Friday, September 16, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ३


श्रीनगरदर्शन....

जम्मु विभागात शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि लेहपासून ३००  किमीवरील न्योमा तालुक्यामध्ये चिन्यांच्या घुसखोरीच्या बातम्या आल्यानंतर ह्या वर्णनाचा तिसरा भाग लिहितोय. खरं ह्या बातम्या नेहमीच्याच आहेत, आपल्याला त्याचं काय, नाही का? ....................................

..... श्रीनगरमध्ये आम्ही पहाटे अडीचला पोचलो. दल सरोवरासमोर असलेल्या अझिझ हॉटेलमध्ये उतरलो. बाईकर्स आणि गिर्यारोहक ह्यांच्या मोहिमांची माहिती देणा-या एका वेबसाईटवरून ह्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली होती. म्हणून हे हॉटेल निवडलं होतं. गेल्या तीन दिवसांच्या प्रवासामुळे गेल्यावर लगेचच आडवे झालो... अर्थातच मनात प्रचंड प्रमाणात उत्तेजना होती, की आम्ही श्रीनगरमध्ये आहोत (चक्क!!)...
नवीन जागा असल्यामुळे फार गाढ झोप लागली नाही. तरीही प्रसन्न वाटत होतं. सकाळी लवकर उठलो. हॉटेल अत्यंत शांत होतं. तसं मध्यमवर्गीय हॉटेलच होतं. परंतु स्वच्छ व नीटनेटकं होतं. सकाळी लवकर हॉटेलच्या बाहेर फिरायला जाणार म्हणून खाली आलो. तर हॉटेलचा स्टाफ झोपलेला होता आणि मुख्य दरवाज्याला कुलुप लावलेलं होतं. तरीसुद्धा श्रीनगरमधल्या सकाळचा आस्वाद घेता आला.... काय अनुभव होता तो..... श्रीनगर..... श्रीनगर !!

पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या प्रवासामधले एजंट श्री. मोहंमद हुसेन ह्यांना फोन केला. त्याबद्दल सांगण्यापूर्वी मोहंमद हुसेन ह्यांचा परिचय कसा झाला हे थोडक्यात सांगतो. पुण्यामध्ये एक पंचाहत्तर वर्षांचे तरुण गृहस्थ राहतात. त्यांचं नाव वि. ग. घाटे. त्यांनी त्यांच्या स्कूटरवरून केलेल्या लदाख सफरीबद्दल पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी स्कूटरवरून त्यांच्या मुलासह जम्मु- लेह- मनाली- अमृतसर- जम्मु इतका मोठा प्रवास केला. कोणत्याही गटासह न करता त्यांनी हा संपूर्ण प्रवास दोघांनीच केला आणि तोसुद्धा २००१ मध्ये, जेव्हा तुलनेने बरेच कमी लोक असा प्रवास करत होते. आज तरी अनेक माध्यमांमधून काश्मीर, तिथे बाईकवर फिरणे इत्यादिबद्दल बरीच माहिती उपलब्ध झाली आहे व जाणा-यांची संख्याही वाढली आहे. पण त्यावेळी तसं नसूनही ते फिरले. अजूनहे हे आता ७५ वर्षांचे तरुण गृहस्थ नियमितपणे काश्मीरला जातात, ट्रेकिंगसुद्धा करतात. तर त्यांचं पुस्तक वाचून त्यांना भेटलो व त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. त्यांनी ज्या एजंटचा क्रमांक दिला होता, ते म्हणजे श्री मोहंमद हुसेन. आमचं सर्व फिरणं व हॉटेलमध्ये राहणं ह्यांच्याकडूनच झालं.   

श्री मोहंमद हुसेनचे सहकारी श्री. हसन आम्हांला श्रीनगरमध्ये भेटणार होते. सकाळी फोन करून भेट ठरली. अझिझ हॉटेलच्या जवळ असलेल्या नत्थू स्वीटससमोर ते आम्हांला भेटले. काश्मीरमधली हिंदु हॉटेल्स किंवा दुकानं लगेच लक्षात येतात. नत्थू हॉटेलमध्ये नाव हिंदु होतं, मालक कदाचित हिंदु असेल (नक्की सांगता येत नाही, कारण श्रीनगरचे बरेच हिंदु दक्षिणेत आले आहेत. आमचा जम्मु- श्रीनगर ड्रायव्हरही मूळचा श्रीनगरचा होता, पण जम्मुमध्ये विस्थापित झाला होता) आणि हॉटेलचा सर्व स्टाफ तर मानव-वंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय होता. इतकंच काय, पण इथून पुढच्या प्रवासात चेहरेपट्टीमध्ये अत्यंत विविधता आढळली. थोडीशी पठाणी छटा, थोडी मंगोलियन, थोडी चिनी छटा असलेले व रंगानेही गोरे, कमी गोरे असे लोक भेटले. अर्थातच काश्मीरचं आगळेवेगळं स्थान व भौगोलिक- ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यास कारणीभूत आहे. ह्या सर्वांमध्ये स्थानिक भाषेमध्येही विविधता होती. परंतु विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो, बोललो, त्यांना हिंदी पुष्कळ नीट बोलता येत होती व समजत होती. उच्चारांची ढब वेगळी होती, परंतु उच्चार स्पष्टपणे कळत होते, संवाद होत होता. हिंदी भाषेला मानलं पाहिजे..... प्रचंड मोठ्या प्रदेशात ती बोलली जाते..... हा एक सुखद अनुभव होता. कदाचित काश्मीरप्रमाणेच हिंदी भाषासुद्धा भारत व पाकिस्तान ह्यांना जवळ येण्यास मदत करू शकेल......

श्री. हसन भेटले व त्यांच्यासह दल सरोवरासमोरच्या नत्थू हॉटेलात नाश्ता केला. त्यांनी माहिती दिली की, श्रीनगर- सोनामार्ग रस्त्यावर जाता येणार नाही, कारण तिथे टॅक्सीवाल्यांनी बंद पुकारला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलेली होती. त्यामुळे आम्हांला आमचा दल सरोवर पाहून लगेच सोनामार्गला निघण्याचा प्लॅन बदलावा लागणार होता. गुलमर्ग (श्रीनगरच्या पश्चिमेस सुमारे ५० किमी) इथे जावं का, विचारलं तर नको म्हणाले. कारण बंद सुरू झाल्यामुळे वातावरण काहीसं तणावाचं होतं व रस्त्यावरही ट्रॅफिक बंद होती. त्यामुळे आम्हांला श्रीनगरमध्ये मुक्काम वाढवाला लागणार होता.

इथल्या पद्धतीप्रमाणे बाहेरील टॅक्सी/ वाहन स्थानिक परिसर दाखवू शकत नाही. श्री. हसन लेहवरून आले होते, त्यामुळे स्थानिक दर्शनासाठी त्यांची गाडी आम्ही नेऊ शकत नव्हतो. म्हणून मग रिक्षाने फिरायचं ठरलं. टॅक्सीपेक्षा त्याचा रेट कमी पडला असता. आमच्या हॉटेल अझिझपासून समोरच दल सरोवर होतं आणि तिथे अनेक शिकारा स्टँड होते. शिका-यातून आत्ताही फिरू शकत होतो, पण खरी मजा संध्याकाळी फिरण्यात होती, म्हणून मग तोपर्यंत शहरातले गार्डन्स फिरावेत असं ठरवलं. तिथेच रिक्षा शोधण्यास सुरुवात केली. श्रीनगरमधल्यावातावरणाची झलक दर्शवणारा एक प्रसंग. दल सरोवराला लागून असलेल्या रस्त्याच्या फूटपाथवर एक आक्रमक जमाव फिरत होता. त्यातल्या तरुणांची परस्परांमध्येच वादावादी चालली होती. काही लोक बरेच तापलेले दिसत होते. चेह-यानेही फार बरे दिसत नव्हते. आमच्याजवळ तो जमाव येऊ लागला, तसे आम्ही रस्ता क्रॉस करून दुस-या बाजूला जाऊन थांबलो व रिक्षा बघण्यास सुरुवात केली. लवकरच एक जण मिळाला.

रिक्षामधून दल सरोवराच्या समोरच्या रस्त्यावरूनच निघालो. सरोवराला लागूनच रस्ता जात होता. ते वातावरण, तो अनुभव शब्दात सांगणं किंवा फोटोतूनही दाखवणं खरंच शक्य नाही. रिक्षात बसल्यावर दोन सुखद धक्के बसले. एक तर रिक्षामध्ये एफएमवर गाणं चालू होतं. श्रीनगरमध्ये एफएम आहे, हा धक्का होता. आणि विशेष म्हणजे दल सरोवरातच शूट झालेलं मिशन काश्मीरमधलं गाणं होतं!

दल सरोवर वाटलं होतं त्यापेक्षा बरंच मोठं आणि लांब पसरलेलं होतं. श्रीनगरही तसं मोठंच आहे. सरोवराच्या काठावरून बरंच लांब पुढे आल्यावर एका डोंगराकडे रस्ता वळाला. अत्यंत पॉश परिसर होता. तिथून पुढे मग वेगवेगळे उद्यान होते. चश्मशाही उद्यान, परिमहल उद्यान इत्यादि. काही ठिकाणी सुरक्षा तपासणीही होत होती. परिसर अत्यंत शांत होता. ढग आणि निळं आकाश. वातावरण नेहमीसारखंच होतं. अगदी पहाटेही फार थंडी नव्हतीच.

परिमहल अत्यंत देखणं उद्यान आहे. ह्या उद्यानातले काही फोटो इथे बघता येतील. उंच डोंगरावर आल्यामुळे खाली श्रीनगर शहर व दल सरोवर दिसत होतं. लांबवर हजरतबाल दर्गा होता. परिमहल उद्यान नावाप्रमाणेच प-यांचा महाल म्हणून प्रसिद्ध होता. काही जुन्या वास्तू आणि उत्तम प्रकारे जतन केलेलं उद्यान होतं. भरपूर झाडं, हिरवळ आणि अत्यंत मोहक फुलं. बरेच भारतीय आणि विदेशी पर्यटक होते. दरवाजावर सैनिकही होते. उद्यानाच्या मागे अजून उंच डोंगर होता. उन्हाळ्यात इथे बर्फ नसतो. उन्हाळ्यात बर्फ सोनामार्ग किंवा सोनमर्गपासून पुढे दिसतो.

परिमहल बघितल्यानंतर खाली येताना एक छोटं भवानी देवीचं मंदीर लागतं. ते बघून पुढे निघालो. चश्मशाही (बॉटनिकल) उद्यान पाहिलं. रिक्षाच्या ड्रायव्हरसह सहज बोलताना विचारलं की जम्मु- श्रीनगर रस्त्यावर डोंगरात आत राहणारे लोक कोण होते, तर तो म्हणाला, ते गुज्जर होते. त्याने सांगितलं, की ते अत्यंत काटक व शक्तिशाली असतात. दुसरं उद्यानही तसंच होतं. उद्यानात मोठे मोठे चिनार वृक्ष होते. तसेच वृक्ष जवळच्या डोंगरावर दिसत होते. परिसर खूपच शांत होता. छोटसं तळं होतं व त्यात नावेचीही सोय होती. परंतु आम्हांला बघायचं होतं ते दल सरोवर.... 

उद्यान बघून परत दल सरोवरावरून अजिझ हॉटेलजवळ आलो. हॉटेलमध्ये जेवून परत आलो. बरीच हॉटेल्स रोजामुळे बंद होती, त्यामुळे थोडं फिरावं लागलं. गेल्या २६ जानेवारीला व खरं तर नेहमीच चर्चेत असलेल्या लाल चौकासारख्या भागातून फिरून आलो. दुपार होऊन गेली होती. ऊन चांगलंच होतं. थोडा आराम करून दल सरोवरावर जायचं ठरवलं.  

जम्मु- श्रीनगर प्रवासात असताना सैनिकांसोबतच्या भेटीसाठी श्रीनगरमधल्या एका कर्नलना फोन केला होता. त्यांनी आधी बरेच प्रश्न विचारले, की आम्ही कोण आहोत, पत्रकार आहोत का? कोणत्या संस्थेकडून येत आहोत? कशासाठी येत आहोत? आम्हांला सैनिकांसोबत काय काय करायचं आहे? मग त्यांना सांगितलं होतं, की आम्ही काश्मीर बघण्यासाठी, इथल्या लोकांना व सैनिकांना अनौपचारिकरित्या भेटण्यासाठी येत आहोत, सैनिकांना राख्या व फराळ देणार आहोत. मग ते म्हणाले होते, की श्रीनगर राजधानी व अत्यंत संवेदनशील शहर आहे, इथे सुरक्षा अत्यंत कडक असते. त्यामुळे इथे परमिशन काढणं आणि भेटणं आम्हांला व त्यांनाही जड गेलं असतं. तेव्हा मग श्रीनगरमध्ये ही भेट करण्याच्या ऐवजी पुढे- द्रास युद्ध स्मारकमध्ये करायचं ठरलं. रेल्वेत भेटलेल्या काकांनी दिलेला इशारा आठवतच होता.

संध्याकाळी ५ वाजता दल सरोवर बघण्यासाठी निघालो. हा अनुभव अत्यंत अविस्मरणीय होता. खरोखर अद्भुत होता. दल सरोवर तर रमणीय आहेच. परंतु तिथले शिकारे, हाऊसबोटी आणि बाजारही तितकेच सुंदर होते. शिका-यामध्ये बसून निघालो. शिकारा म्हणजे सहा- सात जण बसू शकतील इतकी होडी असते. वल्ही वल्हवतच ती चालवतात. नावाडी हाच गाईड असतो. आम्हांला मिळालेला नावाडी- यासीन छान सांगत होता. सरोवरात अनेक शिकारे दिसत होते. पलीकडच्या बाजूला हाऊसबोटी आणि सरोवरावरचे तरंगते बाजार व शेतसुद्धा होते. 


थोडं अंतर गेल्यावर बाजूला एक शिकारा आला व दल सरोवरातलं मार्केटिंग सुरू झालं! त्याच्याकडच्या दागिन्यांसारख्या हस्तकलेच्या वस्तु तो दाखवत होता. त्याचवेळी नावाडी आम्हांला दल सरोवराचा इतिहास सांगत होता. हे सरोवर प्राचीन काळी पंडित लोकांनी वसवलं. असं म्हणतात की पंडित लोक जेव्हा आले, तेव्हा त्यांनी जवळच्याच मंदिराचं दर्शन घेतलं व सरोवरात सोन्याच्या मोहरा अर्पण केल्या. असं सांगून त्याने आम्हांला शंकराचार्यांचं मंदीर दाखवलं. ते तर आमच्या हॉटेलच्या मागेच होतं. 


दल सरोवराला एक चक्कर मारली, सरोवरामध्येच नेहरू गार्डन होतं. हाऊसबोटी पाहिल्या. हाऊसबोटी एका जागी स्थिर असतात, त्या फिरत नाहीत. लहान मोठ्या व सर्व दरामध्ये त्या उपलब्ध होत्या. नंतर सरोवरातले बाजार पाहिले.

सरोवरातच एका ठिकाणी शालींचं व हँडलूमचं दुकान होतं. भरपूर प्रकारच्या शाली, अंगरखे व हँडलूम त्यात होते. विशेष म्हणजे त्यामध्ये डेबिट कार्डाद्वारे पैसे देण्याची सोय होती.....

दल सरोवरात त्यानंतर आणखी काही दुकानं पाहिली. काही ठिकाणी शेती केलेली होती व भाज्या लावलेल्या होत्या. अत्यंत विस्तृत मार्केट तिथे होतं. आणि सर्व व्यवहार एकमेकांशी जोडलेला होता. Inter- dependent  आणि sustainable असं ते वाटत होतं. म्हणजे तिथल्या हाऊसबोटीत जायचं तर ते शिका-यामधूनच. सरोवरावरच्या उद्यानांवर फिरायचं तर तेही शिका-यामधून. असं एकमेकांना जोडून ते चालतं. आणि यंत्र, कारखाने इत्यादि नसल्यामुळे ब-याच प्रमाणात प्रदूषणमुक्त आणि शाश्वत आहे. सुंदर बाजारपेठेचं उदाहरण आहे. आसपासच्या लोकांसाठी रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटनाचा व विदेशी पर्यटकांचा झंझावात असूनही ब-याच प्रमाणात साधं व स्वस्त वाटलं.

हिवाळ्याच्या पाच- सहा महिन्यांमध्ये (नोव्हेंबर ते एप्रिल साधारण) ह्या लोकांना दुसरा व्यवसाय शोधावा लागतो. कारण अत्यंत हिवाळ्याच्या काळात इथले व्यवहार ठप्प होतात. श्रीनगरमध्ये बर्फ पडतो, तपमान शून्यच्या खाली उतरतं. नावाडी सांगत होता, की दल सरोवर गोठतं व बर्फाचा पातळ थर तयार होतो. तो म्हणाला, आधीच्या काळात बर्फ अधिक घट्ट होत होता. इतका बर्फ, की त्यावर लोक तर चालायचेच, पण दुचाकीसारखं वाहनही जाऊ शकायचं. पण सध्या जागतिक तपमानवाढीमुळे किंवा काश्मीरमधल्या शस्त्रांच्या वापरामुळे वाढलेल्या तपमानामुळे तितका घट्ट बर्फ जमा होत नाही........

संध्याकाळचं दिव्यांच्या प्रकाशातलं दल सरोवर मनात अनुभवत व साठवत परत आलो. हॉटेलच्या समोरच शिकारा स्टँड होता, तिथेच उतरलो. अत्यंत स्मरणीय क्षण. हॉटेलच्या मागे शंकराचार्य मंदीराचा दिवा दिसत होता. श्रीनगरच्या बरोबर मध्यभागी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे तो आहे................

संध्याकाळी श्री. हसनजींसोबत बोलणं झालं व त्यांनी सांगितलं, की टॅक्सीवाल्यांचा संप मिटला आहे व उद्या सकाळी निघता येईल. सकाळी सहा वाजता निघायचं ठरलं.

दुपारचं जेवणच भारी झाल्यामुळे रात्री जेवण्याच्या भानगडीत पडलो नाही. हॉटेलच्या आसपास थोडं फिरलो. ते वातावरण मनात साठवण्याचा प्रयत्न करत होतो... अप्रत्यक्षपणे मनाने चिमटा काढत होतो, की आम्ही श्रीनगरमध्ये आहोत....

झोपताना पुढच्या प्रवासाचे विचार चालू होते. उद्या सकाळी लवकर निघून कारगिलपर्यंत पोचायचं होतं. वाटेत सर्व अत्यंत उंचीचा व घाटाचा रस्ता होता, ३३०० मीटर्स उंचीचं व जगातलं दुसरं थंड हवेचं ठिकाण द्रास लागणार होतं. हा प्रदेश असा आहे, की ब-याच जणांना इथे येताना त्रास होतो. अनेक जणांना तर इतका त्रास होतो, की लगेच कमी उंचीच्या ठिकाणी जावं लागतं. शरीराला वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. अर्थात आमची उंची टप्प्याटप्प्यानेच वाढत होती व श्रीनगरमध्ये ब-यापैकी आरामही करता आला होता. तरीसुद्धा मनात एक चिंता होतीच. आणि जम्मु- श्रीनगर रस्त्यावरच त्रास झाला होता, पुढे काय होईल, ही भितीसुद्धा होती....

परंतु ह्या सर्वांपेक्षा श्रीनगरमध्ये आहोत, ही भावना सर्वांत प्रबळ होती आणि अजूनही ही जाणीव, ते क्षण एक चेतना देऊन जातात......


पुढील भाग: कारगिलच्या दिशेने......

2 comments:

  1. यापूढे काश्मिरला जाऊ इच्छिना-या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ब्लॉगमधून मिळत आहे. चांगले वर्णन. तसेच फोटोही छान आहेत. फक्त एकच काश्मिरमध्ये सूंदर फूलांच्या समोर लग्न झालेल्या व्यक्तीनं एकट्याने फोटो काढणे हे पातक आहे.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!