लदाखची भ्रमणगाथा: भाग ४
कारगिलच्या दिशेने......
काल सिक्कीम- पूर्वोत्तर- तिबेट- नेपाळ- बिहार- बंगाल ह्या विस्तृत प्रदेशात मोठा भूकंप झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचा भाग लिहितोय. खरोखर सिक्कीम- तिबेट (हिमालयाचा मध्य आणि पूर्व भाग) अत्यंत दुर्गम आहे. तिथे नेहमीच दळणवळण बिकट असतं, आता तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. भूकंप झाल्यावर कित्येक तास बंद असलेला गंगटोकला जाणारा मार्ग सुरू करण्यात आला व आता विपरित हवामानामध्ये बचाव कार्य चालू आहे. माणूस निसर्गासमोर कोणीही नाही, नगण्य आहे, ह्याची प्रचिती वेदनादायक प्रकारे देणा-या ह्या घटना....
आमचं नशीब चांगलं असल्यामुळे मानव निसर्गासमोर नगण्य आहे, ह्याची प्रचिती आम्हांला वेदनादायक प्रकारे न येता अत्यंत रोमांचक आणि रमणीय प्रकारे आली.... नऊ ऑगस्टला दिवसभर श्रीनगरदर्शन केल्यानंतर दुस-या दिवशी लवकर निघायचं, ह्या विचाराने रात्री लवकर झोपलो. मनामध्ये प्रचंड उत्तेजना होती आणि हे लिहिताना ती अजून जाणवते आहे....
आम्ही दल सरोवराच्या समोर श्रीनगरच्या एका बाजूला होतो आणि लेहकडे जाणारा रस्ता समोरूनच जात होता. त्याच रस्त्यावरून सकाळी साडेसहाच्या सुमारास निघालो. आमचे प्रवास एजंट हसनजी आलेच होते. त्यांच्यासह त्यांचे आणखी एक सहकारी होते. ते दोघं आणि आम्ही तिघं असे टेम्पोमधून निघालो. सोनामार्गच्या पुढे जाताना परमिशन लवकर मिळावी, ह्यासाठी वेळेची थोडी शर्यत होती.
आधीच्या दिवशी आम्ही जिथून उद्यानांमध्ये फिरायला गेलो, त्याच रस्त्यावरून पुढे आलो. परत एकदा दल सरोवराला मोठा वळसा घातला. काय प्रसंग होता तो.... सकाळी सकाळी प्रसन्न हवा आणि दल सरोवर..... शब्द, फोटो, इत्यादि माध्यमं शून्य होऊन जातात..... दल सरोवराला लागून लागूनच पुढे जात राहिलो. डावीकडे आधी दूरवर दिसणारी प्रसिद्ध हजरतबाल मस्जिद जवळ येऊन गेली. पुढे फार वस्ती नव्हती. काही सुरक्षा रक्षकांचे युनिटस होते. त्यानंतर लवकरच आम्ही श्रीनगरच्या बाहेर पडलो.
आणखी पुढे गेल्यावर श्रीनगरच्या उत्तर- पश्चिमेहून येणारा महामार्ग लागला. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून येतो. काश्मीरच्या प्रवासाचं वर्णन करताना काही गोष्टी इथेच स्पष्ट कराव्याशा वाटतात. काश्मीरमध्ये आपण नेहमीच ऐकतो की सरहदीपलीकडून (किंवा सीमेकडून, बॉर्डरकडून) गोळीबार झाला, श्रीनगर- लेह रस्ता बॉर्डरला लागूनच जातो इत्यादि. ह्याबद्दल वस्तुस्थिती स्पष्ट माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.
ह्या नकाशात दिल्याप्रमाणे व खरं तर त्याहीपेक्षा अधिक आज काश्मीर थोडं भारताच्या आणि जास्त पाकिस्तान व चीनच्या ताब्यात आहे. आणि दोन्हीमधील (भारतीय नियंत्रणातील काश्मीर व पाकव्याप्त- पीओके आणि चीनव्याप्त- सीओके) सीमारेषा ही सीमा नसून नियंत्रण रेषा आहे, ताबा रेषा (लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल) आहे. आणि आपण एकदा जम्मुच्या उत्तरेला गेलो, की आंतर्राष्ट्रीय सीमा जाते आणि नियंत्रण रेषेलगत आपला प्रवास सुरू होतो. ह्या दोन्ही रेषांमधला फरक समजवून सांगायची गरज पडते आहे. आपल्याच देशामध्ये एका ठिकाणी जाताना ताबा रेषा येते आहे. ह्याचाच अर्थ आपण आपल्या देशाचा काही (बराच मोठा) भाग तात्पुरता असेल (गेल्या ६० वर्षांपासून...) पण गमावून बसलो आहोत. खरं तर आपण गिलगितच्या पलीकडे किंवा काराकोरम पासच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला सीमा लागायला हवी. पण ती सीमा नियंत्रण रेषेच्या स्वरूपात आपल्या देशाच्या मस्तकाच्या मुकुटाच्या भागात घुसली आहे.
आज जेमतेम एक तृतीयांश काश्मीर आपल्या प्रत्यक्ष नियंत्रणात आहे. वरील चित्रावरून पुरेशी कल्पना येतेच. अर्थात ते आंतर्राष्ट्रीय माध्यमातून घेतलं असल्याने त्यात परिभाषा वेगळी वापरली आहे.
तर इथून पुढे सर्व प्रवासात सातत्याने नियंत्रण रेषा बाजूला होती. सुरुवातीला पीओकेच्या बाजूची व नंतर लेहच्या पूर्वेला गेल्यावर सीओकेची. ही नियंत्रण रेषा म्हणजे खरं मोठी शोकांतिका आहे, जी १९४७ च्या डोमेलपासून झालेल्या चकमकीपासून १९९९च्या कारगिल युद्धापर्यंत व पुढेही सुरूच आहे. शोकांतिका, नव्हे शोकांतिकेची अंत नसलेली मालिका म्हणावं लागेल. कटरा फाटा सोडल्यावर लागलेलं डोमेल आणि आता जात होतो ते कारगिल, अशा ह्या शोकांतिक प्रदेशात आमचा प्रवास सुरू होता. हा विषय अत्यंत मोठा आहे आणि इथे थोडक्यात त्याची जाणीव असणं आवश्यक वाटलं. देशातलं अत्यंत कठोर वास्तव आपण दृष्टीआड करून चालणार नाही.
आणखी एक मुद्दा म्हणजे अनेक वेळा लेह- लदाख असा उल्लेख केल्यामुळे अनेकांचा समज होऊ शकतो, की लेह- लदाख ही एकाच ठिकाणची नावं आहेत. प्रत्यक्षात लदाख हा काश्मीरमधला अत्यंत विस्तृत प्रदेश आहे. इतका विस्तृत, की काश्मीरचं नाव जम्मु आणि काश्मीर असं नाही तर ते जम्मु, काश्मीर आणि लदाख असं असायला हवं. मध्य आणि पूर्व काश्मीर (भारताच्या नियंत्रणातलं आणि काही प्रमाणात पीओके आणि सीओकेसुद्धा) म्हणजे लदाख आणि त्याच्या दक्षिणेला असलेला काश्मीरचा भाग म्हणजे झांस्कर. म्हणजेच लदाख हा एक विभाग आहे आणि लेह हे ह्या विभागाचं मुख्यालय आहे. मराठवाडा- औरंगाबाद प्रमाणे. लेह शहर आहे व तो लदाख विभागातला सर्वांत मोठा जिल्हासुद्धा आहे. लदाख हा विस्तृत परिसर आहे. कारगिल जिल्ह्यापासून लदाखची सुरुवात होते. लदाखमध्ये मुख्यत: बौद्ध व शिया वस्ती आहे. ही माहिती अधिक स्पष्टतेसाठी आवश्यक आहे. आपल्या देशाबद्दल आपल्याला इतकी माहिती असलीच पाहिजे.
.......... सकाळी सकाळी श्रीनगर गेल्यानंतर शांत रस्त्यावर अर्थातचे हे विचार मनात फारसे येत नव्हते. कंगन हे गाव मागे गेलं आणि आता अनोख्या प्रदेशातली रमणीय सफर पुढे चालू झाली. हिरवीगार शेतं दिसत होती. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात शेती काश्मीर व जम्मु विभागातच आहे. ही शेती हळुहळु कमी होत जात होती. डोंगरांची उंची सतत वाढत जात होती. दूरवर आणखी मोठे डोंगर दिसत होते. मुख्य रस्त्यावरच डोंगरातून येऊन अनेक नाले मिळत होते. उंच चिनार वृक्ष दिसत होते. प्रत्येक क्षणाला थांबून त्या दृश्यात बुडून जावं असं वाटत होतं. अक्षरश: भान हरपून टाकणारा दिव्य निसर्ग होता तो. परंतु त्या परिस्थितीतही भानावर राहून माझे दोन्ही मित्र फोटो घेत होते. त्यांच्यामुळेच तिथल्या निसर्गाचा अणुमात्र का होईना पण एक भाग आपल्यापर्यंत ह्या फोटोंच्या स्वरूपात पोचवता येतो आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद,
वाटेत कित्येक ठिकाणी थांबावसं वाटत होतं. पर्वतातून ओघळणा-या नाल्यांनी नदीचं स्वरूप धारण केलं होतं. ती होती सिंध नदी (सिंधु नदी पुढे खालत्सीपाशी लेह महामार्गाला मिळते). बर्फाळ डोंगरमाथ्यावरून हिमालयाच्या चरणांवर उड्या मारत खाली आलेलं ते अत्यंत थंड पाणी होतं. वाटेत एका ठिकाणी एका टोलनाक्यासारखं काहीतरी होतं. आमच्या ड्रायव्हरनी काही पैसे देताना पाहिलं. नंतर कळालं, की ते पैसे कोणी मौलवीला दिले होते. त्यांच्या भागातून जात आहोत म्हणून...... वाटेमध्ये एक ट्रकही लागून गेला; ज्याच्या मागे लिहिलं होतं, “Togetherness is a dream, separation is the law...........”
एका ठिकाणी नदीचं पात्र जवळून दिसत होतं, तिथेच नाश्ता केला. आलू पराठे मस्त मिळाले. तिथे हॉटेलबाहेर पिवळ्या- निळ्या- लाल- हिरव्या रंगाच्या कापडाच्या पट्ट्या बांधलेल्या होत्या व त्यावर तिबेटी लिपीमध्ये काही लिहिलं होतं. आमच्या पुढच्या प्रवासात सर्व ठिकाणी अशा पट्ट्या व त्यावरची लिपी दिसत होती. नंतर समजलं की ते तिबेटी मंत्र आहेत. ही पद्धत तिबेटी प्रभाव दर्शवते. इथून पुढे तिबेटी प्रभावच जास्त दिसतो. हळु हळु हिंदु व मुस्लीम प्रभाव तितकेसे जाणवत नाहीत. श्रीनगरच्या पुढे एकदा कंगनसारखी गावं सोडल्यावर हिंदु नावं फारशी दिसली नाहीत. हॉटेलचा स्टाफसुद्धा मजेशीर होता. मिश्र- चेहरेपट्टी. कोणी पठाणी, कोणी चिनी वळणाचे दिसत होते. युरोपियन लोकांप्रमाणे लाल गोरी छटासुद्धा ब-याच प्रमाणात दिसत होती.
पुढे एका ठिकाणी पाणी घेण्यासाठी थांबलो. काश्मीरमध्ये आणि विशेषत: लदाखमध्ये अजून एक
विशेष गोष्ट. चोरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. परस्पर विश्वासही फार मोठ्या प्रमाणात आहे. साधेपणासुद्धा खूप आहे. त्यामुळे इतकं पर्यटन होऊनही अजूनही साधेपणा जपलेला दिसतो. आमचे प्रवास एजंट व त्यांचे सर्वच लोक अत्यंत राजा पद्धतीचे माणूस होते. एकदम दिलदार व अत्यंत सज्जन. अगदी लेहमध्ये राहून एक- दोन दिवस होईपर्यंत त्यांनी आमच्याकडून प्रवास/ हॉटेलचा थोडाही ऍडव्हान्स घेतला नाही. आम्हांलाच फार झालं तेव्हा आम्ही त्यांना तो घ्यायला लावला. तोपर्यंत त्यांनी आमचा एक पैसाही घेतला नाही, मागितला तर नाहीच नाही. इतके विश्वास ठेवणारे लोक आज किती असतील?
हसनजी व त्यांचे सहकारी कारगिलचे होते. वाटेत त्यांना एक कारगिलला जाणारी गाडी भेटली, त्यामधून त्यांच्या ओळखीचे एक युवती आमच्या गाडीत शिफ्ट झाली. प्रवास पुढे चालू राहिला. श्रीनगरपासून ८१ किमीवर असलेलं सोनामार्ग जवळ येत होतं. तिथून पुढे घाटांचा प्रदेश लागतो व झोजिला, फोटूला असे घाट लागत जातात. तिबेटी भाषेमध्ये ‘ला’ म्हणजे घाट. असे हे सर्व ला घाट आहेत. अगदी झोजिला, खार्दुंगला पासून थेट सिक्किमजवळ नत्थुला पर्यंत व पुढेसुद्धा. लदाख म्हणजे ला-दाख, अर्थात घाटांचा प्रदेश. सोनमर्ग किंवा सोनामार्ग जवळ येत होतं आणि दूरवर उंच डोंगरामध्ये पांढ-या कापसासारखं काही तरी टांगून ठेवल्यासारखं दिसत होतं. लवकरच समजलं की तो बर्फ होता!! बर्फाच्या साम्राज्याला सुरुवात झाली होती.
अजून काही डोंगर चढून गेल्यानंतर सोनामार्ग आलं. गाव तसं लहानसंच आहे. ‘Indian army welcomes you in Sonmarg,’ अशी कमान होती. खरं तर असं स्वागत ग्राम पंचायत किंवा नगर परिषद ह्या प्रकारच्या स्थानिक सरकारकडून गेलं पाहिजे. पण इथे सेना स्वागत करते. काश्मीरमध्ये ब-याच प्रमाणात सेना प्रतिसरकार आहे, असं जाणवतं. सर्वत्र सेनेची उपस्थिती व संचार दिसतो. त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रियाही दिसतात.
सोनामार्ग लहानसं पण मोक्याचं स्थान आहे. कारगिल- लेहच्या दिशेने जाणारी व विरुद्ध बाजूला श्रीनगरकडे जाणारी वाहतूक इथे नियंत्रित केली जाते. टप्प्या टप्प्याने वाहनं सोडली जातात. मुख्य वाहतूक म्हणजे सेनेचे ट्रक्स- काफिले आणि मालवाहतूक करणारे ट्रक्स. त्यानंतर इतर प्रवासी वाहनांना जाता येतं. त्यासाठी सोनामार्गमध्ये मोठी पार्किंगची जागा आहे आणि इथे जे-के पोलिस वाहतूकीचं नियमन करतात. सोनामार्गच्या जवळ थोड्या उंचीवर एक ग्लेशियर (हिमनद) आहे. वेळ असल्यास तिथे चढून जाता येतं. तिथे नेहमी बर्फ असतो. सोनामार्गची उंची २७०० मीटर्स आहे.
काही वेळ परमिशनसाठी आम्ही पार्किंगच्या जागेत थांबलो. सुंदर निसर्गाच्या सान्निध्यातील अविस्मरणीय क्षणांमधले काही क्षण! त्यानंतर आमच्या वाहकाने पोलिसासोबत काही सेटिंग करून घेतली, दादा- बाबा केलं, लांब लेहला जायचं आहे, असं सांगितलं आणि परमिशन घेतली. फक्त सरळ पार्किंगमधून न जाता मुद्दाम इतरांना फार कळू नये म्हणून त्याने गाडी आधी श्रीनगरच्या दिशेला वळवली, थोडं अंतर आणली व मग परत पोलिसाच्या समोरून नेली.... एकदाचं सोनामार्ग ओलांडून आम्ही निघालो. आता परमिशनचा प्रश्न नव्हता. आता आम्ही थेट कारगिलपर्यंत जाऊ शकत होतो. आता कोणी अडवणार नसल्यामुळे हसनजी व ड्रायव्हर आनंदात होते.
श्रीनगर- कारगिल- लेह रस्ता म्हणजे रस्त्याची सर्व रूपं आहेत. साधारण ४७५ किमीचं हे अंतर काही वाहनं सलग १५ तासांमध्ये ओलांडतात. पण बरेच लोक हा प्रवास दोन टप्प्यात कारगिल किंवा द्रासला थांबून करतात. आम्ही द्रास बघून कारगिलला थांबणार होतो. कारगिल साधारण श्रीनगर व लेहच्या मध्यभागी येतं.
सोनामार्ग सोडल्याबरोबर झोजिलाची चढण सुरू झाली. झोजिला हा श्रीनगर- लेह महामार्गावरचा सर्वांत दुर्गम भाग. फोटूला ह्या मार्गावरचा सर्वांत उंच घाट आहे, पण तो तितका दुर्गम नाही, हिवाळ्यातही चालू असतो. पण हिवाळ्यात पाच- सहा महिन्यांसाठी झोजिला बंद होतो; त्यामुळे श्रीनगर- कारगिल वाहतूक थांबते.
.....डोंगरांनी आणखी उंची घेतली होती. आता पांढराशुभ्र कापसासारखा बर्फ नजरेच्या टप्प्यात व बराच जवळ दिसत होता. निसर्गाचं अत्यंत विराट स्वरूप होतं ते. निसर्गाच्या विराट स्वरूपामुळे रस्तासुद्धा बदलला. घाट सुरू झाला. आधी सपाट, मोठा असलेला रस्ता आता कुठे कुठे पायवाट म्हणावी इतकाही नव्हता. रस्ता आडवी वळणं घेत हळुहळु वर चढत होता.
वाटेमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर थोडी दरड कोसळली होती, त्यामुळे जेसीबीद्वारे मलबा हलवून रस्ता समतल केला जात होता. वाहनं थांबत थांबत जात होती. गाडी थांबली की बाहेर उतरून नजारा बघत होतो. तो अनुभव शब्दात सांगणे शक्य नाही. कदाचित फोटोजवरून आली तर पुसटशी झलक मिळेल.
झोजिलाच्या जवळच बालटाल आहे. बालटाल हा अमरनाथच्या यात्रेला जाण्याचा लांबचा मार्ग आहे. डाव्या बाजूला खडा पर्वत होता आणि उजव्या बाजूला दरी होती. त्या दरीच्या पुढे समोरच्या दिशेला बर्फानी बाबा अमरनाथची गुंफा होती. अर्थात अंतर बरंच होतं. दरीच्या तळाशी काही कँप लावलेले दिसत होते. एक हेलिकॉप्टरही दिसलं. वैष्णोदेवीप्रमाणे आम्ही बाबा अमरनाथ ह्यांचंही दर्शन कल्पनेनीच घेतलं.
घाटामध्ये ट्रक्सचा खूप मोठा काफिला लागला. बरेचसे ट्रक्स मिलिटरीचे शक्तिशाली ट्रक्स होते. आधी तो काफिला पास झाला. तोपर्यंत सर्व वाहनं अंग चोरून उभी होती. ते ट्रक्स गेल्यानंतरच परत वाहतूक सुरू झाली. कारण रस्ता काही ठिकाणी अत्यंत अरुंद आहे व म्हणून एकेरी वाहतूक करावी लागते. रस्त्याचं स्वरूप सतत बदलत होतं. काही ठिकाणी अत्यंत अरुंद, कोणत्याही बॅरिअरशिवाय दरीला लागून होता. जसा जसा घाटमाथा जवळ आला, तसा रस्ता आणखी कच्चा व खराब होत गेला. जेमतेम पायवाटीचं स्वरूप त्याला आलं. ह्या वेळी आमच्या गाडीत दोन सैनिकांनी लिफ्ट घेतली. ते ओदिशाचे होते. त्यांच्यासोबत प्रवास करताना रंगत अजून वाढली.
आता बर्फ अगदी डोक्यावर होते. तरीही ते पुष्कळ उंचीवर होते. निसर्गाचं हिरवं स्वरूप हळुहळु कमी होत जाऊन तो खडकाळ होत चालला. पहाड रंग बदलत होते. चिनार वृक्षांची संख्या कमी झाली होती. पुष्कळ उंच चढल्यावर झोजिला घाटमाथा आला. तिथे वस्ती/ घर फार काहीच नाहीत. थोडं पुढे गेल्यावर झोजिला स्मारक दिसतं. जवळच एक कॅम्प होता. तिथे काही वेळ थांबलो. एक मराठी जवान भेटला. मस्त वाटलं आम्हांला आणि त्यालाही. तिथे काही फराळाचं वाटप केलं.
काश्मीरमध्ये अक्षरश: कोणत्याही बाजूला, कोणत्याही ठिकाणी ज्ञात अज्ञात वीरांची स्मारकं आहेत........... आणि आता आम्ही तर द्रासच्या मार्गावर म्हणजे सर्वोच्च कळसाकडे येणार होतो. कारण एक तपापूर्वीच्या कारगिल युद्धाची हीच तर रणभूमी होती.
झोजिलानंतर लगेचच घूमरी हे एक ठाणं येऊन गेलं. इथून आमचा प्रवास आणखी उंचीवर सुरू झाला. कारण पुढचा टप्पा द्रास होतं, जे ३३०० मीटर्स उंचीवर आहे. आता पर्वत जास्त उजव्या बाजूला आला आणि डाव्या बाजूला दरी व नदी होती. मध्ये काही ठिकाणी छोटी कुरणं दिसत होती, त्यामध्ये काही मेंढपाळ लोक दिसत होते. इतर वस्ती मात्र अत्यंत विरळ झाली. मुख्य रस्त्यावरची वाहतुकही नियंत्रित असल्यामुळे कमीच होती.
द्रास नियंत्रण रेषेला लागूनच आहे. त्यामुळे द्रासच्या जवळच्या भागातला श्रीनगर- लेह महामार्ग नियंत्रण रेषेलगतच आहे आणि तो पाकिस्तानच्या मा-याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे तिथे विशेष सुरक्षा असते. झोजिलापासून द्रास तसं ६० किमीच्या आसपास होतं, पण पहाडी रस्ता व सतत वळणावळणाचे घाट, त्यामुळे वेळ फार लागत होता. परंतु आधी वाटत असलेली एक भिती खरी झाली नाही. प्रवासाचा व उंचीचासुद्धा काहीही त्रास झाला नाही. उलट तसा विचार न करता सर्व निसर्ग व वातावरण एन्जॉय करत प्रवास चालू होता. हसनजींशी मधून मधून गप्पाही होत होत्या.
आओ हुजूर आओ......... सितारों में ले चलूं........ दिल झूम जाए, ऐसी बहारों में ले चलूं......
हे गाणं अक्षरश: गाडीत वाजत नसून तिथे ख-या अर्थाने प्रत्यक्षात वाजत होतं, असं वाटत होतं.. जणू खालून वाहत असलेली द्रास नदीच ते म्हणत होती. त्या नद्यांचे प्रवाह निव्वळ भन्नाट. पांढरं शुभ्र, स्वच्छ, ताजं व अत्यंत थंड पाणी. आणि गर्जना करणारा आवाज.... भन्नाट. शब्दच नाहीत. एखादी गोष्ट किती सुंदर असू शकते, किती ग्रेट असू शकते, ह्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात होत्या. एकामागोमाग एक सर्वोत्तम गझल, गाणी म्हंटली जावीत; किंवा एकापाठोपाठ एक सतत सिक्स, चार, सिक्स मारले जावेत; किंवा कोणीतरी येऊन अत्यंत भन्नाट प्रकारे कुंगफू करून दाखवावं, त्यानंतर लगेचच कोणी मार्शल आर्टस करून दाखवावं, अशी मैफल सतत चालू राहावी, अशा प्रकारे सर्व नजारा होता. किंवा हजार बाटल्या रिचवल्यावर जो अनुभव येईल, तसा...... (;0 म्हणजे मानवी क्षमता संपुष्टात येईल, असा अनुभव. किंवा योगाच्या भाषेत इंद्रियातीत अनुभव. असा अनुभव जो आपल्या इंद्रियांच्या सर्व सीमा ओलांडून पुढे जात राहील......
पर्वत आणि दरी. दरीमध्ये नदी. असा प्रवास सुरू राहिला. मध्ये मध्ये नदी ओलांडून रस्ता जात होता. एके ठिकाणी नदीला (बहुतेक द्रास नदी) दुसरा एक प्रवाह येऊन मिळाला व तोपर्यंत पूर्ववाहिनी असलेली नदी पश्चिमवाहिनी झाली. आम्ही पाहिलेल्या नद्यांपैकी बहुतेक नद्याप पश्चिमवाहिन्या होत्या, पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाणा-या होत्या.. झोजिला गेल्यानंतर काश्मीर (खोरं/ घाटी) संपतं. इथून पुढे लदाख सुरू ..................
सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो. द्रासमध्ये येईपर्यंत दुपारचा एक वाजून गेला. अंतर साधारण १७० किमी होतं. द्रास ब-यापैकी मोठं गाव आहे. गावात शिरतानाच एक ओढा रस्त्याच्या जवळून वाहत जातो. त्याचं पाणी अत्यंत थंड होतं. त्या झ-यामध्ये पाणी पिताना समोरच्या बाजूला टायगर हिल दिसते!! सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागातून आम्ही जाणार होतो. द्रासमध्ये जेवण केलं. इथेही सर्व मिश्र चेहरेपट्टी दिसत होती. इकडे आत्तापर्यंत जेवण चांगलं मिळालं होतं. फार अडचण आली नाही. जास्त नकारात्मक विचार न केल्यामुळे आणि घाटावरचा प्रवास मंदगतीने झाल्यामुळे श्रीनगरच्या आधी झाली होती तशी अडचण झाली नाही.
द्रासमध्ये आम्हांला ऑपरेशन विजय स्मारक पाहायचं होतं. हे द्रास- कारगिल रस्त्यावर द्रासच्या थोडं पुढे आहे. द्रास!! टायगर हिल!! कारगिल युद्धाच्या वेळचा सर्व सैनिकांचा टायगर हिल जिंकल्यानंतरचा फोटो आठवत होता.... द्रास हे अत्यंत मोक्याचं ठिकाण आहे. इथून पाकिस्तानची नाकी अत्यंत जवळ आहेत. आमच्या प्रवासातला उत्तरेचा परमोच्च बिंदु द्रास होता. कारण इथून रस्ता थोडा दक्षिणेकडे व पूर्वेकडे जातो.
द्रास हे जगातलं दुस-या क्रमांकाचं वस्ती असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. हिवाळ्यामध्ये तपमान -६० होतं व सर्व जीवन सहा महिने गोठून जातं. इथली उंची जवळजवळ लेह इतकीच आहे. इथे आम्हांला त्रास होत नव्हता. आणि बराचसा प्रवास उंच प्रदेशातून झाल्यामुळे शरीराला थोडा सरावही झाला होता. असं म्हणतात, की सुमारे २००० ते २५०० मीटर्स इतकी उंची सामान्य असते. ती आपलं शरीर सहज सहन करतं. पण तिथून पुढे उंची जर झपाट्याने वाढली, तर त्रास होतो. त्यामुळे अडीच हजार मीटर्स पेक्षा वर जाताना चोवीस तासामध्ये तीनशे मीटर्स इतक्या गतीने जावं म्हणतात. आणि जर जास्त उंचीवर गेलो, तर मुक्काम करताना कमी उंचीवर करावा, असं सांगतात. आम्ही तेच करणार होतो. तेहतीसशे मीटर्सच्या द्रासवरून पुढे जाऊन व थोडं खाली येऊन सत्तावीसशे मीटर्स उंचीच्या कारगिलमध्ये मुक्काम करणार होतो.
द्रास युद्ध स्मारक अत्यंत मोठं आहे. खूप विशाल जागेत पसरलेलं आहे. पण मनात वाटलं होतं, की तिथे भरपूर सैनिक, बघणारे लोक भेटतील. पण तसं झालं नाही. तिथे अगदी दोन- तीन सैनिक भेटले आणि आतमध्ये तर स्मारकात कोणीही व्यक्ती दाखवणारी नव्हती. पण स्मारक भव्य आहे. बलिदान केलेल्या सैनिकांबद्दल व युद्धात लढलेल्या सैनिकांबद्दल भरपूर माहिती आहे. फोटो, नकाशे, युद्धसाहित्य अशा भरपूर गोष्टी आहेत. कारगिल युद्धामधल्या विजयाचंच हे स्मारक आहे. त्यामुळे त्या युद्धाबद्दल भरपूर माहिती आहे. अगदी प्रोजेक्टरचे शोसुद्धा दाखवतात. पण आमची वेळ जरा चुकली होती. भर दुपारी, विरळ हवेतल्या टळटळीत आणि अल्ट्रा व्हायोलेट किरणयुक्त ऊन्हात तिथे भीषण शांतता होती. स्मारकामध्ये एका ठिकाणी हरिवंशराय बच्चन ह्यांची कविता अमिताभ बच्चनने लिहून ठेवली आहे. बहुतेक लक्ष्य चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस लिहिली असेल. आता पुढे आम्ही लक्ष्यच्याच प्रदेशात जाणार होतो.
दोन सैनिकांसोबत थोड्या गप्पा मारल्या. आम्ही सोबत आणलेला फराळ व राख्या त्यांनाच दिल्या, ते पुढे त्या कँपमध्ये पाठवतो म्हणाले. समोरच दूरवर टायगर हिल दिसत होतं. त्याच्याजवळ पांढरा बर्फ चमकत होता.... किती विशेष ठिकाण होतं ते..... अनेक प्रकारे ते भारताचं शिखर/ कळस असल्यासारखं होतं. भारताच्या सेनेचं व पराक्रमाचा अध्याय लिहिणारं शिखर होतं. देशभरातल्या असंख्य ठिकाणचे असंख्य सैनिक.....
कोई गुरखा कोई मदरासी..... कोई जाट मराठा.....
सरहद पर मरनेवाला..................... सरहद पर मरनेवाला हर वीर था भारतवासी...........
पण एका बाजूला जशी ही सैनिकांची शौर्यगाथा आहे, तशीच राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचीही महागाथा आहे. आपल्याच देशाच्या एका भागात आपल्याच नागरिकांना व सैनिकांना किडामुंगीसारखं मरावं लागतं..... शत्रू आतपर्यंत येऊन लढतो....
सैनिकांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या. पण ते औपचारिकतेमध्ये व कडक नियमांमध्ये बांधलेले असल्यामुळे (आणि मराठी नसल्यामुळे) विशेष बोलणं झालं नाही. परत येताना तिथे आणखी बरेच लोक आल्याचं बघून बरं वाटलं.
सैनिकांशी भेटणं व बोलणं हा ह्या फिरण्याचा एक मुख्य उद्देश होता. तो पूर्ण होण्यास सुरुवात झाली होती. सैनिकांना बाहेरूनच पण ब-यापैकी बघण्याची संधी मिळाली होती. जम्मुआधीच्या प्रवासात तर छानच गप्पा झाल्या होत्या.
खरोखर काश्मीर केवळ सैनिकांमुळे भारतात आहे. काश्मीर भागातले (जम्मु व लदाख सोडून) लोक मनाने भारताचा ब-याच प्रमाणात तिरस्कार करतात. त्याला कारणंही आहेत, बरीच, परंतु तरीसुद्धा हे चिंताजनक आहे.
..... त्यामुळे काश्मीरमधून बाहेर पडून लदाखमध्ये आल्यावर शांत वाटत होतं. मुळात तिथला निसर्ग इतका भव्य आहे, की मीपणा, माझं, इगो ह्या गोष्टी उरत नाहीत. माणूस निसर्गापुढे शरण आहे. इतका भव्य निसर्ग होता. मोठे मोठे पहाड, दूरवर दिसणारा बर्फ, मधून मधून दिसणारी हिरवळ.... इतका निसर्ग बघण्याची आपल्याला सवयच राहिलेली नाही. आणि हिमालय म्हणजे तर निसर्गामध्येही सर्वोच्च. त्यामुळे त्सुनामीला भरती येण्यासारखा प्रकार.....
आता पुढचा टप्पा होता कारगिल. कारगिल हेही सर्वश्रुत गाव. अगदी मोक्याचं ठाणं. जरी नियंत्रण रेषेच्या किंचित दक्षिणेला असलं, तरी ह्यालाही तितकंच महत्त्व. तसंच तो जिल्हा व सैनिकी मुख्यालय असल्यामुळे महत्त्व. हिवाळ्यात कारगिल- लेह रस्ता चालू राहतो. त्यामुळे संपर्कासाठी ह्याला महत्त्व.
द्रास ते कारगिल हे साधारण साठ किमी अंतर. घाट नाही, पण उताराचा व म्हणून वळणावळणाचाच रस्ता. निसर्गाचं रूप अजून बदलत होतं. आता हिरवळ बरीच कमी झाली होती. मधून मधून तुटक झाडी दिसत होती. पहाड मुख्यत: बोडके व रखरखीत होते. अगदी छोटी झुडुपं कुठे कुठे दिसत होती. वाटेत अर्थातच सैनिकी चौक्या/ ठाणी लागत होतीच. काही ठिकाणी रस्त्याचं बांधकामही चाललेलं होतं. ह्या पहाडी भागात सदैव सीमा सडक संगठन रस्त्यांची निगराणी करत असते.
आत्तापर्यंत उंचीचा त्रास न झाल्यामुळे आनंद वाटत होता. कारण आता कमी उंचीच्या ठिकाणी जात होतो व पुरेसा वेळ शरीराला मिळाला होता. वाटेत फारशी गावं लागली नाहीत. मधून मधून कुठे दोन- चार हॉटेल- घर दिसायचे. सैनिक तर सतत दिसायचे. इथून पुढचा सर्व परिसर अनेक दृष्टीने लक्ष्य चित्रपटाची आठवण करून देणारा. सैनिकांच्या ट्रक्सचे मोठे जत्थे, रस्त्यावर दिसणारे सैनिक व नाकी, ट्रान्झिट कँप्स..... वेगळंच वातावरण. मित्र त्याचे फोटोही काळजीपूर्वकच घेत होते.
प्रवासात विशेष अडचण आली नाही आणि अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी पाचच्या सुमारास कारगिलमध्ये पोचलो. महामार्ग शहराच्या जवळून जातो. डोंगराच्या बेचक्यामध्ये आणि सुरू नदीच्या काठाशी हे गाव वसलं आहे. त्याचा उच्चार कारगिल नसून करगिल आहे, हेही समजलं. इथे फारसे हॉटेल्स नाहीत आणि जे चांगले होते, ते आधीच फुल होते. तरीही आम्हांला आमच्या हसनजींनी चांगलं हॉटेल दाखवलं. इथे सर्व ठिकाणी त्यांची ओळख दिसत होती. करगिलमध्ये असणारच, कारण ते इथलेच होते.
दाट वस्तीच्या खेड्यासारखं गाव होतं करगिल. सुरू नदी गावाच्या मधोमध वाहते. आणि तीसुद्धा प्रचंड गर्जना करत आणि रोरावत (पुण्यामध्ये मुळा- मुठा नदीला कडेलोट पूर आल्यावर जशी दिसते, तशी)... हॉटेल व परिसर ठीक होता. पर्यटक मोठ्या संख्येत येत असल्यामुळे ब-यापैकी सोयी होत्या. नेट कॅफेसुद्धा होता.
करगिलमध्ये लोक आणखी विशेष वाटले. मिश्र चेहरेपट्टी तर होतीच. पण काही युरोपियन्स, विदेशी पर्यटकही ब-याच प्रमाणात दिसत होते. इथे हिंदु किंवा बौद्ध नाव जवळजवळ दिसतच नव्हतं. इथली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात मुस्लीमच आहे. हा जिल्हा तसा पीओकेशी जास्त जोडलेला आहे. करगिल जिल्ह्यामधला सर्वांत मोठा तालुका स्कर्डू पीओकेमध्ये गेला. मध्य आशियायी व उत्तर काश्मिरी (बाल्टिस्तान, दर्द इत्यादि समूह) समूहांशी ह्यांचं जास्ती साम्य. अर्थात सेनेतले लोक दिसत होतेच.
हॉटेल भर वस्तीत होतं, तरीही नदीची गर्जना पोचत होतीच. जवळच डोंगर दिसत होते. काश्मीरमध्ये सर्व ठिकाणी आकाशवाणीच्या बातम्या ऐकू येतात व सहक्षेपित केल्या जातात, ही एक चांगली गोष्ट आढळली. पण बाकी काहीच ओळखीचं दिसलं नाही. स्थानिक बोलीभाषा, लोक हे वेगळेच वाटत होते. आणि ब-यापैकी दाट व बकाल गाव होतं. कुठून दिसलं तर एखादं पंजाबी किंवा हिंदी हॉटेल दिसत होतं. जिथे उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये इतर अडचण आली नाही. वीजेची व्यवस्था चांगली होती. लॅपटॉप व मोबाईल चार्ज होत होते. एसटीडीसुद्धा होते. मोबाईल नेटवर्क अर्थातच कोणतंही नव्हतं. अगदी इतरत्र चालू असलेले एअरसेल व बीएसएनएल पोस्टपेड इथे बंदच होते.
कारगिल!! नव्हे करगिल!! सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचं ठाणं..... आम्ही चक्क “तिथे” होतो.... प्रचंड उत्तेजनेचा अनुभव घेत होतो. आणखी एक अनुभव हा आला, की उत्साहाच्या भरात भरपूर चाललो, तर लवकर थकत होतो. फार चालवत नव्हतं. हॉटेलवर सामान ठेवून थोडा आराम करून गावात फेरफटका मारला. नदीने गावाचे दोन भाग केले होते व तिचा आवाज व दृश्य निव्वळ भन्नाट होतं. जवळच उत्तुंग पर्वत व थोड्या अंतरावर हिमशिखरंही दिसत होती. करगिलचं महत्त्व म्हणजे ते लेह व लदाखच्या भागामध्ये पुरवठा करणा-या मार्गावर आहे. इथूनच एक रस्ता नियंत्रण रेषेवरील बटालिकला जातो व एक रस्ता दक्षिण काश्मीरच्या झांस्कर भागात जातो. झांस्कर भागात जाणारा हाच मुख्य रस्ता. झांस्कर भाग तसा हिमाचल प्रदेशाला जवळ आहे. तिथून हिमाचल प्रदेशात व जम्मुच्या बाजूला असलेल्या किश्तवाड शहराकडे ट्रेक रूट्स जातात. झांस्करमधून किश्तवाडकडे मेंढ्यांवरून प्रवास केला जातो. अत्यंत दुर्गम भाग होता. झांस्कर म्हणजे दक्षिण काश्मीरमधलं फारसं माहित नसलेलं रम्य नंदनवन आहे. त्याची चुणूक आम्हांला दक्षिणेला दिसणा-या हिमशिखरांवरून येत होती......
“करगिल!!!” अनुभवत त्या दिवशी दहा ऑगस्ट साजरा केला. अत्यंत वेगळ्याच ठिकाणाचा, निसर्गाचा, ख-या हिमालयाचा अनुभव येत होता..........
पुढील भाग: अब तो हमे आगे है बढते रहना......
क्रमश: