Saturday, November 12, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ९

दिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा

जम्मु- काश्मीरमध्ये सेनादलांना असलेला विशेष अधिकार कायदा मागे घेण्यावरून चर्चा होत असताना व नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानने अधिक शस्त्र गोळा करून ठेवलेली असताना भ्रमणगाथेतला पुढचा भाग लिहितोय. मनात राहून राहून विचार येतो, की आम्ही पाहिलेल्या काश्मीरमध्ये आत्ता नक्की कशी परिस्थिती असेल? ते वातावरण, तिथली दाहकता ह्यांचा आम्हांला अनुभव असा आलाच नाही. तसंच तिथली थंडी. आता तर काश्मीरमध्ये फार मोठ्या परिसरात बर्फ पडतोय व ब-याच भागांमधलं दळणवळण ठप्प पडलं आहे.........

चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी हुंदरमध्ये एकाच वेळी वाळवंट, समुद्र, पहाड, नदी, बर्फ इत्यादि अविष्कारांचा अनुभव घेऊन हॉटेलमध्ये गेलो. हुंदर हे गाव लहानसं असलं तरी पर्यटनामुळे व सेनेमुळेसुद्धा टापटीप दिसत होती. विदेशी पर्यटकांचा ओघ सतत सुरू असल्यामुळे रस्ते, वसाहती, हॉटेल व्यवस्थित होते. हा परिसरच फार आल्हाददायक होता. एकदा खार्दुंगला ओलांडून नुब्रा खो-यात आल्यानंतर सर्व कमी उंचीचा पठारसदृश भाग आहे. इथली उंची ३१४४ मीटर्स म्हणजे लेहपेक्षासुद्धा कमी आहे. इतक्या पर्वतमाथ्यांवरून गेल्यानंतर उंची काहीच वाटत नव्हती.

आम्हांला पंधरा ऑगस्ट सेनेच्या कार्यक्रमामध्ये साजरा करायचा होता. पनामिकला जाताना भेटलेल्या सेनेच्या जवानांकडे चौकशी केली होती. तेव्हा ते बोलले होते, की हुंदरमध्ये सेनेच्या कँपवर आम्ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आमचे ड्रायव्हर हैदरभाईंनी त्याची चौकशी केली व आणखी माहिती मिळवली. तिथे त्यांना कळालं, की इथे आर्मीचे युनिटस तर आहेत; पण ते त्यांची परेड प्रत्येकाच्या युनिटमध्ये आतच करतात व ती सार्वजनिक नसते. त्यामुळे आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हतो. म्हणून मग पंधरा ऑगस्टला दिस्कित गावातल्या एका प्रमुख सरकारी शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये जायचं ठरलं.

हुंदरमधली रात्र...... थंडी तर होतीच..... पण शांतता आणि प्रसन्नता..... एका आगळ्यावेगळ्या ठिकाणी असल्याचा अनुभव व भारताच्या उत्तर सीमेच्या जवळ असल्याचा अनुभव.......... १४ ऑगस्टला श्रीनगरमध्ये काय परिस्थिती असेल, ह्याचा विचार मनात येत होता. १५ ऑगस्टपेक्षा श्रीनगर व काश्मीर खो-यातल्या लोकांना १४ ऑगस्टचंच महत्त्व अधिक.......

दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता दिस्कितमधल्या शाळेत पोचायचं होतं. रात्री थंडी होती; पण शांत झोप लागली. सकाळी लवकर उठून आसपासचा परिसर बघितला... सर्वत्र डोंगर आणि मध्ये मध्ये बर्फ..... अद्भुत नजारा होता. जरी हा काहीसा सपाट भाग असला; तरीही पहाड लागूनच होते. अद्भुत नजारा......


आमचं हॉटेल आणि मागे दिसणारी उंच झाडं आणि पर्वत



आमचं हॉटेल




हुंदरपासून दिस्कित जवळच; त्यामुळे आरामात निघालो. इथले हॉटेलवालेही खूप चांगले होते. सर्व सेवा उत्तम होती. तिथे विदेशी पर्यटकही दिसत होते. हवामान किंचित ढगाळ होतं. रस्त्यावर सगळीकडे शाळेत जायला निघालेले मुलं दिसत होते. त्यातले बरेच जण लिफ्टही मागत होते. पुढे काही विद्यार्थ्यांना हैदरभाईंनी गाडीत घेतलं. त्यांची बोलीभाषा वेगळीच होती; पण त्यांना हिंदीसुद्धा नीट समजत होती. ध्वजारोहण कार्यक्रमाची जागा हैदरभाईंनी त्यांना विचारून घेतली. लवकरच त्या ठिकाणी पोचलो. रस्त्यावर सर्वत्र विद्यार्थ्यांची वर्दळ दिसत होती.

कार्यक्रमासाठीची जागा मोठी होती; जिल्हा पातळीवरील सरकारी शाळा असल्यामुळे ब-यापैकी पटांगण व इमारत होती. आम्ही पोचलो तेव्हाच तिथे बरेच लोक जमले होते; विद्यार्थी येऊन बसत होते व बरेचसे सादरीकरणाची तयारी करत होते. एका शिक्षकांच्या सांगण्यावरून आम्ही स्टेजच्या जवळच्या खुर्च्यांमध्ये बसलो. मनात उगीचच भिती वाटली, की आम्हांला स्टेजवर बोलावतील की काय.

कार्यक्रम सुरू होण्यास बराच वेळ होता. हळुहळु लोक जमत होते. इतर शाळांमधले विद्यार्थी येत होते. गर्दी वाढतच होती. मग हळुहळु कार्यक्रमाआधी देशभक्तीची गाणी सुरू झाली; मधून मधून निवेदन.... देशामध्ये इतर ठिकाणी जसा होत सोहळा असेल, तसाच इथेही होत होता. काहीच फरक नाही. उलट इथे तर लोकांचा, विद्यार्थ्यांचा उत्साह कितीतरी जास्त दिसत होता. ह्याचं एक कारण हे असावं, की इथे इतर फारसे सार्वजनिक कार्यक्रम होत नसावेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकांसाठी विशेष होता.


कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असलेली दिसते




कार्यक्रमासाठी येणारे लोक


प्रमुख पाहुणे, जिल्ह्यातील प्रमुख सरकारी अधिकारी, सेनेतील अधिकारी हे आल्यावर कार्यक्रम सुरू झाला. एनसीसीच्या कॅडेटस व अधिका-यांनी सफाईदार आणि सैनिकी आवाजात सूचना दिल्यानंतर परेड व राष्ट्रगीत सुरू झालं. सर्व लोक उभे राहिले. कार्यक्रम बघण्यास पोलंडच्या पर्यटकांचा एक मोठा समूह आला होता; तेसुद्धा राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिल्याचं बघून बरं वाटलं. बरेचसे जण म्हणतही होते. राष्ट्रगीतानंतर मानवंदना देण्याचा कार्यक्रम झाला. सर्व एनसीसी व इतर विद्यार्थी कोअर्सनी परेड दिली. त्यानंतर मग दोन- तीन भाषणं झाली. निवेदनाची भाषा लदाखी, उर्दू आणि हिंदी होती. भाषण करणारे केंद्रीय प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे त्यांचं हिंदी चांगलं होतं.


एकसाथ परेड शुरू करेंगे शुरू कर......








भाषणं चालू असतानाच आमच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध लदाखी गृहस्थांनी आम्हांला एक माहिती दिली, की कुठेतरी मोठा अपघात (हादसा) होऊन कित्येक लोक ठार झाले व त्यामुळे हा कार्यक्रम खूप कमी प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. त्यांना हिंदीत नीट सांगता येत नव्हतं. कार्यक्रमामध्येही ह्याची घोषणा लदाखीमध्ये केली गेली होती; पण ती समजू शकली नाही. कुठे तरी मोठा अपघात/ दुर्घटना झाली, इतकंच आम्हांला समजू शकलं.

भाषणामध्ये नेहमी असतात त्याच गोष्टी होत्या. काश्मीरमुळे वेगळं काही असेल, असं वाटलं होतं, पण तसं नव्हतं! लदाखमध्ये खरोखर फुटिरता कुठेच आढळली नाही. देश कसा स्वतंत्र झाला, आज देश व आपण स्वातंत्र्यामध्ये कसे प्रगती करत आहोत, सेना देशाचं व आपलं रक्षण कसं करते आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, अशा दिशेची भाषणं झाली.

“दूध मांगेंगे तो खीर देंगे; कश्मीर मांगेंगे तो चीर देंगे...”

हा उल्लेख भाषणात ऐकून बरं वाटलं. तरी मनामध्ये नकळत श्रीनगरमधल्या अशा कार्यक्रमांबद्दल वाचलेलं व ऐकलेलं आठवत होतं.

पुढे विद्यार्थांच्या सादरीकरणास सुरुवात झाली. अत्यंत सुंदर व आकर्षक परफॉर्मन्स होते ते! विशेष म्हणजे जे जे परफॉर्मन्स झाले; त्यामध्ये असलेले सर्व गट तिरंगी राष्ट्रध्वज आपल्या पोशाखामध्ये व सादरीकरणामधून दर्शवत होते! सादरीकरणामध्ये देशभक्तीच्या गीतांवर नृत्य, गांधीजींचा प्रसंग, लोककला व लोकनृत्य इत्यादि प्रमुख होते. सादरीकरण करणा-यांमध्ये बहुतांश मुलीच होत्या. मुलांचा समावेश असलेलं सादरीकरण ब-याच उशीरा करण्यात आलं.












तोपर्यंत जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त लोक तिथे जमले होते. शाळेच्या प्रवेशदाराच्या बाहेरही कित्येक लोक उभे राहून बघत होते. सर्वत्र जल्लोष आणि उत्स्फूर्त उत्साहाचं वातावरण होतं. ‘छोडो कल की बाते’ ह्या गाण्यावर केलेलं सादरीकरण विशेष लक्षात राहिलं. ह्या गाण्याचे तीन कडवे माहीत होते; पण तिथे अजून दोन कडवे असलेलं गाणं आकर्षक प्रकारे सादर केलं. मुलांमध्ये कमालीचा उत्साह होता. हे ह्या काही क्षणचित्रांवरून कळून येईल.

इतके सुंदर परफॉर्मन्स चालू होते व वातावरण इतकं उत्साही होतं, की जावंसं वाटतच नव्हतं. सतत लोक येत होते व कार्यक्रम बघत होते. आपल्याइथल्या पद्धतीच्या विपरित इथे प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त जवळजवळ प्रत्येकाला चहा व नाश्ता देण्यात आला. पोलिश पर्यटकही थांबून कार्यक्रम बघत होते.


कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दिसणारे पर्वत............... शब्दातीत......




गांधीजींचा प्रसंग साकारताना विद्यार्थी!


बराच वेळ कार्यक्रम बघितल्यावर उशीर होईल, असे वाटल्याने इच्छेविरुद्ध उठावं लागलो. गेटजवळ आल्यावर हैदरभाई भेटले; ते आमचीच वाट पाहत होते. अखेरीस तो सोहळा अर्धाच सोडून आम्ही दिस्कितमधून निघालो..........

प्रवास आधी आलो होतो; त्याच मार्गाने होता. दिस्कितहून विराट बुद्धमूर्तीच्या जवळून श्योक नदी- पात्रालगत जाणा-या रस्त्याने खालसरच्या दिशेने निघालो. अफाट परिसर होता तो. जणू ख-या विश्वापासून लांब आम्ही एका वेगळ्याच विश्वामध्ये संचार करत होतो. वाटेत एका ठिकाणी वाहनं किंचित अडकली होती. तिथे इतर ड्रायव्हर्सना हैदरभाईंनी हवामानाबद्दल विचारलं. हवामान फारसं ठीक नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लेह- मनाली रस्त्यावर हिमाचल प्रदेशमध्ये एका ठिकाणी एका मिनी बसला अपघात होऊन तिथल्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी जात असलेले लदाखचे २१ कलाकार मृत्यूमुखी पडले, ही माहितीही मिळाली. ह्यामुळेच स्वातंत्र्य सोहळ्यानंतरचा कार्यक्रम मर्यादित ठेवण्यात आला आणि हेही कळालं, की लेहमध्ये तर स्वातंत्र्य सोहळा फारच मर्यादित प्रमाणात झाला.



खार्दुंगला ओलांडण्यासाठी घाई केली पाहिजे, असं हैदरभाईंनी सांगितलं व आम्ही पुढे निघालो. नदीच्या पात्रातून व वाळवंटातून जाणा-या रस्त्याने खालसरपर्यंत आलो व तिथून परत खार्दुंगच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवण करून घेतलं. आलू पराठा उत्तम मिळाला. आता सरळ सत्तर किमी घाटाचा व चढाचा रस्ता होता. वाहनं फारशी लागत नव्हती. नुब्रा खोरं आणि श्योक नदी मागे व खाली लांब राहिली. हळुहळु आमची उंची परत वाढत चालली. खार्दुंग आलं. पुढे नॉर्थ पुल्लूला तपासणीसाठी थांबलो. बर्फाळ हवा व थंड वा-यामध्ये रस्त्यावर थोडं फिरत होतो. एक जण बुलेटवरून खार्दुंगला ओलांडून नॉर्थ पुल्लूमध्ये आला. तपासणीसाठी त्याने गाडी स्टँडवर लावली आणि तो सरळ कोसळला!! लगेचच आसपासचे लोक तिथे धावले व त्याला उचलून घेतलं. हवामान खराब होतं व त्यामुळे त्याला आणखीनच त्रास झाला. शिवाय ऑक्सीजन कमी असल्यामुळेसुद्धा चक्कर आली.

त्यावेळी आम्हांला कळालं; की बाईकवरून लदाखच्या अतिदुर्गम भागात जाण्याची आमची योजना किती अशक्यप्राय होती. ज्याप्रमाणे हिमालयामध्ये मध्यम उंचीच्या शिखरांवर मोहीम करताना स्थानिक शेर्पा, गुरखा लोकांची किंवा खेचरांची, तट्टांची मदत घ्यावी लागते; त्याप्रमाणे बाईकवर इथे यायचं असेल, तर स्थानिक लोकांना सोबत घेऊनच यायला हवं हे जाणवलं. कारण त्याशिवाय कोणत्याच प्रकारे टिकाव लागणं शक्य नाही, हे दिसत होतं. म्हणजे रस्ता अतिदुर्गम होता, असं नाही. रस्ता त्या मानाने कितीतरी चांगला होता. शक्य त्या सर्व ठिकाणी उत्तम स्थितीत होता. रस्त्यापेक्षाही सर्वसाधारण परिस्थिती, ऑक्सीजनची कमतरता; सततच्या प्रवासाचा व भौगोलिक फरकाचा ताण, बर्फामुळे व उंचीमुळे होणारा परिणाम, वाटेमध्ये मॅकेनिक किंवा दुरुस्ती करणा-यांची अनुपलब्धता हा विचार केला तर बाईकवर यायचं असेल, तर आठ- दहा जणांचा गट तर असलाच पाहिजे व त्यामध्ये किमान दोन जण स्थानिक मार्गदर्शक असलेच पाहिजेत, असं प्रकर्षाने जाणवलं.............

नॉर्थ पुल्लूनंतर खार्दुंगला!!! थोडा वेळ थांबलो. सर्वत्र बर्फ होता........ बर्फाचं राज्य.......... काही क्षण तो अनुभव मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग निघालो..... जाताना सेनेचे ट्रक्स दिसतच होते. उतरताना एक गोरा विदेशी पर्यटक सायकलवर जाताना दिसला. अंगठ्यानेच त्याला ‘बेस्ट लक’ची खूण केली. त्याने हसून उत्तर दिलं. वाटेत हवामानाचा त्रास न होता खार्दुंगलावरूनचा प्रवास ‘चांगला’ झाला.





खार्दुंगला: एका विशेष जगाचं प्रवेशद्वार.....

साउथ पुल्लूवर थोडावेळ थांबलो. थंडी व बर्फ अजूनही होता. पण ह्यावेळी फार त्रास झाला नाही. आरामातच प्रवास पार पडला. लवकरच लेहच्या जवळ आलो. संध्याकाळी पाचच्या आसपास लेहमध्ये प्रवेश केला. इथेही एक गंमत झाली. लवकर जाण्यासाठी हैदरभाईंनी एका नो एन्ट्री असलेल्या रस्त्याने गाडी नेली. पण पोलिसाने पकडून सरळ चावी घेतली. शेवटी करगिलहून आलो आहोत असं सांगून दादा बाबा करत कशी तरी किल्ली परत घेतली व निघालो.

हॉटेलवर जाऊन थोडा आराम केला; इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आलो. देशभरातल्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमांच्या बातम्या पाहिल्या. त्याचवेळी आधी ऐकलेल्या लेह- मनाली रस्त्यावर केलाँगजवळ झालेल्या अपघाताची बातमी बघायला मिळाली.

हॉटेलवर गेलो तेव्हा तिथे हसनजी आले होते. त्यांनी आम्हांला बरीच माहिती दिली. मनाली रस्त्यावरचा तो अपघात बराच मोठा होता. लदाखहून कलाकारांचं एक पथक हिमाचल प्रदेशामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होतं. त्यांच्या गाडीला केलाँगजवळ अपघात झाला आणि २१ कलावंत मृत्युमुखी पडले होते. लदाखच्या युवा कलाकारांपैकी ते होते; त्यामुळे सर्वत्र हळहळ वाटत होती.

हसनजी पुढे म्हणाले, की ह्या अपघातानंतर लेह- मनाली रस्ता धोकादायक झाल्यामुळे तिथली वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे लेह- मनाली रस्ता बंद झाला आहे. आमचा परत जाण्याचा हाच रस्ता होता!! अर्थात परत जाण्यासाठी अजून एक दिवस होता. आमचा पुढच्या दिवशीचा कार्यक्रम पेंगाँग त्सो सारख्याच त्सो- मोरिरीला जाणे हा होता. आणि तिथला रस्ता अजून तरी चांगला होता. तिथून परत आल्यावर आमचा परतीचा लेह- मनाली रस्ता व हवामान कसं असेल, ह्याची माहिती घेऊन आमचा परतीचा प्रवास ठरणार होता. आम्ही त्सो मोरिरीला जाऊन येईपर्यंत सर्व माहिती व अपडेट घेऊ आणि मग तेव्हाची परिस्थिती बघून आमचा परतीचा प्रवास ठरवू, असं हसनजी म्हणाले.

लेहमध्ये थोडंसं फिरलो आणि दुस-या दिवशी त्सो मोरिरीला जाण्याच्या विचारात झोपलो. मनामध्ये अर्थातच आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी होत्या. देशाच्या इतक्या टोकाच्या भागामधल्या लोकांची देशभक्ती बघून धन्य धन्य वाटत होतं.... अर्थात, लदाखच्या कलाकारांचा अपघात, बिघडलेलं हवामान आणि बंद झालेला रस्ता ह्यामुळे “लदाख” किती खडतर आहे, हेही जाणवत होतं. लोकांचं राहणीमान किती खडतर किंबहुना असुरक्षित आहे, बिकट आहे, हे जाणवत होतं. लेह- मनाली रस्ता बंद झाला असता; तर आम्हांला लेह- श्रीनगर रस्त्याने; म्हणजे आलो तसंच परत जावं लागलं असतं.

लदाख...... आता चलो त्सो मोरिरी.......








क्रमश:
पुढील भाग: त्सो मोरिरीच्या आसमंतात.....

1 comment:

  1. लिखानाच्या शैलीवर मतभेद असतील..पण लेखकाची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्तीही दांडगी आहे. त्यामुळेच अशा प्रकारची सविस्तर भागांची महामालिका लिहणे शक्य झाले.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!