विज्ञान प्रसाराची "सुदिशा"
नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच! लातूरमधल्या मित्रांच्या, स्नेही जनांच्या व आधीच्या लातूरला केलेल्या सायकल प्रवासाच्या आठवणीही ताज्या झाल्या.
कुलकर्णी सरांसोबत लातूरहून निघालो तेव्हा सरांनी सावध केलं की, पानगांवचा रस्ता इतका सोपा नसणार! आणि आकाशात अमावस्येमुळे चंद्र जरी दिसणार नसला तरी रस्त्यावरचे खड्डे चंद्रावरच्या विवरांची उणीव जाणवू देणार नाहीत! महाराष्ट्रातले जे अनेक रस्ते दुर्गम मनाली- लेह रस्त्याशी स्पर्धा करू शकतात, त्यात हाही रस्ता नक्कीच असेल! ह्या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे संयमाची कसोटी आणि ध्यानाचा धडा! चंद्रावरच्या विवरांना चुकवत व गुरूत्वाकर्षणासोबत घसरगुंडी करत जावं लागलं! पण सरांसोबतच्या गप्पांमुळे प्रवास छान झाला. पानगांवमध्ये सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचं केंद्र आहे. इथे मुलांसाठी "सुदिशा" म्हणजेच "सुट्टीच्या दिवशीची शाळा" हा उपक्रम राबवला जातो. आणि मराठी विज्ञान परिषदेच्या शाखेच्या स्वरूपात विज्ञान प्रसाराचं कामही केलं जातं. इथे सरांची खूप स्वप्नं साकार करण्याची धडपड सुरू आहे.
आकाश दर्शनाची सुरूवात दिवसा तारा बघून झाली! दिन में तारा दिखाने का मौका मिला! फिल्टर लावून सूर्य निरीक्षण. सूर्याचे 99.99% प्रकाश किरण शोषल्यानंतर सूर्य संत्र्यासारखा लालसर व सौम्य दिसतो. जणू "मार्तंड जे तापहिन!" अशा सूर्याचं व त्यावरच्या डागाचं निरीक्षण बाल तारे- तारकांनी केलं. हे डाग म्हणजे सूर्यावरच्या ज्वाळाच आहेत. पण इतर ज्वाळांपेक्षा कमी प्रकाशित असल्यामुळे काळसर भासतात. आणि दिसताना बिंदुवत दिसत असले तरी हे डाग पृथ्वीपेक्षाही मोठे असतात!
आकाशात चंद्राची व शनिची उणीव जाणवणार होती. त्यामुळे चंद्र व शनिचे माझ्या दुर्बिणीने घेतलेले फोटोज व व्हिडिओज दाखवले. चंद्र व शनिचं पिधान- चंद्रामुळे झाकला जाणारा शनिही पॉवर पॉईंटच्या मदतीने दाखवला. तसंच 2020 मध्ये झालेली शनि- गुरूची युतीही दाखवली. आकाशगंगेचा पट्टा कसा दिसतो हेही मुलांना सांगितलं. ह्यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद करता आला. विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला. त्यांना आकाशात काय बघायचं आहे, हे सांगितलं.