बर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो.....
पेंगाँग त्सो........ शब्दांची गरजच नाही....
बर्फाचे राज्य झाले सुरू
थोडं बर्फामध्ये थिजलो आणि चाललो..... भन्नाट हवामान होतं..... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच होता आणि हा तर काहीच नाही; पुढे खरा बर्फ आहे, असं दिसत होतं. बर्फाचे कण हातात घेतल्याघेतल्या लुप्त होत होते; कारण बर्फाचे ते पुंजके होते. पुढचा बर्फ बघण्यासाठी हैदरभाईंच्या सांगण्यानुसार परत निघालो. पुढे सर्वत्र उंच उंच जाणारा रस्ता आणि बर्फच बर्फ होता. रस्त्याचा चढ व वळणांची तीव्रता वाढली. चांगला जवळ आला होता.
लदाखी गायीमध्ये थंड हवामानामुळे झालेले बदल...
चांगलाला थोडावेळ थांबलो. फोटो काढले व फिरलो. श्वास घेताना किंवा चालताना विशेष त्रास होत नव्हता. बर्फासोबत खेळलो; बर्फ उचलला; फेकला; हातांत घेऊन पाहिला. फिरलो तेव्हा बुटांना बर्फ लागला. डोक्यावरच्या टोपीवर आणि हातमोज्यांवर बर्फ लागला....... पंधरा मिनिटे थांबून निघालो.
वाटेत आलेले ढग......
थंडगार वाहतं पाणी आणि रौद्र पहाड... आहा हा....
बिळातून बाहेर आलेले मरमोट
मरमोटांना खाऊ घालणारे आमचे हैदरभाई
पोलादी पूल
पेंगाँगच्या आधीचे प्रवाह
आला रे आला.... पेंगाँग त्सो आला..
पेंगाँगचं नितळ निळं पाणी (ढग असूनसुद्धा नितळ)
काठावरचे लोक दिसत आहेत
गिरीशलासुद्धा कानटोपी घालावी लागली, इतकं तिथे थंड होतं...
अत्यंत शुद्ध व पारदर्शक पाणी ....
भारतीय भूमध्य समुद्र.....
अविस्मरणीय पेंगाँग त्सोचा चिमटा काढत अनुभव घेतला.......... किना-यावर दोन- तीन ठिकाणी फिरलो.... पाणी अत्यंत थंड होतं व खारंसुद्धा होतं. अत्यंत नितळ, शुद्ध पाणी. सैनिकीदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पर्यटकांच्या सर्व हालचाली अत्यंत नियंत्रित आहेत. त्यामुळे कमालीची स्वच्छता होती. सरोवर संपूर्णपणे साफ होतं. पाणी खारं असल्यामुळे त्यात जीवसृष्टी जवळजवळ नाही. लहान लाटा येत होत्या....... निळा समुद्र..........
आमची स्कॉर्पियो
देखता हुं जहाँ तुम ही तुम हो.... और नजारों में क्या नजारा है...
पेंगाँगचा किनारा
हॉटेल व तंबू
परतीच्या मार्गावर
येताना हैदरभाईने आमच्यासोबत छान गप्पा मारल्या. तो बराच अनुभवी ड्रायव्हर होता आणि छान माणूस होता. अनेक गमतीजमती, प्रवासाचे, ड्रायव्हिंगचे अनुभव सांगत होता. पेंगाँगजवळ एकाची अडकलेली गाडी त्याने कशी सोडवली, ते सांगितलं. शिवाय लेहमधली संस्कृती, पर्यटनामुळे होणारे परिणाम ह्याही गोष्टी त्याच्या बोलण्यात आल्या. त्याने सांगितलं, की विदेशी पर्यटकांच्या प्रभावामुळे बरेच स्थानिक तरुण परकीय मुलींशी लग्न करतात व मग ते ख्रिश्चन होतात व त्यातल्या ब-याच जणांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे संबंध तुटतात. ख्रिश्चन लॉबी इथे खूप सक्रिय आहे, असं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.
थोड्या कमी उंचीवर अशी कुरणं आहेत.
दगडांचा देश
शुद्ध सौंदर्य
काही ठिकाणी असे फिर्यारोहकांचे/ पर्यटकांचे तंबू मध्ये मध्ये दिसत होते.
चांगलामध्ये येताना लागलेला बर्फ
बर्फ हाच परमेश्वर
रस्ता झिगझॅग दिसतो.
जमीन जवळ आली...
काश्मीरमध्ये भारतीय हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेपलीकडे उतरून परत आल्यानंतरचे नाट्य घडल्यानंतर व त्यामधील सरकारद्वारे सांगण्यात येत असलेल्या बाजू व प्रत्यक्षातील घटनेच्या शक्यता समोर आल्यानंतर प्रवासवर्णनाचा सातवा भाग लिहितोय.... दिवाळीमध्ये किंचित थंडी पडली असताना आत्तासुद्धा लदाखमधले थंडीचे सर्द करणारे अनुभव जीवंत आठवत आहेत.
१२ ऑगस्टला लेहदर्शन करून झालं व पुढच्या दिवशी पेंगाँग त्सो बघण्याचं ठरवलं. पेंगाँग त्सो काय चीज आहे, ह्याचा एक पुसटसा अंदाज पुढील फोटोवरून येऊ शकतो.
पेंगाँग त्सो........ शब्दांची गरजच नाही....
पेंगाँग त्सो....... लदाखमध्ये आम्हांला ओढून नेणा-या काही प्रमुख गोष्टींपैकी एक. ह्याच्याबद्दल काहीही सांगणं म्हणजे सूर्याचा परिचय मेणबत्तीद्वारे करण्यासारखं आहे........ तरीही एक ओबडधोबड कल्पना यावी, म्हणून प्रयत्न करतो. असं म्हणतात, की जिथे हिमालय निर्माण झाला, तिथे आधी टेथिस नावाचा समुद्र होता. त्या जागी मध्य आशियायी भूपृष्ठाला भारतीय उपखंड दक्षिणेकडूनयेऊन मिळाला व भूपृष्ठाला वळ्या पडून ताण निर्माण झाला व पर्वत निर्माण झाला. अशा प्रकारे हिमालयाची रचना झाली व अजूनही ही ताणण्याची प्रक्रिया सुरू आहे; ज्यामुळे हिमालयाची उंची दरवर्षी किंचित वाढत असते. तर जो मूळ समुद्र होता, तो ह्या भूपृष्ठामध्ये जवळजवळ लुप्त झाला. परंतु संपूर्णपणे नाही! लदाख, तिबेट किंवा अगदी पूर्वोत्तर भारताच्या हिमालय प्रदेशात (सिक्किम, अरुणाचल इत्यादि) अनेक कित्येक सरोवरे आढळतात. ह्यापैकी काही सरोवरे खा-या पाण्याची आहेत! म्हणजेच मूळ समुद्राने काही ठिकाणी त्याचं मूळ स्वरूप टिकवून ठेवलं आहे! अशा विशाल सरोवरांपैकी एक म्हणजे पेंगाँग त्सो अर्थात पेंगाँग सरोवर.....
पेंगाँग त्सो तिबेटमधला एक विलक्षण त्सो आहे. १२० किमी लांबीचा हा जणू भारतीय भूमध्य समुद्रच आहे! त्याच्या लांबीपैकी सुमारे ३५ किमीचा भाग लदाखमध्ये आणि उरलेला भाग तिबेटमध्ये आहे. आता ह्या ३५ किमीपैकीसुद्धा काही भाग चीनने बळकावलेला आहे. म्हणजेच पेंगाँग त्सोमध्येही आधी नियंत्रण रेषा व त्यानंतर मग भारत- तिबेट सीमा आहे (खरं तर तिबेट हा भारताच एक भूषणावह भाग; पण इंग्रजांनी व नंतर चीन आणि क्षुद्र भारतीय राज्यकर्त्यांनी तो तोडला)... ह्यामुळेच पेंगाँग त्सोमध्ये दल सरोवरात आहेत तशा नौका किंवा वाहतूक नाही. फक्त तिथे रात्री सेनेची मोटरबोट फिरते. असो.
अशा ह्या पेंगाँग त्सोच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता लेहमधून बाहेर पडलो. आज आमचा तिसरा साथीदार परीक्षित येणार नव्हता. ह्या वेळेपासून हैदरभाई हा नवीन ड्रायव्हर आम्हांला सोबत करणार होता. मूळचा करगिलचा असलेला हैदरभाई लगेचच आमचा मित्र झाला. हसनजी व हुसेनजींच्या टीममधले सर्वच लोक आम्हांला अत्यंत जवळचे वाटले, इतके ते चांगले होते. हॉटेलमधून बाहेर येऊन मुख्य चौकात आलो व कारूच्या दिशेने निघालो. तिथे सेवा भारती लदाख आणि अन्य संस्थांची पाटी दिसते.
निघतानाच हैदरभाईने हवा खराब आहे, हे सांगितलं. सगळीकडे ढग आले होते. आधीच्या दिवशी गेलो होतो; त्याच रस्त्याने म्हणजे मनालीला जाणा-या महामार्गावरून बाहेर पडलो. लेहपासून सुरुवातीला हा महामार्ग खरोखर महामार्गासारखा आहे. नंतर दक्षिणेकडे जसा दुर्गम प्रदेश सुरू होतो; तसा तोसुद्धा रंग बदलतो. अर्थात आम्ही त्यावेळी त्या दिशेने जात नव्हतो. लेहमधून निघताना शे पॅलेसच्या आधी आम्हांला हैदरभाईने अमीर खानची शाळा दाखवली. थ्री इडियटसं शूटिंग ह्याच परिसरात झालं आहे व इथे अमीर खानने शाळा काढली आहे. काल आलो होतो; त्या परिसरातूनच पुढे आलो.
येताना वाटेमध्ये शिंदे मोड हे एक वळण लागतं. तिथे हैदरभाईने आम्हांला सांगितलं, की शिंदे नावाचा सेनेमध्ये एक अधिकारी होता. त्याच्या गाडीला एक ठिकाणी अपघात होऊन तो मृत्युमुखी पडला होता. तर हा शिंदे नावाचा अधिकारी रात्री १२ नंतर तिथून जाणा-या गाडीमध्ये फक्त एकटा ड्रायव्हर असेल, तर त्याला भेटतो व सिगरेट मागतो! हैदरभाई पुढे म्हणाला की, अनेक अनुभवी ड्रायव्हर्सचा ह्यावर विश्वास नव्हता. एकदा त्याच्या ओळखीतला एक ड्रायव्हर हे पडताळून पाहण्यासाठी रात्री बारानंतर लेहमधून एकटाच निघाला. आणि त्याला शिंदे भेटला म्हणे!! त्याने त्यावेळपासून मान्य केलं! कोणताही त्रास न देता फक्त सिगरेट मागून घेणारा असा हा शिंदेचा आत्मा! आश्चर्यच.... त्या शिंदे मोडजवळून आम्ही गेलो. कारूजवळ नाश्ता करून निघालो. कारू लेहपासून सुमारे ३५ किमी दक्षिणेला आहे. कारूपासून आम्ही उत्तर पूर्वेकडे जाणारा मार्ग घेतला.
कारूपासून पुढे रस्ता वळणावळणाचा होतो. शक्ती किंवा सक्ती हे गाव लागलं व चांगलाचा घाट जवळ आला. अत्यंत वळणावळणाचा रस्ता....... सकाळची वेळ असल्यामुळे व थोडी खराब हवा असल्यामुळे रस्त्यावर वाहनं जवळजवळ दिसतच नव्हते. सर्वत्र पहाड आणि दूरवर दिसणारे बर्फाच्छादित शुभ्र शिखरं!! “कंधों से मिलते है कंधे” लक्ष्यमधलं गाणं ऐकत आम्ही जात होतो. आमचा प्रवास बराचसा लक्ष्य पार्श्वभूमीतील भूमीतून होत असल्यामुळे ते मॅच होत होतो; आम्हांला वातावरणाचा आणखी फील देत होतं.
इथे एक गोष्ट जाणवली; की भरपूर उंची असूनसुद्धा रस्त्यावर ढग नव्हते; जे अगदी खंडाळा घाटामध्ये किंवा गगनबावडा घाटामध्येही असतात. त्याचं कारणही लक्षात आलं; सभोवती उंचच उंच पर्वत असल्यामुळे ढग खाली येऊच शकत नाहीत.
वाटेतच एके ठिकाणी दोन माणसांनी हात दाखवून गाडी थांबवली व आम्ही त्यांना आत घेतलं. ते स्थानिक आरटीओचे कर्मचारी होते. आणखी पुढे गेल्यावर दूरवर व उंचीवर दिसणारा बर्फ आणखी जवळ आला व बघता बघता आमच्या अगदी समोर आला. चांगलाचा घाट सुरू होईपर्यंत आमच्या रस्त्यावर पांढ-या बर्फाचे पुंजके आले होते!! जणू बर्फाची हलकी सर सगळीकडे पडत होती. हळुहळु तो अधिक मोठा होत होता. एका ठिकाणी थांबलो व थोडं बर्फामध्ये फिरलो.... रस्त्यावर, बाजूला आणि समोर डोंगरावर शुभ्र थर दिसत होता. शब्दातीत अनुभव. शब्द संपले....... आणि पेंगाँग तर अजून किती लांब होता.... नजारा इतका भन्नाट होता; की मलासुद्धा फोटो काढावेसे वाटले..... (:o
बर्फाचे राज्य झाले सुरू
थोडं बर्फामध्ये थिजलो आणि चाललो..... भन्नाट हवामान होतं..... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच होता आणि हा तर काहीच नाही; पुढे खरा बर्फ आहे, असं दिसत होतं. बर्फाचे कण हातात घेतल्याघेतल्या लुप्त होत होते; कारण बर्फाचे ते पुंजके होते. पुढचा बर्फ बघण्यासाठी हैदरभाईंच्या सांगण्यानुसार परत निघालो. पुढे सर्वत्र उंच उंच जाणारा रस्ता आणि बर्फच बर्फ होता. रस्त्याचा चढ व वळणांची तीव्रता वाढली. चांगला जवळ आला होता.
थोड्याच वेळात चांगलाला पोचलो. हा पेंगाँगकडे जाणा-या रस्त्यातला सर्वोच्च घाटमाथा. उंची सुमारे पाच हजार तीनशे साठ मीटर्स म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या जवळजवळ दोन तृतीयांश होती........ चांगला हा सैनिकी दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे सगळीकडेच सेनेचं अस्तित्व दर्शवणारे कँपस, युनिटस दिसत होते. चांगलावर येणा-या पर्यटकांसाठी व प्रवाशांसाठी मोफत चहा दिला जातो. सेनेकडून मिळणारा चहा त्या बर्फाळ वातावरणामध्ये भन्नाट लागतो. सर्वत्र थंडगार बर्फ आणि उंच पहाड!!! बर्फ इतका दाट होता; की रस्त्यावरसुद्धा बर्फ होता; परंतु वाहनं जाणा-या जागेवर वाहनांमुळे तो जमला नव्हता. आम्ही जणू एका वेगळ्या विश्वात आलो होतो. नाही, आम्ही खरोखरच एका वेगळ्या विश्वात आलो होतो. लदाखमध्ये असे अनेक विश्व आहेत.......
लदाखी गायीमध्ये थंड हवामानामुळे झालेले बदल...
चांगलाला थोडावेळ थांबलो. फोटो काढले व फिरलो. श्वास घेताना किंवा चालताना विशेष त्रास होत नव्हता. बर्फासोबत खेळलो; बर्फ उचलला; फेकला; हातांत घेऊन पाहिला. फिरलो तेव्हा बुटांना बर्फ लागला. डोक्यावरच्या टोपीवर आणि हातमोज्यांवर बर्फ लागला....... पंधरा मिनिटे थांबून निघालो.
परमोच्च आनंदाची परिसीमा झाली, असं वाटावं असा नजारा होता.... आणि ख-या लदाख भ्रमणाची ही फक्त सुरुवातच होती..... चांगलाहून पुढे निघाल्यावर हळुहळु बुटामधला व हातमोज्यांमधला बर्फ वितळत चालला आणि तिथे मात्र थंडी चाल करून आली. चांगलापासून पुढे उतारावर लवकरच थंडी आक्राळविक्राळ झाली. चांगलावर फिरताना मजा आली होती; पण इथे थंडीने रंग दाखवण्यास सुरुवात केली. थंडी अक्षरश: अंगात भिनली होती. सर्व शरीर थंडीने कापत होतं. मनाला कितीही मजा वाटत असली; तरी जणू शरीर लाउड अँड क्लीअर आवाजात सांगत होतं, “हे पाहा, हा बर्फ, हा नजारा, हे सर्व ठीक आहे, पण गड्या ही जागा तुझ्यासाठीची नाही..... तुझ्यासाठी आपली जमीनच बरी.....” मनाला बर्फाची, उंचीची ओढ वाटत होती; पण कधी एकदा रस्ता खाली येतो आणि उंचावरचा बर्फ संपतो; असं शरीराला झालं होतं. हातपाय चोळून, हातांवर हात घासून कसं तरी अंग गरम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. दोन्ही हात खाली ठेवून व मांडी घालून बसलो; तेव्हा किंचित बरं वाटलं. पण थंडीचा विळखा मजबूत होता.......
प्रवासात किंचित डुलकी येतच होती. बराच वेळ गाडी पुढे पुढे जात होती. हैदरभाई व गिरीश एकदम मजेत होते. थंडीचा त्यांच्यावर काहीही असर झाला नव्हता! अखेर बराच वेळाने, चांगलाचा उतार संपूर्ण उतरल्यानंतर हळु हळु बर्फ लांबवर गेला..... आणि मग हळु हळु थंडी कमी झाली...... त्यावेळी पहिल्यांदा समजलं की बाईकवरून लदाखमध्ये फिरण्याची आमची योजना किती कच्ची होती..... रस्त्यांची अशी अडचण नाही. अलीकडच्या काळात रस्ते बरेच चांगले झाले आहेत. परंतु रस्त्यावर लोक कोणीच दिसत नव्हते. हैदरभाईंनी सांगितलं की वाटेत गॅरेज लागत नाहीत; जी काही दुरुस्ती असेल, ती स्वत:लाच करावी लागते. त्यामुळे वाहनं येतात ती सर्व दुरुस्ती साहित्य व ते करणारा माणूस घेऊनच........
वाटेत आलेले ढग......
थंडगार वाहतं पाणी आणि रौद्र पहाड... आहा हा....
पुढे आमच्यासोबत बसलेले कर्मचारी उतरले व तांगत्से ट्रांझिट कँपच्या (टीसीपी) पुढे आम्ही पोचलो. इथे खूप ठिकाणी सेनेचे तात्पुरते शिबिर लागतात. अधिक उंचीच्या ठिकाणी ज्या जवानांना ठेवण्यात येतं; त्यांना आधी अशा शिबिरांमध्ये ठेवतात; ज्यामुळे ते ह्या वातावरणाला जुळवून घेऊ शकतात. अक्लायमटायझेशन हा प्रकार इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही जर विमानाने लेहला आलो असतो; तर आम्हांला एक दिवस पूर्ण आराम करून उंचीसोबत जुळवून घ्यावं लागलं असतं. कित्येक लोकांना उंचीचा जास्त त्रास होतो व काही जणांना तर लगेचच कमी उंचीच्या ठिकाणी जावं लागतं....
तांगत्से ट्रांझिट कँपच्या पुढे आम्हांला समोरून परत जाणारी बरीच वाहनं लागली. त्यामध्ये मुख्यत: आमच्या स्कॉर्पियोसारख्या दणकट गाड्यांचाच समावेश होता. पहाटे लेहमधून निघून ते पेंगाँग त्सो बघून परत जात होते. ह्या प्रवासात आम्हांला बाईकर्स कमीच दिसले. ह्या परिसरात अनेक ठिकाणी रस्ता नाल्यांवरून किंवा पहाडामधून येणा-या प्रवाहांवरून जातो. अशा ठिकाणी आर्मीचे पोलादी पूल असतात. लोखंडी पूल असतात. जरी विपरित हवामानामुळे ते विस्कळीत झाले, तरी परत लगेचच जोडता येतात. पोलादी पूलावरून जाताना त्याच्या लाकडी फळ्या हलतात. त्यामुळे धडधडडड.... असा त्यांचा आवाज होतो..... करगिलपासून पुढे कित्येक वेळेस असा आवाज ऐकला होता; तरी त्यांची अजूनही मजा येत होती........ अद्भुत नजारा सुरूच होता....
एके ठिकाणी रस्त्याच्या डावीकडे बरेच लोक उतरले होते. हैदरभाईने गाडी थांबवली... तिथे मरमोट हे रानमांजरांसारखे प्राणी होते! मरमोट हा लदाखच्या उंचीवरच्या काही भागांमध्ये लदाखी उन्हाळ्यात दिसणारा रानमांजरांसारखा प्राणी! त्याला बिस्किटं दिली की तो खातो. हा प्राणी समूहात व बिळामध्ये राहतो. जेव्हा उन्हाळ्यामध्ये तपमान वाढतं (म्हणजे शून्याच्या वर पंधरा- वीस) तेव्हा ते बिळातून वर येतात..... बाकीचे आठ- नऊ महिने ते बिळामध्ये सुप्तावस्थेत असतात.... बघावं तिकडे सगळं नवलच होतं. काही वेळ मरमोटांशी खेळून पुढे निघालो.....
बिळातून बाहेर आलेले मरमोट
मरमोटांना खाऊ घालणारे आमचे हैदरभाई
आता फक्त पेंगाँगची प्रतीक्षा होती....... आमच्यासोबत जाणारी वाहनं कमी होती व येणारी वाहनंच जास्त होती. कारण बरेच जण खराब हवामानुळे लवकर जाऊन परत येत होते..... पेंगाँग जवळ येत होता. तो बघण्याची उत्कंठा वाढत चालली. हवामान काहीसं सौम्य वाटत होतं. उंची कमी झाली नव्हती; पण आता थोडं ठीक वाटत होतं.
रस्ता चांगला होता. आता ब-याच ठिकाणी नाल्यांवरही पोलादी पूल झाले आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. वाटेत एका ठिकाणी एक नाला होता; ज्याला पगला नाला किंवा शैतान नाला म्हणतात. ऑगस्ट २०१०मध्ये लेहमध्ये ढगफूटी आली होती. त्यावेळच्या पावसामध्ये त्या नाल्यावरील पूल व रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. यामुळे त्याच्या बाजूला नवीन पूल बांधला होता.
पोलादी पूल
पेंगाँगच्या आधीचे प्रवाह
रस्ता आणखी पुढे जात होता..... डावीकडून बरेच नाले व नदीसारखे प्रवाह वाहत होते. हळुहळु त्यांचा आकार वाढला. पेंगाँगला मिळणारा प्रवाह वाटत होता. समोर टक लावून पाहत होतो. शेवटी पेंगाँगची पहिली झलक बघायला मिळाली....... अद्भुत नजारा.......
आला रे आला.... पेंगाँग त्सो आला..
काही क्षण थांबून फोटो काढून निघालो.... अजून पेंगाँग थोडा पुढे होता. अखेर तो क्षण आला..... पेंगाँग त्सो...... लदाखमधला एक अद्भुत मुकुटमणी..... सुमारे सव्वाचार हजार मीटर्स इतक्या उंचीवरचा एक भूमध्य समुद्रच....... वर्णनाची गरजच नाही; फोटोच पुरेसे बोलके आहेत.
पेंगाँगचं नितळ निळं पाणी (ढग असूनसुद्धा नितळ)
काठावरचे लोक दिसत आहेत
गिरीशलासुद्धा कानटोपी घालावी लागली, इतकं तिथे थंड होतं...
अत्यंत शुद्ध व पारदर्शक पाणी ....
भारतीय भूमध्य समुद्र.....
अविस्मरणीय पेंगाँग त्सोचा चिमटा काढत अनुभव घेतला.......... किना-यावर दोन- तीन ठिकाणी फिरलो.... पाणी अत्यंत थंड होतं व खारंसुद्धा होतं. अत्यंत नितळ, शुद्ध पाणी. सैनिकीदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पर्यटकांच्या सर्व हालचाली अत्यंत नियंत्रित आहेत. त्यामुळे कमालीची स्वच्छता होती. सरोवर संपूर्णपणे साफ होतं. पाणी खारं असल्यामुळे त्यात जीवसृष्टी जवळजवळ नाही. लहान लाटा येत होत्या....... निळा समुद्र..........
आमची स्कॉर्पियो
देखता हुं जहाँ तुम ही तुम हो.... और नजारों में क्या नजारा है...
पेंगाँगचा किनारा
हॉटेल व तंबू
पेंगाँगच्या किना-याला लागून वाहन जातील अशी एक पायवाट होती. पण त्यामध्ये काही गाड्या अडकत होत्या. आमची स्कॉर्पियोही हैदरभाईने त्यातून नेण्याचा प्रयत्न केला; पण गेली नाही. तिथे एक बुलेट नादुरुस्त झाल्यामुळे सोडून दिलेली दिसत होती. पेंगाँगच्या किंचित वरून एक रस्ता जात होता. तो रस्ता पुढे घाटातून स्पँगमिक गावी जात होता. स्पँगमिक गाव पेंगाँगवर आहे आणि तिथे पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. तंबूमध्ये व्यवस्था होते; परंतु ती महाग असल्यामुळे बरेच जण स्वस्त असा होम स्टे घेतात. आम्हांला परत जायचं होतं; त्यामुळे परत मुख्य किना-यावर आलो.
किना-यावर वाळूमध्ये थोडं फिरलो. पाणी अत्यंत थंड होतं; त्यामुळे फार वेळ पाण्यात पाय ठेवता येत नव्हता. पर्यटकांची बरीच गर्दी होती. थंडी परत वाढली. अंगाला अक्षरश: झोंबत होती. थंडी संपूर्ण शरीरामध्ये भिनत होती. थोडावेळ फिरून झाल्यावर जेवणासाठी तंबूतल्या हॉटेलमध्ये आलो. गिरीशवर थंडीचा काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो मनसोक्त फिरत होता........
तंबूमध्ये जेवणाचे बरेच पर्याय होते; पण महाग होते. म्हणून मग चहा आणि मॅगी घेतलं. तंबू ब-यापैकी बंदिस्त होता व आतमध्ये बरेच जण होते. त्यामुळे थंडी किंचित कमी जाणवत होती. हॉटेल चालवणारे लोक बरेचसे चिनी चेहरेपट्टीचे दिसत होते. त्या थंडीमध्ये गरम मॅगी आणि कडक चहा..... चहा ह्या द्रवापेक्षा चहाचं बाष्प जास्त चांगलं वाटत होतं.......
जेवण करून तंबूबाहेर आलो; तर बरेचसे लोक निघण्याच्या गडबडीत होते. आम्हीही निघालो. साधारण दीड तास पेंगाँग त्सोच्या स्वर्गीय परिसरात होतो.......... आता जाताना खराब हवामान आणि चांगला; ह्यांची थोडी चिंता वाटत होती. अर्थात गिरीश आणि हैदरभाई निवांत आणि निश्चिंत होते. ज्या मार्गाने आलो; त्याच मार्गाने परत निघालो. थंडी जास्त होती; त्यामुळे जास्त वेळ मध्ये थांबावसं वाटत नव्हतं. जाताना आम्हांला एक गोव्याची मोठी गाडी दिसली. GA नंबरमुळे लक्षात आली. पेंगाँग सरोवराची गंमत म्हणजे ते हिवाळ्यात गोठत नाही. फक्त अगदी वरती बर्फाचा थर जमा होतो; पण बाकी पाणीच असतं. अजून एक... अलीकडच्या काळात जागतिक तपमानवाढीमुळे हिमालयामध्ये सरोवरांची संख्या वाढत आहे आणि हे धोक्याचं चिन्ह आहे, असं अलीकडच्या एका नेपाळमध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं होतं. अर्थात त्यावेळी मनात फक्त पेंगाँग त्सो हाच एकमेव विचार आणि अनुभव होता....
परतीच्या मार्गावर
येताना हैदरभाईने आमच्यासोबत छान गप्पा मारल्या. तो बराच अनुभवी ड्रायव्हर होता आणि छान माणूस होता. अनेक गमतीजमती, प्रवासाचे, ड्रायव्हिंगचे अनुभव सांगत होता. पेंगाँगजवळ एकाची अडकलेली गाडी त्याने कशी सोडवली, ते सांगितलं. शिवाय लेहमधली संस्कृती, पर्यटनामुळे होणारे परिणाम ह्याही गोष्टी त्याच्या बोलण्यात आल्या. त्याने सांगितलं, की विदेशी पर्यटकांच्या प्रभावामुळे बरेच स्थानिक तरुण परकीय मुलींशी लग्न करतात व मग ते ख्रिश्चन होतात व त्यातल्या ब-याच जणांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे संबंध तुटतात. ख्रिश्चन लॉबी इथे खूप सक्रिय आहे, असं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.
त्याच्याकडून हेही कळालं की लेह किंवा ब-याच प्रमाणात लदाखमधले मुस्लीम शिया आहेत. तो, हसनजी व हुसेनजी हे सर्व करगिलचे शिया मुस्लीम होते. आणि त्यांची मानसिकता काश्मिरी सुन्नी मुस्लीमांपेक्षा अगदी वेगळी आहे. काश्मिरी लोक ब-याच प्रमाणात भारत विरोधी व पाकिस्तानची बाजू घेणारे आहेत. पण लदाखमध्ये वेगळी परिस्थिती जाणवली. लदाखमध्ये शिया व बौद्ध संस्कृतीमुळे ब-याच प्रमाणात भारतीय वातावरण आहे; फुटिरता जवळजवळ नाहीच. अर्थात त्यामागची कारणंसुद्धा आहे. एक तर इथे काश्मीरप्रमाणे रोज अतिरेकी कारवाया होत नाहीत; रोज गोळीबार, आर्मीची थेट कृती होत नाही. त्यामुळे लोकांना सेनेच्या कारवायांचा त्रास होत नाही. शिवाय लदाख परिसरात नियंत्रण रेषेवरील सेना व त्या सेनेला सहाय्य करणारे पुरवठा विभाग, सीमा सडक संगठन इत्यादि कामामुळे आर्मीद्वारे रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. दळण-वळण, रस्ते ह्याबाबतीत आर्मीचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे सामान्य लदाखी माणूस आर्मीबद्दल विरोधी भावना तर नाहीच; पण एक सौहार्दता व विश्वास बाळगताना दिसतो. पाकिस्तानबद्दल भारतात कुठेही आढळेल इतका विरोध इथेही आढळतो. फक्त पाकिस्तानबद्दल नाही; तर चीनबद्दलही. दिसायला चिनी वंशासारखे दिसत असले; तरी मनाने ते चीनविरोधी वाटले. थोडक्यात लदाख भाग काश्मीरमध्ये असला; तरी भारताच्या कोणत्याही भागाइतकाच भारतीय आहे, असं वाटलं.
थोड्या कमी उंचीवर अशी कुरणं आहेत.
दगडांचा देश
शुद्ध सौंदर्य
काही ठिकाणी असे फिर्यारोहकांचे/ पर्यटकांचे तंबू मध्ये मध्ये दिसत होते.
येताना थंडी तशीच होती. बर्फही मोठ्या प्रमाणात होता. पण किंचित कमी झाला होता. येतानाही चांगलामध्ये थांबलो. मिलिटरीचा चहा घेतला आणि निघालो. थंडीमुळे कधी एकदा बर्फाच्या जाळ्यातून बाहेर व कमी उंचीच्या ठिकाणी येतो, असं शरीराला वाटत होतं. मन अर्थातच पेंगाँग व बर्फाकडे ओढ घेत होतं. चांगला उतरल्यानंतर पुढे बर्फ बराच कमी झालेला होता. दिवसभरात वितळून गेलेला होता. हळुहळु बर्फ लांब मागे दिसेनासा झाला.
चांगलामध्ये येताना लागलेला बर्फ
बर्फ हाच परमेश्वर
रस्ता झिगझॅग दिसतो.
जमीन जवळ आली...
कारूमध्ये चहा घेऊन संध्याकाळी सातच्या सुमारास लेहमध्ये हॉटेलमध्ये पोचलो. पेंगाँगच्या आठवणी मनात होत्या..... हॉटेलवर घरच्यासारखं वातावरण झालं होतं. आमचा मित्र परीक्षित डॉक्टरकडे जाऊन आला होता व तो दुस-या दिवशी आमच्यासोबत येऊ शकणार होता. आम्हांला इतका बर्फ बघायला मिळाला ह्याबद्दल हसनजी व हुसेनजींना आश्चर्य व आनंद वाटत होता. ते म्हणाले की उन्हाळ्यात इतका बर्फ पडत नाही; केवळ आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हांला इतका बर्फ मिळाला.
पेंगाँग व चांगलाच्या चांगल्या आठवणी व अनुभव मनामध्ये अनुभवत तेरा ऑगस्टचा दिवस संपला..... लदाख.... पेंगाँग त्सो......... अद्भुत... अफाट........ आता पुढच्या दिवशी नुब्रा खो-यात जायचं होतं आणि १५ ऑगस्टच्या आधी सियाचेन बेस कँपच्या दिशेने पनामिकपर्यंत जाऊन मग दिस्कित आणि हुंदर पाहायचं होतं........... अभूतपूर्व भ्रमणगाथा सुरूच होती.
क्रमश:
पुढील भाग: सियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत.....
nir.................................................................................................................u r just tempting me to go there..what a photoghaphy and beauty of your words...g8!
ReplyDeleteब्लॉग नेहमीसारखा आहे. पण एकाच विषयाचे (काश्मीर सहल) इतके भाग वाचायला आता कंटाळा येतोय. हे सर्व विषय २ ते ३ भागातही संपवता आले असते. प्रत्येक ठिकाण वेगळे आहे त्यामुळे त्याची माहिती वेगळी लिहण्यासाठी वेगळा ब्लॉग लिहणे आवश्यक आहे. हे स्पष्टिकरण येऊ शकेल. ते कदाचित बरोबरही असेल.
ReplyDeleteपण वाचकाच्या आनंदची सर्वोच्च पातळी जिथे असेल तिथे तो ब्लॉग संपवा असा प्रयत्न असावा. ती सर्वोच्च पातळी किमान माझ्या बाबतीत तरी या विषयासंबंधी निघून गेली आहे.