Friday, August 20, 2010

"जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं.." : मराठी इतिहासाचे स्मरण

"जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं.." : मराठी इतिहासाचे स्मरण


इतिहास हा भूतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो हे अत्यंत सत्य आहे. म्हणूनच सर्व प्रगत समाज त्यांच्या इतिहासाचे गहन अध्ययन करतात. ह्यासंदर्भात मराठी इतिहासाचे स्मरण आजही आवश्यक आहे; विचार करण्यासारखं आहे. आपण इतर राष्ट्रांच्या इतिहासाबरोबर तुलना केली तर जाणवतं; की आजही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रमाणित/ शास्त्रीय म्हणता येतील; अशी पुस्तकं/ ग्रंथ हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे आहेत; ह्या उलट इंग्लंडचा किंवा नेपोलियनचा इतिहास (कादंबरी नव्हे); ह्या सारख्या विषयांवर हजारो प्रमाणित पुस्तके/ ग्रंथ आहेत. आपल्याकडे शास्त्रीय दस्तावेजांच्या आणि सत्याच्या आग्रहाऐवजी अतिरेकी भावनिकताच जास्त दिसते. ह्या नाही; तर त्या नेत्याच्या बाजूने वाद आणि संघर्ष होतात. अभ्यास करून सत्य जाणून घेण्यापेक्षा एक बाजू पकडून त्या बाजूने सर्व घटनांचे वर्णन करण्यावर जास्त भर दिसतो. आणि त्यामुळे लोक, समुदाय नेते; विचारवंत; शासनकर्ते; सत्ताधीश ह्यांचे छोट्या छोट्या तुकड्यांत विभक्तीकरण झालेले दिसते. इतिहासही ह्या दृष्टीकोनातूनच पाहिला जातो.

मराठ्यांच्या इतिहासाचा विचार करताना “जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं... विसरून जाती सारी माया ममता नाती...” ह्या ओळी विशेष लक्षात येतात. मराठ्यांच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप टाकला तर हे लक्षात येईल.

शिवाजी महाराजांपूर्वीच्या काळात सतत संघर्ष करणारे आणि निरर्थकपणे लढणारे सरदार. त्यांच्या काळातही सतत संघर्ष करणारे आणि भांडणारे सरदार. ते सतत जगून मरत आणि मरून जगत होते. इच्छाशक्ती आणि उत्कट ध्येयवादातून साकारलेले स्वराज्य; प्रतिकूल परिस्थितीशी लढून सार्वभौमत्वाकडे जातानाचा त्याचा प्रवास. सर्व दृष्टीने प्रबल शत्रूवर वेळोवेळी प्राप्त केलेले अनेक प्रकारचे विजय आणि राजकारणातील यशस्वी डावपेच. अफजलखान युद्धाचा प्रसंग असेल; किंवा पन्हाळ्यावरून सुटका हा प्रसंग असेल; त्या त्या वेळी क्रिएटिव्ह मानसिकतेचा वापर करून आश्चर्यकारक विजय मिळवले गेले. आजच्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर सतत; जवळ जवळ प्रत्येक मॅचमध्ये ७०-७ अशा स्कोअरच्या वेळी किंवा ३४५ धावांच्या आव्हानासमोर सतत मिळवलेला विजय आणि १४० च्या स्ट्राईकने आणि ५०च्या सरासरीने खेळणारे असंख्य धुरंधर वीर ही गोष्ट कदाचित त्या पातळीच्या जवळपास जाऊ शकेल. क्रिकेटमध्ये तरी ठरलेली परिस्थिती आणि मर्यादितच प्रतिकूलता असतात; पण त्या काळात अशा प्रकारचे अभिनव कार्य करणे किती तरी पट अवघड होतं. त्याच मालिकेत शोभणारा पुरंदरचा तह आणि त्यानंतरची काही वर्षं; ज्यावेळी स्वराज्य बॅकफूटवर होतं. पण सर्व विकेट्स राखून ठेवल्याने आणि भक्कम पायाभरणी केल्यामुळे अवघ्या ६ महिन्यांच्या काळात सर्व गमावलेलं स्वराज्य परत प्राप्त करून घेतलं. आणि भौतिक गोष्टींपेक्षा सामाजिक मानसिकता बदलण्यामध्ये ‘स्वराज्य’ विलक्षण यशस्वी ठरलं.



आज जिथे सर्व लोक प्रतिकवादाचे बळी आहेत; ठराविक प्रतिकं; व्यक्ती; इष्ट वस्तु ह्यांच्यासाठी भांडत आहेत; त्या काळासाठी शिवाजी महाराजांची ध्येयदृष्टी डोळ्यात अंजन घालणारी आहे. उद्दिष्ट एकच; पण त्यापर्यंत जाणारे रस्ते अनेक असू शकतील हा त्यांचा संदेश. शिवाजी महाराजांइतका आयडिऑलॉजी स्पष्ट असलेला नेता, महापुरुष त्याकाळी दुसरा कोणी सापडेल का ? पण त्यांच्या वाटचालीत आपल्याला फ्लेग्सिबिलिटी दिसत नाही का ? कधी मोंगलांचे मनसबदार, कशी शांततेचा करार, कधी प्रत्यक्ष युद्ध, कधी खुशामत.... पण जे करायचं होतं; ते केलच. आणि ते एका सिंबॉलमध्ये, माध्यमामध्ये, नावामध्ये संकुचित नव्हतं. आज आपल्याला ह्या व्यापक दृष्टीने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे.

जगून मरावं आणि मरून जगावं हेच ठाऊक असल्याप्रमाणे मराठी इतिहास आहे. वीरमरण आणि भांडणामधील मरण ह्यांपैकी कोणते अधिक आणि कोणते कमी हे सांगणे अवघड आहे. त्या ओळीत म्हंटल्याप्रमाणे सारे विसरून जाती माया ममता नाती; पण ही नाती कोणासोबतची? मराठ्यांचा इतिहास असा विरोधाभास असलेला आहे. शिवाजी महाराजांनी माणसं घडवली; त्यातली कित्येक पुढील काळात स्वराज्याविरुद्ध गेली. संभाजी महाराजांनी ब-याच प्रमाणात शिवाजी महाराजांचाच परिपाठ पुढे चालवला; पण अवेळी समाप्त होणा-या खेळीप्रमाणे त्यांची ज्योत कापली गेली; तरीही त्या ज्योतीने जाता जाता क्रांतीला ठिणगी देण्याचं कार्य चोख पार पडलं. विलक्षण परिस्थितीमध्ये असाधारण गोष्टी घडतात आणि नेहमीची समीकरणं बदलून जातात; हे १६८९ ते १७०७ ह्या मराठी इतिहासातील २७ वर्षांच्या कालखंडाइतकं चांगल्या प्रकारे इतर कोणत्याच कालखंडाने सिद्ध केलं नाही. जनतेचा उठाव; सातत्यपूर्ण राज्यक्रांती अशी क्वचितच झालेली आहे. त्या काळात छत्रपतींच्या स्वराज्यात जिंजी, राजगड इत्यादी फक्त शेवटचे चार किल्ले शिल्लक होते (१७००च्या वेळी); त्यातूनच पुढे स्वराज्याचं रुपांतर मराठी साम्राज्यात झालं आणि हे करून दाखवणारे होते संताजी- धनाजी सारखे लोक. परंतु धनाजीनेच संताजीची हत्याही घडवून आणली. असा मराठ्यांचा इतिहास जगणं आणि मरणं ह्याने भरलेला आहे. माया ममता नाती विसरून गेलेला आहे.

असंख्य कमतरता असूनही मराठी साम्राज्याने प्रगती टिकवून ठेवली; त्यानंतर शतकभर ती वाढतच गेली. असंख्य वीर योद्धे सरदार शिपाई आणि नेते निर्माण झाले. परंतु त्याचबरोबर निजाम, नजीब खान उद्दौला ह्यांचीही परंपरा निर्माण झाली. संपूर्ण स्वराज्य ते मोगलांचे प्रतिनिधी आणि सर्वेसर्वा छत्रपती ते स्वायत्त पेशवे अशी पद्धत आली; तरी मोठ्या प्रमाणात स्वराज्याचा चेहरामोहरा तसाच होता; त्याच योग्यतेची माणसं घडत होती. काळाच्या ओघात आणि बदलत्या परिस्थितीमध्ये ह्या सत्तेचे संदर्भ आणि घटक बदलत गेले आणि शिवराज्याभिषेकानंतर थोडी थोडी नाही; तर तब्बल १४४ वर्षांनी मराठी साम्राज्याचा सूर्य अस्तास गेला. अर्थात त्यानंतरही मराठी सत्तेचा वारसा सांगणारे स्फुल्लिंग प्रज्वलित झाले.

मराठी इतिहासाचे स्मरण आजच्या काळात करणं आवश्यक आहे. आजची पिढी तानाजी मालुसरे; मूरारराव घोरपडे; इब्राहिमखान गारदी; यशवंतराव होळकर ह्यांना न ओळखणारी आणि ओळखत असली; तरी तानाजीने बलिदान केले; ह्यात विशेष ते काय; त्यासाठीच त्याने पैसे घेतले होते ना; असा प्रश्न करणारी आहे. आजही भीषण समस्यांनी आपल्याला घेरलेलं आहे. विजय मिळवण्याच्या विजिगीषू वृत्तीची आजही तितकीच गरज आहे. त्या काळात ज्या परिस्थितीत अशक्य ते शक्य झालं; ते आजही करण्याची गरज आहे; त्या त्या प्रकारे जुळवाजुळव करणं आवश्यक आहे. अर्थात त्यावेळी होती; त्यापेक्षा परिस्थिती कित्येक पट अधिक गुंतागुंतीची झाली आहे; अनेक संदर्भ बदललेले आहेत. परंतु मराठी स्वराज्याचा हाच संदेश आहे; की परिस्थिती/ कार्यपद्धती बदलली असली; तरी उद्दिष्टं बदलत नाहीत आणि म्हणून त्या आदर्शांवर आधारित व्यवस्थेची रचना करण्याची आजही गरज आहे; त्यासाठी स्वतंत्र विचारांवर काम करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना मराठी इतिहासाचे स्मरण मार्गदर्शक आहे.

2 comments:

  1. लेख आवडला. त्यातही पहिल्या भागात एकूण इतिहासाचे वस्तुनिष्ठपणे भावनातिरेक न होता विश्लेषण करणं आवश्यक असल्याचा मुद्दा बरोबर आहेच.
    (आजची पिढी तानाजी मालुसरे; मूरारराव घोरपडे; इब्राहिमखान गारदी; यशवंतराव होळकर ह्यांना न ओळखणारी आणि ओळखत असली; तरी तानाजीने बलिदान केले; ह्यात विशेष ते काय; त्यासाठीच त्याने पैसे घेतले होते ना; असा प्रश्न करणारी आहे)- मुद्दा पटला नाही. संपूर्ण पिढीवर असा ठपका ठेवणे योग्य वाटत नाही. तानाजी किंवा तत्सम त्यांनी काय केले याबाबत आदर आहेच पण दरवेळी ते उगाळत बसून 'आजची पिढी अशी आहे तशी आहे आजची पिढी' करत त्यांच्या नावाने बोटे मोडणारे बरेच आहेत. पण प्रत्येक पिढीत असे होत असते. त्यामुळे पिढीवर ठपका ठेवणे अयोग्य वाटले.
    बाकीचे मुद्दे छान.

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रणव ! मला असं वाटतं, की मी नवीन पिढीवर किंवा कोणावर ठपका ठेवलेला नाही; तर नवीन परिस्थितीतील; नवीन पिढीचे लोक त्या घटनांकडे कसे बघत असतात; त्यांना काय वाटतं; हे व्यक्त केलं आहे. कमेंट पाहून बरं वाटलं.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!