Monday, August 4, 2025

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६)  हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. 

पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते! १९५१ चं "ठण्डी हवाएँ लहरा के आए" ह्या अल्लड प्रेमगीताला संगीत सचिन देव बर्मनांचं होतं. त्यांची चाल संगीतकार रोशन ह्यांना इतकी आवडली की त्यांनी १९६६ च्या "रहें ना रहें हम महका करेंगे" ह्या अर्थपूर्ण गाण्यामध्ये वापरली! पण गंमत म्हणजे १९६६ च्याही आधी त्यांनी १९५४ मध्येच ती चाल एस. डींची अनुमती घेऊन चांदनी चौक चित्रपटात "तेरा दिल कहाँ है" (आशा भोसले) वापरली होती. "तेरा दिल कहाँ है" हे गीत ऐकताना अगदी "रहें ना रहें हम महका करेंगे" ऐकल्याचा भास होतो! पुढे मग आर. डी. बर्मननीही ही चाल- त्या गाण्यातला मीटर किंवा छंद वापरून "हमें और जीने की चाहत ना होती" आणि "सागर किनारे" ही गाणी दिली! त्याही शिवाय त्याच छंदातील गाणी तमिळ व मल्याळमध्येही रचली गेली! इतरही काही विशेष प्रसिद्ध नसलेली ७०- ८० च्या दशकातली हिंदी गाणी त्याच सुरावटीवर आधारित आहेत. अशी एकूण किमान १० गाणी त्याच छंदातली किंवा सुरावटीतली आहेत. लक्ष देऊन ती ऐकली तर त्यातलं साम्य लगेच कळतं! अगदी १९९३ मध्ये लतानेच गायलेलं व राम- लक्ष्मण ह्यांचं संगीत असलेलं "कहा था जो तुमने" हेही गाणं तशाच चालीचं आहे!