पुढे आणि अधिक उंचीच्या पहाडात जाण्याचा आनंद होत होता. दूरवरून दिसणा-या शुभ्र शिखरांचं दूरदर्शन घेत सत्गडवरून पुढे गेलो. रस्ता व पहाड अधिक दुर्गम होता. वाटेत किती तरी ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू होतं. ओगला ह्या गावाच्या आधी एक सेनेची छावणी लागली. ओगला इथे थोडावेळ फिरलो. ब-याच वेळेपासून एखादा ‘ला’ येण्याची वाट पाहत होतो. तिबेटी भाषेमध्ये ला म्हणजे घाट. काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अशा सर्वच भागांमध्ये घाटांना ला म्हंटलं जातं. तसे इथेही दिसतील, असं वाटलं आणि दिसलेही. ओगला, धारचुला इत्यादि! परंतु बाकी तिबेटी/ बौद्ध प्रभाव दिसला नाही. ह्याची कारणं कदाचित दोन असतील. एक तर हा भाग हिमालयाच्या अनेक शिखरांमुळे तिबेटशी सलगपणे जोडल्या गेलेला नाही. लदाख किंवा अरुणाचल त्या मानाने जास्त सोप्या प्रकारे जोडलेले आहेत. तसंच उत्तराखंड व त्याला लागून असलेले नेपाळ आणि उत्तर प्रदेश हे बौद्धपेक्षा हिंदु संस्कृतीचा अधिक प्रभाव असलेले आहेत. त्यामुळे कदाचित असेल..... तरीही पिथोरागढमध्ये तिबेटी निर्वासित आहेतच. नेपाळीही आहेत. नेपाळमधून अनेक वेळेस घुसखोरी झाल्याच्या बातम्याही येत असतात.


नकाशा इथे क्लिक करून मोठा करता येईल.


सोबतच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे इथून नेपाळ सीमा अजिबात लांब नव्हती. जेमतेम १० किमीवर नेपाळ होता.... सविस्तर बघण्यासाठी.इथे क्लिक करून वरील नकाशा मोठा करता येईल.

ओगलाला फिरताना मानस सरोवर यात्रेकरूंसाठीचे फलक दिसले. हा मानस सरोवर यात्रेचा मार्ग असेल, असं वाटत नव्हतं, इतका लहान रस्ता होता. थोडं पुढे गेलो, तर हिमशिखरं जवळ आल्याचं जाणवत होतं. त्रिशुल पर्वत दिसत होता. इथले डोंगर मात्र तोडण्यात येत आहेत....... उत्तराखंडमध्ये गेल्या काही काळात रस्ते चांगले झाले आहेत व मूलभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळेच इथल्या निसर्गाला धोकासुद्धा निर्माण झाला आहे आणि पर्यटनाच्या लाटेचे दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.....








वृक्षतोड आणि दूरवर दिसणारे त्रिशुल शिखर

मानस सरोवर यात्रेचा मार्ग!!! एकेकाळी भारताचा भाग असलेलं तिबेट वेगळं झालं व चीनचा भाग बनलं... तरी सुदैवाने सरकारला ही यात्रा सुरू ठेवण्याची सद्बुद्धी झाली...... लदाखमध्ये मानस सरोवरात उगम पावलेली सिंधू नदी पाहिली होती..... आता मानस सरोवराचा मार्ग....... जणू हिमालय परिक्रमा कल्पनेने पूर्ण होत होती.........

बस्तडी हे गाव ओगलापासून पूर्वेकडे म्हणजे नेपाळच्या दिशेने चार- पाच किमी आतमध्ये होतं. इथेही एका ठिकाणी गाडी सोडून देऊन पुढे बरंच चालत जावं लागलं व खाली दरीत उतरावं लागलं. वाटेमध्ये कनालीछीना गावात ब-याच नेपाळी बायका होत्या. कसबा किंवा छोटी वाडी म्हणण्यासारखं गाव असलं तरी दुकानंही बरीच होती. इथे भुईमुगाच्या शेंगा बारीक छिद्रे असलेल्या एका कढईत मंद गतीने भाजतात. त्यामुळे भाजलेल्या शेंगा काळ्या दिसत नाहीत; पण चवीला छान लागतात. गावातून जाताना मोसंबीसारखी बरीच फळं दिसत होती. त्यांना माल्टा म्हणतात. इथली उंची ओगलापेक्षा थोडी जास्त असल्यामुळे मघाचा त्रिशुल पर्वत अधिक स्पष्ट दिसत होता. सर्वत्र सूचिपर्णी झाडं दिसत होती. उताराच्या कच्च्या रस्त्यावर काम चालू होतं. वाहनं येतील असा रस्ता करण्याचं ते काम होतं.


माल्टाचं झाड






नगाधिराज महाराज......




त्रिशुल शिखर








मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए........




पर्वतीय शेती इतकी रम्य आहे!










पहाड सुंदर असला तरी इथलं जगणं खडतर आहे.....



पुढे दरी उतरून जाताना समोरचा नजारा भव्य होता! उंच उंच पहाड आणि खाली खाली जाणारी पायवाट. जगाच्या एका कोप-यात आल्यासारखंच वाटत होतं! दूरवर डोंगरात येताना आलो होतो तो रस्ता दिसत होता...... अद्भुत....... ह्या भागाची उंची पिथोरागढपेक्षा थोडी जास्त म्हणजे सुमारे २००० मीटर्स होती. गावात एक उंचावर शाळासुद्धा होती. घरी जातानाही उताराची पायवाट होती........

इथली घरंसुद्धा एकदम पारंपारिक वाडा पद्धतीची. तीव्र उतारावरच वसलेली. पण अंगण बरंच मोठं. शिवाय गायी- म्हशी व कुत्रेसुद्धा बरेच. कुत्रा प्राणी तर सर्वत्र अनिवार्य. कारण वाघ किंवा इतर धोक्यापासून वाचवण्यासाठी तोच जास्त उपयोगी. इथे घरांच्या कौलावर निवडुंगासारखं रोप लावण्याची पद्धत दिसली. रात्र लवकर झाली आणि रात्रीचं आकाश अत्यंत स्पष्ट होतं. ढग व प्रदूषण नसल्यामुळे तारे चांगले दिसत होते. इथे काफल हे फळ विशेष महत्त्वाचं मानतात. इथला निसर्ग खडतर असल्यामुळे जगण्यात कष्ट जास्त असतात. म्हणूनच इथे लठ्ठ, अधिक वजनाचे लोक जवळजवळ दिसत नाहीत. निसर्गत: काटक असल्यामुळे इथले लोक सेनेमध्येही ब-याच प्रमाणात आहेत. सेनेचं एक मुख्य प्रशिक्षण केंद्र भारतीय सेना अकादमी- देहरादूनलाच आहे.




इथे घरांवर निवडुंग लावलेलं दिसतं.



दुस-या दिवशी उठून परत निघालो. घरातून बाहेर पडल्यावर पंधरा- वीस मिनिट चढ चढून किनालीछीमापर्यंत आलो. येताना दरी, पहाड व दूरवर दिसणारा रस्ता हा अप्रतिम नजारा मनात साठवला. दूरवर बर्फाच्छादित पर्वतही दिसत होते. किनालीछीमामध्ये एक गंमत ही झाली, की लग्नाचे दिवस असल्यामुळे जीपच मिळत नव्हती. थोडा वेळ थांबून शेवटी पायी पायी निघालो.......... नजारा इतका रमणीय व अप्रतिम होता, की पायी जाणं, हीसुद्धा पर्वणी वाटत होती. रस्ता पक्का होता; पण रस्त्याच्या बाजूला घनदाट झाडी व दरी होती. दूरवरून पर्वतशिखरं सोबत देतच होते. आणि रस्त्याला लागूनच सूचिपर्णी देवदार वृक्ष होते. पहाडामध्ये एका उंचीनंतर हे सर्वत्र आढळतात. तीव्र चढ असलेल्या पर्वतावरही दिसतात. रस्त्याच्या जवळ असल्यामुळे काही जवळून बघितले. इतक्या दुर्गम भागामध्ये असलेल्या ह्या वृक्षांची पानं सुईसारखी टोकदार पण नाजुक असतात. इथे जैव विविधता अप्रतिम आहे.........









वाटेत वस्ती जवळजवळ नव्हतीच. ओगला जवळ आल्यावर एक पहाडी खाजगी शाळा दिसली. ओगलामध्ये मानस सरोवर मार्गावर परत थोडा वेळ फिरून परतीच्या मार्गाला आलो. इथे मात्र लवकरच जीप मिळाली आणि पिथोरागढच्या रस्त्याला लागलो. आसपासचा नजारा मात्र अद्भुत होता....... सर्वत्र लांबच लांब पसरलेले डोंगर आणि घाट.......... अद्भुत.......... दूरवरून प्रेरणा देणारे शुभ्र पर्वत.....





एक दिवस पिथोरागढमध्ये थांबून दुस-या दिवशी म्हणजे २ डिसेंबरला सकाळी लवकर निघालो. ज्या मार्गाने आलो होतो, त्याच मार्गाने म्हणजे पिथोरागढ- घाट- दन्या- शहर फाटक असा प्रवास होता. वाटेत मध्ये मध्ये लोखंडी ब्रिज लागत होते व परत परत लदाखची आठवण होत होती. रामगंगा नदीचं दृश्य तर सिंधू नदीच्या दृश्याची आठवण करून देत होतं. दन्या गावात नाश्ता करून परत त्याच कच्च्या रस्त्याने आलो. ब-याच अंतरापर्यंत ओम पर्वत व त्रिशुल पर्वत सोबत करत होते. पुढे घाट उतरल्यानंतर मात्र ते दिसेनासे झाले........ योगी लोकांच्या कर्मभूमीत नावापुरते एक साधू दिसले. येतानाच्या मार्गात फक्त एक बदल असा होता, की सरळ हल्द्वानीला जायच्या ऐवजी नैनिताल बघून काठगोदामला जायचं होतं. त्यामुळे शहर फाटकपासून रस्ता बदलला. नैनितालजवळ बरीच ट्रॅफिक लागेल, असं वाटलं होतं, पण तसं न होता वेळेत नैनितालला पोचलो.




रस्त्यात ढग लागले!



नैनितालच्या आधी बराच मोठा घाट आहे. पण फार अवघड असा नाही. नैनिताल टिपिकल पर्यटन शहर असल्यामुळे बरंच व्यवस्थित दिसत होतं. सगळीकडे सूचना फलक लावलेले होते. सरळ चढणारा रस्ता पार करून नैनितालच्या मुख्य भागात आलो. नैनितालमध्ये बरेच तलाव आहेत. एकूण नऊ असावेत. नैनिताल हे नाव नैना वरून(म्हणजे पार्वती देवीच्या डोळ्यासारख्या तलावावरून) आणि नऊ तलावांवरून पडलं आहे, असं ऐकायला मिळालं. नैनितालच्या जवळ सपाट प्रदेश असला तरीही त्याची उंची सुमारे २००० मीटर्स आहे. त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात इथे जास्त लोक येतात. ब्रिटिशांचं आवडतं स्थान असल्यामुळे काही जुन्या इमारती दिसतात. नैनितालजवळच जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य आहे. पण ते बघण्याचं जमलं नाही. खरं हा सर्व कुमाऊं प्रदेश म्हणजे एके काळी जिम कॉर्बेटची कर्मभूमी होती. इथेच तो शिकारी म्हणून आला, आधी कोणत्याही प्राण्याची शिकार करणारा शिकारी होता; नंतर फक्त नरभक्षक वाघांचा शिकारी झाला आणि पुढे तर त्याने शिकार करणंच सोडून दिलं आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम केलं.








नैनितालमध्ये संध्याकाळी दिसणारा तलाव पाहिला. काठगोदामला रेल्वे घ्यायची असल्यामुळे फार वेळ नव्हता. नैनितालमध्ये थोडसं फिरलो. टिपिकल पर्यटन केंद्र असल्यामुळे बरीच दुकानं, मोठी मोठी दुकानं होती, बाजारपेठ होती. नैनितालच्या तलावामुळे श्रीनगरच्या दल सरोवराची आठवण झाली!

नैनितालवरून परत येतानासुद्धा काहीच गर्दी लागली नाही. रस्ता घाटाचा असला तरी व्यवस्थित होता. लवकरच काठगोदामला पोचलो. असाधारण अशा पर्वतीय प्रदेशातला अल्पसा अनुभव पूर्ण झाला....... मानस सरोवर नाही, पण त्याच्या मार्गावर जाण्याचं समाधान मिळालं.......खरं तर इतकं धावत पळत गेल्यामुळे उत्तराखंड काहीही बघता आला नाही.... परंतु पुढच्या भेटीमध्ये ही उणीव नक्की भरून निघणार.....


काठगोदाममधील रेल्वेचा स्वागत संदेश




पुढील भाग: दिल्ली दर्शन