✪ निसर्गरम्य कँप साईटवर आकाश दर्शन
✪ मुलांसाठी भूगोलातल्या गमती, टीम वर्क, खेळ, कोडी, हायकिंग, कँप फायर अशी मेजवानी
✪ आकाशामध्ये आकाशगंगा व तारका रत्नांची उधळण
✪ पानशेत बॅकवॉटरचा नितांत सुंदर परिसर
✪ तंबूमध्ये राहण्याचा थरार
✪ मुलांसाठी शिकण्याचा आनंददायी अनुभव- "हवी तेवढी मस्ती करून आणि दमून ये"
✪ आपुलकीचं आदर आतिथ्य
सर्वांना नमस्कार. सध्या शाळेतल्या मुलांसाठी सुट्ट्यांचं वातावरण आहे. त्याबरोबर समर कँप्स, वेगवेगळ्या कार्यशाळा किंवा गड- किल्ल्यांचं भ्रमण अशा गोष्टींचं वातावरण आहे. अशा एका अगदी वेगळ्या "भूगोल" शिबिरामध्ये जाण्याचा आणि तिथल्या मुलांसाठी आकाश दर्शन म्हणजेच खगोलावरचं सत्र घेण्याचा योग आला. तिथला अनुभव ह्याद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. पुण्याच्या पानशेतपासून आणखी १४ किलोमीटर आतमध्ये असलेल्या कँप स्टार ट्रेल (स्पेलिंग Kamp Star Trail) संस्थेने मुलांसाठी भूगोल शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये मला एक आकाश दर्शन सत्र घेण्यासाठी सायली देसाई मॅडमनी बोलावलं. जेव्हा इथलं असं शिबिर आणि कँप स्टार ट्रेलची पानशेतच्याही पुढे अगदी आतली जागा कळाली, तेव्हाच इथे आकाश दर्शन सत्र घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. कारण ही जागा शहरातील सर्व प्रदूषण आणि प्रकाशापासून इतकी दूर आहे की, शहरी प्रकाशात अजिबात न दिसणारे अंधुक तारे, तारकागुच्छ व आपल्या आकाशगंगेचा दुधाळ पट्टा (Milky way) इथे नक्की दिसेल असं वाटलं.
... १५ एप्रिलला दुपारी पुण्यातून श्री. हर्षद साने सरांसोबत निघालो. आकाशात बरेच ढग आहेत. आकाश दर्शनाच्या हवामान अंदाजानुसार आकाश क्लीअर असेल. पण हे म्हणजे टी- २० मध्ये आधी कोण जिंकणार हे सांगण्यासारखं आहे! सरांसोबत गप्पा सुरू झाल्या आणि हळु हळु पाऊस सुरू झाला. सरांसोबत इंडियन ओशन संगीत आणि बाहेर पावसाचं संगीत सुरू झालं. पुण्याच्या जवळ नाही तर हिमालयामध्ये कुठे फिरतोय असं वातावरण झालं आहे. मुठा मार्गे जाताना प्रचंड पाऊस लागला पण जसं जसं पानशेत जवळ येत गेलं, पाऊस कमी झाला आणि कँप स्टार ट्रेलला पोहचेपर्यंत ढग केवळ पूर्वेला उरले! शिबिरामध्ये ८ ते १५ वयोगटातली ३३ मुलं आधीच आली आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या गमती जमती सुरू आहेत. ह्या शिबिरामध्ये भूगोल ही मुख्य थीम आहे. इथे येताना मुलांनी पानशेत धरणाला भेट दिली. हा परिसर एका टेकडीवर आहे. त्यामुळे पर्वतरांग, जलाशय अशा गोष्टी ते प्रत्यक्ष बघत आहेत. इथून पुढे काही अंतरावर श्री. जॉय मिरांडा शाश्वत विकासावर आणि वृक्ष संवर्धनावर अनेक वर्षांपासून काम करतात. त्यांनी तिथे खूप झाडं लावली आहेत आणि निसर्गाचं संगोपन केलं आहे. शहरापासून दूर राहूनही किती वेगवेगळ्या गोष्टी करता येतात ह्याचं एक मॉडेल त्यांनी उभं केलं आहे. अशा अवलिया माणसासोबत मुलांची भेट झाली.
कँप साईटवर पोहचेपर्यंत पाच वाजले आहेत. इथे सायली देसाई मॅडम, कँप साईटचे प्रमुख अथांग पटवर्धन सर, स्वप्नील भट सर, क्षितिजा मॅडम व इतर मंडळींशी परिचय झाला. १९९६ मध्ये सुरू झालेलं हे कँपिंग ग्राउंड आहे. पण त्याबरोबर इथे इतरही अनेक उपक्रम चालतात. दुपारच्या वेळी मुलांनी त्यांच्या टेंटच्या गटानुसार एकत्र मिळून मॅगी बनवली. ढग येत आहेत आणि जात आहेत. त्यामुळे आकाश दर्शनासाठी बोटे गुंफलेली (fingers crossed) आहेत! इथला सगळा परिसर नितांत सुंदर आहे. न राहवून समोरच असलेल्या जलाशयाजवळ आणि डोंगरात जाणा-या रस्त्यावर फिरून आलो. सगळीकडे अप्रतिम सुंदर निसर्ग! इमारती, दुकानं, गजबज ह्यापासून खूप दूर आहे हे! इथे आल्यावर हिमालयाची आणि कोंकणातल्या देवगड सारख्या गावाची आठवण होते आहे. क्वचित डोंगरामध्ये एक- दोन छोटी घरं दिसतात. बाकी सगळं शांत आणि अथांग!
आता मुख्य उत्सुकता अंधार पडण्याची आहे! आणि निसर्गाने साथ दिली. ढग असले तरी पाऊस पडत नाहीय. आणि ढगही काही भागांमध्ये आहेत. अंधार पडता पडता मुलांना एकत्र केलं. माझी त्यांना थोडक्यात ओळख करून दिली. मग त्यांचा परिचय करून घेतला. मुलांचं नाव, वर्ग, शाळा आणि त्यांनी आधी आकाशातलं काय पाहिलं आहे असा हा परिचय होता. अनेक मुलांनी काही ना काही बघितलं होतं. काही मुलं म्हणाले की, त्यांनी एकही ग्रह बघितला नाहीय! एक ग्रह व एक तारा सगळ्यांनी बघितलाय असं सांगून गप्पा सुरू केल्या. शिवाय भूगोल कँप असल्यामुळे मुलांना भूगोलाबद्दल काही प्रश्न विचारले. समुद्रात सूर्योदय बघायचा तर कोंकणात जाऊन चालेल का? मग कुठे जावं लागेल अशा गप्पा झाल्या. ढगांचा सामना अगदी अटीतटीचा चालू आहे. त्यामुळे पश्चिमेकडे तळपणा-या शुक्रापासून टेलिस्कोपिक निरीक्षणाची सुरूवात केली. शुक्र, मंगळ आणि मधाचं पोळं नावाचा तारकागुच्छ (Behive cluster) टेलिस्कोपमधून बघता आले. नेमका पृथ्वीवरचा कृष्णमेघ वाटेत असल्यामुळे मृगातला तेजोमेघ बघता आला नाही. त्याबरोबर नुसत्या डोळ्यांनी दिसणारे व्याध, प्रश्वा, ब्रह्महृदय, मघा, सप्तर्षी असे काही तारे पॉईंटरने दाखवले. ज्या भागामध्ये ढग नव्हते, तिथे आकाश खूप छान दिसतंय. पण ढगांची अटीतटीची मॅच सुरू आहे. त्यात विजांचे चौकारही सुरू झाले. मग पहाटे ५ वाजता जे उठतील त्यांना टेलिस्कोपने चंद्राची कोर, शनीची कडी व आपली आकाशगंगा (Milky way) बघायला मिळू शकेल असं सांगून हे सत्र संपवलं. रात्री नंतरही ढग दाटले असल्यामुळे मला व्यक्तिगत निरीक्षण करता आलं नाही.
रात्रीच्या जेवणानंतर मुलांचं कँपफायर झालं. नंतर दिवसभर दमलेली सगळी मुलं व मोठेही तंबूंमध्येच झोपले. अथांग सर, सायली मॅडम, क्षितिजा मॅडम, हर्षद सर, स्वप्नील सर इत्यादी मंडळी स्वत: सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. हे सगळे जण भावंड/ नातेवाईक आहेत. अशा भावा- बहिणींनी एकत्र येऊन असं आयोजन केलेलं बघून छान वाटलं. नंतर कळालं की, हे कँप स्टार ट्रेल सगळे मिळून एकत्रच चालवतात. सगळे जण इथे येऊन लक्ष देतात. पालकांना सोडून आलेले ८ वर्षांचे मुलं बघताना छान वाटलं. एक मुलगी तर ६ वर्षांची आहे. भरपूर मस्ती करून ये, मजा करून ये असा "लायसन्स" घेऊन आलेल्या मुलांना बघून (आणि त्यांच्या पालकांचाही हा विचार) बघून खूप बरं वाटलं. इथले सर आणि मॅडमच ह्या शिबिरात त्यांचे शिक्षक, ताई- दादा, आई- बाबाही आहेत. प्रेमाने सांगणं, कधी ओरडणं, समजुत काढणं हे सगळं ते करत आहेत. एक मुलगा रुसला तेव्हा हर्षद सरांनी त्याची अतिशय शांतपणे समजुत काढली. समजुत काढली, असं म्हणताही येणार नाही इतकी त्याला फक्त सोबत दिली.
ही कँप साईट डोंगरावर वसलेली आहे, त्यामुळे इथे मातीनेच बनलेले पण खालचे- वरचे असे वेगळे मजले आहेत. मुलांचे तंबू खालच्या भागात आहेत. वरती एक घर आहे व काही बांधलेल्या खोल्या आहेत. अतिशय छान जपलेला हा कँपस आहे. भरपूर झाडं आहेत. डोंगरातले दगड आणि जुनी टायर्स अशा वस्तु वापरून परिसर आणखी सजवलेला आहे. आणि हे डोंगरामध्ये असल्यामुळे व कँपस खूप मोठा असल्यामुळे इकडून तिकडे जाताना आपोआपच थोडा व्यायाम होतो. पहाटे आकाश नक्कीच चांगलं असेल व आता शहरांमधून नामशेष झालेली आपली आकाशगंगा बघत येईल असा विचार करत मला दिलेल्या तंबूत आडवा झालो. स्लीपिंग बॅगमध्ये झोपण्याचा अनुभव होता, पण हा नवीन आहे. त्यामुळे झोप लागेल फार असं वाटत नाहीय. बाहेरचा मुलांचा गलका हळु हळु कमी होत गेला.
रात्रभर झोप अशी लागलीच नाही. तंबू खूप आरामदायक आहे, झोप लागली नाहीय तरी अगदी आल्हाददायक वाटतंय. आसपास इतकी झाडं असल्यामुळे एप्रिल असूनही हिवाळ्यासारखं वाटतंय. फक्त सवय नसल्यामुळे झोप लागली नाही. शेवटी पहाटे ४.१५ ला तंबूचं दार उघडून बाहेर डोकावलो! अप्रतिम नजारा! डोंगरामागून नुकतीच उगवलेली लाल चंद्र कोर आणि आकाशगंगेचा दुधाळ पट्टा! अहा हा! व्वा! उठून तयार झालो. टेलिस्कोप काढला, आयपीसेस लावले, बायनोक्युलर घेतला आणि पार्किंगकडे गेलो. रात्री मुख्य दिवे बंद केलेले असल्यामुळे रस्ता सापडत नाहीय. पण अंधारात फिरताना मजा वाटतेय. हळुच हर्षद सरांना आवाज दिला आणि टेलिस्कोप सेट केला. थोडे ढग आहेत कुठे कुठे. पण आकाशगंगेचा दुधाळ पांढरा पट्टा किती छान दिसतोय! काही तारकागुच्छ डोळ्यांनीही दिसत आहेत. बायनॅक्युलर तिकडे रोखल्यावर तर अक्षरश: तारकागुच्छांचा पाऊस पडतोय! M7, Butterfly cluster, NGC 6231, ज्येष्ठा ता-याजवळचा M4, M 24 असे तारकागुच्छ अप्रतिम सुंदर दिसत आहेत. चंद्राची कोर थोडी वर आल्यावर बाजूलाच शनी दिसला. त्याशिवाय मावळतीकडे झुककेल्या चित्रा आणि स्वाती, उगवलेले तेजस्वी अभिजीत व श्रवण, अनुराधा- ज्येष्ठा- मूळ असा वृश्चिकाचा पूर्ण साज आणि आकाशगंगेत डुंबणारे पूर्वाषाढा- उत्तराषाढा! अहा हा! हर्षद सर आले. आणि अगदी हळु आवाज देऊन बोलवल्यावर काही मुलंही आले. त्यांना मग टेलिस्कोपने चंद्र व शनीची कडी दाखवली. त्याबरोबर आकाशगंगेचा पट्टासुद्धा दाखवला. मुलं खूप दमलेले होते व ते उठले तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं, त्यामुळे त्यांना परत झोपायला पाठवलं. पुढचा अर्धा तास तिथल्या आकाशाचा आनंद टेलिस्कोप व बायनॅक्युलरने लुटत राहिलो. ५.३० नंतर हळु हळु पूर्वेला फिकट लालिमा आली. तारे थोडे अंधुक व्हायला लागले. तेव्हा टेलिस्कोप परत बंद करून ठेवावा लागला! पण किती अप्रतिम अनुभव!
शुद्ध आकाशाबरोबरच इथला इतर निसर्गही खूपच सुंदर आहे. रात्रभर झोप न होऊनही फिरण्याचा मोह आवरला नाही. फोटो घेत मनसोक्त फिरून आलो. धरणाच्या बॅकवॉटरच्या मागे उगवणारा सूर्यही अप्रतिम बघता आला! इतके सुंदर नजारे बघून पावसाळ्यात इथे राईड करायला काय मजा येईल, असं वाटतंय. परत आल्यावर अथांग सर, सायली मॅडम व इतरांसोबत चहा झाला. मुलंही हळु हळु उठले. इथून जवळच डोंगरात चढणारी पायवाट आहे. तिथे अथांग सर मुलांना हायकिंगला घेऊन गेले. बाकी मंडळी त्यांच्या कामात असल्यामुळे परत एकदा तासभर फिरून आलो. परत आल्यावर मुलांचा नाश्ता सुरू होता. त्यानंतर त्यांना थोडा वेळ खेळायला मोकळा होता. अथांग सर, हर्षद सर व सगळ्यांनी मिळून मुलांसाठी भूगोलावर आधारित खजिन्याचा शोध अर्थात् ट्रेझर हंट खेळ त्यांना समजावून सांगितला. आणि नंतर गटानुसार मुलं कामाला लागले! त्यांना कँपसमध्येच चिठ्ठ्या व क्ल्यूज मिळणार आहेत. त्याबरोबर दिशा, अंतर मोजणं, एकत्र मिळून शोधणं अशाही गमती त्यात आहेत. मुलं त्यात रंगून गेली.
रात्री झोप नाही आणि सकाळी दोन वॉकमध्ये १० किलोमीटर पायपीट केल्यामुळे मला आरामाची गरज जाणवतेय. थोडा आराम आणि थोड्या गप्पा असं करत तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेत राहिलो. दिवस वर आला तसं इथेही गरम व्हायला लागलं. इतक्या दमण्याची व खेळण्याची सवय नसलेल्या मुलांना ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सगळ्यांचं लक्ष आहे. सतत पाणी प्यायला सांगत आहेत. त्याबरोबर दूध- रसना असे फ्लुईडसही मुलं घेत आहेत. टोप्याही आहेतच. भर ऊन्हात मुलांचा खजिन्याचा शोध मस्त सुरू आहे. एक एक चिठ्ठी किंवा क्ल्यू शोधतानाची त्यांची उत्कंठा आणि सापडल्यावर होणारा जल्लोष! एका गटातली एक मुलगी तर चिठ्ठी शोधणा-या छोट्यांना प्रेमाने मिठी देतेय आणि "माय स्वीट बेबी" म्हणतेय! सुंदर दृश्य आहे हे सगळं. हर्षद सरांची कामं आटोपल्यावर जेवण घेतलं. हे जेवणही इथल्या मालक असलेल्या पटवर्धन काकूंनी स्वत: केलं आहे. इथल्या वातावरणात आपुलकी जाणवते त्याचं हेही एक कारण!
अशा अनेक आठवणी सोबत घेऊन तिथून हर्षद सरांसोबत निघालो. एका सुंदर ठिकाणी जाण्याचं व मुलांसाठी सत्र घेण्याचं समाधान मिळालं. तिथल्या निसर्गामध्ये फिरताना मिळालेली ऊर्जा आणि प्रसन्नता घेऊन परतीचा मार्ग घेतला. (तिथे विजिट करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क Kamp Star Trail, सायली देसाई- 8087613794). धन्यवाद!
- निरंजन वेलणकर 09422108376
१७ एप्रिल २०२३.