Wednesday, May 13, 2026

सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!

✪ एक, दोन, तीन... “बाय!”
✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह
✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्‍या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई
✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग
✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं
✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण
✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल
✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू
✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!”
✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी

नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं अडीच दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. मुलांचं शिबिर घेण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि वेगळा होता. मुलांची विलक्षण ऊर्जा, उत्साह, त्यांची प्रसन्नता आणि मस्ती जवळून बघता आली. शिबिरामध्ये अविस्मरणीय अशा आठवणी मिळाल्या. त्या शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. 

मुलांसाठी आकाश दर्शन, फन- लर्न किंवा गणित- विज्ञानातील गमती असे उपक्रम अनेक वर्षांपासून करत असलो तरी शिबिर असं हे दुसरंच. मागच्या वर्षी मुलांचं शिबिर जिथे झालं होतं त्या शिळिंबमधल्या अंजनवेलमध्येच हे शिबिर झालं. ह्यावेळी शिबिरामध्ये मुलांसाठी कला कौशल्य कार्यशाळा घेणार्‍या अमृताताई ढगे एका सत्रासाठी आल्या. पर्यावरण, शिक्षण आणि योग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या व मुलांसाठी वाचन- निसर्ग भ्रमंती असे उपक्रम करणार्‍या डॉ. स्नेहलताई देवकर- पाठकसुद्धा पूर्ण वेळ शिबिरात होत्या. लहान मुलांसाठी सत्र घेणार्‍या नेहाताई देशपांडेसुद्धा शिबिरात पूर्ण वेळ होत्या. त्यामुळे कला कौशल्ये, रेखाटन, निसर्ग वाचन, अभिनय, परिसर भ्रमंती आणि अभ्यास अशी वेगळी मेजवानीही मुलांना मिळाली. आम्हा तिघांसोबत अंजनवेलमधले सर्व जणसुद्धा शिबिरामध्ये होतेच.



एक, दोन, तीन... "बाय!"

१० मे च्या सकाळी ७ वाजता सिंहगड रोडवरून बस निघाली आणि मुलं हळु हळु चढत गेली. एकाच वेळी इतक्या मुलांच्या जवाबदारीचा हलकासा ताण वाटतोय आणि त्याबरोबर मुलांसोबत खूप मजा करायला मिळणार ह्याचा आनंदही होतोय. धायरी फाटा, सारस बाग, डेक्कन कॉर्नर आणि वनाजवर मुलं चढली. काही मुलं तर पहिल्यांदाच आई- बाबांपासून लांब राहणार आहेत! पालकांची काळजी, निरोप देतानाचे चेहरे आणि मुलांचे चेहरे! पालकांचं विश्वासाने मुलांना पाठवणं! लहान मुलांनी एकट्याने आई- बाबांपासून दूर जाण्याची हिंमत करणं! बसमध्ये आलेल्या मुलांना आम्ही बसवलं. स्नेहलताईंनी एक, दोन, तीन म्हंटल्यावर सगळी मुलं एका सुरात "बाय!" म्हणाली आणि खुलली!

शिळिंबमधलं अंजनवेल पुण्यापासून फक्त ४५ किमी अंतरावर. हे फार्म हाऊस नाही तर घरापासून दूर निसर्गातलं वेगळं घरच आहे. अनेक उपक्रम तिथे होत असतात. निसर्गरम्य परिसर आणि मजा- मस्ती करायची कित्येक साधनं! मोकळी खेळायची जागा! आणि स्विमिंग पूल! शिवाय ओढा, अनेक खेळ आणि सुंदर झाडं! आता ही मजा मुलांना अनुभवायला मिळणार ह्याचा आनंद होतोय. डॉ. स्नेहलताई आणि नेहाताईंनी मुलांशी गप्पा सुरू केल्या. मी आणि विक्रांत दादासुद्धा प्रत्येकाशी बोललो. आधीच्या शिबिरातली काही मुलंही आहेत. त्यांच्याशीही छान गप्पा झाल्या. छोटी मुलंही छान बसली. त्यांच्या एकमेकांसोबत गप्पा सुरू झाल्या. छोट्यांना उलटीचा त्रास होईल का अशी भिती होती. पण वकार युनुस काही आलाच नाही आणि आम्ही अंजनवेलला ९:१५ ला पोहचलो.

सरड्याने केला शुभारंभ

मुलं पोहचल्यावर राहुल दादा आणि अंजनवेल कुटुंबीयांनी त्यांचं जंगी स्वागत केलं! डॉर्मिटरीत सामान ठेवून मुलं उत्सुकतेने भरलेल्या डोळ्यांनी परिसर बघत आहेत! लवकरच त्यांचा खेळ सुरू झाला! हिरव्यागार लॉनवर फिरणं- झोपाळा- बॅडमिंटन सुरू झालं. त्यांना कसंबसं थांबवून नाश्त्याला बोलावलं. मिसळ पावचा आस्वाद घेत त्यांची एकमेकांशी ओळख होते आहे. मुंबईहून ईरा आली आणि अंजनवेलचेच कृष्णा आणि श्रेयसही मुलांना भेटले. नाश्त्यानंतर मुलांची पहिली ऍक्टिव्हिटी स्नेहलताई घेणार तितक्यात मुलं म्हणाले, तो बघा एक सरडा दिसतोय! लालसर आणि काळपट रंगाचा सरडा झाडावर दिसला! झाडं, पशु- पक्षी आणि निसर्ग वाचन तज्ज्ञ असलेल्या डॉ. स्नेहलताईंनी लगेच मुलांना तो नीट दाखवला. काही प्राणी रंग का बदलतात, आणि या सरड्याचा रंग असा का असेल यावर चर्चा केली. दुसरं रूप घेण्याचा (कॉमोफ्लेज) विषय निघाला आणि मुलांनी त्यांना भरपूर प्रश्न विचारले. अशाप्रकारे सरड्याच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला!

अद्भुत रांजणखळगे आणि बेडकांची अंडी

त्यानंतर थोडे एनर्जायजर्स झाले आणि मुलांचे पाच गट केले गेले. साधारण २८ मुलं आहेत. लहान- मोठे आणि मुलं- मुली एकत्र असलेले गट केले गेले. अळीसारखी हालचाल करून आणि एका लयीत टाळ्या वाजवून मुलांचा उत्साह स्नेहलताईंनी‌ वाढवला. अगदी "कष्ट टाळू" टीशर्ट असलेली ओवीसुद्धा उत्साहाने पुढे येते आहे. सगळ्यांनी आपली ओळखही करून दिली. मनवा, श्रीविद्या, समर्थ आणि अवनीसारखी मुलं तर अथलेटिक्स, सायकलिंग, रनिंग अशा खेळांमध्ये चँपियन आहेत. कोणाला कथ्थक नृत्य आवडतं! तर अरिणी चक्क पुस्तक लिहीतेय हे कळालं! मुलांचे कला- गुण कळण्याची ही‌ फक्त सुरूवात होती.  ऊन जास्त वाढण्याच्या आत अंजनवेलच्या परिसरात राहुल दादांनी मुलांना मस्त फिरवलं. अंजनवेलच्या परिसरात खूप काही बघण्यासारखं आहे. इथे तीन- चार वेळेस येऊनही गोष्टी कळत नाही, इतकी विविधता इथे आहे. हिरव्यागार नर्सरीपासून ही भ्रमंती सुरू झाली. फुलपाखरांनी मुलांचं स्वागत केलं. गवतावर चढलेला भुंगेरा किडा म्हणजे मेटलिक ग्रीन बीटलसुद्धा मुलांनी जवळून बघितला. ताईंनी त्याची माहिती दिली.

राहुल दादांनी मुलांना पॅगोडा मुंग्यांचं घरटं दाखवलं! इतक्या उंचावर हे घरटं त्या मुंग्या बांधतात. मोठा पाऊसही आत जाऊ शकत नाही इतकं ते भक्कम असतं. माती, काड्या, पाचोळा अशा गोष्टींपासून त्या हे घर बनवतात. आणि कधी त्यांना एखादा प्राणी शत्रू वाटला तर त्या झाडावरून त्या शत्रूवर झेप घेऊन त्याला रक्तबंबाळ करतात. गंमत म्हणजे सुतार पक्षी त्यांच्या ह्या घरट्यात अंडी घालतो त्याला त्या काही करत नाही! सुतार पक्षी आणि पॅगोडा (फायटर) मुंग्या एक साहचर्याचं (symbiotic relationship) उदाहरण! निसर्गातली आश्चर्य उलगडण्याची ही फक्त सुरूवात आहे. परिसर भ्रमंतीमध्ये नंतर मुलांनी रांजण खळगे बघितले. हजारो वर्ष पाण्याच्या प्रवाहामुळे खड्डे कसे बनतात, तिथे दगड अडकून ते कसे मोठे व खोलगट होतात हे राहुल दादांनी छान सांगितलं. तिथे असलेलं कमळाचं फूल, बेडकाची अंडी (tadpole) आणि गोगलगायी मुलांनी बघितल्या. विहीरीमुळे असं रांजणखळगं तयार होतं का, असे खूप प्रश्न मुलांनी विचारले. तसं का होत नाही, हे राहुल दादांनी छान सांगितलं. अवनी क्र. २ ने बेडकाच्या अंड्यापासून बेडूक कसं होतं ही छान माहिती सांगितली. पाण्यामध्ये बेडूक- मासे- गोगलगायी कसे एकमेकांसोबत राहतात आणि ते पाणी शुद्ध कसं करतात, हे राहुल दादांनी सांगितलं. 

भर ऊन्हातलं शीतल घर

भ्रमंतीमध्ये पुढचा टप्पा पितळे काकांच घर हा होता. निसर्ग पूरक जीवनशैलीचा अंगीकार करून हे घर बांधलेलं आहे. लाकडी आणि भरपूर हवा खेळती असलेलं घर बाहेरच्या आसमंतापेक्षा थंड आहे, हे लगेच कळत आहे. शेणाने सारवलेली जमीन. मुलांनी छान प्रश्न विचारले आणि राहुल दादा व स्नेहल ताईंनी छान माहिती दिली. लाकडाचं घर उन्हाळ्यात गार असतं आणि थंडीत उबदार असतं आणि ते का असतं हे मुलांना कळालं. इथे वीजसुद्धा सौर ऊर्जेची वापरली जाते. विलायती चिंच आणि चाफ्यासारखी आसपासची झाडं आणि फुलं बघून मुलं हरखून गेली. नंतर डोंगराच्या खडकाळ आणि उताराच्या जमिनीवर हा परिसर अनेक वर्षांच्या मेहनतीने ज्यांनी उभा केला आणि ही दिसणारी झाडं लावली त्या अप्पांच्या घरी मुलं गेली. बसमधून सगळ्यांनी बघितलेला तिकोना किल्ला इथेही मुलांना दिसला. 

अंजनवेलचा परिसर मोठा असल्यामुळे काही भाग ऊन कमी झाल्यावर बघायचा असं ठरलं आणि मुलं डॉर्मिटरीमध्ये गेली. त्याआधी त्यांना चवदार पन्हं मिळालं. एकमेकांसोबत गप्पा- स्वत:चे खेळ ह्यासाठी त्यांना मोकळा वेळ मिळाला. जेवणाच्या वेळेपर्यंत डॉर्मिटरीमध्ये गप्पा रंगल्या. वरद आणि त्याच्या मित्रांनी आणलेली पुस्तकं वाचायला सुरूवात केली. शिबिरातली सर्वांत लहान आदिश्रीसुद्धा मुलांमध्ये रमली. गप्पा- मस्ती- खेळाची मैफिल सुरू झाली! स्नेहलताईंनी एक गंमत आमच्यासोबत शेअर केली. जेव्हा त्यांनी मुलांना सांगितलं की, इथे सकाळी लवकर उठून फिरायचं आहे आणि भटकायचं आहे. आंघोळ आणि अगदी ब्रशही कंपल्सरी नाही. तेव्हा एक मुलगी म्हणाली हा तर माझा लकी डे आहे! लकी डे ची अशी संकल्पना!

"स्टार”, "यार”, कलाकार, कला अन् कल्ला

हळु हळु मुलांच्या गप्पा आणि मस्ती वाढत जाते आहे! जेवणानंतरचं सत्र अमृताताई ढगेंचं आहे. एकदा वाटलं की, मुलं पहाटे उठून आली आहेत. कदाचित त्यांना झोप तर येणार नाही? पण तसं अजिबात झालं नाही. सुरूवातीला त्यांनी मुलांना मस्त जागं केलं. "डबल डबल थिस थिस" कृतींमधून मुलांना एकदम सचेत केलं. मुलंही त्यामध्ये रंगून गेली. त्याचा ताल, हालचाली आणि लयीमुळे मुलांना मजा आली. त्या सत्रात अमृताताईंनी मुलांना पानांच्या वेगवेगळ्या शेडस दाखवल्या. परिसरातल्या पानांचं मुलांनी निरीक्षण केलं. त्यानंतर अंजनवेलच्या ओढ्याजवळच्या मोकळ्या जागेमध्ये बसून कागदावर पानांचं रेखाटन केलं. काळ्या कागदावर रंग कांड्या वापरून पानांची रचना साकारली. अमृताताईंनी त्यांना त्यातल्या गमती उलगडून सांगितल्या. शिवाय अनेक प्रकारच्या पानांची चित्र दाखवली! एक मुलगी त्यांना म्हणाली की, ताई, हे पान तर समोरच्या झाडाचं आहे! मुलांना सत्राच्या मध्ये कोकम सरबत मिळालं. घरी कोकम न पिणार्‍या मुलांनी इथे मात्र ते लगेच गट्ट केलं! ताईंच्या मदतीने मुलांनी सुंदर रेखाटन काढली. ते काढता काढता आजूबाजूच्या झाडांच्या पानांचंही निरीक्षण केलं. फुलांचं निरीक्षण केलं. चित्र काढताना एकमेकांना मदतही केली. सत्र संपलं तेव्हा मुलांनी आनंदाने एकच कल्ला केला.   

पानी में शिरा और पोहा!

सकाळपासून मुलांचा एकच प्रश्न सारखा होता- काकू, काका स्विमिंग कधी करू देणार? आणि अखेर ती घटिका आली. थोडे सोडले तर सगळेच जण पोहण्यात रंगून गेले! ज्यांना पोहायचं नव्हतं ते मग बॅडमिंटन, क्रिकेट किंवा पुस्तक वाचनात रंगून गेले. बॉलर्स तर स्पेल टाकतच आहेत, पण हॅरी पॉटरचे भक्त गणसुद्धा वेगवेगळे स्पेल टाकत आहेत! स्विमिंग करणा-यांवर ताईंचं लक्ष आहे.  मीसुद्धा मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. त्यांची ऊर्जा, उत्साह आणि आनंद बघणं खूप ऊर्जादायी वाटतं आहे! हळु हळु संध्याकाळ झाली आणि अंधार पडला. पण मुलांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. मुलांची मस्ती, उत्साह आणि आनंद बघून खूप छान वाटलं. आणि हे मुलं म्हणजे आमचे मानसपूत्र- मानसकन्या आहेत, असंच वाटलं! 

आकाश दर्शन, काजवे आणि दोन गुरू

दिवसभर खूप ढग होते. त्यामुळे आकाश दर्शन करता येईल का शंका होती. पण संध्याकाळी आकाश मोकळं झालं आणि मुलांना आकाश दर्शन करता आलं. दुर्बिणीद्वारे तेजस्वी शुक्र आणि गुरू ग्रह त्यांनी बघितला. गुरूचे चार उपग्रहसुद्धा बघितले. त्यानंतर पुष्य नक्षत्र (बीहाईव्ह क्लस्टर) हा तारकागुच्छसुद्धा बघितला. ढगांच्या मधून दिसणारे ठळक तारे आणि तारकासमूह मुलांना पॉईंटरने दाखवले. काही कृत्रिम उपग्रहसुद्धा दिसले. आकाशातला गुरू बघताना मुलांसोबत जमिनीवरचा गुरू म्हणजे अंजनवेलमधल्या पाहुण्यांचा सोबती- चार पायांचा गुरूही आला! आणि आकाश दर्शनाबरोबर त्याने मुलांना नंतर ट्रेकिंग आणि खजिना शोधामध्येही तितकीच सोबत केली! गेले दोन- तीन दिवस अंजनवेलमध्ये पाऊस पडला आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात हळुच काजवेही दिसायला लागले! आकाश दर्शन करता करता मुलांचंच लक्ष गेलं! काजवे दिसणं हे उत्तम पर्यावरण संतुलनाचं लक्षण! मुलांनी काजवे डोळे भरून बघितले. आणि नेहाताईसुद्धा काजवे बघताना हरखून गेल्या.

रात्री मुलांनी मस्त जेवण केलं. अर्थात् पहिल्यांदाच आई- बाबांपासून लांब राहणार्‍या मुलांना संध्याकाळी होमसिक वाटतंय. एखाद्याला अचानक रडूही येतंय. क्रिकेटमध्ये दादागिरी करणारा समर्थही चक्क रडतोय! पण स्वाभाविक आहे. पण स्नेहल ताई आणि नेहा ताई त्यांना समजावत आहेत. रडावसं वाटलं तर रडा, असंही सांगत आहेत. ही मुलंसुद्धा आता इतर मुलांसोबत मिसळत आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वांत लहान आदिश्री आणि ईरा मात्र अंजनवेलमध्ये शिबिर दूरवरून बघत असलेल्या आपल्या आईला जास्त भेटत नाही आहेत. मुलं जेवल्यावर लगेच झोपतील असं वाटलं होतं. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. त्यांनी परत मस्ती आणि खेळ सुरू केले! हिरव्यागार लॉनवर खेळ खूप वेळ चालले. काही जण पुस्तक वाचण्यातही बुडाले आहेत! काही नवीन मित्र- मैत्रिणींसोबत गप्पा मारत आहेत. "स्वरित, ते तसं करत नसतात," असं सांगत स्वरितची बहीण ओविया त्याच्यासोबत सगळीकडे फिरते आहे! हॅरी पॉटरचे भक्त गण एकत्र हॅरीचा पाठ करत आहेत. अखेर मुलांच्या डॉर्मिटरीत मुलं आणि मुलींच्या डॉर्मिटरीत मुली आणि ताई गेल्या. हळु हळु गप्पा मंदावल्या. मुलं लोळली आणि दिवे बंद केल्यावर नीजानीज झाली.

दिवस २

दुसर्‍या दिवसाची सुरूवातसुद्धा आकाश दर्शनाने झाली. पहाटे ४:३० ला उठून आकाश बघितलं. अभिजीत आणि श्रवण दिसत आहेत पण बाकी खूप जास्त ढग आहेत. आकाशगंगा तर नाहीच पण चंद्रही ढगात आहे. त्यामुळे थोडा वेळ वाट बघितली. आणि चंद्र दिसेल अशी स्थिती आल्यावर मुलांना उठवून बोलावलं. मुलं आलीच, पण गुरूही त्यांच्यासोबत आला. अवनी तर स्वत: न उठवता आली. अंजनवेलमध्ये थांबलेले पाहुणेही चंद्र बघायला आले. ढगांनी मुलांची थोडी परीक्षा बघितली. पण हळु हळु थांबत थांबत सगळ्यांना चंद्र बघता आला. चंद्रावरचे खड्डे आणि मैदानं बघता आली. चंद्र बघितल्यावर मुलांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती! त्याशिवाय पहाटवारा, रातकिड्यांचा किर्र आवाज, पक्ष्यांचं कूजन, कोंबड्यांचं कूकूचकू मुलांनी अनुभवलं! हळु हळु उजाडत गेलं आणि सगळे एकमेकांना दिसायला लागले. 

सूर्योदयाचा ट्रेक

चंद्र बघून झाल्यावर अंजनवेलच्या अमोल दादांसोबत आणि विक्रांत दादांसोबत मुलांनी एक छोटा आणि सुंदर ट्रेक केला. अंजनवेलपासून जवळच असलेल्या टेकडीवर सगळे सहज चढले. तिथून दिसणारे डोंगर, दाट झाडी आणि थोडा दूर असलेला तिकोना किल्ला सगळ्यांनी बघितला. बायनॅक्युलरने त्यांनी आसमंताचं निरीक्षण केलं. स्नेहलताईंनी त्यांना वाटेत लागणार्‍या झाडा- झुडुपांची छान माहिती दिली. येताना मुलांनी धनगर वस्तीतल्या घराचं निरीक्षण केलं. तिथल्या ताईंनी मुलांना आंबेही दिले.  

परत आल्यावर मुलं आडवी होतील असं वाटलं होतं! पण कसचं काय! त्यांची धमाल सुरूच राहिली. आणि काका, स्विमिंग कधी करायचं, हा ठरलेला प्रश्नही सुरू राहिला! त्याशिवाय त्यांची आपापासातली गप्पा सुरू राहिली. वयानुसार आणि स्वभावानुसार छोटे छोटे गटही एकत्र मिळून मजा करत आहेत! मुलांना खेळायला अजून एक सोबतीण मिळाली! अंजनवेलमधली माऊ! नव्हे माऊली! त्या माऊ-लीला सगळे जण कुरवाळत आहेत! तिचे लाड करत आहेत! हळु हळु मुलांनी आवरलं. काही मुलांनी तर आंघोळसुद्धा केली! काही मुलं खरंच फार जास्त शिस्तबद्ध वाटली! काल रात्री पोट दुखत असलेला अयांश संध्याकाळपासून झोपला होता. त्याला सकाळी फ्रेश वाटलं, त्याने आकाश दर्शनही केलं आणि ट्रेकसुद्धा केला. स्नेहलताई डॉक्टरही आहेत, त्यामुळे काहीच काळजी नाही. शिवाय त्यांना मुलांची नस कळतेच कळते!

निसर्गातलं आश्चर्य उलगडून सांगणार्‍या स्नेहलताई

नाश्ता होईपर्यंत शिबिरात अजून एक चँपियन आला- ऋत्विक! नाश्त्यानंतरचं सत्र हे शिबिरातलं कदाचित मुलांना सर्वाधिक आवडलेलं सत्र असेल. राहुल दादा आणि स्नेहलताईंनी मुलांना खूप सुंदर माहिती दिली. काल राहिलेला उरलेला परिसर तर बघितलाच. पण त्याबरोबर एक एक झाड किती विलक्षण आहे, किती आश्चर्यकारक आहे हे सांगितलं. मुलं प्रत्येक वेळी त्यांना विचारत होती हे झाड कोणतं तेव्हा त्यांना त्याचं नाव, वैशिष्ट्य आणि गमती माहिती होत्याच! मुक्ताने विचारलेलं झाड करंज आहे, हे त्यांनी सांगितलं. पण त्याबर्बर त्याचं बी कडू असतं आणि तेल म्हणून वापरलं जातं हेही सांगितलं. करंज वृक्ष नदीलगत वाढणारं झाड (riperian species) असंही सांगितलं. त्याचं इंग्रजी नाव pongamia pinnata सुद्धा सांगितलं! पांढरी धाग्यांसारखी फुलं खूप ठिकाणी आहेत. तेझाड स्पायडर लिली! त्याशिवाय त्यांनी अर्जुन झाडाचं फळ दाखवलं. 

राहुल दादांनी सह्याद्री पर्वतरांगातल्या बसाल्ट खडकाची माहिती दिली. ओढ्यामुळे पूर्वीच्या काळि कसे पाट किंवा पर्‍या काढले होते ते दाखवले. जमिनीलगत भुयाराच्या रचनेमुळे ओढ्याचं पाणी शेताकडे वळवलं जायचं. ही एक खूप विचारपूर्वक बनवलेली पारंपारिक प्रणाली होती. स्नेहलताईंनी मुलांना अनेक झाडं नीट समजावून सांगितली. फुलासारखी पानं असलेला ऑर्किड (आमरी) वृक्ष दाखवला. माडाच्या म्हणजे फिशटेल पाम वृक्षावर ऑर्किड कसा आला आहे हे त्यांनी आणि राहुल दादांनी समजावून सांगितलं. आणि ऑर्किड हे परोपजिवी नाही तर दोघं एकमेकांना धरून राहतात आणि ऑर्किडला हवेतूनसुद्धा पोषण मिळतं हे त्यांनी सांगितलं. त्याची मुळं फिशटेल पामच्या मुळांशी जोडलेली असतात. पर्वतीय राज्यांमध्ये ऑर्किड हे राज्य वृक्ष आहे. ही झाडं जमिनीवरही येतात आणि इतर झाडांवरही वाढू शकतात. हा ऑर्किड म्हणजे आमरीचा एक प्रकार त्रिशुळ आमरी आहे. ऑर्चिडची गुलबी फुलं सीतेची वेणी म्हणून ओळखली जातात. हा वृक्ष असणं हेसुद्धा उत्तम पर्यावरण संतुलनाचं निदर्शक आहे, असं त्यांनी सांगितलं. 

वृक्षांची अद्भुत दुनिया

तिथेच बाजूला असलेला काटेसावर वृक्ष (bombax ceiba) सुद्धा ताईंनी दाखवला. त्या झाडावर सुरुवातीला संपूर्ण खोड आणि फांद्या भरून काटे असतात. आणि झाड मोठं होईल तसं मुख्य खोडावरचे काटे संख्येने कमी पण जाडसर होतात. त्याची पानं आपल्या हाताच्या पाच बोटांसारखी असतात. आयुर्वेद तज्ज्ञ असलेल्या स्नेहलताईंनी त्याचे औषधी गुणही सांगितले. काट्यांचा वापर पिंपल्सवर औषधी म्हणून केला जातो. शिवाय ह्या काटेसावर वृक्षावर पक्ष्यांना फुलातील मधुरसाची आणि किड्यांची मेजवानीसुद्धा मिळते. फिशटेल पामची फळं धनेश (हॉर्नबिल) पक्ष्याला खूप आवडतात! त्याला भेरली माड किंवा सूर माड असंही म्हणतात. नारळाच्या झावळीसारखं यांचं पानही खूप मोठं असतं आणि माशांच्या शेपटीसारखी पानांची रचना असते. यांच्या लांबलचक केसांसारख्या दिसणार्‍या भागावर फुलं येतात आणि मग त्याच जागी फळं लागतात. त्याच्या फळामुळे खाज सुटते असं राहुल दादाने सांगितलं! मुलंच नाही तर मी आणि नेहाताईसुद्धा ही इतकी माहिती ऐकून मंत्रमुग्ध झालो! ताई‌ सांगतच होत्या आणि फर्न, सिल्व्हर फर्नसारखी नवनवीन झाडं दाखवत होत्या. ओढ्याजवळच्या दगडावर पांढरे- हिरवे शैवालसदृश मॉस येतात आणि तेसुद्धा उत्तम पर्यावरण दर्शवतात, असं राहुल दादा म्हणाले. करवंद वृक्षाची माहिती त्यांनी दिली. ते झाड स्वरूपात आणि वेल म्हणूनही असतं हे त्यांनी सांगितलं. 

अंजनवेलमधल्या वेली आणि वडांबा!

स्नेहल ताईंनी हे दाखवता दाखवता झाड आणि झुडूपातला फरक सांगितला. तुती म्हणजे मलबेरी वृक्ष दाखवला. त्याची फळंही दाखवली. हे सगळं बघतानाचा आनंद त्यांच्या चेह-यावर ओसांडून वाहतोय. कोकणात माड म्हणजे कोकोनट पाम हे उंच वाढणारं झाड असतं. केळी हे गवत आहे की झाड यावरही चर्चा झाली. देवचाफा दिसल्यावर सोनचाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा अशा चाफ्याच्या इतर प्रकारांची माहिती त्यांनी दिली. वाटेत चांदा वृक्षाची पानं पडली होती. पानाच्या साधारण मध्यभागी देठ असलेल्या ह्या झाडाबद्दलही त्यांनी माहिती दिली.

अंजनवेलच्या नावात कोणती वेल आहे, असा प्रश्न मी विचारला. तेव्हा राहुल दादा म्हणाले की, सह्याद्रीमध्ये आढळणा-या १०० झाडांमध्ये ७० झाडं अंजनाची असतात. त्यांना निळी फुलं येतात. त्या झाडामुळे आणि राहुल दादांच्या आजी अंजनाबाई ह्यांच्यावरून हे नाव पडलं आहे. पुढे राहुल दादांनी एक वेगळीच गंमत दाखवली. आंब्याच्या एका झाडावर आलेलं वडाचं झाड! मुलांनी गमतीने त्याला वडांबा हे नाव दिलं! तिथून जाताना राहुल दादांनी सांगितलं की, इथे जी पानं पडली आहेत, त्यामध्ये सुप्तावस्थेमधले काजवे आहेत. काजव्यांच्या अळ्या त्या पानांमध्ये आहेत. वर्षभर त्या अळ्या सुप्तावस्थेत राहतात आणि पाऊस पडल्यावर फक्त १५ दिवस काजवे सक्रिय होतात. नर मादींना आकर्षित करण्याच्या काळात ते चमकतात. नंतर परत ते मरून जातात आणि अळ्या सुप्तावस्थेत जातात. निसर्गातला हा चमत्कार जाणून घेताना सगळे थक्क झाले! 

त्याच ठिकाणी लाल फुलं असलेलं गुलमोहर झाड मुलांनी बघितलं! सध्या उन्हाळ्यात सगळीकडे हीच लाल फुलं बहरलेली दिसतात. पितळे काकांनी मुलांचं लक्ष गुलमोहराच्या मुळांकडे वेधलं. ते म्हणाले की, ही मुळं बट्रेस रूटस म्हणजे खूप जाड आणि मोठी असतात. ज्या बाजूला गुलमोहराचा पिसारा वाढेल, त्या बाजूला आधार देण्यासाठी ही मुळं तिथे येतात. कसं काय झाड हे करत असेल हा प्रश्न मुलांनाच नाही तर आम्हांलाही पडला. पुढे जाताना स्नेहल ताई अतिशय गुणकारी अशी गुळवेल बघून आनंदून गेल्या. गुडुची किंवा अमृता ह्या नावानेही तो ओळखला जातो. ताईंनी अर्जुन म्हणजे टर्मिनेलिया अर्जुना झाडाची माहिती दिली. जांभळासारखी दिसणारी फळं असलेलं मोई झाडही दाखवलं. मुलं फिरत फिरत परत पितळे काकांच्या घराजवळ आली. तिथे पितळे काकांनी मल्टीव्हिटॅमिन नावाच्या झाडाचं पान प्रत्येकाला खायला दिलं! हे सगळं बघता बघता दीड तास गेला! उन्हात फिरून आलेली मुलं सरबत पिऊन सुखावली.

एक मिनिट एकच भाषा आणि कागदातून जाणारा माणूस

हे सगळं करताना सतत वाटतंय की, मुलांसाठी इतक्या गोष्टी मनात आहेत पण वेळ कमी पडतोय. त्यात त्यांना स्वत:लाही खूप मजा करायची आहे. भरपूर हुंदडायचं आहे. त्यांना बरंच काही शेअर तर करायचं आहे, पण त्यांची त्यांची मस्तीसुद्धा थांबवायची नाही. ह्या मर्यादेमध्ये मुलांसाठी एक छोटं सत्र मी दोघा ताईंच्या मदतीने घेतलं. मुलांना एकत्र करणं हेच अवघड आहे इथे! नेहा ताई मुलांना हाका मारून मारून बोलावतात! त्यांचा सशक्त आवाज उपयोगी पडतोय! मुलांना बोलावून व त्यांचे पाच गट करून त्या गटांना एक काम दिलं की, प्रत्येक गटातून एक जण एक मिनिटभर एकाच भाषेत बोलेल. एकच भाषा. दुसर्‍या भाषेतला शब्द नको! प्रत्येक गटाने वेळ घेऊन सादरीकरण केलं. अरिणीने इंग्रजीतून विज्ञानातली माहिती सांगितली. अनुजने किल्ला म्हणजे फोर्ट हा विषय घेऊन मांडणी केली. इतर गटांनी इंग्रजीतच सादरीकरण केलं. रणंजयने मात्र अस्खलित मराठीत एक मिनिटभर छान निवेदन केलं. त्याच्या बोलण्यात फक्त एकच इंग्रजी शब्द आला- सायकल. त्यानंतर मुलांना चर्चेत सांगितलं की, जेव्हा त्याच्या बोलण्यात इंग्रजी शब्द आला, तेव्हा सगळ्यांचं तिकडेच लक्ष गेलं. हा शब्द तसा रुढ आहेच. आणि पूर्ण "मिनिट" तो मराठी छान बोलत होता, तिकडे जास्त जणांचं लक्ष कसं गेलं नाही! मुलांना दुसरी कृती सांगितली होती ती म्हणजे कागदामध्ये असं छिद्र करा ज्यामधून माणूस आरपार जाऊ शकेल! वरदने जिद्दीने ते करून दाखवलं. कागद असा विशिष्ट प्रकारे क्रमा क्रमाने कापला ज्यामुळे एक मोठा हार तयार झाला! मुलं तर त्याला मेटल डिटेक्टरच म्हणाली! त्यातून कोणीही आरामात जाऊ शकत होतं! शिवाय श्रीविद्या आणि ईरानेही एक हार बनवला, ज्यातून छोटी ईरा बाहेर पडू शकली! ह्या कृतीमध्ये छोटं साधन असलं, तरी योग्य मेहनत आणि तंत्र वापरून आपण मोठा परिणाम मिळवू शकतो, हे मुलांना दिसलं. हे होईपर्यंत मुलांच्या पोहण्याची वेळ झाली! पोहायला जा म्हंटल्यावर लगेचच नाचत नाचत उठले आणि कपडे घेऊन पोहायला गेले!   

मुलं दीड तास मनसोक्त पोहली! पोहताना अर्थातच आम्ही लक्ष ठेवून होतो. त्याच वेळेत मी अंजनवेलच्या परिसरात खजिन्यासाठीच्या चिठ्ठ्या पेरून ठेवल्या. स्विमिंग सुरू असताना काही जण इतरही खेळ खेळत होते. नंतर जेवायच्या वेळेला त्यांना बोलावलं. तर ते बाहेर येईच ना! खूप वेळेस प्रयत्न केले तरी येतच नाहीत! मग गणेश दादांची मदत घेतली! ते म्हणाले की, गंमत पाहा. लगेचच सगळ्यांना बाहेर आणतो! ते गेले, त्यांनी दरडवण्याच्या आवाजाचा अभिनय केला आणि मुलं आले की बाहेर! अगदी पाच सेकंदामध्ये! निमूटपणे आवरायला गेले! जेवणानंतर मुलांनी थोडा वेळ आराम केला. मुलांनी दुर्बिणीतून सूर्याचे डाग बघितले. सूर्यावरचे काळे डाग म्हणजे वस्तुत: कमी तपमानाची आग. इतर आगीच्या तुलनेत ती काळी भासते. त्यानंतर काही जणांचं पोट दुखत असल्यामुळे मुलांनी आराम केला. ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्हीही पुढचं सत्र लगेच घेतलं नाही. आम्हांला वाटलं पहाटे ५ ला उठलेली मुलं दुपारी नक्कीच झोपतील! पण कोणीच झोपले नाहीत. डॉर्मिटरीतही पळापळ- मारामारी सुरू राहिली!

खजिन्याचा शोध

मुलांना अतिशय आवडणारा हा उद्योग! मागच्या शिबिरात ह्या खेळाला वन्स मोर मिळालं होतं! विचार करून चिठ्ठ्या पेरून ठेवल्या होत्या! "माझी उंची आहे कमी पण फुलं पांढरी अन् नवी"; "तुमच्या आवडीची खास जागा जवळच उभा मी माझ्याकडे बघा" खजिन्याचा शोध संध्याकाळी साडेचारला सुरू झाला. पण काही चिठ्ठ्या मुलांना आधीच सापडल्या होत्या! पण तरी उरलेल्या चिठ्ठ्यांची उत्सुकता होतीच. काही सोप्या चिठ्ठ्यांचा अर्थ कळायला वेळ लागला आणि काही अवघड चिठ्ठ्या लवकर कळाल्या! त्यानुसार तुफान नाचत आणि धावत मुलांनी शोध घ्यायला सुरूवात केली! त्यांना उत्साहाने आणि आनंदाने असं पळताना बघणं, हासुद्धा मोठा आनंद आहे! बरीचशी शोधाशोध- चुकीच्या जागेवर शोधणं- पळणं- फिरणं असं होऊन अखेर चिठ्ठ्या सापडत गेल्या. एकट्या श्रीविद्याने चार चिठ्ठ्या शोधल्या! खजिनाही तिलाच सापडला! खजिना म्हणजे भारतातल्या वृक्षांची माहिती देणारं पुस्तक! मुलांना खजिना म्हणून आईसक्रीम हवं होतं, तेही त्यांना रात्री मिळालं. 

लाला, ला- ला आणि पक- पक- पकाक

४:३० ला स्नेहल ताईंनी नेहा ताईंसोबत अभिनय अर्थात् थिएटर आर्टचं सत्र घेतलं. मोकळ्या हिरव्या लॉनवर झाडांच्या सावलीत हे सत्र झालं! मुलांची ऊर्जा आणि उत्साह इतका जास्त की, सगळ्यांना एकत्र बोलावून बसवण्यामध्ये आमची ऊर्जा खर्च होतेय! त्यामुळे वेळापत्रक पुढे- मागे होतं आहे. पण एकदा सत्र सुरू झाल्यावर मुलांकडे बघून खूप समाधान वाटतं. सत्राच्या सुरूवातीला ताईंनी मुलांच्या काही जोड्या तोडून नवीन गट बनवले. स्वत:‌ त्यांनी काही हावभाव व फक्त काही शब्द वापरून अभिनय करून दाखवला. हळु हळु मुलांना गोडी वाटायला सुरूवात दाखवली. 

सत्राच्या पुढच्या भागात मुलांच्या गटांना फक्त काही अक्षरं दिली होती. त्यावर त्यांना मिळून एक प्रसंग सादर करायचा होता. ब्रेकमध्ये भेळेचा आस्वाद मुलांनी घेतला. त्यांनी मिळून तयारी केली. त्यानंतर प्रत्येक गटाने सादरीकरण केलं. प्रत्येक गटाचं सादरीकरण छान होतं! एका गटाने ट्रेन चुकलेल्या माणसाचा प्रसंग दाखवला! केवळ एका अक्षरामधून हावभाव आणि आवाजाचा पोत बदलून कसे वेगळे अर्थ होतात हे गटांनी दाखवलं. आराध्यच्या गटाने केलेलं पक- पक पकाक सादरीकरण सगळ्यांना हसवून गेलं! ह्या सादरीकरणात मुलांनी एकत्र मिळून काम करण्याचा अनुभवही घेतला.

मुलांनी घेतलेली परीक्षा

हे सत्र पूर्ण होता होता एक अनपेक्षित प्रसंग आला! एक मुलगा अचानक मोठ्याने रडायला लागला. डोळ्यात काही तरी गेलंय म्हणून तो रडत असला तरी तो पॅनिक ऍटॅक होता. घरी लगेचच जायचं म्हणत रडत होता. संध्याकाळ झाल्याबरोबर अनेक मुलं अस्वस्थ होत होती. थोडा वेळ सगळ्यांनाच काळजी वाटली. पण गणेश दादांनी त्याला शांत केलं. हळु हळु समजावलं. स्नेहलताईंनीही त्याला समजावलं. त्याचं मन ताईंनी दुसरीकडे गुंतवलं आणि मग तो शांत होत गेला. पण ही एक प्रकारे मुलांनी घेतलेली आमची परीक्षाच होती! त्यानंतर मात्र कोणी रडलं नाही. काही जणांना घरची आठवण येते आहे, पण मित्रांची सोबतही हवी आहे. आणि तो रडणारा मुलगाही एकदा म्हणतोय की, उद्या संपणार शिबिर! तो सोडला तर बाकी सगळी मुलं मित्रांसोबत छान राहात आहेत. आणि छोटी परीसुद्धा आईसोबत रूमवर न राहता इतर मुलींसोबतच डॉर्मिटरीत राहतेय. 

कँपफायर आणि पास द पार्सल

संध्याकाळी मुलं प्रचंड दमली आहेत. बरेच जण जेवण कधी आहे, असं विचारत आहेत. पहाटे पाचला उठल्यामुळे त्यांचा दिवस दोन तास पुढे गेला आहे. त्यामुळे जेवणानंतरचं कँपफायर आणि नेहाताईंचं पासिंग द पार्सल सत्र जेवणाच्या आधीच घ्यायचं ठरलं. त्यासाठी नेहाताईंनी गाणी ठरवली आणि अगदी साग्रसंगीत हे सत्र घेतलं. "बम बम बोले मस्ती में तू डोल रे" सारख्या गाण्यावर मुलं नाचले आणि खेळले. नेहाताईंनी मेहनत घेऊन ह्या चिठ्ठ्या बनवल्या होत्या. त्यावर मुलांसाठी छोट्या छोट्या कृती दिल्या होत्या. गाणं थांबताना ज्याच्या हातात चिठ्ठी असेल त्याला ते ते काम करायचं, असा हा सोपा खेळ! प्रचंड दमलेली मुलंसुद्धा ह्या खेळात रंगून गेली. अंजनवेल टीमनेही तत्परता दाखवून त्या लॉनवरच मुलांसाठी रात्री भोजनाचा बेत केला. खेळता खेळता तिथेच मुलं जेवायला बसली. अगदी लॉनवर मस्ती करत करत ती जेवली! संगीत, शेकोटी आणि लॉनवरचं जेवण! एक वेगळाच अनुभव आणि आनंद मुलांनी आणि मोठ्यांनी घेतला! अंजनवेल टीमने मुलांसाठी खास आईस्क्रीमची व्यवस्थासुद्धा केली! त्यामुळे तर मुलं एकदम खुश! एक छोटी मुलगी कौतुकाने आम्हांला सांगत होती, तुमच्यासाठीसुद्धा आईस्क्रीम आहे!

दिवसभर दमलेली मुलं जेवण झाल्यावर परत खेळायला लागली! क्रिकेट आणि बॅडमिंटन सुरू झालं! इतकी ऊर्जा त्यांच्यात येते कुठून असा प्रश्न नेहाताईंसह सगळ्यांना पडला! हळु हळु मुलं डॉर्मिटरीत गेली आणि आडवी होऊ लागली. काही जण तर तिथेही पुस्तक वाचतच बसले! अखेर दिवे बंद केले तेव्हा मुलं झोपायला आले! असा दुसरा दिवस गेला!

दिवस ३ 

खेकडोंगर ट्रेक

पहाटेच्या आकाशामध्ये अजिबात ढग नाहीत! आकाशगंगा चक्क दिसते आहे! बायनॅक्युलरने काही वेळ आकाश दर्शन केलं. मुलं नाही पण मुलांचे पालक बघायला आहेत. मुलांना ट्रेकसाठी थोडं उशीरा उठवायचं ठरलं आहे. पावणेसहापासून मुलांना उठवायला सुरू केलं! हळु हळु एक एक जण उठला. स्नेहलताई मुलींना उठवून मुलांना उठवायला आल्या. हळु हळु मुलं आवरून ट्रेकला तयार झाली. मुलं तयार झाली अन् निघाली तसा गुरूही आला! त्यालाही मुलांची सोबत आवडतेय! राहुल दादा मुलांना घेऊन निघाले. अंजनवेलच्या जवळच्याच एका डोंगरावर हा ट्रेक आहे. मागच्या वेळेस आत्मजाने डोंगराला नाव दिलं होतं- खेकडोंगर! कारण तिथे खेकडेच खेकडे होते! ह्यावेळी खेकडे तर नाहीत, पण त्यांची बिळंच बिळं आहेत. वाटेत जाताना राहुल दादांनी गावातला रक्षणकर्ता देव, त्या देवाची देवराई, खेकड्यांची बिळं अशी माहिती दिली. कातकरी लोक कसे दगड घासून पावसासारखा आवाज करून खेकड्यांना वर आणतात ते सांगितलं. पुढे मुलांच्या वाटेत सशाची शी आली! स्नेहलताईंनी थांबवून मुलांना ती हाजमोलाच्या गोळ्यांसारखी सशाची शी दाखवली! पुढे सशाच्या शिकारीसाठी लावलेला एक सापळाही राहुल दादांनी दाखवला. स्नेहलताईंनी मुलांना बुलबुल आणि डोमकावळा असे पक्षीही दाखवले! एका झुडुपात रातकिडाही दिसला. ह्या ट्रेकवर काही ठिकाणी तीव्र चढ होता. पण मुलांना त्रास न होता आनंदच झाला. उतरताना वेगळ्या मार्गाने आम्ही उतरलो.

नेचर बिंगो- शोधा म्हणजे सापडेल!

आल्यावर मुलं वेळेत तयार झाली. "Alexa, माझा होमवर्क कर" एकीच्या टीशर्टवर लिहीलं आहे! नाश्ता करताना सगळ्यांना वाटतंय की, इतक्या लवकर तिसरा दिवस आला! आणि आपण जाणार लवकरच!? एक हुरहुरसुद्धा वाटतेय. पुढच्या सत्रात स्नेहलताईंनी मुलांसाठी नेचर बिंगो हा खूप वेगळा खेळ घेतला. ह्या खेळात त्यांनी मुलांचे नवीन गट केले आणि प्रत्येक गटाला समान काम सांगितलं. की, असं असं दिसणारं झाडाचं पान आणा. तुतीचं फळ घेऊन या. किंवा सगळ्यांत उंच गवत घेऊन या. ह्यामध्ये काल त्यांनी सांगितलेल्या गोष्टींच्या आकलनाची परीक्षा होणार होती. त्याबरोबर मुलांना झाडं- पानं- फुलं ओळखता येतात का, ते निरीक्षण कसे करतात, हेपण कळणार होतं. चिठ्ठ्या मिळाल्यावर मुलं लगेचच पळाली आणि शोधायला लागली. एकमेकांशी चर्चा करून त्यांनी शोध सुरू केला. ह्या खेळात मनवाच्या गटाने सगळ्यांत बरोबर आणि सगळ्यांत आधी सांगितलेल्या गोष्टी आणल्या. त्यांनी शोधण्याचं काम आणि आणून देण्याचं काम गटात विभागलं. मनवाचं धावणं विलक्षण वेगवान वाटलं! त्याची प्रचिती पुढे लंगडीच्या वेळीसुद्धा आलीच! गटांना दिलेला वेळ झाल्यावर स्नेहलताईंनी प्रत्येक गटाच्या कामाचं कौतुक केलं. काय चुकलं किंवा कमी राहिलं किंवा काय समजलं नाही, तेही सांगितलं. हा खेळसुद्धा मुलांना फार आवडला. 

जोडसाखळी, विष अमृत आणि लंगडी- तु फा न म जा

क्रिकेट- बॅडमिंटनसारखे खेळच मुलं जास्त खेळली होती. त्यांना जोडसाखळी, विष अमृत आणि लंगडीसारख्या खेळांची मजाही मिळाली पाहिजे असं आम्हांला वाटत होतं. मागच्या शिबिरातली दृश्य नजरेसमोर होतीच! मुलं सुरूवातीला नको नको म्हणत होती. मलाही एकदा वाटलं की, त्यांचा मूडच नाहीय. पण स्नेहलताईंनी मुलांना पुढे नेलं. त्यांच्यासोबत आम्हीही खेळाच्या लॉनवर गेलो. आणि लवकरच मुलांचा खेळ रंगला! पारंपारिक मैदानी खेळांची मजा मुलांनीही अनुभवली आणि आम्हीही अनुभवली! काय तो जोश! काय ती ऊर्जा! मिळणारा प्रचंड आनंद! हळु हळु बरीच मुलं खेळायला आली! टॉस करून खेळ सुरू झाले! जोडसाखळी, विष अमृत आणि लंगडीचे डाव अप्रतिम झाले! मुलांची दमछाकही तितकीच झाली. पण आनंद! अहा हा! त्यांचं आनंदाने ओरडणं आणि एकमेकांसोबत मजा करणं! जिंकण्याची जिद्द आणि स्वत:ला पुढे नेणं! त्यातले रुसवे- फुगवे! लंगडीमध्ये तर दोन्ही टीम्स तुफान झुंजल्या! मुलांनी लंगडीमध्ये लांब उडी घेऊन मुलींना आउट केलं! समर्थ, कृष्णा, श्रेयस, अर्णव, वरद अशी सगळ्यांनी मस्त खेळ केला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आउट होता होता यश मिळतं हे ते दाखवत होते! मुलींनीही जोरदार प्रयत्न केले! मनवाची झेप विलक्षण होती! वेगाने पळत येऊन ती लंगडी करत होती! श्रीविद्या आणि अवनीही छान खेळल्या. छोटी परीही खेळली! वेळेच्या मर्यादेमुळे आणि कडक ऊन्हामुळे हा खेळ आवरावा लागला! 

थोडं विज्ञान, थोडं गणित आणि खूप मजा

विज्ञान आणि गणितातल्या गमतीच्या सत्राला अखेर संधी मिळाली. सत्राच्या सुरूवातीला मुलांसोबत गप्पा मारल्या. त्यांना येणारी गाणी, पोवाडे, गारद, भजन, कोडी सादर करण्यासाठी विचारलं. अवनीने विलक्षण अशी गारद सादर केली! सगळ्यांच्या अंगावर शहारे आले! राघवसुद्धा समोर येऊन बोलला. कृष्णाने कोडी घातली. नंतर आम्ही तिघं जण- मी, स्नेहलताई आणि नेहाताई आम्ही एक टास्क घेतलं- कोणाला जास्तीत जास्त मुलांची नावं बरोबर ओळखता येतात? आणि इथेही स्नेहलताईच जिंकल्या. एकूण एक मुला- मुलींची नावं त्यांची बरोबर आली! माझी तर फक्त अर्धी नावं बरोबर आली! पुढचा खेळ एकाने मूठ बंद करणे व दुस-याने ती उघडणे असा होता. सगळ्यांनी शक्तीचेच प्रयोग केले. पण मूठ उघडण्यासाठी बोलतासुद्धा येतं की! किंवा मैत्रीचा हात पुढे करून शेकहँडही करता येतं! जे सहजपणे होत असेल, युक्तीने होत असेल तिथे शक्ती का लावायची किंवा प्रत्येक गोष्ट जोर लावून का करायची, हा मुद्दा ह्या कृतीत होता. 

काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरल्यावर उजवीकडे असलेला बाण डावीकडे जाताना दिसतो, हे मुलांनी करून बघितलं. प्रकाशाचं अपवर्तन होताना बघितलं. त्यानंतर वाढदिवस आणि मिळणारी चॉकलेटस हा एक छोटा खेळही घेतला. ज्याचा वाढदिवस १ असेल त्याला १ चॉकलेट, ज्याचा २ त्याला २ चॉकलेटस, ज्याचा ३ त्याला ४, ज्याचा ४ त्याला ८, ज्याचा ५ त्याला १६ अशा संख्येने. त्यातली गंमत मुलांच्या लक्षात आली. काही जणांनी गणित करून बघितलं की, त्यांना किती चॉकलेटस मिळतील. ज्यांचा वाढदिवस १, २ किंवा ३ असेल त्यांना कमी मिळणार. आणि जिचा वाढदिवस ३१ असेल, तिला सर्वांत जास्त मिळणार! "तुमच्या मित्राच्या शेतात पुराचं पाणी आलं तर तुम्ही काय कराल" ह्या परिस्थितीवर मुलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मदत करू, सोबत करू, इतर मदत मिळवून देऊ असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलेल्या पर्यायांमधल्या चांगल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. मैत्री, सोबत‌ आणि धीर देणं.

समारोप

मुलांना हे शिबिर कसं वाटलं, काय आवडलं हेसुद्धा नंतर मुलांनी सांगितलं. ट्रेकिंग, स्विमिंग आणि खजिना शोध त्यांना फार आवडले. त्याबरोबर इतर गोष्टीही त्यांनी आवडल्याचं सांगितलं. काही जणांनी तर लिहून आपले अभिप्राय दिले! मुलांना प्रचंड आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ती माऊली- माऊ-ली! सारखे तिला मुलं कडेवर घेऊन कुरवाळत होते! एकदा तर दुसरी एक माऊली स्नेहलताईंच्या नोटपॅडवर बसली! दुसरीकडे ठेवलं तर परत आली आणि चक्क झोपली! आणि ती चक्क हळु हळु घसरत होती! अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसं दृश्य होणार होतं! पण ती माऊली वेळेत जागी झाली आणि हलली! 

पावभाजीच्या आवडीच्या जेवणानंतर निघण्याची वेळ आली! मुलांच्या बॅगा तर आधीच तयार आहेत!  जेवणानंतरही मुलांचे खेळ सुरू राहिले! अखेर बस आली. ग्रूप फोटो झाला. तेव्हा कुठे मुलं खेळायची थांबली! इथल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा सत्रांबरोबर मुलांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळही महत्त्वाचा होता. एकमेकांसोबत त्यांना खूप आनंद मिळाला. मोबाईल- टीव्ही नसल्यामुळे काहीही अडलं नाही, हे त्यांनीच सांगितलं! इतक्या लवकर शिबिर का संपलं यार, असं वाटत असताना बस निघाली! परतीच्या प्रवासातही वकार युनूस आला नाही. आणि मुलं तर झोपूनही गेली! बसमधली एक गंमत. अवनी आणि श्रीविद्या अगदी बेस्ट फ्रेंडस! पण श्रीविद्या रुसली होती! बसमध्ये दोघी सोबत बसल्या तरी बोलत नव्हत्या! पण नंतर दोघीही गळ्यात गळे घालून झोपल्या आणि उतरेपर्यंत त्यांचं "पॅच अपही" झालं! होमसिक होऊनही मुलांनी हिंमत केली. रडू येतंय, दु:ख होतंय, पण मी थांबणार हा विश्वास त्यांना मिळाला. शिवाय त्यांनी स्वत:ची एकट्याची सोबतसुद्धा अनुभवली! असा वेगवेगळा अनुभव मुलांना मिळाला.

असं हे शिबिर झालं! मुलांनी खूप गाजवलं! मुलांकडून आम्हांला खूप काही शिकायला मिळालं! मुलांसोबत इतक्या सुंदर निसर्गात राहता आलं, मजा करता आली, त्यामुळे आम्हीही लकी आहोत, असं आम्हांला वाटलं. तपशीलांमध्ये काही चुका असतील तर क्षमस्व. झाडाझुडुपांबद्दल लिहीलेलं स्नेहलताईंकडून तपासून घेतलं आहेच. ह्या शिबिरासाठी सगळी मुलं, पालक, अंजनवेलचे सोबती, शिबिर घेणा-या सगळ्या ताया ह्या सगळ्यांना एक... दोन... तीन... धन्यवाद! 

वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. - निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 13 मे 2026

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.