Friday, December 30, 2011

झेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन

झेपावे जरा उत्तरेकडे!
भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन


हिवाळा ऋतु सध्या शिखरावर आहे. डिसेंबरचा शेवट आणि जानेवारी म्हणजे संपूर्ण देशभर थंडीची लाट मध्य व दक्षिण भारतामध्ये जरी ही थंडी काहीशी सुसह्य असली, तरी उत्तर व उत्तरेकडच्या पहाडी भागांमध्ये बरीच जास्त असते. अशाच उत्तराखंडच्या काही भागात कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.

उत्तराखंड! पूर्वीच्या उत्तर प्रदेशातला उत्तरेचा भाग, नंतर उत्तरांचल म्हणून व आता उत्तराखंड म्हणून ओळखला जाणारा पहाडी भाग! देवभूमी किंवा योगी लोकांची भूमी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध. आणि अर्थातच धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र प्रदेश. इतका पवित्र की पूर्वीच्या काळी गावातून कोणी हृषिकेश, हरिद्वार किंवा गंगोत्री अशा ठिकाणी जाऊन आले तर त्यांचं दर्शन सर्व गाव घेत असे. पर्यटकांसाठी हा प्रदेश म्हणजे नंदनवनच. कारण जिकडे पहावे तिकडे हिमालयाचा रमणीय नजारा! त्यामुळेच कित्येक हिंदी चित्रपटांचं (विशेषत: जुन्या) चित्रीकरण इथेच झालं. असा हा प्रदेश भूराजकीय दृष्टीनेसुद्धा अत्यंत मोक्याचा प्रदेश, कमालीचा महत्त्वाचा प्रदेश. नेपाळ व चीनव्याप्त तिबेट लागूनच आहे. त्यामुळे सेनेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा. चीनच्या कारवाया पूर्वांचल व काश्मीरप्रमाणेच इथेही छुप्या पद्धतीने सुरू असतात. शिवाय मानससरोवराला जाणारा भारतीय यात्रेकरूंचा एक मार्ग इथूनच जातो. इथला निसर्ग, जैव विविधता तर अद्भुतच. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान काय किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स काय, सर्वच एकदम विशेष.... असा हा सर्वच दृष्टीने अत्यंत विशेष व अद्वितीय प्रदेश.
पिथोरागढमधला सूर्योदय

दिल्लीमार्गे तिथे जाताना ह्या सर्व गोष्टी आकर्षित करत होत्या. उत्तराखंड ब-याच प्रमाणात पहाडी असल्यामुळे रेल्वे पायथ्यापर्यंतच म्हणजे मर्यादित ठिकाणीच जाते. तिथून पुढे बस, टॅक्सी अशा साधनानेच जावे लागते. दिल्लीहून नैनितालजवळ काठगोदाम इथे रेल्वे जाते. तेच रेल्वेचं त्या भागातलं टोकाचं स्टेशन आहे. कुमाऊं प्रदेशाचं जणू प्रवेशद्वार. काठगोदामसुद्धा विशेष आहे. ब्रिटिश काळात जेव्हा ब्रिटिशांनी व्यापारासाठी उत्तराखंडमधल्या जंगलांना तोडण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची आवश्यकता होती. जंगलातलं लाकूड दूरवर न्यायचं होतं. ह्या उद्देशाने त्यांनी शक्य तितक्या पहाडाच्या जवळ स्टेशन उभं केलं. तेच काठगोदाम! ब्रिटिश गेल्यानंतरच्या वर्षांमध्ये ह्या भागात तरी रेल्वे अजून पहाड चढू शकली नाही. शक्यताही कमीच आहे. त्यामानाने काश्मीरमध्ये अगदी श्रीनगरपर्यंत रेल्वे पोचली आहे.

२६ नोव्हेंबरच्या रात्री जुन्या दिल्लीच्या स्टेशनवरून निघून पहाटे हल्द्वानी ह्या काठगोदामच्या आधीच्या स्टेशनला उतरलो. हे मोठं गाव आहे; त्यामुळे बरेच लोक इथून पुढे पहाडात जातात. पहाटे थंडी दिल्लीपेक्षा विशेष वाटत नव्हती. स्टेशनबाहेरूनच एक जीप करून पिथोरागढच्या दिशेने प्रवास सुरू झाला....... दक्षिण मध्य कुमाऊं प्रदेशातून हा प्रवास होणार होता. अंतर १६० किमी असलं तरी सर्व रस्ता पहाडी असल्यामुळे बराच वेळ लागणार होता...

हल्द्वानीहून निघाल्यावर थोड्याच वेळात काठगोदाम स्टेशन रस्त्यावर लागतं. पुढे पर्वतीय प्रदेश सुरू होतो. नैनिताललगत असलेलं भीमताल तळ्याजवळून हल्द्वानी- पद्मपुरीमार्गे शहर फाटक ह्या मार्गाने प्रवास चालू झाला. भीमताल! इथे प्रत्येक ठिकाणी पौराणिक संदर्भ मिळतात. भीमताल अर्थातच भीमामुळे तयार झालेला तलाव! तसंच रामायणात उल्लेख असलेला संजीवनी पर्वतही कुमाऊंमध्येच आहे. पुढे लवकरच घाट सुरू झाला. पर्वतीय असला तरी रस्ता सुस्थितीत होता. हळुहळु पर्वतीय प्रदेशाच्या खुणा दिसू लागल्या. स्थानिक प्राण्यांच्या कातडीवर सपाटीवर असतात त्यापेक्षा जास्त केस होते. थंडीसाठी निसर्गाची व्यवस्था! आज माणूस कितीही वल्गना करत असला, तरी निसर्गापुढे तो नगण्य आहे. निसर्गाच्या बरोबर येण्यासाठी माणसाला निसर्गाचीच मदत घ्यावी लागते. हिमालयामध्ये अधिक उंचीवर गिर्यारोहण करणा-या लोकांना स्थानिक शेर्पा, खेचर, घोडे ह्यांचीच मदत होते. आपण थंडीत वापरतो ते स्वेटर किंवा शाली अनेक वेळेस नेपाळी लोकांकडून घेतलेल्या असतात व त्यासुद्धा विशेष थंडीच्या पर्वतीय प्रदेशातील मेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात! पर्वतीय प्रदेशात तर निसर्ग विशेष आव्हान देतो आणि आवाहनसुद्धा करतो...........


साद देती हिमशिखरे

अलीकडच्या वर्षांमध्ये पहाडामध्ये वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु तरीसुद्धा निसर्गवैभव नजरेत मावत नव्हतं. सर्वत्र हिरवी झाडी आणि मोठे होत जाणारे डोंगर दिसत होते. उंचावर करतात ती पहाडी शेती सगळीकडे दिसत होती. डोंगराच्या अनेक लेव्हल करून त्यावर पिकं घेतली जातात. लांब अंतरावरून बघताना ते आपल्याकडे डोंगरात करतात त्या समतल चरांसारखं (Continuous Contour Trench) दिसत होतं. डोंगरावरच्या शेतांमध्ये मधून मधून घरंसुद्धा दिसत होती. सर्वच डोंगराळ भाग! गावंसुद्धा लहान होती. सूचीपर्णी वृक्षही सुरू झाले. पुढे एका ठिकाणी थोड्या उंचीवर आल्यावर दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागली. अत्यंत दूरवर असला तरी तो नजारा अद्भुतच होता. ओम पर्वत, त्रिशुल पर्वत व त्या मालिकेतील अन्य पर्वत शिखरे दिसत होती. त्यांचं अंतर शंभरहून अधिक किमी होतं, परंतु ते इतक्या दुरूनही स्पष्ट दिसत होते. ओम पर्वताचा फोटो आधी पाहिला असल्यामुळे तो लगेच ओळखू आला. पुढच्या सर्व प्रवासामध्ये हे पर्वत दिसतच होते. पाच हजार मीटर्सपेक्षा ह्या पर्वतशिखरांची उंची अधिक होती, त्यामुळे ते लांबूनसुद्धा दिसत होते.


डावीकडे दिसणारा पर्वत ओम पर्वत आहे.


हे ओम पर्वताचे छायाचित्र

देखो जिधर भे इन राहों में रंग पिघलते है निगाहों मे....ठंडी हवा है, ठंडी छाँव है...वाटेमध्ये थांबत आणि नजारा बघत प्रवास सुरू होता. पुढे ड्रायव्हरने मुख्य रस्ता सोडून एक शॉर्ट कट असलेला रस्ता घेतला. त्या रस्त्याने काही किलोमीटर्स वाचतील म्हणाला. आधीच निर्जन असलेला परिसर आणखी निर्जन झाला. रस्त्याचं रूपही बदलत होतं. काही काही घाटामध्ये रस्ता पूर्ण कच्चा होता. काही ठिकाणी पायवाटेसारखा होता. बराच वेळ कच्च्या रस्त्याने प्रवास सुरू राहिला. त्यामुळे आणखी दुर्गम भाग बघता आला. वाटेत वाहन तर नव्हतंच, पण लोकसुद्धा तुरळकच भेटत होते. तेही गुरं किंवा मेंढ्या हाकणारे. एका ठिकाणी एक अवघड वळण आलं व तो घाट ओलांडला. तिथे त्या परिस्थितीची सवय नसताना वाहन चालवणं थोडं अवघडच आहे. रस्ताही सरळ नव्हताच.


ही पर्वतीय शेती. लांबून काहीशी समतल चरांप्रमाणे (Continuous Contour Trench) दिसते.
बराच वेळ कच्च्या रस्त्याने पुढे आल्यावर एका ठिकाणी मात्र दुसरा पक्का रस्ता येऊन मिळाला. तो अल्मोडा- पिथोरागढ मार्ग होता. अल्मोडा गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद इथे आले होते व इथे मायावती आश्रम आहे. अर्थात तसं पाहिलं तर सर्व उत्तराखंड किंवा हिमालयच योगी लोकांचं निवासस्थान आहे. इथे दन्या गावाजवळ चांगलं हॉटेल होतं. महामार्गावर असलं तरी साधं व चांगलं होतं. पर्यटनाच्या लाटेमध्येही असा साधेपणा ब-याच ठिकाणी टिकून आहे.

इथून पिथोरागढ जवळ म्हणजे सुमारे पन्नास किमी होतं. रस्ता पक्का असला तरी पहाड होता व उंची वाढली असल्यामुळे वेळ लागतच होता. उंचच उंच पहाड आणि लांबवर पसरलेला वळणे वळणे घेत जाणारा रस्ता...... राहून राहून काश्मीर व लदाखची आठवण येत होती. काहीसं तसंच वाटत होतं. फक्त इथे हिरवा निसर्ग अधिक प्रमाणात होता आणि पहाडामधून ओघळणा-या प्रवाहामुळे वाहणा-या नदीची कमतरता होती. पण तीसुद्धा दूर झाली! पुढे घाट ह्या ठिकाणी एक घाट होता. इथेच टणकपूर नेपाळ सीमेलगतच्या टणकपूरवरून येणारा रस्ता मिळतो. दोन्ही बाजूंना उंच पर्वत आणि मधोमध वाहणारी नदी.... आहा हा............ स्वर्गाचा उंबरठाच जणू. इथेच सीमा सडक संगठन आपलं स्वागत करतं. मानस सरोवर यात्रेचा मार्ग इथे येऊन मिळतो. पुढे रस्त्यावर पहाडातून येणारे पाण्याचे झ-यासारखे प्रवाह लागतात. इथे प्रवासी पाणी भरून घेत होते. अर्थातच पाणी थंड होतं....


रामगंगा नदीलवकरच पिथोरागढला पोचलो. सकाळी ६ वाजता हल्द्वानीहून निघून पोचेपर्यंत दुपार उलटून गेली. पिथोरागढ जिल्ह्याचं ठिकाण आहे. ह्याची सरासरी उंची १५०० मीटर्स आहे. उंची कमी असली तरी सर्वत्र मोठे मोठे घाट आहेत. शहरसुद्धा डोंगरावरच वसलेलं आहे. दुर्गम जिल्हा असल्यामुळे फार जास्त सुविधा, वाहतूक, वस्ती नाही. हा सर्वच प्रदेश अत्यंत दुर्गम. त्यामुळे इथे राहणीमानही त्यानुसारच आहे. व्यवसायांमध्ये जास्त व्यवसाय शक्यतो मूलभूत स्वरूपाचेच आहेत. म्हणजे शेती, सरकारी सेवा, वाहतूक, सेना (मिलिटरी सेवा), पर्यटन आधारित असे. उत्तराखंड सरकारने उद्योगांना कर माफ केला असला तरी जास्त उद्योग तुलनेने सपाट भागांमध्येच उभे राहिले आहेत. त्या दिवशी पिथोरागढमध्येच थांबलो. गाठीभेटी झाल्या. संध्याकाळी जरा थंडी जाणवली.

दुस-या दिवशी २८ नोव्हेंबरला दोन गावांमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. थंडीमुळे सकाळी लवकर उठणं अवघड होतं. त्यामुळे थोडं उशीरा निघालो. इथे राज्य महामंडळाच्या बस आहेत. त्या अगदी दिल्लीपर्यंत जा- ये करतात. पण बरीच वाहतूक खाजगी पद्धतीने चालते. शेअर जीपच मुख्यत (कारण पहाडी रस्त्यांवर तीनचाकी चालू शकत नाहीत!) चालतात. त्यामुळे आणि एकूणच दुर्गम रस्त्यामुळेही प्रवास थोडा संथ गतीनेच होतो. प्रवासातला पहिला टप्पा मानस सरोवर यात्रेच्या मार्गावरीलच म्हणजे धारचुला रोडवर सत्गड इथे जाणे, हा होता. पिथोरागढच्या पुढे सुमारे तीस किमीवर असलेलं हे छोटसं गाव.

पिथोरागढमधून बाहेर पडतानाच इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) ह्या निमलष्करी विभागाचं मोठं केंद्र लागतं. ह्या भागामध्ये सीमा सडक संगठन (बीआरओ) आणि आयटीबीपी सक्रिय आहेत. दुर्गम व सीमा भागातले हे मुख्य मार्गदर्शक व रक्षक! थोडंसं पुढे जाऊन घाट चढल्यावर काल दिसलेले पहाड- ओम पर्वत, त्रिशुल पर्वत परत दिसण्यास सुरुवात झाली. पिथोरागढमधूनही काही ठिकाणाहून ते दिसतात. सगळीकडून दिसत नाहीत; कारण मध्ये मोठे पहाड आहेत. त्या नजा-याच्या दिशेनेच प्रवास सुरू झाला. सर्वत्र पहाड, हिरवागार निसर्ग, थोडी थोडी घरं व उंचावरची टप्या टप्याने केलेली शेती दिसत होती....... अद्भुत नजारा होता...... वळणं वळणं घेत जाणारे घाटरस्ते आणि त्याला लागून दरी. रस्त्यावरून अधून मधून जाणारी सेनेची वाहनं!


ये हसीं वादियाँ..... ये खुला आसमाँ....
तीस किमी अंतर असलं तरी सत्गडला पोचायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. अजून पुढे शुभ्र शिखरांच्या दिशेने जायची इच्छा होत होती.... सत्गड पहाडी पद्धतीप्रमाणे उंचावरील शेतांमध्ये असलेल्या काही घरांचा समूह मिळून बनलेलं गाव होतं. रस्त्याला लागूनच डोंगर आणि डोंगरामध्ये चढावावर घरं. खरं तर हा सर्व निसर्ग आणि नजारा फोटो, शब्द, वर्णन ह्याद्वारे सांगणं अशक्य आहे. अमिताभचा आवाज शब्दामधून सांगता येत नाही, तो ऐकावाच लागतो. तसं हेसुद्धा बघण्यातूनच कळू शकतं. परंतु एक पुसटसा अंदाज म्हणून हे काही फोटो...सर्वच नजारा विशेष वाटत होता. उंचावरील शेतं. त्यामध्येच घरं. वर वर चढत जाणारा रस्ता. जुन्या पद्धतीची घरं, झाडी, शांतता आणि आपुलकीने स्वागत करणारी साधी माणसं!!!!! अद्भुत अनुभव होता. सत्गडचं म्हणजे सात गावं (वाड्या) असलेलं उंचावरचं गाव. घरं सगळीकडे विखुरलेली, एकमेकांपासून लांबसुद्धा आहेत. ह्या भागातली गावं विशिष्ट समाजावर आधारित होती. म्हणजे एका गावात एकच मुख्य समाज. इतर जवळजवळ नगण्यच. आपल्याकडे असते तशी मिश्र पद्धत नाही.त्या शेतांमधून व घरांजवळूनच पाण्याचे काही प्रवाह वाहत होते. ते पाणी नैसर्गिक स्रोताचं होतं! म्हणजे आपोआप पहाडामधून वाहत येणारं! पहाडामध्ये असे स्रोत जवळजवळ सगळीकडेच आहेत. काळाच्या ओघात त्यांच्यावर नळ लावण्यात आले व हौद बांधण्यात आले. पाण्याचा मूळ उगम पहाडातच! पाणी अर्थातच थंड पण खूप ताजं होतं. घराजवळच्या पायवाटेवरून आणखी वर गेलो. रस्ता खाली लांब राहिला. थोड्या उंचीवरून निसर्ग वैभवाची नीट कल्पना येत होती. सर्वत्र घनदाट झाडी व डोंगर. तिथे ब-याच महिला डोक्यावरून गवताचे भारे घेऊन वरून खाली जाताना दिसत होत्या.  

हा दुर्गम भाग असल्यामुळे अर्थातच शिक्षण व इतर सुविधांसंदर्भात अडचणी आहेत. संपर्काची साधनं मर्यादित आहेत. तसंच आरोग्य व इतरही बाबतीत अडचणी आहेत. दिवसा तिथे फिरायला मजा वाटत होती..... पण रात्री? रात्री तिथे जंगली प्राणी फिरतात. कारण मुळात तो सर्व भाग जंगलच आहे. आणि विरळ जंगल नाही, तर घनदाट जंगल........

दुपारी परत त्याच मार्गाने परत येण्यासाठी निघालो. परत तोच वळणावळणाचा रस्ता. शेअर जीपमध्येही बरीच गर्दी. सतत वळणे असल्यामुळे व बराच रस्ता उताराचाही असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी थोडी चक्कर येण्याची भावना अनुभवास येतेच. पहाडी रस्त्यांवर त्याला पर्याय नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या निसर्गाचं अवलोकन करत प्रवास पार पडला. पिथोरागढहून परत लगेच बूंगाछीना ह्या गावाला जायचं होतं. त्या गावाकडे जाणारा रस्ता पिथोरागढ- धारचुला (ज्या रस्त्याने जाऊन आलो) ह्या रस्त्यावरूनच निघत होता. पण निघेपर्यंत संध्याकाळ झाली. इथली संध्याकाळ म्हणजे रात्र असते, ह्याचा अनुभव आला! संध्याकाळी साडेपाच वाजता स्पष्ट अंधार पडला होता! ह्याची दोन कारणं. एक म्हणजे हा भाग बराच उत्तरेला आहे. सुमारे ३० अंश उत्तरेला असेल. आणि त्यावेळी सूर्य दक्षिणायनात होता. म्हणजे सूर्याची आकाशातली उंची बरीच कमी होती. आणि सर्वत्र पहाड असल्यामुळे सूर्योदय उशीरा होणार; कारण जरी सूर्य क्षितिजावर उगवला असला, तरी पहाडाच्या वर यायला त्याला वेळ लागणार. त्यामुळेच सूर्यास्त लवकर होणार. ह्या कारणामुळे त्या परिसरात दिवस सकाळी 7 ला सुरू होऊन संध्याकाळी ५ ला संपायचा. ५.३० वाजता पूर्ण अंधार! थोडक्यात घड्याळ दोन तास पुढे होतं!

बूंगाछीनाला जाण्यासाठी जीपमध्ये जागाच मिळाली नाही. म्हणून मग जीपच्या टपावरून काही अंतर प्रवास केला..... बाहेर सर्व अद्भुत नजारा होता. पण... पण दुर्दैवाने रात्र झाली होती. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त गार गार वारा अंगाला सुखावून जात होता. असा अनुभव परत कधी मिळाला नसता. पहाडी वा-याचा टपावरून घेतलेला अनुभव! नंतर जीप थोडी रिकामी झाल्यावर खाली आलो. बूंगाछीना हे गावसुद्धा जवळजवळ ३० किमी अंतरावरच होतं. हा रस्ता पश्चिमेकडे जाणारा होता.

जीपमधून उतरून पुढे गावात खाली उतरून गेलो. रस्त्याच्या खाली असलेल्या दरीकडे जाणा-या रस्त्यावर हे गाव म्हणजे वाडी आहे. किर्र अंधार.... वळणावळणाची घसरणारी पायवाट. पंधरा मिनिटं चालल्यावर घरासमोर आलो........ प्रदूषण विरहित आकाशात तारे अधिक स्पष्ट दिसत होते...... भेटीगाठी, गप्पा टप्पा झाल्या.

सकाळी उठून थंड हवेत बाहेर फिरलो. घरालगतच शेती होती. दरीकडे जाणा-या पायवाटा दिसत होत्या. इथेही एका ठिकाणी भुमिगत जलस्रोत होता! वाडा पद्धतीची घरं होती. लोकसंख्येची दाटी नसल्यामुळे घरालगतचं अंगण मोठं होतं. दूरवर डोंगरात मंदीरं दिसत होते. डोंगरातच दूरवर एक रस्ता दिसत होता. सहज फिरायला म्हणून दरीच्या दिशेने निघालो. पायवाट स्पष्ट दिसत होती. पण पुढे अवघड झाली. तीव्र उतार होता. थोडा वेळ जात राहिलो. खाली लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. एक झरासुद्धा वाहत होता. सगळीकडे झाडी होती. ते वातावरण, तो निसर्ग मनात साठवून परत आलो. इथे खालपर्यंत लोक राहतात. गाव लांबपर्यंत विखुरलेलं आहे.दुपारी पिथोरागढला परत आलो. रात्री येताना दिसला नव्हता तो अद्भुत निसर्ग दिसला. सर्वत्र उंचच उंच घाट व लांब रस्ते होते. प्रदेशाची बरीचशी रूपरेषा लदाखशी जुळत होती............. इथली बोलीभाषा कुमाऊनी आहे. पण हिंदी सगळीकडे चालते. हिंदीच प्रमाण भाषा आहे. बाहेरच्या जगापासून जवळजवळ तुटलेल्या भागात फिरण्याचा अनुभव घेतला...........

पुढच्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरला बस्तडी ह्या गावाला जायचं होतं. आधी गेलो होतो त्या सत्गडच्या रस्त्यावरूनच हे आणखी पुढे होतं. आणखी पुढे आणि अधिक उंचीच्या पहाडात जाण्याचा आनंद होत होता. दूरवरून दिसणा-या शुभ्र शिखरांचं दूरदर्शन घेत सत्गडवरून पुढे गेलो. रस्ता व पहाड अधिक दुर्गम होता. वाटेत किती तरी ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू होतं. ओगला ह्या गावाच्या आधी एक सेनेची छावणी लागली. ओगला इथे थोडावेळ फिरलो. ब-याच वेळेपासून एखादा ‘ला’ येण्याची वाट पाहत होतो. तिबेटी भाषेमध्ये ला म्हणजे घाट. काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अशा सर्वच भागांमध्ये घाटांना ला म्हंटलं जातं. तसे इथेही दिसतील, असं वाटलं आणि दिसलेही. ओगला, धारचुला इत्यादि! परंतु बाकी तिबेटी/ बौद्ध प्रभाव दिसला नाही. ह्याची कारणं कदाचित दोन असतील. एक तर हा भाग हिमालयाच्या अनेक शिखरांमुळे तिबेटशी सलगपणे जोडल्या गेलेला नाही. लदाख किंवा अरुणाचल त्या मानाने जास्त सोप्या प्रकारे जोडलेले आहेत. तसंच उत्तराखंड व त्याला लागून असलेले नेपाळ आणि उत्तर प्रदेश हे बौद्धपेक्षा हिंदु संस्कृतीचा अधिक प्रभाव असलेले आहेत. त्यामुळे कदाचित असेल..... तरीही पिथोरागढमध्ये तिबेटी निर्वासित आहेतच. नेपाळीही आहेत. नेपाळमधून अनेक वेळेस घुसखोरी झाल्याच्या बातम्याही येत असतात.


नकाशा इथे क्लिक करून मोठा करता येईल.


सोबतच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे इथून नेपाळ सीमा अजिबात लांब नव्हती. जेमतेम १० किमीवर नेपाळ होता.... सविस्तर बघण्यासाठी.इथे क्लिक करून वरील नकाशा मोठा करता येईल.

ओगलाला फिरताना मानस सरोवर यात्रेकरूंसाठीचे फलक दिसले. हा मानस सरोवर यात्रेचा मार्ग असेल, असं वाटत नव्हतं, इतका लहान रस्ता होता. थोडं पुढे गेलो, तर हिमशिखरं जवळ आल्याचं जाणवत होतं. त्रिशुल पर्वत दिसत होता. इथले डोंगर मात्र तोडण्यात येत आहेत....... उत्तराखंडमध्ये गेल्या काही काळात रस्ते चांगले झाले आहेत व मूलभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळेच इथल्या निसर्गाला धोकासुद्धा निर्माण झाला आहे आणि पर्यटनाच्या लाटेचे दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.....
वृक्षतोड आणि दूरवर दिसणारे त्रिशुल शिखर

मानस सरोवर यात्रेचा मार्ग!!! एकेकाळी भारताचा भाग असलेलं तिबेट वेगळं झालं व चीनचा भाग बनलं... तरी सुदैवाने सरकारला ही यात्रा सुरू ठेवण्याची सद्बुद्धी झाली...... लदाखमध्ये मानस सरोवरात उगम पावलेली सिंधू नदी पाहिली होती..... आता मानस सरोवराचा मार्ग....... जणू हिमालय परिक्रमा कल्पनेने पूर्ण होत होती.........

बस्तडी हे गाव ओगलापासून पूर्वेकडे म्हणजे नेपाळच्या दिशेने चार- पाच किमी आतमध्ये होतं. इथेही एका ठिकाणी गाडी सोडून देऊन पुढे बरंच चालत जावं लागलं व खाली दरीत उतरावं लागलं. वाटेमध्ये कनालीछीना गावात ब-याच नेपाळी बायका होत्या. कसबा किंवा छोटी वाडी म्हणण्यासारखं गाव असलं तरी दुकानंही बरीच होती. इथे भुईमुगाच्या शेंगा बारीक छिद्रे असलेल्या एका कढईत मंद गतीने भाजतात. त्यामुळे भाजलेल्या शेंगा काळ्या दिसत नाहीत; पण चवीला छान लागतात. गावातून जाताना मोसंबीसारखी बरीच फळं दिसत होती. त्यांना माल्टा म्हणतात. इथली उंची ओगलापेक्षा थोडी जास्त असल्यामुळे मघाचा त्रिशुल पर्वत अधिक स्पष्ट दिसत होता. सर्वत्र सूचिपर्णी झाडं दिसत होती. उताराच्या कच्च्या रस्त्यावर काम चालू होतं. वाहनं येतील असा रस्ता करण्याचं ते काम होतं.


माल्टाचं झाड


नगाधिराज महाराज......
त्रिशुल शिखर
मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए........
पर्वतीय शेती इतकी रम्य आहे!


पहाड सुंदर असला तरी इथलं जगणं खडतर आहे.....पुढे दरी उतरून जाताना समोरचा नजारा भव्य होता! उंच उंच पहाड आणि खाली खाली जाणारी पायवाट. जगाच्या एका कोप-यात आल्यासारखंच वाटत होतं! दूरवर डोंगरात येताना आलो होतो तो रस्ता दिसत होता...... अद्भुत....... ह्या भागाची उंची पिथोरागढपेक्षा थोडी जास्त म्हणजे सुमारे २००० मीटर्स होती. गावात एक उंचावर शाळासुद्धा होती. घरी जातानाही उताराची पायवाट होती........

इथली घरंसुद्धा एकदम पारंपारिक वाडा पद्धतीची. तीव्र उतारावरच वसलेली. पण अंगण बरंच मोठं. शिवाय गायी- म्हशी व कुत्रेसुद्धा बरेच. कुत्रा प्राणी तर सर्वत्र अनिवार्य. कारण वाघ किंवा इतर धोक्यापासून वाचवण्यासाठी तोच जास्त उपयोगी. इथे घरांच्या कौलावर निवडुंगासारखं रोप लावण्याची पद्धत दिसली. रात्र लवकर झाली आणि रात्रीचं आकाश अत्यंत स्पष्ट होतं. ढग व प्रदूषण नसल्यामुळे तारे चांगले दिसत होते. इथे काफल हे फळ विशेष महत्त्वाचं मानतात. इथला निसर्ग खडतर असल्यामुळे जगण्यात कष्ट जास्त असतात. म्हणूनच इथे लठ्ठ, अधिक वजनाचे लोक जवळजवळ दिसत नाहीत. निसर्गत: काटक असल्यामुळे इथले लोक सेनेमध्येही ब-याच प्रमाणात आहेत. सेनेचं एक मुख्य प्रशिक्षण केंद्र भारतीय सेना अकादमी- देहरादूनलाच आहे.
इथे घरांवर निवडुंग लावलेलं दिसतं.दुस-या दिवशी उठून परत निघालो. घरातून बाहेर पडल्यावर पंधरा- वीस मिनिट चढ चढून किनालीछीमापर्यंत आलो. येताना दरी, पहाड व दूरवर दिसणारा रस्ता हा अप्रतिम नजारा मनात साठवला. दूरवर बर्फाच्छादित पर्वतही दिसत होते. किनालीछीमामध्ये एक गंमत ही झाली, की लग्नाचे दिवस असल्यामुळे जीपच मिळत नव्हती. थोडा वेळ थांबून शेवटी पायी पायी निघालो.......... नजारा इतका रमणीय व अप्रतिम होता, की पायी जाणं, हीसुद्धा पर्वणी वाटत होती. रस्ता पक्का होता; पण रस्त्याच्या बाजूला घनदाट झाडी व दरी होती. दूरवरून पर्वतशिखरं सोबत देतच होते. आणि रस्त्याला लागूनच सूचिपर्णी देवदार वृक्ष होते. पहाडामध्ये एका उंचीनंतर हे सर्वत्र आढळतात. तीव्र चढ असलेल्या पर्वतावरही दिसतात. रस्त्याच्या जवळ असल्यामुळे काही जवळून बघितले. इतक्या दुर्गम भागामध्ये असलेल्या ह्या वृक्षांची पानं सुईसारखी टोकदार पण नाजुक असतात. इथे जैव विविधता अप्रतिम आहे.........

वाटेत वस्ती जवळजवळ नव्हतीच. ओगला जवळ आल्यावर एक पहाडी खाजगी शाळा दिसली. ओगलामध्ये मानस सरोवर मार्गावर परत थोडा वेळ फिरून परतीच्या मार्गाला आलो. इथे मात्र लवकरच जीप मिळाली आणि पिथोरागढच्या रस्त्याला लागलो. आसपासचा नजारा मात्र अद्भुत होता....... सर्वत्र लांबच लांब पसरलेले डोंगर आणि घाट.......... अद्भुत.......... दूरवरून प्रेरणा देणारे शुभ्र पर्वत.....

एक दिवस पिथोरागढमध्ये थांबून दुस-या दिवशी म्हणजे २ डिसेंबरला सकाळी लवकर निघालो. ज्या मार्गाने आलो होतो, त्याच मार्गाने म्हणजे पिथोरागढ- घाट- दन्या- शहर फाटक असा प्रवास होता. वाटेत मध्ये मध्ये लोखंडी ब्रिज लागत होते व परत परत लदाखची आठवण होत होती. रामगंगा नदीचं दृश्य तर सिंधू नदीच्या दृश्याची आठवण करून देत होतं. दन्या गावात नाश्ता करून परत त्याच कच्च्या रस्त्याने आलो. ब-याच अंतरापर्यंत ओम पर्वत व त्रिशुल पर्वत सोबत करत होते. पुढे घाट उतरल्यानंतर मात्र ते दिसेनासे झाले........ योगी लोकांच्या कर्मभूमीत नावापुरते एक साधू दिसले. येतानाच्या मार्गात फक्त एक बदल असा होता, की सरळ हल्द्वानीला जायच्या ऐवजी नैनिताल बघून काठगोदामला जायचं होतं. त्यामुळे शहर फाटकपासून रस्ता बदलला. नैनितालजवळ बरीच ट्रॅफिक लागेल, असं वाटलं होतं, पण तसं न होता वेळेत नैनितालला पोचलो.
रस्त्यात ढग लागले!नैनितालच्या आधी बराच मोठा घाट आहे. पण फार अवघड असा नाही. नैनिताल टिपिकल पर्यटन शहर असल्यामुळे बरंच व्यवस्थित दिसत होतं. सगळीकडे सूचना फलक लावलेले होते. सरळ चढणारा रस्ता पार करून नैनितालच्या मुख्य भागात आलो. नैनितालमध्ये बरेच तलाव आहेत. एकूण नऊ असावेत. नैनिताल हे नाव नैना वरून(म्हणजे पार्वती देवीच्या डोळ्यासारख्या तलावावरून) आणि नऊ तलावांवरून पडलं आहे, असं ऐकायला मिळालं. नैनितालच्या जवळ सपाट प्रदेश असला तरीही त्याची उंची सुमारे २००० मीटर्स आहे. त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात इथे जास्त लोक येतात. ब्रिटिशांचं आवडतं स्थान असल्यामुळे काही जुन्या इमारती दिसतात. नैनितालजवळच जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य आहे. पण ते बघण्याचं जमलं नाही. खरं हा सर्व कुमाऊं प्रदेश म्हणजे एके काळी जिम कॉर्बेटची कर्मभूमी होती. इथेच तो शिकारी म्हणून आला, आधी कोणत्याही प्राण्याची शिकार करणारा शिकारी होता; नंतर फक्त नरभक्षक वाघांचा शिकारी झाला आणि पुढे तर त्याने शिकार करणंच सोडून दिलं आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम केलं.
नैनितालमध्ये संध्याकाळी दिसणारा तलाव पाहिला. काठगोदामला रेल्वे घ्यायची असल्यामुळे फार वेळ नव्हता. नैनितालमध्ये थोडसं फिरलो. टिपिकल पर्यटन केंद्र असल्यामुळे बरीच दुकानं, मोठी मोठी दुकानं होती, बाजारपेठ होती. नैनितालच्या तलावामुळे श्रीनगरच्या दल सरोवराची आठवण झाली!

नैनितालवरून परत येतानासुद्धा काहीच गर्दी लागली नाही. रस्ता घाटाचा असला तरी व्यवस्थित होता. लवकरच काठगोदामला पोचलो. असाधारण अशा पर्वतीय प्रदेशातला अल्पसा अनुभव पूर्ण झाला....... मानस सरोवर नाही, पण त्याच्या मार्गावर जाण्याचं समाधान मिळालं.......खरं तर इतकं धावत पळत गेल्यामुळे उत्तराखंड काहीही बघता आला नाही.... परंतु पुढच्या भेटीमध्ये ही उणीव नक्की भरून निघणार.....


काठगोदाममधील रेल्वेचा स्वागत संदेश
पुढील भाग: दिल्ली दर्शन

2 comments:

  1. भरगच्च फोटोमुळे ब्लॉग प्रेक्षणीय झाला आहे.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!