नमस्कार.
अतिशय अस्वस्थ करणार्या बातम्या रोज येत आहेत. समाजातले काही जण किती वाईट आहेत, हे सांगणारी भीषण स्थिती आहे ही. अतिशय मोठा प्रश्न आहे हा. ह्या विषयावर २०१६ मध्ये कोपर्डी प्रकरणाच्या वेळी लिहीलेला लेख शेअर करत आहे. एका वेगळ्या कोनातून ह्या प्रश्नावर त्यामध्ये विचार केला आहे.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्कार्याला किंवा बलात्कार्यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बलात्कारी कोणी अज्ञात- माथेफिरू- सराईत गुन्हेगार असा आहे, हे मनातून काढायला पाहिजे. आकडेवारी सांगते की, मोठ्या प्रमाणात बलात्कार व शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये कुटुंबातले जवळचे सर्वसामान्य पुरुषच सामील असतात. आणि जरी कोणी अज्ञात माथेफिरू गुन्हेगार जरी असले तरी तेसुद्धा कोणी तरी माणूसच आहेत ना. आपल्यासारखेच माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ही समस्या जर खर्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात.