२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
पूर्ण भारतात दिसू शकेल
नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे. मुलांसाठी नवीन आणि दुर्मिळ गोष्ट बघण्याची ही संधी आहे.
कसं बघता येईल?नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे बघणे डोळ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे आपण थेट सूर्याकडे बघू शकत नाही. परंतु आपण ह्या सोहळ्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. हे बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सौर चष्मे. अद्याप काही दिवस आहेत, हे सौर चष्मे विकत घेता येऊ शकतात. ते ऑनलाईनही उपलब्ध असतात. अजून एक सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे पिनहोल कॅमेरा प्रोजेक्टर बनवायचा- ही एका खोक्याची अगदी सोपी व्यवस्था असते. त्यावर एक छोटं छिद्र (अगदी टाचणीने होणारं छिद्र- पिनहोल) केलेलं असतं आणि एका बाजूने बघण्य़ाची जागा असते. आपण हे युट्युबवर सहज शोधू शकता. असा पिनहोल कॅमेरा बनवताना मुलांना गंमत वाटू शकते. थोडी माहिती गूगलवर शोधा, काही युट्युब व्हिडिओज बघा आणि तुमच्या जवळच्या मुलांना हे बनवायला सांगा. स्वत: काही तरी करण्याची आणि स्वत: अनुभव घेण्याची संधी त्यांना देऊया. असा प्रोजेक्टर कसा दिसतो, हे माझ्या ब्लॉगवर बघता येईल- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/10/a-rare-show-of-light-and-sha... माझ्या ब्लॉगवर मी घेतलेले चंद्र, सूर्य, ग्रह आणि तारकागुच्छांचेही फोटो बघता येतील.