Showing posts with label Buddha. Show all posts
Showing posts with label Buddha. Show all posts

Wednesday, May 26, 2021

Pain of death

Hello. How are you all? Hope all are fine. Just sharing some thoughts about the pain through which all of us are going. In these days, we are always confronting death. Many of us have lost their dear ones. Many of us have endured tremendous pain. Generally we are never taught to see death with open eyes. Mostly from childhood, we are kept away from death. Even the crematorium is outside the town and this topic never comes in our discussion.

Monday, October 24, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ६

लेहदर्शन

सोनामार्गसह काश्मीरमध्ये ब-याच ठिकाणी हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर आणि काश्मीरच्या चार जिल्ह्यांमधून ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट’ मागे घेण्याचा प्रस्ताव बनवण्यात आल्यानंतर भ्रमणगाथेतील पुढचं वर्णन लिहितोय...

११ ऑगस्टच्या सकाळी करगिलमधून निघून संध्याकाळी सहाच्या सुमारास लेहमध्ये पोचलो....... अभूतपूर्व अनुभव...... शब्दातीत.... लेह!! लदाख विभागाचं मुख्यालय. काश्मीरमधलं एक आगळं वेगळं शहर. सर्वच दृष्टीने एकमेव. शहर आहे, पण मोठं नाही. अत्यंत दुर्गम भागात असलं तरी आधुनिक आहे. उंची ३५०५ मीटर्स, फक्त.






















लेह व एकूणच लदाख प्रदेशात हिवाळ्यामध्ये तपमान शून्यच्या खूप खाली जातं. द्रासमध्ये ते -६० अंशे से. इतकं कमी होतं, तर लेहमध्ये -२० पर्यंत जातं. त्यामुळे इथली जीवनशैली त्यानुसार घडली आहे. घरं त्यामुळेच जास्त जाड होती; भिंती, दरवाजे जास्त भक्कम होते. पर्यटकांचा अखंड ओघ असूनही अद्याप लेह साधं व आटोपशीर वाटत होतं. आकारानेसुद्धा लहानच आहे. पार्श्वभूमी व काही गोष्टी सोडल्या तर इतर शहरांसारखंच. बरीच नावं तिबेटी लिपीमध्ये दिसत होती. ही लिपी थोडीशी बंगाली लिपीच्या वळणाची आहे. कित्येक वाहनांचे क्रमांकसुद्धा तिबेटी लिपीत दिसत होते. पर्यटनाच्या उद्योगामुळे जेवण- हॉटेल, राहण्याची सोय इत्यादि बाबी इतरत्र आहेत, तशाच इथेही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राहण्या- खाण्याचे हाल होत नाहीत.

लेह एका दुर्गम परिसराचा मध्यबिंदु आहे. खाजगी वाहनाव्यतिरिक्त प्रवासाच्या इतर सोयी जवळजवळ नगण्यच आहेत. काही बस उन्हाळ्यात श्रीनगर व मनालीच्या दिशेने जातात; पण त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खाजगी वाहनचालक, प्रवासी एजंट ह्यांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं. लेह शहरामध्ये शहर बससेवा असल्याचं समजलं. परंतु तरीही, सामान्य माणसासाठी इथला प्रवास अवघडच आहे. सर्वच परिसर दुर्गम आहे व त्यामुळे एकंदरीत जीवनशैली व राहणीमानसुद्धा काहीसं अवघड होतं. अन्य भागांना उपलब्ध असलेले पर्याय इथे उपलब्ध होत नाहीत.

तरीसुद्धा पर्यटकांसाठी खूप सोयी निर्माण झालेल्या आहेत. लेहमध्ये इंटरनेट कॅफे मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात हा सर्व परिसर, लदाखचं विश्व असं होतं, ज्यामध्ये इंटरनेट ह्या साधनाचाच काय, सर्व मानवनिर्मित गोष्टींचा विसर पडावा.......

संध्याकाळी लेहमध्ये काहीशी थंडी जाणवत होती. जशी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये हिवाळ्यामध्ये अनुभवता येते. आल्हाददायक थंडी होती. श्वास घेताना व हालचाल करताना किंचित त्रास जाणवत होता; अर्थात काळजी वाटावी इतका तो जास्त नव्हता. संध्याकाळी वेळ मिळाल्यामुळे थोडं फार फिरलो; ज्यामुळे शरीराला त्या वातावरणाची थोडी ओळख झाली. अशी ओळख होणं गरजेचं आहे. आणि तशी द्रासच्या पुढे आल्यापासूनच ओळख होत होती. त्यामुळे शरीर कशी प्रतिक्रिया देईल, ही भिती कमी होत गेली.... लेहमध्ये ठीक होतं, पण पुढे शरीर चांगली प्रतिक्रिया देणार होतं.......

हसनजी व मोहम्मद हुसेनजींच्या रूपाने आम्हांला अत्यंत चांगले लोक मिळाल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम होती. कुठे फिरावं, कसं, कधी, काय बघण्यासारखं आहे, इत्यादिबद्दल आम्हांला आमचे ट्रॅव्हल एजंट योग्य मार्गदर्शन करत होते. रात्री दुस-या दिवशीचा कार्यक्रम ठरला. दुस-या दिवशी आम्ही लेह परिसरातील गोम्पा, राजवाडे, सिंधू घाट इत्यादि पाहणार होतो. त्यानंतर मग लदाखमधील लेहपासून दूर असलेल्या भागांमध्ये जाणार होतो. लेह आसपासच्या भेटीसाठी इनर लाईन परमिट लागत नाही; पण अन्यत्र जवळजवळ सगळीकडेच तो लागतो. आम्ही लेहच्या आसपास फिरत असताना हसनजी आमच्यासाठी पेंगाँग त्सो, नुब्रा खोरे आणि त्सो मोरिरीचा परमिट काढून ठेवणार होते.

आलो तेव्हा संध्याकाळी पडत असलेला पाऊस कमी होता; पण रात्रीसुद्धा पडतच होता. अर्थात तो फार काळजी करण्यासारखा नव्हता. हलकासा छिडकावा होता आणि ढग मोठ्या प्रमाणात पसरले होते...... लेह......



























सकाळी पर्वतांवर दिसणारे कोवळे सूर्यकिरण



























सकाळी दिसणारं लेहमधील नितळ आकाश...


सकाळी नितळ आकाश म्हणजे वस्तुत: काय असतं हे बघायला मिळालं. खरा निळा रंग. अत्यंत स्वच्छ, शांत, आल्हाददायक निळं आकाश...... सकाळी १० च्या सुमारास निघालो. जवळपासच्या भागातच जायचं असल्यामुळे फार घाई नव्हती.

लेह ही नामग्याल ह्या लदाखच्या पारंपारिक राजघराण्याची राजधानी. त्यामुळे राजवाडा लेहच्या जवळच होता. आम्ही लेहमधून निघून कारूच्या रस्त्याला लागलो. दक्षिण- पूर्वेकडे जाणारा हा रस्ता. हाच रस्ता लेह- मनाली महामार्ग आहे. १९८९ मध्ये लेह- मनाली महामार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत लेहला जोडणारा लेह- करगिल- श्रीनगर हाच मुख्य मार्ग होता. कारूपर्यंतचा रस्ता सपाट असल्यामुळे छान आहे. लेहच्या थोडं बाहेर पडलं की लगेचच सिंधू नदी व मग सिंधू घाट लागतो. आम्ही परत येताना तिथे थांबणार होतो.



























झाडी निसर्गत: आलेली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचं लगेच जाणवतं.



लेहमधून निघाल्यानंतर शे राजवाडा व ठिकसे गोम्पा बघितले. ह्या प्राचीन वास्तु आहेत. चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यावेळी तिथे विदेशी पर्यटक भरपूर होते. महाराष्ट्रीय पर्यटकांचेही काही गट दिसत होते. काही केसरीसारख्या पर्यटन संस्थेकडून आले होते; तर काही व्यक्तीगतरित्या एकत्र येऊन फिरत होते.































बाहेरून दिसणारी ठिकसे गोम्पा























गोम्पामधील प्राचीन वारसा






















इतर काहीही असलं तरी विदेशी पर्यटकांमध्ये उत्साहसुद्धा भरपूर असतो....













































बुद्धभूमीतील बुद्धमूर्ती


शे राजवाडा आणि ठिकसे गोम्पा ह्या वास्तु आधी बघितलेल्या लामायुरूतील गोम्पाप्रमाणे काहीशा वाटत होत्या. शे राजवाडा अत्यंत भव्य आहे. ठिकसे गोम्पा तर ब-याच उंचीवर म्हणजे एका टेकडीवर आहे. त्यामुळे टेकडी चढून ठिकसे गोम्पाच्या उंबरठ्यावर पोचतानाच दमछाक झाली. थांबत थांबत जाऊनसुद्धा. त्यामुळे मग आतमध्ये फार फिरून पाहता आलं नाही. आमच्यातला गिरीश मात्र सर्व गोष्टी बारकाईने बघत होता. संपूर्ण प्रवासामध्ये मी व परीक्षित ह्यांच्या तब्येतीचा कस लागला; पण गिरीशला मात्र कुठेही त्रास झाला नाही. जणू कोणत्याही पिचवर दमदार खेळ करणा-या कसलेल्या
फलंदाजाप्रमाणे त्याने लगेचच लदाखच्या पिचसोबत जुळवून घेतलं.

हे आणि लदाखमधल्या इतर सर्व गोष्टी बघताना माझ्यामध्ये फोटो घेण्याचं भान उरतच नव्हतं. नजारा किंवा समोरचं अद्भुत विश्व इतकं विलक्षण होतं, की इतर कशाचच भान राहू शकत नव्हतं. परंतु ह्याही परिस्थितीमध्ये माझ्या मित्रवर्यांनी- गिरीश आणि परीक्षितने फोटो घेण्याचं महान काम पूर्ण केलं व त्यामुळेच हा ब्लॉग ख-या अर्थाने साकार होतो आहे. गिरीश तर जिथे जाणं शक्य असेल; त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करत होता आणि ती वास्तु, तो परिसर डोळ्यात स्टोअर करून घेत होता....

शे आणि ठिकसे पाहून झाल्यानंतर जेवण केलं. ह्या परिसरात मात्र फार चांगलं हॉटेल नव्हतं. ह्या वास्तुंपेक्षा अधिक आकर्षण अर्थातच सिंधू दर्शन घाटाचं होतं. लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकारातून गेल्या दशकाच्या सुरुवातीला सिंधू घाट बांधण्यात आला. तो लेहपासून सुमारे १० किमी दक्षिणेला आहे आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये तिथे सिंधू दर्शन महोत्सव भरतो. सिंधू नदीवरील घाट असल्याने निश्चितच विशेष वाटत होतं. पण असंसुद्धा वाटलं की घाट बांधण्यासाठी नदीला बांध घातला आहे, मर्यादित केलं आहे. लेहच्या अगदी जवळच्या प्रदेशामध्ये सिंधू नदीच्या बाजूचा भाग समतल आहे. त्यामुळे नदीचं पात्र काहीसं छोटं व संथ आहे. त्यातच घाट बांधल्यामुळे ते अजून छोटं झाल्यासारखं वाटतं. घाटाचं बांधकाम चांगलं होतं. नदीमध्ये पाय बुडवून पहुडता येत होतं. छोटासा प्रवाह आणि त्यामध्ये काही छोटी बेटं दिसत होती. लाटा फार लहान होत्या. सिंधू नदीच्या मानससरोवरापासून कराचीपर्यंतच्या प्रवासातला हा उगमाच्या तसा खूप जवळचा टप्पा; त्यामुळे नदी फार मोठी नव्हती.






















संथ वाहते सिंधूमाई....































सिंधू नदी...... तो अनुभव...... खालत्सेपासून सतत सिंधू नदीची सोबत मिळत होती. आम्ही बसलो असतानाच आणखी एक मोठा मराठी पर्यटकांचा समूह आला. काश्मीरमध्ये सर्वत्र मराठी पर्यटकांनी ओळख निर्माण केलेली आहे. अगदी आमच्या हसनजींनाही ‘चांगला’ हा शब्द चांगला माहिती होता! गंमत म्हणजे ‘चांगला’ हा शब्द पुढे आम्हांला अगदी ‘चांगला’ लक्षात राहणार होता. पण अजून त्याला वेळ होता......

























रौद्र सौंदर्य!
























पर्वतांची दिसे दूर रांग....

























सिंधू दर्शन स्थळ


























भारावलेल्या अवस्थेत बराच वेळ सिंधू घाटावर पहुडलो. ऊन जाणवत होतं, पण ढगसुद्धा होते. दूरवर बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मनमुराद पहुडणं झाल्यावर व तो अनुभव मनामध्ये साठवल्यावर निघालो. वेळेअभावी हेमीस ही एक खूप मोठी गोम्पा बघता येणार नव्हती. हेमीस हे एक अभयारण्यसुद्धा आहे व ते लेह आणि झांस्कर खो-याच्या मधल्या विस्तृत भागात पसरलं आहे. हिमशिखरांकडे बघून ‘तिथे’ काय असेल, ह्याची कल्पना येत होती. पण त्याच्या दर्शनाचा योग अजून आला नव्हता............



सिंधू घाटानंतर लेह पॅलेस बघण्यासाठी गेलो. हा लेह शहराच्या पूर्व भागात एका उंच टेकडीवर आहे. इथे राजवाडा आणि संग्रहालय आहे. बराच उंचीवर होता व खालून पर्यटक पायवाटेनेसुद्धा येत होते. उंचावरून दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत व खाली लेह शहर सुंदर दिसत होते.... समोरच एका डोंगरावर एक पांढरी वास्तु दिसत होती. ती म्हणजे शांती स्तुप हे समजलं. लेह- दर्शनातला ते आमचं शेवटचं स्थान होतं. ह्या सर्वच ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञाला व इतिहासाच्या अभ्यासकाला भरपूर खाद्य मिळेल. पण सामान्य दृष्टीकोनातून ह्या सगळ्या वास्तू ब-याच एकसारख्या वाटतात. समोर दिसणा-या शांतीस्तुपाचा मार्ग मात्र बराचसा फिरून आणि लेह शहराच्या मध्यभागातून जात होता.































प्राचीनता आणि आधुनिकता- पांढ-या छोट्या वास्तू प्राचीन आहेत.

































राजवाड्यावरून दिसणारे लेह शहर






























समोर दिसणारा शांतीस्तुप आणि लेह शहराचा काही भाग


शांतीस्तुप...... लेह- दर्शनामध्ये तसे दोनच भाग मनाला भिडले. एक म्हणजे सिंधू दर्शन स्थळ आणि दुसरा शांती स्तुप!! अत्यंत भव्य; एका उंच टेकडीवर केलेलं विशाल बांधकाम. अत्यंत उत्कृष्ट आणि भव्य. उंच टेकडीवर आल्यामुळे एक मोकळेपणा येतो; प्रशस्त वाटतं. सर्व दिशांना लांबवर दिसणारे पहाड आपल्याच उंचीवर आहेत; हा (गोड) भ्रम वाटू शकतो. अत्यंत प्रसन्न वातावरण आणि भरून वाहणारे वारे. हळुहळु ते वारे आणखीनच थंड व गार झाले. उंचावर असल्यामुळे वा-यांसाठी रान मोकळे. त्यामुळे थंडी झोंबण्यास सुरुवात झाली... लदाख!
























शांती स्तुपाचा कळस

































समोर दिसत असलेले पर्वत.... !



शांतीस्तुपामध्ये ध्यान कक्ष आणि इतरही अनेक वास्तु आहेत. इथल्या ध्यान कक्षातील ही बुद्ध मूर्ती. ह्या मूर्तीमध्ये काही वेगळेपणा आढळतो का? बारकाईने पाहिल्यास लक्षात येऊ शकेल.



























शांती स्तुपातील बुद्धमूर्ती

ही बुद्ध मूर्ती काहीशी जपानी वळणाची आहे. जपानी सरकारने हा शांतीस्तुप इथे बांधला आहे. जपानी लोकांचं काम उठून दिसतं, इतका हा स्तुप वैभवशाली व विशाल आहे.



























स्तुप पाहिल्यानंतर खूप काही बघितल्याचं व अनुभवल्याचं समाधान मिळालं. संध्याकाळ झाली होती व अत्यंत थंड हवा होती. दूरवर पाऊस दिसत होता. वारे जणू आम्हांला उचलून फेकण्याच्या विचारात होते.





























शांतीस्तुप पाहून परत निघालो. शांतीस्तुपापर्यंत अगदी वर वाहनं जातात आणि काही लोक लेह शहरातून चालतसुद्धा येतात....... ते सहजपणे खालून अगदी वरपर्यंत चालत येतात.....

परत जाताना खाली मुख्य वस्तीतील बाजारपेठ लागली. भरपूर दुकानं होती. बरेचसे विदेशी पर्यटकही दिसत होते. दुकानं व हॉटेल बरीच महाग असतील असं वाटलं. पण ती तशी नव्हती. अजूनही लेहमध्ये पारंपारिक साधेपणा व आतिथ्य दिसतं.

संध्याकाळी हॉटेलवर जाऊन थोडा आराम आणि मग जवळच्या इंटरनेट कॅफेला भेट दिली. दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. हसनजींनी आमच्यासाठी परमिट आणले होते. त्यामुळे काही अडचण नव्हती. आम्ही पेंगाँग त्सो (पेंगाँग सरोवर) बघायला जाणार होतो. पण परीक्षितला किंचित त्रास होत असल्यामुळे त्याने उद्या आराम करावा असा सल्ला हसनजींनी दिला व आमच्या इथून पुढे सोबत असणा-या ड्रायव्हरशी ओळख करून दिली. त्यांचं नाव हैदरभाई होतं. सकाळी ठीक साडेपाच वाजता आम्ही निघणार होतो.

एकच दिवसात हसनजी व त्यांचे साथीदार आणि हॉटेल अगदी ओळखीचं होऊन गेलं. काश्मीर, दहशतवाद ह्याबद्दल वाटणारी चिंता कुठेच राहिली नव्हती. नेहमीच राहतो अशा सहजतेने आम्ही लेहमध्ये राहिलो. अर्थातच मनामध्ये लदाख, हिमालय व आम्ही घेत असलेला अनुभव ह्याबद्दल अनंत उत्तेजना होती......... “तिथे” असण्याचा अनुभव “तिथे” येऊ शकतो.

आम्ही “जिथे” होतो; तिथून पुढे जाताना आता आम्हांला अनेक मोठ्या घाट माथ्यावरून जायचं होतं. जणू लेहच्या आसपास असलेल्या नितांतसुंदर, श्रीमंत व समृद्ध निसर्गाचं संरक्षण करण्यास बसलेले हे ‘चांगले’ रखवालदारच! कुठेही जायचं तर चांग-ला, खार्दुंग-ला अशा रखवालदारांना जुले (लदाखी भाषेत रामराम) करूनच जावं लागणार.... आणि पुढच्या दिवशी आम्हांला चांगलाला भेटायचं होतं आणि चांगलाचा अनुभव चांगलाच येणार होता......





















क्रमश:


पुढील भाग: बर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो......



Sunday, October 16, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ५


अब तो हमे आगे है बढते रहना......
सिंधू नदीची सोबत



जम्मु काश्मीरमधील विधानसभेमध्ये अफजल गुरूला जीवदान देण्याच्या ठरावावरून गदारोळ झाल्यानंतर आणि नुकताच बनिहालजवळ रेल्वेचा आशियातला दुसरा सर्वांत मोठा बोगदा खुला झाल्यानंतर वर्णनाचा हा भाग लिहितोय. रेल्वे काश्मीर व पूर्वांचलमध्ये अत्यंत महान कार्य करत आहे. काश्मीरमध्ये आता अगदी श्रीनगर- बारामुल्लापर्यंत रेल्वे पोचली आहे. भारतात घडणा-या ह्या काही मोजक्या चांगल्या घटना...

करगिलमध्ये संध्याकाळी पोचल्यानंतरचा दिवस मस्त गेला होता. थोडफार फिरलो, गाव थोडसं पाहिलं, सुरू नदीचा रोरावणारा सूर ऐकला. गावाच्या चारही बाजूंना असलेले डोंगर बघितले. करगिलमधलं आमचं हॉटेल तसं सामान्यच होतं, तरीसुद्धा तिथे वीजेची चांगली सोय होती. आधी ऐकलं होतं की काश्मीर व लदाखमध्ये वीज पुरवठा अत्यंत कमी आहे. परंतु इथेतरी लॅपटॉप व मोबाईल व्यवस्थित चार्ज होत होते.

पर्यटन उद्योगाचा ब-याच प्रमाणात प्रभाव असल्यामुळे हॉटेलमधले कर्मचारीसुद्धा चांगली सेवा देत होते. दुस-या दिवशी बरोबर पहाटे साडेपाच वाजता गरम पाणी आणून दिलं.

करगिलमधली पहाट!! शब्दातीत अनुभवांमधलाच एक असूनसुद्धा ‘एकमेव!’ आकाशात सप्तर्षी दिसत होते. गंमत म्हणजे ते उलटे दिसत होते. करगिल जवळजवळ ३४.५ उत्तर अक्षांशावर असल्यामुळे तिथे ३४.५ उत्तर अंश इतक्या आकाशातले तारे मावळणार नाहीत. त्यामुळे ध्रुव तारासुद्धा नेहमीच्या २० अंशांऐवजी ३४ अंश इतका बराच वर दिसत होता व सप्तर्षी वर आल्यामुळे मावळत नव्हते. हवा थंड पण आल्हाददायक होती. सूर्योदय बघायला मिळेल असं वाटलं; पण ढग होते आणि डोंगरापलीकडे सूर्योदय झाला. सकाळची प्रसन्न हवा, करगिल आणि सुरूगर्जना!! जन्नत, जन्नत!!




करगिल गाव व सुरू नदी

 
सकाळी लवकर निघालो. आज करगिलमधून निघून मुलबेक- लामायुरू- खालत्से- पत्थरसाहीबमार्गे लेहला पोचायचं होतं. खालत्सेपासून सिंधू नदी सोबत येणार होती......

करगिलमध्ये पेट्रोल भरलं. दूरवर हिमाच्छादित पर्वत दिसत होते. पेट्रोलपंपाच्या समोर, रस्त्याला लागूनच एक कोसळलेलं घर होतं. हसनजींनी सांगितलं की ते घर करगिल युद्धामध्ये पाकिस्तानच्या तोफेच्या मा-यामुळे मोडलं होतं......... युद्धाची, अशांततेची व त्याबरोबर सेनेच्या पराक्रमाची व लोकांच्या धैर्यशीलतेच्या अशा खुणा सतत सोबत होत्या...

करगिलच्या जवळून श्रीनगर- लेह मार्ग जातो. गावाबाहेर येऊन परत महामार्ग गाठला. महामार्ग नावालाच; कारण इथल्या पर्वतांमुळे, द-यांमुळे व प्रतिकूल हवामानामुळे तो क्वचितच कुठे मोठा रस्ता दिसतो. साधारणत: जेमतेम मोठी ट्रक जाऊ शकेल असाच मार्ग. आणि क्रॉसिंगच्या जागाही कमीच.
सोनामार्गच्या पुढे नेहमी होणा-या चकमकी, घुसखोरी, अतिरेकी हल्ले ह्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे तिथून पुढच्या भागामध्ये सेनेची जी वर्दळ दिसते ती एक तर नियंत्रण रेषेलगतच्या तळांना पुरवठा करणारी व नियंत्रण रेषेलगतच्या चौक्यांची असते. ही वर्दळसुद्धा प्रचंड असते. सेनेचे ट्रक्स मोठ्या संख्येने काफिल्यामधून जात राहतात. तितका वेळ इतर वाहतूक थोडी अडकून पडते.

करगिलहून पुढे निसर्गामध्ये हिरवा रंग कमी कमी होत जाऊन गुलाबी, करडा, लाल, पिवळा असे रंग दिसत जातात. करगिलजवळची हिरवळ- झाडी व शेतीसुद्धा बरीच कृत्रिम, मानवनिर्मित आहे. डोंगरांचा नव्हे पर्वतांचा आकार मात्र अजून मोठा, भव्य, अतिभव्य होत जातो. जणू संख्या ज्याप्रमाणे खर्व, निखर्व, पद्म, महापद्म अशा अनंताकडे जातात, त्याप्रमाणे पर्वत अतिभव्य, त्याहूनही अतिभव्य होत जात होते. ही भव्यता, व्यापकता विराट होती! शब्दातीत, इंद्रियातीत व भावातीतसुद्धा......
















रस्त्यालगतचा प्रदेशसुद्धा रूप बदलतो. वस्ती जवळजवळ विरळ होत जाते. क्वचित कुठे काही लोक दिसले तर दिसतात. मुख्य वस्ती सेना, सीमा सडक संगठन अशीच दिसते. गावंसुद्धा विशेष नाहीच. मधून मधून छोटी हॉटेल्स किंवा दुकान दिसतात. अन्यथा एकदम निर्जन प्रदेश. रस्त्यावरची वाहतुकसुद्धा तुरळकच; कारण ती नियंत्रित केलेली असते. रस्ता मात्र काहीसा ठीक आहे. कारण झोजिला ओलांडल्यानंतर पुढे मुख्य असे दोनच घाट (ला) आहेत. नमिकेला आणि फोटूला. फोटूला जरी श्रीनगर- लेह रस्त्यावरचा सर्वोच्च बिंदु असला, तरी घाटमाथा म्हणून तो आणि नमिकेलासुद्धा विशेष दुर्गम नाहीत आणि ते हिवाळ्यातही चालू असतात. त्यामुळे प्रवास काहीसा सुकर आहे.

करगिल सोडल्यावर लगेचच एक रस्ता बटालिककडे जातो व पुढे एक रस्ता दक्षिण मध्य काश्मीरमधील झांस्कर भागात जातो. इथे जाण्यासाठीसुद्धा आयएलपी- इनर लाईन परमिट घ्यावा लागतो. लदाखमध्ये लेहच्या आसपासचा परिसर वगळता इतर सर्व प्रेक्षणीय स्थळांसाठी इनर लाईन परमिट घ्यावा लागतो; कारण हा सर्व भाग नियंत्रण रेषेला लागूनच व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात आहे. त्यामुळे तिथली वाहतूक व पर्यटन नियंत्रित आहे, जे अगदी योग्य आहे.

करगिल गाव सोडल्यापासून पुढे सुमारे साठ किलोमीटर्सवर मुलबेक हे पहिलं मोठं गाव येतं. इथे मैत्रेय बुद्धाची विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळच एक गोम्पा आहे आणि तिच्यामध्ये गोल फिरणारं चक्र आहे. खास लदाख शैलीच्या गोम्पा (बौद्ध मठ) इथून सुरू होतात. मुलबेकच्या आसपास अत्यंत कोरडे पाषाण म्हणता येतील असे उंच व विशाल पर्वत आहेत. त्या पर्वतांमध्ये गुहांसारख्या काही फटी किंवा बंदिस्त चौकटी दिसत होत्या. कानावर आलं की सततच्या वाहत्या वा-यामुळे पहाड झिजून तशा फटी निर्माण झाल्या आहेत. पण विश्वास बसला नाही. कारण मुलबेकच्या खूप आधीपासून त्या स्वरूपाचे मोठे पहाड दिसत होते; पण तशी रचना/ वा-यामुळे झालेली झीज आधी कुठेच दिसली नाही. आणि त्या फटींना साचेबद्ध चौकटींचे स्वरूपसुद्धा होते. मनातून वाटलं की त्यासुद्धा जुन्या गोम्पा किंवा त्याहूनही भव्य वास्तूच असाव्यात. पुढेही अशा प्रकारच्या पहाडातील रचना दिसत होत्या. 




























































वर दिसणा-या रचना नैसर्गिक आहेत असं वाटत नव्हतं. नक्कीच ह्या जुन्या वास्तू असल्या पाहिजेत....

मैत्रेय बुद्धाची मूर्ती बरीच जुनी होती व खूप उंच होती. आतमध्ये एक मठ आहे. तिथे फिरताना मात्र चांगलं जाणवत होतं, की आपण उंचावर आणि विरळ हवेच्या ठिकाणी आहोत. पाच- दहा मिनिटातच शरीराचा विरोध लक्षात यायचा. मुलबेक गाव छोटसंच आहे. तिथे एका नेपाळी हॉटेलमध्ये नाश्ता कम जेवण करून पुढे निघालो. आता पुढे नमिकेला हा घाटमाथा होता.

वैराण, उजाड, रुक्ष परंतु तरीसुद्धा विराट, अतिभव्य, विलक्षण, अमानवी प्रदेश होता सर्व. उंचच उंच पहाड. काही श्रेष्ठतम पहाडांना श्वेत शिरपेचाचा मान..... अत्यंत भन्नाट दृश्य निरंतर चालूच होतं. विश्वरूपदर्शनाप्रमाणे हे हिमालय दर्शन होतं.

नमिकेला हा घाटमाथा फारसा दुर्गम नाही. करगिलच्या पुढे रस्ते पसरलेले आहेत, एकदमे उभे- खाली असे नाहीत. त्यामुळे घाटही फार अवघड असे नाहीत. नमिकेलाची उंचीही जेमतेम ३५०० मीटर्स होती; त्यामुळे तो विशेष वाटला नाही. पुढे जाताना एका ठिकाणी मात्र रस्त्यावर एक दरड कोसळली होती व तिचा मलबा जेसीबीद्वारे काढत होते. त्यामुळे थोडा वेळ वाहतूक थांबली होती. तिथून पुढे लामायुरू ही लदाखमधील सर्वांत मोठी गोम्पा (स्पेलिंग Gonpa आहे) लागते. रस्त्याच्या किंचित बाजूला उतारावरच्या डोंगरावर ह्या गोम्पाची मोठी वास्तु पसरली आहे. भरपूर भव्य व समृद्ध आहे. पर्यटकांनी गजबजलेली होती. मुलबेकप्रमाणे इथेही महाराष्ट्रीयन पर्यटक भेटले. बरेचसे विदेशीही होते. लामायुरू साधारणपणे करगिल व लेहच्या मध्यावर येतं. रस्त्यापासून थोड्या चढावर मुख्य वास्तू होती. जुन्या काळातील बरेचसे ग्रंथ, शिल्प, स्मारकं होती. लामा मोठ्या संख्येने दिसत होते. बुद्धमूर्ती ब-याच होत्या. आतमधील चित्रांमध्ये व शिल्पांमध्ये थोडीशी ड्रॅगन शैली दिसत होती... चीनी प्रभाव असावा.































वर उजवीकडे पिवळ्या रंगाचा भाग दिसतोय, तो मूनलँड.


लामायुरूच्या लगतच्या परिसराला मूनलँड म्हणतात. कारण हा परिसर अक्षरश: चंद्राप्रमाणे दिसतो. खडकाळ, लालसर पिवळा रंग. लामायुरूपासून पुढे फोटूला व खालत्से लागतात. फोटूलावर एक प्रसारभारती केंद्र व कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी होते ते तिबेटी मंत्र कापडाच्या पट्ट्यांवर लिहिलेले होते. फोटूलाची उंचीही चार हजार मीटर्सच्या आसपास आहे. तिथे थंडी तितकी जाणवत नव्हती. परंतु भरपूर वारे वाहत होते.




















































खालत्से इथेही गोम्पा आहे. इथे येईपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते. लेहला संध्याकाळपर्यंत पोचायच्या दृष्टीने फार वेळ थांबलो नाही. खालत्सेचं वैशिष्ट्य म्हणजे इथून सिंधू नदी सोबत येते. इथून पुढे ती लेहपर्यंत व लेहच्या पुढेही काही ठिकाणी सोबत करणार होती. सिंधु नदी...... शब्दातीत, भावातीत, कल्पनातीत, इंद्रियातीत असं अतीत सांगत होती. अवर्णनीय आणि अमूर्त.


ज्या नदीमुळे संस्कृती निर्माण झाली, ज्या नदीमुळे आजही देशाला नाव मिळालेलं आहे, त्या नदीच्या किनारी पोचलो होतो. हा अनुभव शब्दांच्या कित्येक लाख प्रकाशवर्ष पुढचा आहे. तिथे भावच हवा आणि अनुभवच हवा. एकदा नव्हे अनेकदा जाऊनच यावं. मनामध्ये तीव्र ऊर्मी होती की सरळ पुढे जावं आणि पहाडामध्ये विलीन व्हावं..... नदीचा प्रवाह अर्थातच आमच्या उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडे जात होता..........

सिंधू नदीच्या सोबत पुढचा प्रवास सुरू झाला.... नदी कधी उजवीकडे तर कधी डावीकडे होती. आता लेह जवळ येत चाललं. नदीचं पात्र लहान- मध्यम आकाराचं होतं. गर्जना होतीच आणि पाणी अर्थातच खूप ताजं व थंड होतं. प्रवाहीपणा... जीवन.... एक उगम, धारा असंख्य....

खालत्सीपासून रस्ता ब-यापैकी समतल झाला. लक्ष्य चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नजारा होता. किंबहुना लक्ष्य चित्रपटात दाखवलेले भागसुद्धा ओळखता येत होते... समतल पक्का रस्ता आणि लांब उंचावर डोंगर..... आहा हा..... अद्भुत..... न भूतो....





 


खालत्सेपासून पुढे निम्मू नावाचं एक गाव आहे. इथे सिंधू आणि झांस्कर नद्यांचा संगम आहे. आम्ही खूप वेळापासून ह्या संगमाची वाट पाहत होतो. दक्षिण मध्य काश्मीरच्या झांस्कर पर्वतराजींमध्ये उगम पावणारी झांस्कर नदी इथे सिंधू नदीला येऊन मिळते. ते दृश्य अत्यंत सुंदर होतं. खरं तर मुख्य रस्ता ब-याच उंचीवरून जात होता. परंतु आमची इच्छा लक्षात घेऊन हसनजींनी गाडी थेट नदीपर्यंत नेली. तिथे गेल्यावरचा अनुभव..... अहा हा..... सिंधू नदीच्या किना-यावर.... इथे नदीचं पात्र भरपूर मोठं होतं. मध्यम आकाराच्या लाटासुद्धा होत्या. नदीच्या पाण्याचा स्पर्श मात्र अत्यंत थंड होता. त्यामुळे फक्त तळपाय नदीमध्ये बुडवून वाळूत बसलो.... पलीकडच्या बाजूला झांस्कर येऊन सिंधूला मिळत होती. वाळूतच एक घर नवीन बांधलेलं दिसत होतं.








































संगमाचं वरच्या रस्त्यावरून दिसणारं दृश्य. खाली किना-यावर एक घर व समोर एक रस्ता दिसतो. 
पाणी अत्यंत थंड असल्यामुळे मधून मधून पाय बाहेर काढावा लागत होता. त्यावेळी तिथे पाऊस पडत होता. मधूनच जरा मोठी सर येऊन गेली. दूरवर झांस्कर नदीमध्ये लाटा व वावटळ दिसत होती. तिथून एक रस्तासुद्धा येत होता. लदाखच्या अतिदुर्गम भागामध्ये सीमा सडक संगठनच्या गौरवशाली कार्याची ती एक खूण होती.

पावसामुळे मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. लदाखमध्ये सहसा पाऊसच पडत नाही. आणि पडला तर फार हानीकारक असतो. गेल्या वर्षीच्या ढगफुटीच्या आठवणी ताज्याच होत्या.... सिंधू नदीच्या आसमंतात पहुडल्यावर परत जायला निघालो..... अनिच्छेनेच. पण सिंधू नदी खूप वेळ सोबत करणार होती. बाजूचा रस्ता परत घेऊन वर येऊन मुख्य रस्त्याला लागलो. आता पुढे पत्थरसाहीब आणि मग लेह.....

पत्थरसाहीब हा एक अत्यंत मोठा गुरूद्वारा आहे. अर्थातच तो खूप समृद्ध व ऐसपैस आहे. ह्या ठिकाणी एका टेकडीवर एका राक्षसाने गुरू नानकांवर मोठा दगड मारला पण गुरू नानकांना काही इजा झाली नाही अशी कथा सांगितली जाते. नानकांवर फेकलेला दगड (पत्थर साहीब) आणि ती टेकडी दाखवतात. खूप मोठ्या परिसरात हा गुरूद्वारा आहे. इथून आम्ही निघालो तेव्हा अत्यंत सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. चांगला पाऊससुद्धा पडत होता. वा-याचा जोर भयानक होता. भितीदायक होता. आमचे हसनजी आम्हांला लवकर निघायला सांगत होते.






































































पुढे वाटेत एका जागी मॅग्नेटिक हिल लागते. इथे गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य होते, असं म्हणतात. म्हणजे न्युट्रल गेअरवर गाडी ठेवली व तिला ढकललं तर ती डोंगर चढते, असं म्हणतात. वेळ नव्हता, अंधार पडला होता व भयानक पाऊस होता म्हणून पुढे सरळ निघालो.... पत्थरसाहीबपासून पुढे आमच्या रस्त्यात एक सुंदर पूर्ण इंद्रधनुष्य दिसत होतं. अद्भुत नजारा होता...... फक्त वारा इतका सुसाट होता, की खिडक्या पूर्ण बंद करून घ्यावा लागल्या. इंद्रधनुष्याच्या जणू खालूनच आम्ही गेलो. संध्याकाळची वेळ व जोरदार वाहणारे वारे ह्या वातावरणात आम्ही लेह शहरामध्ये प्रवेश केला......

लेह अगदी आधुनिक शहर आहे. फक्त लोकसंख्या अन्य मेट्रो किंवा महानगरांइतकी नाही. छान वाटत होतं शहर. आणि का वाटणार नाही. इतक्या अतिभव्य व विशाल तरीही वैराण प्रदेशातून आलो होतो. मुख्य रस्त्याने येऊन थोड्याच वेळात हॉटेलवर येऊन पोचलो. आम्ही फोनवर बोललो होतो ते ट्रॅव्हल एजंट श्री मोहंमद हुसेन भेटले. लवकरच रूम मिळाली. त्यांची संपूर्ण प्रवासातली व वास्तव्यातली सेवा अप्रतिम अशीच होती. काहीच उणीव नाही. काहीच अडचण नाही. अखंड सौजन्य. लदाखी संस्कृतीमधला साधेपणा आणि आपुलकी......

तब्येतीला त्रास नव्हता. थंडीही फार नव्हती. चालताना किंचित हळु चालावं लागत होतं. बोलतानाही जरा थांबून बोलावं लागत होतं. पण अन्य काहीच त्रास नाही. तिथे इंटरनेट कॅफेही मिळाला. बंद पडलेले काही फोन्स सुरू झाले.

लेह..... एका अतिरोमांचक महायात्रेच्या मुख्य टप्प्यावर आम्ही आलो होतो. प्रत्येक वेळी स्वत:ला चिमटा काढून खात्री करून घ्यावीशी वाटत होती, की आम्ही लेहमध्ये आहोत, आम्ही इथे आहोत...... एका आगळ्यावेगळ्या जगामध्ये आमचा प्रवेश झाला आहे...... तिबेट हे जगाचं छप्पर मानलं जातं. आम्ही लेह म्हणजे तिबेटच्या उंबरठ्यावर होतो. सर्वच दृष्टीने अत्यंत रोमांचक क्षण....... अपूर्व.... अमूर्त.... अनंत..... अनादी.....




क्रमश:
(फोटो सौजन्य: परीक्षित आणि गिरीश)
पुढील भाग: लेहदर्शन