Tuesday, January 31, 2023

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन
✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद
✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton
✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था
✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी
✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश
✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट!
✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन
✪ वेगळे "बायनरी स्टार्स" नव्हे हे तर "स्टार" क्लस्टर!
✪ रात्री १ पर्यंत खगोलप्रेमींचा निरीक्षणाचा उत्साह
✪ बिबट्याचा माग चुकवून धुमकेतूचा यशस्वी माग!

सर्वांना नमस्कार. नुकतंच २६ जानेवारी ते २८ जानेवारी (२९ च्या पहाटेपर्यंत!) असं तीन दिवसीय खगोल संमेलन CCS व इतर संस्थांनी आयोजित केलं होतं. ह्या संमेलनामध्ये भाग घेण्याचा अनुभव फार सुंदर होता. तीन दिवस ह्या संमेलनामध्ये भाग घेतल्यानंतर अजूनही ह्या संमेलनाचा हँग ओव्हर जात नाहीय. ह्या संमेलनामधील आनंद आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा छोटा लेख लिहीत आहे. संमेलनाचा हा वृत्तांत नाही म्हणता येणार, पण संमेलनावर प्रतिक्रिया आणि त्यातल्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न असू शकेल.

अगदी थोडक्यात सांगायचं तर ह्या संमेलनामध्ये आजच्या खगोल- विज्ञानात काय सुरू आहे, आज कोणत्या प्रकारचे महाप्रकल्प येत आहेत, सुरू आहेत, कोणतं संशोधन सुरू आहे ह्याची माहिती मिळाली. त्याबरोबर खगोलशास्त्र व आकाश दर्शन संदर्भातील सर्व मूलभूत संकल्पनांची उजळणी झाली. त्यासोबत जुन्या व नवीन पिढीतील अनेक खगोलप्रेमींना भेटता आलं. त्यांच्याबरोबर "विज्ञान स्वयंसेवकांच्या" उत्साही चमूलाही भेटता आलं! एका अर्थाने हे अगदी passing of baton सारखं वाटलं. लहानपणी दूरदर्शनवर एक व्हिडिओ दाखवायचे- त्यातला कपिल देवसुद्धा मशाल घेऊन पळताना दिसायचा. त्यात सगळे जण एकमेकांना मशाल देत जातात (त्या व्हिडिओच्या शेवटी एका लहान मुलीचा गोंडस चेहराही असायचा). हे खगोल संमेलन म्हणजे अगदी तशी मशाल पुढे देण्याची प्रक्रिया वाटली!



लहानपणच्या असंख्य आठवणी ज्यांच्या नभांगण पत्रिकेने दिल्या, त्यांचं त्यातलं हस्ताक्षर व आलेलं पत्र अजूनही आठवतं ते महाराष्ट्रातले आकाश दर्शनाचे पितामह हेमंत मोने सर भेटले! २००५ मध्ये तथा कथित निवृत्ती घेऊनही ते किती सक्रिय आहेत! रिटायरमेंटला हिंदीत निवृत्ती न म्हणता "अवकाश" प्राप्त म्हणतात ते ह्यामुळेच असेल! ह्या वयातही नवीन लोकांना भेटण्याची त्यांची ऊर्जा व उत्साह केवळ लाजबाब. आदरणीय नारळीकर सरांच्या पुस्तकांवर माझ्या आकाश दर्शनाची पाया- भरणी झालेली आहे. सरांचे अनेक सहकारी व विद्यार्थी इथे भेटले. सरांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आयुका ही किती मोठी संस्था आहे व किती वेगळं काम ती करतेय, ह्याची जाणीव एक एक व्याख्यान ऐकताना झाली. आज खगोलशास्त्रातील व खगोलभौतिकीतल्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये आयुका पार्टनर आहे आणि आयुका व इतर संस्थांमधले वैज्ञानिक आज जगभर कसं काम करत आहेत, किती खोलवर‌ आणि किती मेहनतीने काम करत आहेत, ह्याची झलक सगळ्याच व्याख्यानांमध्ये बघायला मिळाली.

(सध्या दिसणा-या धुमकेतूला छोट्या दुर्बिणीतून बघण्याचा माझा अनुभव इथे वाचता येईल.  इथे  माझे आकाश दर्शनाशी संबंधित लेखही वाचता येऊ शकतील. खगोल संमेलनाचं आयोजन करणा-या CCS ची साईट: http://citizenscience.in/ तिथे त्यांच्या उपक्रमांची अधिक माहिती मिळेल.)

इथे झालेले सगळेच व्याख्यान काही मला समजले असं मी म्हणणार नाही. किंबहुना मी म्हणेन की, अनेकांच्या व्याख्यानांची उंची व त्यातला कंटेंट इतका उंच होता, की अनेक वेळा असे बाउंसर्सही गेले. आणि खरं सांगायचं तर ह्यातले विषय समजून घेणं म्हणजे आंधळ्यांनी हत्तीला बघण्यासारखं होतं. आणि विद्यार्थी हा एका अर्थाने आंधळा असतोच. कोणाला हत्तीची शेपूटच दिसली, कोणाला कान तर कोणाला पाय दिसले. सगळ्याच व्याख्यानांचा आवाका इतका मोठा होता की, खूप वेळेस न कळणा-या गोष्टीही होत्या. खगोलाबद्दलच, पण वेगळ्या स्वरूपातली माहिती होती. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळे बाउंसर्स तर होतेच, पण अनेकदा संमेलनामध्ये राहुल द्रविड आणि सूर्यकुमारही आमने सामने येत होते! क्रिकेटमध्येही बॅटसमन सगळे सारखे असले तरी कोणी ओपनिंगचा असतो, कोणी मिडल ऑर्डर असतो. असा बराच फरकही होता. त्यामुळे माझ्यासारख्या observational astronomy मध्ये रस असलेल्याला खगोलभौतिकी, त्यातले वेगवेगळे तांत्रिक पैलू आणि ह्या सगळ्या तांत्रिक संकल्पनांचा "स्पेक्ट्रम" स्वाभाविकपणे थोडा बाउंसरच गेला! असो. व्याख्यानातले मुद्दे, मांडणी, वेगवेगळ्या विषयांची रचना हे उत्तम होतं. त्यातलं मला जे थोडंफार समजलं आणि जे रिलेट झालं, त्याबद्दल माझी प्रतिक्रिया इथे सांगेन.

पहिल्या दिवशी दुपारी उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. योगेश शौचे सरांनी एलियन्सच्या शोधात ह्या विषयाबद्दल माहिती दिली. त्यासंदर्भातले वैज्ञानिक तथ्य, विराट विश्व, सध्या चालू असलेलं संशोधन ह्याबद्दल त्यांचं सत्र झालं. शौचे सर आणि सर्वच व्याख्याते- इतके मोठे वैज्ञानिक असूनही मराठीतच बोलत होते, उभं राहूनच व्याख्यान देत होते आणि सर्वांच्या शंकांचं निरसनही करत होते. पहिल्या दिवशीचं दुसरं व्याख्यान आयुकातले विज्ञान प्रसार समन्वयक श्री. समीर धुर्डे सरांचं होतं. स्क्वेअर किलोमीटर अरे, सदर्न आफ्रिकन लार्ज टेलिस्कोप अशा प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. जीएमआरटी हासुद्धा किती मोठा प्रकल्प आहे हे सांगितलं. उत्कंठा वाढेल अशा पद्धतीने सर सांगत असल्यामुळे तांत्रिक संकल्पना जड वाटल्या नाहीत. तिसरं व्याख्यान NCRA चे प्राध्यापक योगेश वाडदेकर सरांचं होतं. जेम्स वेब टेलिस्कोप काय आहे, कसं काम करतो हे त्यांनी सुंदर प्रकारे उलगडून सांगितलं. त्यातला एक उल्लेख विशेष लक्षात राहिला. जेम्स वेब टेलिस्कोप अंतराळात पोहचल्यानंतर असेंबल करण्यासाठी त्यामध्ये 300 पेक्षा जास्त maneuvers होते! एका ठिकाणी जरी चूक झाली असती तरी सगळा प्रकल्प ठप्प पडत होता. हे वैज्ञानिक किती सूक्ष्म प्रकारे आणि किती मेहनत घेत असतील, त्यांची तयारी किती प्रचंड असेल ह्याचा किंचितसा अंदाज आला. त्याबरोबर सरांनी अशा वैज्ञानिकांबरोबरचे आपले अनुभवही सांगितले. इतक्या मोठ्या वैज्ञानिकांना प्रत्यक्ष ऐकणं हा खूप सुखद अनुभवाचा क्षण होता. असा पहिला दिवस संपला. व्याख्यानांच्या बरोबर सगळीकडे विज्ञान स्वयंसेवकांची मदत, विचारपूस आणि सोबत होतीच. मयुरेश प्रभुणे सर सगळीकडे लक्ष ठेवून होते. आयोजन चोख होतं. जेवणाच्या वेळेसही सुप्रिया मॅडमचं लक्ष होतं. यंग सिनियर खगोलप्रेमींकडेही त्या लक्ष देत होत्या.

दुस-या दिवशी सुरुवातीला आदरणीय हेमंत मोनेंच्या आकाश मित्र मंडळसारख्या अनेक संस्थांचा परिचय झाला. खरोखर महाराष्ट्र आकाश दर्शनातले पितामह! १९७३ मध्ये न्यु इंग्लिशला बघितलेलं बुधाचं अधिक्रमण, १९८० चं सूर्यग्रहण त्यांनी अगदी काल बघितल्यासारखं सांगितलं! त्यांच्या कामाचा आवाका व त्या काळात त्यांनी केलेलं काम! आदरणीय मोहन आपटे हेसुद्धा अनेकांसाठी खगोलशास्त्राबद्दलच्या प्रेरणेचा स्रोत! मला उत्तर हवंय ही त्यांची पुस्तकमाला व सूर्यमालेतील सृष्टी चमत्कार असे इतरही त्यांचे पुस्तक कोण विसरू शकेल? त्यांच्या संस्थेची माहिती नवीन पिढीच्या अभ्यासकांकडून कळाली. मशाल हस्तांतरित झाल्याची जाणीव झाली. नाशिक- अहमदनगरमधल्या वेधशाळा, सचिन पिळणकरांची मराठीतली परिपूर्ण आकाश माहिती देणारी वेबसाईट avakashvedh.com, पितांबरी अग्रो फार्ममधले आकाश दर्शन उपक्रम, लदाख़मध्ये हॅनले वेधशाळेत घेऊन जाणारे उन्मेष घुडे, औरंगाबादचा ब्रह्मांड अस्ट्रोफिजिक्स क्लब अशा इतर अनेक उपक्रमांची माहितीही मिळाली. पुढच्या सत्रात आदरणीय मोने सरांनी दिवसाचे खगोलशास्त्र ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोणताही खर्च न करता सोप्या प्रयोगांमधून सावलीच्या मदतीने अक्षांश- रेखांश मोजणे, सूर्याची स्थिती बघणे, वेगवेगळ्या नोंदी ठेवणे अशा गोष्टींची माहिती त्यांनी छान दिली. खूप मोठ्या दुर्बिणी, भलं मोठं अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठा पसारा अशा गोष्टींवर भर देणा-या इतर काही सत्रांच्या तुलनेत हे वेगळं सत्र वाटलं. आकाश दर्शन केवळ रात्रीच नाही, तर दिवसाही Day time astronomy द्वारे करता येतं असं सर म्हणाले. तसंच आकाश दर्शनासाठी किंवा ह्या विराट रंगमंचाचा आनंद घेण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी विशेष साधन- दुर्बीण- अत्याधुनिक उपकरणं आवश्यक आहेत, असं अजिबात नाही, असं माझं मत आहे. मोठ्या दुर्बिणी, महाप्रकल्प, अत्याधुनिक फोटोग्राफी उपकरणं ह्यांच्या चर्चेमध्ये नवख्या खगोलप्रेमींची कुठे misconception होऊ नये की, आकाश बघायला टेलिस्कोपच लागतो, आनंद घ्यायला साधनंच लागतात, असं मला वाटलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देणा-या व साधनावर आधारित पद्धतींच्या बाजूला सरांच्या प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित पद्धतींनी थोडं संतुलित केलं, असं मला वाटलं! फक्त सूर्य कुमार यादव सगळीकडे कसा चालेल, राहुल द्रविडही हवा ना! उपकरणं- साधनं असली तरी नुसत्या डोळ्यांनी बघण्याची क्षमता, संकल्पनांची समजसुद्धा हवी. असो.

नंतरच्या सत्रात खगोलशास्त्र प्रसाराबद्दल मान्यवर वैज्ञानिकांचा परिसंवाद झाला. मयुरेश प्रभुणे सरांनी अनेक प्रश्न विचारून वेगवेगळ्या बाजूने चर्चा घडवून आणली. पुढच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. अजित केंभावी सरांच्या सत्रामध्ये त्यांनी दीर्घिका- गॅलक्सीजच्या संशोधनाची माहिती दिली. त्यामध्ये सामान्य नागरिकही कसे सहभागी होऊ शकतात हे छान सांगितलं. खगोल अभ्यास व प्रसारही दर वेळी अवघडच असेल असं नाही, सोप्या गोष्टीही आपण करून त्यात सहभागी होऊ शकतो, ही जाणीव झाली. नंतरच्या श्री. सुहृद मोरे सरांच्या व्याख्यानाचा विशेष आनंद घेता आला. दुर्बिणींचं जग, युरेनस- नेपच्युनचा शोध व नंतरच्या काळात प्लुटो आणि प्लुटोची गच्छंती हे सगळं त्यांनी सुंदर उलगडलं. सेडना व एरिसला शोधणारे त्यांचे सहकारी आहेत हे कळालं! प्लुटोची ग्रह पदवी काढल्यामुळे त्यांनी त्यांचं ट्विटर हँडल Pluto Killer असं ठेवलंय हेही त्यांनी सांगितलं! सर इतके मोठे वैज्ञानिक असूनही किती छान मराठी बोलतात, हे अतिशय आनंददायक वाटलं. प्रत्यक्ष संशोधन, त्यामागचा शास्त्रीय पाया, गणित, शास्त्रीय संशोधन आणि निरीक्षणांची योग्य पद्धती ह्या गोष्टी त्यांनी छान उलगडल्या. गॅलिलिओ- न्युटनपासून आजच्या वैज्ञानिकांपर्यंत मशाल कशी पुढे पुढे आलेली आहे, हे त्यात जाणवलं.

दुस-या दिवशीचं शेवटचं सत्र रेडिओ खगोलशास्त्राबद्दल होतं. NCRA चे संचालक डॉ. गुप्ता सरांनी सुंदर प्रकारे ह्या विषयाची माहिती दिली. अर्थात् ती काही पूर्ण कळाली नाही! पण त्यांनी सांगितलं की, जो नवीन Square kilometer Array महाप्रकल्प बनणार आहेत, त्यात अंतराळातील रेडिओ लहरींचा एका दिवशी गोळा होणारा डेटा हा संपूर्ण जगाच्या एका दिवसाच्या इंटरनेट डेटाहूनही जास्त असेल! तेव्हा अशा डेटाच्या व्यवस्थापनासाठी बाकी साधनंही तितकीच मोठी हवीत. नियोजन, तयारी अशा सगळ्याच गोष्टी मग किती प्रचंड व वेगळ्या असतील ही जाणीव झाली! GMRT सुद्धा दर सेकंदाला 20 GB डेटा गोळा करते हे कळालं. एका पाठोपाठ इतके जबरदस्त व्याख्यान झाले की कधी दिवस संपला, ९ वाजले कळालं नाही! दुसरा दिवस संपताना GMRT च्या सोळंकी सरांनी सर्वांना तिथले नियम सांगितले, माहिती दिली आणि इशाराही दिला की, तिकडे सगळे जण एकत्र राहतील, कोणी एकटाच बाहेर गेला तर तिथून परत येण्याची खात्री देता येत नाही!

अजस्र GMRT ला अविस्मरणीय भेट!

CCS च्या शिस्तबद्ध पद्धतीनुसार जीएमआरटीला जाण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली होती. GMRT ला भेट म्हणजे निश्चितच अनेकांसाठी स्वप्न प्रत्यक्षात येणं होतं. संमेलनात माझे दोन मित्र सहभागी असल्यामुळे त्यांच्यासोबत हा सर्व आनंद घेता आला. GMRT वस्तुत: अतिशय वेगळं काम करणारी संस्था. पण त्यांनीही इतक्या मोठ्या ग्रूपचं आनंदाने स्वागत केलं. तिथे पोहचल्यावर आदरणीय भारतीय खगोल भौतिकीचे पितामह डॉ. गोविंद स्वरूप सरांची आठवण झाली. युरोपियन स्पेस एजन्सीच्या मंगळ मिशन मोहीमेमध्ये जीएमआरटीने कसा त्यांच्या यशाचा रेडिओ पुरावा दिला, अशा व इतर बातम्या दिसल्या. आणि अर्थातच बाउंसर असलेल्या इतरही अनेक गोष्टी दिसल्या. परंतु ह्या तांत्रिक गोष्टी GMRT च्या हिरव्यागार परिसरामुळे जड वाटत नव्हत्या. सोळंकी सरांनी परत एकदा इथले नियम सांगितले, रूपरेषा सांगितली. आणि सी- ३ डिशच्या जवळ सगळ्या खगोलप्रेमींचा मेळा भरला! डिशची भव्यता नजरेत मावत नव्हती. एका अतिशय वेगळ्या ठिकाणी आल्याची जाणीव सतत होत होती. GMRT चे तांत्रिक पैलू, डिशची रचना, कार्य, तंत्रज्ञान ह्याबद्दल तिथल्या वैज्ञानिकांनी माहिती दिली. हवे तितके प्रश्न विचारू देण्याचा त्यांचा संयम कौतुकास्पद वाटला. दुपारच्या सत्रात GMRT च्या इतर पैलूंबद्दल तिथल्या अभियंत्यांनी व वैज्ञानिकांनी माहिती दिली. आता अपग्रेड झालेली GMRT किती मोठं योगदान देते आहे, हे सांगितलं. खगोलप्रेमींच्या शंकांचं समाधान केलं. तांत्रिक पैलू शक्य तितके सोपे करून सांगितले. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांना खूप चांगले प्रश्न विचारले.

वेगळे "बायनरी स्टार्स" नव्हे हे तर "स्टार" क्लस्टर!

मुख्य आयोजक असलेल्या मयुरेश प्रभुणे सरांनी CCS आणि आधीच्या खगोल विश्वाचं काम सांगितलं. एक व्यक्ती आणि अशा काही जणांचा गट किती मोठं योगदान देऊ शकतो, हे त्यांनी समोर ठेवलं. वेगवेगळ्या उल्कावर्षाव, ग्रहणे, पिधान अशा खगोलीय घटनांचा अभ्यास आणि त्याबरोबर ह्याबद्दल समाजात केलेलं प्रबोधन ह्याबद्दल त्यांनी माहिती दिली. पुढे पुढे इतर लोकांनाही ह्या उपक्रमांमध्ये सहभागी केलं. अनेक अभ्यास- निरीक्षण- उपक्रम हे खगोलप्रेमींनी जनतेसोबत मिळून केले. गेले २५ वर्षं कसं त्यांचं काम चालू आहे, हे कळालं तेव्हा खंत वाटली की, ह्या कामाबद्दल आधी माहिती का मिळाली नाही. २५ वर्षं सातत्याने काम करत राहणं ही खूssssप मोठी गोष्ट आहे. अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याच्या, लोणार परिसंस्था संवर्धनाच्या त्यांच्या संवर्धनाच्या कार्याबद्दल खगोल विश्व आणि CCS ला खरंच सॅल्यूट. उपस्थितांच्या प्रतिक्रिया सत्रात एका खगोलप्रेमींनी सांगितलं तसं त्यांना आधी वाटलं होतं की, ही टीम मयुरेश प्रभुणे सर व सुप्रिया प्रभुणे मॅडमची म्हणजे बायनरी स्टारची आहे. पण नंतर सगळ्यांनाच जाणवलं की, यशोधन पानसे सर, भूषण सहस्रबुद्धे सर, सोनल मॅडम व इतर अनेक "विज्ञान स्वयंसेवकांचं" हे तर तेजस्वी "स्टार" क्लस्टर आहे!

 


एस्ट्रो फोटोग्राफीबद्दल मार्गदर्शन आणि आकाश दर्शन

ह्या संमेलनाचं अजून एक आकर्षण असलेलं एस्ट्रो फोटोग्राफी सेशनही नंतर झालं. यशोधन सरांनी अगदी सुरुवातीपासून स्टेप्स उलगडून सांगितल्या. ह्या पूर्ण संमेलनामध्येच असं खूप नवीन गोष्टींचं "एक्स्पोजर" सगळ्यांना मिळालं! त्याबरोबर मोठे टेलिस्कोप्सच्या मदतीने विज्ञान स्वयंसेवकांनी वेगवेगळे ऑब्जेक्टस सगळ्यांना दाखवले. अगदी १२ इंच- १० इंच इतके मोठे टेलिस्कोप त्यासाठी ह्यांनी सेट केले होते. खरोखर सगळ्यांच्या उपस्थितीची नोंद, कूपन्स देणं, एक एक व्यवस्था, सगळ्यांची सोय बघण्यापासून ते प्रमाणपत्रावर नाव लिहीण्यापर्यंत सर्व स्वयंसेवकांनी खूप कष्ट घेतले. आणि टाळ्यांच्या कडकडाटामधून सगळ्यांना वाटलेलं कौतुकसुद्धा "रिफ्लेक्ट" होत होतं. टेलिस्कोप्ससोबत नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या आकाशातल्या ता-यांची व नक्षत्र- तारकासमुहांची माहिती मयुरेश सरांनी दिली. पण  तेव्हा खरी उत्सुकता होती धुमकेतूची. २३ जानेवारीच्या पहाटे सहजपणे हा धुमकेतू माझ्या चार इंचीतून शोधता आला होता. पण इथे खूप वेळ प्रयत्न करूनही दिसत नव्हता. कदाचित चंद्रप्रकाशाच्या चादरीत झाकला गेला असेल किंवा क्षितिजापासूनची उंची कमी असल्यामुळे एक्स्टिंक्शनमुळे दिसत नव्हता. ध्रुवमत्स्यातल्या बीटा ता-याच्या वर खूप वेळ शोधूनही दिसला नाही. त्या भागात अनेकदा ४ इंची टेलिस्कोप व मोनोक्युलर नेला, पण दिसला नाही. आणि रात्र वाढत चालल्यामुळे बिबट्याचा नसला तरी कडक थंडीचा संचार मात्र सुरू झाला होता.

बिबट्याचा माग चुकवून धुमकेतूचा यशस्वी माग!

काही वेळासाठी परत फोटोवर प्रोसेसिंगचं सेशन झालं. हॉर्स हेड नेब्युलाची सुंदर प्रतिमा कशी बनवता येते, ते सरांनी दाखवलं. त्याबरोबर एस्ट्रो फोटोग्राफीची अत्याधुनिक साधन, पद्धती, सॉफ्टवेअर्स ह्याबद्दलही माहिती दिली. पण तेव्हाही खरी ओढ धुमकेतूचीच होती. इथे आकाश बरंच चांगलं होतं, M 44 तारकागुच्छ सहज नाही तरी अवेर्टेड विजन वापरून दिसला होता, M 41 तारकागुच्छ सहजपणे दुर्बिणीतून दिसला होता. पण धुमकेतूने खूप वेळ माग लागू दिला नाही. शेवटी आकाश दर्शनाची वेळ अगदी संपत आली असताना गिरीशने- माझ्या मित्राने- सांगितलं की, बाहेरच्या टेलिस्कोपमध्ये धुमकेतू सेट केलाय! त्यात तो दिसतोय. आणि अष्टमीचा चंद्रही मावळलाय! त्यामुळे परत उत्साह वाटला. आधी त्या दुर्बिणीतून बघितला. परत एकदा पोजिशन चेक केली. यशोधन सरांनीही दिशा परत सांगितली. स्काय सफारी एपवर मी आधीच बघून ठेवलेली पोजिशनच होती. इथे मोबाईल बंद केला असल्यामुळे आजच्या दिवशीची पोजिशन आधीच बघून ठेवली होती. ह्यावेळी परत एकदा त्या भागामध्ये टेलिस्कोप नेला आणि सापडला! २३ जानेवारीला ह्याच ४ इंची टेलिस्कोपमधून दिसला होता, त्याहून जास्त अंधुक दिसत होता. पण दिसला धुमकेतू एकदाचा. त्याची क्षितिजापासूनची उंची जेमतेम २४ अंश होती, त्यामुळे व थोडं धुकं असल्यामुळे अंधुक दिसत असेल. अखेरीस बिबट्याचा माग तर चुकवलाच, पण धुमकेतूचाही यशस्वी माग काढला! सत्राची वेळ अगदी संपता संपता बघता आला. त्यानंतर मात्र थंडीपुढे सगळ्यांनी डाव घोषित केला आणि परतीचा प्रवास सुरू झाला!

असं हे तीन दिवसीय संमेलन झालं! अतिशय उत्तम व्याख्यानं, मोठ्या लोकांच्या भेटी, इतर खगोलप्रेमींसोबत संवाद, अतिशय सुंदर विषय मांडणी आणि GMRT ची अविस्मरणीय भेट! हे संमेलन कोणी विसरू शकणार नाही. तेव्हा सर्व आयोजक, सर्व संस्था व सर्व स्वयंसेवकांना धन्यवाद देऊन इथे थांबतो. धन्यवाद. CCS च्या उपक्रमांना खूप शुभेच्छा. कोणाला त्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांच्या साईटची माहिती वर दिली आहे.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!