Monday, March 3, 2025

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

विज्ञान प्रसाराची "सुदिशा"


नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच! लातूरमधल्या मित्रांच्या, स्नेही जनांच्या व आधीच्या लातूरला केलेल्या सायकल प्रवासाच्या आठवणीही ताज्या झाल्या.

कुलकर्णी सरांसोबत लातूरहून निघालो तेव्हा सरांनी सावध केलं की, पानगांवचा रस्ता इतका सोपा नसणार! आणि आकाशात अमावस्येमुळे चंद्र जरी दिसणार नसला तरी रस्त्यावरचे खड्डे चंद्रावरच्या विवरांची उणीव जाणवू देणार नाहीत! महाराष्ट्रातले जे अनेक रस्ते दुर्गम मनाली- लेह रस्त्याशी स्पर्धा करू शकतात, त्यात हाही रस्ता नक्कीच असेल! ह्या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे संयमाची‌ कसोटी आणि ध्यानाचा धडा! चंद्रावरच्या विवरांना चुकवत व गुरूत्वाकर्षणासोबत घसरगुंडी करत जावं लागलं! पण सरांसोबतच्या गप्पांमुळे  प्रवास छान झाला. पानगांवमध्ये सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचं केंद्र आहे. इथे मुलांसाठी "सुदिशा" म्हणजेच "सुट्टीच्या दिवशीची शाळा" हा उपक्रम राबवला जातो. आणि मराठी विज्ञान परिषदेच्या शाखेच्या स्वरूपात विज्ञान प्रसाराचं कामही केलं जातं. इथे सरांची खूप स्वप्नं साकार करण्याची धडपड सुरू आहे.

आकाश दर्शनाची सुरूवात दिवसा तारा बघून झाली! दिन में तारा दिखाने का मौका मिला! फिल्टर लावून सूर्य निरीक्षण. सूर्याचे 99.99% प्रकाश किरण शोषल्यानंतर सूर्य संत्र्यासारखा लालसर व सौम्य दिसतो. जणू "मार्तंड जे तापहिन!" अशा सूर्याचं व त्यावरच्या डागाचं निरीक्षण बाल तारे- तारकांनी केलं. हे डाग म्हणजे सूर्यावरच्या ज्वाळाच आहेत. पण इतर ज्वाळांपेक्षा कमी प्रकाशित असल्यामुळे काळसर भासतात. आणि दिसताना बिंदुवत दिसत असले तरी हे डाग पृथ्वीपेक्षाही मोठे असतात!

आकाशात चंद्राची व शनिची उणीव जाणवणार होती. त्यामुळे चंद्र व शनिचे माझ्या दुर्बिणीने घेतलेले फोटोज व व्हिडिओज दाखवले. चंद्र व शनिचं पिधान- चंद्रामुळे झाकला जाणारा शनिही पॉवर पॉईंटच्या मदतीने दाखवला. तसंच 2020 मध्ये झालेली शनि- गुरूची युतीही दाखवली. आकाशगंगेचा पट्टा कसा दिसतो हेही मुलांना सांगितलं. ह्यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद करता आला. विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला. त्यांना आकाशात काय बघायचं आहे, हे सांगितलं.


हे होईपर्यंत छान अंधार पडला आहे! आकाशात चांदोबा गुरुजी नसले तरी त्यांचे सर्व शिष्य आले आहेत! आणि जमिनीवरचे तारे- तारकाही हळु हळु यायला लागले. आकाशात नसलेल्या चंद्राची उणीव १५% प्रकाशित शुक्राने भरून काढली. दुर्बिणीतून दिसणार्‍या शुक्राच्या कोरीचा आनंद सर्वांनी घेतला. बूध व शुक्र हे अंतर्ग्रह असल्यामुळे आपल्याला कधीच पूर्ण का दिसत नाहीत, हे विद्यार्थ्यांना सांगितलं. घनतमी शुक्र बघ राज्य करी ह्या ओळी सार्थ आहेत. कारण सूर्य- चंद्रानंतरचा आकाशतला तिसरा तेजस्वी ऑब्जेक्ट म्हणजे शुक्र! आणि एकदम अंधार्‍या ठिकाणी त्याच्या प्रकाशात आपली सावलीही दिसते! आणि शुक्र दिवसाही बघता येतो. शुक्रानंतर सूर्यमालेतला ग्रहांचा सेनापती- गुरू व त्याचे उपग्रह बघितले. त्यानंतर तांबडा मंगळ बघितला. मंगळावर लोह खनिजाचं (FeO2) प्रमाण अधिक असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनीही तो लालसर दिसतो. हे बघता बघता पॉईंटरच्या मदतीने आकाशातले मुख्य तारे व नक्षत्रांचं निरीक्षण केलं व माहिती दिली. त्यामध्ये रात्रीच्या आकाशातला सर्वांत तेजस्वी तारा व्याध, त्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर असलेला अगस्त्य तारा, मृग नक्षत्र, गुरूच्या बाजूचा रोहिणी तारा, जवळचंच कृत्तिका नक्षत्र (तारकागुच्छ), मंगळाच्या बाजूला असलेले पुनर्वसूचे दोन तारे, प्रश्वा, मघा असे तारे होते. मराठी महिने व प्रत्येक महिन्याचा नक्षत्रासोबत असलेला संबंध ह्यावर चर्चा केली.

प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर. एका दिवसामध्ये असतात 86,400 सेकंद. म्हणून एक प्रकाशवर्ष हे अंतर तीन लाख गुणिले 86,400 गुणिले 365 इतके प्रचंड किलोमीटर्स! सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर किंवा सव्वा आठ प्रकाश- मिनिट अंतरावर आहे! चंद्र साधारण 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर म्हणजे सव्वा प्रकाश सेकंद अंतरावर आहे. पण आकाशातलं कृत्तिका नक्षत्र हे सुमारे 400 प्रकाश वर्षं अंतरावर आहे! म्हणजे आपण ते आज जरी बघत असलो, तरी तो प्रकाश 400 वर्षांपूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारास निघालेला आह्! पानगांव अगदी अंतर्भागात असल्यामुळे इथलं आकाश खूपच सुंदर आहे! डोळ्यांनीही कृत्तिका नक्षत्र सुंदर दिसतंय. मृग नक्षत्रातला तेजोमेघ (तार्‍यांचा ढग व तार्‍यांचं जन्मस्थान) छान दिसतोय. हा तेजोमेघ तर 1300 प्रकाश वर्षं अंतरावरचा! तरी आपले चिमुकले डोळे (12 मिमीचा टेलिस्कोपच) ते बघू शकतात! ह्या दोन्हीचं निरीक्षण विद्यार्थ्यांनी व मोठ्यांनीही दुर्बिणीतून केलं. हे करता करता मुलांच्या शंकांबद्दल चर्चा, त्यांचे प्रश्न, त्यांच्या डोळ्यातला आनंद व आश्चर्य अनुभवता आलं! असा हा सोहळा रंगला. विज्ञान प्रसाराची ही "सुदिशा" आहे ह्याची प्रचिती उपस्थितांना आली. मोठ्यांसोबत आकाश दर्शनाच्या दुसर्‍या पैलूसोबत चर्चा झाली. आपली जी सामान्य धारणा असते- की आपण कोणी तरी बडे असामी आहोत- म्हणजे आपलं सुख किंवा दु:ख सुद्धा- जगातलं सगळ्यांत मोठं आहे! ही जाणीवच आकाश दर्शन करताना दूर होते! सूर्यावरचा चिमुकला डागच जर पृथ्वीपेक्षा मोठा असेल आणि इतके तारे सूर्याहूनही शेकडो पट मोठे असतील, हजारो प्रकाश वर्षांचं हे अंतर असेल तर आपण "कोण" आणि "किती" आहोत हे समजणं इतकंही अवघड नाही! आकाश दर्शन त्या अर्थाने ध्यानाचीही "सुदिशा" देतं‌ आणि आपला "अहं" उतरवण्यासाठी मदत करतं. सत्रादरम्यान पानगांवचे शिक्षक गण, प्रा. कबाडे सर, प्रा. कुलकर्णी सर व इतरांसोबत संवाद करता आला. विद्यार्थ्यांची ऊर्जा व उत्साह बघून छान वाटलं.

मराठी विज्ञान परिषदेच्या शाखेसाठी हे सत्र घेण्याची संधी मिळाली! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप आपुलकीच्या भेटी झाल्या, गप्पा झाल्या. ह्या सगळ्याबद्दल प्रा. संतोष कुलकर्णी सर, प्रा. कबाडे सर, इतर आयोजक व श्री. राजकुमार गव्हाणे सरांनाही मन:पूर्वक धन्यवाद!

(निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 1 मार्च 2025)
 

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!