Tuesday, September 8, 2026

ऍडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध: सत्य आणि विपर्यास


✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू
✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश
✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश
✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ 
✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण?
✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण
✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं

३ सप्टेंबर १९३९! दुसरं महायुद्ध नावाचं अग्नीकुंड ह्या दिवशी पेटलं. पोलंडमध्ये युद्धाला तोंड फुटल्यापासून हिरोशिमानंतर जपानने शरणागती पत्करण्यापर्यंतचे हे २१६३ दिवस! आधुनिक इतिहासातलं महाभारत आणि अतिशय नाट्यमय कालखंड. पराक्रम, क्रूरता, अमानुषता, स्वार्थ आणि जागतिक वर्चस्ववादाचा विलक्षण अविष्कार. दुसरं महायुद्ध हा माझ्यासाठी अतिशय जवळचा विषय. गेल्या ३ सप्टेंबरलाच युद्ध आणि हिटलरबद्दल एक वेगळा दृष्टीकोन सांगणारं हे पुस्तक वाचण्यात आलं. पराग वैद्य ह्यांची शैली आणि विषय मांडणी अशी‌ आहे की एकदा सुरू केल्यावर थांबवता आलं नाही. त्या पुस्तकाबद्दलची ही प्रतिक्रिया. 





ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
 


प्रचलित- रूढ इतिहास सांगतो की, नाझी जर्मनीच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे हे युद्ध सुरू झालं. जर्मनी व जपान ह्यांचा साम्राज्यवाद, त्यांनी जगावर लादलेलं युद्ध व ब्रिटन- अमेरिका अशा लोकशाही देशांनी त्यांच्यापासून जगाचं केलेलं रक्षण. रूढ इतिहास हा आहे. ह्या इतिहासाची एक वेगळी फार समोर न येणारी बाजू हे पुस्तक सांगतं. जर्मनी देश म्हणून कसा होता, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याचं सामर्थ्य काय होतं आणि ब्रिटीश- अमेरिकन व रशियाचा खरा चेहरा काय होतं ह्याची खूप वेगळी चर्चा ह्या पुस्तकात आहे. जर्मनीचा तो आक्रमक साम्राज्यवाद आणि स्टॅलिनच्या रशियाने ओरबाडलेले पोलंड, लिथुआनिया, फिनलंड, लॅटव्हिया, युगोस्लाव्हिया व युद्धोत्तर काळात ग्रीस असे देश; नाझी हे मानवता विरोधी आणि साम्राज्यवादी; पण जगभर नाझींपेक्षा प्रचंड मोठ्या जुलुमी वसाहती असलेले देश मात्र शांतताप्रेमी ह्या प्रचलित रूढ इतिहासाची मोडतोड करणारी मांडणी पुस्तकामध्ये आहे. आणि त्यासाठी पुस्तकामध्ये अक्षरश: शंभरहून अधिक पानं भरतील इतकी संदर्भ सूची आहे. लेखक पराग वैद्य ह्यांनी हे पुस्तक प्रचंड अभ्यास करून लिहीलं आहे. आणि त्यांनी मांडलेली भुमिका व वेगळ्या दृष्टीकोनातून सांगितलेली तथ्यं खूप रोमांचक आहेत.

दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीला जर्मनीचं सैन्य अतिशय तुटपुंजं होतं. आर्थिक मंदी होती आणि अनेक समस्या होत्या. त्यांचे असंख्य पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाझी जर्मनी युद्धखोर देश होता आणि त्यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे युद्ध सुरू झालं हा प्रचलित इतिहास केवळ सांगितलेला इतिहास आहे हे लक्षात येतं. आणि तेव्हा लोकशाही देशांच्या वसाहती जगभर होत्याच की. एका देशाने अनेक खंडांमध्ये ढिगाने देशांवर राज्य केलं तरी तो लोकशाही देश आणि दुसर्‍या एका देशाने व्हर्सायच्या तहात गमावलेले स्वत:चेच भाग- प्रदेश, शहरं किंवा अगदी जमिनीचा तुकडा परत घेतला तरी तो देश मानवताविरोधी अशी ही लोकशाही देशांनी उभी केलेली धारणा होती. 

पुस्तक पुराव्यानुसार दाखवून देतं की, इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. कारण असंख्य समस्या होत्या. शक्ती कमी होती. पुस्तक सांगतं की, जर्मनीवर युद्ध लादलं गेलं आणि मग तो देश जिद्दीने उभा राहिला आणि पुढे मोठ्या मोठ्या देशांना युद्धात जर्मनीने पाणी पाजलं. पण जगभर पसरलेली साम्राज्य- जागतिक अर्थसत्ता व रशियातलं मनुष्यबळ ह्यामुळे जर्मनीचा पराभव झाला. तो अपरिहार्यच होता पण तरीही जर्मनीने युद्धात दाखवलेला पराक्रम किती वेगळा होता ह्याचं सैनिकी विश्लेषण पुस्तक सांगतं. जर्मनी रशियाविरुद्ध हरण्यामागे असलेलं एक अज्ञात कारणसुद्धा त्यात येतं. 

ऍडॉल्फ हिटलर राष्ट्रप्रमुख म्हणून ह्या पुस्तकात समोर येतो. त्याचं पूर्वायुष्य व व्यक्तिगत जडण घडणीची संक्षिप्त चर्चा आलेली आहे. पुस्तकामध्ये अनेक उल्लेख आहेत जे दर्शवतात की, ३ सप्टेंबर १९३९ नाही तर हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला तेव्हापासूनच शत्रूंनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे शत्रू आणि युद्धाचे खरे सूत्रधार कोण हे पुस्तकातच वाचायला हवं. हिटलर व नाझींबद्दल अनेक धक्कादायक मतं पुस्तकात आहेत जी मला पटली नाहीत. पण ब्रिटन व अमेरिकेबद्दल लेखकाची मतं पटण्यासारखी आहेत. भारताला ह्या लोकशाही देशांनी दिलेली वागणूक कोण विसरेल? युद्धासाठी सगळा जोर लावत असताना १९४३ च्या दुष्काळात लाखो बंगाली लोकांना चर्चिल सरकारने मदत न करता मरू दिलं. जर्मनी व रशियाने एकमेकांची शक्ती कमी करावी व नंतर आम्ही त्याचा फायदा उठवू असं अमेरिकेचं गणित होतं. शिवाय स्टॅलिनने केलेली रशियन लोकांची दडपशाही, हत्याकांडं व छोट्या देशांवरचा वरवंटा लोकशाही देशांनी नजरेआड ठेवला. अशा अनेक विसंगतीवर हे पुस्तक बोट ठेवतं. 

लेखकांनी अभ्यासाने दिलेले पुरावे व संदर्भ वाचनीय आहेत. हिटलर आणि नाझी ह्यांना छळछावण्या, दडपशाही व जुलुमशाहीच्या ज्या अपराधांसाठी ओळखलं जातं, त्या गोष्टीही लोकशाहीवादी देशांनी व सूत्रधारांनी पसरवलेल्या आहेत असं पुस्तक सांगतं. पण त्याबद्दलचे पुरावे त्यात अजून हवे होते. लेखक ज्या गोष्टींना असत्य म्हणतात, त्या त्यांनी सिद्ध करायला हव्या होत्या. ज्याला दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास महत्त्वाचा वाटतो आणि ब्रिटन- अमेरिकेचं खरं चरित्र आणि चारित्र्य ज्यांना माहिती आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं! भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दुसर्‍या महायुद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातूनही हे पुस्तक वाचनीय आहे. हे पुस्तक बूकगंगा व इतर ठिकाणी उपलब्ध आहे. लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 सप्टेंबर 2026.

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.