मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!
ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक आणि मस्ती की पाठशाला
✪ पानी में शिरा और मस्त पोहा!
✪ अंजवेलमधलं भूताचं झाड आणि साप
✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच
✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या!
✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग
✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना
✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा
✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण
✪ सारखी तीच ती संख्या कशी येतेय?
✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे
✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद
✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी!
✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि टीम स्पिरिट
नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं तीन दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. अजूनही शिबिराचा हँगओव्हर जात नाहीय. ह्या शिबिरात खूप सुंदर गोष्टी अनुभवता आल्या. मुलांकडून व सगळ्यांकडून खूप काही शिकता आलं. त्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. बसमधून मुलांना घेऊन निघताना मनात थोडी धाकधुक आहे. मुलांसाठी सत्र व छोटे उपक्रम अनेकदा घेतले आहेत, पण पूर्ण तीन दिवसीय शिबिर घेण्याची ही पहिलीच वेळ! धायरी- कात्रजवरून मुलांना घेत घेत निघालो. चांदणी चौकात शिबिरातली सर्वांत लहान ८ वर्षांची वेदिका आणि इतर चौघे आले आणि बस निघाली! चांदणी चौकात रस्ता चुकण्याचा कार्यक्रम झालाच! पण मृणाल ताई आणि ऋतुराज दादांनी मुलांना अजिबात कंटाळा येऊ दिला नाही. भेंड्या, गाणी आणि गमती सुरू झाल्या. पिरंगुट- पौड- कोळवण मार्गे अंजनवेलचा प्रवास होत गेला आणि उलटीचाही कार्यक्रम सुरू झाला. मृणाल ताई मुलांची काळजी घेत आहेत आणि मुलंही तयारीची आहेत. त्यामुळे उलटी होऊनही कोणाचं हसू थांबत नाहीय!
जवन गावात आणखी छोटे चँपियन्स सोबत आले! सकाळी ९.३० ला अंजनवेलला पोहचलो आणि तिथे अगदी जंगी स्वागत आणि "शिवाजी महाराज की जय" व इतर घोषणांनी अंजनवेल निनादून गेलं! पहिल्यांदाच इथे येणारी व शिबिरालाही पहिल्यांदाच येणारी मुलंही हळु हळु खुलली. सामान डॉर्मिटरीमध्ये ठेवल्यावर व नाश्ता झाल्यावर मुलांनी परिसरात हुंदडायला सुरूवात केली! अंजनवेलचा जगप्रसिद्ध ओढा! मृणाल ताई व ऋतुराज दादा सोबतीला आहेत. काही वेळ मुलांनी ओढ्याचा आनंद घेतल्यावर त्यांना थांबवलं. मुलांसाठी बोर्नव्हिटा दुध तयार आहे!
थोडा वेळ इन्डोअर खेळ खेळल्यावर परत एकदा सगळ्यांनी ओळख करून दिली. मुलांचे दोन गट केले. एका गटाने तुंग नाव घेतलं तर दुस-याने तिकोना! नवीन मित्र- मैत्रिणी व्हावीत म्हणून फेविकॉलच्या जोड्यांना तोडून वेगळं केलं! मुलं विक्रांत सरांसोबत फार्म टूअरला निघाली. सरांनी फार्म टूअरमध्ये अंजनवेलची खूप चांगली ओळख करून दिली. रमेशकाका जगताप ह्यांनी उतारावरच्या पडीक जमिनीतून हिरवीगार परिसर कसा उभा केला, कशी झाडं लावली, कसं पाणी अडवलं, कसं ते वाढत गेलं हे सरांनी सांगितलं. अंजनवेलमधली माड, सोनचाफा, वेगळ्या बटाट्याचं झाड अशी झाडं, उंच झाडावर लढाऊ मुंग्यांनी केलेलं घरटं अशा खूप गमती सरांनी दाखवल्या. रोपवाटिका आणि परिसरातून जाताना सरांनी खेकड्याचं बिळही दाखवलं! लाखो वर्षं पाणी झिरपून तयार झालेली रांजण खळगी त्यांनी दाखवली! आणि हो, अंजनवेलमधल्या भुताच्या झाडाची माहितीही दिली! गायरान सुरक्षित राहावं म्हणून एका झाडाला भुताचं झाड म्हंटलं जायचं! सरांनी सांगितलं की, अंजनवेलमध्ये निसर्ग खूप समृद्ध आहे. इथे सापही आहेत. पण ते विषारी नाहीत आणि कोणाला त्रासही देत नाहीत.
निसर्गाला धक्का न लावता अगदी साध्या पद्धतीने राहणार्या पितळेकाकांचं घर मुलांनी बघितलं. इतक्या जंगलातही असं सहजपणे राहता येतं हे बघून मुलांना आश्चर्य वाटलं! रमेशकाकांनाही मुलं भेटले. तिथे त्यांच्या नातवांनी केलेला सिंहगड बघितला. खूप मेहनतीने उभा केलेला हा किल्ला! आणि तिथेच दूरवर तिकोनाही दिसला. पुढे शेततळं आणि सापाचं वारूळसुद्धा मुलांनी बघितलं. तिथून ओढ्याकडे येताना विक्रांत सरांनी मुलांना जायंट स्पायडर अर्थात् "विराट कोळी" दाखवला! मुलांनी विराट अशी मादी आणि छोटुकला गुलाबी नरसुद्धा ओळखला. इंद्रायणी भात शेती मुलांनी बघितली. सुरवंटाचं निरीक्षणही केलं. ओढ्याच्या गर्जनेमध्ये फिरून मुलं परत आली. मृणाल ताईंनी एक मोठ्ठा खेकडा पकडून धरला आणि मुलांना दाखवला! सगळ्यांनी त्याला हात लावला! डोळ्यांना हात लावल्यावर त्याने हळुच डोळे मिटले!
शेवयाची खीर, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबिर आणि बरंच काही असं जेवण केल्यानंतर मुलांनी खजिन्याचा शोध घेतला! खूपच वेगाने एक एक चिठ्ठीचा अर्ध लावत मुलं धावत सुटली! आवाज करणारे बदक, पार्किंग, चिमुकला सिंहगड, किचन, ओढा, स्विमिंग पूल असं सगळीकडे पळत त्यांनी चिठ्ठ्या शोधल्या. एक एक चिट्ठी सापडल्यावर त्यांचा उत्साह, आनंद आणि पुढच्या चिट्ठीची उत्कंठा बघण्यासारखी आहे! शेवटच्या चिठ्ठीनंतर त्यांना पुस्तक रूपी खजिना सापडला! दुपारी मुलांनी थोडा आराम केला. तुंग व तिकोना गटांनी एकमेकांसाठी खजिना शोधाच्या चिठ्ठ्य बनवल्या! त्यामध्येही दोन्ही गटातले काही खेळाडू दुसर्या गटावर हेरगिरी करताना पकडले गेलेच! आणि मग आर्या, गिरीजा, मोठी वेदिका अशी मोठी मुलं आणि त्यांचा "तात्या" म्हणजेच छोटा श्रीयांश असा टॉम अँड जेरीचा खेळ सुरू झाला! चिमुकला श्रीयांशही मोठ्या ताईंना जेरीस आणतोय! बर्थडे गर्ल अवनी आणि श्रीविद्या नव्हे श्रीवल्ली ह्या दोघी बेस्ट फ्रेंडस आहेत की बेस्ट एनिमीज आहेत हेच कळत नाहीय! मधूनच वेगळीच शिट्टी वाजवणारा स्वराज! त्यातही कोणी बोअर झालं तर त्यांना पेरू करायला इतर आहेतच. श्रेयस, अवनीश, कृष्णा, हेरंब, तीर्थ, शौर्य असे मुलंही हळु हळु एकमेकांमध्ये समरस होत आहेत.
दुपारनंतर मुलांनी स्विमिंग पूलचा आनंद घेतला! त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पानी में शिरा और मस्त पोहा! २० पैकी जवळ जवळ १५ जणांना स्विमिंग नीट जमतंय आणि ज्यांना येत नाहीय, तेही पाण्याला घाबरत नाहीच आहेत हा आनंदाचा धक्का आहे! छोटीशी वेदिकासुद्धा मस्त पोहतेय. वातावरण बदललं आणि पाऊस सुरू झाला तरी आनंदावर काही पाणी पडत नाहीय! एकमेकांसोबत मस्ती, धक्काबुक्की, खुन्नस, ढकला- ढकली मस्त सुरू झाली! छोट्या मुलांवर मृणाल ताईंचं लक्ष आहे. पाऊस असल्यामुळे छोट्या मुलांना लवकर आवरावं लागलं. सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतल्यावर स्वत:ला कोरडं केलं आणि मग पावसासोबत भजीचा आनंद घेतला! कॅरम, मिनी गोल्फ, टेबल टेनिस, चेंडू हलवून छिद्रात पाडण्याचा एक खेळ, नेमबाजी असे इन्डोअर खेळ आणि गप्पा मुलांच्या सुरू राहिल्या.
संध्याकाळचे दाट ढग आणि पावसाचं वातावरण! आजूबाजूचे डोंगर ढगांमध्ये गेले. खळाळत्या ओढ्याची गर्जना! संध्याकाळी मुलांसोबत आम्ही सगळे बसलो. चायनीज विस्पर, बैठे खेळ, कोडी अशा गमती मुलांसोबत घेतल्या. विक्रांत सरांनी खणखणीत आवाजात "रणी फडकते लाखो झेंडे" गीत गायलं. "मोराने पिसारा फुलवला" हे शब्द एकमेकांकडून दुसरीकडे जात कसे बदलतात ती गंमत मुलांनी अनुभवली. एकाने हावभाव करून दाखवायचे व रांगेतल्या मुलांनी पाठीवर थाप देऊन ते पुढे सांगायचे असा खेळ राहुल सरांनी घेतला. बर्थडे गर्ल अवनीने रोमांचकारी व स्फूर्तिदायी सादर गारद केली! मुलांना चर्चा करून मांडणी करण्यासाठी विषय दिला- "तुमची मैत्रीण गणितात कच्ची आहे, बरेच दिवस आजारी असल्याने तिची शाळा बुडली. तर तुम्ही तिला कशी मदत कराल?" सगळ्यांनी गटामध्ये चर्चा केली. इतका साधा छोटा मुद्दा. पण मुलांनी मिळून त्यावर खूप विचारमंथन केलं आणि प्रत्येक गटाने छान सादरीकरणही केलं. अनेक पैलूंवर विचार केला. आम्ही तिला गणितात मदत करू, आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ सांगू असंही मुलं म्हणाले! तुम्हांला गणित चांगलं येतं का, तुमचं आरोग्य उत्तम आहे का, असं विचारल्यावर "होsss" म्हणाले!
संध्याकाळी बर्थडे गर्ल अवनीच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तिचे व तिची "बेस्टी" श्रीविद्या नव्हे श्रीवल्लीचे आई- बाबा आले तरी त्या मित्र- मैत्रिणींमध्येच रमल्या. जेवण लवकर झाल्यावर मुलं झोपायच्या वाटेवर आहेत. पहाटे लवकर उठून आल्यामुळे आणि दिवसभर मनसोक्त उंडारल्यामुळे मुलं दमली आहेत. मुलांच्या डॉर्मिटरीत मुलं व दुसर्या डॉर्मिटरीत मुली गुडूप झाल्या. योगनिद्रा ऐकत मुलं लगेचच झोपून गेली! पावसामुळे आकाश दर्शन आणि कँप फायर होऊ शकलं नाही.
दिवस २
राहुल सरांनी "श्री व्यंकटेशा सुप्रभातम्" अर्थात् "कौशल्या सुप्रजा राम पूर्वसंध्या प्रवर्तते" सह केली. एकेकाला हलवून आणि पांघरून ओढून उठवलं! उठणंही गमतीशीर केलं! उठल्यावर आवरताना मुलांना बेडकांचं व खेकड्यांचं दर्शन झालं! पण कोणालाच भिती किंवा किळस वाटली नाही. आणि इकडे तिकडे मधूनच येणार्या गुरूलाही कोणी घाबरले नाहीत! सगळ्यांचं आवरून झाल्यावर विक्रांत सरांनी उपासना घेतली. पाऊस थांबला आहे पण डोंगरांवर मस्त ढग आले आहेत. चहा बिस्कीट झाल्यावर राहुल सर, विक्रांत सर, मृणाल ताई, ऋतुराज दादा आणि सगळी बच्चे कंपनी जवळच्या डोंगरावर भटकंतीला निघाले. शेत आणि गवतातून वर चढणारी पायवाट! कुठे घसरगुंडी तर कुठे उडी! मस्तीखोर तात्या अर्थात् छोटा श्रीयांश आणि छोटी वेदिका मजेत चढत गेले. वर पोहचल्यावर दूरवर तुंग आणि तिकोना दिसले! पवना जलाशयाचं पाणी दिसलं. मुलांनी बायनॅक्युलरमधून ही दृश्य बघितली. विक्रांत सर व राहुल सरांनी शेताची व झाडा- झुडुपांची माहिती दिली. इथे खेकड्याची इतकी बिळं बघून आत्मजाने डोंगराल खेकडोंगर नाव दिलं! मुलांनी फुलं- पानंही उतरताना सोबत घेतली.
दमून आल्यावर इडली सांबारचा नाश्ता मुलांनी केला. नाश्त्यानंतर त्यांना टेलिस्कोपला सोलार फिल्टर लावून सौर डाग दाखवता आले. पृथ्वीपेक्षाही मोठे असलेले हे डाग म्हणजे सूर्यावरच्या आगीतली कमी तेजस्वी आग. फिल्टरमधून दिसणारा कोवळा संत्र्यासारखा सूर्य. जणू मार्तंड जे तापहिन! पाऊस थांबल्यानंतर आणि थोड्या विश्रांतीनंतर मुलांनी मनसोक्त खेळायला सुरूवात केली. मृणाल ताईंनी त्यांचे जोड साखळी आणि विष अमृत असे खेळ घेतले! एकमेकांसोबत मिळून मुलं रंगून गेली आहेत! मुलांच्या साखळीतून छोटी मुलं खाली वाकून बाजूला जात आहेत! एकमेकांवर पडत आहेत, ओरडत आहेत आणि नाचत आहेत! पाठलाग करत आहेत. मध्येच लुटुपुटीची लढाई आणि खोटं रडणं! खूप छान वाटलं हे बघताना! अशा वातावरणामुळे अनोळखी मुलंही दोस्त झाले! एकमेकांमध्ये मिसळून गेले. काही जणांनी त्यांना येणार्या कविता, गाणी किंवा कला सादर केली. छोट्या वेदिकाने कोडी सांगितली. श्रीविद्या नव्हे श्रीवल्लीने डोरेमॉन व सिंचॅनचे आवाज काढून सगळ्यांना हसवलं.
दुपारी जेवणाच्या आधी परत एकदा मुलांच्या आग्रहाखातर त्यांना स्विमिंग पूलमध्ये जाऊ दिलं. आज पाऊस नाहीय आणि गरम होतंय. गरम हवेत पोहण्याचा आनंद त्यांनी घेतला. ते पोहत असताना राहुल सरांची मदत घेऊन परत एकदा खजिन्याच्या शोधासाठी चिठ्ठ्या पेरून ठेवल्या. अंजनवेल परिसरातली सोनटक्क्यासारखी झाडं, जात्यासारख्या वस्तु, आंब्याच्या झाडावर आलेलं पेरूचं झाड, झिपलाईनच झाड, ओढ्याजवळचं मचाण अशा ठिकाणी चिठ्ठ्या ठेवल्या! पहिल्या वेळेपेक्षा त्या अवघड केल्या. मुलांना आवडेल असा खजिना म्हणून आईसक्रीमची व्यवस्था सरांनी केली!
जेवल्यावर थोडी विश्रांती घेऊन मुलांनी खजिन्याचा शोध सुरू केला! सगळ्यांनी मिळून चिठ्ठ्या शोधल्या. कुठे कुठे त्यांना वेळ लागला. पण शोधाची मजाही मिळाली. दुपारी मुलांनी इन्डोअर खेळ खेळले. त्यांच्या आपापसात गप्पा होत गेल्या. काही जणांनी आणलेले पुस्तकं वाचले. संध्याकाळी तुंग व तिकोना टीमला किल्ला उभा करण्याचं काम दिलं गेलं. त्यांनी श्रेयस व कृष्णाने उभा केलेला अंजनवेलचा सिंहगड नीट पाहिला. आणि एकत्र येऊन काम सुरू केलं. दगड, माती, गोणपाट, काड्या अशा गोष्टी वापरून किल्ला बनवायची सुरूवात केली. दोन्ही गटांमध्ये स्पर्धा व खुन्नस आहेच. पण त्याबरोबर ते एकमेकांची मदतही करत आहेत! गोणपाट एका टीमने दुसर्या टीमला दिला. कात्रीही वापरू दिली! श्रीयांश, छोटी वेदिकासुद्धा दगड उचलून आणत आहेत. मोठी मुलं त्यांना संभाळून घेत आहेत. स्वरा, आरोही, हेरंब असे सगळे जण आपापल्या टीममध्ये मिळून काम करत आहेत! काही जणींची तीव्र इच्छा होती की, त्या एकाच टीममध्ये हव्यात. पण फेविकॉलच्या जोड्या तोडल्या गेल्या आहेत! छोट्या श्रीयांशचं त्याच्या ताईंसोबत मस्त भांडण- प्रेमाचं विष अमृत सुरू आहे! चिडवल्यावर त्यांचे केस ओढून त्यानेही त्यांना अद्दल घडवली! सगळ्यांनी साहित्य आणलं आणि चिखल- मातीसोबत खेळून किल्ला उभा केला! अवनीने मस्त गारद सादर केली आणि तिकोना- तुंगचं वातावरण आणखी उत्तुंग केलं!
आकाश बरचसं स्वच्छ असल्यामुळे मुलांना दुर्बिणीतून चंद्र बघता आला. चंद्रावरचे वेगवेगळे खड्डे आणि मैदानं त्यांनी बघितले. शनिची कडीही बघितली. पॉईंटर वापरून त्यांना काही मुख्य तारे दाखवता आले. जेवणाच्या आधी मुलांसाठी एक खूप वेगळा कार्यक्रम सादर झाला. कॅप्टन यशोधन मराठे सरांनी त्यांचे नौदलातले व हेलिकॉप्टर उडवण्याचे अनुभव मुलांना सांगितले. मुलांच्या सगळ्या प्रश्नांची मनापासून उत्तरं दिली! स्मगलिंग म्हणजे काय, भर समुद्रात पाऊस अचानक आला तर हेलिकॉप्टर कुठे जाईल, रात्री रस्ता कसा शोधतात, पूर्वी कसे नकाशा शोधायचे अशा प्रश्नांची उत्तरं दिली! आत्मजाचे प्रश्न ऐकून त्यांनीच तिला विचारलं की, तू गुप्तहेरांच्या कथा वाचल्या आहेत का! श्रीविद्या नव्हे श्रीवल्लीचे प्रश्नही छान आहेत. रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ मुलांना मोकळा मिळाला. गप्पा आणि इन्डोअर खेळ ते खेळले आणि हळु हळु झोपायला आले. पहाटे आकाश दर्शन होईल असं त्यांना सांगितलं. झोपण्याच्या आधी काही मुलांनी योग निद्रा परत हवी असं सांगितलं!
दिवस ३
पहाटे ४ वाजता उठून बाहेर आकाश बघितलं. अहा हा! थोडे ढग असले तरी व्याध, मृग नक्षत्र, तेजस्वी गुरू, पुनर्वसू, कृत्तिका तारकागुच्छ अशी मंडळी आलेली आहेत. टेलिस्कोपमधून आकाश दर्शन केलं. नंतर ५ वाजता मुलांना हलकेच हाक मारली. ते उठण्याची वाट बघून परत आकाश दर्शन केलं आणि फोटोग्राफीही केली. कॅप्टन यशोधन मराठे सरही आकाश दर्शनासाठी आले आणि त्यांच्यासोबत संवाद करता आला. खूप छान चर्चा झाली. पहाटेच्या आकाशातलं मृग नक्षत्र व त्यात दिसलेल्या उल्का-
मुलं उठल्यावर व आवरून झाल्यावर त्यांनी चहा- बिस्कीट घेतलं. विक्रांत सर व राहुल सरांनी त्यांना हसवत हसवत वॉर्म अप घेतले! वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेचिंगच्या हालचाली आणि सोपे योगासन करून मुलं तयार झाली! आत्मजा, छोटी वेदिका, श्रीविद्या, शौर्य आणि आणखी काही मुलांनी धनुरासन, चक्रासन, पश्चिमोत्तानास, नौकासन अशी आसनं करून दाखवली! नौकासनानंतर नौकायुद्ध झालं! मानवी नौका करून त्यांचं युद्ध! मुलांना फार मजा आली! तशीच रस्सीखेच! दोरी कुठेय असं विचारल्यावर राहुल सरांनी सांगितलं की, आपणच दोरी बनायचं! त्यामध्ये खेचल्यावर मुलं ओढली गेली, पण कोणालाच त्रास झाला नाही. आनंदच वाटला. आणि हात सोडल्यावर मस्त जमिनीवर पडली! एक खूप वेगळा आनंद आणि अनुभव मुलांना मिळाला! आणि मस्त दमल्यावर मुलांना दही थालीपीठ व चटणीचा नाश्ता मिळाला आणि तो मुलांच्यामते सुपरहीट ठरला! अंजनवेलच्या सगळ्या टीमने मुलांची काळजी घेतली आणि त्यांच्याकडे सतत लक्ष दिलं.
थोडा वेळ ब्रेक दिल्यानंतर मुलांनी परत स्विमिंग पूलचा हट्ट केला. राहुल सरांनी त्यांना "हो" म्हंटल्यावर सगळ्यांनी स्विमिंग पुलाकडे धाव घेतली! मुलांना सोबत करणारे ऋतुराज दादा, साहिल दादा व अमिषा ताईसुद्धा स्वत:ला थांबवू शकले नाहीत. निघायची वेळ जवळ येताना ओढ्याजवळच्या मचाणावर मुलांना गणितातल्या गमती सांगितल्या. ४९५ ही संख्या अशी आहे की, त्यामधले अंक उतरत्या क्रमाने घेऊन येणारी मोठी संख्या- ९५४ ही अंक चढत्या क्रमाने घेऊन येणारी लहान संख्या ४५९ ह्यांची वजाबाकी केली तर ४९५ हेच उत्तर मिळतं. कोणत्याही वेगवेगळे अंक असलेल्या ३ अंकी संख्येसोबत हीच प्रक्रिया केली तर शेवटी ४९५ हेच उत्तर मिळतं. चार अंकी संख्यांमध्ये ही संख्या ६१७४ आहे. ह्या दोन्ही संख्या कापरेकर स्थिरांक म्हणून ओळखल्या जातात. नंतर मुलांना प्रकाशाचं अपवर्तन (diffraction of light) होऊन दिशा बदलणारा बाण आणि बुडणारा व तरंगणारा बटाटा ह्या दोन वैज्ञानिक गमतीही दाखवल्या.
परतीच्या प्रवासात उलटीचा त्रास नको म्हणून दुपारी मसालेभाताचं जेवण मुलांनी केलं. जेवण झाल्यावर मुलांनी आपापले अभिप्राय दिले. शिबिरात काय आवडलं, काय आवडलं नाही ते सांगितलं. त्याबरोबर त्यांना येणार्या गोष्टी, गाणीही गायली. छोट्या वेदिकाने "ए मेरे वतन के लोगो" सुंदर गायलं! हेरंबने "तेरी मिट्टी में मिल जावां" हे मोठ्ठ गाणं न अडखळता गायलं! बहुतेक बेडकंही सगळ्यांना आवडली असावीत, कारण कोणीच न आवडलेल्या गोष्टींमध्ये त्यांचा उल्लेख केला नाही! न आवडलेल्या गोष्टींमध्ये बसचा प्रवास काही मुलांनी सांगितला. अंजनवेलमधलं घरासारखं वातावरण, कॅप्टन सरांचं सत्र, खेळ, गमती, आकाश दर्शन अशा गोष्टींबद्दल त्यांनी चांगलं मत दिलं. योगनिद्रेमुळे झोप लवकर लागली असंही सांगितलं. मुलांची ऊर्जा, ग्रहण शक्ती आणि समंजसपणाही त्यातून दिसला. अशा प्रकारे वेळ संपत आल्यामुळे मुलांना हळु हळु निघण्याची तयारी करावी लागली. पण गंमत अशी की, अगदी सामान ठेवल्यावर बसला वेळ असतानाही मुलं खेळत होती!
... परतीचा प्रवास सुरळीत झाला. उलटीचा व्यत्यय न येता मुलं वेळेत आपापल्या घरी पोहचली. कोणालाही दमल्यामुळे त्रास झाला नाही! शिबिरामध्ये मुलांनी तुफान धमाल केल्या असल्या तरी अंजनवेलमध्ये खूप गमती त्यांची वाट पाहात आहेत! आणि त्यासाठी मुलांना परत यावं लागणार आहे!
वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. - निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 30 ऑक्टोबर 2025.

No comments:
Post a Comment
Thanks for reading my blog! Do share with your near ones.