Friday, September 5, 2025

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

🏔️ वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट
🏔️ "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही
🏔️ बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा
🏔️ कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी
🏔️ सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ!
🏔️ छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ 
🏔️ ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा
🏔️ ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट
🏔️ "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!"
🏔️ सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम

नमस्कार! नुकतंच "Lost in the Himalayas- James Scott's 43- day ordeal" हे पुस्तक वाचलं! त्याबद्दलचा एक पोडकास्ट आधी ऐकला होता. आजच्या "विद्यार्थी दिनी" ह्या पुस्तकातून शिकण्यासारखं खूप आहे! अतिशय थरारक हे पुस्तक आहे! आणि आकाराने थोडं मोठं असलं तरी सर्व गोष्टी वर्तमानात दिल्या आहेत, त्यामुळे हे पुस्तक एकदा धरलं की सोडता येत नाही. नेपाळमध्ये एका अभ्यास भेटीसाठी आलेला जेम्स स्कॉट, २२ वर्षांचा ऑस्ट्रेलियातला वैद्यकीय विद्यार्थी! काही दिवसांच्या सुट्टीमध्ये तो नेपाळला येतो. सुट्टीत एक छोटा ट्रेक करतो. काही दिवसांनी दुसरा ट्रेक करायला जातो आणि हरवतो! अनेक दिवस होऊनही काही संपर्क नाही म्हणून अखेर त्याची बहीण जोआन त्याच्या शोधासाठी नेपाळला येते! हे पुस्तक दोघांनीही लिहीलं आहे. मुख्य मुख्य दिवसांचे घटनाक्रम दोघांच्या वर्णनातून कळतात.

(हा इथे स्पॉटीफायवर ऐकता येईल.) 

 
 

थोडक्यात सांगायचं तर नेपाळमधल्या पहिल्या ट्रेकच्या अनुभवानंतर उत्साहाच्या भरात दुसर्‍या ट्रेकला जेम्स व त्याचा एक मित्र असे दोघे निघतात. जर्मन ट्रेकर्सच्या सांगण्यावरून ते दुसरा एक खडतर ट्रेक ठरवतात. हिमालयातल्या अतिउंचीचा अंदाज नसल्यामुळे व पहिल्या ट्रेकच्या वेळी काही गरज वाटली नसल्यामुळे त्यांच्याकडे कमीत कमी सामान असतं. काठमांडौच्या उत्तरेला साधारण १२५ किमीवर उच्च हिमालयामध्ये ते पुढे जातात. एका टप्प्यावर जेम्सला त्रास होतो व तो मित्राला परत फिरू असं म्हणतो. पण मित्र पुढे जायचं ठरवतो आणि जेम्स हा मागे येण्याचा तुलनेने सोपा पर्याय निवडतो. बर्फामध्ये वाट दिसेनाशी झाली तरी दोन- तीन तासांमध्ये आधीच्या गावामध्ये पोहचेन असं त्याला वाटतं. पण... प्रचंड हिमवृष्टीमुळे सगळी पायवाट व परिसर झाकला जातो. तासाभरापूर्वी ओळखीची असलेली वाट व खुणा बर्फामुळे हरवून जातात. अंदाजे दक्षिणेची दिशा व उताराची वाट घेत तो पुढे पुढे जातो. हा दिवस असतो २२ डिसेंबर १९९१! नेमक्या आधीच्या रात्रीच जेम्सच्या होणार्‍या बायकोला स्वप्न पडलं असतं की, जेम्सचा मृत्यु झालाय! इकडे परिस्थिती खडतर होत जाते. दिशा मिळत नाही. पहिली रात्र तो एका दगडाजवळ कशीबशी काढतो. अर्थात् आपण उद्या गावात पोहचू, ह्याचा त्याला दृढ आत्मविश्वास असतो. पण दुसरा दिवसही जातो आणि तेव्हा मात्र त्याला जाणवतं की, आपण अडकलोय. अजून एक रात्र आपण इतक्या थंडीत आणि बर्फामध्ये उघड्यावर राहिलो तर वाचू शकणार नाही! त्याला काही‌ वाट मिळत नाही. बर्फामुळे सगळीच दिशा त्याची चुकते. सगळीकडे नुसते पर्वत, दूरवर वाहणार्‍या नदीचा व धबधब्याचा आवाज आणि जंगल. तिकडे त्याचा मित्र अतिशय अविश्वसनीय प्रकारे पुढचा घाटमाथा ओलांडून सुखरूप पोहचतो!

जेम्स मात्र असेच प्रयत्न पुढचे दोन दिवस करतो. पण दिशा चुकल्यामुळे तीव्र उतार, त्यात कोसळणारे धबधबे आणि भयावह चढ अशा दुर्गम जागी अडकतो. शिवाय त्याच्याकडे अशा जागेतून जाण्यासाठीची साधनंही नसतात. तरीही जिद्द करून तो प्रयत्न करत राहतो. पण तीन दिवसांनी मात्र आपण पुरते अडकलोय हे त्याला कळतं. भर पाऊस आणि हिमवृष्टीत कसबसं पुढे जाता जाता त्याला एक नैसर्गिक खडकाने बनलेली उघडी गुहा सापडते. तीन बाजूंनी दगडी आच्छादन असल्यामुळे बर्फ व पावसापासून तिथे सुरक्षितता मिळते. आतमध्ये थंडी व वारा कमी येतो. ते त्याचं घर बनतं. समोरच डोंगरातली मोकळी जागा असते. ते बघून त्याला लगेच लक्षात येतं की, सुटकेसाठी हेलिकॉप्टर आलं तर इथे त्याला ते वरून बघू शकतं. पहिल्या दोन दिवसांमध्ये चॉकलेटस संपवल्यावर त्याच्याकडे काहीही अन्न नसतं! तिथून सुरू होतो त्याचा खडतर प्रवास! वैद्यकीय विद्यार्थी असल्यामुळे त्याला कल्पना असते की, अन्नाशिवाय माणूस ७० दिवस जगलेला आहे. त्यामुळे तो ७० दिवसांचं उद्दिष्ट ठेवतो! नैसर्गिक गुहेमुळे थंडी व वार्‍यापासून आपण वाचू ह्याची त्याला खात्री असते. जेवण म्हणून फक्त बर्फ वितळवून मिळणारं पाणी असतं! फळझाडं किंवा खाता येईल असे प्राणी अजिबात नसतात! 

गुहेमध्ये अडकलेल्या स्थितीतच त्याचा ख्रिसमस जातो. सुरूवातीच्या हिमवृष्टीच्या अति थंडीच्या रात्री बिकट जातात. काही दिवसांनी हवामान बदलतं. निळं आकाश व ऊन बघायला मिळतं. हळु हळु तो दिवस मोजायचे सोडून देतो. सोबत असलेले पुस्तकं परत परत वाचतो. सहा वर्षांचं कराटे प्रशिक्षण असल्यामुळे एका शिस्तीत तो स्वत:ची काळजी घेतो. टप्प्या टप्प्याने कपडे वाळवतो. पण प्रयत्न करूनही त्याला आग पेटवता येत नाही. त्याचं लायटर आणि दुसरा चांगला नकाशा मित्राकडे राहिला असतो! प्रिय जनांच्या आठवणी, त्यांना पत्र लिहीणं आणि विज्युअलायजेशनवर तो दिवस काढतो! वेदनेपासून आणि त्रासापासून आपलं लक्ष म्हणजे ध्यान दुसर्‍या गोष्टीकडे तो नेत राहतो. परत चालू झालेली पेन, स्वत:च्या आवाजातलं‌ गाणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ऊर्जा मिळवत राहतो. २१ जानेवारीचा त्याचा वाढदिवसही त्याला कळत नाही. अखेर एकदा तो प्रयत्न करतो आणि उतारावर नकाशात असलेल्या गावाला जायचं‌ ठरवतो. पण इतक्या दिवसांचा अशक्तपणा आणि पाच फूट पडलेला बर्फ! काही‌ तासांमध्ये दोनशे मीटर जाऊन त्याला परत यावं लागतं. तेव्हा मात्र तो ठरवतो की, आता बस्स झालं. आता बर्फाचं पाणी पिणं बंद करू म्हणजे काही तासांनी एक शांत मृत्यु येईल. 

आणि नेमक्या त्या वेळी त्याला शोधायला निघालेले लोक जवळ येत असतात. त्याची बहीण ऑस्ट्रेलियातून काठमांडौला येते. ऑस्ट्रेलियन राजदूतावास, इतर ट्रेकर्स, नेपाळी मदत करणारे ह्यांची मोट बांधून ती एक खूप मोठी मोहीम राबवते. वस्तुत: इतक्या उंचीवर व इतक्या हिमवृष्टीमध्ये काहीही साधन नसलेला माणूस ३ दिवसांहून जास्त काळ जीवंत राहूच शकणार नाही, हेच सगळ्यांचं सांगणं असतं. पण ती शोध सुरू ठेवते. तिला मदत करणारेही मिळतात. सुरूवातीचे काही दिवस एका ट्रेकर ग्रूपच्या चुकीच्या सांगण्यामुळे त्यांची दिशाभूल होते. एक एक मार्ग, रूट आणि जागा ते पिंजून काढत जातात. हळु हळु संभाव्य अशा सर्व जागा शोधत जातात. अशा वेळी रिनपोचे थरंगू लामा जोआनला एक वेगळी जागा सांगतात. त्यांच्या ध्यान साधनेच्या बळावर त्यांना दिसतं की, तो अशा जागी डोंगराच्या मधोमध अडकलाय! तिथेही ते शोधायचं ठरवतात. पण हे सोपं नसतं. काठमांडौवरून लोक जाणार, त्यांना जायला दोन दिवस, शोधायला दोन- तीन दिवस आणि मग ते परत येणार असा वेळ घेणारा प्रकार असतो. शक्य तिथे ते हेलिकॉप्टरही पाठवतात. हळु हळु वेळेची मर्यादा संपत असते. पण जेम्सची दोरी पुरेशी लांब असते! दोन वेळेस तो हेलिकॉप्टरला इशारे करतो, त्याची स्लीपिंग बॅग पसरवतो, लाल रंगाचे कपडे दाखवतो. पण दोन्ही वेळा हेलिकॉप्टरच्या लोकांना तो दिसत नाही! 

तिकडे त्याच्या बहिणीची तगमग सुरू असते. अनेक जण हळु हळु सुचवतात की, आता काही तो जीवंत नसणार. हिमालयात असे खूपसे ट्रेकर्स हरवतातच. त्यांचा काहीच माग लागत नाही. आता तुम्ही प्रयत्न सोडावेत, असं लोक सांगतात. पण बहिणीचा आतला आवाज सांगत असतो. जेम्सचे आई- बाबा व होणारी बायको ह्यांनाही तो जीवंत आहे हेच जाणवत असतं. ह्या सगळ्या प्रयत्नात मदतीला येणार्‍या मित्रांचं वर्णनही हृद्य आहे. शोध मोहीमेचा मोठा खर्च, अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे प्रयत्न, पाठपुरावा ह्या सगळ्यामध्ये मित्र परिवाराचं योगदान मोठं असतं.

अखेरीस २ फेब्रुवारीला हेलिकॉप्टरच्या लोकांना तो दिसतो! त्यांनी आपल्याला बघितलंय हेही जेम्सला कळतं. त्याची अवस्था वाईट झालेली असते. ३६ तासांच्या डिहायड्रेशननंतर पश्चात्ताप होऊन तो परत बर्फाचं पाणी सुरू करतो. आपण असा चुकीचा विचार का केला, ह्यामुळे त्याला वाईट वाटतं. पण मग परत तो रुळावर येतो. शरीराची स्थिती बिकट असते. डोळ्यांना दोन प्रतिमा दिसत असतात. वजन एक तृतीयांश कमी झालेलं असतं! हेलिकॉप्टरच्या लोकांनी बघितलंय, पण ते येईपर्यंत तरी आपण टिकू का, ही शाश्वती त्याला वाटत नसते. पण अखेरीस दोन शेर्पा सहा तासांचा खडतर ट्रेक करतात. एकाच्या पायात तर बूटही नसतात. तरीही ते रात्रीच्या अंधारात आणि सहा फूट बर्फ तुडवत त्याला शोधत येतात! हे सर्वच प्रसंग वाचण्यासारखे आहेत! आणि ते वाचताना लेहजवळ उघड्यावर रात्र काढताना केवळ ४ अंश इतक्या तपमानामध्येच (उणे तपमानही नव्हतं) माझी झालेली अवस्थाही आठवली. आणि जेम्सने किती मोठं दिव्य सहन केलं ही जाणीव होत गेली! 

सोडवणारे त्याला नमस्कार करून मिठी मारतात आणि आनंदाने ओरडतात. ते म्हणतात, "तू देव आहेस. कारण कोणीही माणूस अशा जागी ३ दिवसांहून जास्त काळ राहू शकत नाही." ते थोड्या थोड्या वेळाने त्याला हात लावून बघत असतात की, हा खराखुरा आहे ना! सोडवणार्‍या सगळ्यांना अश्रू अनावर होतात. पुढे मग हेलिकॉप्टरच्या खाली हार्नेसला लटकून त्याला पहिल्या जवळच्या गावात नेतात. तिथून दुसर्‍या हेलिकॉप्टरने काठमांडौला नेतात आणि तिथे त्याला त्याची बहीण भेटते! 

पुढचा घटनाक्रमही विशेष आहे. इतके दिवस एकटा असताना त्याचं मनावर नियंत्रण असतं. पण हॉस्पिटलमध्ये आल्यावर व लोकांमध्ये परत आल्यावर सगळं नैराश्य बाहेर पडतं- मीच मूर्खपणा केला, तयारी नसताना अशा जागी गेलो! मीच माझ्या प्रिय जनांचा अपराधी आहे वगैरे. किंवा हॉस्पिटलमध्ये नळ्या खुपसण्यापेक्षा त्या गुहेतच मी बरा होतो वगैरे! त्यातच मीडियाला बातमी मिळते आणि मीडियाचा ससेमिरा सुरू होतो. चुकीच्या बातम्यांचा सुकाळ होतो. अशक्यप्राय स्थिती असल्यामुळे काही लोक विश्वास ठेवत नाहीत. पण त्याबरोबर अनेक अनोळखी लोकांनाही ही बातमी कळाल्यावर आनंदाश्रू येतात. क्रिकेटच्या मॅचच्या प्रसारणात ही बातमी सांगितली जाते! मीडिया ट्रायल झाली तरी मुलाखती व वार्तांकनामुळे त्याला पैसेही मिळतात आणि शोध मोहिमेचा खर्च भरून निघतो. वर्षभराने जेम्स बरा होतो. तरीही त्याला दृष्टीमध्ये थोडी विसंगती व चालताना त्रास कायमस्वरूपी होतो. पुढे ते नेपाळमधलं त्याचं हॉस्पिटल व शोधणार्‍या शेर्पांच्या गावासाठी मदत उभी करतात. ऑस्ट्रेलियन जोआनला नेपाळ कसा वाटला, हे वर्णनही वाचावं असं आहे.

जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती विपरित परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो आणि त्यातून बाहेर येऊ शकतो हे इथे कळतं! प्रेम देणारे प्रिय जन, जीवाभावाची माणसं, देवावरची श्रद्धा व मित्र परिवार किती ऊर्जा देतात हे दिसतं! आवर्जून वाचावं असं हे पुस्तक. त्याबद्दलचे पोडकास्टही उपलब्ध आहेत. पुस्तक अमेझॉनवरून विकत घेता येईल.

वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 5 सप्टेंबर 2025.)

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.