Thursday, November 3, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ८

सियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत.....

काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्या अनुभवाचा, त्या भव्य दिव्य विश्वाचा थरार व प्रभाव जाणवतो आहे....... लदाख.......

पेंगाँगवर जाऊन अत्यंत भारावून आणि शरीराने थंड होऊन परत आलो. पेंगाँगवर म्हणजे चीनव्याप्त काश्मीरच्या अत्यंत जवळ गेलो होतो हे ह्यावरून दिसतं. पेंगाँग त्सो........ एक अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभव......

पेंगाँग सरोवर किती तिबेटमध्ये, किती चीनव्याप्त काश्मीरमध्ये आणि उरलेलं किती भारतात आहे आणि आम्ही नक्की कोणत्या भागात फिरलो आणि कोणत्या भागात फिरणार होतो; ते पुढील नकाशांवरून कळेल.


काश्मीरचा नकाशा. जम्मु- श्रीनगर- करगिल- लेह- चांगला- पेंगाँग


लेह- खार्दुंगला- खालसर- पनामिक व खालसर- दिस्कित- हुंदर.

१४ ऑगस्टला सियाचेनच्या उंबरठ्यावर असणा-या भागात जाण्यास निघालो. सियाचेनची एक झलक ह्या व्हिडिओमध्ये बघता येईल. आमच्या ह्या संपूर्ण मोहिमेचं उद्दिष्ट सियाचेनच्या शक्य तितकं अधिक जवळ जाणं; हेच होतं. सियाचेन.... भारताचा जणू मुकुटमणी.... भारतातील सर्वांत मोठी हिमनदी ही फक्त एक ओळख. त्याव्यतिरिक्त भारताचा भारताच्या ताब्यात असलेल्या सर्वांत उत्तरेकडील भागांपैकी एक मोक्याचा भाग.... पाकव्याप्त काश्मीर व चीनव्याप्त काश्मीर ह्यांच्यावर शह देण्यासाठीचं अतिमहत्त्वाचं केंद्र आणि अर्थातच जगातलं सर्वाधिक उंचीचं रणांगण!! सियाचेनचा शब्दश: अर्थ पांढरे गुलाब हा आहे!! भारत- पाकिस्तानमधील सर्वांत ज्वलंत मुद्दा आणि संघर्षाचा केंद्रबिंदु!! इंदिरा गांधींनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असल्या तरी त्यांनी काही चांगल्या व हिमतीच्याही कृती केलेल्या आहेत. त्यामध्ये सियाचेनचा सैनिकी ताबा घेणं व सिक्कीम भारतामध्ये समाविष्ट करून घेणं ह्या आहेत.

सियाचेन अतिदुर्गम आहे. सियाचेन म्हणजे त्याचा माथा- सियाचेन ग्लेशियर (हिमनद) आणि सियाचेन बेसकँप; जो लेहपासून साधारण अडीचशे किमी उत्तरेकडे आहे. सियाचेन ग्लेशियरवर आजवर जेमतेम दोन ट्रॅकिंगच्या मोहिमा गेल्या आहेत. तिथे सामान्य माणूस जाऊ शकत नाही; कारण उंची साडे सहा हजार मीटर्सपेक्षा अधिक आहे व ते अतिदुर्गम आहे. सियाचेन बेस कँपच्या पुढे आठ- दहा दिवस ट्रेक केल्यावर तिथे जाता येतं. आम्हांला सियाचेन बेसकँपवर जायचं होतं; पण त्यासाठी अनुमती मिळू शकली नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सैनिकी गोपनीय भाग. त्यामुळे तिथे काय; पण त्याच्या कित्येक आधी असलेल्या पनामिक ह्या गावाच्या पुढे नागरी लोक (सिविलियन्स) जाऊ शकत नाहीत.... त्यामुळे आम्हांला नाईलाजाने पनामिक व हुंदर ह्या सियाचेन बेस कँपपेक्षा सुमारे शंभर किमी अलीकडे असलेल्या गावीच जाता येणार होतं........ पण सियाचेन इतका उंच व भव्य आहे; की निदान त्याच्या उंबरठ्यावर पोचण्याचं समाधान मिळणार होतं........

१४ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता निघालो. आमचा साथीदार- परीक्षितला डॉक्टरांनी येण्याची अनुमती दिली होती. फक्त जाताना खार्दुंगलावर थांबू नका, असं म्हणाले. पेंगाँगच्या रस्त्यावर जसा चांगला हा रखवालदार होता; तसा नुब्रा खोरे आणि सियाचेनच्या ह्या रस्त्यावर खार्दुंगला हा चौकीदार...... आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जगातला सर्वोच्च मोटोरेबल रस्ता होता! शब्दातीत अनुभूतीच्या ओढीने सकाळी प्रवास सुरू झाला... आम्ही तिघं जण- मी, गिरीश, परीक्षित आणि अर्थातच हैदरभाई. आणि स्कॉर्पियोसुद्धा! ह्या थरारक प्रवासाला निघालो......




लेहमधून बाहेर पडताना दोन दिवस आधी पाहिलेल्या शांतीस्तुपावरून गेलो. लेहपासून जेमतेम चाळीस किमीवर खार्दुंगला आहे. लेहची उंची ३५०५ मीटर्स आहे; तर खार्दुंगलाची ५६०२ मीटर्स फक्त. ह्याचाच अर्थ ह्या चाळीस किमीच्या आतमध्ये उंची सरळ झेप घेऊन दोन हजार पेक्षा अधिक मीटर्सनी वाढणार......... निव्वळ भन्नाट...... त्या उंचीवर शब्द पोचू शकत नाहीत........


खार्दुंगला घाटाच्या रस्त्यावरून खाली लांब दिसणारं लेह शहर आणि ओळखू येणारा शांतीस्तुप...........




उंचावरून खोलवर दिसणारे लेह शहर व आसपासचा भाग (हिरवळ व शांतीस्तुपाचा ठिपका)


बर्फ................. आणि छोटे दिसणारे ट्रक्स....


अद्भुत नजा-याची फक्त सुरुवात......

लेह शहराच्या बाहेर गेल्यावर लगेच चढ सुरू झाला. मोठे मोठे पहाड समोर दिसत होते. बर्फाच्छादित हिमशिखरं जवळ येत होती. बरंच पुढे येऊनसुद्धा शांतीस्तुप दिसत होता. हळु हळु तो ठिपक्याएवढा झाला; पण लांबूनसुद्धा ओळखू येत होता. ही उंची न थांबता जाण्यासाठी थोडी अवघड होती. त्यामुळे मध्ये दोन ठिकाणी थोडा वेळ थांबलो. हॉटेल, थांबायला जागा असा प्रकार नाहीच. घाटामध्येच जिथे जरा मोकळी जागा दिसेल, तिथे गाडी बाजूला घेऊन थांबायचो. गंमत म्हणजे फक्त माणसालाच नाही; तर गाडीलासुद्धा इतकी उंची चढताना ब्रेकची गरज होती!

हवामान ह्यावेळीही तसं चांगलं नसल्यामुळे ढग आलेले होते व नेहमी उन्हाळ्यात पडते त्यापेक्षा जास्त बर्फ पडत होता.... आमच्यासाठी ही अभूतपूर्व पर्वणीच होती...... बराचसा चढ येईपर्यंत रस्ता चांगला होता! (चांगला शब्द आता चांगलाच मनात कोरल्या गेला आहे....) घाट अगदी तीव्र होता. वाटेत अनेक वेळेस सेनेच्या ट्रक्सचा काफिला विरुद्ध बाजूने जात होता. नक्कीच सियाचेनहून ते परत जात असावेत.....

खार्दुंगलाच्या काही किमी आधी साउथ पुल्लू हे एक चेकपोस्ट लागतं. इथे आमच्या वाहनाची व इनर लाईन परमिटसची तपासणी झाली. असे चेकपोस्ट दुर्गम व नियंत्रण रेषेच्या तुलनेने जवळ असलेल्या सर्वच भागांमध्ये असतात. तिथेच एक हॉटेल होतं; त्यामध्ये नाश्ता कम जेवण करून घेतलं. अत्यंत थंड वारे अंगाला झोंबत होते. गरम चहाच्या वाफेमुळे जरा मदत मिळत होती. अर्थात फक्त काही क्षणच. कारण तिथे चहा किंवा गरम पाणीसुद्धा जास्त वेळ गरम राहत नाही. थोडा वेळ ब्रेक मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात साउथ पुल्लूची उंचीसुद्धा फार वेळ तिथे थांबावं अशी नव्हती.....

पुढे अर्ध्या तासाने खार्दुंगला आला................. हवामान खराब असल्यामुळे नेहमीइतकी गर्दी नव्हती, असं हैदरभाई म्हणाले. खार्दुंगलाचं हवामान चांगलापेक्षा अजून बिकट असल्यामुळे इथे सेनेतर्फे चहा दिला जात नाही. पण इथे एक कॅफेटेरिया आहे. जगातला सर्वांत उंचीवर असलेला कॅफेटेरिया, असा मान तो मिरवतो. खार्दुंगला हा जगातला सर्वांत उंच मोटोरेबल (वाहन जाण्यास योग्य) रस्ता आहे, असं म्हंटलं जातं. साउथ पुल्लूच्या पुढे रस्ता अर्थातच कच्चा व त्या वेळी बर्फमय होता. पण इतक्या उंचीवर रस्ता व दळणवळण आहे, हीच मुळात आश्चर्यकारक गोष्ट आहे...... धन्य सीमा सडक संगठन (बीआरओ!)


खार्दुंगला!! तिथेही गोम्पा आहेच!


बर्फही बर्फ हो; सर्दियों का हो मौसम........




बी.आर.ओ.चा फलक आणि तिबेट पद्धतीचे मंत्र लिहिलेल्या पताका


खार्दुंगलाचे रक्षक


हिमाय तस्मै नम:


खार्दुंगलाहून दिसणारी काराकोरम पर्वतरांग व त्या दिशेचे अन्य पर्वत.......


सर्वाधिक उंचीवरील कॅफेटेरिया!!


हात सियाचेनची दिशा दर्शवतो.......


पांढरा शुभ्र!!


सीमाएँ बुलाए तुझे चल राही.... सीमाएँ पुकारे सिपाही.....

खार्दुंगलावर थांबू नये; असं सांगितलं असतानाही थांबण्याचा मोह अनावर झाला. थोडंसं फिरलो. फोटो काढले. पण चांगलाचा अनुभव चांगलाच असल्यामुळे फाजील उत्साह दाखवला नाही. खार्दुंगलाची उंची इतकी जास्त आहे; की तिथून अत्यंत दूर असलेली काराकोरम पर्वतरांग दिसते! काराकोरममध्येच के२ हे सर्वोच्च शिखर आहे व ते पाकव्याप्त काश्मीरच्या टोकाला दूरवर आहे. ते नाही; पण बर्फामध्ये समाधिस्थ झालेली काराकोरम पर्वतरांग व सियाचेनच्या आसपासचे पर्वत आम्ही पाहू शकलो..... काश्मीरमधल्या कोणत्याही भागाप्रमाणे इथेसुद्धा पराक्रमाची पर्वतशिखरं आहेत. काश्मीरमधले अनेक पर्वतशिखर आपल्या नियंत्रणात नसतील; परंतु आपल्याजवळ अगणित सैनिकांचे, वीरांचे आणि श्रमिकांच्या पराक्रमाची शिखरं आहेत.....

खार्दुंगलापासून पुढे घाटाचा उतार आहे. साउथ पुल्लु हे परतीच्या मार्गावरचं चेकपोस्ट आहे. तिथून पुढे खार्दुंग गाव लागतं; ज्या गावामुळे ह्या घाटास खार्दुंगला नाव मिळालं. गाव लहानसंच आहे. इथून पुढे अखंड उतार सुरू..... पण सर्वत्र बर्फाने शुभ्र छत्र धरलेलं. सर्वत्र एकाहून एक उंच पहाड व बर्फच बर्फ दिसत होता. सरळ समोरच्या दिशेत दिसणारे उंच पहाड सियाचेनच्याच मार्गावरचे होते.....



वाटेत थांबण्यासारखं हॉटेल मिळालं नाही. त्यामुळे सरळ पुढे जात राहिलो. अखंड उतार सुरू होता. अर्थातच तीव्र वळणांनी भरलेला. एकामागोमाग एक पहाड जातच आहेत; तरीही जमीन खाली कुठेतरी दूरवर असावी असं वाटत आहे.... तीव्र उतार व त्याआधीची उंची ह्यामुळे थोडं बरं वाटत नव्हतं. शरीराने परत सूचना दिली होती, ‘गड्या तुला जमीनच चांगली...’ पण जमीन लवकर येईचना!! नुसता उतार. अक्षरश: खार्दुंगलापासून पुढे सुमारे साठ- सत्तर किमी नुसता उतार आहे. खालसर हे गाव जवळ आल्यावर खाली जमीन जवळ आल्यासारखी दिसते आणि मग उजवीकडे दरीमध्ये श्योक नदीचं पात्र दिसायला सुरुवात होते. नुब्रा व्हॅली!! खरोखर ही एक लांब प्रदीर्घ पसरलेली दरीच आहे. म्हणूनच खार्दुंगला व पुढच्या सर्व भागाला नुब्रा व्हॅली म्हणतात. इतकी मोठी दरी की जणू पाताळच.... खाली जातोय; खाली जातोय आणि अजून जातोय.... जमीन दूरच आहे...


दरी संपूर्ण उतरल्यावर जमिनीचा तळ लागला...




खडे पहाड आणि पठार.....




पर्वतांनी वेढलेलं पठार व नदी.....




दूरवरून दिसणारे खालसर... नुब्रा खो-याची सुरुवात....

खालसरमध्ये एक रस्ता डावीकडे दिस्कित व हुंदरकडे जातो आणि मुख्य रस्ता सरळ समोर पनामिककडे जातो. पनामिक हे उष्ण झ-यांचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथपर्यंत पर्यटक किंवा सिव्हिलियन्स येऊ शकतात. पनामिकच्या पुढे सेसेर ला, ससोमा अशी गावं गेल्यावर सियाचेन बेस कँप येतो. तिथे सहसा सिव्हिलियन्स जातच नाहीत. आमचा इनर लाईन परमिट पनामिकपर्यंतच होता. तरीसुद्धा तिथून आणखी पुढे जाऊन तर बघू, असा आमचा विचार होता. पण हैदरभाईंनी आम्हांला थांबवलं. ते म्हणाले की, पनामिकपर्यंत आम्हांला लेह कमिशनरने परमिशन दिलेली आहे; तिथून पुढे पनामिकच्या बाहेर गेल्यावर जे-के पोलिसांचं तपासणी नाकं आहे आणि ते आम्हांला निश्चितच अडवणार. कारण ते म्हणाले, की अनेक वेळेस सेनेचे अधिकारी स्वत:च्या ओळखीने अनेक पाहुण्यांना किंवा सिव्हिलियन्सना पुढे घेऊन जातात; पण परत येताना त्यांना जे- के पोलिस अडवतात; कारण त्यांच्याकडे अधिकृत परमिट नसतो.... ह्यातून खटलेही उभे राहतात..... थोडक्यात आम्ही पनामिकच्या पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यासाठी दिल्लीतल्या संरक्षण मंत्रालयाच्या विशेष परमिशनची गरज होती; जी आम्ही घेऊ शकलो नव्हतो.

तरीही, अगदी तरीही, पनामिकच्या त्या अनामिक आणि अपूर्व भागाकडे जाताना भावातीत थरार जाणवत होता...... जिथपर्यंत सिव्हिलियन्स जाऊ शकतात; त्या भारताच्या नियंत्रणातील सर्वांत उत्तरेला असलेल्या भागात आम्ही जात होतो. तसंच तुलनेने इथून प्रत्यक्ष सीमासुद्धा (म्हणजे नियंत्रण रेषेपलीकडील आंतर्राष्ट्रीय सीमा) फार लांब नाही.... जणू भारताच्या उत्तर टोकाजवळ आम्ही पोचलो होतो. शब्द त्या उंचीवर, “त्या ठिकाणी” पोचू शकत नाहीत...

खालसरमध्ये सैनिकी चेकपोस्टवर एका सैनिकाने आमच्या गाडीची व आमची तपासणी केली. तो मराठी माणूस होता! मग काय!! मजा आली; सर्वांनाच आनंद झाला. आमच्याकडील लाडू त्यांना दिले. सियाचेन इथून दिसतं का, अजून किती लांब आहे, इत्यादि माहिती विचारली. ते बोलले, की अजून पुढे सुमारे शंभर किमीवर सियाचेन बेस कँप आहे; आणि एकामागोमाग एक अत्युच्च शिखरे असल्यामुळे सियाचेनचं शिखर दिसू शकत नाही.... हेही नसे थोडके........ आज नाही; तर उद्या........






रौद्र-रमणीय


रुक्ष पहाडांनंतर अशी नदी म्हणजे........ जीवनदायीनी.....


गोम्पा आणि लदाख........ अतूट नातं


श्योक नदीचे विशाल पात्र

खालसरपासून सतत श्योक नदी सोबत करत होती. ही सियाचेनच्या पर्वतरांगांमध्येच उगम पावणारी नदी. प्रवाह बराच मोठा होता. खालसरपासून पुढे रस्ता व आसपासचा प्रदेशसुद्धा बराच समतल झाला. एक मोठं पठार असावं. अर्थात भन्नाट असे पहाड किंचित लांबवरून सोबत करतच होते. उंची कमी झाल्यामुळे कुरणं, चरणारी जनावरं (त्यांचीही कातडी जाड व केसाळ; अगदी कुत्रासुद्धा!) व थोडी शेती बघायला मिळाली. रस्त्यावर वाहतूक अत्यंत विरळ होऊन गेली. बरेचसे लोक खार्दुंगलावरूनच परत जातात. काही दिस्कित- हुंदरकडे जातात. अर्थात सैनिकी वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसत होती. सियाचेन व अन्य ताबारेषेलगतच्या भागांना रसद पुरवठा करणारी वाहने!! खरोखर लक्ष्यचाच हा प्रदेश होता.....


हाँ यही रस्ता है तेरा..... तुने अब जाना है.....

आणि कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावंसं वाटणारं हे गाणं.

अब जो भी हो; बादल बन कर पर्वत पर है छाना......


........ पनामिक गावामध्ये जेवण केलं. तोपर्यंत बरं वाटायला लागलं (जमीन जवळ आली होती ना). पनामिक गावाच्या सुरुवातीला उष्ण पाण्याचे झरे आहेत. गंधकयुक्त पाणी पर्वतातून वाहतं व त्या ठिकाणी बघण्यासाठी ओटा, हौद, पाय-या इत्यादि केलेले आहेत. इथले पर्वत विशेष आहेत. अगदी दिसायलासुद्धा लाल, पिवळे आणि मिश्र रंगांचे दिसतात. हजारो वेळेस जाणवत होतं, की आम्ही जिथे होतो; ती एक अद्भुतच दुनिया होती...........

उष्ण पाण्याचा अनुभव घेतला. तिथे टेकडीवर समोर दिसणारं दृश्य फार मस्त होतं. मध्ये पठार व समोर उंचच उंच पर्वतरांग. दोन्हीच्या मध्ये नदी, नदीच्या आधी रस्ता, त्या रस्त्यावरून जाणारे सेनेचे महाकाय व मजबूत ट्रक्स........ सियाचेन नाही; पण त्याच्या जवळच्या पर्वतरांगा दिसत होत्या...... खार्दुंगलाच्या टोकाच्या उंचीवर आणि तिथून नंतर सरळ पाताळाच्या दरीत आल्यावर शब्द संपून गेले होते..... भावातीत, शब्दातीत, इंद्रियातीत........ भन्नाट, अचाट, सुसाट, विराट, अफाट..............


देखेंगे क्या है पर्वतों के पार...........







त्या टेकडीवरून दिसणा-या दृश्यामध्ये यथासांग डुंबलो... बरेचसे पर्यटक येऊन जात होते. अर्थात त्यातही मराठीच जास्त दिसत होते. भरपूर वेळ “त्या” विश्वात रमल्यावर परत निघालो. परत म्हणजे खालसरपर्यंत उलट येऊन तिथून दिस्कित व हुंदरकडे जाण्यासाठी...... नदीला लागून असलेल्या रस्त्यावर प्रवास सुरू होता....... वाटेत गावं व वस्ती अगदीच थोडी. वाटेत मैलाच्या दगडांवर मात्र सियाचेनच्या वीरांच्या खुणा दिसत होत्या..... भारावलेल्या अवस्थेत प्रवास सुरू होता. खालसरच्या आधी एक गोम्पा धावत्या भेटीत बघितली. विराट निसर्गापुढे माणसाचं अस्तित्व जाणवतंच नव्हतं.





खालसर येण्याच्या आधी आम्हांला हैदरभाईंनी नदीच्या पलीकडे एक वास्तू दाखवली. दिस्कितच्या रस्त्यावरची ती एक गोम्पा होती. दिसायला सरळच समोर दिसत होती; पण जायचा मार्ग खालसरवरून लांबवरून होता...... श्योक नदी........... शब्द नाहीत...............


सियाचेनचा मार्ग.................




वाळवंटातून जाणारा रस्ता!!

परत येताना खालसरमध्ये मराठी अधिकारी दिसले नाहीत. पुढे सरळ दिस्कितच्या मार्गाला लागलो. खालसरपासून दिस्कितकडे जाताना श्योक नदीचा मुख्य प्रवाह लागतो. अत्यंत विस्तृत असा प्रवाह आहे. फार मोठा होता. इतक्या पर्वतीय भागात इतका मोठा प्रवाह बघून आश्चर्य वाटलं. नदीमुळे आसपासचा प्रदेशही थोडा हिरवागार आणि वालुकामय झाला होता. काही ठिकाणी नदीच्या पात्रात वाळवंट होतं. रस्तासुद्धा अशाच एका वाळवंटातून जाऊन दिस्कितच्या बाजूच्या पर्वतरांगेस येऊन मिळतो. नदीचं विशाल पात्र व वाळवंट..... नक्कीच इथे भूतकाळात फार मोठा इतिहास घडला असला पाहिजे. हिमालयातील कितीतरी दुर्गम, अतिदुर्गम शिखरांमध्ये तिबेटी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दिसत होता.... ‘ला’ च्या रूपाने. अतिदुर्गम प्रदेशामध्ये पोचलेली बौद्ध संस्कृती किती गौरवशाली असेल आणि आहे.....


श्योक नदी पात्र व लगतची वाळू


वाळूजवळ असतात तसे दगडगोटे




करामत प्रतिबिंबाची....




निसर्गाचा कुंचला



नदीच्या पाण्यामध्ये पर्वताचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं..... पुढे दिस्कितच्या आधी एक विशाल गोम्पा आणि विशालकाय बुद्धमूर्ती होती. गोम्पा आणि त्यासोबत ब-याच मोठ्या वास्तु होत्या. पण त्या उंचीवर होत्या...... त्यामुळे फक्त गिरीशच त्या नीट पाहू शंकला.... दिस्कित गाव पुढे होतं.






दोघांच्या आकारावरून मूर्ती किती विशाल होती, ह्याचा अंदाज येऊ शकतो...





दिस्कित गाव लहानच आहे. तिथून सरळ पुढे हुंदर (किंवा हुंडर) हे गाव सात किमी अंतरावर लागतं. ह्या ठिकाणी आम्हांला अद्भुतामधला आणखी अद्भुत नजारा पाहायला मिळाला. दोन कुबड असलेल्या उंटांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. असं म्हणतात, की भारतावर सिकंदराने स्वारी केली; तेव्हा त्याच्या उंटांच्या काफिल्यातील काही उंट वाट चुकले. त्यांना दोन कुबड होते. त्याच उंटांचे हे वंशज आहेत, असं म्हंटलं जातं... उंटांव्यतिरिक्त तिथे जवळजवळ सर्व प्रकारचं दृश्य होतं. म्हणजे नदी होती, नदीच्या वाळूमुळे वाळवंट तयार झाला होता (कदाचित तिथे उंट असण्याचं हेच कारण असावं), जवळ पर्वत होते व दूर बर्फसुद्धा होता!!! एकाच वेळी अशा प्रकारचं दृश्य अन्य कुठे तरी दिसेल का? जगप्रवासामध्ये जितकं पाहायला मिळणार नाही; तितकं तिथे एकाच वेळी एका ठिकाणी दिसत होतं. अद्भुत नजारा.............


वाळवंट, पहाड, बर्फ आणि नदी.....


सुंदर हुंदर




दोन कुबडांचे उंट!!








खेळ मांडियेला वाळवंटी काठी........ हो, लदाखला बर्फाळ वाळवंट (कोल्ड डेझर्ट) असंही म्हणतात...






हे लदाखच आहे हो........






ह्या फोटोमध्ये काय काय दिसतं आणि काय दिसत नाही?

तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. हुंदर तसं अत्यंत छोटसं गाव. पण अद्भुत नजा-यामुळे पर्यटनस्थान म्हणून विशेष विकसित केलेलं वाटत होतं. सर्वत्र टापटीप व नीटनेटकेपणा दिसत होता. विदेशी पर्यटकांच्या झंझावाताचा हा एक चांगला परिणाम आहे. हैदरभाईंनी हॉटेल दाखवलं. तेही तिथेच मुक्काम करणार होते. तसंच श्रीनगर ते लेह आमच्यासोबत असलेले हसनजींचे सहकारीसुद्धा तिथे दुस-या पर्यटकांना घेऊन आले होते. हे हॉटेलसुद्धा अप्रतिम होतं; त्यामुळे घरच्यासारखं वाटत होतं.

प्रवासात हैदरभाईंसोबत गप्पा होत असताना अनेक गोष्टी कळल्या. सिव्हिलियन्सना जरी नियंत्रण रेषेलगतच्या भागात जायला परमिशन नसली; तरी ते सेनेच्या कामामुळे अनेकदा नियंत्रण रेषेजवळ गेले होते. अगदी बटालिकपासून चुशूल आणि सियाचेन बेसकँपपर्यंत. आनंदाने सांगत होते, की चुशूलमध्ये सूसू केली तर ती चीनमध्ये जाते..... नियंत्रण रेषा आणि सीमारेषा ह्यामधला फरक त्यांना कदाचित सांगता येणार नाही; पण देशभक्ती निश्चितच सच्ची होती. लदाख विभागामध्ये कुठेही फुटिरता आढळली नाही. उलट तिथले लोक भारताशी खूप घट्ट प्रकारे जोडले गेलेले आहेत.

ह्या सर्व प्रदेशाचा इतिहासही भूगोलाइतकाच रोमहर्षक आणि वेगळा आहे. प्राचीन सिल्क रूट (रेशीम व्यापार मार्ग) इथूनच जात होता. त्यामुळे हा भाग सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. इथे त्यामुळे अनेक राज्ये, संस्कृत्या नांदल्या. हिंदु किंवा इस्लामी संस्कृतीपेक्षा अलीकडच्या काळात इथे बौद्ध संस्कृतीचाच प्रभाव आढळतो. नैसर्गिक व भौगोलिक आव्हानांना तोंड देऊन बौद्ध रितीरिवाज आजही ठामपणे उभे असल्याचं दिसतं. अर्थात एकूण संस्कृती कमालीची मिश्र आहे. बटालिकच्या उत्तरेला नियंत्रण रेषेलगत दहानू हे एक गाव असल्याचं कळालं. तिथे फक्त आर्यन समाजाचे लोक राहतात, असं कळलं. इतर समाजापेक्षा ते अत्यंत वेगळे दिसतात, असं कळालं. एकूणच लदाख व मध्य काश्मीर ह्या सर्व प्रदेशात कमालीची विविधता आहे आणि अजूनही प्राचीन संस्कृतीची मुळे घट्ट दिसतात.

दिस्कित, हुंदर व तुर्तुकपर्यंतचा प्रदेश आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. इथून भौगोलिक दृष्टीने करगिल जवळ आहे. पण सर्व रस्ता नियंत्रण रेषेलगत असल्यामुळे अद्याप प्रशासनाने तो खुला केलेला नाही. त्यामुळे तुर्तुक किंवा दिस्कितपासून करगिलला जायचं असेल, तर लांबवरून लेहमधूनच जावं लागतं. त्यामुळे जरी हा प्रदेश अद्भुत सौंदर्याचा असला तरी तो तितकाच कठिण आणि दुर्गम आहे. सामान्य माणसाचं आयुष्य खडतर नव्हे कमालीचं अवघड आहे.... सर्वच दृष्टीने. तरीसुद्धा इथे निर्मळ हास्य आणि साधेपणा उठून दिसतो.......


सियाचेन नाही, पण सियाचेनच्या उंबरठ्यावर आलो होतो........ इथून कन्याकुमारी व बीजिंग हे जवळजवळ सारख्याच अंतरावर होते..... १४ ऑगस्टची रात्र होती. दुस-या दिवशी स्वातंत्र्यदिन......

माझ्या मित्रांनी घेतलेले काही निवडक व्हिडिओज:

व्हिडिओ १

व्हिडिओ २

व्हिडिओ ३

व्हिडिओ ४

व्हिडिओ ५

व्हिडिओ ६

व्हिडिओ ७

व्हिडिओ ८

क्रमश:

पुढील भाग: दिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा

1 comment:

  1. वा, सुंदर. घरबसल्या काश्मीरच्या मनोहरी सौंदर्याचे दर्शन घडवणारी ही महामालिका आहे.हे सर्व फोटो काढणा-यांचे विशेष अभिनंदन. त्यामुळे हा ब्लॉग आणखी उठावदार झाला आहे.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!