Tuesday, February 18, 2025

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर
✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक
✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!"
✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग
✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़"
✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी
✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण!
✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान
✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक


सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. १४ ते १६ फेब्रुवारीला त्र्यंबकेश्वरजवळ सत्यानंद योगदर्शन पीठ इथे हा सोहळा रंगला. सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असं स्वरूप असल्यामुळे ऑनलाईन काम करणारे अनेक जण त्यामध्ये सहभागी होऊ शकले. बिहार स्कूल ऑफ योगा अर्थात् BSY बद्दल लहानपणापासून ऐकलं होतं. मी ज्यांच्याकडून योग शिकलो ते स्वामी श्रीमूर्ती जी हे BSY चेच संन्यासी. शिवाय माझे बाबा व अनेक परिचित हे BSY चे साधक. त्यामुळे ह्या शिबिराची उत्सुकता होती. वेळ व दिवस जुळत असल्यामुळे शिबिर करायचं ठरवलं. हे शिबिर म्हणजे योग व ध्यानाशी संबंधित सर्व पंचपक्वान्न- अगदी आसन, प्राणायाम ते धारणा, ध्यान आणि कीर्तन- भजन अशा सर्व मिष्टान्नाची मेजवानीसारखं वाटलं. प्रत्येक गोष्टीमध्ये BSY चा ठसा जाणवत होता. तिथले परमाचार्य परमहंस निरंजनानंद सरस्वतींना जवळून बघण्याची संधी मिळाली. त्यांचे अनेक सत्र ऐकता आले!
 
त्र्यंबकेश्वरजवळ सत्यानंद योगदर्शन पीठ हा एका डोंगरावर असलेला आश्रम आहे! त्र्यंबकेश्वर! म्हंटलं तर नाशिकसारख्या शहरापासून अतिशय जवळ, पण तितकंच निसर्गामध्येही रममाण व म्हणून रमणीय! ह्या आश्रमात जातानासुद्धा पायवाटेचा एक छोटा ट्रेक करावा लागतो आणि आसपासचं निसर्ग वैभव आपल्याला मंत्रमुग्ध करतं! चढाची पायवाट चालून आपण शिबिरामध्ये पोहचतो तेव्हा प्राणायामाची सुरूवात झालेली असते! रिक्षा न घेता रोज चालतच जाणार्‍या माझ्या बाबांसोबत ह्या शिबिराचा आनंद घेता आला. मला योग उलगडून सांगणारे पहिले गुरू श्रीमूर्तीजींशी भेट होते! शिवाय परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेचे व इतरही ठिकाणचे अनेक योग साधक भेटतात! सगळं वातावरण अगदी योगमय! BSY मध्ये येणार्‍यांचं गुरूबंधू- गुरूभगिनी प्रमाणे आपुलकीने स्वागत होतं! अनेकांना ओळखीची मंडळी भेटतात. हळु हळु रंगत वाढत जाते. एक मैफिलच सुरू होते!
 
ह्या शिबिरामध्ये साधारण असे घटक होते- सकाळी ८ ते १० मध्ये योग आसन, प्राणायाम आणि ध्यानाचे काही प्राथमिक घटक. त्याशिवाय भजन- कीर्तन व प्रवचन. आणि दुपारी ३ ते ५ च्या सत्रामध्ये मुख्यत: ध्यान, प्रवचन व अनेक प्रकारे सत्संग असं स्वरूप होतं. सकाळचं जेवण १० नंतर लगेचच व संध्याकाळचं जेवण ५ नंतर. खरं तर फक्त चार- साडेचार तास हे सत्र असूनही त्याचा परिणाम खूप खोलवर जाणवत होता.

शिबिराच्या सुरूवातीला स्वामी शिवराजानंदांनी ताडासन, तिर्यक ताडासन व कटिचक्रासनाचा अभ्यास घेतला. श्वासाची त्याला जोड देऊन प्राणायामचाही अभ्यास त्यासोबत जोडला. त्याबरोबर सूक्ष्म शरीराच्या व्हिज्युअलायजेशनला जोडून धारणेचाही अभ्यास घेतला! अगदी तीन आसनं- पण त्यासोबत प्राणायाम व धारणाही झाली. ह्या आसनांची मस्त उजळणी झाली. सूर्यनमस्काराच्याही सूचना त्यांनी दिल्या. एकट्याने योग करणं व जवळ जवळ हजार लोकांच्या उपस्थितीत आणि उच्च साधक व सिद्धांच्या उपस्थितीत करणं ह्याचा मोठा फरक पडतो. इतक्या मोठ्या लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, पाणी, जेवण, मंचावरचं दिसावं म्हणून भरपूर स्क्रीन्स व स्पीकर्स अशी सगळी जय्यत तयारी. शिबिरार्थी हजार एक लोक असतील तर निदान दोनशे लोक तरी व्यवस्थेतले व्हॉलंटीअर्स असावेत. पहिल्या सत्राच्या विरामानंतर ह्या योग पीठाचा परिसर बघितला. इथे साधकांसाठी वेगवेगळे कक्ष आहेत. शिवाय स्वामी शिवानंदजी, स्वामी सत्यानंदजी ह्यांच्याही प्रतिमा असलेले ध्यान कक्ष आहेत. आसपास सगळा रमणीय परिसर आहे.

दुपारच्या सत्रामध्ये परमहंस निरंजनानंदजींची वाणी ऐकायला मिळाली. आज काल आपण इंटरनेटवर बघतो त्या गुरूंपेक्षा खूप वेगळे वाटले. अतिशय परखड. कठोर. त्यांचं एक वाक्य- इथे कोणी असं असेल ज्याला वाटत असेल की त्याला आसनं येतात तर त्याने उठून बाहेर जावं! किंवा आज लोक संन्यास घेतात, दोन वर्षांमध्ये संन्यास वेष मिळतो व लगेच ते त्यांचे योग क्लासेस सुरू करतात, जणू दुकान उघडतात. BS‌Y च्याच अनेक साधकांना पचवायला जड जाईल अशी परखड वाणी!‌ पण त्याबरोबर त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, त्यांचे गुरू- सत्यानंदजींनी कसा त्यांचा ज्ञानाचा भ्रम दूर केला होता. कशी त्यांना जाणीव करून दिली होती की, त्यांनी योगामध्ये अजून खूप खोलवर जायचं बाकी होतं. स्वामी निरंजनानंदजी इथे प्रत्यक्ष अर्थाने उपस्थित होते, तर स्वामी सत्यानंदजी अपरोक्ष प्रकारे उपस्थित होते असंच वाटत होतं. कीर्तन, भजन, त्यांच्या आठवणी, त्यांच्या जीवन व कार्यातले प्रसंग दाखवणार्‍या फिल्म्स ह्यामधून त्यांची उपस्थिती सतत जाणवत होती.



 

संपूर्ण शिबिरामध्ये अशी पंचपक्वान्नांची मेजवानी पुढेही सुरू राहिली. BSY चे लोक खूप उदार आहेत. प्रसाद म्हणून पुस्तकं त्यांनी दिली. साधनेसाठी लागणार्‍या गोष्टी प्रसाद म्हणून दिल्या. घेणा-याची झोळी कमी पडावी इतके ते देत होते. पण ह्या शिबिराचा खरा केंद्रबिंदू अर्थातच स्वामी निरंजनानंद सरस्वती! त्यांच शिबिर स्थळावर येणं, बसणं, बोलणं! त्यांच्या बोलण्यातली डेप्थ आणि गहनता! मला तर ह्या शिबिराचं खरं USP हे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण असणं हेच वाटलं. सत्संग ज्याला म्हणतात. गुरू की मौजुदगी! आजच्या काळातले परमहंस असूनही त्यांचा साधेपणा, इतरांबद्दलचा आदर! त्यांची इतकी उंची असूनही त्यांच्यामुळे कोणतंही दडपण न येणं! अवघड आसनाच्या स्थितीमध्ये दोन श्वास जास्त थांबवल्यावर त्यांचं "मै कभी कभी गिनती भूल जाता हूँ" म्हणणं! कीर्तनाच्या वेळी त्यांचं रंगून गाणं म्हणणं! किंवा एखादा मोठा विचार सहजपणे सांगणं! स्वामीजी म्हणाले की, मला अजिबात नमस्कार किंवा चरणस्पर्श करू नका. तर फक्त हे "चार मिले चौसठ खिले, बीस करे जोड़" करा! चार मिले म्हणजे माझे दोन डोळे व तुमचे दोन डोळे एकमेकांना भेटतात. चौसठ खिले म्हणजे बत्तीस दातांनी दोघंही प्रसन्नपणे हसतात. आणि बीस करे जोड़ म्हणजे दोन्ही हातांची दहा- बोटं घेऊन दोघंही एकमेकांना नमस्कार करतात. आणि हे होतं तेव्हा शरीर आनंदित होतं, मन प्रसन्न होतं व शरीरातल्या ७२ हजार नाड्या प्राणवान होतात.

स्वामीजींनी योगाच्या प्राथमिक गोष्टीही खूप सुंदर सांगितल्या. “प्रसन्नता" हा त्यांनी योगासाठीचा पहिला आवश्यक नियम म्हणून सांगितला. प्रसन्नता हे असं कवच आहे जे अनेक विकार व दोष दूर ठेवू शकतं! त्यांनीच HOPE शब्दाची अशीही व्याख्या सांगितली- Having Only Positive Expectations! शिबिरामध्ये प्रसन्न होण्यासाठी एक नाही‌ तर असंख्य साधनं आहेत! सतत लावली जाणारी सुमधूर गीतं! कीर्तन- भजनामधली ऊर्जा व प्रफुल्लता! अतिशय अर्थपूर्ण व ध्यानाला खोलवर नेणार्‍या ओळी! काही इन्स्ट्रुमेंटल संगीत! त्या गाण्यांमधली गहराई व भाव! काही कीर्तनं व गीत अशी होती-

शिवोsहम् शिवोsहम्- वही आत्मा सच्चिदानन्द मैं हूं

शम्भू मुरारी शंकर मुरारी

जय जय गंगे जय हर गंगे (गंगा स्तोत्रम्)

हे ईश्वर हे परमात्मा अंतर्यामी तुझको प्रणाम

जया गुरू शिवानन्दाय

पुढचे दोनही दिवस सकाळी भरपूर आसनांचा व प्राणायामांचा सराव झाला. त्यातल्या अनेक गोष्टी स्वामी निरंजनजी उलगडून सांगत होते. योगाभ्यासामध्ये साधक कोणत्या चुका करतात, काय केलं नाही पाहिजे तेही सांगत होते. त्यांची भाषा अजिबातच बोजड वाटली नाही. अगदी हसत खेळत आणि आधुनिक भाषा! त्यासोबत अधून मधून साधकांना काढलेले चिमटे आणि हास्यविनोद! त्याबरोबर त्यांच्या स्वत:च्या साधनेतले अनुभव! हातामध्ये जपमाळ घेऊन एक पूर्ण आवर्तन होईपर्यंत तिच्याकडे श्वासाची व स्पर्शाची सजगता टिकवणं किती कठीण हे त्यांनी सांगितलं! आपणसुद्धा जर एक पूर्ण मिनिटभर सेकंदकाट्याकडे बघायचं ठरवलं तर बघू शकत नाही! तिथून धारणा सुरू होते. ध्यान टिकवण्याची सवय लागते. स्वामीजींच्या बरोबर इतरही संन्यासिनी व आयोजकही अधून मधून मोजकं बोलायचे व स्वामीजींना साथ करायचे. 





स्वामीजींच्या सांगण्यात आलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अध्यात्मामध्ये प्रेम किंवा करूणापेक्षा समझ (अंडरस्टँडिंग) आणि जागरूकता जास्त महत्त्वाचं आहे. ज्याला समझ असेल व जागरूकता असेल तो आपोआप प्रेम करेल, करूणा करेलच. ते विकसित कसं केलं पाहिजे हे त्यांनी उलगडून सांगितलं. मनाच्या सवयी कशा मोडाव्या लागतात, मनाला कसं हळु हळु वळण लावावं लागतं हे त्यांनी सुंदर सांगितलं. ते स्वत:च साधक असताना त्यांना पहाटे उठता येत नव्हतं. दिवस उजाडल्यावरच ते उठायचे. आणि मग जिद्दीने पहाटे ४ चा गजर (अलार्म) लावायचे. पण तसंही थोडे दिवस उठल्यावर परत सवय आड यायची. परत उठणं व्हायचं नाही. इतकं की त्यांचे गुरू- बंधू त्यांची खाट बाहेर रस्त्यावर नेऊन ठेवायचे तेव्हा त्यांना जाग यायची! शेवटी खूप विचार करून त्यांनी ठरवलं की रोज फक्त ५ मिनिट लवकर उठत जायचं. म्हणजे ते ६ ला उठायचे, म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी ५.५५ चा अलार्म लावला. थोडेच मिनिट असल्यामुळे ते उठता आलं. मग पुढच्या दिवशी ५.५० चा अलार्म. असं करत करत रोज मनाला थोडं वळण लावत नेलं, हळु हळु सवय वाढवत नेली. टप्प्या टप्प्याने आहिस्ता आहिस्ता- Slow but steady करत त्यांनी दोन महिन्यांनंतर पहाटे उठण्याची सवय विकसित केली! त्यांचे गुरू सत्यानंदजी म्हणायचे तसं- मनाला सोबत घेऊन. मन को पकड़ना भी नही और छोड़ना भी नही! ह्याच पद्धतीने त्यांनी साधकांनाही एक सूत्र दिलं- तुम्ही जितके क्षण- जितके मिनिट प्रसन्न असाल त्यात रोज दोन मिनिट वाढवत न्या. रोज थोडे क्षण जास्त प्रसन्न व्हा!

स्वामीजींनी त्यांच्या साधनेच्या अनुभवाबरोबरच त्यांच्याही गुरूंच्या अनुभवही सांगितले. विविध फिल्म्स, मुलाखती, ऑडिओज व फोटोजद्वारे गुरू कसे होते, कोण होते, हे दाखवलं! त्यांचे गुरू एके काळी साधक म्हणून कसे हट्टी होते. भारताच्या फाळणीमुळे अस्वस्थ होऊन संन्यास सोडायला निघाले होते, पण त्यांच्या गुरूंनी- स्वामी शिवानंदांनी त्यांना कसं हळु हळु पुढे नेलं ते त्यांनी फार सुंदर सांगितलं! गुरूंबद्दल एक एक गोष्ट सांगताना, गुरूंसोबतच्या आठवणींना उजाळा देताना व गुरूंनी कोणत्या उद्दिष्टासाठी आयुष्य वाहून घेतलं होतं व मी आज जो आहे तो त्यांच्या आशीर्वादाने व कृपेने आहे हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. स्वामी निरंजनजी इथल्या साधकांचे गुरूही असले तरी तितकेच खोल शिष्य आजही आहेत हेच जाणवत होतं. एकाच वेळी गुरू व शिष्यत्वाचं मूर्तिमंत उदाहरण अनुभवायला मिळत होतं!

असा हा सोहळा रंगला! साधकांची मांदियाळी रमली! एक मैफिल रंगली. तिथे केलेले आसनं, प्राणायामाच्या टेक्निक्स, मंत्रानुसार केलेले प्राणायाम व योग निद्रा ध्यान खूप छान वाटले! प्राणायामाच्या संदर्भात तर स्वामीजींनी सांगितलं की, आपल्या फुप्फुसांची श्वास घेण्याची क्षमता पाच लीटर असते, पण आपण जेमतेम ५०० मिली श्वास घेतो व त्यातही फक्त ३५० मिली श्वास आपल्या फुप्फुसापर्यंत जातो! ही क्षमता आपण जितकी जास्त वापरू तितकं आपलं शरीर नव्हे जीवन तेजपूर्ण होईल, प्रफुल्लित होईल. हे अनुभवताना खरंच जाणवलं की, आपलं शरीर म्हणजे किती मोठं अद्भुत यंत्र आहे! बाहेरून आपण घेतो तो श्वास किंचित शीतल असतो. अक्षरश: दहा सेकंदांमध्ये आपण तो उच्छ्वास म्हणून बाहेर सोडतो तेव्हा तो थोडा गरम झालेला असतो! तोच श्वास पण आपल्या शरीर यंत्रणेने पूर्ण शरीरभर त्याचं अभिसरण केलेलं असतं! किती कमाल आहे ही! त्याबरोबर स्वामीजींनी हेही सांगितलं की, जितकी आपण आसक्ती किंवा पकड ठेवू तितका ताण होतो. अगदी श्वासाच्या संदर्भातही. जितका श्वास आपण बाहेर सोडून देऊ शकू, जितका श्वास जास्त वेळ बाहेर सोडलेला असेल तितका वेळ आपण रिलॅक्स होतो. Let go = relaxation.

अशा टेक्निक्स, पद्धती, आसनाचे व प्राणायामाचे प्रकार ह्या सगळ्यांच्या बरोबरीने बॅकग्राउंडला होणारी सूक्ष्म पण खरी मोलाची गोष्ट म्हणजे गुरू तत्त्वाची ऊर्जा व साधकांचं एकत्र येणं! त्यामुळेही खूप छान वाटलं. नवीन साधकांशीही परिचय झाले. जुन्या साधकांशी आणखी चांगली मैत्री झाली. साधनेमध्ये अगदी किरकोळ गोष्टीही कशी मदत करतात हे कळालं. योग निद्रा व शवासनाच्या वेळेस घोंगावत असलेल्या माशाही झोप लागू न देण्यासाठी मदत करत होत्या! सजगतेसाठी हातभार लावत होत्या! शिवाय फक्त आसन एके आसन किंवा फक्त लेक्चर असं न करता व्हिडिओज, फिल्म्स, संगीत- कीर्तन आणि त्याबरोबर कार्टून स्टोरीजद्वारेही खूप काही सांगितलं गेलं! असो! अनुभवावी अशी ही पर्वणी होती, इतकंच. अगदी समारोप करतानाही स्वामीजींनी सर्वांचे- सर्व व्हॉलंटीअर्स व साधकांचेही आभार मानले व मिस्किलपणे "I thank myself” असंही ते म्हणाले!

आणि एकीकडे ही‌ मेजवानी सुरू असताना उरलेल्या वेळामध्ये त्र्यंबकेश्वर बघता आलं. गौतमी तळं बघता आलं! वाटेतली गोदावरी नदी! नदी वाटतच नव्हती. नालाच वाटत होता तो! जेव्हा काम नवीन सुरू असतं, सुरूवातीच्या टप्प्यावर असतं तेव्हाची स्थिती ती जणू दर्शवत होती! कुठे ही नाल्यासारखी गोदावरी व कुठे महाराष्ट्र- तेलंगण सीमा असलेली गडचिरोलीतली प्राणहिता संगमावरची विराट गोदावरी! असो! योग फार सुंदर होते. त्यामुळे ब्रह्मगिरीचा नितांत सुंदर ट्रेकही करता आला. गोदावरीचं उगमस्थान बघता आलं! केवढा तो विराट पर्वतरांगेचा परिसर! तिथे वाटेतल्या माकडांची फारच भिती घातली जात होती. पण त्यांनी काहीच त्रास दिला नाही. त्याउलट प्लॅस्टीकच्या बाटल्या फेकणारेच जास्त भितीदायक वाटले! असा हा योग शिबिराचा व निसर्गाच्या सत्संगाचा सोहळा झाला. 




आणि हो! त्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल सांगायचं राहिलं! त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा जायचं ठरलं तेव्हा हॉटेल शोधत होतो. BSY कडून आश्रमात योग वर्ग होता व भोजन व्यवस्था होती. पण राहण्याची सोय प्रत्येकाला करायची होती. त्यासाठी पर्याय शोधत असताना गजानन महाराज् संस्थानची माहिती कळाली. त्याचं ऑनलाईन बूकिंग होत नाही, हेही कळालं. पण इंटरनेटवर शोधलं तर वेबसाईट मिळाली. त्यावर एन्क्वायरी केली तर लगेच रिप्लाय आला व डिटेल्स सांगितले. सगळं विचारून मग बूकिंग करायचं ठरवलं. त्यात त्यांनी (म्हणजे संस्थानच्या वतीने बोलतो आहोत असे सांगत होते त्यांनी) घाई करून आजच बूकिंग करा सांगितलं. कधी कधी आपल्या बुद्धीला ग्रहण लागतं तसं झालं. संस्थानचा माणूस हिंदीत का बोलेल? इतका डेस्परेट का होईल? व्हॉटसअप कॉल का करेल? गूगल पे ची लिंक दिलीय ती संस्थानच्या नावाने नसून व्यक्तिगत नावाने का आहे? बरं संस्थानचंच असेल तरी जानेवारी 2025 मध्ये जॉईन केलं असं का दिसतंय? इतके प्रश्न पडून व मनामध्ये शंका येऊनही बुद्धी जणू ग्रहणामुळे झाकलेली होती म्हणून त्या नंबरवर पैसे पे केले. जणू वाटलं की, हे संस्थानचे लोक असं कसं करतील? किंवा माझ्या बाबतीत असं कसं होऊ शकेल? आणि मग पेमेंट केल्यावर त्यांनी सांगितलं की, पेमेंट असं असं दोन अमाउंटमध्येच झालं पाहिजे, परत करा. आधी तुम्ही रिफंड करा, मग करतो म्हणालो तर ते ऐकत नव्हते. तेव्हा मात्र कळालं की, अरे रे! आपण माती खाल्ली! पाच हजार रूपये अक्कलखाती पाठवले! आधी वाईट वाटलं. धक्का बसला. पण मग थोडी सजगता आली. होश आला. की अरे, असेल आपला कुठला बाकी राहिलेला हिशेब! कधी आपण घेतले असतील कोणाचे. ते वेगळ्या मार्गाने लाईफने चुकते केले असतील!

जेव्हा सायबर सुरक्षा एक्स्पर्टशी बोललो तेव्हा त्यांनी तर सांगितलं की कम्प्लेंट करा, पण त्यामुळे काही होणार नाही. ढिगाने तक्रारी पडून आहेत. म्हणून तर हे सारखे कॉलवर सांगत आहेत! संस्थानच्या काही लोकांपर्यंत हा विषय पोहचवला. शिवाय दोन तास प्रयत्न करून सायबर सेलवर कशीबशी तक्रार दाखल केली. त्यातही खूप अडथळे! नंतर तक्रार पोलिस ठाण्याकडे हस्तांतरित झाली इतकं कळालं. पुढे संपर्क केला तर फोन घेतला नाही. संस्थानवाल्यांनी तरी काही हालचाल करावी असं वाटलं. कारण त्यांचंच नाव व त्यांचीच इमेज वापरून हे लोक फसवतात ना. आणि संस्थानच्या लोकांना माहितीसुद्धा आहे. पण ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाही! अप्रत्यक्ष प्रकारे संस्थानचा ह्या फसवणुकीशी संबंध आहे व त्यांनी ह्यावर काही कारवाई केली पाहिजे, अशी फक्त माझ्या मनातली इच्छा आहे! असो! आणि हो, हे झालं त्या रात्री निवांत झोप लागली. जीवन त्याच्या मार्गाने गोष्टी करत असतं. कधी कधी भला भला माणूस चकतो, कधी मुरलेला खेळाडू नवख्याला विकेट देत राहतो!

पण हे शिबिर झाल्यावर मात्र आता त्या गोष्टीचं काही वाटत नाही. तिथे इतकं काही मिळालं की, हे नुकसान किरकोळ म्हणावं लागेल. फसवणुकीचा अनुभव सांगण्याचा उद्देश इतकाच की लोकांनी सावध व्हावं. कोणी पेमेंटसाठी फार डेस्परेट होत असेल, सारखे कॉल करत असेल तर सावध व्हावं. वेबसाईटवर "S (https)” आहे का हे तपासावं. बाकी वेबसाईटसचे कंटेंट तपासावेत. पेमेंट कोणाच्या नावाने आहे हे पाहावं. आणि मुख्य म्हणजे "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" क्षण अन् क्षण जागेपणा- होश- सजगता! हाच ध्यानाचा गाभा आहे. आणि समोरचा प्रसंग- समोरचा कसाही वागला तरी साधकाने नेहमी ते inside out च बघायचं असतं. स्वत:च्या कर्म संस्काराचं फल म्हणून बघायचं असतं. असो. लेखणीला विराम देतो. योगाच्या भाषेत हरि ॐ तत् सत्!
 
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या वरच्या ब्लॉगवर ध्यान, सामाजिक उपक्रम, फिटनेस, ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, आकाश दर्शन इ. बद्दलचे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक १८ फेब्रुवारी २०२५.)

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!