Showing posts with label गणित. Show all posts
Showing posts with label गणित. Show all posts

Wednesday, May 13, 2026

सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!

✪ एक, दोन, तीन... “बाय!”
✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह
✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्‍या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई
✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग
✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं
✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण
✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल
✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू
✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!”
✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी

नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं अडीच दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. मुलांचं शिबिर घेण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि वेगळा होता. मुलांची विलक्षण ऊर्जा, उत्साह, त्यांची प्रसन्नता आणि मस्ती जवळून बघता आली. शिबिरामध्ये अविस्मरणीय अशा आठवणी मिळाल्या. त्या शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. 

मुलांसाठी आकाश दर्शन, फन- लर्न किंवा गणित- विज्ञानातील गमती असे उपक्रम अनेक वर्षांपासून करत असलो तरी शिबिर असं हे दुसरंच. मागच्या वर्षी मुलांचं शिबिर जिथे झालं होतं त्या शिळिंबमधल्या अंजनवेलमध्येच हे शिबिर झालं. ह्यावेळी शिबिरामध्ये मुलांसाठी कला कौशल्य कार्यशाळा घेणार्‍या अमृताताई ढगे एका सत्रासाठी आल्या. पर्यावरण, शिक्षण आणि योग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या व मुलांसाठी वाचन- निसर्ग भ्रमंती असे उपक्रम करणार्‍या डॉ. स्नेहलताई देवकर- पाठकसुद्धा पूर्ण वेळ शिबिरात होत्या. लहान मुलांसाठी सत्र घेणार्‍या नेहाताई देशपांडेसुद्धा शिबिरात पूर्ण वेळ होत्या. त्यामुळे कला कौशल्ये, रेखाटन, निसर्ग वाचन, अभिनय, परिसर भ्रमंती आणि अभ्यास अशी वेगळी मेजवानीही मुलांना मिळाली. आम्हा तिघांसोबत अंजनवेलमधले सर्व जणसुद्धा शिबिरामध्ये होतेच.

Thursday, October 30, 2025

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला 

✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा!
✪ अंजवेलमधलं भूताचं झाड आणि साप
✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच
✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! 
✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग
✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना
✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा
✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण
✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय?
✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे
✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद
✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी!
✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि टीम स्पिरिट

नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं तीन दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. अजूनही शिबिराचा हँगओव्हर जात नाहीय. ह्या शिबिरात खूप सुंदर गोष्टी अनुभवता आल्या. मुलांकडून व सगळ्यांकडून खूप काही‌ शिकता आलं. त्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. बसमधून मुलांना घेऊन निघताना मनात थोडी धाकधुक आहे. मुलांसाठी सत्र व छोटे उपक्रम अनेकदा घेतले आहेत, पण पूर्ण तीन दिवसीय शिबिर घेण्याची ही पहिलीच वेळ! धायरी- कात्रजवरून मुलांना घेत घेत निघालो. चांदणी चौकात शिबिरातली सर्वांत लहान ८ वर्षांची वेदिका आणि इतर चौघे आले आणि बस निघाली! चांदणी चौकात रस्ता चुकण्याचा कार्यक्रम झालाच! पण मृणाल ताई आणि ऋतुराज दादांनी मुलांना अजिबात कंटाळा येऊ दिला नाही. भेंड्या, गाणी आणि गमती सुरू झाल्या. पिरंगुट- पौड- कोळवण मार्गे अंजनवेलचा प्रवास होत गेला आणि उलटीचाही कार्यक्रम सुरू झाला. मृणाल ताई मुलांची काळजी घेत आहेत आणि मुलंही तयारीची आहेत. त्यामुळे उलटी होऊनही कोणाचं हसू थांबत नाहीय!

जवन गावात आणखी छोटे चँपियन्स सोबत आले! सकाळी ९.३० ला अंजनवेलला पोहचलो आणि तिथे अगदी जंगी स्वागत आणि "शिवाजी महाराज की जय" व इतर घोषणांनी अंजनवेल निनादून गेलं! पहिल्यांदाच इथे येणारी व शिबिरालाही पहिल्यांदाच येणारी मुलंही हळु हळु खुलली. सामान डॉर्मिटरीमध्ये ठेवल्यावर व नाश्ता झाल्यावर मुलांनी परिसरात हुंदडायला सुरूवात केली! अंजनवेलचा जगप्रसिद्ध ओढा! मृणाल ताई व ऋतुराज दादा सोबतीला आहेत. काही वेळ मुलांनी ओढ्याचा आनंद घेतल्यावर त्यांना थांबवलं. मुलांसाठी बोर्नव्हिटा दुध तयार आहे! 

थोडा वेळ इन्डोअर खेळ खेळल्यावर परत एकदा सगळ्यांनी ओळख करून दिली.  मुलांचे दोन गट केले. एका गटाने तुंग नाव घेतलं तर दुस-याने तिकोना! नवीन मित्र- मैत्रिणी व्हावीत म्हणून फेविकॉलच्या जोड्यांना तोडून वेगळं केलं! मुलं विक्रांत सरांसोबत फार्म टूअरला निघाली. सरांनी फार्म टूअरमध्ये अंजनवेलची खूप चांगली ओळख करून दिली. रमेशकाका जगताप ह्यांनी उतारावरच्या पडीक जमिनीतून हिरवीगार परिसर कसा उभा केला, कशी झाडं लावली, कसं‌ पाणी अडवलं, कसं ते वाढत गेलं हे सरांनी सांगितलं. अंजनवेलमधली माड, सोनचाफा, वेगळ्या बटाट्याचं झाड अशी झाडं, उंच झाडावर लढाऊ मुंग्यांनी केलेलं घरटं अशा खूप गमती‌ सरांनी दाखवल्या. रोपवाटिका आणि परिसरातून जाताना सरांनी खेकड्याचं बिळही दाखवलं! लाखो वर्षं पाणी झिरपून तयार झालेली रांजण खळगी त्यांनी दाखवली! आणि हो, अंजनवेलमधल्या भुताच्या झाडाची माहितीही दिली! गायरान सुरक्षित राहावं म्हणून एका झाडाला भुताचं झाड म्हंटलं जायचं!  सरांनी सांगितलं की, अंजनवेलमध्ये निसर्ग खूप समृद्ध आहे. इथे सापही आहेत. पण ते विषारी नाहीत आणि कोणाला त्रासही‌ देत नाहीत.


Sunday, December 22, 2024

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं!
✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती"
✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद"
✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं!
✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं
✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत?

नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला. अगदी तिसरी- चौथीपासूनची मुलं गणितातील गमती कशा रंगून जाऊन सांगतात, कसे गणित शिकवणारेही होतात हे अदूसोबत बघता आलं! हा सगळा कार्यक्रमच अफाट सुंदर होता. कार्यक्रमाबरोबर प्रक्रियाचं केंद्रसुद्धा. मुलांना तिथे किती मजा येत असेल, तिथे मुलं काय काय शिकत व शिकवत असतील, हेसुद्धा कळालं.

आजच्या गणित दिवसानिमित्त तिसरी ते सहावीच्या मुलांनी सात ते आठ स्टॉल्स लावले होते. प्रत्येक स्टॉलवर कागद, खडू, फळा, स्वत: तयार केलेल्या आकृत्या ह्यांचा वापर करून मुलं गणितातल्या प्राथमिक संकल्पना समजावून सांगत होते. प्रत्येक स्टॉलवर तीन मुलं. संख्यारेषेपासून ते थेट वर्गमूळ, समीकरण व अपूर्णांकांपर्यंत! आणि मुलं हे सगळं सांगत असताना व समजावून देत असताना कोणीही शिक्षक किंवा "प्रक्रियाचे" सदस्य त्यांच्यासोबत नव्हते. मुलांनीच प्रत्येक स्टॉलवर आपापसात गोष्टी ठरवल्या होत्या की, कोणी मल्टीपल (पट) सांगेल, कोणी फॅक्टर (अवयव/ गुणक) सांगेल. मल्टीपलची मुलांनी सांगितलेली सोपी व्याख्या म्हणजे पाढ्यातल्या संख्या! आधुनिक पाटीवर संख्या मांडून मुलं गणिताच्या संकल्पना सोप्या करून सांगत होती. त्याबरोबर वर्ग- वर्गमूळसुद्धा सांगत होती. ज्या संख्येचे विषम अवयव असतात, त्या संख्येचा सगळ्यांत मध्ये असलेला अवयव वर्गमूळ असतो. जसे १६ चे १, २, ४, ८, १६ हे अवयव आहेत. त्यांच्यामध्ये ४ येतो व तो वर्गमूळ आहे असं. १२ संख्येचे अवयव १, २, ३, ४, ६, १२ असे समच आहेत म्हणून १२ चं वर्गमूळ नाही असं.