नमस्कार. मला जर कोणी विचारलं की तुझ्या पाहण्यामध्ये असा कोणी आहे का जो कधीच तणावात दिसत नाही, जो कधीच अति गंभीर असत नाही आणि जो कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीतही चेहर्यावरचं हसू गमावत नाही तर माझ्या डोळ्यापुढे एकच नाव येतं. आणि खात्रीने सांगू शकतो की हाच प्रश्न इतर अनेक लोकांना विचारला, तरी ते त्याच व्यक्तीचं नाव घेतील. हा प्रश्न व हे दुर्मिळ गुण असणं म्हणजे ध्यान जमणं आहे. कितीही आणीबाणी येऊ दे, कितीही खडतर परिस्थितीचं ओझं येऊ दे किंवा कितीही गंभीर स्थिती असू दे, जो माणूस प्रसन्नचित्त राहतो तो खूप वेगळा असतो. सुहासभाऊंचे मित्र, त्यांनी ज्या ज्या प्रकल्पांमध्ये काम केलंय तिथले ताई- दादा माझ्या वाक्याशी खात्रीने सहमत होतील. आणीबाणी- मग ती कोणतीही असेल- संस्थेमध्ये बाहेरून मंडळी भेटायला आली आहेत आणि त्यांना नेणार्या गाडीचा ड्रायव्हर फोनच उचलत नाहीय, किंवा प्रकल्पासाठी डॉक्युमेंटस सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि फिल्ड वर्कर्सकडून डेटाच आलेला नाहीय. तरीही ज्यांची शांती ढळत नाही, कितीही ताण होऊनही ज्यांचं एक खट्याळ असं हसू लोप पावत नाही ते सुहासभाऊ! हास्यवदनी सुहासभाऊ! आणि शेकडो जणांचे जिव्हाळ्याचे "मितवा" अर्थात् मित्र- तत्त्वचिंतक आणि वाटाडे!