२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
पूर्ण भारतात दिसू शकेल
नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे. मुलांसाठी नवीन आणि दुर्मिळ गोष्ट बघण्याची ही संधी आहे.
कसं बघता येईल?नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे बघणे डोळ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे आपण थेट सूर्याकडे बघू शकत नाही. परंतु आपण ह्या सोहळ्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. हे बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सौर चष्मे. अद्याप काही दिवस आहेत, हे सौर चष्मे विकत घेता येऊ शकतात. ते ऑनलाईनही उपलब्ध असतात. अजून एक सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे पिनहोल कॅमेरा प्रोजेक्टर बनवायचा- ही एका खोक्याची अगदी सोपी व्यवस्था असते. त्यावर एक छोटं छिद्र (अगदी टाचणीने होणारं छिद्र- पिनहोल) केलेलं असतं आणि एका बाजूने बघण्य़ाची जागा असते. आपण हे युट्युबवर सहज शोधू शकता. असा पिनहोल कॅमेरा बनवताना मुलांना गंमत वाटू शकते. थोडी माहिती गूगलवर शोधा, काही युट्युब व्हिडिओज बघा आणि तुमच्या जवळच्या मुलांना हे बनवायला सांगा. स्वत: काही तरी करण्याची आणि स्वत: अनुभव घेण्याची संधी त्यांना देऊया. असा प्रोजेक्टर कसा दिसतो, हे माझ्या ब्लॉगवर बघता येईल- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/10/a-rare-show-of-light-and-sha... माझ्या ब्लॉगवर मी घेतलेले चंद्र, सूर्य, ग्रह आणि तारकागुच्छांचेही फोटो बघता येतील.
अजून एक अगदी सोपा पर्याय म्हणजे एक चेंडू घ्यायचा. त्यावर एक छोटा आरसा चिकटवायचा. ह्या आरशाच्या पृष्ठभागावर जाड पुठ्ठा किंवा काळा कागद लावता येईल (फॉईल पेपर असेल तर उत्तम). मग ह्या कागदावर एक अगदी लहान ३ मिमीचं छिद्र करा. हे छिद्र लहान असतं व म्हणूनच त्याला पिन होल म्हणतात. आता तुम्ही हा चेंडू एखाद्या भांड्यावर किंवा एखाद्या बॉक्सवर ठेवू शकता. त्याला अशा स्थितीत ठेवा ज्यामुळे ह्या छिद्रावर सूर्याचा प्रकाश पडेल व त्याचं प्रतिबिंब तुम्ही दूर एखाद्या सावलीतल्या भिंतीवर घेऊ शकाल. अशी भिंत सावलीत व सुमारे ३० फूट दूर असली तर उत्तम. हे करताना सूर्याकडे पाठ करायची आहे. कधीही सूर्याकडे थेट बघू नका! चेंडू व आरसा योग्य त्या दिशेने ठेवल्यावर सावलीतल्या भिंतीवर तुम्हांला सूर्याची प्रतिमा घेता येईल. पांढरी भिंत असेल तर अजून चांगलं.
इथे हे छोटं छिद्र एका भिंगाचं काम करतं आणि आपल्याला काही अंतरावर सूर्याची एक मोठी पण उलटी प्रतिमा मिळते. आपण थेट सूर्याकडे बघू शकत नाही, परंतु अशी सूर्याची प्रतिमा सहजपणे बघू शकतो. ग्रहणामध्ये सूर्याच्या चकतीमध्ये चंद्र आल्याचं आपण सहजपणे बघू शकतो. आरसा चेंडूवर लावलेला असल्यामुळे आपण सहजपणे त्याची दिशा बदलू शकतो व तो स्थिरही ठेवू शकतो.
हा आनंद कधी घेता येईल?
आपल्या ठिकाणानुसार २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या साधारण दोन
तास आधीपासून हे बघता येईल. आपण त्याची नेमकी वेळ व आपल्याकडे दिसणारी
ग्रहण टक्केवारी इथे बघू शकता: https://in-the-sky.org/news.php?id=20221025_09_100
तेव्हा ही संधी चुकवू नका आणि आपल्या ओळखीतल्या मुलांना एक चांगला अनुभव
घेऊ द्या! ह्या आरशाच्या प्रयोगाचाही ते आनंद घेऊ शकतील. त्यासाठी केवळ एक
चेंडू, छोटा आरसा, पुठ्ठा आणि छोटी टाचणी लागेल. ही सगळी तयारी करून आपण २५
ऑक्टोबरच्या सायंकाळी सज्ज राहू शकता. साधारण ४.३० पासून सूर्याची प्रतिमा
घ्यायला तयार राहू शकता. जर तुम्ही उत्तर भारतात असाल तर त्याआधी तयार
राहावं लागेल. हा अनुभव कसा वाटला व मुलांची प्रतिक्रिया कशी होती, हेही
कळवा.
(निरंजन वेलणकर- आकाश दर्शन सत्र व मुलांसाठी फन- लर्न सत्र. तसेच मोठ्यांसाठी फिटनेस व ध्यान सत्र. अधिक माहितीसाठी- 09422108376, niranjanwelankar@gmail.com)
No comments:
Post a Comment
आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!