Showing posts with label चंद्र. Show all posts
Showing posts with label चंद्र. Show all posts

Monday, September 8, 2025

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते. अगदी थोडा वेळ ढग बाजूला जायचे व चंद्र दिसू शकायचा. तेव्हा ग्रहण स्थिती स्पष्ट दिसत होती! पोर्णिमेच्या चंद्राची हळु हळु कोर होत गेली! आणि जसा जास्त भाग झाकला गेला तसा चंद्र लाल होत गेला! विरळ ढगांमधूनही नुसत्या डोळ्यांनी ही स्थिती बघता आली!

फोटो घेताना मात्र ढगांचा लपंडाव असल्यामुळे इतके व्यवस्थित फोटो घेता आले नाहीत. माझ्या मित्राने- गिरीश मांधळेने त्याच्या ८ इंची दुर्बिणीसोबत काढलेले फोटो उत्तम आले. ते इथे बघता येतील.