Saturday, March 1, 2025

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

✪ The more you sweat in peace, the less you bleed in war!
✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे
✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक
✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा
✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज
✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा
✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज
✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा
✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट

नमस्कार. "इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती" हे श्री. चंद्रशेखर वेलणकर लिखित व अमालताश बूक्सद्वारे प्रकाशित पुस्तक नुकतंच वाचून झालं. चंद्रशेखर वेलणकर म्हणजे माझा शेखर काका! त्यामुळे हे पुस्तक खरं तर वाचलं कमी आणि त्याच्या आवाजात व त्याच्या मिस्कील शैलीत ऐकलं जास्त, असंच वाटलं. ह्या पुस्तकावर ही प्रतिक्रिया आपल्यासोबत शेअर करतो आहे. सौ. वर्षा वेलणकर- माझी वर्षा काकू हिच्या आरोग्य समस्या- डायलिसिस ते किडनी ट्रान्सप्लांट व पुढे ह्या त्यांनी गेली अनेक वर्षं अनुभवलेल्या खडतर वाटचालीबद्दल आणि त्यातून त्यांनी रस्ता कसा शोधला हे सांगणारं पुस्तक आहे. आणि बारा वर्षांच्या ह्या एक प्रकारच्या तपश्चर्येमध्ये त्यांना जशी वाट मिळाली तशी ते इतर सहप्रवाशांसाठी कसे सोबती झाले हे वर्णन त्यात आहे. गंभीर व दुर्धर आजाराच्या स्थितीतील रुग्ण व रुग्णांची काळजी घेणारे सोबती ह्या सर्वांना उपयोगी पडेल म्हणून हे पुस्तक काकाने लिहीलं आहे. 



वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य, आरोग्य विमा, तांत्रिक बाबी ह्याबद्दल तेही सुरूवातीला अनभिज्ञ होते. पण आरोग्य समस्या सुरू झाल्या आणि हळु हळु स्थिती खूप विपरित होत गेली. ते सर्व अनुभव, टप्पे व त्या वेळची मन:स्थिती हे काकाने पुस्तकात संवादाच्या स्वरूपात सांगितलं आहे. पुस्तकाचं स्वरूपच असं आहे की आपण हे वाचतोय असं न वाटता काका बोलतोय, असंच वाटतं. ओढवलेल्या संकटाचं त्यांचं वर्णन ऐकताना आपल्या डोळ्यांपुढे ती दृश्यं येतात. बोलता बोलता चर्चेमध्ये काका एक एक गोष्ट सांगत जातो. त्याचे व काकूचे अनुभव शेअर करत जातो. ते कसे चाचपडले, कुठे ठेच लागली, काय आणीबाणी उद्भवली होती व नंतर कसे त्यांना त्यांचे वाटाडे मिळत गेले व मार्ग निघत गेला हे सांगतो. एका व्यक्तीच्या आरोग्याच्या आणीबाणीपासून सुरू झालेली ही चर्चा पुढे अनेक गोष्टींना स्पर्श करते. काकाची मिस्कील शैली आणि कुठे कुठे अचानक वेगवेगळ्या गोष्टींची दिलेली सांगड ह्यामुळे हे वर्णन रुक्ष न होता खूप प्रवाही व जीवंत होतं. ते सविस्तर पुस्तकामध्येच वाचण्यासारखं नव्हे ऐकण्यासारखं आहे.  

ह्या पुस्तकात आलेले मुख्य मुद्दे थोडक्यात शेअर करायला आवडतील. जरी आरोग्य हे मुख्य सूत्र असलं तरी पुस्तकाच्या शीर्षकानुसार कोणत्याही प्रकारची खडतर वाटचाल करणारे प्रवासी व त्यांच्या सोबत्यांसाठी ते लागू आहे. पुस्तकातला एक मुख्य विचार आरोग्याबद्दल सजग असणं हा आहे. आज जे गंभीर व दुर्धर रोग आहेत त्यांची कारणं अनेक आहेत. अनेक कारणं आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत (जसं अन्नातली भेसळ, अशुद्ध हवा, प्रदूषण इ.). पण त्याबरोबर आपल्या हातामध्ये असलेल्याही अनेक गोष्टी आहेत. The more you sweat in peace, the less you bleed in war! आपण आधी स्वत:चे खरे सोबती बनून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपलं शरीर जे इशारे देतं ते लक्षात घेतले पाहिजेत. चालणं- व्यायाम- योग असे आपल्याला जे आवडत असतील ते व्यायाम केले पाहिजेत. त्यादृष्टीने हे पुस्तक योग व प्राणायामाचं महत्त्व व फायदे खूप चांगलं सांगतं. जसं शिक्षण हे बरचसं विद्यार्थ्यावर अवलंबून असतं, तसंच आरोग्याचंही आहे. डॉक्टर व वैद्यकीय सुविधा ह्या त्यांच्यावर पूर्ण परावलंबी होण्यासाठी नाहीत.

बोलता बोलता काका आपल्याला अनेक प्रश्न विचारतो. आरोग्य विमा व आरोग्यासाठीची आर्थिक तरतूद. किंवा भविष्य काळात होणार्‍या आरोग्याच्या समस्यांबद्दल आपली सजगता. त्यासाठी आपण तयार आहोत का, हे तो आपल्याला विचारतो आणि पुढची दिशाही सांगतो. ज्या व्यक्तींकडे अशी तयारी नव्हती किंवा अशी परिस्थिती नव्हती, त्यांनी भोगलेले त्रास त्यात त्याने सांगितले आहेत. विनय- विद्या व बारक्या हा प्रसंग भावुक करणारा आहे.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरचं काही नियंत्रणात नसलेलं असलं तरी नियंत्रणातही बरंच काही असू शकतं. जसं दुर्धर रुग्णाची काळजी घेणार्‍या सोबत्याने त्याचं आरोग्य टिकवणं हे त्याच्या नियंत्रणात असतं. मनावर होणारे ताण हलके करण्याच्याही पद्धती उपलब्ध असतात. काका सांगतो की, त्यामध्ये संवाद व बोलणं- व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं आहे! रुग्णांना असलेले व सोबत्यांना असलेले ताण कसे बोलून हलके होतात ह्याचे प्रसंग त्याने सांगितले आहेत. क्रिकेटचे चाहते असलेले आजोबा कसे हळु हळु हलके होतात व इतर रुग्णांचीही काळजी करतात ते त्याने सांगितलं आहे. स्वत: अतिशय कठिण परिस्थितीतून जात असूनही हळु हळु इतरांची एक सक्षम सोबती बनलेल्या वत्सलाताईंबद्दल काकाने सांगितलं आहे. असं हे पुस्तक केवळ समस्या मांडत नाही किंवा वाट किती कठीण असू शकते हेच सांगत नाही तर असे अनेक वाटाडे व सोबती कसे पुढे जातात व आपणही कसे पुढे जाऊ शकतो, हेही सांगतं. ती हिंमत देतं. जीवनशैलीमुळे होणारे इतके आजार आपण बघतोय, तरी आपण त्यातून शिकताना का दिसत नाही, हा "यक्ष प्रश्नही" हे पुस्तक विचारतं.

असे अनेक अवघड जागेचे मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. मानसिक ताणावरचे उपाय सांगितले आहेत. व्यक्त होण्याचं व बोलून हलकं होण्याचं महत्त्व अनेकदा सांगितलं आहे. काही वेळेस कदाचित ऐकणार्‍याला हे खूप बाळबोध वाटू शकेल किंवा खूपच कमी इयत्तेतल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केल्यासारखंही वाटू शकेल. पण समाज म्हणून आपली ती स्थिती आहे, हेही तितकंच खरं. आजही आपल्याकडे व्यक्तिगत स्पेस किंवा "आनंदाला" पाप मानलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. आरोग्याबरोबर जन्म- मृत्यु (जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात आहेत), एक दिवस होणारी प्रिय जनांची ताटातूट, पैशाचं महत्त्व व अपरिहार्यता, टोकाच्या स्थितीतील रुग्णांसमोरचे पर्याय ह्याबद्दलही सांगोपांग चर्चा पुस्तकात केली गेली आहे.

हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे: https://amzn.in/d/61roztW

हे पुस्तक वाचल्यावर एक फिटनेस प्रेमी म्हणून मनामध्ये हे प्रश्न आले. ही अशी चेकलिस्ट मनात आली. आपण प्रत्येकाने ह्याचं स्वत:ला उत्तर द्यायला पाहिजे-

1. मला भरपूर घाम आला आहे, धाप लागली आहे, असं शेवटचं कधी झालं होतं? किंवा किती अंतराने होतं?
2. माझी झोप अगदी संपूर्ण झाली आहे आणि मला अगदी फ्रेश वाटतंय, असं शेवटचं कधी झालं होतं?
3. मला कडकडीत भूक लागली आहे व पोटात कावळेच कावळे झाले आहेत असं शेवटचं कधी झालं होतं?
4. कोणतंही काम नसताना मी एखाद्या व्यक्तीला भेटायला शेवटचा कधी गेलो/ गेली आहे?
5. किती जणांसोबत माझं कामाशिवाय आणि केवळ आनंदासाठी "बोलणं" होतं?
6. किमान 10 मिनिटे मी काहीही न करता/ मोबाईल न घेता स्वस्थ बसलो आहे/ बसले आहे असं शेवटचं कधी झालं होतं?

(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या ब्लॉगवर https://niranjan-vichar.blogspot.com/ माझे ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान इ. बद्दलचे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक १ मार्च २०२५.)

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!