Monday, September 8, 2025

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते. अगदी थोडा वेळ ढग बाजूला जायचे व चंद्र दिसू शकायचा. तेव्हा ग्रहण स्थिती स्पष्ट दिसत होती! पोर्णिमेच्या चंद्राची हळु हळु कोर होत गेली! आणि जसा जास्त भाग झाकला गेला तसा चंद्र लाल होत गेला! विरळ ढगांमधूनही नुसत्या डोळ्यांनी ही स्थिती बघता आली!

फोटो घेताना मात्र ढगांचा लपंडाव असल्यामुळे इतके व्यवस्थित फोटो घेता आले नाहीत. माझ्या मित्राने- गिरीश मांधळेने त्याच्या ८ इंची दुर्बिणीसोबत काढलेले फोटो उत्तम आले. ते इथे बघता येतील. 



 

चंद्र सावलीत पुढे गेला तसं चंद्राचं रूप बदलत गेलं! लालसर झालेल्या चंद्राजवळ दुर्बिणीतून अंधुक तारेही दिसत होते. इतर वेळी चंद्राच्या प्रकाशात झाकोळले गेल्यामुळे असे अंधुक तारे दिसत नाहीत. पण लालसर चंद्र व बाजूला तारे हे दृश्य बघता आलं. पोर्णिमेपासून चंद्र सर्व कला दाखवत पूर्ण खग्रास स्थितीमध्ये पूर्णत: लालसर झाला! त्यानंतर हळु हळु परत त्याची तेजस्वी कोर प्रकट झाली! पुनश्च प्रतिपदेपासून पोर्णिमेपर्यंतचा प्रवास दिसू शकत होता! आणि ह्यावेळी चंद्रावर पडलेली पृथ्वीची वक्राकार सावली! ह्या सावलीचं वर्तुळ चंद्रापेक्षाही किती मोठं आहे हे तिची वक्रता दाखवत होती! शिवाय चंद्र गोलाकार आहे, हेही ती वक्रता दाखवत होतं. एकाच दिवशी चंद्राने त्याच्या सर्व "कला" दाखवल्या! उशीरापर्यंत थांबणं सार्थक झालं!

असा चंद्र हा पृथ्वीसाठी व पृथ्वीच्या जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे! चंद्र- सूर्यामुळेच समुद्रात भरती- ओहोटी येते आणि मानवी शरीरातही ७०% पाणीच आहे. तेही आंदोलित होतं. सूर्य हा शक्तीचं प्रतिक तर चंद्र हा शीतलतेचं व भावनेचं प्रतिक. सूर्य हा शरीराला बळ देतो तर चंद्र मनाला बळ देतो. चंद्राचा संबंध कित्येक जैविक चक्रांसोबत आहे आणि मानवी मनासोबतही आहे. त्यामुळे अनेकदा चंद्र आल्हाददायक वाटतो तर कधी रात्री उशीरा किंवा पहाटे कृष्ण पक्षातला चंद्र अस्वस्थ करतो. पोर्णिमेच्या बाबतीत तर अजून जास्त. पोर्णिमेच्या दिवशी मानवी मनामधील आंदोलनं किंवा लहरी तीव्र असतात. त्यामुळे पोर्णिमेला लोकांमध्ये अस्वस्थता असते, अगदी आपणही आपल्या मनातल्या भावनांचं निरीक्षण केलं तर पोर्णिमेला ग्राफ खाली- वर होताना दिसू शकतो. म्हणूनच इंग्रजीमध्ये चंद्राच्या प्रभावामुळे अस्वस्थ होण्यासाठी "lunatic" असा शब्द आहे. आणि गंमत म्हणजे पोर्णिमेलाच मनाच्या पलीकडे ध्यानामध्ये जाण्याचीही शक्यता जास्त असते. बुद्धांची बुद्ध पोर्णिमा, नानक पोर्णिमा व कबीर पोर्णिमा! ते पोर्णिमेच्या दिवशीच मनापासून मुक्त झाले. अशी ही पोर्णिमा. 

आणि पोर्णिमेला असं खग्रास चंद्रग्रहण असेल तर ह्या मानवीय आणि जीवसृष्टीच्या वाटचालीत एक अनियमितता- anomaly येते. त्याचीही उदाहरणं आहेत. चंद्र- सूर्यावर जीवसृष्टीचं घड्याळ चालतं आणि instincts काम करतात. चंद्राच्या पोर्णिमेमध्ये एकदम तफावत येऊन चंद्र क्षीण होऊन परत पूर्ववत होतो ह्याचा सजीव सृष्टीवर निश्चितच परिणाम होतो. 

आपल्याला आपलं जीवन खूप ओळखीचं व सुस्पष्ट वाटतं. पण आपली आकाशगंगा- तिच्यासह सूर्य- सूर्यासह पृथ्वी दररोज अंतराळात लाखो किलोमीटर पुढे जात असतात. त्यामुळे वस्तुत: आपण दररोज अतिशय नवीन आणि अज्ञात प्रदेशात संचार करतो! आकाश बघताना हे गूढ समोर येत जातं आणि तेव्हा हे गाणं आठवतं- 
 

रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा

संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा 

हा खेळ सावल्यांचा

वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 8 सप्टेंबर 2025.

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.