Tuesday, November 22, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात

लदाखची भ्रमणगाथा भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात


......... नुकतीच भारत- चीन युद्धास ५० वर्षं पूर्ण झाली. अर्थात हा स्मृतीदिन होता की वर्धापनदिन, हे सांगणं मात्र अवघड आहे... भारत- चीन युद्धाच्या आठवणी चर्चेत येत असताना आणि प्रत्येक दिवशी भारत- चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणाव निर्माण केला जात असताना पुढचा भाग लिहितोय........ आज भारताचे दोन शत्रू सर्वांत मोठे आहेत आणि ते ब-याच विदेश- संबंधित समस्यांच्या केंद्रस्थानी आहेत. ते म्हणजे अमेरिका (व्हाया पाकिस्तान) आणि चीन! चीन हा भारताचा अत्यंत बलाढ्य शत्रू. आज अशी परिस्थिती आहे, की सर्वच बाजूने चीन भारताभोवती विळखा आवळत आणलेला आहे. काश्मीर आणि पूर्वांचल- उत्तर आणि पूर्व दिशांमध्ये चीनची सेना स्वत: आहे तर भारताच्या अन्य सीमांच्या बाजूला त्यांचे वेगवेगळे मोहरे आणि केंद्र आहेत. अंदमान समुद्र, हिंदी महासागर ते थेट पश्चिम किनारपट्टी आणि पाकिस्तान सीमा ह्या सर्वच मोक्याच्या ठिकाणी चीन आपली ताकत शक्य त्या सर्व प्रकारे वाढवत आहे आणि वेगवेगळे मुद्दे समोर करून औपचारिकत: आणि उघड उघड भारतीय सार्वभौमत्वास आव्हान देत आहे...... ह्यात नवीन असं काहीच नाही.... चीनच्या इतिहासामध्ये चीनची सीमा असलेली चीनची भिंत आज जवळजवळ चीनच्या मध्यभागात आहे...

असा हा चीन आणि लदाख हा चीनच्या डोळ्यात खुपणारा भाग. कारण लदाख म्हणजे चीनने बळकावलेल्या तिबेटचाच सख्खा बंधू. हा भाग चीनला इतका खुपतो; की एका विश्लेषणानुसार ऑगस्ट २०१० मध्ये लेहमध्ये झालेली अभूतपूर्व ढगफूटी चीनच्या हवाई शस्त्रांनीच केलेली होती... लदाखचंही स्थान व भूराजकीय महत्त्व तितकंच. त्यामुळे लदाख हा चीनच्या अतिरेकी कारवायांचाही एक केंद्रबिंदु आहे. आधीच्या भागात बघितल्याप्रमाणे इथे बराचसा भारतीय भूप्रदेश चीनव्याप्त आहे, चीनने बळकावलेला आहे.

विशेषत: स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राज्यकर्त्यांची पराभूत आणि दरिद्री मानसिकता ह्यामागचं एक कारण आहेच. परंतु हा भाग, विशेषत: लदाख आणि उत्तर काश्मीरचा भाग, अतिदुर्गम असणे आणि इतिहासामध्येही तो बदलत्या शासकांच्या नियंत्रणात असणे, हेही एक महत्त्वाचं कारण आहे. मध्ययुगामध्ये चिनी आणि तिबेटी शासकांच्या नियंत्रणात असलेला हा प्रदेश नंतर डोग्रा राजांनी जिंकून घेतला. तोच नंतर ब्रिटिश भारताचा भाग बनला. जरी ब्रिटिशांनी इथे सीमारेषा आखली, तरीसुद्धा ह्या सीमानिश्चितीला चीनची मान्यता नव्हती. एक प्रकारे तो भाग मुख्य भूमीशी दुर्गमतेमुळे संलग्न नसल्यामुळे आणि त्यामुळे सांस्कृतिक दृष्टीने थोडासा वेगळा राहिलेला असल्यामुळे अनिश्चित बनला. तसंच उत्तर- पूर्व काश्मीरच्या ह्या भागामध्ये लोकसंख्याही अत्यंत विरळ. त्यामुळे इथल्या सीमारेषा अनिश्चित स्वरूपाच्याच राहिल्या. त्याचं भूराजकीय महत्त्व लक्षात घेण्याची दूरदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये नव्हती. आज भारताच्या नकाशात असलेला अक्साई चीन हा भूप्रदेश १९६२च्या युद्धापूर्वी चीनने बळकावला आणि तेव्हापासून तो त्यांच्याच नियंत्रणात आहे. पाकव्याप्त आणि चीनव्याप्त काश्मीरचा विळखा काश्मीरला बसलेला आहे आणि त्यामधल्या प्रदेशातला सियाचेन हा मोक्याचा भाग भारताच्या अजूनही नियंत्रणात आहे. मध्य आशियाशी जोडणारी ही भूभागाची पट्टी आहे; त्यामुळे हा सर्वच भाग जरी अतिदुर्गम आणि रखरखीत असला; तरीही महत्त्वाचा ठरतो. ह्या संदर्भात आणि चीनच्या आक्रमणाच्या इतिहासाच्या संदर्भात हे दोन लेख वाचनीय आहेत. लेखावरील प्रतिक्रियासुद्धा माहितीपूर्ण आहेत.

चीन युद्धातील चुका आणि घोडचुका (शशिकांत पित्रे)
पन्नाशी: चीन- भारत युद्धाची

........ दिस्कितमधल्या शाळेत स्वातंत्र्यदिनाचा रोमांचक सोहळा आणि लदाखमधला थरारक निसर्ग बघून लेहमध्ये रात्री परत आलो. लेह- मनाली रस्ता अपघातानंतर बिकट हवामानामुळे व भूस्खलनामुळे बंद झाल्याची बातमी मिळाली. परत जाण्याचे पर्याय ह्यावर चर्चा झाली. ह्या वेळेपर्यंत हसनजी व हुसेनजी ह्यांच्या सहवासात व लेहमध्ये जेमतेम सहा दिवस झाले असले; तरीसुद्धा खूप जिव्हाळा निर्माण झाला होता. रात्री जेवण करताना, हॉटेलमध्ये असताना गप्पासुद्धा होत होत्या. एका वेळेस आम्ही लक्ष्य चित्रपटातील दृश्यांमध्ये दाखवलेल्या भागामध्ये जाऊन आल्याबद्दल बोलत असतानाच हसनजींनी आम्हांला धक्का दिला. लक्ष्य चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तर हसनजींच्या हॉटेलमध्ये राहिला होता आणि हसनजींनी त्यांना हॉटेलच्या गाडीतून फिरवलं होतं!! आमचा हा खरोखर लक्ष्यच्या प्रदेशातला प्रवास होता!

हसनजी व हुसेनजींच्या हॉटेल व प्रवास ह्या सर्व व्यवस्थेबद्दल आम्ही खूप खुश होतो. त्याबद्दल अधिक बोलताना त्यांनी सांगितलं, की त्यांची पद्धत साधी आहे. ते जास्तीत जास्त ग्राहक वाढवण्यापेक्षा मर्यादित ग्राहक (पर्यटक) घेतात आणि त्यांना व्यक्तिगत आणि दर्जेदार सुविधा देतात. व्यक्तिगत लक्ष देत असल्यामुळे प्रत्येक ग्राहक खुश होतोच व तोच त्यांना नवीन ग्राहक मिळवून देतो, असं ते म्हणाले. तसंच प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार व बजेटनुसार सुविधा ते उपलब्ध करून देतात. तसंच प्रत्येक ठिकाणच्या हॉटेलवाल्यांसोबत त्यांचे रिलेशन्स आहेत. त्यामुळे कमी दराने ते त्यांच्या ग्राहकांना ह्या हॉटेलमध्ये सुविधा देतात.

विशेष म्हणजे हॉटेल व वाहतूक व्यवसाय, पर्यटन व संबंधित उद्योग हे फक्त ४-५ महिन्यांसाठीच असतात. त्यानंतर इथलं जीवन जवळजवळ ठप्प होतं. त्या काळात ब-याच ठिकाणी वाहतूक थांबलेली असते; विशेष हालचाल नसते. त्यामुळे उन्हाळा संपता संपता हिवाळ्याची तयारी सुरू होते. ५-६ महिन्यांसाठी धान्य, इंधन साठवून ठेवलं जातं. बरेच लोक त्या काळात अन्य प्रदेशात जातात. हसनजी व हुसेनजी हिवाळ्याचे पाच महिने (नोव्हेंबर ते एप्रिल) कोलकातामध्ये जाणार, असे म्हणाले होते. काश्मिरी विद्यार्थ्यांना असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन काही लदाखी विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षणही घेत आहेत, असंही त्यांच्या बोलण्यात आलं होतं.

रोज प्रवास असूनही थोड्या मिळणा-या वेळेमध्ये हुसेनजींशी इतकं बोलणं होईल, इतकी चांगली मैत्री तोपर्यंत झाली होती. भारतीय पारंपारिक साधेपणा त्यांच्या कार्यपद्धतीत दिसत होता. फसवणूक, लुटालूट आमच्या अनुभवाला तरी आली नाही. बघता बघता सहा दिवस लदाखमध्ये गेले होते....... आता ओढ होती पेंगाँग त्सोचा सख्खा भाऊ शोभणा-या त्सो मोरिरीची......


त्सो मोरिरीकडे जाण्याचा नकाशा


त्सो मोरिरी!! लेह- त्सो मोरिरी हे अंतर सुमारे १६० किमी आहे. त्यामुळे एका दिवसात त्सो मोरिरीवर जाऊन परत येणं म्हणजे ३२० किमी आणि ते अतिदुर्गम परिस्थितीमध्ये म्हणजे आणखी अवघड. त्यामुळे आमचा आधीचा विचार होता की लेहवरून त्सोमोरिरीला जाऊन एक रात्र तिथे मुक्काम करायचा आणि नंतर तिथूनच मनालीच्या रस्त्याला त्सो कार रस्त्याने जायचं. परंतु पांगपासून पुढे मनाली महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली असल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मोठा प्रवास असूनही आम्ही तो एका दिवसात करावा, असं ठरलं.

पहाटे ६ वाजता निघालो. हवामान खराबच होतं. सर्व आकाश अभ्राच्छादित दिसत होतं. ह्याचाच अर्थ दूरवर ढग होते, ब-याच प्रमाणात बर्फवृष्टी होती व रस्ते बंद राहण्याची शक्यता होती. लेह- मनाली रस्ता कधी खुला होतो, ही चिंता मनात होती. आजचा प्रवास एका दिवसातला आमचा जम्मुहून निघाल्यानंतरचा सर्वांत मोठा प्रवास असणार होता. अद्भुत प्रदेशातून जाणार होतो.... ते क्षण, ते अनुभव.... अहा हा..... भन्नाट. अचाट. विराट. सुसाट....... सिंधु नदी आजही आम्हांला मोठीच सोबत करणार होती.

पेंगाँग त्सोवर जाताना ज्या रस्त्याने गेलो होतो त्या रस्त्याने कारूपर्यंत जाऊन पुढे उपशी इथे नाश्ता घेतला. अर्थातच मनाली रस्त्यावरून वाहनं येत आहेत का, ही चौकशीही केली. रस्ता अजूनही बंद होता आणि सर्व वाहनं पांगमध्येच थांबवून ठेवली असल्याचं समजलं. पांग हे त्या मार्गावरचं एक लहान कसबावजा गाव. तिथलं रेशनसुद्धा संपून गेलं असेल, ही माहितीही मिळाली.................

उपशीमध्ये मिळालेलं जेवणच लदाखमधल्या भोजनात सर्वाधिक आवडलं. अप्रतिम आलू पराठा आणि सोबत भाजी, चटणी आणि दालसुद्धा. फक्त आलू पराठ्यामध्ये मूल्यवर्धित सेवा! सकाळची प्रसन्न हवा आणि असं जेवण आणि अर्थातच गरम चहा...... चहाच्या बाबतीमध्ये एक मात्र राहून गेलं. लदाखी पद्धतीमध्ये खास असा गुरगुर चहा करतात. तो गोड नाही तर खारट (नमकीन) असतो. लदाख व बाल्टीस्तान प्रदेशात तो विशेष प्रसिद्ध आहे. लेह, उपशीसारख्या गावांमधले हॉटेल्स इथे मिळणा-या गुरगुर चहापेक्षा चांगला गुरगुर चहा करगिलमध्ये किंवा अन्यत्र मिळेल, तो तुम्ही घ्या, असं आम्हांला हैदरभाई व हुसेनजी म्हणाले होते; व शेवटी तो चहा घ्यायचा योग संपूर्ण भ्रमंतीमध्ये ह्या वेळी तरी आलाच नाही....

उपशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लेह- मनाली रस्त्यावर उपशीला एक पेट्रोलपंप आहे आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशातील तंडी ह्या गावापर्यंत जवळजवळ ३०० किमी पेट्रोलपंपच नाही!! हाही पेट्रोलपंप नवीनच झाला आहे. त्या आधी तर लेहनंतर ३६५ किमी पेट्रोलपंपच नव्हता... उपशीपासून मनाली महामार्गाला एक फाटा फुटतो व एक रस्ता पूर्वेकडे जातो. सिंधू नदीसुद्धा ह्या दिशेने आमच्यासोबत येत होती.... उपशीहून पुढे चुमाथांगच्या दिशेने निघालो. सिंधू नदी उजव्या बाजूने रोरावत जात होती.......


सिंधू नदीच्या तीरी....

उपशीच्या जेमतेम बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं, की गाडीचं एक टायर पंक्चर झालं होतं!! आमच्या संपूर्ण प्रवासातला हा पहिला (आणि शेवटचाही) अडथळा. अर्थातच दुसरं टायर गाडीमध्ये होतंच... पण... पण नेमका पाना मिळत नव्हता. असलेले पाने वापरून टायर बदलता येत नव्हतं... त्यामुळे आम्हांला थांबावं लागलं.

अत्यंत थंड हवा...... दूरवर बर्फाची दुलई..... जवळच सिंधू नदी...... कोणाला तिथून पुढे जावसं वाटणार.......  सिंधू नदीच्या रोरावत्या निनादामध्ये आणि फेनमय वर्षावामध्ये मनसोक्त विलीन झालो...... अफाट......


सिंधूच्या सान्निध्यात

हैदरभाई येणा-या जाणा-या गाड्यांच्या ड्रायव्हरना थांबवून पान्याबद्दल विचारत होते. गंमत अशी की, बहुतेक ड्रायव्हर्स थांबत होते (आपल्यासारखं नाही). इथे निसर्ग इतका प्रबळ आहे, की माणूस माणसाच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर शेवटी एका व्हॅनच्या ड्रायव्हरजवळ तसा पाना मिळाला व टायर बदलता आलं. इथून पुढे ती व्हॅन व आमची स्कॉर्पियो सोबतच पुढे नेऊ, असं हैदरभाईंनी त्या ड्रायव्हरला सांगितलं. तो ड्रायव्हर नेपाळी होता.

सिंधू नदीच्या काठाकाठानेच प्रवास पुढे सुरू होता...... अद्भुत...... निसर्गाचे अविष्कार अप्रतिम होते. सर्वत्र खास लदाखी शैलीचे कोरडे पाषाण आणि सन्माननीय उच्च पर्वतांना बर्फाचा मान..... ढगाळ असलं तरीही ते वातावरण अत्यंत आल्हाददायक आणि प्रफुल्लित वाटत होतं. चांगला आणि खार्दुंगला हे बलाढ्य चौकीदार आम्ही पार केले असल्यामुळेच की काय, पण ह्या संपूर्ण लेह- त्सोमोरिरी प्रवासामध्ये एकही ‘ला’ नव्हता!! पहाड, घाट व डोंगर तर होतेच. पण एकच असा घाटमाथा नव्हता....... कदाचित हा लदाखी आतिथ्याचा व साधेपणाचा भाग असेल, की त्या रौद्र निसर्गाने आम्हा क्षुद्र मानवांना मोठ्या मनाने सोडून दिलं!!

वाटेमध्ये एक स्मारक होतं. थोडा वेळ तिथे थांबलो. काश्मीर..... सदैव पराक्रमाची प्रचिती देणारी स्मारकं दिसतच होती, दिसतच होती........ निसर्गाच्या उंचीबरोबरच मानवही त्याग आणि पराक्रमाने उंची वाढवू शकतो; ह्याची ही उदाहरणंच जणू........
ज़िंदा रहने के मौसम बहोत है मगर जान देने की ऋत रोज आती नही.........
भारावलेल्या मन:स्थितीत प्रवास सुरू होता. हिमया ह्या गावी सिंधूनदीवर दोन ब्रिज होते. गावं म्हणजे काही घरं आणि थोडीशी दुकानं. इथे महामार्गावर पर्यटकांव्यतिरिक्त इतर वाहतूक कमीच असते. त्यामुळे त्या प्रकारचे व्यवसायही दिसत नाहीत. काही काही लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटनाशी संबंधित हॉटेलिंग, गाईड असे व्यवसाय करतात. पण बाकी जीवनशैली तशी पारंपारिकच. शेतीसुद्धा कमीच. इथला निसर्गच तसा..... अगदी कुत्रा, गाय, बैल हे प्राणी नेहमीसारखे असले, तरीसुद्धा ह्या अतिथंडीच्या अतिदुर्गम प्रदेशामध्ये त्यांच्यातही भरपूर कातडी, थंडीपासून रक्षण करण्यासाठी अधिक केस इत्यादि बदल झालेले दिसत होते.वाटेत एका ठिकाणी थोडा वेळ थांबलो..... सहज मागे बघितलं तर आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो; त्याच्यामागे विशाल बर्फाचे पर्वत दिसत होते.... अप्रतिम दृश्य......... अद्भुत नजारा........


आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता....


एका ठिकाणी थ्री इडियटस पॉइंट होता

पंक्चर झालेलं टायर बदलण्यासाठी वाटेत मोठं गावच नव्हतं. त्यामुळे थेट चुमाथांगपर्यंत यावं लागलं. बराच प्रवास आटोपला होता. दुपार झाली होती. इथे (दुसरं!) जेवण करून घ्यायचं ठरवलं. चुमाथांग हेही छोटंसंच गाव आहे. मुख्य रस्त्याच्या उजवीकडे काही दुकानं, गॅरेज आणि हॉटेल्स आणि हॉटेल्सच्या मागे सिंधू......... गंमत म्हणजे इथेही पनामिकसारखे उष्ण पाण्याचे झरे आहेत. त्या पाण्याच्या वाफा येताना दिसत होत्या....... पण त्या पाण्यामध्ये गंधक असावं असं वाटल्यामुळे फार वेळ पाण्याजवळ थांबलो नाही. हॉटेलमध्ये पर्यटकांची बरीच गर्दी होती. हॉटेल्स कमी असल्यामुळे जागाही कमी पडत होती. ह्या परिसरात मधून मधून सेनेचे युनिटस दिसतात. परंतु वाहतूक मोठ्या प्रमाणात जाणवली नाही.
अद्भुत नजा-यामध्ये बराच वेळ डुंबून व प्रवासामध्ये थोडा वेळ विराम घेऊन निघालो. टायरही नीट झालं होतं. आता पुढे माहे हे गाव आणि तिथून त्सोमोरिरी!!

माहे ह्या गावापाशीच एक पोलिस चेकपोस्ट होती. इथेसुद्धा सिंधू नदीवर ब्रिज आहे. वाईट हे होतं की, आम्ही नदी ओलांडून उजवीकडे गेलो आणि नदी आम्हांला सोडून सरळ पुढे गेली..... माहे ब्रिजची एक गंमत म्हणजे हा ब्रिज थ्री इडियटस चित्रपटामध्ये आहे. थ्री इडियटस चित्रपटातलं काही शूटिंग ह्या परिसरात झालं आहे. लेहजवळ आमीर खानच्या प्रेरणेने चालू असलेली एक शाळासुद्धा आम्ही रस्त्यावरून पाहिली होती. गाडीच्या धडधडधडडड आवाजासह माहे ब्रिज ओलांडल्यावर थ्री इडियटस चित्रपटात दाखवलेला भाग आहे... तिथे फोटो काढले. जवळची सिंधू नदी लांब जाण्याआधी जणू सम्मोहित करत होती.....
माहेपासून आत आल्यावर एका ठिकाणी आम्हांला एक गोव्याची गाडी दिसली. हीच गाडी आम्हांला पेंगाँग त्सोकडे जातानासुद्धा दिसली होती आणि संध्याकाळी परत जाताना दिसणार होती... इथून पुढे उंचच उंच बर्फाच्छादित पर्वत जवळ येत होते. परंतु रस्ता तुलनेने सरळ होता. मध्येच खाली जायचा; तर कधी वर चढायचा....... त्सोमोरिरीची ओढ लागलेली होती. ह्याच रस्त्यावर एक फाटा उजवीकडे वळतो व त्सोकारमार्गे लेह- मनाली रस्त्याला मिळतो. त्सो कार हासुद्धा एक त्सो; फक्त तो जरा लहान आहे. लेह- पांग रस्त्यावर लागणारा तंगलंगला हा एक ‘ला’ ह्या रस्त्याने गेल्यास लागत नाही. मनाली रस्ता बंद असल्यामुळे पांगवरून परत येणारे बरेच लोक ह्या मार्गाने येत होते.

मध्येच काही भाग खोलगट पठारासारखा होता. परत मधून मधून चढ. परंतु तरीही एकूण रस्ता कमी वळणावळणाचा होता. अर्थात दुर्गमतेमुळे व रस्त्याच्या कमी रुंदीमुळे अखंड सावधानता अनिवार्य होती. त्सो मोरिरीच्या जवळ आलो, तसा पक्का रस्ता संपला. त्सो मोरिरीला जाताना शेवटचा टप्पा कच्चा रस्ता आहे. ह्या कच्च्या रस्त्यामध्येसुद्धा जवळचा रस्ता कोणता ते हैदरभाईंना माहीत होतं!

त्सो मोरिरीच्या आधी एक सुंदर सरोवर आहे... जणू त्सो मोरिरीची उंची बघण्यासाठी आपले डोळे व मन तयार व्हावं, म्हणूनच ते “तिथे” आहे..... छोटंच असलं तरी वेड लागण्यासाठी तो पुरेसा नजारा होता....

आणि आला..... त्सो मोरिरीचा अद्भुत अविष्कार.. शब्दांनी, वाक्यांनी कमीपणा आणण्यापेक्षा ही झलकच चांगली...


पेंगाँगसारखंच त्सो मोरिरीचं दर्शन

हवामान काहीसं ढगाळ असलं तरीही त्सो मोरिरीमध्ये भरपूर वेगवेगळ्या रंगछटा दिसत होत्या. त्सो मोरिरी पेंगाँगपेक्षाही किंचित जास्त म्हणजे जवळजवळ ४५९५ मीटर्स उंचीवर आहे आणि तो संपूर्णपणे भारतीय भागात व आपल्या नियंत्रणातील प्रदेशात आहे..... विशेष म्हणजे ह्या पाण्यामध्ये जैव विविधतासुद्धा दिसते.
निळा शुभ्र!!
जलतरंग!!


स्वर्ग


ह्या सर्व सुंदर फोटोजचं श्रेय माझ्या मित्रद्वयांच....


लाटा!!


पेंगाँगप्रमाणेच इथेही पर्यटक मुक्काम करू शकतात. त्यासाठी तंबू व घरामध्ये सोय हे पर्याय असतात. विदेशी पर्यटक येत असल्यामुळे दर तसे जास्त असतात. बरेच जण तंबूपेक्षा घरामध्ये राहणं पसंद करतात; कारण ते स्वस्त पडतं. कार्झोक गावही तसं त्या मानाने त्या ठिकाणी मोठंच म्हंटलं पाहिजे. बरेच हॉटेल्स होते. एका हॉटेलमध्ये जेवण केलं. इथे थंडीचा फार जास्त त्रास झाला नाही.

त्सो मोरिरी हा सीमेपासून व बळकावलेल्या प्रदेशापासून थोडा दूर व अंतर्भागात असल्यामुळे इथे काही निर्बंधांसह मानवी व्यवहार चाललेले दिसतात. काही बांधकामं दिसत होती. इथल्या नैसर्गिक विविधतेमुळे हा परिसर संरक्षित जलाशय क्षेत्र म्हणून घोषित केला गेलेला आहे. थ्री इडियटसमधला शेवटच्या प्रसंगांपैकीचा एक प्रसंग इथेच चित्रित करण्यात आला आहे. ह्या निमित्ताने तरी लदाखच्या अतुलनीय सौंदर्याची ओळख लोकांना होत आहे.

दिवसभर मोठा प्रवास करायचा असल्यामुळे फार वेळ थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे दीड तास थांबून व जेवण करून परत फिरलो..... तो अनुभव, तो प्रसंग शब्दांच्या पलीकडे आहे.....


लदाख बघायला लवकर या!!


फोटो घेणा-याची ही कमाल.... मी तो हमाल... भारवाही


ही वाट दूर जाते......
..
येताना आधीच्या सरोवराचा नजाराही परत पाहिला आणि मग सरळ पुढे आलो. माहेच्या काही अंतर आधी
हैदरभाईंनी डोंगरात आम्हांला काही ठिपक्यांची रांग दाखवली. जवळ गेल्यावर कळालं की त्या केसाळ मेंढ्या होत्या. तिबेटी जंगली घोडेसुद्धा दिसले. पुढे माहेच्या आधीच्या एका छोट्या गावामध्येच आम्हांला गोव्याची गाडी रस्त्यावर सोडून दिलेली दिसली. पेंगाँगच्या जवळच आम्हांला अशी एक बुलेट दिसली होती. हैदरभाईंनी अशा वाहनं बिघडलेल्या लोकांना मदत केल्याचं सांगितलं होतं.माहेचा ब्रिज ओलांडला व परत सिंधू नदीजवळ आलो. तिथल्या चेकपोस्टवर थोडा वेळ थांबलो.... संध्याकाळची वेळ आणि सिंधू नदीचा निनाद!!! काही क्षण तिथे थांबून निघालो.

त्याचवेळी चेकपोस्टच्या पोलिस अधिका-याने आमची ओळख एका व्यक्तीशी करून दिली आणि ती व्यक्ती आम्ही वारंवार बघितलेल्या गोव्याच्या गाडीचा चालक होती... त्यांची गाडी मनालीचा रस्ता बंद असल्यामुळे परत लेहला जाताना माहेच्या जवळ अचानक बंद पडली होती. तेव्हापासून त्यांचे खूप हाल झाले होते. विशेष म्हणजे गाडी अत्यंत मोठी असून त्यांच्यासोबत एकही सहप्रवासी नव्हता आणि ते भयाण अशा लेह- मनाली प्रवासाला निघाले होते...... मग त्यांना सोबत घेऊन आम्ही लेहच्या दिशेने निघालो. दोन- तीन दिवस दुर्गम भागात अडकल्यामुळे, सर्वच संपर्क व सोबत तुटल्यामुळे ते अगदीच असहाय्य झाले होते.

ते कर्नाटकचे होते आणि लदाखमध्ये एका कंपनीच्या सर्विसवर होते. मग इतक्या दिवसांनी कोणी तरी भेटल्यामुळे त्यांनी त्यांची सर्व कर्मकहाणी आम्हांला सांगितली. त्यांची परिस्थिती बिकट होती; जवळजवळ अस्थिर होती. पण आम्ही सोबत आहोत, हे कळाल्यानंतर त्यांना धीर आला व मग ते रिलॅक्स झाले. कमीतकमी ते आता बोलून आपलं दु:ख हलकं करू शकत होते. कन्नडमधल्या एक- दोन वाक्यांचा उपयोग करण्याचं धाडस करून त्यांना आणखी आपलेपणा येईल, असा प्रयत्नसुद्धा करून बघितला!येतानाच्या प्रवासात आश्चर्याची व अर्थातच आनंदाची बाब म्हणजे ब-याच मोठ्या प्रमाणात आकाश निरभ्र झालं होतं. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीसुद्धा सहन होणार नाही, असा तीव्र सूर्यप्रकाश होता. लदाखमध्ये हवा विरळ म्हणजे सामान्य हवेच्या ६२% असल्यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट गॉगल्स वापरावेत, असं सांगितलं जातं.... पण त्यांचा वापरच करत नव्हतो; कारण मनात इच्छा होती; बघू तरी आपल्या शरीराची परीक्षा घेऊन.... ह्याच विचाराने चांगलामधून जाताना थंडीचे कपडे फार जास्त नव्हते वापरले; पण तिथे चांगलाच झटका बसला होता.........

येताना फारसे थांबलोच नाही. सिंधू नदीच्या व लहान मोठ्या स्मारकांच्या सोबतीने प्रवास सुरू राहिला. उपशी जवळ आल्यानंतर मात्र आकाशामध्ये परत ढगांचं प्रमाण वाढायला लागलं आणि नंतर पुढे तर ते खूप जास्त होते. लेह- मनाली रस्ता खुला झाला असेल, ही आमची आशा धुसर होत चालली..

उपशीमध्ये पोचेपर्यंत चांगली रात्र झाली होती. थोडावेळ थांबून लगेच निघालो. कारू गेलं तोपर्यंत गाडीमध्ये बरीच शांतता होती. सर्वच जण दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. कारू गेल्यानंतर एका ठिकाणी एक सैनिक खो खो सारख्या स्थितीमध्ये रस्त्यावरच बसलेला दिसला. दारू पिऊन बसला असेल, असं वाटत होतं; पण तो गणवेषात होता. हैदरभाईंनी त्वरेने गाडी उजवीकडे घेतली व आम्ही पुढे निघालो.... आणि त्याच वेळी लक्षात आलं की तोच शिंदे मोड होता; जिथे शिंदे ह्या सैनिकाचा आत्मा दिसत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे, असं हैदरभाई आधी एकदा म्हणाले होते........

लेहमध्ये रात्री ९ नंतर पोचलो. हॉटेलवर हसनजी व हुसेनजींना भेटायची तीव्र इच्छा होती. लेह- मनाली रस्त्याचं काय झालं, ते विचारायचं होतं. जेवताना व नंतरही खूप चर्चा झाली. लेह- मनाली रस्ता अजूनही बंद असून दिवसभरात पांगच्या पुढे कोणतंही वाहन गेलं नाही आणि मनालीहून दोन- तीन दिवसांपूर्वी निघालेले लोकही अजून आलेले नाहीत; ही माहिती मिळाली. इतकंच काय; ज्या २१ कलाकारांच्या गाडीच्या अपघातानंतर रस्ता असुरक्षित म्हणून बंद केला होता; त्यांचे पार्थिवसुद्धा रस्त्याने लेहमध्ये आणता आले नव्हते; शेवटी ते हेलिकॉप्टरनेच आणावे लागले.........

आता आम्ही परत जायचं कसं, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला. अर्थात आम्ही सिमलाहून केलेलं पुढच्या प्रवासाचं आरक्षण काही दिवस पुढेच होतं. तीन पर्याय होते:

१. अजून रस्ता सुधरण्याची वाट पाहायची. पण हसनजी व हुसेनजींनी सांगितलं की रस्ता कधी ठीक होईल, हे काहीच सांगता येत नाही; कारण तो रस्ताच अत्यंत बिकट आणि दुर्गम आहे. त्यामुळे वाट पाहण्यात अर्थ नाही. उलट वाट पाहिली आणि कदाचित हवामान आणखी बिघडलं तर लेह- श्रीनगर रस्ताही बंद होऊ शकतो. सर्वत्र मुसळधार पाऊस होत असल्याच्या बातम्या होत्या.
२. ज्या रस्त्याने आलो; त्याच रस्त्याने म्हणजे लेह- करगिल- श्रीनगर- जम्मु- दिल्ली असं परत जायचं. पण त्यात कोणालाच फार रस नव्हता; कारण नवीन बघायला मिळणार नव्हतं. परत जाताना करगिलपर्यंत वेगळ्या रस्त्याने जाऊ, असंही हसनजी म्हणाले.
३. तिसरा पर्याय म्हणजे लेहवरून विमानाने दिल्ली/ मुंबईला जायचं. ह्यामध्ये दिवस बरेच वाचले असते. पण खर्च खूप जास्त होता.

आमची फार इच्छा होती; की लेह- मनाली रस्त्यानेच जावं. काही वाहनं जर पुढच्या दिवशी जात असतील; तर आम्हीसुद्धा जावं, हीच इच्छा मनात होती. कारण हा अद्भुत बिकट मार्ग बघायचाच होता. कारण अजूनपर्यंत झालेला प्रवास तसा अर्धाच होता. म्हणून बराच वेळ आम्ही ह्यावर ठाम राहिलो. पण शेवटी हसनजीच म्हणाले, की हा मार्ग सुरक्षित नाही; तेव्हा ते आम्हांला तिथून जाऊ देणार नाहीत....

तेव्हा मग विमान प्रवासाची चौकशी करून बघावी असं ठरलं. इंटरनेट कॅफे १० वाजेपर्यंत चालू असल्याने त्या वेळेत ही माहिती घेऊन आलो. पुढच्या दिवशीच्या विमानाच्या काही जागा उपलब्ध आहेत, इतकी माहिती मिळाली. तरीपण निर्णय होत नव्हता. शेवटी दुस-या दिवशी सकाळी लवकर लेह- मनाली रस्त्याचा अंदाज घ्यायचा व विमानाची तिकिटं काय दराने मिळतात, हे बघून परतीच्या प्रवासाचा मार्ग ठरवायचा, असं ठरवलं. हो नाही करता करता विमानानेच जायचं असं ठरलं. कारण लेह- श्रीनगर- जम्मु- दिल्ली- पुणे/ मुंबई ह्या प्रवासाच्या खर्चापेक्षा लेह- मुंबई विमान प्रवास फार जास्त महाग नव्हता. शिवाय बरेच दिवसही वाचत होते. त्यामुळे सकाळी तयारी करून व सामान घेऊनच विमानतळावर जायचं ठरवलं...... हे ठरेपर्यंत मध्यरात्र ओलांडून गेली होती......

तोपर्यंत हसनजी व आम्ही हे पैशापुरते, कामापुरते संबंध असलेले लोक राहिलोच नव्हतो. जवळच्या मित्रासारखे झालो होतो. सर्व मदत, सर्व सहकार्य आम्हांला मिळत होतं. पहाटे गाडीसुद्धा तयार राहणार होती. हसनजी स्वत: आमच्यासोबत येणार होते. आम्हांलाही त्यांना एक प्रकारचा त्रास देण्यामध्ये वावगं वाटत नव्हतं....

लदाखच्या संपूर्ण प्रवासामध्ये सर्वत्र अत्यंत चांगले लोक मिळाले. साधे, आतिथ्यशील, मनमिळावू आणि सच्चे.... कोणतीच गोष्ट करणं जड गेलं नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणं म्हणजे तर आश्चर्यच म्हंटलं पाहिजे आजच्या जगात. कारण आम्ही कोण, कुठले, घाटेकाकांची एक ओळख सोडली तर आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण परके होतो. तरीही आम्हांला घरच्यासारखं वागवलं. हवं तसं आणि हवं तिथे फिरू दिलं आणि फिरवलं. आणि साधेपणा इतका, की हॉटेलच्या खर्चाचा ऍडव्हान्सही घ्यायला ते तयार नव्हते. नंतर द्या ना, काय फरक पडतो, असं म्हणायचे..... आज इतका साधेपणा, इतकं नितळ मन व विश्वास कुठे पाहायला मिळेल?

१६ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर झोपताना एक प्रकारे हा डाव अर्ध्यात सोडून जाताना वाईट वाटत होतं. जेमतेम अर्धा प्रवास झाला होता... अजून खूप काही बघायचं होतं..... आणि अजिबात अपेक्षा नसताना आम्ही निघून जात होतो..... परिस्थितीच थोडी अवघड झाली होती व फारसे पर्यायही नव्हते......... पण ह्याही पलीकडे दिवसभर काय बघितलं, गेले आठ दिवस काय बघितलं, त्याचा थरार मनात जाणवत होता........ एक नवीन विश्व बघितल्याचं समाधान वाटत होतं......
क्रमश:

पुढील भाग: “चुकलेल्या रस्त्यावरून” जाताना........