Saturday, December 31, 2011

झेपावे जरा उत्तरेकडे- भाग २: दिल्ली दर्शन

उत्तराखंडकडे जाताना आणि येतानासुद्धा काही वेळ दिल्लीत थांबण्याचा योग आला..... दिल्ली राजधानीला शोभेल असं महानगर. खरखुरं रॉयल महानगर. मोठे रस्ते, वैभवसंपन्न वास्तू, आधुनिकता व राजकीय प्रभाव.... दिल्ली अजूनही ब-याच प्रमाणात पूर्वीसारखंच आहे...... अक्षरश: पांडवांच्या काळातसुद्धा इंद्रप्रस्थ म्हणजे आजच्या दिल्लीमधलं ठिकाण, हीच राजधानी होती. आजच्या क्षणभंगुर जगात हे सनातनत्व विशेषच.....

दिल्ली! भारताच्या इतिहासाचं आणि राजकारणाचं केंद्र! कितीही वेळेस बघितलं तरी विशेष वाटतं. ह्या वर्णनामध्ये दिल्लीतल्या गतवैभवाच्या खुणांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो. दिल्ली प्रचंड आहे. कित्येक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण मर्यादित वेळेत आणि सहज फिरताना ज्या गोष्टी बघण्यात आल्या, त्यांबद्दल बोलतो.

दिल्ली जरी प्राचीन वारसा बाळगत असलं, तरी ते आधुनिकसुद्धा आहे. मोठ्या रस्त्यांप्रमाणेच मेट्रो संजाल ह्याचं जीवंत उदाहरण आहे! मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले धुरंधर व ७९ वर्षांचे तरुण श्रीधरन ह्या प्रकल्पातून निवृत्त असतानाच हा भाग लिहितोय. विश्वेश्वरय्यांप्रमाणेच इतकं दीर्घकाळ त्यांनी काम केलं...... असे इतक्या वर्षांचे तरुण पुढील काळात किती दिसतील?

दिल्ली बघताना सुरुवात कुतुब मिनारपासून केली. गतवैभवाची झलक येण्यासाठी इथे येणं पुरेसं आहे..... प्राचीन काळात सूर्यवंशीय आणि चांद्रवंशीय राजे, नंतरच्या काळात मौर्यवंशीय आणि पृथ्वीराज चौहान असे राजे आणि नंतर तुर्क आणि मुघल....... आणि नंतर सुमारे पन्नास- साठ वर्षे मराठी सत्तेचा अंमल...... दिल्ली जर बोलायला लागली तर अण्णांपासून दिग्विजयसिंह आणि तेंडुलकरपासून फेडररपर्यंत सर्व शांत होतील!


उंची कित्येक मजले आहे...इतकं भव्य वास्तुकाम करण्यामागची खरी प्रेरणा नक्की कोणती असेल?


हा भाग मिनारच्या आधी तिथे असलेल्या मंदीराचा तर नसावा?

प्राचीन वारसा आता कालबाह्य (म्हणजे सरकार व सत्ताधा-यांच्या दृष्टीने) झाल्यामुळे त्याकडे झालेलं दुर्लक्ष जाणवत होतं. आज शिल्लक असलेल्या वास्तू त्यांच्या शिखर कालखंडातल्या नसूनही अवशेषांच्या स्वरूपातही अचंबित करतात. जुनं जग वेगळंच होतं. आज इतकी मोठी वास्तू कोण प्लॅन करणार, ती कोण स्पॉन्सर करणार आणि कोण मॅनेज करणार?? जसं होतं तसंसुद्धा ठेवणं मॅनेज होत नाही. वास्तुंपैकी काही वास्तुंचा भाग खचला आहे आणि मीनार तर एका प्रकारे बंदच करून ठेवलं आहे.

त्यानंतर बहाई मंदीर म्हणजेच लोटस टेंपल पाहिलं. ही मात्र अत्यंत आधुनिक भव्य वास्तू. विमानातूनही स्पष्ट ओळखू येते. एक वेगळंच उदाहरण देणारी. एका गोष्टीबद्दल तरी ह्या मंदिराच्या धुरिणांचं अभिनंदन करावं लागेल. त्यांनी इतकी भव्य वास्तु बांधली आणि ती नीट ठेवली आहे. स्वच्छता, सौहार्दता, बघणा-यांची सोय, ह्या सर्व गोष्टी जपल्या आहेत. थोडसं वेगळ्या पार्श्वभूमीचं मंदीर/ वास्तू असूनही ध्यान करण्यास चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. प्रत्यक्षात काय असेल माहित नाही, पण तिथे सांगितल्याप्रमाणे व त्यांच्या पत्रकाप्रमाणे तरी बहाई धर्म सभ्य व सहिष्णू वाटतो.


अत्यंत भव्य.....
पवित्रतेचं उत्तम प्रतिक!

अत्यंत मोठं ध्यानगृहध्यानासाठी योग्य वातावरण आहे...

त्यानंतर राजघाटला गेलो. राजघाट...... दिल्लीशी संबंधित असंख्य घटनांच्या आठवणी उभ्या राहतात. राजघाट हा लाल किल्ल्याप्रमाणेच दिल्लीचा एक केंद्रबिंदु. इथून जवळच यमुना वाहते....... तीच यमुना........ पण आता राजघाट मुख्यत: गांधीजी समाधी स्थान म्हणूनच ओळखला जातो. भव्य परिसर आहे. वास्तूही छान व प्रेक्षणीय आहे. ह्या सर्व परिसरात सहलीला आलेल्या शाळेतल्या मुलांची झुंबड उडालेली दिसते. राजघाटच्या एका प्रवेशद्वारासमोरून दिल्लीची वाहतूक धावते. यमुना थोडी पलीकडे आहे.

राजघाटमध्ये इतर कशाहीपेक्षा सर्वाधिक जाणवलेली गोष्ट म्हणजे कचरा! मुख्य परिसरामध्ये सर्वत्र कच-याचे ढीग पसरले होते. बरेचसे लोक तर खात खातच बघायला येत होते आणि कचरा तिथे फेकत होते. कदाचित ते महात्मा गांधींऐवजी अन्य कोणत्या गांधींचे भक्त असावेत. पण आतमध्ये पसरलेला कचरा भयानक होता. त्याहीपेक्षा इतक्या मोठ्या, इतक्या महत्त्वाच्या वास्तुमध्ये असा कचरा पसरलेला असणं व तो हलवला न जाणं जास्त भयानक होतं. हे दिल्ली आहे, हा राजघाट आहे! इथे इतका कचरा!!! असा कचरा डाउनिंग स्ट्रीटवर दिसेल का? गांधीजी (सीनिअर) हे सर्व जगभरातल्या लोकांना वंदनीय व मान्य असलेलं व्यक्तिमत्व. त्यामुळे अर्थातच इथे विदेशी लोकही मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना हे पाहून भारताबद्दल काय वाटत असेल, हा प्रश्न पडून फार त्रास झाला.

राजघाट बघायला आलेले चिनी लोक.....

तिथेच एक जण काही विदेशी पर्यटकांना राजघाट स्मारकाची माहिती देत होता. थोडा वेळ माहिती देऊन त्याने त्यांना पुढे पाठवलं व तो एका जागेवर बसला. सहज म्हणून त्याची विचारपूस केली. तो चिनी भाषांतरकार होता व ते चिनी लोक राजघाट बघायला आले होते. मग त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्या. त्याने सांगितलं, की प्रत्यक्ष स्मारकामध्ये समजावून सांगण्यासारखं काही नव्हतं, त्यामुळे त्यांना पाठवून तो बसला होता. तो जेएनयूचा पास-आउट होता. मग कच-याबद्दल त्या लोकांना काय वाटतं, ते प्रश्न विचारतात का असं विचारलं. त्याने सांगितलं, की त्या लोकांनासुद्धा ही गोष्ट जाणवते. कचरा साफ कसा केला जाऊ शकत नाही, हे त्यांना समजतच नाही. कारण असा कचरा भारताबाहेर कोणत्याही प्रगत देशात साचू दिला जाणार नाही.... मग त्याने कचरा साफ न होण्यामागचं कारण सांगितलं. कदाचित सीझनच्या गर्दीमुळे कचरा वाढला असेल, त्यामुळे तो अजून साफ केला गेला नसेल, असं म्हणाला. अनेक वेळा कचरा नसतो, पण कधी कधी असतो, असं म्हणाला. मनात मात्र वाटत होतं, हे सर्व राजकीय सत्तेचं केंद्र आहे. न जाणो, गेल्या काही वेळेत कोणत्या राजकीय व्हीव्हीआयपीने भेट दिली नसावी, म्हणून साफ केला नसेल.... किंवा.... किंवा कोणी व्हीव्हीआयपी भेट देणार असेल, एखादं शिष्टमंडळ भेट देणार असेल, म्हणूनही मुद्दाम साफ केला नसेल.... शेवटी राजकीय सत्तेचं आणि राजकीय हालचालींचं हेच केंद्र आहे. दिल्लीत सर्वत्र मिरवणारी राजसत्ता इथे तरी कशी कार्यरत नसेल?

त्या व्यक्तीने आणखीही चांगली माहिती दिली. यमुना किती दूर आहे, असं विचारल्यावर बोलला, की राजघाटच्या पलीकडे काही अंतरावर आहे. पुढे असंही म्हणाला, की एकेकाळी यमुना राजघाटला लागूनच होती. म्हणजेच राजघाट हा खरोखर नदीवरचा घाट होता. पण नंतर ब्रिटिश कालखंडात नदीपात्रातली वाहतूक बंद पडत गेली. त्यामुळे नदीचं स्थानसुद्धा बदललं. नदीचं स्थान तेच राहण्यासाठी त्यावर नियमित वाहतुक होणं आवश्यक असतं; ज्यामुळे त्यातील वाळू निघून जात नाही आणि तिचा प्रवाह- मार्ग स्थिर राहतो. पण वाहतुकच बंद पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहानुसार मुख्य प्रवाह- मार्ग बदलत गेला........ त्यामुळे यमुना राजघाटापासून दूर गेली..... त्याने न सांगितलेली उघड गोष्ट म्हणजे नदीवरील बांधकाम, इमारती आणि नदीत सोडले जाणारे प्रदूषण...... असो.....

इतका धक्का पुरेसा नव्हता म्हणून की काय बाहेर आल्यावर आणखी एक गोष्ट कळाली. आमच्या सोबत असलेल्या माझ्या पत्नीच्या भावाचे बूट चोरीला गेले होते...... अस्वस्थ करणारा अनुभव होता....... एकवेळ मेट्रो स्टेशनवर कचरा पडलेला असेल तर समजू शकतो. एकवेळ स्टेशनच्या गर्दीमध्ये चोरीची घटना समजू शकतो.... पण राजघाट??? गांधीजी (सिनिअर)?? जणू गांधीवादानेसुद्धा स्थान बदललं आहे, असं वाटतं. पण ही गोष्ट बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है म्हणून सोडून देण्यासारखी नाही..... वेळेच्या मर्यादेमुळे गांधी संग्रहालय आणि ग्रंथालय न बघता निघालो.
राजधानी असावी तर अशी!

रॉयल राजधानी!


हे भारताचं हाऊस ऑफ कॉमन्स कधी होईल का?सत्ता ओसांडून वाहते...

संसद भवन, नॉर्थ आणि साउथ ब्लॉक, सचिवालय इत्यादि इमारतींच्या परिसरात गेलो. ह्या वास्तुंबद्दल मनात संमिश्र भावना येतात. राष्ट्रीय वास्तु, अभियांत्रिकी, वास्तुकला म्हणून ह्या वास्तु महान आहेत....... पण............... पण तिथे असलेल्या व राज्य करणा-या लोकांबद्दल असं म्हणता येत नाही......... ह्या दोन्हीमधला फरक अस्वस्थ करतो...........

दिल्लीमधील प्राचीन व आधुनिक वास्तु पाहताना, कुतुब मिनारचे अवशेष आणि राजघाटाची दशा बघताना मनात प्रश्न निर्माण होतात. ह्या वास्तुंचं आजचं रूप पाहून त्यांच्या गतकाळाची कल्पना येऊ शकत नाही. परंतु गतकाळात एक देश म्हणून असलेला आपला वारसा किती महान होता, ह्या नजरेने ह्या वास्तुंकडे बघण्याची आवश्यकता जाणवते. निव्वळ करमणूक किंवा पर्यटन म्हणून नाही, तर अतीत शोधण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे....... तशी दृष्टी तरी आपल्या सर्वांना मिळावी, हीच इच्छा. इथे तसा प्रयत्न येणा-या लेखनामध्ये केला जाईल. 


आगामी आकर्षण:
दक्षिण दर्शन- भाग १ रजनीकांतच्या गावात!

1 comment:

  1. सुंदर फोटो आहेत! दिल्ली जा रही हूं तो सोचा पढ़ ले

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!