Showing posts with label नेताजी रहस्याचा शोध.. Show all posts
Showing posts with label नेताजी रहस्याचा शोध.. Show all posts

Friday, September 2, 2022

India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.

(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये इथे वाचता येईल)

✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे

नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं‌ त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही‌ असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.